टागोरांच्या अतीतीव्र संवेदनेची नस पकडायला थोडा नेट लावावा लागतो. पण मोलाचे, तुम्हाला श्रीमंत करणारे काही आत मुरवायचे, तर थोडी किंमत मोजायला हवी नं?
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन वैद्य
  • ‘रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे’
  • Wed , 16 August 2023
  • ग्रंथनामा शिफारस रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे Ravindranath Tagoranchi Patre रवीन्द्रनाथ टागोर Ravindranath Tagore साने गुरुजी Sane Guruji

‘रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे’ हे पुस्तक पाहिले आणि साने गुरुजींनी आपली भाची सुधास लिहिलेली ‘सुंदर पत्रे’ आठवली. शाळकरी वयात ती आसूसून वाचलेली. नंतर घरात असावेच म्हणून घेतलेले. त्याचे तिन्ही भाग मात्र कुणीतरी वाचायला नेले, ते परत आलेच नाहीत. पण या निमित्ताने किमान डोळादेख तरी व्हावी, असे फार वाटू लागले. तसा लायब्ररीत गेलो. जीर्ण झालेले सुरुवातीच्या आवृत्त्यांमधले तिन्ही भाग पाहिले.

गुरुजींनी प्रत्यक्षात ‘साधने’साठी शेवटच्या वर्षात म्हणजे १९४९मध्ये जवळजवळ वर्षभरात लिहिलेली ही ४२ पत्रे उस्फूर्तपणे, कुठल्याही निमित्ताने वा विनाही, पण काहीशा उपदेशपर बाजाची, सगळीकडे वाचली जाणार आहेत, याचे भान ठेवून लिहिलेली आहेत, असे जाणवले. यातला गुरुजींचा स्वर फार हृद्य, ओला आहे. यातले पहिलेच पत्र जून १९४९मधले. गुरुजी मृगाआधी पंधरा दिवस पाऊस आलेला. पेरणीची पूर्वतयारी न झालेल्या शेतकऱ्यांची धांदल वर्णन करतात. पहिल्या पावसासाठी उत्सुक धरतीचं सुंदर वर्णनही येतं.

टागोरांच्या या पुस्तकातही ‘साधना’ या त्यांच्याच मासिकासाठी काही कर्तव्य म्हणून, वेळेचा काच पाळत लिहायच्या सामाजिक विषयांवरील लेखनाचा अनेकवार उल्लेख पाहून गंमत वाटली. पण टागोरांनी लिहिलेली पत्रे छापली गेली, ती जवळपास लिहिल्यानंतर दोन दशकांनी. प्रत्यक्ष लेखनामागे संवादाशिवाय, अभिव्यक्तीच्या असोशीशिवाय अन्य कसला ‘ड्राईव्ह’ नव्हता. टागोरांची चैन गुरुजींना मानवणारी, परवडणारी नव्हती. वैयक्तिक अनुभव या अर्थानं गुरुजी कुठल्याच घटिताकडे पाहत नाहीत, त्याची एक चौकट त्यांच्या मनात तयार होती. राजकारण-समाजकारणाचा काच नसता, तर त्यांची लेखनाची तितकीच अफाट असोशी कशी व्यक्त झाली असती, या कल्पनेने थोडे उदास व्हायला झाले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

कुठलंही पुस्तक वाचताना पहिल्या चार-सहा पानातंच यातल्या ऐवजाशी संवाद शक्य आहे का, याचा अंदाज येतो. तशी हातात लाल पेन्सिल येते. पुढे कदाचित लिहावेसे वाटले, काही प्रतिसाद-प्रतिवादही करावासा वाटला, तेव्हा पुन्हा पुस्तक पूर्ण वाचायचा वेळ असत नाही, तर त्यासाठी समासात काही खुणेचे शब्द, महत्त्वाचा मजकूर अधोरेखित करायची सवय. (त्यासाठीच अर्थात पुस्तक आपलेच हवे असते.) लिहायचे, तर नंतर तेवढा भाग फक्त चाळून पूर्ण पुस्तकाच्या मांडवाखालून पुन्हा जाता येते. बऱ्याचदा मुद्रितात राहून गेलेल्या चुका भाताच्या घासात खडा लागावा, तशा बोचत राहतात. त्याच्याही लाल खुणा.

(सरदेशमुख आपले नवे पुस्तक आले की, शांतपणे पाहत अशा सगळ्या राहून गेलेल्या चुका दुरुस्त करून ठेवत. एखाद्या शब्दाचा अभिप्राय समासात असे काही वेळा. किती न् काय काय अंगी मुरत गेलेले असते, हे जाणवून केव्हा केव्हा गंमत वाटते. बाय द वे, या पुस्तकात अशा चुका नगण्य आहेत, हे सांगायला हवे.)

इथे टागोरांची सगळीच वर्णने, संभाषिते इतकी काव्यमय, चित्रदर्शी, चिंतनशील आहेत की, सगळीच पानं रंगायला लागली, तसा नाद सोडला. यात अनुवादक विलास गिते यांचे श्रेयही मोठे. ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा नुसती येणं, तिचा आपल्या भाषेत अर्थ लावता येणं, ही प्राथमिक, जुजबी बाब. पण मूळ भाषेत कालौघात, सांस्कृतिक घुसळणीत घडत गेलेले बदल लक्षात यायला हवेत. आपल्या भाषेत त्याचे प्रतिबिंब दाखवता यायला हवे. नाहीतर अर्थ‌ पोचवता येईल, पण मुळातला वाचनानुभव? हे अर्थात सोपे नाही.

टागोर मराठीत लिहिते, तर कदाचित ते हेच शब्द असते, असे वाटून गेले. इतके तादात्म्य क्वचित दिसते. जुना काहीसा अलंकारिक, विशेषणांनी युक्त तरी सहज संवाद दुसऱ्या भाषेत तसाच पण अकृत्रिमरित्या पोचवणे हे मोठेच काम.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

या ११२ पत्रांत प्रत्यक्षात कुठलीही मोठी घटितं नाहीत. निसर्गाचा भोवती अफाट पसरलेला पसारा, त्यातल्या बारीकसारीक घडामोडी आणि त्या पाहत अनुभवत असताना मनात उमटत असलेले विचारतरंग, हे सगळं एकाच वेळी शब्दांत पकडण्याचा प्रयत्न टागोर करत राहतात.

म्हणतात, “एखाद्या गोष्टीचा पूर्ण आनंद घ्यायचा तर फुरसत हवी. या लहान गावात एकटा राहत असताना पत्रं इतकी चांगली वाटतात, कारण त्यातलं अक्षर न् अक्षर आस्वादण्यासाठी वेळ असतो. मनातल्या कल्पना त्यातल्या प्रत्येक शब्दाभोवती सजवता येतात, घाई केली की, हे सुख नाही. सुखाची इच्छा वेगाने पुढे जाताना बऱ्याचदा सुखालाच मागे टाकून जाते.”

पद्मा नदीत हाऊसबोट थांबू शकेल इतकी खोली असलेल्या ठिकाणी ‘पाणीच पाणी चहुकडे’ असा रहिवास. तिथून दिसणारे दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरातले नैसर्गिक विभ्रम पाहणे, ते कुणाला तरी सांगणे - याची एक अधीर असोशी मनात असतानाच जमीनदारीतला फुका डौल, तिथले उच्चासन सांभाळताना तेही आपण का इथे आणि कसलाच फरक नसलेले बाकी सगळे खाली हात जोडून का, या अनुत्तरित प्रश्नाशी सतत झगडत चालते. हे समजून घेणारा परिवारातही नाही कुणी.

एके ठिकाणी बोटीवर सकाळी झाडलोट, सफाई करणारा माणूस येत नाही वेळेवर, तर चिडचिड होते, रागही येतो. थोडे उशिरा आल्यावर तो दगडी चेहऱ्याने ‘आठ वर्षांची मुलगी काल रात्री गेली म्हणून थोडा उशीर’, इतकेच सांगतो आणि खालमानेने झाडू हातात घेतो, असा प्रसंग आहे. मन विदीर्ण होते टागोरांचे, वाचताना आपलेही.

भोवताली पसरलेलं वेल्हाळ चांदणं आणि लादलेली जमीनदारी यांच्यातला हा ताण त्यातल्या अपरिहार्यतेच्या जाणीवेने अधिकच काचत राहतो. “आत्मा आणि पोटातली भूक या गोष्टी चिरकाल एकत्र राहत आल्या आहेत. दोन्ही बाबी एकमेकींना मिथ्या ठरवतात, पण त्या आहेत आणि आपण दोन्हींच्या मध्यभागी आहोत”, असं म्हणतात टागोर.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

भारतीय राष्ट्रवाद आणि रवींद्रनाथ टागोर - किशोर बेडकीहाळ

रवीन्द्रनाथ टागोरांची समकालीन समयोचितता - संजॉय मुखर्जी

आपण बांग्ला भाषेशिवाय टागोरांच्या कवितांचा प्रवास समजून घेऊ शकत नाही, त्यांच्या कवितेमागचे भावनिक पदर एखाद्या स्थानिकासारखे उलगडू शकत नाही - जीवन तळेगावकर

.................................................................................................................................................................

यात किती न् काय काय दडलेले आहे! या काळातल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेल्या कथांची नोंद प्रस्तावनेत गितेंनी केली आहे. रवींद्रनाथांचं लेखन मोठं, मानवी मर्यादेत का होईना, पण कालजयी झालं, त्याचं महत्त्वाचं कारण त्यामागे अनुभवाला कोऱ्या पाटीनं भिडण्याची असोशी आहे. आपण आणि आपला आतला अनुभव यामध्ये ते कशालाच येऊ देत नाहीत... वाडवडिलांचे भक्कम संस्कार आणि भरपूर वाचनानं तयार झालेल्या मनोभूमिकेलाही.

या पत्रांमध्ये त्याची छोटी छोटी प्रतिबिंबं दिसतात. ती फार लोभस आहेत. एरवी निसर्गातली वेगवेगळ्या प्रहरातली सहज घटितं आणि त्यासह आपले त्यांकडे साक्षीभावाने पाहात फक्त ‘असणे’ हेच आनंदनिधान. कुठंही पोचायची सक्ती, घाई नसणारे निधान. पद्मा नदी आणि तिच्या दोन्ही काठची छोटी छोटी गावं, हेच वसुलीचे कार्यक्षेत्र. त्यामुळे मुक्काम बहुतेक तरंगणाऱ्या नौकेतच. ही नाव त्यांना जुन्या ड्रेसिंग गाऊनसारखी वाटते, खूप ढिले निवांतपण जाणवते. वाचन-लेखनही इच्छा होईल तेव्हाच करावे, एरवी फक्त समोरच्या टेबलावर पाय पसरून दोन्हीकडच्या पाणपसाऱ्याकडे पाहत राहावे...

अन्यथा कलकत्त्यात ‘साधना’ नियतकालिक चालवणे, त्यासाठी काही राजकीय, मुख्यतः सामाजिक प्रश्नांवरचे लेखन वेळेचा काच सांभाळत करणे, हेही त्यांना घाईगर्दीत धावण्यासारखे, अनावश्यक वाटू लागते.

पत्रांचा काळ १८८५ ते १८९५ असा दहा वर्षांचा, त्यांना वसुलीसाठी, जमिनदारीतल्या सरकारी कामांसाठी जबाबदारी म्हणून हिंडावे लागत होते, तेवढाच आहे. पण तो इथे गोठून राहिला आहे असे वाटते. पद्मा नदीच्या दोहोकाठच्या (आज बांगलादेशी असलेली) पाणथळ प्रदेशातली छोटी गावं. प्रवाह लहान असला तरी बहुतेक ठिकाणी जाणं फक्त नावेनेच. तेही शक्य नाही तिथं पालखीतून. सुदूर गावं, वस्त्या. तिथवरचा प्रवास हाच मग लिहिण्याचा विषय होतो. एरवी मधली - स्वतंत्र शेती होते, इतकी मोठी - बेटं हे फिरण्याचे ठिकाण.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पावसाळी, चिखलानं भरलेले दिवस. भोयांनी उचललेल्या पालखीत अंग आखडून बसणं, बारीक संततधार, सारख्या मालवणाऱ्या दिवट्या, अंधार गडद होत जाणं, म्हणजे भवतालाशी असलेलं नातंच तुटत जाणं जणू. भोयांचं मधूनमधून चिखलात फसणं, उफाणलेल्या, फुसांडत वाहणाऱ्या एरवीच्या करंगळीच्या धारेसारख्या छोट्या नद्या. मुक्कामी पोहोचणं, हा असा खास अनुभव. दिवसचे दिवस अफाट पाणपसारा, नदीतली अर्धी बुडून गेलेली झाडं, त्यावरचे पक्षी, हाऊसबोटीतल्या घरभर हुंदडणाऱ्या खारी, गावातल्या ये-जा करणाऱ्या माणसांचे, दोन्ही बाजूंच्या शेतात राबणाऱ्या कष्टकरी स्त्रिया, तिथंच भरणारे आठवडी बाजार असे अनेक विभ्रम नावेच्या खिडकीतून पहात टागोरांचे चिंतन चालते.

‘‘...जिथे निसर्ग मेघांनी, धुक्याने, बर्फाने, अंधःकाराने आच्छादलेला असतो, तिथे माणसाचं खूप कर्तृत्व. तिथे तो आपल्या सगळ्या इच्छांना, प्रयत्नांना ते चिरस्थायी आहेत असं मानून आपलं सगळं कार्य चिन्हित करून ठेवतो. चिन्हं भंगून जातात, नावं विस्मृतीत जातात पण वेळेअभावी ते कुणाच्या लक्षात येत नाही.

‘‘...माझ्याबरोबर माझे कर्मचारी असतात त्यांच्यामुळे मला निवांतपण असं मिळत नाही. मुलांच्या खेळाला ते व्रात्यपण, बेअदबी समजतात. नावाडी आपसात मनमोकळेपणाने बोलतात त्याला ते जमीनदाराविषयीचा अनादर समजजून लगेच लाठी घेऊन धावतात. माझ्या जवळचा परिसर हास्यहीन, खेळहीन, आवाजहीन, जनहीन अशा भीषण वाळवंटात रूपांतरित केल्यावरच त्यांच्या दृष्टीने माझा मान राखला जातो.

‘‘...वाढत्या वयात कळत जातं, काही हवं असण्याची इच्छा कुणी काय, किती देऊ शकते यापेक्षा आपण किती घेऊ शकतो यावर अवलंबून असते. जे शक्य आहे, हाताजवळ आहे तेच पूर्णपणे हस्तगत करणे आपण वयाबरोबर शिक्षण, साधना आणि संयमातून शिकत जातो, पण त्यात आयुष्यातला पंचाहत्तर टक्के काळ निघून जातो. पुढे फळं चाखण्यासाठी अधिक काळ मिळत नाही.’’

अशी संभाषितं पुस्तकभर विखुरली आहेत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

आपण बांग्ला भाषेशिवाय टागोरांच्या कवितांचा प्रवास समजून घेऊ शकत नाही, त्यांच्या कवितेमागचे भावनिक पदर एखाद्या स्थानिकासारखे उलगडू शकत नाही - जीवन तळेगावकर

गांधींची हत्या एका व्यक्तीने नव्हे, विकारग्रस्त अशा एका विचारसरणीने केली. जेव्हा जेव्हा ती विचारसरणी द्वेषाचा अंधकार पसरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गांधींचा संदेश दिव्याप्रमाणे तो अंधार दूर करण्यासाठी नेहमीच अवतीर्ण होतो - श्याम पाखरे

‘काबुलीवाला’ : बिमल रॉय यांच्या या १९६१ सालच्या हिंदी सिनेमावर २०२३ साली हिंदी नाटक - प्रा. अविनाश कोल्हे

.................................................................................................................................................................

गावातल्या एका नवयौवनेची सासरी पाठवणी करतानाचा शोकाकूल माहोल पाहून टागोरांना वाटते- “सकाळच्या एखाद्या करूण रागिणीप्रमाणे पृथ्वीही सुंदर असून वेदनेने परिपूर्ण आहे. परतणारे लोक ही विरहाची वेदना विसरून जातील. वेदना क्षणिक असते आणि विस्मृती चिरस्थायी, पण विचार केला तर लक्षात येते वेदनाच खरोखर सत्य असते, विस्मृती नव्हे. माणूस केवळ भ्रमामुळे निश्चिंत असतो, आशंका आणि शोक याच गोष्टी जगात सत्य आहेत.‌ कुणीही थांबून राहत नाही, काहीही अनंतकाळ राहत नाही हे इतकं सत्य आहे की, ते स्मरणातही राहत नाही. हे आठवून माणूस आणखी व्याकूळ होतो (तो) केवळ तो कधीतरी जाणार एवढंच नव्हे, तर कुणाच्या आठवणीतही राहणार नाही, (या भावनेतून).”

बहुतेक पत्रं स्वगत असावे तशी आहेत, त्यात संवादाचा सूर अपवादानेच. आपल्यापुरता पैस‌ पाहात त्यातले हेलकावे, बारकावे मांडून पाहावेत आपल्यापुरतेच, असेच बरेचसे स्वसंवादी लेखन आहे हे. एका पत्रात टागोर इंदिरेला ही सगळी पत्रं कधीतरी दे, त्यातल्या नोंदी पुन्हा पाहून नोंदवून ठेवीन वहीत... कुठेच माझ्या सुख-दुःखांचे दिवस आणि रात्री अशा गुंफलेल्या नाहीत, असे लिहितातही. टागोरांचे आपल्या निर्मितीशी जोडलेले घट्ट नाते दिसते यात.

तत्कालीन भारतातली अपमानित होऊनही सतत काहीशा न्यूनगंडाने वा वैयक्तिक स्वार्थासाठी इंग्रजांच्या कच्छपी लागलेली माणसं पाहून त्यांना अंतरी क्लेश होतात. भवताल आपला, भारतीय, त्यावर राज्य युरोपीय इंग्रजांचे. त्यांच्या संदर्भातल्या भारतीयांच्या शरणागत मनोवृत्तीची टागोरांना चीड येते.

वेगवेगळ्या संदर्भात टागोर भारतीय जग आणि युरोपियन विश्वाची तुलना करतात. युरोपात माणूस महत्त्वाचा, प्राणीपक्षांना महत्त्व नाही, पण भारतात माणसाचा जन्म क्रमाने प्राण्यांच्या नंतर वा आधी, त्यामुळे प्राणीमात्रांविषयी दयेचा भाव. युरोपियन संगीत अनेक हार्मनीजचा समावेश असलेलं, समूहासाठी तर विशुद्ध, करुण गंभीर रागिण्यांचं भारतीय संगीत एकट्यानेच, स्वतःशीच गाण्यासाठी. इंग्रज शासकांचा भारतीयांप्रती शोषणकारी दुजाभाव पाहून सतत अशी दुसऱ्या टोकाची तुलना त्यांच्या लेखनात येते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

इंग्रज प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतूनही त्यांचा उद्धट, पाशवी स्वभाव आणि गर्व‌ दिसतो. जमीनदारीसंदर्भात इंग्रज अधिकाऱ्यांचा नाईलाजाचा संबंध येतो, तोही नकोसा वाटतो. हतबलतेने भारत ही त्यांना आपली गौरवहीन विषण्ण हतभागी जन्मभूमी वाटते. ‘‘जोवर इंग्रज मला माझा देश, देशवासियांपासून अलग करून सन्मानित करतील, तोवर तो मला अपमानच वाटेल’’ असेही ते नोंदवतात.

पुढे आणखी दोन दशकांनी ‘व्यावहारिक भान आलेले’ टागोर मात्र युरोपीय साहित्यविश्वात पोहोचावी, म्हणून मूळची बंगाली ‘गीतांजली’ स्वतः इंग्रजीत करतात, त्याला यीट्सची प्रस्तावना घेतात, इंग्लंडमध्ये सुदूर जाणकारात तिचं वाचन करतात. शांतिनिकेतनसाठी पैसा गोळा करण्यासाठी जगभर व्याख्यानांची माळ लावताना तिथं त्यांना आवडतील ते विषय निवडतात, हे आठवते, तेव्हा मात्र काहीसा उदासीचा ठसका लागतो. या पुस्तकातल्या पत्रांचे मोल अधिकच वाटू लागते.

टागोरांचा हा तसा पंचविशीतला तारुण्यकाळ लेखक म्हणून घडणीचा, कदाचित गीतांजलीतल्या कवितांची सुरुवातही या काळात झाली असावी. वाचनसंस्कार अनुभवांत मुरवून बाणवण्याचा काळ. असंख्य पुस्तकं, त्यांचे वाचनसंस्कार कृतज्ञतेने आठवतात त्यांना. शेक्सपिअरसह अभिजात युरोपीय साहित्यापासून, टॉलस्टॉयसह रशियन साहित्य, वेदान्त तत्त्वज्ञान, वैष्णव पदावल्या, संस्कृत नाटकं ते नेपालीज बुद्धिस्ट लिटरेचर असा व्यापक पैस. ‘मनाचे ऋतू सहा नव्हेत, तर कदाचित पत्त्याच्या कॅटसारखे बावन्न असावेत’ असे त्यांना वाटते. कधी कशाचा चस्का लागेल ते सांगता येत नाही, म्हणून हा सगळा बाडबिस्तरा बरोबर घेऊनच हिंडतात.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

हंसाने सगळा भवताल फुरसतीने न्याहाळत संथ पाण्याच्या प्रवाहात तो नेईल तिकडे, त्या गतीने लोटून द्यावे स्वतःला, तसे आयुष्य असावे, असे वाटत असताना एरवी ‘‘मुग्धपणे, तन्मय चित्ताने नेत्र अर्धोन्मिलीत करून गात असता रोजच्या सत्याला शाश्वत सौंदर्यात रूपांतरित करता येतं, दुःखकष्टही आभामय होऊन जातात’’ असे वाटण्यासारख्या साक्षात्कारी अनुभवाच्या समेवर खजांची अंडीलोणीतूपसरसूचंतेल असा हिशेब घेऊन येतो...

असे अनुभव डाचत राहतात. तरी यातली अपरिहार्यताही कळते. माझी दोन जीवनं आहेत, एक मनुष्यलोकातलं (जे टाळता येत नाही) आणि दुसरं भावलोकातलं (जे सगळ्यांनाच लाभतं असं नाही). या पुस्तकातली पत्रं हा माझ्या भावलोकातला जीवनवृतांत आहे, असं टागोर म्हणतात. 

ज्या माणसांना सतत सोबतच राहिल्यामुळे कधीही एकमेकांना पत्रं लिहायची संधी मिळत नाही, ती माणसं कधीही एकमेकांना संपूर्ण ओळखू शकत नाहीत. अनेक सत्यं, कंगोरे समजून घ्यायचा काही उपायच नसतो त्यांच्याकडे असे त्यांना वाटते. त्यामुळे हा संवाद पुतणीला लिहिलेल्या पत्रांच्या निमित्ताने, तरी तो टागोरांचीही आंतरिक गरज वाटावा, इतका मनोरम्य आहे. यातला बहुतांश काळ संवादसहवासाच्या दृष्टीने एकाकी.

माणसं येतात, दिसतात ती कामासाठी वा लाभासाठी तोंडपुजेपणा करण्याच्या निमित्तानेच. एरवी दिवसचे दिवस चहुकडे एकाकी पाणपसारा. हे एकटेपण तसे आवडते तरी त्यातून चिंतन दाटून येते मनात, त्याचे काहीसे उत्सर्जन या पत्रांतून होते. ते फार फार हृद्य, लोभस, शतकभरापेक्षा मोठा काळ ओलांडूनही ‘पोचणारे’ आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

आपलं आपल्यापुरतं नितांतसुंदर असलेलं जग तसंच, स्मृतीत तरी अक्षुण्ण ठेवण्याचा प्रयत्न करावासा वाटतो त्यांना. ‘‘दिवस बदलतील, घाईगडबडीचे होतील, भवतालही बदलेल पण त्यावेळीही स्मृतीतलं हे जग असंच असेल. तुमच्यातलं माणूसपण कोमेजून गेलेलं असेल कदाचित परिस्थितीनं वा बदलत गेलेल्या मानसिकतेनं करपून गेलेलं असेल, तेव्हाही हे स्मृतीतलं जग संजीवनीसारखं येईल...’’

परमेश्वर, त्याचं सामान्यांनी सहजसोपं करून टाकलेलं कर्मकाडांशी जोडलेलं अस्तित्व टागोर मानत नाहीत अर्थात, पण त्याच वेळी आध्यात्मिक स्तरावरचं, जगाची नियंत्रक शक्ती म्हणून असलेलं अस्तित्व त्यांच्या लेखनात सतत दिसतं. आपण लिहितोय ते जाणवलेलं व्यक्त करण्याची शक्तीही संपूर्ण जगात व्याप्त असलेली, तीच स्वतः हे कार्य करते. त्यामुळे आपलं जीवन तिला समर्पित केलं पाहिजे, असे त्यांना वाटते. आपल्यात प्रेम, संवेदनशीलताही तीतूनच येते असंही ते म्हणतात.

मोठ्या लेखकाचे सगळे लेखन आपल्या दुखऱ्या नसेच्या अधिकाधिक जवळ पोचण्यची धडपड असते, अशा आशयाचे एक इंग्रजी वाक्य मागे वाचनात आले होते. टागोरांनाही दुसऱ्या शब्दांत वाटते- ‘‘...बराचसा रस मनातच राहून जातो. वाचकांना थेट कापणी केलेलं धान्य मिळतं. शेतावरचं आकाश आणि वारा, हिरवा आणि निळा रंग त्यांना मिळत नाही. सगळंच वाचकांना देता येत नाही. जे स्वतःचं आहे ते सुद्धा दुसऱ्याला देण्याची क्षमता विधात्याने माणसाला संपूर्णपणे दिलेली नाही...’’

या पुस्तकाबद्दल थोडी जवळीक वाटण्याचे एक परात्पर कारणही आहे. ही १८८५ - १८९५ या काळातली रवींद्रनाथांनी त्यांची पुतणी, मोठे बंधू पहिले भारतीय आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ यांची मुलगी इंदिरादेवीला त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी लिहिलेली पत्रे आहेत. सत्येंद्रनाथ यातला बहुतांश काळ म्हणजे १८८४-१८९३ अशी नऊ वर्षे सोलापुरात जिल्हा न्यायाधीश होते, म्हणजे यातली बहुतांश पत्रे पोस्टकृपेने सोलापुरात आलेली असावीत, या विचाराने थोडे हळवे व्हायला झाले.

यातली भाषा चिंतनशील, दृष्टी कमालीची संवेदनशील. त्यामुळे त्याचे वाचनही पद्मा नदीच्या पावसाळा नसलेल्या दुपारच्या प्रवाहासारखे संथगतीने होते. टागोरांच्या अतीतीव्र संवेदनेची नस पकडायला थोडा नेटही लावावा लागतो. पण मोलाचे, तुम्हाला श्रीमंत करणारे काही आत मुरवायचे (ते काय, यासाठी शब्द सापडत नाहीत तरी) तर थोडी किंमत मोजायला हवी नं? विलास गिते आणि रोहन प्रकाशनाचे या निर्मितीसाठी आपण ऋणी असायला हवे.

‘रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे : पुतणी इंदिरादेवी सोबतचा पत्रसंवाद’ - अनुवाद - विलास गिते

रोहन प्रकाशन, पुणे | मूल्य - २९५ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......