अजूनकाही
साधारणपणे एक वर्षांपूर्वी ‘ओपेनहायमर’ संदर्भात काही दृश्ये आणि नंतर सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. त्यातून हा चित्रपट अमेरिकेच्या अणुबॉम्ब निर्मितीविषयीचा असेल असे वाटू लागले होते. या सिनेमाच्या प्रसिद्धी माध्यम संस्थांकडूनही त्याच स्वरूपाची माहिती प्रसारित केली जात होती. पण प्रत्यक्षात तो प्रदर्शित झाल्यानंतर कथा वेगळीच असल्याचा धक्का सिनेरसिकांना बसला. कारण हा सिनेमा अमेरिकेच्या अणुबॉम्ब निर्मितीचा ‘मॅनहॅटन’ प्रकल्प जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर पुढे काही वर्षांत ज्या राजकीय कुरघोडीने बजबजला, त्यावर आधारित आहे, हे लक्षात आले. ते राजकीय नाट्य विस्तृतपणे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने पडद्यावर साकारल्याने नोलनप्रेमींची काहीशी निराशा झाली.
नोलनने आजपर्यंत पडद्यावर अद्भुत वैज्ञानिक कथा, काही वेगळे विषय हाताळले होते. त्यांच्यापेक्षा अत्यंत भिन्न, शीतयुद्धाला जन्म देणारा व व्हाइट हाऊसच्या देखरेखीखाली चालणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणाला हात घालणारा विषय नोलनने निवडला. ही निवड त्याच्या एकूणच वेगळेपणाची साक्ष देते.
विज्ञान बाह्य राजकीय नाट्याचा वेध
हा सिनेमा अमेरिकी लेखक काई बर्ड व मार्टिन जे. शेरवीन यांनी लिहिलेल्या ‘American Prometheus : The Triumph and Tragedy of J. Robert Oppenheimer’ या पुस्तकावर आधारित आहे. हे ओपेनहायमरचे चरित्र असले, तरी यात त्याच्या व्हाइट हाऊस प्रशासनाने निलंबित केलेल्या ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’मागचे भयावह राजकारण आणि त्यामागचे खरे सूत्रधार असे उत्कंठावर्धक नाट्य उभे केले आहे. नोलनला हे नाट्य अधिक महत्त्वाचे वाटल्याने, त्याने ते तपशीलवारपद्धतीने पडद्यावर अत्यंत अदभुतरित्या आणले.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
फेक न्यूज : डेंजरस अफवांचा आधुनिक व्हायरस
मोदींनी २० वर्षांनंतर Y2Kची आठवण का केली असेल? Y2K ही २१व्या शतकातली पहिली ‘जागतिक फेक न्यूज’ होती!
ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय!
..................................................................................................................................................................
आयमॅक्सचे तंत्रज्ञान, पडद्यावर काळाचा पट स्पष्ट करत येणारे ब्लॅक अँड व्हाइट व रंगीत प्रसंग, प्रेक्षकाला चित्रपटाचा भाग बनवणारे पार्श्वसंगीत व प्रत्येक कलावंतांचा अप्रतिम अभिनय, या एकूण बळावर हा या वर्षातला उत्तम सिनेमा बनला आहे.
नोलन पन्नासच्या दशकातील अमेरिकेच्या राजकीय इतिहासाकडे का वळला, ही एक औत्सुक्याची बाब आहे. नोलनने त्यासंदर्भात आपले स्पष्ट मत दिलेले नाही, पण सद्यकाळात आपली एक राजकीय भूमिका असावी, या दृष्टीकोनातून त्याने अमेरिकेच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाचा विषय घेत, त्या काळातील सत्ताधाऱ्यांच्या क्रूर महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक पातळीवरील द्वेष, मत्सर, अशा मानवी अवगुणांना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नोलन ‘ओपेनहायमर’मधून अमेरिकेतल्या पन्नासच्या दशकात रिपब्लिकन पक्षाचा सिनेटर मॅकार्थीकडून समाजात पद्धतशीरपणे पेरले जाणारे द्वेष, खुनशी, झुंडीचे, हिंस्त्र, भय व उन्मादाचे राजकारण तपशीलवार उभे करतो. या पद्धतीचे वातावरण आज केवळ अमेरिकेत नव्हे, तर अनेक लोकशाही देशांत अस्तित्वात आहे आणि ते पद्धतशीरपणे पसरलेले दिसत आहे.
‘मॅकार्थी मॉडेल’ हे कोणत्याही देशातल्या लोकशाहीपुढील खरे आव्हान आहे. एखाद्या व्यक्तीचे पद किंवा प्रतिष्ठा कितीही उंचीची असली, तरी त्या व्यक्तीविरोधात मोठ्या प्रमाणात असत्य, खोटी माहिती, आरोपाची राळ उडवून, तिला ‘देशद्रोही’ ठरवायचे व तिची प्रतिमा कलंकित करायची, असा अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा एक भाग आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे तंत्र फॅसिझम वा कम्युनिझमला उत्तर नव्हते, तर स्वकियांविरोधात केलेले षडयंत्र होते आणि आहे, याचे अनेक पुरावे आता मिळू लागले आहे. पन्नासच्या दशकात मॅकार्थीने हे तंत्र ‘अँटी कम्युनिस्ट अजेंड्या’द्वारे प्रस्थापित केले. त्याचे बळी अमेरिकेतले विचारवंत, लेखक, कलाकार, बुद्धिवादी ठरले.
या राजकारणाचा ओपेनहायमर हा विक्षिप्तपणाची झाक असलेला विद्वान वैज्ञानिकही बळी ठरला, हे नोलनला स्पष्टपणे सांगायचे आहे. त्यामुळे ओपेनहायमरची चौकशी करण्यामागचे सत्य नेमके काय होते आणि सुमारे सात दशकानंतर अमेरिकेच्या व्यवस्थेने ओपेनहायमरबाबत केलेली चूक कशी दुरुस्त केली, असा विस्तृत इतिहास नोलन सांगतो.
विध्वंसक प्रवृत्तींकडे बोट
या चित्रपटातून एक महत्त्वाची बाब दिसून येते, ती ही की, नोलन राज्यकर्ते, प्रशासन व वैज्ञानिक जगत यांच्यातील तुटलेला राजकीय संवाद आपल्यापुढे मांडतो. अखंड मानव कल्याणाचे जे चित्र विज्ञान जगत पाहत असते, तो दृष्टीकोन संकुचित, कोत्या मनाच्या, सत्तेची असुरी इच्छा आकांक्षा असलेल्या, खुनशी राजकीय विचारधारेवर आपले राजकारण उभे करणाऱ्या नेत्यांकडे असत नाही. ते विश्वकल्याणाचे व्यापक चित्र बघू शकत नाहीत वा समजूही शकत नाहीत. त्यांच्याकडे वैज्ञानिकांसारखे द्रष्टेपण नसते. त्यामुळे अशा विघ्नसंतोषी नेत्यांकडून जगाची रचना बिघडवणारे विनाशकारी, भयंकर असे राजकीय निर्णय घेतले जातात आणि त्याचे गंभीर परिणाम कोट्यवधी लोकांना भोगावे लागतात, याकडे नोलन लक्ष वेधतो.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
फेक न्यूज : डेंजरस अफवांचा आधुनिक व्हायरस
मोदींनी २० वर्षांनंतर Y2Kची आठवण का केली असेल? Y2K ही २१व्या शतकातली पहिली ‘जागतिक फेक न्यूज’ होती!
ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय!
..................................................................................................................................................................
नोलनची भूमिका समजायची असेल, तर या सिनेमातील नाट्यपूर्ण कोर्टरूम ड्रामा व ओपेनहायमरचा ‘स्व’च्या पातळीवरचा संघर्ष हा महत्त्वाचा भाग आहे. तो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असल्याचे पण पुरावा नसलेले आरोप, त्याच्या कुटुंबाची केलेली मानसिक छळवणूक, त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकारी व अन्य सर्वांची उभी-आडवी, सर्वच बाजूंनी केलेली चौकशी, त्यांच्यावर आणला गेलेला विविध पद्धतींचा दबाव, हा या चित्रपटातील कळीचा मुद्दा आहे. हे नाट्य तपशीलवार समजल्यास नोलनचा हा सिनेमा त्याचा पहिला स्पष्टपणे राजकीय भाष्य करणारा चित्रपट आहे, हे लक्षात येते.
अखिल मानव कल्याणाची भूमिका
या चित्रपटात नोलन जोरकसपणे विज्ञान जगताची मानव कल्याण भूमिका मांडतो. ओपेनहायमरच्या नेतृत्वाखाली अमेरिका अणुबॉम्ब बनवत असली, तरी या बॉम्बमुळे मानवजातीचा नाश होऊ शकतो, या बॉम्बच्या वापरामुळे अमेरिका व सोव्हिएट युनियनदरम्यान न संपणारी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते, या स्पर्धेनेच जागतिक शांतता कायमची बाधित होऊ शकते, हे धोके आणि इशारे ओपेनहायमर देत असतो.
मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करत शस्त्रास्त्र कंपन्यांची नफेखोरी, त्यांना सत्तेत बसलेल्यांचे मिळालेले पाठबळ, एखाद्या विचारसरणीविरोधातला विद्वेष, मत्सर आणि व्यक्तिगत पातळीवरचा मत्सर, असे भयंकर वास्तव नोलन पुढे आणतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘ओपेनहायमर’ अमेरिकेत प्रदर्शित झाल्यानंतर काही वेबपोर्टलनी नोलनची राजकीय भूमिका कम्युनिस्ट धार्जिणी आहे का, तो कम्युनिस्ट विचारधारेसंदर्भात अत्यंत मऊ भूमिका घेतो, यावरही चर्चा सुरू केली. सोव्हिएट युनियनचे पतन होऊनही अमेरिकेच्या राजकारणात आजही कम्युनिस्ट विरोध, हा हिरिरीने मांडला जातो.
रशियाची भीती कोणत्याही प्रकाराने जनतेपुढे सतत ठेवली जाते. वर्तमानपत्रे, टीव्ही आणि आता सोशल मीडिया रशिया, चीनविरोधी प्रोपगंडा करण्यात पुढे असतो. हा प्रचार दुसरे महायुद्ध संपून ७५ वर्षे पूर्ण झाली, तरी आजही कायम आहे. ते भूत आजही अमेरिकेतल्या राजकारणावर ठाण मांडून बसले आहे, याची खात्री पटत जाते.
ओपेनहायमर आणि देशी राजकारण
आपल्याकडेही फार वेगळी परिस्थिती नाही. मोदी सरकार सत्तेत येण्याआधी केजरीवाल-अण्णा हजारे टीमने संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, देशातल्या राजकीय पक्षांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरवला होता. त्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियाने अधिक आग लावली आणि त्या निर्माण झालेल्या राजकीय पोकळीतून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कट्टर हिंदुत्ववादी सरकार एकदा नव्हे, तर दोनदा सत्तेवर आले.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
फेक न्यूज : डेंजरस अफवांचा आधुनिक व्हायरस
मोदींनी २० वर्षांनंतर Y2Kची आठवण का केली असेल? Y2K ही २१व्या शतकातली पहिली ‘जागतिक फेक न्यूज’ होती!
ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय!
..................................................................................................................................................................
या सरकारने सत्तेवर येताक्षणी मुस्लीम, शेतकरीविरोधी, पुरोगामी, मवाळवादी, सेक्युलरिस्ट, कम्युनिस्ट, समाजवादी यांच्याविरोधात अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. बुद्धिवादी, वैज्ञानिक, कलाकार, पत्रकार, साहित्यिक, चळवळी यांची गळचेपी सुरू केली. व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली सगळ्या ठिकाणी केवळ आपल्या विचारधारेची माणसे बसवण्यास सुरुवात केली. इतिहास, शालेय अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात केली. माध्यमे ताब्यात घेतली, न्यायालये ताब्यात घेतली आणि देशाचे राजकारण ढवळून काढले. आमच्याविरोधात कोणीही बोलल्यास तो ‘देशद्रोही’ असा ‘मॅकार्थी’ने घालून दिलेला दंडक या सरकारने स्वीकारला आणि तसेच राजकारण आज देशात सुरू आहे.
म्हणून ‘ओपेनहायमर’ पाहताना अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या खुनशी राजकारणाचा संबंध या काळाशी जोडण्याची गरज निर्माण होते. मॅकार्थीने पाया घातलेले हेच राजकारण जागतिक शांततेला बाधा ठरत गेलेले दिसून येते. अमेरिकेच्या राजकारणात रिचर्ड निक्सन, रोनाल्ड रेगन, जॉर्ज बुश बाप-लेक व डोनाल्ड ट्रम्प या मंडळींनी सत्ता मिळवल्यानंतर जगातील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, उदारमतवाद, जागतिक शांतता व सौहार्द मूल्यांना मोठ्या प्रमाणात नख लावले.
लक्षावधी माणसे या सत्ताधाऱ्यांच्या खुनशी राजकारणाची बळी पडली. लोकशाही स्वीकारलेले देश अधिकारशाही, हुकूमशाहीकडे वळले. आंतरराष्ट्रीय दहशतवादाने जन्म घेतला. त्यात काही अरब राष्ट्रे उद्ध्वस्त झाली. आशियात शस्त्रास्त्र स्पर्धेने वेग घेतला. शेख मुजिबर रेहमान, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बेनझीर भुत्तो, प्रेमदास आदी नेत्यांचे राजकीय खून झाले. असे अराजक पसरवणारे मॅकार्थीच्या विचारसरणीचे लोकशाहीला, मत-व्यक्तिस्वातंत्र्याला, उदारमतवादाला नष्ट करणारे ‘मॉडेल’ आज जिवंत आहे, याची खात्री पडते.
इतिहासातील घटना, त्यांचे तत्कालीन संदर्भ आणि वर्तमान यांच्या संबंध जोडणे, ही उच्च कलाकृतीची लक्षणे समजली जातात. ‘ओपेनहायमर’ हा सिनेमा आपल्याला जागतिक पातळीवर उकळी घेऊ पाहणाऱ्या वर्तमानाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. हेच वैशिष्ट्य त्याला श्रेष्ठत्व देऊन जाते.
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या सप्टेंबर २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक सुजय शास्त्री ज्येष्ठ पत्रकार आहेत.
sujayshastri@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment