आजची पोरंपोरी पेपर वाचत नाहीत, टीव्ही पाहत नाहीत अन् रेडिओही ऐकत नाहीत. नुसती मोबाइलवर खिळलेली असतात. बातम्या, अग्रलेख त्यांना काही माहीत नसतं. जेवढं त्यांचे मोबाइल सांगतील, तेवढं त्यांना ठाऊक. बाकी कशाची ‘फिकीर नाही’, ही अशी ओरड पत्रकारिता शिकवणारे शिक्षक नेहमी करत राहतात. त्यांच्या दृष्टीने पेपर - टीव्ही - रेडिओ म्हणजे माध्यमे मोबाइल फोन आणि इंटरनेटला जोडलेली संगणकांची आयपॅड, लॅपटॉप व डेस्कटॉप ही रूपे म्हणजे माध्यमे नाहीत.
संगणक त्यांच्या लेखी फक्त कामासाठी वापरले जाणारे एक यंत्र. त्यात मनोरंजन, क्रीडा, जुगार यांचीही जोड असते, असा आणखी एक समज. संगणक हे यंत्र वृत्तपत्रे आणि रेडिओ टीव्हीसारखे ज्ञान देत नाही, असा ग्रह. आणखी एक म्हणजे, सामान्य ज्ञान, बुद्धीचा विकास व शहाणपण यांचा आत्ताच्या पिढीशी काही संबंध नाही. त्यामुळेच ही पिढी भरकटलेली, असहिष्णु आणि संयम हरवलेली असल्याचा निष्कर्ष.
फार पूर्वी माध्यम म्हणजे सरकार व जनता यांच्यामध्ये जोड म्हणून किंवा सांगड म्हणून किंवा संपर्क म्हणून जे कार्य करते, ते. जशी पूर्वी चूल पेटवायला तोंडातली हवा चुलीतल्या ज्वालाग्राही पदार्थांपर्यंत पोचवणारी फुंकणी असे, तसे हे कार्य. लोकांना सरकारला जे सांगायचे ते आणि सरकारला लोकांसाठी जे कळवायचे ते, कळवणारी यंत्रणा म्हणजे, माध्यमे. त्यात काम करणारे पत्रकार म्हणवले जाऊ लागले. पत्रकार म्हणवून घेणे ज्यांना जड जाऊ लागले. त्यांनी मग स्वतःसाठी ‘माध्यमकर्मी’ असा शब्द घडवला.
जसा रंगमंचावर कसलेही काम करणारी व्यक्ती रंगकर्मी म्हणवते, तसे माध्यमकर्मी हे विशेषण. माध्यमांत आता माहिती, ज्ञान आणि भाष्य एवढेच नसते, तर त्यांच्या निमित्ताने वा नावाने बकवास, भंकस, निरर्थक असेही भरपूर येत जात असते. म्हणजेच पूर्वी माहिती, ज्ञान, विश्लेषण यांसाठी सत्यता, वास्तव आणि संदर्भ यांची जी निकड लागे, ती आता लागेनाशी झाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे, जनता व सरकार एवढ्यांपुरतेच माध्यमांचे जे स्वरूप कोंडले गेले होते, ते तसे न राहता बदलले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
एकांगी आणि एकेरी
म्हणजे काय बदलले? सरकार म्हणून जी व्यवस्था निःस्पृह, तटस्थ, समन्यायी व निःस्वार्थ पद्धतीने कार्य करत असल्याचा दावा करी, तो आता ठिसूळ व संदेहास्पद होऊन गेला. १९९१पासून सरकार ही संस्था एकेका क्षेत्रामधून मागे हटत गेली आणि ती क्षेत्रे खाजगी करत गेली, तेव्हापासून सरकार पातळ होत गेले. याचा अर्थ, लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी वापरावयाचे एक साधन आपले रूपच पालटवून बसले.
यामागे अर्थातच खाजगीकरणाचे तत्त्वज्ञान पाळणारे राजकीय पक्ष, संस्था, माणसे होती. त्यांनी बहुमत मिळवून सरकार ही यंत्रणा मोजक्या हितसंबंधांसाठी मोकळी करून दिली. परिणामतः आरंभापासून खाजगी हातातच असलेली माध्यमेसुद्धा आपले शोभिवंत, दिखाऊ तटस्थपण त्यागून एकांगी, एकेरी होऊ लागली. तंत्रज्ञानातल्या सुधारणांमुळे अजून एक बदल घडला.
माध्यम म्हणजे काही दूरस्थ, संस्थात्मक, नियमांनी बांधलेले, स्थिर आणि प्रभुत्वशाली, जबाबदार असे जे काही रूप होते, ते भराभर निखळू लागले. तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीलाच माध्यम बनवून टाकले. ज्याच्या हाती इंटरनेटने जोडलेली संगणकीय यंत्रणा असेल, तो एक माध्यम ठरू लागला. प्रसारण, प्रक्षेपण यांना जे स्थैर्य आवश्यक असे किंवा कायदेशीर अधिकार लागत, त्यांची गरज संपली. बातम्यांना, भाष्यांना, विश्लेषणाला, माहितीला आता विशिष्ट चाकोरीतून जायची जरूरी संपून गेली.
फेसबुक, यु ट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि आता थ्रेड्स यांचा आधार व्यक्ती, समूह, झुंड, समुदाय, गट असा आखूड होऊ लागला. समाज, लोक, जनता यांचा पाया उखडून पडला. ‘समाजमाध्यम’ असे नाव प्राप्त करून मूठभर जमाती, जाती, समविचार, संघ आपापली भूमिका पसरवू लागले. मग ती गरळ असो की विखार; शिवीगाळ असो की, तर्कहिन कथन, प्रसारण, प्रक्षेपण यांना ‘सरकारी’ पकडीतून सुटका मिळाली. सरकार स्वार्थी हितसंबंधांच्या हवाली झाल्यावर जे व्हायचे असते, ते सारे भराभर होत चालले आहे.
तर्कहिन आणि विषारी
आधुनिक काळात प्रविष्ट होण्यापूर्वी एकेक माणूस माध्यम राहू शके. चावडी, ओटा, चव्हाटा, पार, पंचायत, मैदान अशा जागा व्यक्तिगत माहिती आदानप्रदान करू देत. त्या काळी अर्थातच भारतीय समाजव्यवस्थेतल्या मुखंडांना काही विशेषाधिकार असल्याने ते सांगतील ते ज्ञान, विचार, माहिती! ब्राह्मण, क्षत्रिय अन् वणिक यांच्या ठायी प्रसारणाचा अधिकार एकवटलेला आणि त्यासोबत प्रतिवादाची शक्यता नाहीशी केलेली. त्यामुळे त्यांच्या तोंडचा शब्द अंतिम. ही अवस्था नंतर संपुष्टात आली. परंतु आता ती सामाजिक स्थिती पुनःस्थापित व्हावी, यासाठी पराकाष्ठा करणारा राजकीय विचार (भाजप) माध्यमांनी आपल्याला वश व्हावे, याची धडपड करतो आहे.
माध्यमांचे संस्थात्मक आणि म्हणून संविधानात्मक रूप नष्ट करण्यात माध्यमांचे वैयक्तिकीकरण जबाबदार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप या मंचावरून काहीही फेकाफेक होत असली, तरी ती मित्र, आप्त, सहकारी, साहेब, जातबांधव आणि समविचारी माणसे करत राहिल्याने त्यावर पटकन विश्वास बसतो. कुठून तरी लांबून, अज्ञात, परक्या स्रोत्रांनी दिलेल्या माहितीपेक्षा निकटच्या रक्ताच्या माणसांनी दिलेली माहिती सच्ची मानण्याचा प्रघात पडत चालला आहे. या करताच वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ यांचे चालत आलेले स्थान घटवण्याची खटपट चालू आहे.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
.................................................................................................................................................................
संघपरिवार हा ‘परिवार’ असल्याने तमाम खोटारडे, निराधार, तर्कहिन आणि विषारी दळणवळण निर्धास्त होत राहते. त्यातूनच थोरामोठ्यांसंबंधी विकृत, विपर्यस्त माहिती खरी मानली जाते. मोठा भाऊच सांगतो आहे म्हटल्यावर ते खोटे कसे असेल? जिवलग दोस्तच काही सांगत आहे, तर ती अफवा कशी असेल? असा आधार सापडला की, अपप्रचार आणि गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. अशा आप्तस्वकियांकडून होणाऱ्या प्रसारणामुळे माध्यमसंहिता आणि वितरणमूल्ये खलास होत जातात.
एरवीच भारतीय माणूस ‘आपल्या’तल्या माणसांची, नातलगांची तारीफ तोंडफाट करत असतो. आयताच कोणी एक नातेवाईक सल्ला, सूचना, विश्लेषण अथवा टीका लागला की, ती ठाम व योग्य असल्याचा निर्वाळा निर्व्याज मन देतेच. त्यामुळे समाजात मोठ्या कष्टाने तयार झालेले तज्ज्ञ, विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, भाषापटू, विचारवंत वा अभ्यासक तुच्छ ठरायला लागतात. त्यांच्या विवेचक अन् सतर्क मतांना किंमत मिळेनाशी होते.
प्रस्थापित माध्यमांनी निरनिराळ्या पुरवण्या काढत राहून वाचकांनाही आरोग्य औषधी ज्ञान दिले आणि उत्तम शेतकरी बनवले त्यापेक्षा प्रचंड गतीने अन् संख्येने तंत्रज्ञानजीवी माहितीने कोट्यवधी लोकांना ज्ञानी, तरबेज अथवा कुशल बनवून सोडले आहे.
थोडक्यात, तसा आभास निर्माण केलेला आहे. त्यामुळे चोखंदळपणा, विचक्षण बुद्धी आणि पडताळणी जवळपास प्रत्येकाच्या जीवनातून जळून गेली आहे. बहुतेक जण पराकोटीचे अहंकारी, कठोर, कर्मठ होऊन बसले आहेत.
या माध्यमांच्या भडिमाराने स्वत:वर उपचार स्वत:च करवून घेणारे जसे घरोघरी पैदा झाले, तसे दारोदारी इतिहासकार, विद्वान, जाणकार हेही झाले. त्यांना धर्म कळू लागला, संस्कृती त्यांच्या घरी खेळू लागली आणि असंख्य संदर्भ त्यांच्या तोंडी नाचू लागले. काही यांच्या मनाविरुद्ध घडायचा अवकाश की, यांच्या घरी वास करणारी सरस्वती सशस्त्र होऊन विरोधकांना नामोहरम केल्याशिवाय परतत नाही.
अशा परिस्थितीमुळे उगाच नाही झुंडी आणि झुंडीचे बळी दिसू लागले. अधलेमधले कोणी नको, हम सब जानते हैं, अशा तयारीने न्यायनिवाडे रस्त्यावर होत चालले. काही तरी भलतेसलते वाचले काय अन् सडकेनासके पचवले काय, नव्या पिढीचे ज्ञानी, चार हात प्रत्यक्षात करायलाच उतावीळ असतात. सर्वज्ञतेचा असा अवतार प्रतिवाद्यांचा खातमा करायलाच जन्माला आलेला असतो. दोन्हीकडच्या बाजू मांडणारी आणि दोन्हीकडच्यांना जबाबदार असणारी माध्यमांची रीत, हे लोक अक्षरश: विपरीत करून टाकतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
निष्कर्षात खोट
प्रत्येका हाती संपर्काचे न संप्रेषणाचे साधन पोचले की, ते झाले लोकशाहीकरण, असा निष्कर्ष गेल्या वीसेक वर्षांत काढला जाऊ लागला आहे. या निष्कर्षात खोट आहे. प्रस्थापित माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे-टीव्ही-रेडिओ स्वनिर्मितीवर आणि स्वतंत्र मांडणीवर उभी असतात. ‘एक्सक्ल्युसिव्ह’ अर्थात स्पर्धकांकडे नसलेली माहिती देण्यात त्यांची ओळख निर्माण होते. ऐतखाऊ आणि परोपजीवी ही विशेषणे पत्रकारांना आवडत नसतात. कोणताही ना सर्वज्ञ असतो ना परिपूर्ण ‘जर्नलिझम’मधला ‘इझम’ हा कोणता वाद नसून सत्याकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे. माणूस म्हणून निःपक्ष असे कोणी नसते, हे मानले तरी व्यावसायिक कारणांसाठी निःपक्षता हे एक कौशल्य व गरज मानली जाते.
‘राइट टु इन्फर्मेशन’ संयुक्त राष्ट्रसंघाने एक मानवाधिकार मानलेला आहे. माणूस जगतो तो माहितीवर आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानावर, शहाणपणावर. माणसाचा मेंदू स्वानुभव, निरीक्षण, श्रवण, विश्लेषण, अनुकरण, परीक्षण इ. वेगवेगळ्या अवस्थांमधून जात सुखी व सुरक्षित होऊ पाहतो. या प्रक्रियेत खरीखुरी, स्वच्छ, निर्मळ, अप्रदूषित, ससंदर्भ माहिती मिळणे त्याची गरज आहे. त्यासाठी माणसाने माध्यम शोधले, वाढवले आणि रुजवले. त्याला लोकशाहीचे कवच चढवले. विश्वास व निष्ठा यांच्या आधारे माध्यमांचा कारभार फळला, फुलला. सत्याशी त्याची जवळीक निर्माण झाली.
साहजिकच मानवी विकासात पत्रकार आणि माध्यमे अनिवार्य बनली. ही अर्थातच समविचारी, सममूल्यनिष्ठ समाजात मान्य झालेली बाजू होय. एकांतिक, अतिरेकी, जीर्णमतवादी, वंशवादी, वर्णवादी, अभिजनवादी विचारांना ही बाब जीवघेणी वाटते. सबब, आज भारतात माध्यमांचे स्वातंत्र्य जायबंदी केले जात असून, त्यामागे उपरोक्त तत्त्वांवर चालणारा हिंदुत्ववादी राज्यकर्ता पक्ष आहे.
माहिती तंत्रज्ञानात झालेली प्रगती आपल्या हितासाठी या पक्षाने मोठ्या त्वेषाने वापरली. मात्र सत्तेत आल्यासरशी जी जी प्रस्थापित माध्यमे होती, त्यांच्याभोवती निरनिराळी बंधने आवळायला सुरुवातही केली. म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत एकही वार्ताहर परिषद न घेऊन प्रश्नोत्तरांपासून पळ काढणे घ्या.
हुकूमशहांना आपण कोणास जबाबदार नाही, असे भासत असते. त्याऐवजी ते थेट जनतेला आपल्याशी संवाद करायला किंवा आपण जनतेशी संवाद करायला तयार ठेवत असतात. म्हणजे ‘माध्यम’ अशी कोणतीही व्यवस्था, यंत्रणा त्यांना आवडत नसते. तेवढेच नव्हे, मोदींनी संसदेत एकदाही सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...
मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?
मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!
.................................................................................................................................................................
मोदी कोणती खाती हाताळतात, हे कोणालाही माहीत नाही. मोदी एक तर जाहीर भाषणे करत राहतात किंवा ती नसताना ट्विट करून आपला निर्णय, भावना वा मत कळवतात. एखादा प्रक्षोभक प्रश्न उगवलाच, तर ते सरळ भाष्य टाळून देतात. महिला कुस्तीपटूंचे आंदोलन, मणिपूरमधला हिंसाचार, चीनने बळकावलेला भाग, हिंदू-मुस्लीम दंगे, माध्यमांवरचे निर्बंध, महागाई, अदानी आदी विषम त्यांना नकोसे झाले.
ट्विट करण्याचा अर्थ असा की, मोदींना दुमत, प्रतिवाद, शंका आवडत नाहीत. ते सर्वज्ञ आहेत. त्यांचे सदैव बरोबरच असते. ते म्हणजे सरकार अन् सरकार म्हणजे देश! त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे म्हणजे देशाची उणीदुणी काढणे. ‘माँ भारती’चे ते पराक्रमी पुत्र असल्यामुळे त्यांच्यातले दोष म्हणजे भारतमातेतले दोष. सबळ, प्रतिप्रश्न वा संदेह यांना जागाच नाही.
तुतारी आणि ढोल
आत्यंतिक व्यक्तिकेंद्री, आत्मप्रौढीस उत्तेजक आणि केवळ भावभावनांवर उभे असलेले नवमाध्यमांचे पर्यावरण असे अनेक मोदी घडवते. आज घडीला भारतात करोडो मोदी आहेत आणि त्यांची निर्मिती माध्यमांकित आहे. आजचा बहुसंख्य समाज ‘माध्यमज’ आहे. इतके कोटी सेलफोन भारतीयांकडे आहेत, इतका टक्के भारत इंटरनेटने जोडलेला आहे, इतके तास मोबाइलचा वापर भारतीय करतात, भारतात क्षणार्धात आज अफवा फैलावल्या जाऊ शकतात, अशा आकडेवाऱ्या प्रस्थापित माध्यमांमधून जवळपास रोजच आपल्यापर्यंत पोचतात. त्याउलट होत नाही. म्हणजे, कोविडनंतर वृत्तपत्र वाचक वाढले, टीव्हीमध्ये पत्रकार वाढले किंवा आकाशवाणीमुळे श्रोतृवर्ग वाढला, असे कधीही वाचलेले आठवत नाही.
पत्रकारांची कपात दरमहा होते, वृत्तपत्रे कागदाऐवजी काचेवर जाऊ लागली आणि नभोवाणीला मोदींच्या ‘मन की बात’ वाचून लोकप्रियताच मिळेना! याचा अर्थ असा की, माध्यमे दोन्ही तोंडांना उघडी असलेली फुंकणी राहिलेली नाहीत. त्यांची तुतारी तरी झाली आहे किंवा ढोल तरी!
महत्त्वाचे म्हणजे, जो मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे. नेतृत्वस्थान त्यागून तो पाठीराखा, अनुयायी बनू लागला आहे. ज्या माध्यमांमध्ये या मध्यमवर्गाची शंभर टक्के उपस्थिती असे, त्यातून तो गायब झालेला आहे. वैचारिक द्वंद्व तो आता टाळतो. वस्तुस्थिती त्याला भिववते. प्रतिवाद आणि दुसरी बाजू त्याची हवा काढते. खुशमस्करी, चापलुसी, स्तुती हे मध्यमवर्गाचे गुण बनले आहेत. त्यालाही खुशामत आवडते आणि तो ती राज्यकर्त्यांची करण्यात कमीपणा मानत नाही.
मध्यमवर्ग अशा रीतीने एक माध्यम होऊन राहिला आहे. आपल्या आर्थिक स्थितीमुळे ज्याचे स्थान मध्यस्थानी असे आणि त्यापायी त्याला खालचे व वरचे वास्तव उमजे, तो मध्यमवर्ग पूर्णपणे एकतर्फी, एकेरी ठरतो आहे. त्याच्या या अध:पतनाला नवतंत्रज्ञानमंडित माध्यमे जबाबदार आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
दुटप्पीपणा आणि ढोंगबाजी
भारतातली सारी प्रस्थापित माध्यमे भांडवलदार व सवर्ण यांच्या हातातली आहेत. त्यामुळे नवमाध्यमे मागस जातींच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या हाती गेली असा एक दावा केला जाऊन विकेंद्रीकरणाचा गाजावाजा केला जातो. पण हे लक्षात कोणी का घेत नाही की, हे सवर्ण भांडवलदार निदान देशी तरी आहेत. व्हॉट्सअॅप, ट्विटर, युट्यूब, इन्स्टाग्राम आदी मंच शुद्ध आणि संपूर्ण परदेशी भांडवलदारांचे आहेत. त्यांच्या हातात भारताची लोकशाही सदृढ व्हायला विसावली आहे, असे कोणी कसे म्हणून शकते?
या माध्यमांमधला विखार, प्रचार आणि अविचार कोणासाठी अन् कोण्या देशाच्या हितासाठी चालू असतो? राष्ट्रवादी म्हणवून घेणारा भारतीय मध्यमवर्ग असा अमेरिकन मंचावर मनमुराद बागडतो आहे.
भाजप काय, संघ काय, त्यांना अमेरिका अत्यंत प्यारी. साम्यवादाची विरोधक म्हणून आणि उजव्या अतिरेकी विचारांची पाठीराखी म्हणून जे राष्ट्रीय शिक्षण धोरण मोदी सरकार राबवत आहे, ते निखालस अमेरिकन आहे. मध्यमवर्ग अमेरिकेच्या प्रेमात असल्याने त्यावर टीका केली जात नाही. अमेरिकन भारतीय मध्यमवर्ग उभा न् आडवा दुभंगलेला असून त्याचे ध्रुवीकरण झाले आहे.
भारतीय माध्यमे गेली काही वर्षे धार्मिक व सामाजिक ध्रुवीकरण बिनदिक्कत करत आहेत. त्यांनी सर्व मुसलमान खलनायक ठरवले आहेत. ‘ते आणि आम्ही’ असा दुभंग हिंदू व मुस्लीम एवढाच करण्यात आलेला नसून गरीब-श्रीमंत, सवर्ण-दलित, स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण असाही केला गेला आहे. राजकीय बाबतीत त्यांनी भाजप-संघ एकीकडे आणि बाकीचे दुसरीकडे असे करून टाकले आहे. विरोधी पक्ष मुद्दाम महत्त्वहीन लेखला जातो. कित्येकदा तर अदृश्य केला जातो.
मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या गेली पाच-सहा वर्षे निव्वळ पाणचट, उथळ, असंबद्ध आणि केवळ वैयक्तिक मजकूर छापून आपली बौद्धिक दिवाळखोरी साजरी करत आहेत. नाव घेण्यासारखा एकच संपादक मराठी वृत्तपत्रसृष्टीत असावा आणि तोही उजव्या विचारांची पालखी वाहणारा, ही केवढी लाजीरवाणी गोष्ट आहे! टीव्हीवर संपादक म्हणून जाणीवपूर्वक भाजप-संघ यांचे प्रचारक नेमले जात आहेत. विविध प्रश्नांवरच्या चर्चांचे कार्यक्रम पूर्वी आकर्षण म्हणून लोकमान्य होते. ते आता इतिहासजमा झाले आहेत. २०१४पासून महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या भाजपने हे सारे मातेरे केले आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मुस्कटदाबीचा मुकाट स्वीकार
मध्यमवर्ग जेवढा नैतिकतेच्या चारित्र्याच्या आणि निष्ठांच्या चर्चा काढतो, तेवढा तो स्वार्थ दिसला की, उलटी बाजू कशी बरोबर आहे, तेही समजावून सांगतो. असा दुटप्पीपणा व ढोंगबाजी त्यांचे प्रतिबिंब असणारी माध्यमेही प्रसारित करत असतात. संधीसाधू प्रवृत्ती प्रचंड प्रमाणात बोकाळलेली असताना एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे निष्ठांतर या मध्यमवर्गाला पूर्णपणे स्वागतार्ह वाटते.
बहुसंख्य पत्रकार आता मालकांच्या आदेशानुसार जाहिराती जमवणे, खप वाढवणे, प्रचार करणे, विविध सोहळे आयोजित करणे, अशा कामी जुंपले जात आहेत. यासाठी बिनचेहऱ्याचे, बिनकण्याचे, बिनबुडाचे पत्रकार त्या पदांवर नेमले जातात. तेच मुळात सुमार असतात. स्वाभाविकपणे त्यांचा चमूही असाच सुमार दर्जाचा राहणार.
टीव्हीवरच्या बातम्या तर नुसत्या ‘साऊंडबाइट्स’वर आधारलेल्या असतात. एकदा भाजपच्या नेत्याचा बाइट घेतला की, दुसरा काँग्रेसच्या नेत्याचा घ्यायचा अन् त्यांची सजावट टोला मारला, टीकास्त्र डागले, तोफ धडाडली, षटकार ठोकला, अशा हिंसक क्रियापदांनी करायची. प्रस्थापित माध्यमांना झुंडशाहीची माध्यमे डसली, ती अशी भडक, बटबटीत आणि उल्लू वाटेल, असे सर्व राजकारण रंगवायचे.
आणखी एक विशेष. राजकीय बातम्या फार दिल्या जाऊन आपला कल लक्षात येत असल्याचे दिसताच गुन्हे आणि हिंसाचार यांच्या बातम्याची रेलचेल करायची. म्हणजे बातमीला बातमी मिळाली आणि राजकीयदृष्ट्या आपण सुरक्षित राहिलो, असे भासवत राहायचे, असाही एक खेळ बऱ्याच दिवसांपासून चालू आहे.
एक सुघटित असे की, ज्याला ‘आल्टरनेटिव्ह मीडिया’ म्हणतात, तो पर्याय त्याच विदेशी मंचावर उभा राहिला असून त्याद्वारे वास्तव कळते. दुसरी बाजू समजते. सत्ताधाऱ्यांची मुजोरी उघडकीस येते. तीही पत्रकारिता नव्हे, पण करणार काय? बुद्धिभ्रष्ट मध्यमवर्गाला त्याच्यातूनच शहाणपणाचे धडे दिले जात आहेत.
परंतु हाही एक धोकाच आहे. प्रतिकूल मते प्रसारित केली, तर थेट भारत सरकारकडून दबाव येत असल्याचे गाऱ्हाणे मध्यंतरी जॅक डॉर्सी या ट्विटरच्या माजी मालकाने केले होते. फेसबुकवरही कित्येकदा अशी दडपणे येतात. मोदी सरकारने माहिती प्रसारणावर बंदी आणायचा नवाच प्रघात इंटरनेट संपर्करहित करून पाडला आहे. अशी मुस्कटदाबी मध्यमवर्ग मुकाट स्वीकारतो.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
.................................................................................................................................................................
याचा अर्थ असा की तो सरकारला पूर्णपणे सामील झालेला आहे. याचा दुसरा अर्थ असा की, लोकशाहीच्या चार खांबांपैकी एक म्हणजे ही प्रसारमाध्यमे पण पाहता पाहता मोदींनी हा खांब आपल्या सरकारचा एक स्तंभ बनवून टाकला! लोकशाही, सरकार, देश असे सारे वेगळे असताना मोदींनी प्रसारमाध्यामांचे सरकारीकरण करून टाकले.
गंमत म्हणजे, मुळीच खळखळ न करता सारी माध्यमे मोदी सरकार, भाजप आणि संघ परिवाराची प्रवक्ते बनली. म्हणूनच सरसंघचालकांची निरर्थक, तर्कदुष्ट आणि अनभ्यस्त भाषणे दैनिकांच्या प्रथम पृष्ठांवर झळकतात अन् वृत्तवाहिन्या ती मथळ्यांत झळकवतात.
संघपरिवार स्थापनेपासूनच चर्चा, वाद, मुद्देसूद मांडणी, ससंदर्भ निवेदन या विरोधात आहे. त्यामुळे प्रचार, असत्य व अर्धवट माहिती फैलावण्यात संघ पटाईत. या मागे भारतीय सामाजिक परिस्थिती जशीच्या तशी असावी, त्यात परिवर्तन न व्हावे असे इच्छिणारा मध्यमवर्ग व हिंदू सवर्ण आहे. पुनरुज्जीवन आणि पुनःस्थापना करायची असेल, तर चर्चा वा वार अनावश्यक असतात.
पुन्हा मागे कशासाठी जायचे, हा साधा प्रश्नदेखील उपस्थित न व्हावा, ही संघाची भूमिका. अशी भूमिका पोट भरलेल्या व सुस्थित झालेल्या मध्यमवर्गाची असते. कारण टाकून दिलेल्या चालीरीती आणि परंपरा चालू झाल्या तरी त्यांचे काही बिघडत नाही. उलट त्यांचे हरवलेले अग्रस्थान पुनः प्राप्त होते. सबळ, जवळपास सारी माध्यमे धर्म, संस्कृती, इतिहास, अध्यात्म या नावाखाली जीर्णोद्धार प्रकल्प पूर्ण करायच्या नावाला लागली आहेत.
ब्राह्मणशाहीचे नवे रूप
भाजप सत्तेत आल्यापासून हिंदू धर्माला नव्याने ब्राह्मणी झळाळी आली आहे. आपल्यावर फारच अन्याय झाला असे भासवून ब्राह्मण वर्चस्ववादी मंडळी परशुरामांची पुन:स्थापना जोरजोरात करू लागली आहे. देवळांत कोणी (म्हणजे स्त्रियांनी) तोकडे कपडे घालून येऊ नये, असे फतवे जारी करू लागली आहे. त्याच्या बातम्या ठळकपणे प्रसारित केल्या जात आहेत. सारा मामला एकतर्फी, एकांगी आणि दडपशाहीचा! आणि म्हणे लोकशाहीची जननी भारतभूमी!
मराठी संतांनी आणि भागवत संप्रदायाने देव व भक्त यांच्यामधला भट दूर केला. थेट परमेश्वराशी नाते जोडले. कपडे, नवस, कर्मकांडे, प्रथा इत्यादी सर्व अवडंबर नष्ट केले. नवभारताकडे निघालेली ब्राह्मणशाही पुन्हा आपले प्रभुत्व समाजावर लादू पाहते आहे, हे याचे उदाहरण. या प्रकल्पाला एकाही माध्यमाने हरकत घेतलेली नाही. चर्चा करण्याची शक्यताच नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
‘सोशल मीडिया इज बुलशिट’ या शीर्षकाचे पुस्तक बी. जे. मेंडेल्सन यांनी २०१२मध्ये लिहिले. त्यांचे म्हणणे असे- ‘‘ट्विटर तुमच्यासाठी योग्य आहे का? कोणाला ठाऊक नाही. ट्विटर फक्त एक प्लॅटफॉर्म आहे. तो ना बरा-वाईट, ना उपयोगी, अनुपयोगी; मात्र आपल्याला स्वयंतुष्ट, हावरट, सुपोषित गोऱ्या लोकांनी त्याभोवती अशी एक मिथ्यकथा घडवली आहे, जी भलतेच काही सांगते. ते असे म्हणतात की, तुम्ही समाजमाध्यमे वापरायला हवीत, तुमचे सारे प्रश्न सुटतील. हे सर्व होत असताना त्या कंपन्या आणि त्यांचे प्रचारक खिसे भरून घेतात. तुम्हाला व त्या कंपन्यांना प्रचारक काही भंकस, व्यर्थ विकतात, तर या कंपन्या तुमची माहिती इतरांना विकून पैसा कमावतात. या कंपन्यांच्या भागधारकांना व जाहिरातकारांना नफा मिळतो, तो तुम्ही करत असलेल्या त्यांच्या वापरातून. त्यांची अमाप धन करून बदल्यात ‘एक्स्पोजर’च्या दिलाशाव्यतिरिक्त तुम्हाला काय मिळते?” (पृष्ठ २८, २९)
लबाडांचा खेळ
या मंचांनी अथवा व्यासपीठांनी मानवी नाती पुरती पालटवून टाकली आहेत. ज्ञान व माहिती यांच्या क्षेत्रात अशी नाती कधी नसत. कॉन्टॅक्ट, फॅन, फ्लोअर अशी ती नाती असून, त्यात मैत्री, दोस्ती असं काही उरत नाही. ऑफलाइनची गरज प्रत्यक्ष ओळख व्हायला अन् त्यातून झालीच तर मैत्री, प्रेम व्हायला होते. ऑनलाइन संबंध त्या त्या उपकरणांच्या क्लिकपुरते बंद-चालू होतात. थोडासा मतभेद झाला किंवा प्रतिवाद केला की, झालेच सारे उलटपालट!
लोकशाहीला प्रगल्भता, परिपक्वता लागते म्हणतात. अशा उच्छृंखल, थिल्लर अन् क्षणभंगुर समर्थकांची वा भक्तांची कोणाला गरज असते? एकाकी, आत्ममुग्ध, अहंकारी व निराश लोकांना, अर्थव्यवस्थेमुळे बेकार, निरक्षर, असहिष्णु वाढत चालले आहेत. त्यांना या व्यासपीठावर कसलासा दिलासा, हवाला वा भरोसा मिळत असावा.
मेंडेलसन म्हणतात, हा खेळ लबाडीने चालला आहे. काहीही बदललेले नाही. चाळवणारे, चेतवणारे एक नवे माध्यम येते आणि टेलिफोन, रेडिओ, टीव्ही आणि केबल यांच्याबाबतीत जे घडते, तसेच पुन्हा घडते. त्यावर जगातल्या मोजक्या, पण बलाढ्य कंपन्यांनी कब्जा करून टाकला. त्यामुळे इंटरनेट आणि वेब सर्वानुमते जसे वर्णिले गेले, तसे प्रत्यक्षात नव्हते.
आता ग्राहक वा वापरकर्ता हा उत्पादक असल्याचे सांगितले जाते अन् ती फार आदर्श संकल्पना आहेही. पण ते वास्तव फार थोड्या वर्गापुरते आहे. उरलेले आपण सारे अजूनही ऑडियन्सच आहोत. ऑफलाइन अनुभवांना प्रतिसाद म्हणून वेळ वापरणारे! हे माध्यम ऑनलाइन जे घडते आहे, त्याच्या मागे आहे, आपण नव्हे..
“हे माध्यम ज्या चर्चांमागे आहे ते बदलणारे नाही कारण वेळ हा प्लॅटफॉर्म विशिष्ट वापरकर्त्यांसाठी आहे, जनतेसाठी नाही. या कंपन्यांचे नफ्याचे गणित त्या विशिष्ट वापरकर्त्यांवर अवलंबून असून, ते जेवढे व्यापक असतील तेवढ्या या कंपन्या नफ्यात असतील त्यामुळे सर्वत्र तोच तो आशय तुम्हाला मिळेल.” (पृष्ठ क्र. ७४-७५)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
मध्यमवर्ग एकसुरी आणि एकमुखी कशाने झाला, का झाला, याचे उत्तर या उताऱ्यात मिळेल. किंबहुना, तो स्वत:च एक माध्यम कसा बनला तेही उमजेल. अध्यात ना मध्यात, अधले ना मधले, अर्धे असोत की मुर्धे; असे जे जे तटस्थ होते, ते सारे एका टोकाला जाऊन पोचले आहेत. ते टोक म्हणजे, अग्रभाग आहे.
संविधान, पुरोगामी चळवळी आणि आधुनिक जग यांनी टाकून दिलेल्या जुनाट, घाणेरड्या समाजरचनेच्या नेतृत्वस्थानाचे. थोडक्यात, पुनरुज्जीवन चाहणाऱ्या हिंदुत्ववादी सामाजिक-राजकीय विचारांचा मध्यमवर्ग आता ‘नवभारता’चा नेता झालेला आहे. मध्यम स्थानावरून त्याने शिखरस्थानी, अग्रस्थानी उडी मारली आहे, पण ती फार लवकर खड्ड्यात पडणार आहे, हे त्याला ठाऊक नाही!
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या ऑगस्ट २०२३च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment