‘नागपूर पत्रिका’तील दिवस
ग्रंथनामा - आगामी
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुुस्तकाचे मुखपृष्ठ. मुखपृष्ठकार - विवेक रानडे
  • Sat , 26 August 2023
  • ग्रंथनामा आगामी लेखणीच्या अग्रावर Lekhanichya Agravar प्रवीण बर्दापूरकर Pravin Bardapurkar पत्रकारिता नागपूर पत्रिका Nagpur Patrika

ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांचे साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करणारे ‘लेखणीच्या अग्रावर’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या निमित्ताने ‘उद्याचा मराठवाडा’ प्रकाशनाच्या क्षेत्रात पदार्पण करत  आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

‘सागर’ सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा कोल्हापूरला ‘सकाळ’ आणि नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ असे दोन पर्याय होते. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा सदा डुम्बरे आणि वृत्तसंपादक किशोर कुलकर्णी होते. दोघंही माझे जवळीकीचे मित्र होते. शिवाय ‘सकाळ’चा चिपळूणचा वार्ताहर म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे त्या दोघांनाही माझं लेखन कौशल्य चांगलंच ज्ञात होतं. मी कोल्हापूरलाच यावं, असं सदाचा आग्रह होता. शिवाय पत्रकारितेला सुरुवात केल्यावर मी काही काळ कोल्हापूरच्या एका सायंदैनिकातही काम केलेलं होतं, पण का कोण जाणे माझा ओढा नागपूरकडे होता. त्याचं एक महत्त्वाचं कारण नागपूरची सांस्कृतिक संपन्नता हे होतं. अखेर कायम हसतमुख असणाऱ्या सदाची नाराजी ओढवून घेत मी नागपूर पसंत केलं. मात्र आम्हा दोघांच्या मैत्रीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

‘नागपूर पत्रिका’ हे विदर्भातील सर्वांत जुन्या ‘नागपूर टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचं मराठी भावंड होतं. प्रसिद्ध गांधीवादी तसंच हिंदी साहित्यातील एक बडं प्रस्थ असलेले अनंत गोपाळ शेवडे यांनी ही दैनिके सुरू केलेली होती. या दोन्ही दैनिकांचं संचालन ‘नवसमाज लिमिटेड’ या कंपनीमार्फत होत असे. अनंत गोपाळ शेवडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी यमुनाताई शेवडे कंपनीच्या अध्यक्ष, तर विदर्भातील एक नामवंत आणि कुशाग्र चार्टट अकाउंटंट नरेश गद्रे कार्यकारी संचालक होते. रविवार पुरवणी साकवी (साहित्य कला विद्याचे लघुरूप) स्वत: यमुताई बघत आणि मंगला विचुर्णे या पुरवणीची ईनचार्ज होती. मंगलाच्या रविवार पुरवणीचा सहकारी ही अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर यमुनाताई शेवडेंनी नंतर टाकली. हीच मंगला विंचुर्णे पुढे माझी बेगम होणार आहे, असा पुसटसाही विचार तेव्हा माझ्या मनात उमटला नव्हता.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

यमुनाताई शेवडे, नरेश गद्रे, त्यांच्या पत्नी सौ. पुष्पा आणि मंगला हे टीकाकुशल वाचक होते. प्रकाशन सुरू  झाल्यावर अल्पावधीतच ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकानं विदर्भ आणि रायपूर, जबलपूर, बालाघाट वगैरे भागात चांगला जम बसवलेला होता. चिपळूणहून ‘नागपूर पत्रिका’साठी क्रिकेट आणि ललितलेखन मी नियमितपणे करत असे. माझ्या या लेखनावर विशेषत: नरेश गद्रे आणि मंगला हे दोघंही बेहद खुश होते. त्यामुळेच ‘नागपूर पत्रिका’त मी रुजू व्हावं, अशी ऑफर मला मिळाली होती. २६ जानेवारी १९८१ रोजी मी नागपूरला पोहोचलो आणि २७ला नोकरीवर रुजू झालो. अपेक्षा उपसंपादक किंवा ज्येष्ठ उपसंपादक म्हणून रुजू होण्याची होती, पण प्रत्यक्षात मला शहर वृत्त विभागात टाकण्यात आलं.

पत्रकार म्हणून माझ्या आयुष्याला लाभलेलं हे निर्णायक वळण होतं. अजूनही पक्कं आठवतं, मला पहिली असाइनमेंट मिळाली ती संस्कृत भाषातज्ज्ञ आणि मोलकरीण संघटनेच्या सर्वेसर्वा डॉ. रूपाताई कुलकर्णी यांच्या भाषणाची. 

‘नागपूर पत्रिके’तले दिवस खूप शिकवणारे होते. यमुताई शेवडे मला आणि मंगलला बसवून रविवारच्या पुरवण्यांचे प्लॅनिंग करत. वृद्धत्वाकडे झुकलेल्या गोर्‍यापान यमुताई स्वत:हून लेखकांना फोन करणं, पत्र पाठविणं अशा अनेक कामांत आम्हा दोघांसोबत रमून जात. श्रीकांत चोरघडे यांचं ‘अडगुलं मडगुलं’, विनय वाईकरांचं ‘गझल दर्पण’, विश्वेश्वर सावदेकरचं ‘कुतूहल’, डॉ. मधुकर आष्टीकरांचं ‘मधुघट’ अशी पत्रिकेतली तेव्हा गाजलेली एक ना अनेक सदरे त्याच काळातील. सदानंद देशमुख आणि अजित उत्तमसिंग चाहल (नंतर हा जणू गायबच झाला!) त्याच काळात लिहिते झालेले होते. त्यांच्या प्रतिमा, शैलीचे केवढे कौतुक तेव्हा आम्हाला होते.

यमुताई सहसा चिडत नसत, पण एकदा मात्र जाम भडकल्या. कारणही तसंच होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती सुजाता मनोहर होत्या. मुंबई उच्च न्यायालयातल्या त्या पहिल्या महिला न्यायमूर्ती. त्यांच्या एका भाषणाच्या बातमीचं शीर्षक ‘न्या. सुजाता मनोहर यांचे भाषण’ऐवजी ‘न्या. सुजाता मनोहर यांचे निधन’ असे प्रकाशित झालं. ही चूक मुद्रितशोधन बापू करमरकर यांची होती, पण सकाळी लवकर कार्यालयात आल्यामुळे तडाख्यात मी सापडलो आणि सर्वांनी माझीच यथेच्छ धुलाई केली!

दुपारी यमुताईंच्या सहीचा माफीनामा घेऊन मी माझ्या एका सहकार्‍यासह न्या. मनोहर यांना भेटलो. त्यांनी मात्र हे सर्व, वृत्तपत्रात चुका घडायच्याच अशा उदारपणे घेतले. नंतर बापू करमरकरांना कायम बडतर्फ करण्याचा प्रस्ताव चर्चेत समोर आला, तेव्हा यमुताईंनी त्याला ठाम विरोध केला. या वयात ते जातील कुठं, अशी भूमिका घेऊन आठ दिवसांच्या निलंबनाची शिक्षा बापूंवर बजावण्यात आली.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मोदी-शहा यांची ‘जादू’ हिमाचल प्रदेशात चालली नाही, कर्नाटकात चालली नाही; ती मध्य प्रदेशात तरी चालेल का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!

समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...

..................................................................................................................................................................

नागपूर पत्रिकेच्या रविवार पुरवण्यांनी अक्षरश: धमाल केली. डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांच्यामुळे या पुरवणीसाठी आम्हाला खूप मजकूर मिळाला; कारण भोळे सरांकडे संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे साहित्यिक, पूर्णवेळ कार्यकर्ते यांची संख्या मोठी. कुणी येणार असल्याचा निरोप मिळाला की, मुद्दामच रात्री आठनंतर भोळे सरांकडे जायचं, मग त्या साहित्यिकाची मुलाखत व्हायची आणि विजया वहिनींच्या हातचे पोटभर जेवणही मिळायचे. तेव्हा भोळे सर विद्यापीठाच्या क्वॉर्टर्समध्ये अमरावती रोडवर राहायचे आणि सायकल मारत आम्ही तिथे पोहोचायचो.

नागपूर आकाशवाणीवर क्रिकेटच्या सामन्याचं समालोचन मराठीत होणार नाही, अशी बातमी आल्यावर आंदोलन करण्याची आणि त्याचं नेतृत्व डॉ. वि. भि. कोलते उपाख्य भाऊसाहेब कोलते यांच्याकडे देण्याचे भोळे सरांच्या याच घरात प्रकाश देशपांडे, भोळे सर आणि मी ठरवलं. भाऊसाहेबांचा मराठीचा आग्रह त्या वयातही इतका तीव्र होता की, पंचाहत्तरीतले भाऊसाहेब माझ्या स्कूटरवर बसून आकाशवाणी चौकात धरणे धरायला आले. नंतर - आता सगळी नावे आठवत नाहीत - भाऊसाहेब कोलते, राम शेवाळकर यांच्यासह अनेक जण मोर्चातही सहभागी झाले.

वसंतदादा पाटील तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होते. त्यांनी आम्हा मोर्चेकर्‍यांना विधानभवनातील आपल्या दालनात बोलावून घेतले. भाऊसाहेब कोलत्यांनी दालनात प्रवेश करताच सभागृहातून उठून लगबगीने दादा पुढे आले आणि त्यांनी भाऊसाहेबांना नमस्कार केला. नंतर भाऊसाहेब कोलतेंना निरोप द्यायला दादा विधिमंडळाच्या इमारतीच्या व्हरांड्यापर्यंत आले. (आता असे सुसंस्कृत राजकारणी राहिले नाहीत.)

भाऊसाहेबांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर वसंतदादांनी (तसे त्यांनी दिल्लीशी आधी बोलून ठेवलेलं होतं.) लगेच दिल्लीला फोन करून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून मराठीतून समालोचन करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले.

भाऊसाहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपूर पत्रिकेने एक विशेषांक काढला. त्यात भाऊसाहेबांची मुलाखत, आज चटकन कोणाचा विश्वास बसणार नाही, पण डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांनी घेतली. एखादी मुलाखत कशी घ्यावी, त्यासाठी काय तयारी करावी, मुलाखत कशीही झाली, तरी लेखनात सुसंगती कशी ठेवावी, याचा संस्कारच भोळे सरांनी यानिमित्ताने माझ्यावर केला. त्या मुलाखतीचे शब्दांकन मी केले होते. या जवळजवळ वीस कॉलम मुलाखतीच्या ऑफ प्रिंट्स काढून सगळ्या महाराष्ट्रभर वितरित करून मराठी भाषेसंबंधी ‘नागपूर पत्रिके’ने एक मोठी चर्चा तेव्हा घडवून आणली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमरावती विद्यापीठ स्थापन झाले, तेव्हा प्रदीप देशपांडेंच्या मदतीने काढलेला विशेषांक, कवी अनिलांच्या स्मृत्यर्थ काढलेला विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त काढलेला विशेषांक आणि या सर्व अंकांसाठी लेखक मिळवताना, संदर्भ शोधताना केलेली धावपळ, एका संथ लयीत धुराची वर्तुळे काढत हरिभाऊ येगावकर माहितीचा खजिना आमच्यासमोर रिता करत असत. हरिभाऊ म्हणजे साहित्य, संगीताचा कोशच होते.

एका सकाळी बातम्या वाचल्यावर प्रदीप देशपांडेच्या मनात आले की, फुलनदेवीचा शरणागती समारंभ कव्हर करायला चंबळच्या खोर्‍यात जावं. त्या दिवशी वृत्तपत्रांना सुटी होती. आम्ही दोघं थेट गद्रेंच्या रामदास पेठेतील फ्लॅटवर धडकलो, तेही आधी न कळवता प्रारंभी तेही असाईनमेंट करू द्यायला रिलक्टंट होते. मराठी पत्रकारितेत कदाचित ही घटना कव्हर करणारे आपणच कसे, एकमेव अशा वगैरे भाषेत प्रदीपने त्यांना राजी केले. एवढंच नव्हे तर प्रवास खर्चाचे पैसेही त्यांच्याकडूनच अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतले. ही इव्हेन्ट कव्हर करणारे ‘नागपूर पत्रिका’ हे दैनिक आणि प्रदीप व मी एकमेव मराठी पत्रकार ठरलो. अर्थात त्यामुळे प्रकाश देशपांडे जाम वैतागला. कारण आम्ही त्याला या असाईनमेंटचा थांगपत्ताही लागू दिलेला नव्हता.

नागपूर पत्रिकेच्या याच दिवसांत एकनाथ बागडे या मनोरुग्णालयातील माणसाची कथा हाती लागली. या रुग्णालयातील एक डॉक्टर एका रात्री भेटायला आले आणि त्यांनी एका दलितावर कसा अन्याय होतो, हे सांगितले. सगळी कागदपत्रे बघितल्यावर लक्षात आले की, ही अन्यायाची नाही तर प्रशासनातल्या निडरपणामुळे एका माणसाची झालेली फरफट आहे.

एकनाथ बागडेंनी वेडाच्या भरात पाणी मागणार्‍या मुलीला पाणी पिण्यासाठी विहिरीत फेकून दिले. ती बुडून मरण पावली. एकनाथ बागडेवर खुनाचा गुन्हा दाखल झाला, पण वेडाच्या भरात त्यानं कृत्य केल्यानं त्याची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. पुढे खटला चालला. वेडाच्या भरात हत्या केली असल्यामुळे एकनाथ बागडेची सुटका झाली. मनोरुग्णालयातील उपचारांमुळे तो बरा झाला, पण त्याची सुटका झालीच नाही कारण सुटकेचे आदेश लालफितीत अडकले, अशी ही बातमी होती.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात या बातमीचा संदर्भ देऊन, तेव्हा विरोधी पक्षात असणारे बबनराव ढाकणे, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख प्रभृती सदस्यांनी तत्कालीन अंतुले सरकारला चांगलेच धारेवर धरलं. अखेर एकनाथ बागडेची सुटका झाली.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या बातमीला भालाकार भोपटकर पारितोषिकही मिळाले. या पारितोषिकाचे तेव्हाचे माझ्यासोबतचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे वाटेकरी अनिल महात्मे आणि नागपूर पत्रिकेचे मुर्तिजापूरचे वार्ताहर मधु खोकले होते. तेव्हा नागपूर पत्रिकेत खूप मोठा जल्लोष झाला होता. या बागडेच्या बातमीची कॉपी लिहिणे माझ्यासाठी तेव्हा एक छळवणूकच वाटत होती.

या वृत्तमालिकेतील प्रत्येक बातमी रमेश राजहंसांनी इतक्यावेळा माझ्याकडून पुनर्लेखन करून घेतली की नको ती बातमी, असे वाटायचं, पण पारितोषिक मिळाल्यावर मात्र राजहंस अचूक लिखाण, सुसंगती नेमक्या याबद्दल आग्रही का असत, हे कळले. या काळात एकनाथ बागडेच्या भावविश्वाचा एक भागच मी झालो इतकी त्या बातमीत आणि बागडे कुटुंबीयात माझी इनव्हॉलमेंट झालेली होती. सत्तरच्या काळात या विषयावर ‘लोकप्रभा’च्या दिवाळी अंकासाठी दीर्घकथा लिहिताना ते सर्व दिवस लख्खपणे समोर आले.

आचार्य विनोबा भावे तेव्हा देश आणि राज्यातील सत्ताकारण्यांचे वंदनीय स्थान होते आणि गांधीवादी चळवळीच्या विविध प्रवाहांचे केंद्रबिंदूही होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते अगदी सोम्यागोम्या राजकारण्यांची तेव्हा पवनारच्या परंधाम आश्रम आणि सेवाग्रामच्या महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट असे. या सर्व भेटींचे वृत्तसंकलन करण्यासाठी नागपूरच्या तेव्हाच्या सर्वच मुख्य वार्ताहरांकडे आमच्यासारखे नवशिके बकरे होते. त्यातूनच विनोबा भावेंनी केलेल्या प्रायोपवेशनाचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली.

इंदिरा गांधी यांना दर तासाला फोन करून सीताराम केसरी (तेव्हा ते अखिल भारतीय काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते.) आचार्यांच्या प्रकृतीविषयी कळवत असत. नागपूरचे आम्ही वार्ताहर दररोज संध्याकाळी स्कूटरने वर्ध्याला जाऊन रात्रभर तिथे थांबत असू. एक दिवस आम्ही सकाळी ६.०० वाजता नागपूरला परत निघालो आणि त्यानंतर विनोबा भावेंचे प्रायोपवेशन यशस्वी झाले. विनोबांच्या निधनाची बातमी मात्र तिथे प्रथमच पोहचलेल्या यूनएनआयच्या किरण ठाकूर या एकट्या वार्ताहराला मिळाली आणि ती ‘फ्लॅशही’ झाली. ती बातमी आल्यावर नरेश गद्रेंनी माझी काढलेली खरडपट्टी आजही आठवते. ‘विनोबा गेले आणि तू तिथे का नव्हतास?’ असा त्यांचा सूर होता. मृत्यूचे भाकीत करता येत नाही, याचा हा धडा होता.

आचार्य विनोबा भावे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असताना इंदिरा गांधी यांचा भावनाविवश आणि त्यामुळे लालबुंद झालेला चेहरा आजही आठवतो. त्यावर मग ‘लोकप्रभा’साठी एक दीर्घकथा लिहिली. या काळात एका पत्रकाराची मानसिकता व्यक्त करण्याचा प्रयत्न या कथेत केला आहे. दारूबंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात परंधाम आश्रमामागेच दारू कशी गाळली जाते याचे नागपूर पत्रिकेने दिलेले वृत्तही गाजले होते. त्यावर गोविंदराव तळवलकरांनी नागपूर पत्रिकेचा उल्लेख करून अग्रलेखही लिहिला होता.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मोदी-शहा यांची ‘जादू’ हिमाचल प्रदेशात चालली नाही, कर्नाटकात चालली नाही; ती मध्य प्रदेशात तरी चालेल का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!

समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...

..................................................................................................................................................................

१९८१मध्ये नागपुरातले सुरुवातीचे काही महिने आमदार निवासात काढल्यावर नागपूर पत्रिकेतील उत्साही क्रीडा वार्ताहर मोहन जोशी यांच्या पुढाकाराने रामनगरच्या हिल रोडवर एक खोली मिळाली. मी कविता करण्याच्या दिवसातला साक्षीदार असलेल्या  प्रकाश निंबेकरनं  तत्परतेनं  सार्वजनिक बांधकाम खात्याचा एक लोखंडी पलंग व गादी रूमवर पोहोचती केली आणि झोपायची सोय झाली, अन्यथा फरशीवरच झोपायची वेळ होती. वर्‍हाडपांडे यांचा बंगला आंध्र असोसिएशनच्या शेजारी म्हणूनच पत्ता सापडण्यासाठी अतिशय सोप्पा आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी हमरस्त्यावर. तेव्हाचा रस्ता आताच्या रस्त्याच्या नेमका निम्मा होता आणि तो तयार करण्याच्या काळात अनेक महिने सर्वत्र धुळीचा खकाणा पसरायचा, इतका की दिवसभर बंद असलेल्या खोलीवरच्या गादीवर अंग टाकले, तरीही कचकच जाणवायची.

बंगल्याच्या मालकीणबाई ‘मालती वर्‍हाडपांडे’, त्यांना आम्ही ‘मावशी’ म्हणत असू, त्यांना जाम त्रास व्हायचा. त्यात माझ्या कडकेपणाने त्यांना भाडेही वेळेवर मिळायचे नाही आणि त्यांनी ते मागायचे ठरवले तर अनेक दिवस भेटच व्हायची नाही. कारण आमच्या दिवस-रात्रीच्या वेळेला सीमाच नव्हत्या, पण मावशी मात्र वडिलकीच्या ममत्वाने वागत, चेहरा फारच उपाशी दिसला तर किंवा सणावाराला आवर्जून जेवायला बोलावून ‘होमसिकनेस’ दूर करण्याचा प्रयत्न करत.

याच काळात जेनिफर कपूरचा ‘३६ चौरंगी लेन’ हा अप्रतिम कलात्मक चित्रपट चर्चेत होता. त्या पार्श्वभूमीवर ‘८७ , हिल रोड, रामनगर, नागपूर’ हा या घराचा पत्ता त्या काळात मोठा काव्यमय वाटायचा.

बंगल्याचे मालक मधुकरराव वर्‍हाडपांडेंना सर्वच भाऊ म्हणत, आजच्या भाषेत सांगायचे तर एकदम ‘सही’ साधा माणूस हा. हे दाम्पत्य सुशील आणि लाघवी होते. भाऊ वर्‍हाडपांडे म्हणजे कथालेखक डॉ. वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे यांचे चुलतबंधू. वसंतरावांशी माझी ओळख झाली, ती वृद्धिंगतही झाली. त्यांच्या हनुमाननगरातील घरी अनेकदा जाणे-येणे झाले. वळणदार सही करून वसंतरावांनी आवर्जून दिलेली त्यांची अनेक पुस्तकं आजही माझ्या संग्रही आहेत. वसंतरावांशी गप्पा मारणे, हा नेहमीच ज्ञानार्जनाचा एक आनंददायी अनुभव असे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नागपूर पत्रिकेत असताना एकदा दहावीच्या रिझल्टच्यावेळी येणार्‍या दूरध्वनींना कंटाळून अनंतरावांचा दूरध्वनी क्रमांक सर्वांना देऊन तेथे रिझल्ट उपलब्ध आहे, असं सांगायला सुरुवात केली. अनंतरावांच्या घरी दिवसभरात हजार-बाराशे तरी फोन गेले असतील. ते जाम वैतागले पण, हा खोडसाळपणा कोणी केला, हे त्यांना समजतच नव्हते.

पुढे काही दिवसांनी ‘तो मीच’ सांगितल्यावर वैतागण्याऐवजी हा माणूस दिलखुलास हसत दाद देता झाला. तेव्हा अनंतराव आणि गिरीश गांधी अशी जोडगोळी होती आणि त्यांची गॅस एजन्सी होती. तेव्हा गॅस मिळण्यासाठी प्रदीर्घ वाट पाहावी लागत असे. माझे दोस्तयार अनिल पिंपळापुरे व वासंती मराठे, रवी दंडे व अंजली गोखले आणि प्रकाश निंबेकर व साधना देशमुख ही मंडळी प्रेमविवाह करून मोकळी झालेली. इकडे माझ्या भणंगपणाबद्दल कोणतीही फिकीर न करता मंगल तर गॅस मिळाल्याशिवाय लग्नाला तयारच नव्हती. पत्रकारांचे हक्काचे ठिकाण घारड-गांधी होते. त्यांना लग्नातला खोडा सांगितला. रात्री ऑफिसमधून येण्याच्याआधी गॅस घरी तयार होता.

आता वनराईचे तसंच अन्य अनेक क्षेत्रातील बडे नाव असलेले गिरीश गांधी त्या वेळी ‘मानव मंदिर’ ही संस्था चालवत. या संस्थेच्यावतीने शहरातील होतकरू विद्यार्थ्यांना सायकल आणि तत्सम उपयोगी वस्तू वितरित करण्याचा एक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला होता. हे उमेदवार निवडण्यासाठी प्रकाश देशपांडे, सुधीर पाठक, मी आणि अन्य एक पत्रकार (आता त्यांचे नाव आठवत नाही.), अशा चौघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या निमित्ताने नागपूर शहराचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढला, हे महत्त्वाचे नाही, तर नागपुरात किती भीषण दारिद्रय, आहे याचे जे दर्शन आम्हाला घडले, त्यातून आमच्या मध्यमवर्गीय पांढरपेशा आणि जीवनशैली सुरक्षित असलेले बुरखे अक्षरश: टराटरा फाडले गेले.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नागपूरसारख्या शहरात माणसं अक्षरश: किड्या-मुंग्यासारखी राहतात, कल्पनातीत अस्वच्छ, ओंगळही आयुष्य जगतात, हे पाहणे खरेच स्वत:वरचा विश्वास उडवणारे होतं आणि तरीही परिस्थितीशी झुंज देण्याची त्यांची जिद्द थक्क करणारी आणि इतरांना उमेदही देणारी होती. यातून आलेल्या कणवेपोटी पहिल्याच वर्षी लाभार्थीची संख्या फुगवून आम्ही चौघांनी गिरीश गांधींचे बजेट पार बिघडवून टाकले. तीन-चार वर्षे आम्ही चौघे या कामात होतो, नंतर व्यापामुळे दूर झालो.

गिरीश गांधी सुसंस्कृत आणि त्यांचे म्हणणे ठासून पण, कोणतीही पोझ न घेता सांगण्यात पटाईत. शिवाय त्यांचा जनसंग्रहही दांडगा आणि तो वृत्तपत्रातही आणि तोही वार्ताहरापासून ते थेट संपादकांपर्यंत आपले वरिष्ठांशी घनिष्ट संबंध आहेत हे मात्र ते त्या वृत्तपत्रातील कनिष्ठांना कधीही जाणवू देत नसत.

मी मुंबईत असताना १९९६ साली ‘लोकसत्ता’त ‘लोकप्रतिनिधींचा संशयास्पद व्यवहार’ ही वृत्तमालिका चालवताना काही मजकूर गिरीश गांधी यांच्याबाबत लिहिण्याची वेळ आली. त्यानंतर गिरीश गांधी मला ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉईंटवरील कार्यालयात भेटायला आले. ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते आणि मी माझ्या लिहिण्यावर, कारण ती माहिती नागपूर सुधार प्रन्यासमधील एका बड्या अधिकार्‍यानं दिलेली होती आणि त्या संदर्भातली कागदपत्रेही माझ्याकडे सुपूर्द केली होती. गिरीश गांधी यांनी दिलेला खुलासा मी स्वीकारला, मात्र त्यातील मजकूर प्रकाशित करण्याबाबत कोणतीही हमी दिली नाही. अशा वेळी संपादकांना भेटून दबाव वगैरे आणण्याचे जे काही टिपिकल प्रयत्न राजकारण्यांकडून नेहमी होतात तसे काही त्यांनी केले नाही, हे मान्य करायलाच हवे, पण ते काहीसे नाराज झाले यात शंकाच नाही; असे असले तरीही त्यांनी ते बोलूनही दाखवलं नाही, त्यांच्या देहबोलीतून मात्र ते जाणवले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशाच एका रात्री उशिरा वाचकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांना उत्तरे देणारे सदर सुरू करण्याची कल्पना रवी दंडेच्या डोक्यात आली आणि रवी दंडे, अनिल पिंपळापुरे, मीनाक्षी आणि श्याम पितळे या डॉक्टरांच्या नावाने हा स्तंभ सुरू झाला खरा पण, पहिल्या दोन आठवड्यातच इतर चौघांचा लिहिण्याचा उत्साह मावळला आणि पुढे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी एकट्या मीनाक्षीवरच पडली आणि तिनं  ती जवळजवळ वर्षभर निभावलीही. अमरावतीहून प्रदीप देशपांडे जाऊन-येऊन असायचाच. पुढे पुढे हा कारवा वाढतच गेला.

नागपूर पत्रिकेतले दिवस एक धमालही होती. नागपूरच्या पत्रकारितेत लक्ष्मणराव जोशी, दत्ता कविश्वर, युधिष्ठिर जोशी, दिनकर देशपांडे, आप्पासाहेब पाडळकर, उत्साहाने खळखळणारा विजय फणशीकर ही रिपोर्टिंगमधली आघाडीवरची नावे होती. प्रकाश देशपांडे, बाळ कुळकर्णी, प्रकाश दुबे, सुधीर पाठक, मोरेश्वर बडगे, अरुण फणशीकर, ओमप्रकाश सोनी हे तेव्हा दुसर्‍या फळीत होते. पुढे त्यात प्रदीप देशपांडेही सहभागी झाला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या रिपोर्टिंगसाठी कुमार केतकर, अरुण साधू, दिनकर रायकर, मधुकर भावे ही आमच्यासाठी ‘स्टार’ असणारी मंडळी मुंबईहून येत असत. हे सर्वच जण आम्हा नवोदितांना कोणतेही आढेवेढे न घेता रिपोर्टिंगच्या चार गोष्टी सहजपणे शिकवत, इतके चांगले वातावरण त्यावेळी नागपूरच्या पत्रकारितेत होते.

नात्यागोत्याची सर्व बंधने झुगारून त्या पलीकडे जाणारा प्रदीप देशपांडे, सिद्धार्थ सोनटक्के आणि प्रकाश देशपांडे यांचा बंध याच काळातला. विजय सातोकर आणि शरद पाटील यांच्यासारखे अकृत्रिम कौटुंबिक मैत्रही याच दरम्यानचे. एका मिनिटाचा जरी वेळ मिळाला तरी आप्पासाहेब पाडळकर पुस्तक काढून वाचायला सुरुवात करत. मराठी, हिंदी, इंग्रजी असा कोणताही भाषाभेद त्यांच्याकडे नव्हता. डोळ्यावरचा चष्मा कपाळावर सरकवून आप्पासाहेब पाडळकर ‘नागपूर टाईम्स’साठी टाईपरायटरवर कॉपी लिहायला बसत आणि टापिंगचे सर्व कार्य एका बोटाने करत. ते कार्याला लागले की, तासनतास न्यूज रूममध्ये टिकटिक घुमत असे.

माझे पहिले मुख्य वार्ताहर (पुढे मी त्यांचा मुख्य वार्ताहर झालो!) दिनकर देशपांडे हे माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातले एकमेव असे गृहस्थ की, जे स्वत:चा उल्लेखही ‘राव’ असाच फोनवर बोलतांना करत. दिनकररावांचे घर माझ्यासारख्या असंख्य बॅचलरला रात्री-बेरात्रीही अन्न मिळण्यासाठी खुले असे. घरी पोहचल्यावर दिनकरराव पत्नीला ‘मनीषा काही तरी खायला दे या पोरांना’ असे सांगत आणि रात्री दोन-अडीच वाजताही वहिनी कुकर लावत. दिनकररावांचा जनसंग्रह अफाट, बालसाहित्यिक म्हणून त्यांचे नावही मोठे. वर्‍हाडी माणसांचे किस्से ते केवळ सांगतच नसत तर तेवढ्याच रसाळपणे लिहीतही असत. दिनकररावांभोवती कायम माणसांचा गराडा असे. रात्री आम्हा बॅचलर्सची कुठल्या तरी पत्रकार परिषदेत पुख्खा झोडण्याची सोय लावून देण्यात दिनकरराव पुढाकार घेत असत.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!

मोदी-शहा यांची ‘जादू’ हिमाचल प्रदेशात चालली नाही, कर्नाटकात चालली नाही; ती मध्य प्रदेशात तरी चालेल का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!

समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...

..................................................................................................................................................................

रमेश राजहंस हे एक अफलातून वृत्तसंपादक नागपूर पत्रिकेत होते. अक्षरश: रडकुंडीला येईपर्यंत ते आम्हा नवीन रिपोर्टर्सकडून बातमी पुन्हा पुन्हा लिहून घेत असत. संगीत हा त्यांचा प्राण आणि आपल्या बोलण्यात नवीन काही वाचनाचा संदर्भ आला की, ते वाचायला मिळण्यासाठी त्यांचा कायम धोशा असायचा. नागपूर पत्रिकेतून बाहेर पडलेल्या आजच्या ज्या पत्रकारांची कॉपी चांगली असेल, त्याचे सर्व श्रेय रमेश राजहंसांना आणि ज्यांचा लोकसंपर्क मोठा आहे, त्याचे श्रेय दिनकरराव देशपांडेंना.

नागपूर पत्रिकेत भेटलेल्या शरद देशमुख वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ, पण पहिल्याच भेटीत त्यानं हे अंतर दूर करून जवळीक साधली. विधि शाखेतील पदवी प्राप्त असणारा शरद देशमुख सर्वार्थानी हरहुन्नरी आणि अवलिया या सदरात मोडणारा. एकदा कामाला बसला की, वेळ-काळ याचे कोणतेही भान न ठेवता वीस-बावीस तास काम करण्याची त्याची तयारी असे आणि कामही अगदी बिनचूक.

शरदचं  वाचन अफाट. बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्य कथांपासून ते अगदी जी. ए. कुलकर्णींपर्यंत तो अपडेट असायचा. रात्रंदिवस काम करूनही त्याला वाचायला आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ केव्हा मिळतो हे कोडेच असायचं. शरदचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो अस्सल खवय्या होता. नागपुरात कुठे काय चांगले खायला मिळतं आणि कोणत्या पदार्थाची चव केव्हा आणि किती प्रमाणात घ्यायची, याची इतकी जानकारी असणारा सहकारी मला अद्याप लाभलेला नाही.

रविवार किंवा अन्य पुरवणीचं  काम करताना कोणत्याही पद्धतीने मजकूर कमी पडला की, आम्हाला हमखास आठवण यायची ती शरदची. त्याने कधीच कुणाला या बाबतीत निराश केले नाही. पत्रिकेत नवीन आलेल्यांना शिकवण्याची शरदची हातोटी नवोदितांना नवी उमेद प्राप्त करून द्यायची. ‘नागपूर पत्रिका एक प्रतिष्ठित सवय’ ही कॅचलाईनही त्याचीच. शरदचा अकाली मृत्यू चटका लावणारा ठरला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नागपूर पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे, या वृत्तपत्राचे धोरण कोणा एका विचाराचा किंवा राजकीय पक्षाचा पाठपुरावा करणारे नव्हतं. तरीही या वृत्तपत्राच्या सर्वच विभागात हिंदुत्ववादी विचारांच्या सहकार्‍यांची संख्या जास्त होती. सर्वच विभागातील वरिष्ठ अधिकारी बहुसंख्येनं हिंदुत्ववादी होते. अर्थात कोणत्याही प्रकारच्या लिखाणावर या मंडळींनी कधी सेन्सॉरशीप लादल्याचं मात्र आठवत नाही. त्यामुळे साहित्य, नाट्य, कला, राजकारण आदी क्षेत्रातील प्रस्थापित आणि नवखे तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत काम करणार्‍या चळवळीतल्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची वर्दळ असे. या सर्वांशी संबंधित बातम्या, लेख, रिपोर्ताज यांना पत्रिकेत आवर्जून स्थान मिळत असे. सीमाताई साखरे यांचा तर अन्य एका वृत्तपत्रात नियमित असा स्तंभ सुरू होता, पण सीमाताईंच्या स्त्री अत्याचारविरोधी लढ्यातील बातम्यांना अग्रस्थान देत असताना वरिष्ठांपैकी कोणी हरकत घेतली नाही. लीलाताई चितळे, रूपा कुळकर्णी, विजय जावंधिया, मोहन हिराबाई हिरालाल, शरद पाटील, मदन थूल, चंद्रकांत चन्ने, असे एक ना अनेक तेव्हा बहरात असणारे चळवळीतल्यांचे नागपूर पत्रिका हे विसाव्याचेही ठिकाण होते.

---

एखादं  वृत्तपत्र बंद पडणे, याचा अर्थ त्या  प्रदेशाच्या साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा विविध घटकांत घडणार्‍या घडामोडींचा एक साक्षीदार अस्तंगत झाल्याच्या वेदना असतात, जणू एक इतिहास थांबून जातो. जर त्या प्रकाशनाशी आपले भावबंध जोडले गेले असले, तर हा काही उमाळा नसतो तर, वेदनेची सर्वांगाला झिणझिण्या आणणारी एक कळ असते. पत्रिकेने केवळ चांगल्या पत्रकारितेचा संस्कारच केला नाही, तर निर्व्याज सृजनांचा असा मोठ्ठा गोतावळा दिला. पत्रकारितेचा उन्माद या सृजनांनी आजवर माझ्यावर स्वार होऊ दिलेला नाही, त्यातून उतराई होणे शक्यच नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......