अजूनकाही
जुगाराची जाहिरात करतो म्हणून विक्रमादित्य क्रिकेटपटू, ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर विरुद्ध आमदार बच्चू कडू खटला दाखल करणार असल्याची बातमी वाचली आणि एक घटना आठवली…
बेगम मंगलाच्या आजारपणाच्या काळात ती आमच्याकडे आली. रात्र ते सकाळ अशी तिची कामाची वेळ होती. आमच्यासोबत सकाळचा चहा तिचाही होई. मग ती दुसऱ्या कामाला जात असे.
तिचं माहेर जवळच्या एका खेड्यातलं. आई-वडील शेतमजूर. मॅट्रिकपर्यंत शिकलेली. शिक्षणामुळे वागण्या-बोलण्यात स्मार्टपणा आलेला. मॅट्रिक झाल्यावर लग्न झालं. पती एका शिक्षण संस्थेत वेठबिगार. काहीबाही काम करून ही संसाराला मदत करत असे. लग्नानंतर मुलगा झाला. पती दारूच्या आहारी गेला. इतका की, सकाळपासून प्यायला सुरुवात करत असे. मग तीच कथा. मारहाण; अमानुष मारहाण. ते जे काही घडलं ते तिच्या चेहऱ्यावरही उमटलेलं. शेवट घटस्फोटात झाला.
याच दरम्यान शेजाऱ्याची अनाथ झालेली मुलगी तिनं दत्तक घेतली. दोन्ही मुलांचा शिक्षणाचा बोजा आणि पालकत्वही तीच सांभाळत होती.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
मोबाईल गेम्स आणि ऑनलाईन गेम्स : डोकी भ्रष्ट करणारी निर्मिती
डिजिटली घडण्याऐवजी ‘बि’घडत(च) चालली आहे तरुण पिढी…
..................................................................................................................................................................
आमच्याकडे ती आली, तेव्हा तिच्या जगण्याचा संघर्ष बहरात होता, तरी हसतमुख असायची. कोणत्याही कामाला नाही म्हणायची नाही, स्वत:हून पुढे यायची. आमच्याकडून गेली की, तीन-चार घरची कामं. ती आटोपून घरी जाऊन स्वयंपाक वगैरे मग एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी. इतक्या कामामुळे स्वयंपाक करायला वेळ नाही, म्हणून रात्रीचा डबा लावलेला.
एकदा सहज म्हणून त्या अन्नाची चव घेतल्यावर बेगमनं तिच्या रात्रीच्या जेवणाची सोय आमच्याकडे केली, तीही जबरदस्तीनं. एकदा गप्पा मारताना ज्या एजन्सीकडून ती आली, ती एजन्सी दर महिन्याला तिच्याकडून तीन हजार रुपये सेवाशुल्क म्हणून घेत असल्याचं लक्षात आलं. म्हणजे आम्ही दिल्यापैकी सात हजारच रुपये तिच्या हातात मिळत. मग आम्ही एजन्सीला नाही म्हणून सांगितलं आणि तिला थेट कामावर घेतलं.
जवळ जवळ दीड वर्ष असं गेलं. बेगम मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात गेली. तिनं आमच्याकडचं काम सोडलं. करोना सुरू झाला. तळहातावर पोट बहुसंख्यांची जी होरपळ झाली, ती तिच्याही वाट्याला आली. आम्ही इतरांना जे सहाय्य केलं तेच तिलाही केलं. अधूनमधून जमेल तशी आर्थिक मदत केली. जगण्याची चिकाटी इतकी की, दरम्यान पठ्ठीनं मध्ये काही काळ तर चक्क पेट्रोल पंपावर पेटोल-डिझेल भरण्याचं काम केलं. इतके सगळे कष्ट करून ती मुलगा-मुलगीच्या पुढील शिक्षणासाठी बचत खात्यात भर टाकत होती. पैसे साठले की ब्युटी पार्लर सुरू करायचं तिचं स्वप्न होतं. त्याच वेळी मुलग्याचं शिक्षणात लक्ष नाही; तो नुसत्याच टवाळक्या करत असतो, म्हणून गडद निराशाही होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गेल्या आठवड्यात ती आली आणि एकदम रडायलाच लागली. मुलाला रमी खेळायची सवय लागली; सवय कसली तो ऑनलाईन रमीच्या आहारी गेला होता. एका दुकानात तो काम करत असे आणि तिथून मिळणारा पगार रमीवर खर्च करत असे. कधी कधी तो तिचा सेलफोन घेऊन त्यावर रमी खेळत असे. त्यात तिला फार वावगं वाटलं नाही, पण एक दिवस बँकेत गेली, तर खात्यावरचे सर्व पैसे संपलेले होते. धक्का बसून ती घरी आली आणि रडत बसली. तेव्हा मुलानं रमीच्या लागलेल्या व्यसनाविषयी आणि तिच्या खात्यावरचे पैसे त्यानंच खर्च केल्याचं सांगितलं. त्याचा आवडता हिरो रमी खेळून कसे पैसे मिळवतो, हे पाहून त्यालाही रमी खेळायची प्रेरणा मिळाली होती म्हणे!
तिचा आक्रोश बघवला आणि ऐकवलाही जात नव्हता. नवरा दारुडा आणि मुलगा रमीच्या आहारी गेल्याचं तिचं दु:ख अथांग होतं. त्या अथांगतेत ती पूर्ण बुडाली. असाच बराच वेळ गेला. हळूहळू तिचा रडण्याचा वेग मंदावला. मग शक्य होती तेवढी मदत तिला केली, कारण मुलीला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत मागायला ती आली होती. डोळे पुसत पाया पडून पुढचा संघर्ष करण्यासाठी ती रवाना झाली.
पुढचे काही दिवस सेलफोनमध्ये नजर घालून मग्न झालेल्या लोकांशी बोलण्याचा परिपाठ सुरू केला. नागपूर, अमरावती, मुंबईतील कांही मित्रांनाही त्यात सहभागी कjtन घेतलं, तर लक्षात आलं की, दहापैकी किमान चार-पाच तरी लोक कुठला ना कुठला ऑनलाईन जुगार खेळत आहेत. कोण नव्हतं त्यात… दिवसभर कबाडकष्ट करून रात्रीच्या पोट भरण्याची तजवीज करणारपासून ते नोकरीत स्थिरावलेले मध्यमवर्गीय होते. धक्कादायक म्हणजे महाविद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थीही जुगार खेळताना आढळले.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
..................................................................................................................................................................
यांची अधिकृतता काय ते तपासून पाहिलं, तर ‘रमी हा कौशल्य असणारा खेळ आहे’, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं १९६८ साली दिला असल्याचं लक्षात आलं. मात्र ऑनलाईन रमी आणि अन्य जुगाराबाबत असा कोणताही दाखला मिळाला नाही. इंटरनेटवरून माहिती काढली तर समजलं की, ऑनलाईन पत्त्यांच्या (Pokar/Rummy) जुगाराची भारताची २०२२ची वार्षिक उलाढाल ८५ दशलक्ष डॉलर्स आहे आणि २०३०पर्यंत ती १७० दशलक्ष डॉलर्स होईल, असा अंदाज आहे.
८५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ८ हजार ५०० कोटी रुपये होतात. याशिवाय ऑनलाईन नसणाऱ्या जुगारांची उलाढाल वेगळी आणि ती ऑनलाईन जुगारांच्या चौपट असावी, असा अंदाज या क्षेत्रातल्या एका जाणकारानं ठामपणे व्यक्त केला. त्यात रोखीनं चालणाऱ्या रमीचे स्थानिक अड्डे, मटका, सोरट अशा देशभर, गल्लो-गल्ली, वाडी-तांड्यापर्यंत जाळं पसरलेल्या जुगारांचा समावेश आहे. ऑनलाईन आणि ऑनलाईन नसलेल्या जुगाराची उलाढाल लक्षात घेता, हा आकडा कित्येक लाख कोटी रुपयांवर जातो आणि तो आकडा एखाद्या राज्याच्या एकूण महसुलापेक्षा नक्कीच जास्त आहे!
जनतेला जुगारी करण्याच्या या उद्योगावर बंदी घालण्याऐवजी या उलाढालीवरचा वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात केंद्र सरकारनं समाधान मानलं आहे; जनतेनं जुगार खेळावा आणि बरबाद व्हावं हीच ‘संस्कारी’ सरकारची इच्छा दिसते आहे, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल... भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याची भाषा करणाऱ्यांच्या बलशाली भारताचं स्वप्न असं जुगारी असेल तर कठीण आहे... तसा तो जुगारी भारत देश आपल्याला हवा आहे का?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ऑनलाईन रमीवर बंदी घालण्याची संवेदनशीलता आपल्या सरकारकडे नाही, तर संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या जुगाराच्या जाहिराती करणारे क्रिकेटपटू आणि अभिनेते एवढे कोडगे कसे? त्यात एकटा सचिन तेंडुलकर नाही, तर सौरव गांगुलीसह अनेक मान्यवर क्रिकेटपटू व बडे अभिनेते आहेत आणि त्या सर्वांचा हेतू केवळ पैसा कमावणे हाच आहे.
खरं तर, जनतेला व्यसनी करणाऱ्या जुगाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे दखल करायला हवेत, पण ती हिंमत सत्तेत येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारमध्ये नव्हती आणि आजही नाही.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment