आज आपण ज्या सामाजिक स्तराला ‘मध्यमवर्ग’ म्हणून ओळखतो तो कधी निर्माण झाला? आजचा मध्यमवर्ग स्थूलपणे कालमापन केले तर साधारणपणे गेल्या दीड-पाऊणे दोनशे वर्षांत उदयाला आला असे म्हणता येईल. शिवाजी महाराजांच्या काळात आजच्या सारखा मध्यमवर्ग नव्हता. म्हणजेच तो उदयाला येऊन त्याचा विस्तार व्हायला विशिष्ट आर्थिक-सामाजिक-राजकीय परिस्थिती निर्माण होईपर्यंत हा वर्ग नव्हता. ती परिस्थिती कोणती? तिचे निकष कोणते? जरासे काळाच्या ‘क्रिस्टल बॉल’मध्ये डोकावून पाहिले, तर ढोबळपणे आपण असे म्हणू शकतो की, इस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडात प्रवेश करण्यापूर्वी ‘मध्यमवर्ग’ निर्माण होण्यासाठी लागणारी ‘सामाजिक-आर्थिक’ पार्श्वभूमीच नव्हती.
तसे पाहिले तर इस्ट इंडिया कंपनीची स्थापना इ. स. १६००मध्ये झाली. तोपर्यंत वास्को द गामा भारतीय भूप्रदेशात, सामुद्री मार्गे पोहोचून एक शतक झाले होते. त्याच्याही अगोदर सहा वर्षे भारताचा शोध घेण्याच्या उद्देशाने निघालेला कोलंबस अमेरिका खंडात उतरला होता. वास्को द गामा पोर्तुगीज आणि कोलंबस स्पॅनिश / भारताचा शोध का घ्यायचा, तर या भागात मसाल्याचे पदार्थ - लवंग, दालचिनी, वेलची असे बरेच मसाल्याचे पदार्थ पिकत. त्यांना युरोपात उदंड मागणी असे. भारतातून मसाले आणि चीनमधून सिल्क आणि अफूसुद्धा!
या सामुद्री साहसात वास्को पोर्तुगीज आणि कोलंबस स्पॅनिश म्हणजेच इंग्लिश, फ्रेंच, जर्मन तसे नव्हतेच. या तमाम सामुद्री मार्गाने शोध घेण्याचे प्रयोग त्या त्या देशातील व्यापारी वर्गाच्या संघटना करत. इंग्लिश, डच आणि फ्रेंचही होते. पण निदान शंभर वर्षे सामुद्री प्रभुत्व पोर्तुगीज व फ्रेंचांचे होते. (आजही दक्षिण अमेरिकेतील ब्राझील वगळता सर्व देश स्पॅनिश भाषिक आहेत. ब्राझील - पोर्तुगीज.)
ईस्ट इंडिया कंपनीची ‘इंग्लिश’ आवृत्ती इ. स. १६००मधली. तशी डच वगैरे इस्ट इंडिया कंपन्याही होत्या. असो. आपला विषय तो नाही. हे संदर्भ देण्याचे कारण इतकेच की, व्यापार हे जग एकत्र येण्याचे सूत्र होते. (हे सर्व औद्योगिक क्रांतीच्या जवळजवळ दोनशे वर्षं अगोदर!)
त्यावेळच्या बोटींकडे ना होते स्टीम इंजिन, ना होकायंत्र. लोह, स्टील, खनिज तेल त्यानंतर अडीचशे वर्षांनी. त्या बोटींना दोरखंड, कापडी शिडं, लाकडी जाड फळ्या इतपतच. दिशादर्शन वाऱ्याकडून, आणि सामुद्री मार्गाचा वेध घेत घेत प्रवासाला जाणारे अनेक मृत्युमुखी पडत. बोटी वादळात सापडून, विविध रोग बोटीत शिरून प्रवासी असहाय रुग्ण होऊन, अगदी उपासमारीनेसुद्धा. असो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर एकूणच सामुद्री व्यापारी स्पर्धा वाढली. त्यातून या देशांमध्ये लहान-मोठी युद्धे झाली. त्यातूनच आधुनिक शस्त्रास्त्रांचा शोध व वापर सुरू झाला.
औद्योगिक क्रांतीची ही आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी होती. औद्योगिक क्रांती झालीच नसती, तर आपण ज्याला ‘औद्योगिक कामगार वर्ग’ म्हणतो तो आणि ‘मध्यमवर्ग’ म्हणून ओळखतो, तो उदयालाच आला नसता. कामगार वर्ग आणि मध्यमवर्ग यांच्या जन्मतिथीत फार अंतर नाही.
कामगार आणि मध्यम वर्गाचा उदय
कामगार वर्गाच्या अगोदरही, म्हणजे कारखान्यांच्याही अगोदर वस्तूंचे उत्पादन होते, पण ते व्यक्तिगत वा कौटुंबिक पातळीवर. लोहार, कुंभार, चांभार, शिंपी, विणकर, गवंडी, सुतार वगैरे. परंतु कारखाना आल्यावर असे सर्व कष्टकरी एका छपराखाली, अनेक यंत्रांवर एकत्रितपणे आणि संयुक्तपणे, वाटून दिलेल्या यंत्रावर नेमकेपणाने काम करू लागले आणि ‘कामगार वर्ग’ जन्माला आला. मग या कामगारांच्या कामाची, उत्पादनाची, व्यवस्थेची सोय करणारा, नोंद करणारा, त्यावर लक्ष ठेवणारा, त्यांचे वेतन ठरवणारा, वेतन देणारा एक निरीक्षक- सुपरवायजरी वर्ग निर्माण झाला. आधुनिक मध्यमवर्गाचा उदय हा असा उत्पादक-कष्टकरी कामगार वर्गांबरोबर तयार झाला.
तरीही गेल्या १०० वर्षांत आणि विशेषत: गेल्या २५ वर्षांत, म्हणजे एकविसाव्या शतकात या मध्यमवर्गात किमान चार-पाच आवर्तने झालेली आहेत आणि हे शतक पूर्ण होईपर्यंत आणखीही आवर्तने प्रगट होतील. त्यामुळे मध्यमवर्गाचे सामाजिक-मानसिक आणि आर्थिक-सांस्कृतिक तसेच राजकीय आणि जागतिक रूप हे बऱ्याच अंशी लवचिक व काही प्रमाणात अनिश्चितही असणार आहे.
हा मुद्दा अल्पसा आढावा घेऊनही लक्षात येऊ शकेल.
उदाहरणार्थ, माझ्या लहानपणी (पुणे येथे) समस्त सवर्ण-ब्राह्मण समाज स्वत:ला ‘मध्यमवर्गीय’ (आणि ‘सुसंस्कृत’) समजत असे. त्या ‘उच्च’ मानल्या गेलेल्या जाती श्रेष्ठतेमुळे त्यांना ‘मध्यमवर्गीय’ दर्जा प्राप्त झाला होता. वस्तुतः त्यांचा आर्थिक स्तर दरिद्री, गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय असा होता. त्यांच्यातील एक स्तर वर सरकला होता, पण मर्यादित अर्थाने. त्यांच्यातील एक लहान गट त्याही वर म्हणजे श्रीमंत म्हणवून घेऊ शकेल अशा स्थितीत होता.
साधारणपणे चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, देवज्ञ, सारस्वत, सीकेपी वा तत्सम जातींत विभागला गेलेला हा समाज महाराष्ट्रात पाच टक्क्यांच्या आत होता. साठीच्या दशकात ‘साडेतीन टक्के ब्राह्मण’ असे काहीसे उपहासाने, कुचेष्टेने व हिणवण्यासाठीसुद्धा बोलले जात असे.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
.................................................................................................................................................................
खरे म्हणजे, मराठा जातीतही मोठा मध्यमवर्ग होता. एकूण मराठा समाजापैकी आठ-दहा टक्के मराठा समाज कनिष्ठ ते वरिष्ठ मध्यमवर्गात होता. पण तो मराठा (वा कधी कधी कुणबी) असल्याने स्वतःला बहुजनात मानत असे. एकूण मराठा-कुणबी मिळून महाराष्ट्रात ३३-३४ टक्के (११ कोटींपैकी) आहेत. म्हणजे साधारणपणे चार-साडेचार कोटी लोक (इतकी तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्याची लोकसंख्या आहे!)
मध्यमवर्गाचा झिरप
पन्नाशी साठीच्या दशकात ‘ओबीसी’ ही संज्ञाही प्रचलित नव्हती - धनगर, माळी, आग्री, कोळी इत्यादी. या समाजातही मध्यमवर्ग होता, पण चार-पाच टक्के. पण तेही बहुजनातच धरले जात.
दलित समाजात मोठी उतरंड होती आणि आहेही. त्यातही ‘पुढारलेला दलित’ म्हणजे महार असे समजले जाई. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजातून आले असल्यामुळे या समाजास विशेष स्थान प्राप्त झाले. आरक्षणाचे धोरण आपल्या समाजातील उपेक्षित विभागांना प्रचंड प्रमाणावर उपयोगी ठरले. आरक्षणाच्या माध्यमातून दलितांमध्ये १९७०च्या व १९८०च्या दशकात बीसी-ओबीसी- एससी / एसटी समाजातूनही मध्यमवर्गाचा विस्तार होऊ लागला, पण संख्येच्या प्रमाणात तो कमी होता. कधी वास्तवतेतून तर कधी छद्मीपणाने त्यांचा ‘क्रिमी लेअर’ म्हणून उल्लेख होऊ लागला. एकूण टीकेचा रोख काही प्रमाणात खरा होतो आहे. लाभार्थी प्रामुख्याने महार असल्याने इतर दलित जाती-मांग, ढोर, मेहतर (भंगी) वगैरे अधिक उपेक्षित राहिले. त्यांच्यात ‘क्रिमी लेअर’ जवळजवळ नाहीच!
मुस्लीम मराठी समाजाला आरक्षणच नाही. त्यांच्यात श्रीमंत आणि गरीब असे दोन मुख्य गट होते (व आहेत) मध्यमवर्ग संख्येने अगदी कमी. त्यांचा मध्यमवर्ग मुख्यतः व्यावसायिक-दुकाने, कारागिरी, व्यापारी कंत्राटे वगैरे. तुलनेने शिक्षणाचे प्रमाण कमी. दलितांमधील महार समाजात मात्र शिक्षणाचा प्रचंड प्रसार झाला तो मुख्यतः डॉ. आंबेडकरांमुळे. इतर दलित समाजात कमी आणि मुस्लिमांमध्येही प्रमाण कमी.
शिक्षणाचा आणि ‘मध्यमवर्गीय’ असण्याचा दर्जा या दोन गोष्टींचा जवळचा संबंध आहे. सवर्ण वा ब्राह्मण समाजात परंपरेने शिक्षणाचे मूल्य व महत्त्व रुजलेले होतेच. समाजसुधारणेचे बहुतेक प्रयोग याच समाजात झालेले असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ ब्राह्मण वर्गातही शिक्षणाचे प्रमाण बरेच होते. (पुढे पुढे तर शिक्षित असण्याचा एक माजही या समाजात निर्माण झाला. परिणामी दलित- ओबीसींकडे काहीसे तुच्छतेने, उपेक्षेने आणि कधी उपकाराच्या भावनेने पाहणे होऊ लागले.)
बहुसंख्य सवर्ण-ब्राह्मण टूबीएचके (किंवा वन बीएचके सुद्धा) कुटुंबांमध्ये (आणि अर्थातच उच्च मध्यमवर्गात) कामाला असणारे स्त्री-पुरुष (मुख्यत: स्त्रियाच) हे बीसी-ओबीसी समाजातलेच असतात. (मुस्लीम जवळजवळ नाहीच.)
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
आमच्या मोलकरणीची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात - बघा कसे टिपटॉप युनिफॉर्म आहेत. येथपासून ते आता मजुरीची कामे करणाऱ्या बाई पुरुषांचे कपडेही झकपक, चांगल्या क्वालिटीचे आहेत ओळखूच येत नाही मालकीण कोण आणि मोलकरीण कोण अशा प्रकारचा संवाद नेहमी ऐकू येतो. मुद्दा हा की, गेल्या ७५ वर्षांत शिक्षणाचा प्रचंड प्रसार व विस्तार झाला आहे. (अर्थातच गेल्या ७५ वर्षांत काहीच झाले नाही, हे पालूपद चालवणाऱ्यांना हे पाहायचेच नसते. त्यांची गेली नऊ वर्षेही याच ७५ वर्षांतली आहेत तरीही!)
मध्यमवर्ग : एक स्वायत्त सार्वभौम देश
शिक्षण हा मध्यमवर्गात प्रवेश करण्याचा एक प्रकारचा सामाजिक-सांस्कृतिक परवाना आहे. उच्च शिक्षण हा अधिकच दर्जा देणारा. आणि त्यातून अमेरिकन शिक्षण घेऊन आलेला सवर्ण-ब्राह्मण तर एका वेगळ्याच स्तरावर असतो. तो तर कधी कधी येथील शिक्षितांनाही ‘उपेक्षित’ वा ‘तुलनेने मागासलेले’ मानतो. अमेरिकेचा व्हिसा हे या वर्गाच्या प्रतिष्ठेचे उच्च मध्यमवर्गीय अस्मितेचे प्रतीक बनले आहे. मध्यमवर्गीय उतरंडीतील हा स्तर पिरॅमिडच्या सर्वात वर! किंबहुना ‘एनआरआय ब्राह्मण’ - अनिवासी अमेरिकास्थित ब्राह्मण, ही एक नवी जात चालवण्याला ओलांडून, मनुला न विचारता तयार झाली आहे. हा अनिवासी ब्राह्मण निवासी ब्राह्मणांनाही काहीसा कमी लेखतो.
आपल्या देशात या सर्व स्तरांवरील एकत्रित मध्यमवर्गाची संख्या ५० ते ६० कोटींच्या आसपास आहे. म्हणजे २० कोटी कुटुंब! ही संख्या युरोपियन युनियनच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे (युरोपियन युनियन ४५ कोटी. त्यात २८ देश आहेत.) म्हणजेच भारतातील संयुक्त मध्यमवर्ग हा एक देशांतर्गत स्वायत्त (सार्वभौम) देश आहे.
या वर्गाच्या अपेक्षा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा सतत वाढल्याच नव्हे, तर त्यापैकी बहुतेकांना त्यांची जीवनशैली ही अमेरिकन-भारतीय (एनआरआय) जीवनशैलीप्रमाणे समृद्ध, बंगला (वा बंगले) मोटारी, स्वतंत्र जिम, स्विमिंग पूल वगैरे असावी, असे वाटते. खरे म्हणजे सर्व एनआरआय भारतीयांची अशी जीवनशैली नसली तरी ज्यांना भारतीय मध्यमवर्गाने ‘आयकॉन’ मानले आहे, त्या मध्यमवर्गाचे जीवनमान असे आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि एकूणच सिलीकॉन व्हॅली ही अमेरिकेची अलिबाबाची गुहा! (दिलीप व शोभा चित्रेंची क्षमा मागून)
साधारणपणे, या गुहेत शिरलेला विद्यार्थी असो वा सॉफ्टवेअर इंजिनियर वा अन्य कुणी टेक्निकल प्रोफेशन कुणीही परत येऊ इच्छित नसतो. स्टुडंट व्हिसा ते एच वन व्हिसा ते ग्रीन कार्ड ते सिटिझनशिप असा त्यांचा प्रवास असतो. (फार तर १० टक्के एनआरआय ही चेन तोडून परत येतात!) रुपये - डॉलर यातील विनिमयाचा दर डॉलरच्या तुलनेत रुपया ८० वा ९० वा अधिक १०० रुपये झाला, या अनिवासी भारतीयांना तसा फरक पडत नाही- नव्हे काहीसा लाभच असतो. कारण त्यांना भारतात जर १०० डॉलर्स पाठवले, तर त्याचे ५० रुपये दराने पाच हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना (वा ज्यांना पाठवले त्यांना) मिळतात. पण जर तो दर ८० रुपये असेल तर भारतातील तत्सम कुटुंबाला / वा कुणालाही आठ हजार रुपये मिळतील. साधारणत: अमेरिकेत गेलेला उच्चशिक्षित हा अमेरिकेतील त्याच्या एवढ्याच शिक्षित असलेल्या व्यक्तीपेक्षा कमी पण भारतात मिळणाऱ्या पगारापेक्षा पाच पट (किमान दुप्पट) असतो. त्या उत्पन्नामुळेच अमेरिकेत जाण्याची अहमहमिका असते.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...
मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?
मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!
.................................................................................................................................................................
व्यक्तिवादी महत्त्वाकांक्षांचा भस्मासूर
अशा वास्तव वा अवास्तव आकांक्षा महत्त्वाकांक्षा मध्यमवर्गात कधी निर्माण झाल्या? आज ज्यांचे वय १६ ते ४०-४५ आहे, त्यांच्यापैकी अनेक मध्यमवर्गीय तरुणांना तशा महत्त्वाकांक्षा आहेत. परंतु ज्यांचे वय ४०च्या पुढे आहे. त्यांच्या लहानपणी त्यांचा आई-वडील वा आत्या- काकांना त्या नव्हत्या. म्हणजेच या महत्त्वाकांक्षांचा उगम व विस्तार १९८०-९०च्या दशकातला आहे.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपले व आपल्या कुटुंबाचे जीवनशैली, जीवनमान अधिक चांगले व्हावे, आपल्या मुलांना व मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, आपल्या कुटुंबाला राहण्यासाठी टू बीएचके / वन बीएचके वा अधिक जागा राहायला मिळावी, अशी आकांक्षा ठेवण्यात काही आक्षेपार्ह नाही. प्रत्येकाची धडपड व प्रयत्न त्यासाठी असतो. जगातल्या सर्व ट्रेड युनियन्सचा संघर्ष अधिक उत्पन्नासाठी, अधिक चांगल्या कामाच्या सुविधांसाठी आणि अधिक व आधुनिक तंत्रकुशल कामासाठी असतो. ती भौतिक / ऐहिक ‘सिव्हिलायझेशन’ची गती आहे. प्रगतीचे अनेक टप्पे त्यातील वास्तव अपेक्षा आकांक्षांनी गाठले आहेत.
पण जेव्हा वास्तव आकांक्षा ‘अवास्तव महत्त्वाकांक्षां’चे अक्राळविक्राळ रूप धारण करतात आणि अनेकांच्या आयुष्याला वेढू लागतात, तेव्हा त्यातून आज दिसणारा मध्यमवर्ग तयार होतो. याच मध्यमवर्गातील, अगदी एक दोन पिढ्यांमागील, त्यांचेच सर्व नातेवाईक किती साधे जीवन जगत होते, याचाही त्यांना विसर पडतो. आकांक्षा म्हणजे केवळ स्वार्थ नव्हे, पण महत्त्वाकांक्षा (आणि तीही अवास्तव) मात्र व्यक्तीला वा कुटुंबाला एक प्रकारची झिंग आणते, माज आणते, बेपर्वाईसुद्धा!
(आताच्या ६० कोटी मध्यमवर्गातील प्रत्येक व्यक्तीला वा कुटुंबाला हा महत्त्वाकांक्षी आजार झाला आहे असे अजिबात मला सुचवायचे नाही - पण या आजाराची साथ या वर्गात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. कोणत्याही साथीतला रोग प्रत्येकाला होतो असे नाही, पण साथ आली की प्रत्येक व्यक्ती व कुटुंब त्यात सापडण्याची स्थिती व भीती मात्र तयार होते.)
साथ किती वेगाने एकूणच समाजात पसरते याचे उत्तम चित्रण ‘स्लमडॉग मिलीओनर’मध्ये आपल्याला दिसते. ‘कोटा फॅक्टरी’ चित्रपटात आणि ‘क्रॅश कोर्स’ या मालिकेतूनही या महत्त्वाकांक्षांचे हिंस्त्ररूप दाखवले आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनी कसे अक्षरशः पागल होतात, याचे ते चित्रण आहे. परिणाम अपयशातून येणाऱ्या भावना, उदासीनता ते आत्महत्या वा वेड लागणे!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
आज अक्षरश: काही लाख विद्यार्थी कोटा येथेच नव्हे, तर दिल्ली, बंगलोर, चेन्नई, मुंबई या ठिकाणीही JEE आणि IASच्या परीक्षा देऊन, त्याद्वारे ‘आयआयटी’च नव्हे, तर नंतर ‘आयआयएम’ आणि कुठच्या तरी (कुठच्याही!) अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी वा सरकारी उच्चपदस्थ अधिकारी बनण्यासाठी रक्त आटवून प्रयत्न करत असतात. उच्च शिक्षणाची इच्छा आणि उच्चपदस्थ होण्याची आकांक्षा असणे हा रोग म्हणता येणार नाही. पण आपल्या समाजात त्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जो व्यक्तिवादी महत्त्वाकांक्षांचा भस्मासूर उभा राहतो आहे, हे वरवर पाहून कधीही समजणार नाही. समाजमनाचा गाभाच त्यामुळे या व्हायरसने त्या तरुणाचा आत्माच फाटायला लागतो. पुढचे आयुष्य तो (अयशस्वी झाल्यास) त्याच उमेदीत जगू शकत नाही. हा व्हायरस कोविड व अन्य कोणत्याही पॅन्डेमिकपेक्षा घातक आहे. कारण शरीर नव्हे, मेंदू नव्हे तर मन आणि मानसिक अस्तित्वावरच तो हल्ला करतो.
वस्तुतः व्यक्तित्वाची जाणीव, आत्माविष्कार, व्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टी सिव्हिलायझेशनच्या दीर्घ प्रवासात जन्माला आल्या आणि विकसित झाल्या. परंतु व्यक्तित्व (Individuality) आणि व्यक्तिवाद (individualism) या दोन गोष्टी भिन्न आहेत. व्यक्तित्व ही आपली स्वत:ला व जगालाही झालेली व दिलेली ओळख आहे. परंतु व्यक्तिवाद म्हणजे individualism ही एक त्यातूनच निर्माण होणारी विकृती आहे.
व्यक्तिवाद, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, अहं उर्फ Ego, स्वत:बद्दलचे कर्तृत्वाचे, गुणांचे अवास्तव आत्मप्रकटन या गोष्टी त्या व्यक्तीला अतिशय घातक होतातच, शिवाय त्याचे परिणाम कुटुंबावर आणि समाजावरही होतात. स्वत:बद्दलचे अतोनात प्रेम, स्वतःच्या मोठेपणाच्या असामान्यत्वाच्या विलक्षण कल्पना आणि आपण एक प्रकारे सर्वज्ञ आहोत व आपल्याला अंतर्ज्ञानानेच काय योग्य काय अयोग्य है। समजते, कुणाशीही सल्लामसलत करायची गरजही भासत नाही, मित्र व स्नेही, प्रेमी वा कॉम्रेड कुणीही गरजेचे वाटत नाही - अशी माणसे आपण पाहतो. नरेंद्र मोदी हे त्याचे सर्वोत्तम आणि परिचित उदाहरण. इतिहासात डोकावायचे तर हिटलर हे याच व्यक्तिवादाचे उग्र व हिंस्र रूप.
विकृतींची जन्मकुंडली
या सर्व विकृतींची जन्मकुंडली ‘मध्यमवर्गीय’ समाजात होते. किंवा असेही म्हणता येईल, की अशा अवास्तवतेचे समर्थन याच मध्यमवर्गाकडून होते. लौकिक अर्थाने सुशिक्षित व उच्चशिक्षितसुद्धा असलेले लोक आजुबाजूच्या समाजाचे भान कसे विसरतात, गरीब वा उपेक्षित लोकांबद्दल कसे तुच्छतेने बोलतात, ‘Disposable People’ असे वर्णन, म्हणजे खरे तर जगण्याचीही लायकी व गरज नाही असे लोक, अशी ज्या उपेक्षितांबद्दल धारणा होते, त्या धारणेचा उगम या ‘मध्यमवर्गा’त आहे. (आता दलित, ओबीसी व मुस्लीम यांच्यातही जो नवा मध्यमवर्ग तयार होत आहे, त्यांच्यातही या प्रवृत्ती निर्माण होऊ लागल्या आहेत.)
‘मध्यमवर्ग’ जणू एक सामाजिक खलनायक आहे, असा कृपया समज करून घेऊ नये. जवळजवळ सर्व स्वातंत्र्य चळवळी, कामगार चळवळी, लेखक, कवी, नाटककार, नवे विचार मांडणारी माणसे, संतप्रवृत्तीचे लोक, समाजसुधारक, विचारवंत, शास्त्रज्ञ असे सर्व मध्यमवर्गातूनच आले आहेत आणि येत राहतील.
या लेखात फक्त गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच वर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील, या विश्वासाने ही नकारात्मक वाटणारी मांडणी केली, इतकेच.
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या ऑगस्ट २०२३च्या अंकातून साभार.
...............................................................................................................................................................
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत.
ketkarkumar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment