सर्वच राजकीय कार्यकर्ते चारित्र्यसंपन्न असतील, तर चारित्र्यहननाचा प्रश्नच उदभवणार नाही...
संकीर्ण - पुनर्वाचन
अद्वयानंद गळतगे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 30 August 2023
  • पडघम पुनर्वाचन अद्वयानंद गळतगे चारित्र्य Character चारित्र्यहनन character-assassination

हा मूळ लेख ‘चारित्र्यहनन की चरितार्थहनन?’ या नावाने ‘नवभारत’ मासिकाच्या जून १९७५च्या अंकात प्रकाशित झाला आहे. म्हणजे अजून दोन वर्षांनी त्याला पन्नास वर्षे पूर्ण होतील. आजही आपल्या समाजात, राजकारणात, समाजकारणात आणि संस्कृतीत चारित्र्य, चारित्र्यहनन यांची सतत चर्चा होत असते. त्यावरून पेचप्रसंग उभे राहत असतात. त्यामुळे या लेखातील प्रतिपादनाचा चारित्र्यहननाच्या समस्येकडे पाहताना नक्कीच उपयोग होऊ शकेल, असे वाटते. - संपादक, अक्षरनामा

.................................................................................................................................................................

एखाद्या गोष्टीसंबंधी वृत्तपत्रांत जेव्हा जोरात चर्चा सुरू होते, तिच्यासंबंधी उलटसुलट प्रतिक्रिया अगर विचार प्रकट होऊ लागतात, तेव्हा ती गोष्ट अत्यंत दुर्मीळ झाली आहे, असे खुशाल समजावे! अलीकडे आचारसंहितेसंबंधी बरेच ऐकावयास मिळते. आचार बिघडल्यामुळेच म्हणजे सदाचार दुर्मीळ झाल्यामुळेच आचारसंहितेविषयी विचार करण्याची पाळी येते, हे उघड आहे.

आणखी एका विषयाचा अलीकडे फार बोलबाला झाला आहे, आणि तो विषय म्हणजे चारित्र्यहनन! चारित्र्यहनन टाळले पाहिजे, असे आवर्जून सांगण्यात येते. आता प्रश्न असा आहे की, चारित्र्यहनन म्हणजे काय? ते कोण करते व का करते? ते टाळायचे म्हणजे काय करायचे? या प्रश्नांची नीट व काळजीपूर्वक उत्तरे दिली पाहिजेत.

‘चारित्र्यहनन’ हा इंग्रजीतील ‘character-assassination’ या शब्दाचा मराठी अनुवाद आहे. ‘Assassination’ याचा अर्थ खून! चारित्र्याचा खून करणे, चारित्र्याचा मुडदा पाडणे किती वाईट, हा यातील अभिप्राय. शिवाय ‘assassin’ या शब्दाने निव्वळ खून अभिप्रेत नसून दगाबाजीने खून करणे, असाही अर्थ अभिप्रेत आहे. पाठीत खंजीर खुपसण्यासारखे ते घोर कृत्य असल्याचा एकूण भावार्थ, तो एक पद्धतशीरपणे आखलेला राजकीय डाव म्हणूनही ओळखला जातो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आता असा प्रकार राजकीय क्षेत्रात आपल्याकडे होतच नाही, असे म्हणवत नसले, तरी त्याचा बाऊ करण्यात संबंधित व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले नाहीत, याची जोपर्यंत सामान्य जनतेची खात्री पटत नाही, तोपर्यंत या प्रश्नाचे गांभीर्य मान्य करूनसुद्धा, त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन पूर्वग्रहदोषविरहित व स्वच्छ असावा, असे वाटते. चारित्र्यहनन ठराविक व्यक्तींचे व ठराविक व्यक्तींकडून होते, असे नसून सर्वच जण त्याविषयी सामान्यपणे तक्रार करत असल्याचे आढळून येते. जणू आमच्या राजकीय जीवनाला तो एक रोगच जडला आहे! अशा परिस्थितीत सत्ताधारी गटाचा किंवा विरोधी पक्षाचा तो एक राजकीय डाव आहे, हा सिद्धान्त सोडून द्यायला हवा.

प्रथम हे मान्य केले पाहिजे की, सर्वच राजकीय कार्यकर्ते चारित्र्यसंपन्न असतील, तर चारित्र्यहननाचा प्रश्नच उदभवणार नाही. पण हा प्रश्न दुर्मीळ झाला आहे, ही वस्तुस्थितीच आपल्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य ढिले झाले असल्याचे सूचित करते. ‘चारित्र्यहनन’ हा रोग नसून ते रोगाचे बाह्य लक्षण आहे. तेव्हा आमच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चारित्र्यसंपन्नता दुर्मीळ होत चालली आहे, हे प्रथम आपण प्रांजळपणे मान्य करू या. मूळ रोग कोणता ते शोधून काढल्याखेरीज त्यावर उपाययोजना करता येणार नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

नेत्यांनी नैतिक ‘झाडा’ दिला पाहिजे

याविषयी आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, चारित्र्याचे कधीच ‘हनन’ होत नाही; आणि ज्या चारित्र्याचे हनन होते, त्याला चारित्र्य म्हणत नाहीत. महात्मा गांधींचे रशियन विश्वकोशातील चरित्र वाचून त्यांचे चारित्र्यहनन झाले, असे कोणी म्हणणार नाही, त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील (बहुधा पिवळ्या वर्तमानपत्रातील) एकाद-दुसरी बातमी वाचून एखाद्या कार्यकर्त्याच्या चारित्र्याचा भंग झाला, असे कोणी मानणार नाही, आणि तसे कोणी मानलेच तर त्याचा भ्रमनिरास केव्हा तरी होणार. कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवता येतात, म्हणजे कोणावरही आरोप करता येतात, हे खरे असले तरी शुद्ध आचरणाच्या व्यक्तीचे चारित्र्य त्यामुळे एकदम डागळते, असे समजण्याचे कारण नाही.

अमक्या प्रसिद्ध पुढाऱ्याचा अमक्या स्मगलर्सशी संबंध आहे, असे म्हटल्याने त्या पुढाऱ्याचे चारित्र्यहनन होत असेल, तर त्याचे चारित्र्य अगदीच ढिसूळ आहे, असे म्हटले पाहिजे. ती व्यक्ती खरी चारित्र्यसंपन्न असेल, तर अशा आवईकडे मुळीच लक्ष देणार नाही. खोट्या आरोपांचा प्रतिवाद केला पाहिजे, यात शंका नाही. पण सच्चरित्र व्यक्ती चारित्र्यहननाचा कधीच धसका घेणार नाही.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

हिटलरच्या सरकारात कमी बुद्धीचे, कुवत व चारित्र्य नसलेले लोक बरेच होते. मुख्य म्हणजे ते महत्त्वाच्या पदांवर होते...

केवळ चारित्र्य आणि लोकांचा विश्वास, या बळावर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी महत्कार्य केले!

यदुनाथ थत्ते : कणखर चारित्र्यवान संपादक

प्रधान मास्तर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य, चारित्र्यसंपन्नता आणि नीतिमत्ताही

..................................................................................................................................................................

पण खरी गोष्ट अशी आहे की, एखाद्या सत्तेवरील व्यक्तीविषयी असा आरोप जेव्हा होतो, तेव्हा लोकांना त्या व्यक्तीच्या चारित्र्याविषयी संशय वाटू लागतो. अशा वेळी त्या व्यक्तीने आपल्या स्वतःचा निःपक्षपातीपणे ‘झाडा’ देणे हाच एक मार्ग आहे. (रेचक हे शारीरिक आरोग्यालाच उपकारक असते, असे नसून नैतिक आरोग्यालाही उपकारक असते.) पण होते नेमके याच्या उलट! ती व्यक्ती आपले चारित्र्यहनन होत असल्याचीच तकार करते. आणि मग लोकांचा संशय स्वाभाविकपणे अधिकच बळावतो. चारित्र्यहननाविरुद्ध ओरड करणाऱ्याचेच पाणी कुठे तरी मुरत असले पाहिजे किंवा ‘The lady protests too much’, असे मग लोक समजू लागतात.

चारित्र्यहननासंबंधी सत्तारूढ पक्षातील लोकच जास्त तक्रार करतात, या वस्तुस्थितीवरून बराच बोध होण्यासारखा आहे. चारित्र्य बिघडवणारी प्रलोभने व प्रसंग त्यांच्याच वाटचाला जास्त येत असल्यामुळे हे स्वाभाविक आहे. पण याला उपाय चारित्र्यहनन टाळण्याचा आग्रह धरणे हा नसून, चारित्र्य सुधारणे, हा आहे. (विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करणे किंवा प्रेस सेन्सारशिप लादणे, हा तर मुळीच नाही.)

पण चारित्र्य सुधारण्याचा मार्ग कठीण व लांबचा असल्याने चारित्र्यहनन टाळण्याचा आग्रह धरण्याचा सोपा मार्गच सत्तारूढ पक्ष अवलंबेल, हे उघड आहे. (विरोधकांच्या किंवा वर्तमानपत्रांच्या सत्ताधाऱ्यांनी मुसक्या बांधल्या, तर त्यांचे चारित्र्य तर बिघडलेच आहे, पण ते सुधारण्याच्याही पलीकडे गेले आहे, असे खुशाल समजावे!) यासाठी विरोधी पक्षातील लोकांनी व विचारवंतांनी सत्तारूढ पक्षाच्या सुरात सूर मिसळून चारित्र्यहननाविरुद्ध आवाज उठवण्याची नकारात्मक भूमिका घेण्याऐवजी चारित्र्य सुधारण्याचा आग्रह धरण्याची रचनात्मक भूमिका घ्यावी.

पण बहुतेक जण चारित्र्यहनन टाळले पाहिजे, असाच आग्रह धरतात. यावरून दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे चारित्र्यहननाविरुद्ध बोलणारांना असे वाटत असावे की, चारित्र्यहनन म्हणजे ‘मर्माघात’ असून ते राजकीय सदाचारात बसत नाही. मर्मस्थळावर आघात करणे, हे एक निंद्य कृत्य आहे. एखाद्याला राजकीय जीवनातून उठवण्याचा तो प्रयत्न आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या युक्तिवादात माणसाचे चारित्र्य हे मर्मस्थळांनी युक्त असल्याचे गृहीत धरले आहे. यात असेही गृहीत धरले आहे की, प्रत्येकाच्या चारित्र्यात अशी मर्मस्थळे असतात. म्हणजे प्रत्येकाच्या काही ‘नाजूक गोष्टी’ असतात. (इंग्रजीत याला ‘weak point’ किंवा ‘vulnerability’ असे म्हणतात.) हा मर्मस्थानाचा सिद्धान्त म्हणजे दोषावर पांघरूण घालण्यासाठी निर्माण केलेला युक्तिवाद आहे, हे स्पष्ट आहे.

‘मर्मस्थाना’ला इंग्रजीत जे प्रतिशब्द आहेत, त्यांचा दुसरा अर्थ ‘दोष’ असाच आहे. उदा. ‘He has a weakness for women’ किंवा ‘His weakness for women is his vulnerable point’. शरीराच्या मर्मस्थानाची उपमा चारित्र्याला लागू होत नाही, हे यावरून स्पष्ट आहे. तसा प्रयत्न करू गेल्यास, म्हणजे प्रत्येकाला शरीराप्रमाणेच चारित्र्यात्मक मर्मस्थळे असतात. कोणाला कोणते चारित्र्यात्मक मर्मस्थळ आहे, हे शोधून प्रत्येकाला काढून कुठल्या ना कुठल्या ‘मर्मस्थळा’चा संरक्षण परवाना द्यावा लागेल! मग कोणी ‘बाटली’चा परवाना मागेल, तर कोण ‘बाई’चा परवाना मागेल. कुणाचे पैसा हे ‘मर्मस्थळ’ असेल, तर कुणाचे सत्ता!

अशा परिस्थितीत मर्मस्थळावर आघात करणे, हे आचारसंहितेत बसत नाही, असे म्हणण्याऐवजी असा आघात करणे, हाच सदाचार आहे, असे म्हणावे लागते. आणि अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला राजकीय जीवनातून उठवणे, हे एक महान राष्ट्रीय कर्तव्य ठरते. तात्पर्य, या अर्थाने चारित्र्यहनन करणे निषिद्ध ठरवता येत नाही.

राज्यकर्त्यांना खासगी ‘चारित्र्य’ असू शकत नाही

चारित्र्यहननाविरुद्ध बोलणाऱ्यांचा दुसरा एक असा दृष्टीकोन संभवतो की, चारित्र्यविषयक चर्चा केल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप होतो, आणि असा कोणाला अधिकार असू नये. पण राजकीय कार्यकर्त्यांना खासगी व राजकीय अशी दोन जीवने असून, खासगी जीवनात ते काय करतात, याचा त्यांच्या राजकीय जीवनाशी काही संबंध नाही, ही समजूत मुळातच बरोबर नाही. सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्यांचे जे खासगी जीवन असते, ते इतके मर्यादित किंवा नाममात्र असते की, त्यात खाजगी असे क्वचितच काही असते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर ज्याचे खाजगी जीवन उघड व शुद्ध असेल, असा कार्यकर्ताच राजकीय जीवनात उजळ माथ्याने यावरू शकतो. असा कार्यकर्ताच आपल्या राजकीय आचरणाच्या शुद्धतेवर हक्क सांगू शकतो. निष्कलंक चारित्र्याच्या माणसाच्या खासगी जीवनातील नसलेली कुलंगडी बाहेर काढण्याचा एखाद्या नाठाळाने चंग बांधलाच, तर त्याच्या माथी कायद्याची काठी बसेल किंवा तो केव्हा तरी उघडा पडेल. त्यामुळे त्या राजकीय कार्यकर्त्याचे प्रथम थोडे नुकसान झाल्यासारखे वाटले, तरी ‘कुलंगडी’ बाहेर काढणाऱ्याचे पितळ उघड झाल्यानंतर तो कार्यकर्ता अधिकच तेजाने चमकेल.

पण खरी गोष्ट अशी आहे की, असे ‘पाण्यात वार’ करण्याचे कोणी मनातही आणणार नाही. लालबहादूर शास्त्रींच्या वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी करू शकले नाही, याचे कारण त्यांचे राजकीय जीवन शुद्ध होते, हे एकच नसून त्यांचे खासगी जीवनही शुद्ध होते, हेही आहे. किंबहुना राजकीय जीवन वेगळे व खासगी जीवन वेगळे, असे त्यांच्या बाबतीत नव्हतेच मुळी. खऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या दोन वागण्याच्या तऱ्हा किंवा दोन जीवने मुळी असतच नाहीत. प्राचीन चीनमध्ये कम्फ्यूशियसचे असे एक राजकीय तत्त्व होते की, ‘Orderly political life must come from orderly private life.’ म्हणजे सुव्यवस्थित राजकीय जीवन हे सुव्यवस्थित खाजगी जीवनातूनच तयार होते.

तो म्हणतो, “When a ruler's personal conduct is correct, his government is effective without issuing orders. If his personal conduct is not correct he may issue orders but they may not be followed.”

म्हणजे राज्यकर्त्याची खासगी वागणूक बरोबर असेल तर हुकूम न काढतासुद्धा त्याचे राज्य बरोबर चालते. पण राज्यकर्त्याचे खासगी वर्तन जर बरोबर नसेल, तर तो हुकूम काढूनसुद्धा जनता ते पाळणार नाही. मला वाटते चीन दोन सहस्र वर्षे एकसंध राहून राजकीय स्थैर्य अनुभवू शकला, याचे हे इंगित असावे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

हिटलरच्या सरकारात कमी बुद्धीचे, कुवत व चारित्र्य नसलेले लोक बरेच होते. मुख्य म्हणजे ते महत्त्वाच्या पदांवर होते...

केवळ चारित्र्य आणि लोकांचा विश्वास, या बळावर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी महत्कार्य केले!

यदुनाथ थत्ते : कणखर चारित्र्यवान संपादक

प्रधान मास्तर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य, चारित्र्यसंपन्नता आणि नीतिमत्ताही

..................................................................................................................................................................

हा जनतेचा हक्क आणि राज्यकर्त्यांचे कर्तव्य

चारित्र्यहननाचा धि:कार करायचा याचा अर्थ खोटेनाटे आरोप करणाऱ्यांचा धि:कार करायचा. पण राज्यकर्त्यांच्या चारित्र्याची चर्चा करणाऱ्यांचा धि:कार होता कामा नये. कारण आपले राज्यकर्ते शुद्ध चारित्र्याचे असावेत, अशी जनतेची अपेक्षा असून ती पुरी केली पाहिजे. आणि ती पुरी करावयाची झाल्यास राज्यकर्त्यांच्या खासगी जीवनात डोकावून पाहण्याचा, ते शुद्ध आहे की नाही, हे तपासण्याचा जनतेला अधिकार आहे, हे मान्य करावयास पाहिजे.

अशा प्रकारे राज्यकर्त्यांच्या चारित्र्याची शहानिशा जाहीर चर्चा हे निकोप राज्यकारभारासाठी आवश्यक आणि समर्थनीय ठरते. आणि राज्यकर्त्यांचेही याबाबतीत जनतेचे पूर्ण समाधान करण्याचे आद्य कर्तव्य आहे. अर्थात् त्यासाठी प्रभू रामचंद्राप्रमाणे लोकाराधनेसाठी पत्नीचा त्याग करण्याइतक्या आत्यंतिक टोकाला त्यांनी जावे, अशी कुणाचीच अपेक्षा नाही! पण काही किमान नैतिक दर्जा ठरवून तो पाळावा, अशी मात्र अपेक्षा आहे.

इतकेच नव्हे तर तो दर्जा पाळल्याबद्दल उघड चौकशीची यंत्रणा उभी करून जनतेची खात्री पटवून दिली पाहिजे, पण तसे न करता चारित्र्यहननाविरुद्ध सत्ताधारी लोक तक्रार अगर ओरड करू लागतील, तर सत्ताधाऱ्यांचे लपवून ठेवण्यासारखे बरेच असावे, या संशयाला पुष्टी मिळते.

वृत्तपत्रांत आपल्यासंबंधी बेछूट लिखाण होत असते, बेजबाबदारपणे आरोप केले जातात, असे सत्तारूढ पक्षाला वाटत असेल, तर त्या बेजबाबदारपणाला जबाबदारपणे पण समर्पक उत्तरे देऊन व गंभीर आरोपाच्या जाहीर चौकशीच्या यंत्रणेमार्फत चौकशी करवून विरोधकांचे समाधान करणे, हाच लोकशाही पद्धतीतील एकमेव मार्ग आहे.  त्यासाठी विरोधकांच्या टीकाकारांच्या मुसक्या बांधणे हा नव्हे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

सत्तारूढ पक्ष आपला कारभार जितक्या गुप्तपणे चालवील, तितकी जनतेला त्याच्या निर्भेळपणाबद्दल, त्या राज्यकर्त्याच्या चारित्र्यविषयक निर्मळपणाबद्दल संशय वाटेल. अशा संशयास्पद जागा राहू न देण्याची जबाबदारी सत्तारूढ पक्षाची असून, त्याने ती जबाबदारी निकोप संकेत रूढ करण्याच्या दृष्टीने चोखपणे पार पाडली पाहिजे.

वृत्तपत्र आपल्याच मरणाने मरतात, असा अनुभव आहे. त्यांना खतपाणी पुरवण्याचे बंद करणे, म्हणजेच खळबळजनक मसाला आपल्यात सापडू न देणे - म्हणजे चारित्र्यविषयक शुद्धता पाळणे - हाच यावर परिणामकारक उपाय असून जनतेच्या व देशाच्या हिताच्या दृष्टीनेही ते आवश्यक आहे.

आमच्या खाजगी जीवनाशी जनतेचे काही कर्तव्य नाही. आम्ही चोख व प्रामाणिकपणाने राज्यकारभार करतो की नाही, आमची कर्तव्ये चोख पार पाडतो की नाही, एवढेच जनतेने पाहावे, असे म्हणणाऱ्यांचा दुटप्पीपणा स्वयंसिद्ध असल्याने त्याविषयी अधिक लिहिण्याची जरुरी नाही. पण पाश्चात्य देशात लैंगिक वर्तनातील स्वैरपणामुळे आपले चित्त त्या काळापुरते विचलित व विस्कळीत (unhinge) होत असल्याचे मान्य करणारे प्रामाणिक राज्यकर्ते आहेत, ही गोष्ट जीवनात कप्पे करणाऱ्या किंवा मानणाऱ्या लोकांचा युक्तिवादातील फोलपणा सिद्ध करते. (आपल्याकडे तेवढा प्रामाणिकपण नाही!)

प्रोफ्युमो प्रकरण तर प्रसिद्धच आहे. केनेडीचे खाजगी जीवन अमेरिकेला किती उपकारक ठरले, हा एक संशोधनाचा विषय असून, त्यावर कधी काळी पूर्ण प्रकाश पडेल की नाही, याविषयी जबरदस्त शंका आहे. खाजगी व सार्वजनिक जीवनाच्या सीमारेषा गुप्तहेरानी तर पूर्णपणे पुसून टाकल्या असून, ‘खाजगी जीवन-वाद्यां’कडूनच देशाची गुपिते बाहेर फुटत असल्याचे आता दिसून आले असल्याने, राजकीय धुरीणांना खाजगी जीवन असल्याचे मान्य न करण्याकडेच पाश्चात्य विचारवंतांची हल्ली प्रवृत्ती होत आहे. कारण खाजगी जीवन असणे म्हणजे भानगडी असणे, असे समीकरण बनू पाहत आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जिम्मी कार्टरने अधिकार ग्रहण करण्यापूर्वी आपले खाजगी लैंगिक जीवन शुद्ध असल्याचे जाहीर करून टाकले, ही वस्तुस्थिती बरीच बोलकी आहे. आपण परस्त्रीची अभिलाषा केली, पण मोहाला मात्र बळी पडलेलो नाही, असे प्रांजळपणे सांगताना त्याने मानवाची स्खलनशीलता लक्षात घेऊनसुद्धा आदर्शाप्रत जाण्याचा प्रयत्न करण्याबद्दल आग्रह धरणाऱ्या नीतिवाद्यांचेच, म्हणजे ‘शुद्ध चारित्र्य-वाद्यां’चेच हात बळकट केले आहेत.

आणि लोकशाहीच्या यशस्वितेला शुद्ध चारित्र्याची नितांत आवश्यकता असल्याने चारित्र्यहननाविरुद्ध ओरड करणाऱ्यांना किंवा त्याची सतत मनात भीती बाळगणाऱ्याना खरी भीती चारित्र्यहननाची नसून (कारण चारित्र्य नसलेल्या माणसाला त्याची भीती कधीच मसते) आपल्या चरितार्थ-हननाचीच भीती वाटत असावी, असे म्हणण्यावाचून गत्यंतर उरत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......