प्रसिद्ध कादंबरीकर आणि लेखक नंदा खरे यांच्या निवडक लेखांचे संकलन नुकतेच ‘...नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन’ या नावाने विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत पाटील यांनी संकलित-संपादित केले आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक व राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
नंदा खरेंनी ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ हे पुस्तक लिहिले, तेव्हा ‘इंटरनेट’ घराघरांत आले नव्हते वा आजप्रमाणे मोबाईल हाताहातांत रुळले नव्हते. इंटरनेटचा जन्म जरी लष्करी संदेशवहनासाठी साठच्या दशकात झाला होता, तरी तो सार्वत्रिक व्हायला नव्वदीच्या दशकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. ‘गूगल'चा जन्म तसा १९९५मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात झाला असला, तरी रीतसर गूगल कंपनी १९९८मध्ये, म्हणजे बरोबर २५ वर्षांपूर्वी स्थापन झाली. ‘वाय-फाय’ तर त्यानंतर म्हणजे १९९९मध्ये फक्त सादर झाले. ‘वाय-फाय’ (वायरलेस फायडेलिटी) ही संज्ञा परवलीची व्हायला, त्यानंतर दहा-बारा वर्षे लागली.
मोबाईल, इंटरनेट, वाय-फाय हा त्रिकोण आता आपल्या (अगदी अशिक्षित व गरिबांच्याही) जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. शरीराच्या अवयवांपेक्षाही अधिक अपरिहार्य आणि अविभाज्य. कारण व्यक्ती आंधळी असो वा पांगळी, मुकी-बहिरी असो वा अर्धांगवायुजर्जर, त्यांनाही मोबाईल-इंटरनेट-वायफाय हा त्रिकोण जवळ असल्याशिवाय जगण्यात अर्थ वाटत नाही. नंदा खरेंनी ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ लिहिले, तेव्हा ही ‘गूगलक्रांती’ झाली नव्हती.
दुर्दैवाने ‘चॅट जीपीटी’चा वेगाने वाढता झंझावात मात्र त्यांना पाहायला मिळाला नाही, फक्त जन्मखुणा पाहता आल्या. परंतु या गेल्या दोन दशकांत माणसाला या इंटरनेटने जो विळखा घातला आहे. त्यामुळे ज्ञान आणि माहिती, समज आणि सुज्ञता यांतील सीमारेषा पुसट झाल्या आहेत. भविष्यवेध घेताना नवे निकष वा पॅरामीटर्स तयार झालेले नाहीत. खरे या विळख्यातून बाहेर पडताना त्यातील नव्याने प्राप्त होत असलेली अनाकलनीय शक्ती कवेत घेऊ पाहत असत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हा सर्व संदर्भ देण्याचे कारण नंदा खरेंचे ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ १९९०मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांची ‘२०५०’ ही भविष्यवेधी कादंबरी १९९३मध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजेच वर उल्लेखलेल्या त्रिकोणाच्या अगोदर तीस-पस्तीस वर्षे! खरेंचे ‘उद्या’ हे पुस्तक जरी २०१५मध्ये प्रकाशित झालेले असले, तरी त्याची संकल्पना व त्यातील भविष्यवेधी मांडणी मी त्याअगोदर दहा-पंधरा वर्षे त्यांच्याकडून ऐकत होतो. ‘उद्या’चा भविष्यवेध जरी ‘उज्ज्वल’ नसला तरी तो इशारा देणारा आहे. पण सध्याची मानसिकता इशारे दुर्लक्षून विनाशाला आलिंगन देणारी आहे, हेही खरेच!
नंदा खरे म्हणजे एक सतत ऊर्जा फेकणारा विचारस्तंभ होता. ऊर्जा आणि प्रकाशही. तसे पाहिले, तर नंदा लौकिकार्थाने पत्रकार, लेखक, कवी वा प्राध्यापक नव्हते. ते ओजस्वी वक्ता वा प्रवचनकर्ताही नव्हते. ते राजकीय कार्यकर्ता नव्हते, वा दिवसरात्र झपाटलेला समाजकार्यकर्ता नव्हते. परदेशी प्रवास करूनही ते परदेशाभिमुख वा पाश्चिमात्य वा अन्य जीवनशैलींत रमले नाहीत. वैज्ञानिक नसूनही कट्टर विज्ञानवादी! (कित्येक वैज्ञानिक वा डॉक्टर, वा सर्जनही विज्ञानवादी नसतात. असो.)
प्रसिद्धिपराङ्मुख असल्यामुळे (आणि प्रतिष्ठा, पुरस्कार अशा व्यक्तिगर्व वाढवणाऱ्या सामाजिक गोष्टी, समारंभ, व व्यासपीठ वा टीव्ही अशा (सवंग) सार्वजनिक बाबींबद्दल संकोच, नावड, वा नफरत असल्यामुळे) नंदा खरे तसे दूर असत. पण तो माणूसघाणा वा माणसांविषयी तुच्छता बाळगणारा माणूस अजिबात नव्हता. किंबहुना माणूस या प्राण्याबद्दल, विविध माणसांच्या अनेकविध स्वभावांबद्दल, त्यांच्या सर्जनशीलतेबद्दल, कर्तबगारीबद्दल, विविध समाजांबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल व आदर होता. मुख्य म्हणजे आपला समाज!
खरे म्हणजे आपलाच नव्हे, तर जगभरचा - आफ्रिका, चीन, रशिया, अमेरिका, जपान - समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या भाषा, त्यांचे वाङ्मय, त्यांचे चित्रपट वा नाटके या सर्व गोष्टींबद्दल त्यांना अचाट कुतूहल व आकर्षण होते. ती जिज्ञासा, ते आकर्षण आणि त्यासंबंधीचे वाचन, यातूनच त्यांना प्रचंड ऊर्जा प्राप्त होत असे. दृष्टीकोन वैज्ञानिक व मार्क्सवादी पण त्यामुळे त्यातून रुक्षता निर्माण झाली नाही आणि ‘जे जे आपणांसी ठावे, ते जगाला देत राहावे’, या वृत्तीमुळे त्यांनी अक्षरश: विपुल लेखन केले. त्याचा पुरावा म्हणजे प्रस्तुत ग्रंथ आणि इतर सर्व पुस्तके! स्वतंत्र, सर्जनशील लेखन आणि जागतिक वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, लेखक यांच्या लेख-पुस्तकांचे सुलभ अनुवादही खरे उत्साहाने करत. शिवाय चित्रपट व कलाप्रदर्शनांची समीक्षाही!
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
आयुष्यात खूप माणसं येतात, जातात. मात्र नंदा खरे यांच्यासारखा ‘खरा माणूस’ अभावानंच सापडतो!
कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा
..................................................................................................................................................................
नंदांनी त्याचे बहुतेक लेख ‘आजचा सुधारक’ आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके यांमधून केले. शिवाय काही स्फुट वृत्तपत्रीय लेख. प्रस्तुत ग्रंथात अशा सर्व संकीर्ण लेखनाचे संकलन केले आहे. हेसुद्धा जिकिरीचे (आणि जोखमीचेही) होते. कारण सुमारे ४०-४५ वर्षांचे हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची संगती लावणे!
म्हटले तर त्याला संगती आहे, म्हटले तर नाही - संगती आहे वैचारिक धाग्यांची, तात्त्विक भूमिकेची, आणि विषयवैविध्यातून जगाचे आकलन कसे करता येईल, हे सांगण्याची. हे पुस्तक एखाद्या कादंबरीप्रमाणे वा नॉन-फिक्शन ग्रंथाप्रमाणेही वाचता येणार नाही. त्याची तशी आवश्यकताही नाही. शिवाय हा ग्रंथ सलगपणे वाचण्याचीही गरज नाही. विविध विषयांनुसार केलेले विभाग आणि त्यातील लेखांचे विषय पाहून वाचक त्याच्या कलानुसार काय वाचायचे, ते ठरवू शकतो.
‘आजचा सुधारक’ हे म्हटले, तर तसे विशिष्ट उद्देशाने सुरू झालेले नियतकालिक. ते सार्वत्रिक वितरणासाठी असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मास सर्क्युलेशनचा मुद्दाच नव्हता. त्यातील विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत हे उद्दिष्ट असले, तरी त्याचे स्वरूप आणि वितरण हे ‘लोकप्रभा’ वा अगदी ‘माणूस’सारखेही अभिप्रेत नव्हते. संस्थापक-संपादक दि. य. देशपांडे यांनी घालून दिलेल्या मर्यादा (आणि कमांडमेंट्स) त्यांच्या कारकिर्दीत व नंतरही नैतिक व वैचारिक स्तरांवर पाळल्या गेल्या!
‘आसु’च्याच शब्दांत सांगायचे तर - “ ‘आजचा सुधारक’चा लेखक-वाचक मुख्यत: मध्यमवर्गी, शहरी व उच्चवर्णी, वयाने व अनुभवाने परिपक्व व प्रौढ असा आहे.” ‘आसु’च्या वाचक-लेखकाचे त्यांनी असे नेमकेपणाने वर्णन केले आहे. पुढे ते म्हणतात, “पु. ल. देशपांड्यांच्या प्रवासवर्णनावर न थांबता तो पी. साईनाथांच्या ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गुड ड्राउट’ (‘दुष्काळ आवडे सर्वांना’) या पुस्तकापर्यंत पोचतो. ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटापेक्षा त्याला ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’ हा चित्रपट महत्त्वाचा वाटतो. लता मंगेशकरांचे विचार ऐकण्यापेक्षा मेधा पाटकरांचे विचार ऐकायला आवडते. भा. रा. तांब्यांपेक्षा केशवसुत आणि मंगेश पाडगांवकरांपेक्षा नारायण सुर्वेही त्याला महत्त्वाचे वाटतात. वरील सर्व उदाहरणांमध्ये पहिल्या पर्यायाबद्दल अनादराची भावना नसून त्या-त्या क्षेत्रातील त्या व्यक्ती वा कृतींबद्दल आदरच आहे. पण येथे दुसऱ्या पर्यायांपर्यंत पोचण्याची वृत्ती ठसवायचाच हेतू आहे.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खरे म्हणजे खरेंना इतक्या विविध विषयांमध्ये रस होता, जिज्ञासा होती, ज्ञानेच्छा होती की, ती बौद्धिक भूक त्यांना फक्त वाचन व लेखनानेच भागवणे शक्य होते. असे असले तरी खरेंनी तथाकथित ‘लोकप्रिय’ विषयांवरही ‘आसु’मध्ये लेखन केले आहे. विविध लोकप्रिय नियतकालिके त्यात येतात. दैनिके, लघुविषय हाताळणारी नियतकालिके आणि क्वचित काही मुलाखती, चर्चासत्रे!
पण मुद्दा तो नाही. ‘आसु’ला - म्हणजे नंदा खरेंना - आहे ती सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती मंजूर नाही. ती बदलण्याची (तातडीची) गरज आहे आणि आपल्यावर ती जबाबदारी आहे, असे त्यांना वाटते. त्यांचे साहित्य ‘स्वान्तसुखाय’ नाही, जरी त्यांच्या कादंबऱ्या आनंदही देतात, शैली व भाषेचे अवडंबर न माजवता त्यांचे सौंदर्यही जपतात आणि अतिशय सुप्त पण विनोदही त्यात आणतात. हेच गुण ‘आसु’मधल्या पुढील लेखांमध्येही वाचकाला आढळतील. फक्त ‘आसु’मधील नव्हे, तर इतरही लेखनातून त्यांची ही आर्तता जाणवते. परंतु खरे कधीही पारंपरिक वा पोथीनिष्ठ घोषणाबाज पुरोगाम्यांच्या सापळ्यात अडकत नाहीत.
पुरोगाम्यांनी एक प्रकारचे ‘कम्फर्ट झोन’ तयार करत आपला परिवर्तनवादी विचार त्यात सफाईने बंदिस्त केला आहे. म्हणजे म्हटले तर वैचारिक बंडखोरी आहे, पण ती चौकटीत बंदिस्त करून आत्मगुंजनी समाधान देते. नंदा खरे म्हटले तर ‘स्थितिवादी’, म्हटले तर ‘शहाजोग’ वा कधी कधी बौद्धिक औद्धत्याच्या सापळ्यात स्वत: पडू इच्छित नाहीत, वाचकाला पडू देत नाहीत आणि त्यांच्या लेखकांनाही त्या मानसिकतेतून बाहेर काढतात. म्हणूनच उत्तर-आधुनिकतावाद उर्फ ‘पोस्ट-मॉडर्निझम’च्या ‘इंटेलेक्चुअल फॅशन’च्या विरोधात ते ‘वैचारिक तलवार’ घेऊन उभे ठाकतात. असे वैचारिक संघर्ष खुद्द मार्क्स व लेनिनच्या काळातही हिरिरीने लढले गेले आहेत.
मला आठवते, चीनच्या सांस्कृतिक क्रांतीच्या काळात (१९६६-७६) एक वाद माओंनी उपस्थित केला होता. चिनी कम्युनिस्ट पार्टीत काही तज्ज्ञ मंडळी होती - अनेक क्षेत्रांत. विज्ञान, राज्यशास्त्र, नियोजन व अर्थशास्त्र वगैरे. या ‘इंटेलेक्चुअल्स’ आणि ‘एक्स्पर्ट्स’चा समाजात व पक्षात खूप दबदबा असे. त्याचप्रमाणे पक्षातही काही चळवळी कार्यकर्ते, उत्साही आणि सतत क्रियाशील असत. त्यांचा दबदबा त्यांच्या प्रत्यक्ष ‘रस्त्यावर’ उतरून कार्य केल्यामुळे असे. त्यातूनच तो वाद निर्माण झाला.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
‘अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी वेगळ्या दृष्टीकोनातून
येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...
..................................................................................................................................................................
माओंनी ‘तज्ज्ञ आणि कार्यकर्ते’ - म्हणजेच ‘एक्स्पर्ट्स’ आणि ‘ॲक्टिव्हिस्ट्स’ असे दोन तट उभे केले. दोघांपैकी कोणाचाच दबाव समाजावर, पक्षावर, प्रशासनावर असता कामा नये, अशी माओंची भूमिका होती. खरी समता प्रस्थापित करायची तर केवळ भांडवलशाही यंत्रणा काढून पुरेसे नाही, तर भांडवली वृत्ती आपल्या स्वभावातून व सामाजिक व्यवहारातून दूर केली पाहिजे, अशी ती सांस्कृतिक क्रांतीची मांडणी होती.
भांडवलशाही म्हणजे केवळ उत्पादनसाधनांची खाजगी मालकी नव्हे, तर आपण कुणीतरी विशेष आहोत, इतरांवर अधिकार गाजवू शकतो, अशा पदावर आहोत, असे वाटणे वा वागणे हीपण भांडवली वृत्ती आहे. ती नाहीशी करणे हासुद्धा भांडवलशाहीविरुद्धचा संघर्ष आहे.
नंदा खरे त्या सांस्कृतिक क्रांतीचे उदाहरण देत नसले, तरी साधारणपणे त्या विचाराच्या जवळ जाणारी भूमिकाच ते ‘आसु’मध्ये मांडतात. चळवळीत न पडता नुसतेच लेख प्रस्तुत करणे हापण ‘कम्फर्ट झोन’ नाही का’, या संभाव्य प्रश्नाच्या उत्तरादाखल, “मला तसे वाटत नाही. आगरकरांचा ‘सुधारक’ हा लोकाग्रणींमध्ये मतपरिवर्तन करणे या हेतूने काढला व चालवला गेला. लोकाग्रणी म्हणजे आजच्या भाषेत ‘ओपिनियन मेकर्स’!” असे त्यांनी म्हटले आहे.
खरेंनी अशा वैचारिक प्रबोधनाला, ‘ओपिनियन मेकिंग’ला, वेगळ्या स्तरावरचे कार्यच मानले आहे. त्या अर्थाने नंदा खरे हे ‘ॲक्टिव्हिस्ट’च आहेत. जोन रॉबिन्सनचे ‘कल्चरल रिव्होल्यूशन इन चायना’ हे काहीसे दुर्मिळ असलेले पुस्तक खरेंनी माझ्याकडून आवर्जून मागून घेतले होते.
चळवळीत काम करणाऱ्या अनेक प्रकारच्या कार्यकर्त्यांशी ‘नंदाकाकां’चे व्यक्तिगत संबंध होते. मग ते कम्युनिस्ट चळवळीतले कुमार शिराळकर असोत वा सुधीर बेडेकर. शिराळकर ॲक्टिव्हिस्ट आणि बेडेकर ‘इंटेलेक्चुअल’. खरेंचा संबंध डॉक्टर अभय बंग यांच्या ‘शोधग्राम’मधील निर्माणच्या कार्यकर्त्यांशी होता, तसाच ग्रामीण रोजगाराच्या चळवळीत काम करणाऱ्या अश्विनी कुलकर्णीशीसुद्धा. जयदीप हर्डीकरसारख्या थेट शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार-लेखक-संघटक-कार्यकर्त्यांबरोबर आणि रवींद्र पंढरीनाथसारख्या विचक्षक वाचक लेखक क्रियाशील स्वयंसेवकाबरोबरही. तरुण कवी (विशी-पंचविशीतलेही) त्यांच्याकडे येत आणि ‘नवलेखक’ही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘नंदा खरे निर्मित-दिग्दर्शित’ ही एक न स्थापलेली, अदृश्य भासणारी, पण अस्तित्वात असलेली संस्थाच होती. या सर्व व्यापक नेटवर्किंगचे व त्यातून येणाऱ्या मुद्द्यांचे, तसेच समाजातील समस्यांचे दर्शन आपल्याला या लेखनात प्रत्ययास येते. किंबहुना म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्याकडे सातत्याने येत, त्यांच्याशी चर्चा करत आणि काही बौद्धिक / वैचारिक शिदोरी बरोबर घेऊन जात. हे सर्व उद्योग नंदा स्वत:चा व्यवसाय व त्या अनुषंगाने येणारी बंधने पाळून करत.
नंदा स्वत: सिव्हिल इंजिनीयर. त्यातही धरणप्रकल्प बांधणारे. त्यामुळे त्यांचा थेट संबंध पाण्याचा प्रश्न आणि शेतीविषयक समस्यांशी येत असे. साहजिकच केवळ ‘सैद्धान्तिक'-बौद्धिक-वैचारिक-वाद-प्रतिवादी मांडणी न करता ते शेतकऱ्याच्या आत्महत्यांपासून ते अगदी देशातील अन्नधान्य उत्पादनापर्यंत आणि अमेरिकेवर एकेकाळी अवलंबित असलेल्या ‘पी एल ४८०’ धान्यापर्यंत सर्व गोष्टींची सविस्तर चिकित्सा करतात. या ग्रंथात शेतीविषयक, जमीनविषयक, कृषितंत्रज्ञानविषयक आणि शेती-अर्थव्यवस्थेसंबंधातील लेखन ‘शेती’ विभागात संकलित केले आहे.
त्यांच्या मांडणीत आणि प्रचलित पुरोगामी मांडणीत अनेक वेळा अंतरही असे. त्यामुळे त्यांचे वादही होत. पण त्यातून कधी कटुता आल्याचे मी पाहिले नाही. त्यामुळे या लेखनातही ती कटुता नाही. ‘पॉलेमिक्स’ उर्फ वाद-प्रतिवाद कधी-कधी शत्रू निर्माण करतात, तर कधी शत्रुत्व न येता दुरावा निर्माण करतात. खरे सर्वांचे ‘मित्र’ नव्हते, पण अजातशत्रूही नव्हते. जो शत्रू नाही, तो मित्रच असला पाहिजे असे नाही.
आपल्याकडे ‘बुद्धिवादी’, ‘बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘बुद्धिजीवी’ असे शब्दप्रयोग ‘इंटेलेक्चुअल्स’साठी वापरतात. परंतु माझ्या मते त्यातून ‘इंटेलेक्चुअल्स’ या शब्दातील अभिजनपणा आणि त्याचा सामाजिक रोल नीटसा स्पष्ट होत नाही. चिनी भाषेत तो कसा मांडला गेला असेल, याची कल्पना नाही, पण तसा अनुत्पादक अभिजन वर्ग सगळ्या समाजांमध्ये असतो. आपल्याकडचा ‘ब्राह्मण्यवाद’ हासुद्धा एक प्रकारचा ‘एलिटिस्ट’ अभिजन वर्गवादच आहे! नरेंद्र मोदी वा संघपरिवार याच अभिजनवर्गाचा उल्लेख ‘खान मार्केट गँग’ किंवा ‘जेएनयू’ची ‘टुकडे टुकडे गँग’ असा करतात. असो.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
आयुष्यात खूप माणसं येतात, जातात. मात्र नंदा खरे यांच्यासारखा ‘खरा माणूस’ अभावानंच सापडतो!
कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा
..................................................................................................................................................................
भांडवलशाहीच्या आताच्या अवस्थेमध्ये ‘इंटेलेक्चुअल सेलिब्रिटी’ असाही एक थर असतो. जगभर या वर्गाचा दबदबा मीडियामार्फत तयार झाला आहे. त्यात टीव्ही अँकर्स, टीव्ही आर्टिस्ट्स, संपादक, फॅशन डिझायनर्स, प्रोग्रॅम कॉर्डिनेटर्स असे अनेक जण असतात.
रेजीस डेब्रे या फ्रेंच मार्क्सवादी विचारवंताने तर असे म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांत विद्वज्जनांपेक्षा ‘फॅशन सेलिब्रिटीज’ अधिक ‘प्रभावी’ झाले आहेत, किंबहुना आता तर व्यासंगी ‘स्कॉलर्स’ना मीडियात स्थान मिळाले नाही, तर त्यांची सामाजिक सांस्कृतिक किंमत (म्हणजे व्हॅल्यू) कमी होते. त्यामुळे विद्वानसुद्धा, अगदी वैज्ञानिक, संशोधकसुद्धा, मीडियात उतरण्याचा प्रयत्न करतात. विद्यापीठांची जागा टीव्हीने (आता व्हॉट्सॲप विद्यापीठ) आणि अभिजात कलावंतांची जागा मीडिया सेलिब्रिटीजनी घेतली आहे.
एका समाज-मानसशास्त्रज्ञाच्या मांडणीनुसार आता मीडिया मॅनेजमेंट आपली स्वभावशैली, विचारसरणी, समाजव्यवहार ठरवणार! नव्हे, ठरवत आहे. टीव्ही, इंटरनेट, फोर-जी, फाइव्ह-जी वगैरे बाबींनंतर जो माहितीस्फोट झाला आहे. त्यामुळे आपले आयुष्य (मानसिक / वैचारिक / व्यावहारिक) मीडियाने व्यापले आहे. अजून या मीडिया माहौलचा किती खोल व व्यापक परिणाम समाजावर / व्यक्तीवर / राजकारण-अर्थकारणावर झाला आहे, होणार आहे यांबद्दल पुरेसे समाधानकार विश्लेषण झालेले नाही. काही मार्क्सवादी विचारवंत तो प्रयत्न करत आहेत.
नंदा खरे मार्क्सवादी होते असे मी वर म्हटले, पण म्हणजे नक्की काय? देशात जे दोन प्रमुख कम्युनिस्ट पक्ष आहेत. त्यांपैकी कुणाचेही ते सदस्य (कार्ड होल्डर) नव्हते. देशात जे २५-३० नक्षलवादी व माओवादी गट आहेत, त्यांच्याबरोबरही ते नव्हते. शिवाय अनेक छोटे-मोठे मार्क्सवादी अभ्यासगट व कामगार / शेतकरी / आदिवासी चळवळी होत्या, त्यांपैकी कोणाचबरोबर ते नव्हते.
शिवाय ते सरळ सरळ पंडित जवाहरलाल नेहरूंचे समर्थक होते - म्हणजेच मतदानाच्या राजकारणात ते काँग्रेसला अधिकांश मत देत असत. (म्हणजे काँग्रेस पक्षाचे सर्व काही त्यांना मान्य होते असे नाही.) हिंदुत्ववाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या इतर चलाख नावांनी काम करणाऱ्या संस्था यांपैकी कुणाहीबरोबर ते जाणे शक्यच नव्हते. (नागपूरमध्ये राहूनही!)
मग ते मार्क्सवादी होते म्हणजे काय? या जगाचा (आणि जगण्याचा) अर्थ बऱ्याच तत्त्वज्ञांनी लावला आहे. ‘आपली जबाबदारी आहे, हे (अन्याय्य, विषम, दु:खी, बेपर्वा) जग बदलण्याची!’ या मार्क्सच्या भूमिकेशी ते पूर्ण सहमत होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्याचबरोबर ते हेही मानत की, अनेक तत्त्वज्ञ, लेखक, विचारवंतांनी या जगाचा आणि जीवनाचा, इतिहासाचा आणि भूगर्भशास्त्राचा, भूगोलाचा आणि अथांग विश्वाचा अर्थ लावला असला, तरी संशोधन चालूच आहे. त्या संशोधनाच्या ‘कारवाँ’मध्ये, त्या शोधयात्रेमध्ये, आपण सामील व्हायलाच हवे. मगच प्रस्थापित, अन्याय्य, विषम, दु:खी जग बदलता येऊ शकेल.
या ग्रंथात त्यांनी अथांग विश्वाचा वेध घेतला आहेच, पण या भूतलावरील मानवी संबंधांचाही. इतिहासाचा अर्थ लावताना नवे निष्कर्षही मांडले आहेत. ते लौकिक अर्थाने खगोलशास्त्रज्ञ नव्हते वा इतिहासकारही नव्हते, पण त्यांचे लेख (व त्या लेखांपैकी काहींची विस्तारित पुस्तके - मग ती मानववंशाची कहाणी असो वा दगडधोंड्यांचा मनोवेधक अभ्यास) हे विलक्षण उद्बोधक आहेत. त्यांचा मार्क्सवाद असा जग समजून घेत घेत ते बदलण्याचा होता.
इतरांप्रमाणेच त्यांनाही दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन मेंदू (लहान व मोठा) होते. पण त्यांच्या लेखन-चिंतनावरून मला असे वाटत असे की, त्यांचा दिवस चोवीस तासांचा नव्हे, तर जास्त असावा, इतके विपुल त्यांनी सादर केले आहे.
या पुस्तकातील लेखांवरून कुणालाही हे सहज लक्षात येईल की, विचारविश्वात मात्र नंदा खरे अस्सल (युरोपीय!?) ‘लिबरल’ होते. त्यांचा उदारमतवाद हा - विशेष म्हणजे त्यांच्या मार्क्सवादातून आला आहे! त्यामुळेच कार्ल पॉपर (पुस्तकात त्यावर भाष्य आहे) आणि पंडित नेहरू, बर्ट्रांड रसेल आणि आइन्स्टाइन व ओपेनहायमर यांच्यावर खरे दिलखुलास लिहू शकतात. जे कर्मठ-कडवे मार्क्सवादी असतात, ते इतक्या मोकळेपणाने व थेटपणे नेहरू व पॉपर व एकूणच उदारमतवाद यांबद्दल लिहीत वा बोलत नाहीत. पूर्वीचे कट्टर ‘ॲन्टी-कम्युनिस्ट’ गेल्या काही वर्षांत ‘ॲन्टी-लिबरल’ किंवा उदारमतवादविरोधी झाले आहेत. त्यामुळे जगभर उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढला आहे.
मी तर धार्ष्ट्याने असेही म्हणेन की, जरी नंदा बुद्धिप्रामाण्यवादी व भौतिक-ऐहिक परंपरेतले ‘इंटेलेक्चुअल’ असले, तरी त्यांचे विचार, वाचन व दृष्टीकोन अधिकाधिक प्रगल्भ होत गेला, तोच मुळी ‘आजचा सुधारक’मुळे. (दि. य. देशपांडे व मोहनी यांच्या बौद्धिक सहवासामुळे.) दि. य. देशपांडेंचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा स्वभाव, त्यांचे चिंतन आणि त्यांची मांडणी, यावर एक उत्कृष्ट लेख या ग्रंथात आहे. दि. य. देशपांडेंचा विवेकवाद हाच एका स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्यावरचे विवेचन या ग्रंथात आले आहे. म्हणून मी ते प्रस्तावनेत घेऊ इच्छित नाही.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
‘अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी वेगळ्या दृष्टीकोनातून
येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...
..................................................................................................................................................................
एकूणच तंत्रज्ञान माणसाच्या बुद्धीवर कुरघोडी करू शकेल, त्याची मतं बदलू शकेल वा घडवू शकेल आणि राजकारण-समाजकारणाचा बाज बदलू शकेल, याचे भान नंदांना होते. पण ते युव्हाल नोआ हरारी या सध्या गाजत असलेल्या तत्त्वचिंतकाच्या ‘सुपर-तंत्रज्ञान क्रांती’च्या विचारांच्या आहारी कधीही गेले नाहीत. ते हरारीपासून चार हात दूरच होते. माझ्या मते नंदांनी त्याचे विचार ऐकून-वाचून त्याचा प्रतिवाद करायला हवा होता, पण ते त्या अत्याधुनिक तत्त्वज्ञाच्या फंदातच पडले नाहीत. असो.
खरेंनी हरारींना जरी जास्त भाव दिला नाही, तरी स्वत:च्या विचक्षक आणि विश्लेषक पद्धतीने ते यंत्रसंस्कृतीचे मंत्र अभ्यासत राहिले. विशेषत: गेल्या वीस वर्षांत मेंदू आणि मन, मेंदू आणि संगणक, मेंदूची उत्क्रांत होत गेलेली स्थिती आणि संगणकाची होत असलेली ‘उत्क्रांती’ (वा विकास); इतकेच नव्हे तर एकूणच मानसशास्त्र याचा त्यांनी अभ्यास सुरू केला होता.
या विषयावर ढोबळ व पूर्वग्रहदूषित मांडणी करणाऱ्यांना नंदा अक्षरश: फैलावर घेत असत. मग तो कुणीही असो - पुरोगामी (समाजवादी) विचाराचे पळशीकर असोत वा राजीव साने असोत, वा प्रा. पांढरीपांडे असोत; नंदा खरे त्यांच्या विचारातील तर्क-अशुद्धी, अवैज्ञानिकता थेटपणे दाखवून देत. एकूणच मन आणि मनोव्यापार हा नंदांच्या चिंतनाचा (आणि चिंतेचा) विषय झाला होता.
मुद्दा हा की, कट्टर विज्ञानवादी असल्याने नंदा खरे विज्ञानाच्या मर्यादासुद्धा वैज्ञानिक चिकित्सेने अभ्यासत असत. राजकारण आणि राज्यशास्त्र विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही, पण म्हणून त्याबद्दल खरेंनी नफरत दाखवली नाही. (राजकारणी व्यक्ती, सत्ताकारण आणि पक्ष यांबद्दल ते कठोर आक्षेप घेत असले तरी राजकारणाबद्दल व राजकीय प्रशासनाबद्दल ते गांभीर्याने विचार करत असत, हे या ग्रंथातील लेखांवरूनसुद्धा दिसून येईल.)
किंबहुना सिंगापूर असो, वा स्वीडन-अमेरिका असो, वा ब्रिटन-रशिया असो, वा चीन - तेथील राज्यपद्धती, राज्यकर्त्यांची विचारसरणी, त्यांचा मीडिया, वृत्तपत्रस्वातंत्र्य व त्याचा होणार संकोच, त्या-त्या देशांमधील चळवळी यांबद्दल ते किती सजग व बारकाईने पाहत असत, हे त्यांच्या अमेरिकेतील घटनांवरील भाष्यातून समजू शकेल. मग तो ‘शिकागो सेवन’सारखा चित्रपट असो वा ओपेनहायमरचा खटला व त्यावरील चित्रपट!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ते निराशावादी नसले तरी आजूबाजूची परिस्थिती मात्र त्यांना अतिशय निराशाजनक वाटत असे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर तर अधिकच! पण म्हणून त्यांनी त्यांचे बौद्धिक-राजकीय-वैचारिक जागृती करण्याचे कार्य कधीही खंडित होऊ दिले नाही. मोदीप्रणित फॅसिझमविरोधी लढा दीर्घ काळ चालणार, मोदींनंतरही त्या प्रवृत्ती व विचारांशी लढावे लागणार असे त्यांचे मत होते. म्हणूनच विचारसंपन्न संचित ते लेखनातून निर्माण करत होते.
मोदी-राज आल्यापासून ते सतत जॉर्ज ऑर्वेलच्या लेखनाचा जप करत. ते स्वाभाविक होते. ऑर्वेलने ‘1984’ आणि ‘ॲनिमल फार्म’मध्ये वर्णिलेले सर्व प्रसंग, त्यांतील हिंस्र-विसंवादी मांडणी आणि सामान्य माणसाला दिङ्मूढ करणारे अंतर्विरोध गेली नऊ-दहा वर्षे आपण अनुभवत आहोत.
विज्ञान आणि तत्त्वज्ञान व त्या अनुषंगाने गणित, मन आणि मनोव्यापार (व स्वभावशास्त्र), मेंदू आणि डीएनए व आरएनए घडवत असलेली शरीरांतर्गतची आंदोलने आणि आवर्तने, अवकाशशास्त्र आणि पृथ्वीची ‘जिऑलॉजिकल’ कॅरेक्टर (अगदी दगड, खडक, पर्वत, नद्या, पाणी) हे सर्व एक प्रकारे वेगवेगळे विषय नसून, एक ‘होलिस्टिक’ किंवा एकत्व पद्धतीने अभ्यासण्याचे विषय आहेत, असे नंदांचे पक्के मत होते.
खरेंनी केलेली एक मांडणी मी उद्धृत करतो, म्हणजे मला उगीच माझी विद्वत्ता पाजळायला लागणार नाही. तो उतारा पुढीलप्रमाणे -
“गणित हे शास्त्र नक्कीच सर्वांत खेळकर आहे. गणितातली गृहीतके (anxioms) म्हणजे क्षेत्र आखून देणारे खेळाचे नियम. खेळाचे नियम आणि गणितातली गृहीतके मान्य करावीच लागतात. त्यावर शंका घेता येत नाहीत. गृहीतकांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन त्याला संकेतचिन्हांच्या माळा मानतो - अशा माळा, ज्यांचे रूपांतर नेमक्या नियमांनुसार इतर माळांमध्ये करता येते. या माळांना म्हणायचे प्रमेये. हा दृष्टिकोन प्रमेये सिद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु या नव्या-जुन्या माळांना अर्थ जोडायला (त्यांचा अर्थ लावायला) कल्पनाशक्ती लागते. संकेतचिन्हांच्या माळांना वास्तवातील स्थितीचे अर्थ नेहमीच देता येतात असे नाही. ज्या प्रमेयांना वास्तवाचे मॉडेल मानता येते, ती उपयोजित गणितातली प्रमेये मानली जातात. जिथे मॉडेल सापडत नाही, ते शुद्ध गणित. पण आज बरेचदा शुद्ध वाटणाऱ्या गणिताचेही मॉडेल म्हणून उपयोग सापडले आहेत.”
हा उतारा कदाचित खूप जडजंबाल वाटू शकेल, पण तो वाचताना मनात घोळवत गेले, तर त्यातील तर्कशुद्धता व सौंदर्य ध्यानात येऊ शकेल.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
आयुष्यात खूप माणसं येतात, जातात. मात्र नंदा खरे यांच्यासारखा ‘खरा माणूस’ अभावानंच सापडतो!
कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा
..................................................................................................................................................................
नंदांचे गणितावर विलक्षण प्रेम होते, कारण त्यांचे शुद्ध विज्ञानावर प्रेम होते. ‘आजचा सुधारक’ हे मूळ ‘सुधारक’ही संकल्पना ओलांडून कसे पुढे गेले आणि तरीही त्यातील वैज्ञानिकता, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनवाद टिकून राहिला, याचे मुख्य कारण नंदा खरेंची कमालीची व्यापक, अमर्यादित जिज्ञासा आणि जगभर चाललेल्या संशोधनाचा मागोवा.
त्यातूनच खरे मानववंशशास्त्र आणि जेनेटिक्स, तसेच भाषेच्या उगमाचे व विविधतेतेचे, लॉजिस्टिक्सचे शास्त्र आणि स्वभावशास्त्र किंवा वर्तनशास्त्र यांकडे वळले. त्यांची अशोक केळकरांशी असलेली मैत्री आणि नोम चोम्स्कीच्या (वा स्टीफन पिंकरच्या) सिद्धान्तावर केलेले चिंतन हेच दाखवते की, खरे कायम ज्ञाताच्या कुंपणाच्या बाहेर बागडत असत, उडतही असत आणि क्वचित अंतर्धानही पावत असत! पण त्यांचे हे बौद्धिक अंतर्धान पावणे आध्यात्मिकतेकडे कधीही वळले नाही.
खरे म्हणजे आध्यात्मिकता हे बऱ्याच अंशी स्तोम आहे, असेच त्यांचे मत होते. म्हणूनच ते ‘आसु’मध्ये असेही प्रश्न उपस्थित करत असत. उदाहरणार्थ -
‘‘प्राणी शब्द वापरत नाहीत. मग ते विचार कसा करतात? भाषेशिवाय विचार करता येतो का? देकार्त या तत्त्वज्ञाच्या प्रतिपादनानुसार आपण विचार करतो तो शब्दांच्या आधारे. भाषा नसेल तर विचारच करता येणार नाही. पण आता हे प्रतिपादन कुणीच स्वीकारत नाही. शब्द विचारांचे वर्णन करतात, विचारांना लेबले लावतात. विट्गेन्स्टाइनही म्हणतो त्याप्रमाणे, शब्द विचारांचा निर्देशही करतात. इतर प्राण्यांमध्ये नसलेली ही मानवी क्षमता आहे. जाणिवेतून आपण विचार करतो, हे आपल्याला समजते. विचारांचे गूढ प्रवाह पाहणे आणि त्यांना दिशा देणे हे जाणिवेतून घडते. पण शब्द म्हणजे जाणीव नाही. संशोधनाचा विषय हा की शब्दाधारित भाषेशिवाय प्राण्यांना जाणीव कशी येते. आपण विचार करीत आहोत हेच मुळी जाणिवेतून कळते. मग आपण शब्दांद्वारे स्वत:लाच सांगतो की आपण विचार करतो आहोत. असो.”
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
‘अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी वेगळ्या दृष्टीकोनातून
येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...
..................................................................................................................................................................
हे सर्व प्रकरण म्हणजे जाणिवा, विचार, शब्द, संवाद, विसंवाद, चिंतन, मनन या सगळ्याचा वैज्ञानिक अभ्यास. या बाबींवर खरेंनी अजून काही मूलभूत मांडणी केली असती. त्या दृष्टीने ७४ वर्षांचे त्यांचे आयुष्यमान फारच कमी होते.
गंमत म्हणजे याविषयीसुद्धा - म्हणजे आयुष्यमान, एजिंग प्रोसेस, आयुष्यमानविस्तार या सर्व गोष्टींवरही - त्यांचे चिंतन होते आणि ते ‘२०५०’ या कादंबरीत आणि या ग्रंथातील काही लेखांमधून येते. प्रस्तावनेतून खरेंचे अफाट विचारविश्व सांगणे अतिशय कठीण. (खरे तर अशक्यच!)
पण खरे म्हणजे नंदा खरेंचे मनोविश्व असाच एक ग्रंथ लिहायला हवा. या पुस्तकातील प्रकांड लेख म्हणजे मोठाले कवडसे आहेत, पण कवडसा मोठा झाला की, तो कवडसा राहतच नाही. म्हणूनच नंदा खरेंच्या मनाच्या खिडक्यांमधून येणाऱ्या प्रकाशावर पुस्तक यायला हवे.
‘...नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन’ : नंदा खरे
संकलन-संपादन : विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत पाटील
मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ६३६ | मूल्य – ८०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment