गुडघ्यापर्यंत नेसलेले धोतर, पायात घुंगरू, खांद्यावर लाल किनार असलेले उपरणे, हातात काठी आणि लाल झेंडा अशा वेषात तो व्यासपीठावर यायचा आणि ‘जाग रे बंधो जाग रे जाग..., आग हैं यह आग हैं, भुखे पेट की आग हैं!!’ असे आपल्या पहाडी आवाजात गायला सुरुवात करायचा आणि क्षणार्धात समोर बसलेली लाखो जनता अंर्तमुख व्हायची.
त्या लोक शाहिराचे नाव होते गुमाडी विठ्ठल राव उर्फ गदर... पण आयुष्यभर जनतेनं त्यांच्या ‘गदर’ याच नावावर प्रेम केलं, प्रचंड प्रेम केलं. चंद्राबाबु मुख्यमंत्री असताना गदरवर त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, तेव्हा आंध्र प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत उस्फूर्तपणे जनतेने बंद पाळला होता. या गोळीबारातून गदर बचावले. अशा अवस्थेतही ते पुढील दोन दशकं लढत होते, जातीअंताच्या संघर्षात, कामगारांच्या लढ्यात, स्वतंत्र तेलंगणाच्या आंदोलनात.
खरं तर गदरमुळेच हा लढा जनतेचा झाला होता. (त्याचा राजकीय फायदा कोणी घेतला, हा एक वेगळा विषय आहे)
कॉ. गदर आपल्या गाण्यातून जनतेला वर्ग, वर्णसंघर्षाचं आव्हान देत. त्यांच्यात सत्ताधारी वर्गाला थेट अंगावर घेण्याचं धाडस होतं, कारण एका मोठ्या संघटनेचं, पक्षाचं त्यांच्यामागे पाठबळ होतं. हा पक्ष म्हणजे सीपीआय (एम एल, पिपल्स वॉर). या पक्षाच्या सांस्कृतिक विभाग असलेल्या जन नाट्य मंडळीचे काम गदर करत होते. केवळ आंध्र प्रदेशातील नव्हे, तर गदर देशातील सर्वहारा जनतेचा बुलंद आवाज होते. आयुष्याची पाच दशकं त्यांनी लोकांसाठीच्या संघर्षात खर्ची केली, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत...
गदरसारखे लोक कलावंत, नेते सहजच निर्माण होत नाहीत. त्यामागे मोठी परंपरा असते. आंध्र प्रदेशला साहित्य आणि लोककलेची दीर्घ परंपरा आहे. गदरच्या लोकप्रियतेचं कारण त्यांच्या लोककला प्रकारात शोधावं लागेल. त्यांनी याच माध्यमातून आपली गाणी जनतेच्या दरबारात ठेवली. या प्रदेशातील लोककलांची दोन भागांत विभागणी होते- ‘ओगू कथा’ आणि ‘विधी भगोतम’. गदर यांनी दुसऱ्या प्रकारची परंपरा वापरली. या प्रकारात जनतेच्या थेट प्रश्नांची चर्चा होते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
गदर सहजपणे-
‘यह गाव हमारा, यह गल्ली हमारी,
हर बस्ती हमसे हैं, हर काम हमसे हैं!
हल हमने चलाया, खेतो को जगाया,
दिन रात जागकर फसलो को उगाया,
अपने बिना धान नही, पशु नहीं, दूध नहीं,
तो जालिम कोन रे उसका जुल्म क्या रे’
असा प्रश्न आपल्या गाण्यातून विचारत आणि ते थेट जनतेच्या मनाला भिडे.
गदरच्या परंपरेचे वारसदार होते. त्याची बिजे श्रीकाकुलम विभागातील आदिवासी चळवळीत आहेत. १९६०च्या दशकात ही सशस्त्र चळवळ जोरात होती. कवी सुब्बाराव पाणीग्राही या चळवळीचे एक नेते होते. पोलिसांच्या दडपशाहीत पाणीग्राही यांचा मृत्यू झाला. पुढे कवी चेराबंडा राजू, वरवरा राव (वरवरा राव सध्या एल्गार प्रकरणात तुरुंगात आहेत), हे या चळवळीत सक्रीय झाले. त्यांनी ‘विल्पव रचयतल संघम’ (विरसम) ही साहित्यिकांची संघटना स्थापन केली.
विरसमने उघडपणे नक्षलवादी चळवळीचं समर्थन केलं. या साहित्य चळवळीने युवकांची एक पिढी घडवली. तिचे प्रतिनिधी होते कॉ. गदर. याच काळात म्हणजे १९६८मध्ये फिल्मकार नरसिंह राव यांनी ‘आर्ट लव्हर’ ही संस्था स्थापन केली. गदरही त्यात सहभागी होते. नरसिंह राव यांनी तेलंगणामधील सशस्त्र लढ्यावर ‘मा भूमी’ हा चित्रपट निर्माण केला. त्यात त्यांनी एक गाणंही गायलं आणि छोटीशी भूमिकादेखील केली होती.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
नव्या आव्हानांना नव मध्यमवर्ग कसे तोंड देतो, हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे...
.................................................................................................................................................................
खरं तर गदर उस्मानिया विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आले होते. शिक्षण त्यांनी पूर्ण केलंच, पण दरम्यानच्या काळात ते क्रांतिकारी संघटनेत सक्रीय झाले. १९७३मध्ये जन नाट्य मंडळीची स्थापना करण्यात आली. अर्थातच गदर प्रमुख होते. जंगलात हत्यारं घेऊन नक्षलवादी कार्यकर्ते लढत होते, तर जन नाट्य मंडळी हाच क्रांतिकारी विचार आपल्या गाण्यांतून जनतेपर्यंत पोहोचवत होती.
गदरचा झंझावात एवढा प्रचंड होता की, सत्ताधारी वर्ग भयभित झाला. आम्ही सांस्कृतिक सेना आहोत, असे गदरने स्पस्ट केलं. माझं गाणंच माझं हत्यार आहे, अशी घोषणा त्याने केली. सुरुवातीच्या दोन दशकांत गदर यांनी आंध्र प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा प्रचार केला. या काळात कामगार, विद्यार्थी, महिला, रिक्षा चालक आणि गरीब पोलिसांच्या समस्याही गदर यांनी आपल्या गाण्यांतून मांडल्या.
गदर जनतेत प्रचंड लोकप्रिय होत असतानाच शासक वर्गासाठी डोकेदुखी ठरत होते. याच काळात आणीबाणी लागू करण्यात आली. तिचा सर्वांत मोठा फटका नक्षलवादी चळवळीला बसला. किस्ता गौड आणि भुमय्या या दोन शेतकरी नेत्यांना फासी देण्यात आली. स्वतंत्र भारतातील ही पहिलीच राजकीय फासी होती. या घटनेचा एकूणच चळवळीवर खोलवर परिणाम झाला. अनेक नेते भूमिगत गेले. गदर यांनाही भूमिगत व्हावे लागले.
या काळात गुरराखी बनून गदरने गावोगावी कार्यक्रम केले. गुंटूर जिल्ह्यात जन नाट्य मंडळीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यात गदरही पोलिसांच्या तावडीत सापडले. आणीबाणी संपेपर्यंत ते तुरुंगात होते. चेराबंडा राजुसह अनेक जण तुरुंगातच होते. त्याचा गदर यांच्यावर खूप परिणाम झाला. तुरुंगातून सुटका होताच त्यांनी बँकेची नोकरी सोडली आणि पुन्हा भूमिगत झाले. ते अनेक वर्षं भूमिगत होते. या काळात त्यांनी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सिमेवरील गावांची पाहणी करून एक अहवाल पक्षाला दिला होता.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
नंतरच्या काळात या परिसरात पक्षाचं काम वाढवण्यासाठी या अहवालाचा आधार घेण्यात आला. काही वर्षांनंतर गदर, त्यांचे प्रमुख सहकारी संजीव, दिवाकर यांच्यासह गदर पुन्हा उघडपणे जनतेत कार्य करायला लागले. पण १९८५मध्ये नक्षलवादी आंदोलनावर सरकारने प्रचंड दमनचक्र सुरू केलं. गदरवर रामनगर षडयंत्र प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पुन्हा गदरला भूमिगत व्हावं लागलं. पाच वर्षं आंध्र प्रदेशसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसाचे पोलीस गदरला शोधत होते.
गदर भूमिगत असले, तरी तोपर्यंत गदरची गाणी जनतेची गाणी झाली होती. तेलगू सिनेमावर आणि एकूणच तेलगू साहित्यावर गदरचा भारी प्रभाव पडला होता. गदरच्या भूमिगत काळातही त्याच्या गाण्याची कॅसेट निघत होती आणि त्याच्या लाखो प्रती खपत होत्या. सिनेमात गदर आणि त्यांच्या गाण्यांची नक्कल केली जात होती.
चेन्ना रेड्डी सरकारने १९९०मध्ये पिपल्स वॉरवरील बंदी मागे घेतली आणि भूमिगत कार्यकर्त्यांना उघडपणे काम करण्याची संधी मिळाली. १८ फेब्रुवारी १९९० रोजी गदर यांनी अनेक वर्षांनंतर जाहीर कार्यक्रमात भाग घेतला. हैदराबाद प्रेस क्लबने त्याचा वार्तालाप आयोजित केला. इथे ते सहकुटूंब हजर होते. याच दिवशी झालेल्या जाहीर कार्यक्रमात गदर रात्रभर गात होते आणि लाखो जनता भान हरपून आपल्या या लाडक्या गायकाला प्रतिसाद देत होती. (मी या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे.)
त्यानंतर अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने गदरचा भारतव्यापी दौरा आयोजित केला. मुंबई आणि भिवंडीत गदर आणि आव्हान नाट्य मंचचे जोरदार कार्यक्रम झाले. आव्हान नाट्य मंचचे काम शाहिर विलास घोगरे आणि संभाजी भगत करत होते. त्यानंतर नागपूर येथे गदर यांचा कार्यक्रम होणार होता, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही पोलिसांनी अचानक लाठीहल्ला करून कार्यक्रम उधळून लावला आणि गदर यांना अटक करून आंध्र प्रदेशच्या हद्दीत सोडून दिले.
कर्नाटक, मध्य प्रदेश सरकारनेही नागपूर पोलिसांचाच कित्ता गिरवला. गदर यांची अशा पद्धतीने सरकार दखल घेत होते, तर दुसरीकडे पक्षातही ते अनेक प्रश्नावर संघर्ष करत होते. याच काळात पिपल्स वॉरचे सरचिटणीस कोंडापल्ली सितारामया (के.एस) यांना अटक झाली होती. त्यांच्या जागी के.जी. सत्यमूर्ती पक्षाचे सरचिटणीस झाले. सत्यमूर्तींसोबत अनेक बाबतीत गदरचे मतभेद होते. त्यांच्यावर कोंडापल्ली सितारामयाचा खूप प्रभाव होता. के. एस.ला नंतर कार्यकर्त्यांनी तुरुंगातून पळवून नेलं. सुटल्यावर के. एस यांनी दिलेल्या भाषणावर गदर यांनी एक गाणं लिहिलं- ‘भारत अपनी महानभूमी उसकी कहानी सुनो रे भाई’ या गाण्यात देशाच्या एकूणच राजकीय, सामाजिक परिस्थितीचे जबरदस्त वर्णन करण्यात आलं होतं. हे गाणं चळवळीचं जणू प्रेरणागीत झालं.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
या काळात नक्षलवादी चळवळीत अनेक प्रश्नावर विचारमंथन सुरू होते. त्या वेळी पक्षाच्या केंद्रिय समितीत जन नाट्य मंडळीचा प्रतिनिधी असला पाहिजे, अशी भूमिका गदर यांनी घेतली होती. ते केवळ गायक किवा शाहीर नव्हते, तर एक अभ्यासू विचारवंतही होते. नक्षलवादी विचारधारेचाच नव्हे, तर फुले-आंबेडकरी विचारधारेचाही त्यांचा अभ्यास होता. जातीच्या प्रश्नावर ते अभ्यासपूर्ण मांडणी करत. त्यावर त्यांनी नक्षलवादी आंदोलनात सकारात्मक चर्चा घडवून आणली होती.
जन नाट्य मंडळी केवळ संघटनेच्या प्रचाराचंच काम करणार नाही, तर निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग असेल, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती. के.एस. यांच्या मृत्यूनंतर गदर यांचे पक्षाच्या नेतृत्वाशी घटके उडत होते, पण विचाराशी पक्की बांधीलकी मानणाऱ्या गदर यांनी कधीही शिस्त मोडली नाही.
१९९७मध्ये गदर यांच्यावर त्यांच्या घरात घूसून गोळ्या झाडण्यात आल्या. पाच गोळ्यांनी त्यांच्या छातीची चाळणी केली. पण अशा दडपशाहीला भीक घालण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आलं, पण दोन गोळ्या शेवटपर्यंत त्यांच्या शरीरात होत्या. याच काळात त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, पण ते थकले नाहीत. त्यांनी त्यानंतरही पक्षाचं, चळवळीचं काम अधिक जोमानं केलं.
दरम्यानच्या काळात जन नाट्य मंडळीचे संजीव यांच्यासह त्यांचे काही सहकारी शहिद झाले होते. पण गदर यांनी पुन्हा आंध्र प्रदेशातील खेड्यापाड्यात प्रचार केला. शरिरात गोळ्या घेऊन त्यांनी मुंबईतही कार्यक्रम केले. दादर येथील आंबेडकर भवन आणि भायखळा येथे शहिद भागवत जाधव स्मृती दिनी कार्यक्रम सादर केले. विद्रोही साहित्य संमेलनातही गाणे गायले. भागवत जाधव स्मृती दिन कार्यक्रमात गदर यांनी ‘जयभीम कॉम्रेड, लाल सलाम कॉम्रेड’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर पक्षात अनेक मतभेद निर्माण झाले. पक्षाने गदर यांनी शिस्तभंग केल्याची नोटीस बजावली.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
.................................................................................................................................................................
अर्थात त्यासाठी इतरही काही विषय कारणीभूत होते. तेव्हा गदर यांनी आपण थेट पक्षाच्या सरचिटणीसासोबतच चर्चा करणार अशी भूमिका घेतली होती. त्या वेळी गणपती पक्षाचे सरचिटणीस होते. नंतर गदर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले, पण तोपर्यंत आंध्र प्रदेशात चळवळीला मोठा फटका बसला, पक्षाची पिछेहाट झाली होती. त्याचा गदर यांच्यावर मोठा परिणाम झाला. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गदर यांनी एक संस्था सुरू केली होती.
याच काळात स्वतंत्र तेलंगणाची मागणी जोर धरत होती. छोट्या राज्याच्या निर्मितीला नक्षलवादी चळवळी पाठिबा होता. गदर यांनी स्वतंत्रपणे तेलंगणा आंदोलनात भाग घेतला आणि त्यामुळे या चळवळीला जन चळवळीचं स्वरूप मिळालं. केसीआरला या चळवळीच्या काळात केलेल्या घोषणाची सत्तेवर विस्मरण झालं. तेव्हा गदर अशा चळवळीत कसे राहतील, त्यांचा तो स्वभाव नव्हता आणि संसदीय राजकारणात त्यांना काही मिळवायचंही नव्हतं.
नंतरही गदर आपल्या परीने सक्रिय होते. आंबेडकरी विचारधारा आणि मार्क्सवादी विचारावर ते काम करत होते. अलीकडच्या काळात फासिवादी पक्षाचा पराभव झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन गदर संघर्ष करत होते. त्यामुळेच काँग्रेसला मदत करण्याची जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘गदर प्रजा पक्षा’ची स्थापना केली होती. गेल्या महिन्यात तेलंगणात झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहून त्यांनी समर्थन दिलं होतं. आपल्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरं अनुभवणारे गदर शेवटपर्यंत जनतेसोबत होते. नक्षलवादी चळवळीच्या नेत्यांसोबत त्यांचे मतभेद झाले आणि आपलं सारं आयुष्य ज्या पक्षासाठी दिलं, त्याने निलंबित केलं, तरी गदर यांनी कधीही पक्षाला विरोध केला नाही. ते कायम विचारधारेशी बांधील राहिले.
‘देश हमारा, धरती अपनी,
असली हम हक्कदार हैं इसके,
धन दौलत, मानव की इज्जत,
हमही पहरेदार हैं इसके ,
सदियोंसे सुनहरा रंगभरा
हाथो मे जब आया हैं मौका,
जब की लोहा लाल हुआ हैं,
जोरदारही लगाओ ठोका
जनता का शासन लाने को
हाथ मे हथियार लेना रे भाई’
असा संदेश गदर यांनी आपल्या ‘भारत अपनी महान भूमी’ या गाण्यात दिला आहे. शेवटपर्यंत गदर हाच संदेश घेऊन संघर्ष करत होते...
..................................................................................................................................................................
लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.
bandhulone@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment