भारतामधील सर्व जाती-धर्मीय स्त्रिया मध्यमवर्गीय होण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यापुढील आव्हाने मात्र वाढत आहेत!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सुलक्षणा महाजन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 07 August 2023
  • अर्धेजग कळीचे प्रश्न मध्यमवर्ग Middle class नव मध्यमवर्ग New Middle class महिला Women

भारतामधील मध्यमवर्ग वाढतो आहे. या वर्गाच्या अनेक व्याख्या आहेत, त्या संबंधात अनेक प्रश्न आहेत. पाश्चिमात्य विकसित देशात मध्यमवर्गातील लोकांची बहुसंख्या कशी, केव्हा आणि कशामुळे झाली? स्वतंत्र होण्याआधी भारतामध्ये मध्यमवर्ग होता का? असल्यास त्याचे प्रमाण किती होते? त्याचे समाजातील स्थान आणि प्रभाव किती आणि कसा होता? स्वातंत्र्यानंतर त्या वर्गाची कशी कशी वाढ झाली? कोणकोणते सामाजिक गट त्या वर्गाचा हिस्सा बनले? समाजातील खालच्या थरातील आणि वरच्या थरातील लोक मध्यमवर्गामध्ये ओढले गेले की, ढकलले गेले? तसे होण्यामागे कोणती धोरणे कारणीभूत ठरली? या वर्गाची चर्चा कधीपासून महत्त्वाची झाली ?

भारतामधील मध्यमवर्गाच्या संदर्भात हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याची स्पष्ट उत्तरे नाहीत. या वर्गाची व्याख्याही सुस्पष्ट नाही. एकोणिसाव्या शतकात प्रगत शहरांमध्ये सुरू झालेली मध्यमवर्ग तयार होण्याची प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः गेल्या तीन दशकांत वेगवान झाली आहे. वसाहतवाद विरोधातील स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व याच वर्गातून उदयाला आले आणि समाजातील इतर लोकांनी त्यांना पाठबळ पुरवले. स्वातंत्र्य मिळाल्यावर या वर्गाची वाढ अधिक जोमाने सुरू झाली. भारताच्या राज्यांमध्ये तसेच विविध समाज गटांमध्ये त्यांचे प्रमाण कमी-जास्त आहे. हा वर्ग एकजिनसी नसून वैविध्यपूर्ण आहे, त्यामध्ये आडवे उभे स्तर आहेत. त्यामध्ये नागरिकांचे संक्रमण आणि घुसळण होते आहे. त्याचे सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थितीवर परिणाम होऊ लागले आहेत.

मध्यमवर्गीय स्त्रियांची घडण

गेल्या दोन दशकांत जगातील बहुतेक देशांमध्ये स्त्रियांचे पारंपरिक स्थान, भूमिका आणि वर्गीय मानसिकता यात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे पुरुष वर्गाचे स्थान, मानसिकता आणि भूमिकाही बदलत आहेत. मध्यमवर्गातील महिलांमुळे प्रत्येक देशातील जुन्या समाजरचनेला आणि विभागणीला धक्के बसत आहेत; ती विस्कळीत होत असताना नव्याने घडवण्याचे प्रयत्न होत आहेत. महिलांचा कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढता आहे.

भारतामध्ये समाजातील सर्व थरांमध्ये आणि धार्मिक गटांमध्ये अशी प्रक्रिया बाळसे धरत असताना, एकीकडे त्याला अनेक प्रकारे खीळ घालण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजात ताण-तणाव, स्त्रियांच्या विरोधातील गुन्हे वाढले आहेत. अशा छुप्या आणि उघड विरोधाला तोंड देण्यासाठी मध्यमवर्गीय स्त्रियांची जबाबदारी वाढली आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

या लेखाची सुरुवात वैयक्तिक गोष्टीपासून आणि काही उदाहरणांमधून करते.

माझ्या पणजीचा म्हणजे, आजीच्या आईचा जन्म साधारण १८८० ते १८९०मध्ये झाला असावा. माझ्या आजीचा जन्म १९०४ सालचा. तीन बहिणी आणि तीन भाऊ असलेले हे कुटुंब गरीब होते. पणजोबा विदर्भातील यवतमाळ येथे शिक्षक होते, विचाराने सुधारक होते. त्यांच्या मोठ्या एकत्र कुटुंबापासून दूर झाले होते. फुले-आगरकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीचा तो प्रभाव असावा. माझ्या आजीला आणि तिच्या धाकट्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्यामध्ये धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेमध्ये धाडले होते. तेथे आजी सातवीपर्यंत शिकली.

त्या काळातील रिवाजानुसार वयात आलेल्या ब्राह्मण मुलींना प्रथमवर मिळणे दुरापास्त असल्याने, सोळाव्या वर्षी तिचे लग्न बिजवर असलेल्या आणि मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजोबांशी झाले. सासरचे कुटुंब सुस्थित होते. आजोबांचे वडील ब्रिटिश डॉक्टरच्या हाताखाली काम करत असताना एडनला गेले. पुढे डॉक्टर होऊन खान्देशमध्ये आधी सरकारी नोकरी आणि नंतर स्वतःचा व्यवसाय करू लागले आणि पुढे त्यांची मुले-नातवंडे हाच व्यवसाय निवडून महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावात स्थिरावली.

आजी नंतरच्या पिढीतील माझी आई आणि मावशी पुण्याला वसतिगृहात राहून, लग्नाआधी पदवीपर्यंत शिकल्या. त्यांच्यावर मुख्यतः भारतीय स्वातंत्र्याचे, काँग्रेसचे, गांधी-नेहरू पर्वाचे, सामाजिक सुधारणांचे तसेच काही थोड्या सदस्यांवर हिंदू राष्ट्रवादाचे तर काहींवर साम्यवादी राजकीय विचारांचे संस्कार झाले होते. कुटुंबातील अनेक महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत भागही घेतला होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला डॉक्टर, वकील, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक क्षेत्रांमधील सहसा सवर्ण वर्गातील, आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा लाभ मिळालेली सुधारक कुटुंबे आघाडीवर होती. त्यात स्त्रियांची उपस्थिती अपवादात्मक होती. मात्र बंगाल, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत, पंजाब येथील मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेले सामाजिक सुधारणांचे वारे रेल्वे, वर्तमानपत्रे, मासिके, रेडिओ याद्वारे भारतभर वाहू लागले होते.

स्त्रीसहभागाचा विस्तार

स्वातंत्र्य मिळण्याच्या मागे-पुढे जन्मलेल्या माझ्या पिढीतील अशा बहुतांश सवर्ण स्त्रिया, त्यांच्या लेकी सुना उच्चशिक्षित, व्यावसायिक आहेत. आमच्या लेकी-सुना त्याहूनही जास्त शिकल्या आहेत. परदेशांमध्ये जात आहेत. ही प्रक्रिया शहरी-निमशहरी भागातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये घडलेली आहे. विभक्त कुटुंब हे या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण. सांपत्तिक स्थैर्य अनुभवणाऱ्या अशा मध्यमवर्गातील स्त्रिया आरोग्य अभियांत्रिकी, उच्चशिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, समाजमाध्यमांत, करमणूक, वाहतूक, पर्यटन आणि विविध प्रशासकीय विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जुनी पुरुषी मक्तेदारी असलेल्या पोलीस, लष्कर, आरमार आणि हवाई दलामध्येही सामील होत आहेत.

गेल्या सात दशकांत अशा स्त्रियांवर प्रसिद्धीचा मोठा झोत पडला आहे आणि त्या वर्गामध्ये समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या स्त्रिया आकर्षित होत आहेत. पुरोगामी स्वरूपाच्या भारतीय राज्य घटनेमुळे सर्व प्रकारच्या शिक्षणाची, व्यावसायिक क्षेत्राची द्वारे महिलांसाठी खुली झाली आहेत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच मध्यमवर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील!

नव्या आव्हानांना नव मध्यमवर्ग कसे तोंड देतो, हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे...

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

.................................................................................................................................................................

या प्रक्रियेत मध्यमवर्गातील सुशिक्षित गृहिणींचाही मोठा सहभाग आहे. त्यांना घराबाहेरच्या विस्तृत जगात कार्य कर्तृत्वाच्या संधी मिळाल्या नाहीत, याची बहुतेकांना खंत आहे. आर्थिक दृष्टीने त्या सुस्थित असून उपभोगाची आणि करमणुकीची नाना साधने सहजपणे हाताळणाऱ्या आहेत; आधुनिक काळाशी सुसंगत राहून समाजात वावरत आहेत. त्यांच्या मुली-सुना आर्थिक- सामाजिक शिड्यांच्या आधारे अधिकाधिक उंचावर जाऊ पाहणाऱ्या सुरक्षितता आणि स्वास्थ्य उपभोगण्याचे स्वप्न बघणाऱ्या आहेत. व्यावसायिक क्षेत्रात, देशाच्या इतर भागात आणि परदेशातही त्यांना पाठविण्याची धडपड आहे. एकंदरीत असा पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील शिक्षित महिलांचा सामाजिक प्रभाव खूप मोठा आहे.

असंघटितांचा मध्यमवर्ग

माझ्याकडे घरकामात मदत करणारी सुरेखा (नाव बदलले आहे). तिचे आणि तिच्या कोकणातून मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबाचे चाळीस वर्षात झालेले परिवर्तन प्रातिनिधिक म्हणायला हवे. सातवीपर्यंत शिकून तिने शाळा सोडली. तिच्या तीन मोठ्या बहिणी लग्न होऊन सासरी गेल्या आणि कामगार असलेले वडील कारखाना बंद पडल्यामुळे बेकार झाले. घराची जबाबदारी तिच्यावर आणि अशिक्षित आईवर आली. वडील आजारी झाले. उदरनिर्वाह आणि भावाचे शिक्षण यामुळे घरकामे करणे भाग पडले. पुढे शिकलेल्या भावाला डेटा एन्ट्रीची चांगली नोकरी मिळाली. इस्पितळात नर्स असलेली बायको मिळाली. ३५ वर्षांची सुरेखा अजून अविवाहित आहे. मात्र उच्च मध्यमवर्गातील घरांमध्ये काम करून ती स्वयंपाक करण्यात, घराचे व्यवस्थापन करण्यात, पाहुण्याची सरबराई करण्यात, घराची स्वच्छता आणि सौंदर्य राखण्याच्या बाबतीत, तरबेज झाली आहे.

माझ्यासारख्या अनेक महिलांच्या व्यावसायिक यशाचे खरे श्रेय तिच्या सारख्या अनेकींना द्यायला हवे. तिच्यासारख्या गृह-सहाय्यक, शिक्षित मुली आणि स्त्रियांमुळे उच्चशिक्षित महिला निश्चिंत होऊन बाहेरच्या जगात यश मिळवू शकतात.

आज तिच्या कुटुंबाचे उत्पन्न साधारण महिना ६०,००० रुपये असावे. अलीकडेच झोपडपट्टीचे पुनर्वसन होणार म्हणून त्यांनी एका नवीन बहुमजली म्हाडा इमारतीमध्ये बेडरूम, एक खोली आणि लहानसे स्वयंपाकघर, स्वतंत्र संडास बाथरूम असलेले घर १५००० रुपये भाड्याने घेतले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे घरामध्ये गॅस, फ्रीज, टीव्ही, धुण्याचे मशीन आहे. बँकेमध्ये बचत आहे. इमारतीमध्ये राहायला गेल्यावर तिची वेशभूषा आणि राहणी बदलली आहे. गाऊन घालून, हातात रुमाल आणि मोबाइल घेऊन येणारी सुरेखा आता पंजाबी ड्रेस घालून, लहान पर्स, मोबाइल घेऊन कामाला येते. समारंभाला जाताना झुळझुळीत साडी, बाजारात मैत्रिणीबरोबर जाताना शर्ट पॅन्ट आणि घरामध्ये गाऊन असे तिचे वेष परिवर्तन झाले आहे. दातांसाठी तिने महाग उपाय करून घेतले आहेत.

मोठ्या शहरात स्थलांतर केलेली, झोपडवस्त्यांमध्ये असुरक्षित आयुष्य जगणारी, कष्ट आणि विविध प्रकारची कामे करून, कौशल्ये मिळवून, एक-दोन पिढ्यांमध्ये शिक्षित झालेली सुरेखासारखी अनेक कुटुंबे उच्च मध्यमवर्गाच्या राहणीमानाचे अनुकरण करून बदलली आहेत. सधन, सुशिक्षित आणि भविष्यवेधी होत आहेत. अशा अनेकींना सधन मध्यमवर्गाने सर्व प्रकारचे साहाय्य केले आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मात्र अर्थशास्त्राच्या संदर्भात शेती, मजुरी करणाऱ्या, अशिक्षित असणाऱ्या पहिल्या पिढीच्या स्थलांतरित महिलांपासून महानगरांमध्ये असंघटित क्षेत्रात काम करून उपजीविका स्त्री वर्गाला मध्यमवर्गामध्ये गणले जात नाही. त्यांचे आर्थिक, सामाजिक योगदान, त्यांच्यात होणारे बदल मोजले जात नाहीत. माझ्या दृष्टीने तरी या सर्व स्त्रियांची कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. वस्तीमधील महिलांवर त्यांचा प्रभाव मोठा आहे. गरीब, दलित, वंचित, ग्रामीण स्त्री वर्गालाही अशा मध्यमवर्गाच्या शिड्या चढायच्या आहेत. त्यासाठी अनेक मध्यम वर्गीय महिलांनी सुरू केलेल्या ‘स्त्रीमुक्ती संघटना’, ‘कोरो’, ‘अन्नपूर्णा’, ‘महिला राजसत्ता आंदोलन’, अशा मुंबईच्या आणि इतर शहरांमधील स्त्री संस्थांच्या माध्यमातून धडपडणाऱ्या स्त्रियांची उदाहरणे बघायला मिळतात. स्त्री साहित्यामध्ये त्याचे प्रतिबिंब पडते आहे.

रामलाल आणि अनारा

‘मॅडम, आप कैसी हो?’ २०२० मार्चमध्ये लॉकडाउन झाल्यापासून एक-दोन दिवसांनी रामलाल (नाव बदलले आहे) आणि त्याची बायको अनारा माझी खबरबात घेत असत. मीही त्यांची चौकशी करत असे. त्यातूनच त्यांची जीवन कहाणी समजून घ्यायला सुरुवात झाली.

जानेवारी महिन्यात रामलाल ठाण्याहून ट्रेनने म्हैसूरला सुतारकाम करण्यासाठी गेला होता. काम पूर्ण झाले नसूनही २३ मार्चला करोनाचा लॉकडाउन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी त्याला टॅक्सीने बंगलोरला आणि नंतर विमानाने मुंबईस परत पाठवले. तो कुटुंबामध्ये सुखरूप पोचला. त्याचे सहकारी दोन दिवस आधीच ट्रेनने उत्तर प्रदेशात निघून गेले होते.

लॉकडाऊन काळाचे तीन महिने मी माझ्या चार खोल्यांत एकटी, तर तो त्यांच्या १४० चौ. फुटाच्या विटांची भिंत आणि पत्र्याचे छप्पर असलेल्या दुमजली खोलीत सहा जणांसह बंदिस्त झाला होता. पोटमाळ्यावर तो आणि अनारा तापल्या पत्र्याखाली दिवसभर असत. खालच्या भागात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असत. संडासासाठी बाहेर पडणे धोका असूनही आवश्यक असे. मोबाइल फोन अत्यावश्यक गरज झाली होती. विरंगुळाही होता. ‘बहुत तकलीफ होती हैं. बच्चे लोग बहुत तंग आये हैं. गांव जाना चाहते हैं, क्या करू?’ या त्याच्या तक्रारीवर माझ्याकडे धीर आणि थंडावा देण्या व्यतिरिक्त काय होते?

दीड महिना झाल्यावर, दुसरा लॉकडाउन सुरू झाला. रामलालने मुलगा, सून-नातवंडांना गावी पाठवू का विचारले. मी घाबरून गेले. ‘मत जाने दो. फस जाएंगे और बहुत धोका हैं. पुलीस जाने नही देगी और ट्रेन नही हैं तो कैसे जाएगे?’ - माझ्या चिंता.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

या वेळेपर्यंत धीर धरून जागच्या जागी असेल त्या घरात, असेल त्या परिस्थितीमध्ये अडकलेले स्थलांतरित मिळेल त्या वाहनाने गावी जायला निघाले होते. टीव्हीवर सतत त्याच बातम्या होत्या. रामलालच्या मुलाचा, नातवांचा आग्रह अधिकच वाढला. पोलिओमुळे एक हात अधू झालेला त्याचा मोठा मुलगा, त्याची बायको आणि एक लहान मुलगा शेती सांभाळत उत्तर प्रदेशात गावी होते. दुसरा मुलगा, सून आणि नातवंडे ठाण्यात होती. त्यांना ठाण्याला खाजगी इंग्रजी शाळेत घातले होते. परीक्षा झाली आणि लॉकडाउन सुरू झाला. सुट्टीत गावी जाण्याची इच्छा असूनही मुले अडकून पडली. आजूबाजूचे लोक, गाववाले उत्तर प्रदेशात चाललेले बघून त्यांनीही जायचा हट्ट धरला.

एक दिवस मोठा मुलगा गावांकडून रामलालनेच खरेदी केलेली त्यांची सेकंड हँड स्कॉरपीओ मोटार घेऊन मुंबईकडे यायला निघाला. दिवस-रात्र गाडी चालवत, थांबत, पोलीस पहारे चुकवत तिसऱ्या रात्री ठाण्याला पोचला. इकडे रामलालच्या घरी पराठे, खाण्याचे सामान, स्टो, रॉकेल अशी सर्व बांधाबांध झाली. त्याच रात्री २ वाजता ११ जण गावाकडे जायला निघाले. ११००-१२०० कि.मी.चा प्रवास एकटा मोठा मुलगा गाडी चालवणारा. आडवाटेने गाडी चालवत तीन दिवसांनी गावी पोचले. रामलाल आणि अनारा ठाण्यातच राहिले. त्या अगोदर त्याचाच एक नातेवाईक बायको आणि तीन मुलांना रिक्षात घालून मजल-दरमजल करत चार दिवसांनी गावी पोचला होता. खडतर प्रवासामुळे सगळ्यांची अंगे सुजली होती. काही नातेवाईक ट्रकने गावी पोचले होते. गाववाल्यांनी परतणाऱ्या सर्वांची १४ दिवस शाळेमध्ये ते विलगपणे राहण्याची सोय केली. गॅस, शिधा, पाणी सर्व त्यांना पोचवले जात होते.

काम मिळत नसल्याने रामलाल कंटाळला होता. आर्थिक उत्पन्न नव्हते, पण ३० वर्षातील बचतीचा आधार होता. तेव्हा एकदा अनाराला मी फोनवर भाजणीची कृती पाठवली. तिच्याकडे घरघंटीवर दळून तिने मला भाजणी, त्यांच्या शेतचे मक्याचे आणि बाजरीचे पीठ पाठवले. शेजारी-पाजारी बायकांची शिवणाची कामे तिने केली. दोन्ही यंत्रे वापराविना पडून असल्याने मध्यमवर्गातील स्त्रियांनी तिला वापरायला दिली होती. घर बसल्या ती कुटुंबाला मदत करत होती. उत्तर प्रदेशात लग्नाआधी ती दहावी पर्यंत शिकलेली होती.

जेमतेम सातवी शिकलेला रामलाल १९८५मध्ये प्रथम आमच्या घरी सुतारकाम करण्यासाठी आला, तेव्हा १९ वर्षांचा होता. सुरुवातीला नातेवाईकांच्या आधाराने आणि पारंपरिक सुतार कौशल्याच्या जोरावर आधुनिक पद्धतीचे फर्निचरचे काम शिकून स्वतंत्रपणे उद्योग करू लागला. तेव्हापासून गेली ३५ वर्ष त्याने आमच्या घरातील लाकडी कपाटे, पलंग, सोफा, टेबल, खुर्च्या, लहान-मोठ्या दुरुस्त्या अशी सर्व कामे केली आहेत. ओळखी वाढवत, कौशल्य वाढवत त्याने अंतर्गत सजावटीची अनेक कामे केली.

या सर्व काळात त्याने आधी कुर्ला, मग कळवा आणि नंतर ठाण्याच्या झोपडवस्त्यामध्ये भाड्याने घर घेऊन वास्तव्य केले. शेवटी ठाण्याला ७५ हजार रुपये देऊन एक खोली झोपडवस्तीमध्ये मिळवली. नंतर वाढवली. मधल्या मुलाला, हाताशी घेऊन मोठी कामे सुरू केली. चार मुले मोठी झाल्यावर अनारा ठाण्यात राहायला आली ती इथलीच झाली.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

या काळात रामलालने बँकेत, युनिट ट्रस्टमध्ये जमतील तसे पैसे गुंतवले. त्यातून भरपूर नफा मिळू लागला, तेव्हा अधिक काटकसर आणि कष्ट करून अधिक गुंतवणूक करू लागला. बँकेच्या मार्फत गावी पैसे पाठवणे शक्य झाले. गावी वडिलांनी कुळ म्हणून मिळालेल्या शेत जमिनीत गुंतवणूक करून शेती वाढवली. मोबाइल फोनमुळे रामलालचा व्यवसाय चांगला वाढला. त्याची मुलगी उत्तर प्रदेशातच जवळच्या शहरात बसने जाऊन एम.ए.पर्यंत शिकली. शिकलेला नवरा बघून, हुंडा देऊन तिचे लग्न केले. तिच्या नवऱ्याने कर्ज काढून ‘नोएडा’ला चार खोल्यांचे घर विकत घेतले. एकदा तिची अडचण झाली, तेव्हा रामलाल आणि अनार विमानाने दिल्लीला जाऊन आले. सर्वात धाकटा मुलगा जिल्ह्याच्या गावी इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन शिकला. हिमाचल प्रदेशात आणि नंतर बडोद्याला नोकरी मिळाली. शिकलेल्या मुलीशी लग्न झाले. रामलालच्या आग्रहामुळे मुली-सुना सुशिक्षित गृहिणी झाल्या.

या काळात रामलालने गावी वाटणीला आलेल्या जमिनीच्या तुकड्यावर आठे खोल्यांचे पक्के विटांचे आणि काँक्रिट स्लॅब असलेले घर बांधले. घराबाहेर दोन संडास, त्यातील एक पाश्चिमात्य पद्धतीचा आईसाठी बांधला. त्यावर पाण्याची टाकी, पंप यांची व्यवस्था केली. दोन गायी-म्हशी घेतल्या. भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेतीची कामे केली. शेतीचे उत्पन्न वाढले. जोडीला स्कॉर्पिओ गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या मुलाने सुरू केला. ठाण्यातले झोपडवस्तीतले घर हे रामलालचे सर्वांत मोठे शल्य आहे. ३०-४० लाखाचे कर्ज काढून घर घ्यायची ऐपत आली आहे, पण त्या पैशामध्ये आसनगाव येथेच घर मिळते. कामाच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने सोयीचे नाही म्हणूनच ते झोपडीत राहत आहेत.

रामलाल आणि अनारा यांच्यासारख्या असंघटित क्षेत्रातील लाखो स्थलांतरितांच्या कुटुंबांचा समावेश मध्यमवर्गाच्या अर्थशास्त्रीय व्याख्येत केला जात नसला, तरी मला तो एक महत्त्वाचा नव-मध्यमवर्ग आहे असे म्हणावेसे वाटते. विशेषतः अशा कुटुंबातील स्त्रियांची, पुढच्या पिढीची वाटचाल मला महत्त्वाची वाटते. स्थलांतर करून कौशल्य आणि नवीन तंत्र शिकणाऱ्या, संधी शोधून, संघटित होऊन सक्षम होऊ बघणाऱ्या बचत गट करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणाऱ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या लाखो स्त्रिया वर्गाच्या व्याख्येत बसत असल्या नसल्या तरी मनाने, वृत्तीने आणि महत्त्वाकांक्षेच्या बाबतीत मध्यम स्त्रीवर्गात दाखल होत आहेत. अशा कनिष्ठ वर्गातून मध्यमवर्गीय होऊ बघणाऱ्या स्त्रियांपुढील आव्हाने वाढत आहेत.

मध्यमवर्गीय स्त्रियांपुढील आव्हाने

अलीकडेच आलेल्या ‘लेडी डॉक्टर्स’ या पुस्तकात भारतामधील एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या, नंतर डॉक्टर झालेल्या पहिल्या सहा जणींचा खडतर जीवनप्रवास रेखाटला आहे. त्यात प्रत्येकी दोन जणी मराठी, बंगाली आणि दक्षिणेच्या राज्यातील आहेत. त्यांचातील समान धागा म्हणजे, वरिष्ठ जातीमधील बहुसंख्य सनातनी कुटुंबांचा आणि समाजाचा तीव्र विरोध पत्करून त्या डॉक्टर झाल्या होत्या. शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. आज वैद्यकीय आणि सर्वच व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व जाती-धर्मांच्या मुलींचे प्रमाण वाढते आहे. एकेकाळी सर्व स्त्रियांना दलितांच्या समान मानले जात असे. आता भारतामधील सर्व जाती-धर्मीय स्त्रिया मध्यमवर्गीय होण्यासाठी धडपडत असताना त्यांच्यापुढील आव्हाने मात्र वाढत आहेत. या सर्वांचे प्रतिबिंब गेल्या पन्नास वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या स्त्री साहित्यामध्ये विशेषत्वाने पडते आहे.

अलीकडे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ जातीतील स्त्रियांच्या बरोबरीनेच धडपडणाऱ्या दलित वर्गातील स्त्रियांची चरित्रे, आत्मचरित्रे, तसेच कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. शिक्षणाचा प्रसार हे त्याचे महत्त्वाचे कारण. शिक्षणामुळे तसेच आरक्षणाच्या धोरणांमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये, विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये स्त्रियांची उपस्थिती वेगाने वाढली आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची बहुसंख्या आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

वर्तमानपत्रे, मासिके आणि लिखितसाहित्याच्या क्षेत्रात स्त्रियांची संख्या मोठी आहे. नाटक, सिनेमा, संगीत आणि टीव्ही या सारख्या करमणूक क्षेत्राचा स्फोट झाल्यापासून मध्यमवर्गीय स्त्रिया आणि त्यांच्या वास्तव अवास्तव- काल्पनिक स्त्री-समस्या टीव्ही मालिकांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या सवलती आणि बिगर सरकारी सामाजिक संस्थांच्याद्वारे मिळणारी संघटनात्मक मदत आणि आधार यामुळे स्त्रियांचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण आणि योगदान वाढले आहे.

ग्रामीण मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी असले तरी शिक्षणाची आस वाढली आहे. कर्ज काढून शहरात पाठवून मुलींना शिक्षण देण्याचे प्रयत्न पालक करत आहेत. आदिवासी विभागांमध्येही शिक्षणाचे प्रमाण क्रमाक्रमाने वाढत आहे. आर्थिक दृष्टीने मध्यमवर्गीय स्त्रियांचा प्रभाव अल्प असला, तरी शैक्षणिक-सामाजिक-मानसिक प्रभाव सर्व स्तरातील स्त्रियांपर्यंत पोचतो आहे.

मध्यमवर्गीय, सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्याची आस आणि शक्यता वाढली आहे. घरातील आधुनिक उपकरणे आणि खात्रीच्या सार्वजनिक सेवा सर्वांना हव्या आहेत. समृद्ध, वैविध्यपूर्ण जीवन जगण्याची महत्त्वाकांक्षा वाढती आहे. लहान आणि विभक्त कुटुंबे, त्यातील स्वातंत्र्य, आधुनिक शिक्षण आणि आर्थिक संधी त्यांना हव्या आहेत. चाळी, वाडे आणि झोपड्यांतून त्यांना बाहेर पडायचे आहे. अनावश्यक पाळत नि वैयक्तिक स्वातंत्र्याला थारा न देणारी फ्लॅट संस्कृती या स्त्रियांना भावली आहे.

त्यामुळेच वेळ आणि श्रम वाचविणारी उपकरणे आणि विविध वस्तूंचा उपभोग वाढता आहे. त्यामुळे स्त्रियांच्या कार्यक्षमतांमध्ये वाढ झाली आहे. कुटुंबांमधील खाद्यसंस्कृती, भाषा, वेशभूषा यात मोठे बदल झाले आहेत. मध्यम स्त्रीवर्गाचा कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढता आहे. जाहिराती स्त्री केंद्रीत होण्यामागे तेही एक कारण आहे.

अशा अनेक सकारात्मक बाबींची नोंद घेत असताना, मध्यमवर्गाच्या जीवनात येणारे खाच-खळगे, संकटे वाढली आहेत, हे एक वास्तव आहे. एकीकडे अवास्तव उपभोगाच्या संस्कृतीला मध्यम वर्गीय स्त्रिया बळी पडत आहेत, तर दुसरीकडे पुरुषप्रधान पारंपरिक संस्कृतीच्या अत्याचारांमध्येही वाढ होते आहे. मध्यमवर्गीय स्त्रीच्या बदलत्या स्थानामुळे पुरुष वर्ग अस्वस्थ झाला आहे. प्रसंगी हिंस्त्र होत आहे. अशा घटनांचे आघात, त्यातून वाढलेली भीती, अनिश्चितता अशा अनेक नकारात्मक गोष्टी जोडीला आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अलीकडच्या काळातील धार्मिक पुनरुज्जीवनवादी राजकीय-सामाजिक संघटनांची वाढ हा स्त्रियांच्या पुढे जाण्याच्या धडपडीमध्ये अडचणी, ताण, धोके वाढवत आहे. दुर्दैवाने अनेक मध्यमवर्गीय स्त्रिया त्यात सामील होताना दिसत आहेत. धार्मिक पुनरुज्जीवन वाद हा स्त्रियांच्या विकासात खोडे घालण्यामध्ये अग्रेसर आहे. त्यासाठी दांभिक खोटा प्रचार, समाजमाध्यमांचा गैरवापर होतो आहे. त्यातही अल्पसंख्याकांना आणि त्यातही महिलांना विशेष लक्ष्य केले जात आहे.

सार्वजनिक, राजकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या मुली आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार हे मध्यमवर्गीय होऊ बघणाऱ्या दलित आणि स्त्रीवर्गाला नामोहरम करण्यासाठी आहेत. सर्वच स्त्रियांना त्या विरोधात विचार करणे अत्यावश्यक आहे. सीएए कायद्याविरोधातले दिल्लीतले शाहीन बाग इथले स्त्रीकेंद्री आंदोलन आणि कुस्तीगीर महिलांसारख्या सामाजिक-राजकीय आंदोलनाना पाठिंबा देणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील अन्यायाला नकळतपणे आपण तर राजकीय पाठिंबा दिला नाही ना, याचा विचार वरिष्ठ वर्गातील सर्वांनी आणि विशेषतः महिलांनी करणे आवश्यक आहे.

उच्च मध्यमवर्गातील अनेक स्त्रिया आत्मसंतुष्ट आणि आत्ममग्न, स्वकेंद्री झाल्या आहेत. उत्सवप्रियतेच्या झगमगाटात हरवल्या आहेत. त्यांचाही प्रतिवाद करणे आवश्यक आहे. धर्म, वर्ण आणि पारंपरिक पुरुषी वर्चस्वाला आणि स्त्रियांमधील गैरसमजुतींना शह देण्यासाठी सुजाण स्त्रियांच्या धैर्याची आणि स्वतंत्र विचार क्षमतेची कसोटी आहे.

एका बाजूला, पुरोगामी राजकीय पक्षांनी मध्यमवर्गाला आणि त्यातील स्त्रियांच्या भूमिकांना तुच्छ लेखले आहे. केरळ आणि तामिळनाडू अशी राज्ये सोडली तर त्यांनी स्त्री आणि दलित वर्गाच्या मध्यमवर्गीय अपेक्षांना मदत होईल असे भरीव काम केले नाही. मध्यमवर्गाची वाढ होते तेव्हा त्यातील स्त्रियांचा आर्थिक-सामाजिक-राजकीय सत्तेमध्ये प्रभाव वाढतो, हा जागतिक अनुभव आहे.

मध्यमवर्गात स्त्रियांचा सहभाग वाढवण्याची जबाबदारी प्रगतिशील राजकीय पक्षातील स्त्रियांची आणि स्त्री संघटनांची आहे. सुदैव हे की, भारतामधील आजचा नव-मध्यमवर्ग हा मुख्यतः कालच्या कामगार वर्गातून, अल्प शिक्षित, कुशल अशा मध्यम आणि कनिष्ठ जातीमधून, मुख्यतः ग्रामीण- निमशहरी भागातून वर आलेला आहे. श्रम, काटकसर, बचत हा त्या वर्गाचा स्थायी भाव आहे. कौटुंबिक संबंध सैलावले असले, तरी तुटलेले नाहीत. थोडेसे स्वास्थ्य आणि अल्पशी चैन या वर्गाला मिळू लागली, ती गेल्या तीन-चार दशकांमध्ये. त्यामुळेच हे लाभ नाहीसे होण्याची धास्ती या वर्गाच्या मानसिकतेमध्ये दिसते. त्याचाच परिणाम गेल्या दशकातल्या राजकीय अस्वस्थेमध्ये, अनागोंदीमध्ये, उलथापालथीमध्ये प्रत्ययाला येत आहे.

भविष्यात हाच वर्ग भारताचे राजकीय आणि आर्थिक भवितव्य ठरवणारा असेल. त्यातील स्त्रियांची भूमिका कळीची असेल.

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या ऑगस्ट २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा