माननीय बौद्धिकप्रमुख भाऊसाहेब यांच्यासमोर बसून आम्ही त्यांना एक सवाल केला होता. सवाल कसला, बालिश पृच्छा होती ती. बौद्धिकप्रमुखांच्या विशाल अन् सखोल ज्ञानाला दिलेली, ती एक हलकीशी ढुसणी होती. त्यांच्या जाडजूड मांड्यांवरही खेळायची आमची प्राज्ञा नव्हती. त्यांच्या ढेरीवरून घसरत खाली येण्याचा खेळ आमच्या नशिबी नव्हता. थोडक्यात, बालक म्हणण्याइतकीही आमची बौद्धिक उंची बौद्धिकप्रमुखांच्या प्रचंड ज्ञानापुढे नव्हती. आम्हाला त्यांनी ‘खुजे’ म्हणून हिणवले असते, तरी आम्ही वाईट वाटून घेतले नसते. ‘ए बुटक्या’ असे म्हटले असते, तरी चालले असते. होतोच आम्ही त्या ज्ञानशिखरासमोर अंगठ्याएवढे…!
पण आमच्या त्या सवालाने बौद्धिकप्रमुख एकाकी शांत बसले. त्यांनी जणू मौन धारण केले. ना हातवारे, ना तोंडाद्वारे काही आवाज. आम्ही विचारला होता एक प्रश्न आणि त्यांना पडला होता पेच. पेचात पडलेले आमच्यासारख्या बावळटांचे चेहरे समोर आणून बघा! मख्खपणा, तोड वासलेले, डोळे एकटक थिजून गेलेले अन् श्वासोच्छवास जणू कानातून चाललेला. स्तब्धता अशी भयंकर असते- आम्हाला माहीतच नव्हते!
आमचा प्रश्न अगदी पोरकट म्हणजे सोपा होता. आम्ही माननीय बौद्धिकप्रमुखांना विचारले होते, “ ‘भारताला स्वातंत्र्य का हवे?’ अशी सांगोपांग मांडणी करणारे एखादे पुस्तक परमपूज्य गुरुजींनी अथवा परमपूज्य डॉक्टरसाहेबांनी लिहिले असेल, तर आम्हाला पाहिजे. कारण आता आम्हाला खोटे आरोप अजिबात सहन होत नाहीत. आमच्या हाती काही तरी ठोस द्या, म्हणजे त्या फडतूस काँग्रेसवाल्यांच्या तोंडावर फेकून मारू आम्ही आणि कायमचे गप्प करू त्यांना!”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
थोडक्यात, सहन होत नाही अन् सांगता येत नाही, अशी जाहिरातीमधली ओळ आमच्या अवघ्या मेंदूत घुमत होती. हातपाय शिवशिवत होते, समोरच्यांचे तोंड गप करायला. मुखी असंख्य अपशब्द येऊन बाहेर पडण्याची परवानगी मागत होते. सारखी भुणभुण लावतात हे काँग्रेसवाले, त्याने आम्ही भयंकर वैतागलो होतो. मन सांगत होते, अभ्यास करून उत्तर दिले की, दातखीळ बसेल या राष्ट्रद्रोह्यांची कायमची.
आमचे तात्यासाहेब होते तुरुंगात. ते शास्त्रीबोवा होते शिक्षा भोगत, आमची संबंध एक शाखाच सत्याग्रह करून जेलमध्ये गेली होती, असे आम्ही कितीतरी वेळा त्या महामूर्ख अडाणी काँग्रेसवाल्यांना बजावले, परंतु दरवेळी ‘पुरावे द्या, काहीबाही थापा मारू नका’, असे आम्हाला दरडावून ते नेहमी हरवतात. म्हणून ठरवले की, माननीय बौद्धिकप्रमुखांना प्रत्यक्ष भेटूनच त्यांच्याकडे असलेला एखादा ठोस ऐवज मिळवावा अन् आपली वैचारिक बाजू बळकट करावी. मार तरी किती खायचा एकाच मुद्द्यावरून? काही मर्यादा असते किनई सहनशक्तीची?
अगदी साधी मागणी होती आमची, पण समोर बौद्धिकप्रमुख अचानक पुढ्यात वाघ यावा, तसे बसून राहिलेले. (आजकाल समोर वाघ यावा व आपण गर्भगळीत व्हावे, असे प्रसंग टीव्हीवर अन् वर्तमानपत्रांत सारखे पाहून तसे काही होत नसावे, असेच वाटू लागले आहे. उलट वाघाने आपल्याला दर्शन द्यावे, म्हणून व्याकूळ झालेले लोकच जास्त झाले आहेत.) बौद्धिकप्रमुख भाऊसाहेब असे निश्चल बसलेले पाहून आम्ही चरकलो. आपल्या हातून काही भयंकर घडले की काय, असे आमचे मन आम्हाला खाऊ लागले. उगाचच म्हाताऱ्याला या वयात त्रास दिला, असे वाटू लागले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तेवढ्यात घसा खाकरून बौद्धिकप्रमुख काही पुटपुटत आहेत, असे दिसले. ‘हे बघ बाळ…’ असे काही तरी त्यांनी म्हटल्याचे आम्हाला ऐकू आले. पुढचे काही नाही. आम्ही कानात प्राण आणून अत्यंत जिज्ञासू चेहरा करून त्यांना विचारले, “काय म्हणालात भाऊसाहेब? काही समजले नाही. आहे म्हणता तसे पुस्तक? स्वातंत्र्य का हवे, ते समजावून सांगताना ते मिळवायला काय कृती करावी, हेही त्यात सांगितले असेल ना, त्या महामानवांनी, त्या क्रांतिकारकांनी? तेच मला हवे आहे. मग बघा, कसे हाणतो त्या काँग्रेसवाल्यांना ते…”
“मूर्ख माणसा, गप्प बस! कळतं का काही तुला? तुला काही करायचंय म्हणून माझा वेळ खायला का आलायंस? जा. वेळ झालीय शाखेची, तिकडे जाऊन चर्चा करा आपसांत. मला विचारायची हिंमत कशी झाली तुझी?”
एकदम भडाभडा बौद्धिकप्रमुख बोलते झाले. त्यांचा गोरापान चेहरा लाल झाला होता. त्यांचे थुलथुलीत पोट जोरजोरात वर-खाली होऊ लागले होते. कानांमधून आता गरम वारे बाहेर पडते आहे, असे जाणवू लागले. त्यांच्या कानांवरचे केसांचे झुपके आम्हाला नागाच्या फण्यासारखे दिसू लागले. बापरे! हे काय आपण केले, असे वाटून आम्ही दु:खी झालो. शरमलो.
आम्हाला शाखेत जायला सांगत आहेत, म्हणजे बौद्धिकप्रमुख आपले शंकासमाधान करणार, असे आम्हाला वाटले. पण आज काही गुरुवार नव्हता. दर गुरुवारी त्यांची बौद्धिके ठरलेली. आमच्या मनात कोणते प्रश्न असतील, ते स्वत:च ठरवून बौद्धिकप्रमुख यायचे अन् आमचे बौद्धिक घ्यायचे. प्रश्नोत्तरे त्यांचीच, श्रोते आम्ही.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आता आम्ही पुरेसे भांबावलो. इकडेतिकडे बघू लागलो. भिंतीवर भारताचा नकाशा होता, पण तो नेहमी दिसणारा नव्हता. चेहरा सुजल्यासारखा त्याचा आकार होता. तो १९४७ पूर्वीचा नकाशा आहे, असे आम्हाला बौद्धिकप्रमुखच एकदा म्हणाले होते. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा. असे कसे होईल? आम्ही वर्गात शिकायचो तो नकाशा अगदी छान रेखीव असे. आणि हा काही नवे अवयव उगवल्यासारखा दिसतो आहे. म्हणजे राहायचे स्वतंत्र देशाच्या नकाशात आणि जाऊ बघायचे या अगडबंब - बघायची मुळीच सवय नसलेल्या - नकाशात! स्वातंत्र्य मिळवण्याआधीच्या? गंमतच म्हणायची ही!
बौद्धिकप्रमुख सांगत – “एवढा मोठा आपला देश होता. त्याचे सगळेच म्हणजे संस्कृती, इतिहास, भूगोल, परंपरा मोठे होते? मोठे म्हणजे आकाराने नाही, तर मानाने! तो देश पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे. त्यासाठी रोज शाखेत येत चला. काटछाट झालेला नकाशा आपला नसतो. आपला अस्सल नकाशा हा एवढा असतो. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मिळाले अन् आपल्या देशाची अशी कापणी झाली. तुकडे झाले देशाचे! त्यामुळे देश जायबंदी झाला. त्यात देशाचा काही दोष नाही. स्वातंत्र्यामुळे असे झाले, म्हणून स्वातंत्र्य आणि ते मिळवून देणारे लोक दोषी आहेत.”
“भाऊसाहेब, तुम्ही याच नकाशावर व्याख्यान दिल्याचे स्मरते. ‘अखंड भारत’ हाच, असं तुम्ही म्हणायचा. मग परत मागे जायचे? म्हणजे स्वातंत्र्य नसलेल्या काळात आपण जायचे का? हा भिंतीवरचा देश खरा आपला होता आणि तो पुन्हा मिळवायचाय, हो ना?” भानावर येत आम्ही बौद्धिकप्रमुखांना विचारले. खरे पाहता त्यांना मस्का लावायला आम्ही हा प्रश्न केला होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ते आम्हाला न्याहाळतच होते. आपण हाकलले तरी हा कसा जात नाही, अशा खाऊ का गिळू नजरेने ते आमच्याकडे पाहात राहिले. पण आमच्या या निरीक्षणाने अन् त्यामधून आम्ही काढलेल्या निष्कर्षामुळे त्यांचे मन बदलल्याचे आम्हाला दिसले. अतिशय स्निग्ध दृष्टीने आम्हाला निरखत बौद्धिकप्रमुख प्रेमळपणे बोलले-
“अरे वा! उमजले की तुला. नुसता या नकाशापुढे उभा राहिलास आणि केवढा मोठा साक्षात्कार झाला बघ तुला. अशी आहे या नकाशाची जादू. त्याकडे दृष्टी फेकली की, आपल्याला तो बोलावतो आणि म्हणतो, ‘या माझ्या मुलांनो, करा माझी सुटका तुमच्या विकृत कल्पनांमधून. कसले ते स्वातंत्र्य, कशाचे ते स्वातंत्र्य? तुमच्या त्या वेडापायी पाहा, माझी कशी अवस्था झाली ते?’ ”
आता बौद्धिकप्रमुख खुलले. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रागा नाहीसा होऊन, त्या जागी संतोष, समाधान अन् प्रेम झळकू लागले. तेही त्या भिंतीवरच्या नकाशाकडे बघू लागले. त्यांचा चेहरा अचानक इतका उजळला की, त्यांनी नुकतीच आपली दाढी व मिशी साफ केली, असे वाटू लागले. त्यानंतर खूप चोळून घासून आंघोळ केली, असेही वाटले. एक नकाशा एखाद्या माणसात इतके चैतन्य निर्माण करतो, याचे आम्हाला दर्शन झाले.
“हा नकाशा कुठे मिळेल? आम्हाला हवाय.” आम्ही बोलून गेलो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
बौद्धिकप्रमुख पुन्हा स्तब्ध झाल्याचे आम्ही जाणले. त्यांची नजर नकाशावर खिळली होती. परंतु आमच्या त्या प्रश्नाने त्यांचा पुन्हा पापड मोडला की काय, असे आम्हाला वाटले. मनातल्या मनात खूप धास्तावलो. उगाच हावरटपणा केला, असे वाटू लागले. त्यांना आता पुन्हा आपण पेचात पाडले की काय, या प्रश्नाने आमचे मन पुन्हा आम्हाला खाऊ लागले.
मघाशी त्याचे पोट भरले नव्हते वाटते. बौद्धिकप्रमुख धुसफुसत आहेत, असे आवाज आमच्या कानावर पडू लागले. बहुधा त्यांचा राग अजून शांत झालेला नव्हता. काय करावे समजेना. पण चिवटपणा आपला गुण असतो. नव्हे, निलाजरेपणा आपल्याला ताकद देत असतो, अशी शाखेमधली त्यांची शिकवण आठवली आणि पाय रोवून तिथेच उभे राहिलो.
राष्ट्रसेवेसाठी आपले सर्वस्व त्यागावे. अहंकार, मानअपमान अशा भावना राष्ट्रोत्थानाआड येऊ देऊ नयेत. आपण कोण राष्ट्रापुढे? एक यत्किंचित कीटक. राष्ट्र केवढे महान! त्याचा उत्कर्ष जर आपल्यामुळे होत असेल, तर आपण मागे हटू नये, असे याच भाऊसाहेबांनी आम्हावर बिंबवले होते. आम्हाला कट्टर स्वयंसेवक त्यांच्याच तर बौद्धिकांनी बनवले होते!
“त्याचं असंय बाळ, हा असा नकाशा कुठंही मिळत नसतो. तो विकायला बंदी आहे. छापायलाही मनाई. तसं केलं तर गुन्हा होतो. हेच तर आपल्याला बदलायचंय. आपली प्रिय महान भारतभूमी आजच्यासारखी काटछाट झालेली तुलाही बघवत नाही ना? स्वातंत्र्यानं अशी तिची खांडोळी केलीत. १९४७नंतर आपला नकाशा आटला. म्हणून आपण तो आधीचा भारत पुन्हा जिवंत करायला सज्ज झालो आहोत.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बौद्धिकप्रमुख एकाकी सुस्वर, मवाळ, हळवे झाल्यासारखे बोलले. बौद्धिकांत बुद्धीला झिणझिण्या आणणारे असे ज्ञान ते देत नसत. त्यांना बुद्धीपेक्षा भावना पेटवणे जास्त आवडे. म्हणजे त्यांची बौद्धिके भावभावनांनी चिंब भिजलेली असत. आम्ही सारे त्यात ओले होऊन जात असू. बुद्धी कोरडी असते, तिला राष्ट्र वगैरे कळत नाही, असा त्यांचा हेका असे.
बौद्धिकप्रमुखांना आम्ही ‘भारताला स्वातंत्र्य का हवे?’ असे पुस्तक तुमच्यापाशी आहे का, असे विचारणे चूक होते, याचा उलगडा आम्हाला झाला. त्यांच्या घरात पुस्तकांचे कपाट, शेल्फ अथवा टेबल असे काहीच दिसत नव्हते. ते आम्हाला सांगत की, त्यांची तयारी आधीच्या थोर राष्ट्रभक्त बौद्धिकप्रमुखांची बौद्धिके ऐकतच झाली होती. त्यांनी एकदा सांगितल्यावर पुस्तकांची काय आवश्यकता?
आम्ही पुरते गडबडलो. कारण काँग्रेसवाले अन् समाजवादी लोक आमच्याशी वाद घालताना ‘पुरावे दाखवा’, ‘साक्ष दाखवा’, ‘थापा नका मारू’ असे सांगून आमची पुरती फजिती करतात. आम्हाला स्वातंत्र्यलढा ज्ञात झाला, तो सावरकर यांनी तुरुंगवास भोगल्यामुळे. त्यांची आठवण दिली की, काँग्रेसवाले अन् समाजवादी म्हणतात, ‘अहो, अंदमानानंतर काय केले ते सांगा! संघाने काय कार्य केले तेवढे सांगा!!’
आम्हाला फार अपमानित व्हायचे. म्हणून आम्ही बौद्धिकप्रमुख भाऊसाहेबांकडे आलो होते की, काहीही करून आम्हाला ठोस माहिती द्या अन् काही पुरावे द्या. परंतु ते तर काही सांगायलाच तयार नाहीत! ना त्यांनी कोणती पुस्तके दिली, ना हे आपले स्वातंत्र्यसैनिक अशी कोणाची ओळख दिली… आता काय करावे? आम्ही हबकलो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आमची चुळबुळ आणि हताश अवस्था बौद्धिकप्रमुखांच्या लक्षात आली. त्यांना आमची फार काळजी वाटल्याचे आम्ही ताडले. कारण शाखेत जर आम्ही याच प्रश्नावरून काही पृच्छा, शंका व्यक्त करू लागलो, तर फारच मोठे संकट ओढवायचे, असे त्यांच्या मनाने घेतले असावे. तसे त्यांनीच एकदा आम्हाला सांगितले होते. त्या वेळी ते म्हणाले होते- ‘आपल्यापाशी सर्व समस्यांची उत्तरे आहेत. शाखा हाच सर्वांत मोठा उत्तरांचा खजिना आहे. इथे बाहेरचे प्रश्न आणायचे नाहीत आणि इथून प्रश्न घेऊन बाहेर जायचे नाही! संघाला सगळे कळते. संघच सर्व प्रश्नांचे उतर आहे.’
बौद्धिकप्रमुख आमच्याशी खूपच वत्सल अन् बरोबरीच्या स्वरात बोलू लागले- “हे बघा कुमारराव, तुमची अडचण आम्हाला कळते. हे काँग्रेसवाले, समाजवादी आणि काही पुरोगामी तुम्हा मंडळींचा बुद्धिभेद करायला जातात. तुम्ही त्याला बळी पडता. आपला मुख्य शत्रू कोण आहे? परमपूज्य गुरुजींनी जे तीन शत्रू आपल्याला संगितले, त्यात कोण कोण आहे? मुसलमान, ख्रिश्चन आणि साम्यवादी, हे ते तीन शत्रू आहेत ना आपले? यांच्यात आपले तथाकथित स्वातंत्र्यहरण करणारे इंग्रज आहेत का? नाहीत ना? मग लक्षात घ्या, आपली लढाई इंग्रजांशी नव्हती. हां, शत्रूंमध्ये ख्रिश्चन सामील केले, म्हणून इंग्रज आले का त्यात? असू शकतात आणि नसूही.
आपलं मूळ उद्दिष्ट काय होतं? या तीन शत्रूंपासून स्वातंत्र्य हवं होतं आपल्याला. तेव्हा उगाच पारतंत्र्याचा ओरडा का करायचा? आम्हाला ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्यात ज्यांची मदत होईल, त्यांना सोबत घ्यायचं ठरवलं होतं आपल्या प्रमुखांनी. काही केल्या गांधी, काँग्रेस, नेहरू यांच्याकडे देश सोपवायचा नाही, असा आपला इरादा इंग्रजांना ठाऊक होता आणि इंग्रजांचा आपल्याला.”
एवढे बोलून बौद्धिकप्रमुख थांबले. जणू त्यांना एवढाच इतिहास माहीत होता किंवा त्यांना आणखी काही सांगायचेच नव्हते.
आम्ही पुन्हा चुळबुळू लागलो. तोंडामधून शब्द बाहेर पडायची तयारी करू लागले. परत बौद्धिकप्रमुख ओरडतील की काय, असे भय वाटू लागले. तेवढ्यात त्यांनीच भिवया उंचावल्या आम्हाला बघून.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आम्ही बरळू लागलो : “पण भाऊसाहेब, सध्या ‘स्वातंत्र्याचा अमृतकाल’ असल्याचं मोदीजी सतत सांगत आहेत. त्यात आपल्या लोकांची, परमपूज्य मंडळींची नावंच नसतात. त्याऐवजी आम्ही कधीच न ऐकलेली काही नावं असतात. आदिवासी, ग्रामीण, राजे-राण्या अशा काही लोकांची नावं असतात, मग आम्ही गोंधळतो. कारण आमच्या आई-वडिलांनाही ती ठाऊक नसतात. दुसरं असं की, आमच्या कानावर स्वातंत्र्यासह देशाची फाळणी झाल्याचं एवढं येतं की, स्वातंत्र्याचा आनंद साजरा करायचा नाही, कारण आपल्या देशाचे तुकडे झाल्याचं दु:ख आधी येतं… मग आमच्यासारख्यांनी काय करायचं? ते काँग्रेसवाले म्हणतात की, देशाची फाळणी होत असताना कुठं होतं, ते तुमचं संघटन आणि तुम्ही? का नाही तुम्ही आडवं पडून फाळणी अडवली?”
बौद्धिकप्रमुख अचानक आतल्या खोलीकडे वळून ओरडून म्हणाले, “अहो, ऐकताय का? या बाळाला कपभर दूध आणा बरं, गरम गरम. भूक लागलेली दिसतेय त्याला. भुकेपोटी काहीबाही बरळू लागलाय तो.”
बापरे! ही तर आपल्या हकालपट्टीची आज्ञा. बौद्धिकप्रमुख चिडलेले दिसतात. आता काय करावे? आम्हीच आता पेचात पडलो. कसे तरी करून बौद्धिकप्रमुखांना खुलवावे असा विचार केला. मनाचा हिय्या केला अन् बोललो, “भाऊसाहेब, आम्हाला असं वाटतं की, जर आपल्यापाशी आपलं स्वत:चं काही नसेल, तर आपण बेलाशक पक्ष फोडून माणसं आपल्याकडे आणतो, तसा इतिहास फोडून आपल्याकडे आणला तर?
म्हणजे असं की, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले पुष्कळ लोक स्वत:हून सत्याग्रह वगैरे करायचे. आपण त्यांना ‘आपलं’ म्हटलं तर कसं राहील? म्हणजे ज्यांचा काँग्रेसशी, समाजवाद्यांशी संबंध नव्हता, पण ज्यांना कैद झाली होती, त्यांना आपण ‘आपलं’ म्हणून घोषित केलं तर? त्यामुळे काँग्रेसवाल्यांची दातखिळ बसेल ना! ती मुसलमान पोरं आपल्या पोरी प्रेमात पाडून जशा पळवतात, तसा हा आपला ‘जिहाद’ असावा का? ‘फ्रीडम जिहाद’ म्हणून शकतो आपण त्याला.”
बौद्धिकप्रमुख थयथयाट करतील, लाठी आपल्या टाळक्यात हाणतील, अशा बेतानं आम्ही प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. उलट ते हलके हलके स्मित करू लागले. मग ते ओरडून म्हणाले, “शाब्बास! आहेस तू आपल्या परंपरेमधला. उद्यापासून तुला शाखाप्रमुखाचं पद द्यायला सांगतो.”
आता आमच्या बालबुद्धीने आम्हाला अर्थ सांगितला की, ‘जिहाद’ म्हणजे डल्ला! त्यासाठी बऱ्याच उचापती कराव्या लागतात!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment