उदाहरणार्थ, श्रीयुत संभाजी भिडे आणि श्रीयुत शरद पोंक्षे... विचार वा तत्त्वचिंतन करण्याचे काम महाराष्ट्रामध्ये ‘नेत्या-अभिनेत्यां’नी आपल्या हातात घेतले आहे!
पडघम - देशकारण
श्रीनिवास जोशी
  • श्रीयुत संभाजी भिडे, श्रीयुत शरद पोंक्षे आणि महात्मा गांधी
  • Tue , 08 August 2023
  • पडघम देशकारण संभाजी भिडे Sambhaji Bhide शरद पोंक्षे Sharad Ponkshe महात्मा गांधी Mahatma Gandhi अहिंसा Ahimsa Nonviolence हिंसा Violence धर्म Religion

श्रीयुत संभाजी भिडे आणि श्रीयुत शरद पोंक्षे हे दोघेही महाराष्ट्रातील गांधीजींच्या अहिंसेचे एकनिष्ठ विरोधक आहेत, ही गोष्ट आजच्या मितीला कोणीही नाकारू शकत नाही.

अहिंसा, क्षमा, शांती आणि मुख्य म्हणजे करुणा ही तत्त्वे अगदीच निरुपयोगी आहेत, असे या दोघांच्या ज्या पोस्टस सोशल मीडियामध्ये फिरत आहेत, त्या बघून अनेकांना वाटू लागले आहे.

खरं तर, महाराष्ट्र देशाचा विचार करायचा तर, विचार वा तत्त्वचिंतन करण्याचे काम विचारवंत आणि तत्त्वचिंतक यांच्या हातून गेल्याला आज कित्येक वर्षे झाली आहेत. ते काम अभिनेत्यांनी आपल्या हातात घेतले आहे. त्यालाही आता बरीच वर्षं झाली आहेत.

डॉ. लागू यांच्याकडून देवाविषयी महाराष्ट्राने खूप काही ऐकून घेतले आहे. त्यानंतर सहनशील महाराष्ट्र नाना पाटेकर यांच्याकडून आता नम्रता आणि शांततेचे महत्त्वसुद्धा ऐकून घेत आहे. तसे पाहता आपण बोलतो आहोत, त्यावर या दोघांनीही पुस्तके वगैरे लिहिलेली नाहीत, पण तरीही त्यांची मते महाराष्ट्र अतिशय आनंदाने ऐकून घेत आहे. मते महत्त्वाची, त्यामागचा अभ्यास महत्त्वाचा नाही, हे भान महाराष्ट्राला आहे.

याच धर्तीवर भिडे-पोंक्षे हे दोघेही अहिंसेचे एकनिष्ठ आणि विखारी विरोधक असले, तरी त्यांची ओळख ‘हिंसेचे एकनिष्ठ पाईक’ अशी करून द्यायची नसते, हे भानसुद्धा महाराष्ट्राला आहे. असो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

लागू आणि पाटेकर या दोघांच्या बरोबरीने शरद पोंक्षे यांच्यासारख्या अभिनेत्याचीही भर महाराष्ट्रातील ‘विचारवंतां’मध्ये पडल्याला आता निदान दोन-पाच तरी वर्षे झाली आहेत. त्यात आता श्रीयुत संभाजी भिडे यांच्यासारख्या नेत्याचीही भर पडली आहे. सध्याच्या जमान्यातील एक अभिनेता आणि एक नेता, अशी ही जबरदस्त युती झाली आहे, हे आज मितीला महाराष्ट्रात सगळ्यांनाच मान्य करायला पाहिजे.

लागू-पाटेकर यांनी महाराष्ट्राला शांततेचे महत्त्व सांगितले आहे आणि आता पोंक्षे-भिडे महाराष्ट्राला आक्रमक पौरुषाचे महत्त्व सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र देशी अनेकांना आपण शांतता बाळगायची आहे, की आपण आक्रमक पौरुषाची आराधना करायची आहे, हे कळेनासे झाले आहे.

अहिंसा आणि हिंसा यांचे समाजात आणि राष्ट्रात स्थान काय, हा तसे बघायला गेले तर तत्त्वज्ञानाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावर लागू-पाटेकर आणि पोंक्षे-भिडे अशा दोन पक्षांची मते जुळताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र देशी एक विलक्षण गोंधळ तयार झाला आहे. असो.

अगदी अलीकडच्या काळाबद्दल बोलायचे, तर सध्या पोंक्षे-भिडे या दोघांनी आपल्या हातात एक महत्त्वाचा विषय घेतला आहे. भारत हा देश आपले सत्त्व विसरत चालला आहे, असा हा विषय आहे. या आता ‘पौरुष’ वाढले नाही, तर या देशाला भवितव्य नाही, असे या दोघांचे म्हणणे आहे. या देशाला महात्मा गांधीजींनी अहिंसेचा फार मोठा डोस दिला. त्यामुळे या देशाचे अतोनात नुकसान झाले, असे या दोघांचे म्हणणे आहे. अहिंसेच्या अतिरेकामुळे आपण राष्ट्राभिमान व स्वाभिमान विसरून गेलो आहोत. अहिंसेच्या अतिरेकामुळे आपला देश हळूहळू नपुंसक होत चालला आहे, असेही या दोघांचे म्हणणे आहे.

आपल्या या विचारांमुळे पोंक्षे-भिडे हे दोघेही महात्मा गांधींबद्दल वेळोवेळी विविध वक्तव्ये करत असतात. ती बघून यांना भारत देशाला हिंसेचा मोठा डोस पाजायचा आहे की काय, असे भल्याभल्यांना वाटू लागले आहे. तसे असल्यास त्यांनी तसे अगदी स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगायला हरकत नाही. महाराष्ट्र ऐकून घ्यायला तयार आहे. 

हिंसा करणे कुठल्याही राष्ट्राच्या दृष्टीने कधी ना कधी अनिवार्य ठरते, हे कुणीच नाकारत नाही. पण राष्ट्राने केलेली हिंसा आणि राष्ट्रातल्या सामान्य लोकांनी केलेली हिंसा, यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच मध्यमवर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील!

नव्या आव्हानांना नव मध्यमवर्ग कसे तोंड देतो, हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे...

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

भारतामधील सर्व जाती-धर्मीय स्त्रिया मध्यमवर्गीय होण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यापुढील आव्हाने मात्र वाढत आहेत!

.................................................................................................................................................................

तसे पाहायला गेले, तर आपल्या भारत देशात आवश्यक आणि अनावश्यक अशा दोन्ही प्रकारची हिंसा होताना दिसून येते. एक राष्ट्र म्हणून भारताकडं दीडशेच्या वर अ‍ॅटम बॉम्ब आहेत. वेळ आली, तर ते आम्ही वापरू आणि तुम्हाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू, असा दम भारताने पाकिस्तानला दिलेला आहे. हे अ‍ॅटम बॉम्ब टाकण्यासाठी आवश्यक असलेली क्षेपणास्त्रेसुद्धा मुबलक प्रमाणात भारत देशाकडे आहेत. आताशा तर बीजिंगसुद्धा या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आलेले आहे.

या शिवाय भारताकडे चौदा लाखांचे सैन्य आहे. त्याच्याच जोरावर भारताने तीन युद्धे जिंकलेली आहेत. या प्रचंड सैन्याला मदत करण्यासाठी भारताकडे निम्न लष्करी दले आहेत. बीएसएफ आहे, सीआयएसएफ आहे, इंडो-तिबेटन फोर्स आहे, इतरही फोर्सेस आहेत. आज भारताकडे विमानं आहेत, रणगाडे आहेत, युद्धनौका आहेत, पाणबुड्या आहेत, तोफा आहेत; सगळे काही आहे.

भारत या जगातील शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतील सर्वांत मोठा खरेदीदार आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. नुकतीच आपण राफेल विमाने घेतली आहेत. त्याचप्रमाणे आपण स्कॉर्पीन पाणबुड्यासुद्धा घेतल्या आहेत. आपण आपल्या सैनिकांच्या हातात उत्कृष्ट दर्जाची हत्यारे दिलेली आहेत आणि देतही आहोत. आपण आपल्या सैनिक दलांची उत्कृष्ट काळजी घेत आहोत. जगात आपल्या सैन्य दलाने एक उत्कृष्ट दर्जाचे आणि शिस्तीचे सैन्य-दल म्हणून लौकिक कमावलेला आहे. उत्कृष्ट दर्जाचे युद्धनेतृत्व तयार करण्यासाठी आपल्याकडे ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’ आणि ‘मिलिटरी अकॅडमी’ अशा संस्था आहेत.

देशातील अंतर्गत शत्रूंसाठी आपल्याकडे आयबीसारखी अंतर्गत गुप्तहेर संघटना आहेत. या शत्रूवर मात करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला अर्ध-सैनिक दलांची व्यवस्था केलेली आहे. अंतर्गत शत्रूंना कह्यात ठेवण्यासाठी आपण अत्यंत कडक कायदे केलेले आहेत. भारतीय राज्यकर्त्यांना आवश्यक वाटला, तर हिंसेचा पर्याय कधीही वापरता येईल, अशी आज परिस्थिती आहे.

स्वतः महात्मा गांधी यांनी भारतीय सैन्य स्थापनेला विरोध केलेला नाही. १७-११-१९२१च्या ‘यंग इंडिया’मध्ये गांधीजी लिहितात- “माझ्या स्वप्नातल्या स्वराज्यात सैन्याला खरं तर स्थान नाहिये. परंतु, हे स्वप्न कधी सत्यात उतरेल असं मला वाटत नाहीये.” थोडक्यात, एका राष्ट्राच्या संदर्भात अहिंसेला मर्यादा आहेत, हे गांधीजींना माहीत होते. असो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आता सरकारच्या वर्तुळापलीकडील हिंसेकडे आपण येऊ.

भारतीय समाजाने गेल्या सत्तर वर्षांत खूप सारी हिंसा केलेली आहे. दिल्ली आणि इतरत्र शिखांचे शिरकाण झालेले आहे. धर्मावरूनही होऊ शकणारी हिंसासुद्धा भारत देशात खूप झालेली आहे. यामध्ये मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन अशा सर्वच धर्मीयांच्या हत्या झालेल्या आहेत. गुजरात, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश अशा आणि खरे तर भारतातील सगळ्याच राज्यात धर्मावरून झालेल्या हत्यांचा कहर उडालेला आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे जम्मू-काश्मीर इलाखा आहे. आता तर मणिपूरचेही उदाहरण देता येईल.

धार्मिक हिंसाचाराबरोबरच दलितविरोधी हिंसेने बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा राज्यात टोक गाठले आहे. या राज्यांच्या बरोबरच बाकी सगळ्याच राज्यांचे हात दलित-विरोधी हिंसाचाराने रंगलेले आहेत.

आर्थिक कारणांनी होणारी हिंसासुद्धा आपल्या देशामध्ये खूप होत आहे. नक्षलवादी आहेत, माओवादी आहेत, सलवा जुडूम आहे. खाणी, जंगले, वाळू, अशा सर्वच क्षेत्रातले माफिया आहेत. अगदी आयपीएस आधिकाऱ्यांनाही ते बिनदिक्कत मारत आहेत. जुगारातल्या हत्या, तर फार पुरातन कालापासून भारत देशात होत आलेल्या आहेत. 

आर्थिक हिंसाचारामध्ये अगदी सगळ्या धर्मातले डॉन्स भाग घेताना दिसून येतात. मोठ्या डॉन लोकांबरोबरच छोट्यामोठ्या लफंग्यांची आणि लवंगी खुन्यांची ‘कॉटेज इंडस्ट्री’सुद्धा या आर्थिक क्षेत्रात आहे. अनेक ‘सुपारीबाज’ या क्षेत्रात हिंसा करून आपला उदरनिर्वाह करत आहेतच, पण आपले जीवन अय्याशीमध्ये व्यतीतसुद्धा करत आहेत. हे असे लोक अनेक विधानसभांमध्येच काय, अगदी संसदेमध्येसुद्धा जनप्रतिनिधी म्हणून बसलेले आपल्याला दिसत आहेत.

आपला महाराष्ट्रसुद्धा या सगळ्या बाबतीत अजिबात मागे नाहीये. गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रात दोन हजारांवर दंगली झालेल्या आहेत. बॉम्बस्फोटसुद्धा खूप झालेले आहेत. मुंबई, मालेगाव, भिवंडी, परभणी, अगदी सगळीकडे स्फोट झालेले आहेत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

या सगळ्यांबरोबरच वैयक्तिक कारणासाठी होणारी हिंसासुद्धा भारतात कमी नाहीये. एखाद्या मुलीने आपले प्रेम स्वीकारले नाही, तर तिला सुऱ्याने भोसकायची नवी प्रथा आपल्या देशात पडली आहे. त्या मुलीवर अॅसिड फेकायची पद्धतसुद्धा रुळू पाहते आहे. त्याचबरोबर सुना जाळल्या जात आहेत. आंतरजातीय प्रेम केलेल्या मुला-मुलींना फासावर लटकवण्यासाठी खाप पंचायती आहेत. काही मुले तर केवळ ‘क्रेझ’ म्हणून खून करत आहेत.

आपल्या भारतात अगदी आनंदाच्या क्षणीसुद्धा हत्या होत आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाब वगैरे राज्यात लग्नसमारंभात आणि वरातीत आनंद म्हणून बंदुकीच्या गोळ्या उडवल्या जातात. या ‘आनंदी’ गोळीबारात अनेक निष्पाप लोक मरत आहेत. या ‘आनंद-हत्या’ महाराष्ट्रात अजून आलेल्या नाहीत, हे आपल्या महाराष्ट्र देशाचे नशीबच म्हणायचे!

हा झाला विविध राज्यांमधील अंतर्गत हिंसाचार! भारतातील विविध राज्याराज्यांमध्येसुद्धा त्यांच्यातील हितसंबंधांवरून हिंसा होत आहेत. सीमा-प्रश्नांवरून हिंसा होत आहेत तसेच, सगळ्यांच्या लाडक्या पाणी प्रश्नावरूनसुद्धा हिंसा होत आहेत. म्हणजे जागतिक, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अशा सर्वच पातळ्यांवर हिंसा होत आहे. गावपातळीवरच्या राजकारणातून आणि गल्लीपातळीवरच्या भांडणातूनसुद्धा हिंसा होत आहेत.

थोडक्यात बोलायचे तर, वैश्विक, धार्मिक, जातीय आणि वैयक्तिक अशा सगळ्या पातळ्यांवरच्या हिंसा भारतात होत आहेत.

 

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींनी अहिंसेचा डोस भारताला पाजला आणि भारत स्त्रैण झाला, असे श्रीयुत पोंक्षे आणि श्रीयुत भिडे यांचे मत असल्याचे आपल्या सगळ्यांना ऐकावे लागत आहे. पण, तसे पाहायला गेले, तर स्त्रियासुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहेत, असे दिसून येते. स्त्रिया सैन्यामध्ये मोठ्या पदांवर पोहोचल्या आहेत. अगदी फाइटर विमानांच्या वैमानिकसुद्धा त्या झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात महिला ‘डॉन’ प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्यावर बॉलिवुडमध्ये सिनेमेदेखील निघालेले सगळ्या भारताने पाहिलेले आहेत. आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा आणि आपल्या नवऱ्याच्या मदतीने आपल्या प्रियकराचा खून स्त्रियांनी केल्याच्या अनेक बातम्या आपण नियमित वाचत असतो. त्यामुळे हिंसा आणि पौरुष हे नाते आता कालबाह्य झाले आहे, असे वाटू लागले आहे.

भारतातील बहुतांश सामान्य लोक शांतताप्रिय आहेत आणि सहिष्णू आहेत, या विषयी कुणालाही वाद घालायचे कारण नाही. परंतु वरील सर्व खासगी हिंसा बघता खूप साऱ्या भारतीय लोकांना करुणेचे महत्त्व निश्चितच सांगायला पाहिजे, असे अनेक ‘सेन्सिबल’ लोकांना वाटत होते. हिंसेच्या आहारी जाणाऱ्या या अस्वस्थ लोकांना ‘अहिंसा परमो धर्मः’ म्हणजे ‘अहिंसा हाच सर्वोच्च धर्म आहे’, असे पटवून द्यायला पाहिजे, असे अनेकांना वाटत होते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

अहिंसेबद्दलच्या या श्लोकावर वाचन करत असताना, ‘अहिंसा परमो धर्मः’ हा महाभारतातील श्लोक गांधीजींनी अर्धाच सांगितला आहे, अशी माहिती नेटवर माझ्या वाचनात आली. पोंक्षे-भिडे यांच्या वृत्तीच्या लोकांनी हा आरोप केल्याचे माझ्या लक्षात आले. या लोकांचे म्हणणे असे की,  पूर्ण श्लोक खरे तर, ‘अहिंसा परमो धर्मः । धर्म हिंसा तथैव चः।।’ असा आहे. गांधीजींनी भारतीय लोकांना अर्धाच श्लोक सांगितला, त्यांनी या श्लोकातील ‘धर्म हिंसा तथैव च’ हा भाग सांगितलाच नाही, असा आरोप हे लोक ‘व्हॉट्सअप’, ‘फेसबुक’ आणि नेटवर इतर अनेक ठिकाणी सातत्याने करताना आजही दिसून येतील. वरील श्लोकासंबंधी नेटवर थोडा शोध घेतला, तर या प्रचारातील विखार वाचकांच्या लक्षात येईल.

या संदर्भातील अनेक पोस्ट वाचल्यावर मी कुतूहलाने सगळे महाभारत चाळले, परंतु मला वरील श्लोक कोठेही दिसला नाही. शेवटी नेटवर ‘धर्म हिंसा तथैव च’ हा भाग कुण्या अर्वाचीन काळातील माणसाने राजकीय करणासाठी मूळ श्लोकाला जोडल्याचे काही पोस्टमध्ये वाचनात आले. आपल्या भारतात हिंसेचे प्रमाण अजून थोडे तरी वाढावे किंवा निदानपक्षी अहिंसा तरी थोडी कमी व्हावी, अशी हा आरोप करणाऱ्या लोकांची इच्छा आहे की काय, असे मला वाटून गेले.

महाभारतात एक लाख श्लोक आहेत. त्यात कुणाला कोठे हा श्लोक मिळाला, तर त्याचा संदर्भ मला जरूर कळवावा. माझ्या नजरचुकीने इतका महत्त्वाचा श्लोक पाहायचा राहून गेला, असे व्हायला नको. विशेषतः या श्लोकाचा महाभारतातील नक्की पत्ता मला सांगा, अशी जाहीर विनंती मी पोंक्षे-भिडे आणि त्यांच्या मित्रमंडळींना करतो. असो.

खरं तर, अहिंसेबद्दल महाभारतात अत्यंत सखोल चर्चा केली गेली आहे. ‘अनुशासन पर्वा’त ११५व्या अध्यायात खालील श्लोक आहे.

‘अहिंसा परमो धर्मस्तथा हिंसा परं तपः।

अहिंसा परं सत्यं यतोधर्मः प्रवर्तते ।।’

(अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे, अहिंसा ही सर्वोत्तम तपस्या आहे, अहिंसा हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे कारण अहिंसेनेच धर्माची धारणा होते.)

याच अध्यायात युधिष्ठिर आणि भीष्म यांच्यामध्ये धर्मसंवाद झडलेला आहे. भीष्म सांगत आहेत की, “हे युधिष्ठिरा अगदी किड्यापासून मनुष्यमात्रापर्यंत सगळ्यांनाच आपला जीव प्रिय असतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या संदर्भात हिंसा झालेली कुणालाही नको असते. या जगातील कुठल्याही जीवाला मूलतः शांतता हवी असते.” येथे भीष्म सांगत आहेत की, या जगातील प्रत्येकालाच स्वतःचा जीव प्रिय असल्याने अहिंसा हे या जगातील सगळ्यात मोठे तत्त्व आहे. 

गांधीजी आपल्याला हेच तर सांगत आले आहेत.

तसे बघायला गेले तर, सैन्याशिवाय कुठलेही राष्ट्र असू शकत नाही, हे गांधीजींनी मान्य केल्याचे आपल्याला मान्य करावे लागते. याची अनेक उदाहरणे आपल्याला गांधीजींच्या जीवनात पाहायला मिळतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

पहिले उदाहरण म्हणजे, गांधीजींनी पाहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांना मदत करावी, असे सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, जर्मनीपेक्षा त्यांना ब्रिटिश बरे वाटत होते. अर्थात, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने!

दुसरे असे की, त्यांना हिटलर आणि मुसोलिनी यांच्या समोर अहिंसात्मक मार्ग विफल ठरतील, हे कुठेतरी मान्य होते. हिटलरसारख्या लोकांना सैन्यबलावरच पराभूत करावे लागते, हे त्यांना माहीत होते. भारतीय तरुणांनी दुसऱ्या महायुद्धासाठी सैन्यात भरती होऊ नये, असे आवाहन गांधीजींनी केले नाही. जेव्हा भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारताने ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात ‘संपूर्ण’ मदत करावी, अशी विनंती केली, तेव्हा गांधीजींनी ‘संपूर्ण’ मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यात सैन्य भरतीला विरोध न करणे अध्याहृत होते.

नाझींच्या संदर्भात गांधीजी लिहितात - “...We know what Hitlerism has come to mean, It means naked, ruthless force reduced to an exact science & worked with scientific precision.” (हिटलरशाही म्हणजे काय, हे आता आपल्या सगळ्यांना कळून चुकले आहे. ती एक नग्न आणि अतिक्रूर शक्ती आहे. या शक्तीच्या वापराचे हिटलरशाहीने एक शास्त्र बनवलेले आहे.)

या शक्तीचा सामना ब्रिटिश राजसत्ता सैन्यबल वापरून करत होती आणि गांधीजींचा त्या सत्तेला ‘संपूर्ण’ पाठिंबा होता.

तिसरे उदाहरण म्हणजे, जपानी सैन्य ब्रह्मदेशातून ओरिसाच्या किनाऱ्यावर उतरण्याची शक्यता जेव्हा निर्माण झाली, तेव्हा जपानी सैन्याचा ओरिसाच्या लोकांनी अहिंसात्मक मार्गांनी प्रतिकार करावा, अशी गांधीजींची इच्छा होती. परंतु, जपानी सैन्याने तोपर्यंत फिलिपीन्स, कोरिया, चीन आणि ब्रह्मदेश या सगळ्या देशांमध्ये जो नृशंस नरसंहार केला होता, ते पाहून गांधीजींनी तसे आवाहन केले नाही. अहिंसात्मक विरोधात जपानी सैन्याला पाणीसुद्धा मिळू न देणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होता. पण अशा विरोधामुळे अतीव हत्या होतील, हे जाणून गांधीजींनी या बाबतीत ब्रिटिशांच्या सैन्यबलावर अवलंबून राहण्याचे ठरवले.

इतके सगळे बघितल्यावर अहिंसा हा ‘परम’ धर्म असला, तरी राजधर्मामध्ये हिंसेसाठी तयार राहायला लागते, हे गांधीजींना माहीत होते, हे आपल्याला मान्य करावे लागते.

नाझी सैन्याचा अहिंसात्मक मार्गांनी विरोध शक्य आहे, अशी विधाने गांधीजींनी केली होती, परंतु, ती जे लोक नाझी भस्मासुराच्या तावडीत सापडले होते त्या संदर्भात होती. नाझी लोकांनी तुमचा देश व्यापला आहे, तुम्ही सामान्य नागरिक आहात, तुमच्या जवळ शस्त्रे नाही आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही अहिंसात्मक मार्गांनी विरोध करायचा आहे. या विरोधात जीव गेला, तरी बेहत्तर, परंतु दुष्ट शक्तींना शरण जायचे नाही, अशी ही गांधीजींची भूमिका होती.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

गांधीजी, पोंक्षे आणि भिडे यांची अहिंसा आणि हिंसा या विषयातील मते इतकी भिन्न आहेत की, गांधीजी आणि हे लोक कुठल्या तरी दोन वेगवेगळ्या धर्मांवर विश्वास ठेवत आहेत, असे कुणालाही वाटेल. पण इथे गंमत अशी आहे की, महाभारतात आणि उपनिषदांमध्ये विशद केलेला ‘सनातन धर्म’ हा आपला धर्म आहे, असे गांधीजी, पोंक्षे आणि भिडे असे तिघेही म्हणताना आपल्याला दिसतात. सनातन धर्म पाळायचा असेल, तर अहिंसेचे तत्त्व मानायला पाहिजे, असे गांधीजींचे म्हणणे आहे आणि सनातन धर्म पाळायचा असेल, तर ‘पौरुषा’ला समाजात स्थान मिळाले पाहिजे, असे पोंक्षे-भिडे या द्वयीचे व त्यांच्यासारख्या अनेक लोकांचे म्हणणे आहे. पौरुषाला स्थान मिळायला पाहिजे, याचा अर्थ नक्की कशाला स्थान मिळायला पाहिजे, असे या दोघांचे म्हणणे आहे, हे वाचकाच्या लक्षात आलेलेच असेल.

हिंसा, अहिंसा आणि धर्म यांची जेवढी विस्तृत चर्चा महाभारताने केली आहे, तेवढी या जगात क्वचितच कुठे झाली असेल. त्यामुळे आपल्याला जर हिंसा आणि अहिंसा यांच्याविषयी काही मत बनवायचे असेल, तर महाभारतकार याविषयी नक्की काय म्हणत आहेत, ते आपल्याला बघावे लागते. त्याशिवाय आपल्या मनातला गुंता सुटणार नाही आणि गांधी विरुद्ध पोंक्षे-भिडे आणि मित्रमंडळी हा गुंताही.

महाभारतकार आपण विशद करत असलेल्या धर्माला ‘सनातन धर्म’ का म्हणत आहेत, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. सनातन धर्म म्हणजे सतत असणारा धर्म, सदैव शाश्वत असलेला धर्म, अमर अशा स्वरूपाचा धर्म. साध्या भाषेत सांगायचे तर कधीही न मरणारा धर्म! महाभारतकार या धर्माला ‘भारत धर्म’ वगैरे कुठल्याही दुसऱ्या नावाने संबोधित करत नाहीत. कारण त्यांचा धर्म एका देशाचा अथवा, काळाचा अथवा कुणा एका मानवी समूहाचा धर्म नाहिये. तो संपूर्ण मानव जातीचा धर्म आहे.

‘मी ज्या सनातन धर्मावर विश्वास ठेवतो तो सनातन धर्म हा सागरासारखा विशाल आहे’, असे गांधीजी म्हणतात ते या अर्थाने. एखाद्या धर्माला जर संपूर्ण मानवजातीचा धर्म व्हायचे असेल, तर त्याला मानवी अंतरंगाची संपूर्ण जाण असायला हवी. त्याचबरोबर त्याला मानवाच्या संपूर्ण आशा-आकांक्षांची संपूर्ण जाण असायला हवी.

या संदर्भात बघायला गेलं, तर आपण वर बघितलेला श्लोक सगळ्यात महत्त्वाचा ठरतो.

‘अहिंसा परमो धर्मस्तथा हिंसा परं तपः।

अहिंसा परं सत्यं यतोधर्मः प्रवर्तते ।।’

म्हणजे, अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे, अहिंसा ही सर्वोत्तम तपस्या आहे, अहिंसा हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे कारण अहिंसेनेच धर्माची धारणा होते.

या जगातील प्रत्येक जीवाला सगळ्यात प्रिय अशी जर कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे त्याचा जीव! त्याचे रक्षण व्हावे, त्याला कुठलाही त्रास आणि कुठलीही वेदना होऊ नये, असे प्रत्येक जीवाला वाटत असते. ‘अनुशासन पर्वा’मध्ये ज्या ठिकाणी ही चर्चा झडलेली आहे, तिथे ‘कीटकोपाख्यान’ दिलेले आहे. अगदी किड्यालाही आपला जीव प्यारा असतो, हे त्यात महाभारतकारांनी बिंबवलेले आहे.

अशा जीव नावाच्या सगळ्यांना सर्वांत प्रिय असलेल्या गोष्टीला सर्वोच्च स्थान दिले नाही, तर कुठलाही धर्म स्वतःला सनातन धर्म म्हणवून घेऊ शकणार नाही, हे महाभारतकारांना माहीत होते. त्यामुळेच प्रत्येक जीवाला त्याच्या जीवाची हमी दिल्याशिवाय सनातन धर्माला पुढे जाता येणार नाही, हे त्यांना माहीत होते. या कारणामुळेच सनातन धर्माने अहिंसेचे तत्त्व सर्वोच्च मानले आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

ज्या प्रमाणे जीवाला धर्माची गरज असते, त्याप्रमाणे धर्मालाही जीवाची गरज असते. जीवच राहिला नाही, तर धर्म कोण पाळणार? त्यामुळेच अहिंसेमुळे धर्माचीही धारणा होते, असे महाभारतकार म्हणत आहेत.

आता इथे धर्माला जीवाच्या दुसऱ्या एका लक्षणाची दखल घ्यायला लागते. प्रत्येक जीवाला नुसते जगायचे नसते. त्याला प्रगतीसुद्धा हवी असते. अगदी सगळ्या प्रकारची प्रगती प्रत्येक जीवाला हवी असते. लौकिक आणि पारलौकिक प्रगती झाली नाही, तर निदान मानवाच्या जीवाला तरी आपण जगतो आहोत, असे वाटत नाही. सगळ्यांना जिवंत राहायचे असेल, सगळ्यांना प्रगती करायची असेल, तर राष्ट्रात एक सुंदर वातावरण अस्तित्वात येणे गरजेचे असते. हे वातावरण तयार व्हावे आणि टिकावे म्हणून समाजातील सगळ्या घटकांना काही नियम पाळायला लागतात. या ठिकाणी सत्य, न्याय, नैतिकता आणि सदाचरण या गोष्टी सनातन धर्माचा भाग बनतात. या चार गोष्टींचे ‘Truth, Justice, Morality and Righteousness’ असे इंग्रजी भाषांतर आहे.

समाजातील प्रत्येक जीव नियम पाळतो आहे की नाही, हे बघण्यासाठी राजसत्तेला अस्तित्वात यावे लागते. तिने सत्याचे, न्यायाचे, नैतिकतेचे आणि सदाचरणाचे रक्षण करायचे असते आणि त्याच वेळी तिने स्वतःसुद्धा समाजातील प्रत्येक घटकाशी न्यायाने व नैतिकतेने वागायचे असते. नाहीतर राजसत्ता ज्या जीवाच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी जन्माला आली आहे, त्याच जीवाला हानी पोहोचवू लागते.

म्हणजे अहिंसा धर्म हा सर्वोच्च आहे. अहिंसा धर्म पाळता यावा, म्हणून न्याय्य समाजाची आवश्यकता आहे. आणि न्याय्य समाज निर्माण व्हावा म्हणून न्यायाला सर्वोच्च स्थान देणारी राजसत्ता असायला हवी आहे. इथे अहिंसा सर्वोच्च आहे. त्या खालोखाल न्याय आहे आणि या दोन्ही गोष्टींच्या खाली राजसत्ता आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की, सनातन धर्माने व्यक्तीला केंद्रस्थानी मानले आहे. मानवी मनाचा संपूर्ण अंदाज महाभारतकारांना होता. म्हणून अहिंसेबरोबरच हिंसेलाही त्यांनी मानवी जीवनात योग्य स्थान दिलेले होते.

महाभारताने राजधर्माचे वर्णन करताना हिंसेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. राजसत्तेला बलवानच असायला लागते. ‘शांतिपर्वा’च्या छप्पनाव्या अध्यायात युधिष्ठिर म्हणतो की, गजाला जसे अंकुशाच्या साहाय्याने काबूमध्ये ठेवावे लागते, त्याप्रमाणे राजधर्म हे लोकांना आवरून धरण्याचे साधन आहे. येथे आपल्याला अंकुश हा माहुतानेच म्हणजे राजानेच वापरायचा आहे, हे मान्य करावे लागेल.

हिंसा मुख्यतः राजसत्तेने करायची आहे, तीसुद्धा जेथे अनिवार्य आहे फक्त तेथे! राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने हिंसा करायचे म्हटले, तर कसे चालायचे? भिडे-पोंक्षे यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजातील प्रत्येक तरुणाला धारकरी करायचे म्हटले तर कसे चालायचे? असे केल्यामुळे अनिर्बंध हिंसेचे वातावरण तयार व्हायला लागले, तर जंगल-राजच तयार व्हायचे! महाभारतकार हे कसे मान्य करतील?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

जंगल-राज नको असेल, तर हिंसेची जबाबादरी मुख्यतः राजसत्तेने उचलायची आहे. हिंसेचा पर्याय राजसत्तेने निवडायचा आहे, मग आव्हान बाहेरून आलेले असो वा राष्ट्राच्या अंतर्गत भागातून. आव्हान बाहेरून आलेले असेल, तर युद्ध करायचे आणि आव्हान जर अंतर्गत असेल, तर दंडनीती वापरून ते आव्हान परतवून लावायचे. दंडनीती वापरणे म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून देहांतापासून इतर विविध शिक्षा करणे.

ही दंडनीतीच्या माध्यमाने होणारी हिंसासुद्धा धर्माला, नीती-नियमांना आणि आधुनिक भाषेत कायद्याला अनुसरून करायची आहे. राजसत्तेने जी हिंसा करायची आहे, ती धर्माला अनुसरून करायची आहे. महाभारताला आणि गांधीजींना अंतर्गत शिस्त हवी आहे. अनुशासन हवे आहे. समाजाच्या एका भागाने दुसऱ्या भागाशी केलेल्या दंगली नको आहेत. जे काही करायचे ते समाजाची शांततापूर्ण धारणा लक्षात ठेवून.

 

या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना ‘गांधीजी विरुद्ध पोंक्षे-भिडे आणि मित्रमंडळी’ या प्रकरणाचा विचार करायला लागणार आहे.

मुसलमानांचा हिंदू धर्माला धोका, हा पोंक्षे-भिडे वगैरे मंडळींचा मुख्य विचार आहे. तो खरा असेल, तर सनातन धर्माला अंतर्गत धोका आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. या प्रश्नावर आपण महाभारतकारांना त्यांचे मत विचारले, तर ते म्हणतील की, राष्ट्रातील आजची राजसत्ता यावर काय विचार करत आहे? ते म्हणतील की, या बाबतीत राष्ट्राच्या पंतप्रधानांनी संसदेत चर्चा घडवून आणावी आणि संसदेसमोर आपले मत स्पष्टपणे मांडावे.

म्हणजे देशातील जनतेलाही नक्की परिस्थिती काय आहे, हे कळेल. राष्ट्रातील १४ टक्के मुसलमान जर २.४ टक्के या वेगाने वाढत असतील आणि राष्ट्रातील ८० टक्के हिंदू २ टक्के वेगाने वाढत असतील, तर ते हिंदूंना लोकसंख्येमध्ये नक्की कधी मागे टाकतील, यावर विद्यमान सरकारने संसदेत एक ‘व्हाईट-पेपर’ काढावा.

ही आकडेवारी चुकीची असेल, तर तसे पंतप्रधानांनी संसदेसमोर सांगावे. राष्ट्रातील मुसलमान बाकी काही कुरापती काढत असतील, तर त्या कोणत्या आहेत आणि त्यांच्यावर त्यांना काबूत आणण्यासाठी राजसत्ता नक्की काय करत आहे, यावरही एक ‘व्हाईट पेपर’ पंतप्रधानांनी काढावा, असे महाभारतकार या संदर्भात म्हणतील.

यातील काहीही न करता, सोशल मीडियावर विविध गैरसमज पसरवत राहणारे मेसेजेस पसरत राहिले, तर प्रचंड गोंधळ माजेल. या गोंधळामुळे नको ते गैरसमज पसरत राहतील. सतत पसरत राहणाऱ्या गैरसमजांमुळे समजात हिंसेची प्रवृत्ती वाढत राहील, आणि ते सनातन धर्माच्या मुख्य तत्त्वांच्या विरोधात जात राहील.

या गोंधळामुळे वा गैरसमजांमुळे राष्ट्राची हानीच होईल, असे महाभारतकारांचे मत पडेल. अशा स्फोटक परिस्थितीमध्ये पंतप्रधान मौन पाळत राहणार असतील, तर उचित असा राजधर्म पाळला जात नाही आहे, असेच महाभारतकार म्हणतील, याविषयी संशय नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अशा गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर भिडे-पोंक्षे यांना समाजातील तरुणांच्या हाती तलवारी द्यायच्या आहेत. त्यांना ‘धारकरी’ निर्माण करायचे आहेत. इथे महाभारतकार प्रश्न विचारतील की, भिडे आणि पोंक्षे हे नक्की कोण आहेत, म्हणून ते तरुणांच्या हातात तलवारी देत आहेत?

भिडे-पोंक्षे यांना शिवाजी महाराजांसारखे वीर तयार करायचे आहेत, त्यासाठी ते तरुणांच्या हातात तलवारी देत आहेत? येथे शिवाजी महाराजांनी एक राजसत्ता म्हणून तलवार हातात धरली होती, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज, भिडे-पोंक्षे ज्या तलवारी तरुणांच्या हाती देत आहेत, त्यामुळे उद्या जर हिंसा झाली, तर ती खाजगी स्वरूपाची हिंसा असेल. अशी खाजगी हिंसा विद्यमान राजसत्तेच्या विरोधात जाणारी असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

पोंक्षे तर नुसतीच भडकाऊ भाषणे देत आहेत. महात्मा गांधी यांच्यामुळे भारत स्त्रैण झाला इत्यादी गोष्टी ते बोलत असतात. भारत स्त्रैण झाला म्हणजे नक्की काय झाले, याविषयी पोंक्षे काही बोलत नाहीत. पोंक्षे यांच्याकडे काही डेटा वगैरे आहे काय? त्यांनी देशातील पौरुष मोजण्यासाठी काही फुटपट्टी वगैरे तयार केली आहे काय? शौर्य कमी झाले असेल, तर भारताने तीन युद्धे भित्रेपणा दाखवून जिंकली आहेत, असे पोंक्षे यांचे म्हणणे आहे काय?

‘अनुशासन पर्वा’च्या १६२व्या अध्यायात भीष्म युधिष्ठिराला सांगतात की, मतिमंद पुरुष तर्कशुद्ध विचार आणि प्रत्यक्ष अनुभव यांचे महत्त्व नाहीसे करतात. अशा लोकांच्या बरळण्यामुळे वास्तव स्थितीचा अपलाप होतो. त्यामुळे संशयाचे प्राबल्य वाढते. अशा लोकांमुळे शेवटी धर्माचे आणि राष्ट्राचे नुकसानच होते.

आज अपप्रचार आणि दुष्प्रचार या दोन्हींमुळे भारत देशात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. या गोंधळातून बाहेर पडायचे असेल, तर महाभारतातील धर्मविचार मुळातून समजून घेतला पाहिजे. जो काही विचार करायचा आहे, तो तत्त्वांच्या आधारानेच झाला पाहिजे. कोणीही व्यक्ती आणि तिची मते आधार म्हणून वापरण्याचा मोह आपण टाळायला हवा. मग ते भिडे असोत वा पोंक्षे वा हिंदूहृदय सम्राट असो वा अगदी दस्तूरखुद्द महात्मा गांधी असोत. आजच्या भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपले विचार, तत्त्वे समजून घेऊनच आरेखित केले पाहिजेत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच मध्यमवर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील!

नव्या आव्हानांना नव मध्यमवर्ग कसे तोंड देतो, हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे...

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

भारतामधील सर्व जाती-धर्मीय स्त्रिया मध्यमवर्गीय होण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यापुढील आव्हाने मात्र वाढत आहेत!

.................................................................................................................................................................

गीतेमध्ये म्हटलेले आहे की, हे जग दोन संपातांमध्ये विभागले गेलेले आहे. ‘दैवी संपात’ आणि ‘आसुरी संपात’. संपात म्हणजे संपत्ती. साध्या भाषेत बोलायचे, तर मानवातील या दोन प्रवृत्ती आहेत. महाभारतकार सांगतात की, या दोन प्रवृत्तींमध्ये सतत युद्ध सुरू असते. आपण एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे अगदी प्रामाणिकपणे पाहिले, तर आपल्या असे लक्षात येते की, आपल्या मनामध्येसुद्धा या दोन प्रवृत्तींचे युद्ध सतत सुरू असते. आपण स्वतः या युद्धात नक्की कोणाच्या बाजूने उभे राहायचे आहे, ते आपण स्वतः ठरवायचे असते.

दैवी प्रवृत्तीची लक्षणे गीतेमध्ये सांगितलेली आहेत. निर्भयता, हृदयातील हेतूंची शुद्धी, निग्रह, उदारवृत्ती, आत्म-संयम, सरळमार्गी विचार आणि सरळमार्गी वर्तन, ही दैवी संपाताची लक्षणे आहेत. आसुरी संपाताच्या लक्षणात खोटे बोलणे, दांभिकता, गर्व, पराकोटीचा अहंकार, क्रोध, उद्धटपणा आणि अज्ञान यांचा समावेश होतो.

महाभारतकार सांगतात की, तुमच्यात दैवी संपाताचे प्राबल्य वाढले की, तुम्ही अहिंसेकडे आणि शांततेकडे ओढले जाता. तुमच्यात आसुरी संपाताचे प्राबल्य वाढले की, तुम्ही द्वेष, हिंसा आणि युद्धाचे आकर्षण यांच्याकडे ओढले जाता.

जी गोष्ट व्यक्तीची तीच गोष्ट राष्ट्राची. दैवी संपाताच्या मार्गाने जाणारे राष्ट्र सबळ पण शांततावादी असते. आसुरी संपाताच्या नेतृत्वाखालचे राष्ट्र हिंसेकडे ओढले जाते.

हिंसा आसुरी संपाताच्या प्रभावाखालील लोकांकडून घडतात. ही हिंसा आपल्या स्वतःच्या अंगाशी आलेली नसते, म्हणून या जगात सगळे आलबेल आहे, असे आपले मत बनलेले असते. परंतु खरी गोष्ट अशी असते की, आपल्या राष्ट्रामधली हिंसा अगदी कुठल्याही क्षणी आपल्या वाट्याला येऊ शकते.

आसुरी संपाताच्या प्रभावाखालील व्यक्तीला महाभारतकार ‘दुरात्मा’ म्हणतात. पण त्यांना आपण ‘दुरात्मे’ आहोत, याचा पत्तादेखील नसतो. स्वतःच्या मतांमध्ये हे लोक मस्त रमलेले असतात. आपली मते आणि या जगाविषयीचे ज्ञान या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे या लोकांना माहीत नसते. आपली मते म्हणजेच संपूर्ण ज्ञान आहे, असे या लोकांना वाटत असते. आपल्या आसुरी प्रेरणांमधून आणि आपल्या भीत्या, क्रोध आणि अहंकारामधून हे लोक आपली मते बनवत असतात. असे असूनही आपली अशी मते म्हणजेच, या जगातील अंतिम ज्ञान आहे, अशा थाटामध्ये हे लोक वागत असतात. आपण ‘ज्ञाना’ने मंडित आहोत, म्हणजेच आपण ‘चांगले’ आहोत, असा या लोकांचा भ्रम असतो.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या भीत्या, आपले मोह आणि आपले क्रोध यांच्या बाहेर येऊन धर्मविचार केला गेला पाहिजे, असे महाभारतकारांचे मत आहे. ‘उद्योग पर्वा’च्या तेहतिसाव्या अध्यायात ‘विदुरनीती’ दिलेली आहे. विदुर म्हणतो की, धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन क्षुब्धचित्ताने करू नये. धर्माचा विचार करताना जी काही मते बनवायची असतील, ती अत्यंत शांतपणे सगळे समजून उमजून बनवावीत. 

खरं तर महाभारतातील धर्म-चर्चा हा अतिशय विस्तृत विषय आहे. त्याचा संपूर्ण परामर्श एका लेखात करणे अवघड आहे. त्यामुळे यात मुख्यत्वेकरून अहिंसा आणि हिंसा यांच्याविषयी सनातन धर्म काय म्हणतो आहे, यावर लक्ष केंद्रित केले. पुढील लेखात सनातन धर्म या विषयी महाभारतकार काय म्हणतात, या विषयी पाहू.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

थोडक्यात, अहिंसावादी गांधीजी आणि त्यांचे आक्रमक पौरुषवादी विरोधक यांच्यामध्ये गांधीजींचा विचारच सनातन धर्माच्या जास्त जवळचा आहे, असे म्हणावे लागते. यातच आधुनिक भारताचे हित लपलेले आहे. ‘आक्रमक पौरुषा’च्या शोधात भारतीय जनमानस हिंसेच्या आहारी जात राहील की काय, अशी भीती मला वाटत राहाते.

भिडे-पोंक्षे हे या चर्चेसाठी केवळ निमित्त आहेत. या दोघांनी धर्म, अहिंसा आणि हिंसा या सगळ्या संदर्भात फार महत्त्वाचा विचार मांडला आहे, असे मला वाटत नाही. याउलट गांधीजींनी आयुष्यभर अहिंसेवर विचार केला आहे, अहिंसेवर लिहिले आहे. त्यांचे विचार वाचायचे म्हटले, तर ते किमान सातशे-आठशे पानांचे आहे.

टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद म्हणजे नक्षत्रांच्या शर्यती, असे गडकऱ्यांनी म्हटले आहे. येथे गांधीजींचे विचार नक्षत्रासारखे स्वयंप्रकाशित आहेत, परंतु त्यांच्यासमोर उभे राहिलेल्या भिडे-पोंक्षे यांचे विचार कुठल्याही तत्त्वज्ञानात रुजलेले नसल्यामुळे नक्षत्रांसारखे आहेत, असे म्हणता येत नाही. या दोघांचे विचार त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्यांमधून जन्माला आलेले आहेत. म्हणजे, या दोघांच्या ‘व्यक्तिमत्त्वातील त्रुट्या’ असा घ्यायचा नसतो, हे भान महाराष्ट्राला आहेच! हे दोघे बोलत असतात, तेव्हा आपण तत्त्वज्ञान ऐकत नसून, त्यांची वैयक्तिक मते ऐकत आहोत, असेच वाटत राहते.

या उलट, गांधीजी आपल्याशी बोलतात, तेव्हा आपण सनातन धर्मविचारातून जन्मलेल्या संपृक्त ज्ञानाच्या संपर्कात आलेलो आहोत, असे समाधान प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीला वाटत राहते. शेवटी विजय ज्ञानाचा होणार असतो, वैयक्तिक मतांचा नाही.

नाहीतरी गांधीजी म्हणालेलेच आहेत - ‘एक चीज हमेशा ध्यान में रहनी चाहिए. इतिहास में कई बार बहुतसे हत्यारे और सितमगर हरएक राष्ट्रपर छा गए हैं. कुछ बार ऐसा लगा की, जीत उन्हीकी होगी. मगर हुआँ यूं की वो सदा के लिए मिट गए.’

गांधीजी आज आणि उद्याही राहतील, पोंक्षे-भिडे विस्मृतीच्या पडद्याआड विलय पावतील.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......