विंग कमांडर अशोक लिमये वयाच्या चाळिसाव्या वर्षी, सतत उंचावणारं करिअर अपघातामुळे धोक्यात आलं असतानाही अत्यंत संयमानं मार्ग शोधू शकले...
ग्रंथनामा - झलक
सोनाली नवांगुळ
  • ‘राखेतून उगवतीकडे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 01 August 2023
  • ग्रंथनामा झलक विंग कमांडर अशोक लिमये Wing Commander Ashok Limaye द फिनिक्स रायजेस The Phoenix Rises राखेतून उगवतीकडे Rakhetun Ugavatikade सोनाली नवांगुळ Sonali Navangul

विंग कमांडर अशोक लिमये यांच्या ‘द फिनिक्स रायजेस’ या आत्मकथनाचा ‘राखेतून उगवतीकडे’ या नावाने सोनाली नवांगुळ यांनी मराठी अनुवाद केला आहे. नुकताच तो राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला नवांगुळ यांनी लिहिलेलं हे मनोगत...

..................................................................................................................................................................

विंग कमांडर अशोक लिमये यांचं ‘द फिनिक्स रायजेस’ हे पुस्तक ‘मेनका’च्या आनंद आगाशे व सुजाता देशमुखांनी मला दिलं, याचं प्रमुख कारण आमची दोघांची शारीरिक स्थिती आणि त्यामुळे आलेल्या मर्यादा एकसारख्या होत्या. दोघंही अपघातामुळे ‘पॅराप्लेजिक’ झालो होतो. हे मी अनुवादासाठी घ्यायला हवं, कारण शारीरिक स्थितीवर मात करण्याचं विंग कमांडर अशोक लिमयेंचं धैर्य, नियोजन, त्यातले अडथळे आणि त्यातून त्यांनी मिळवलेलं यश; हे सारं मला स्वत:च्या अनुभवामुळे अधिक चांगलं कळण्याची शक्यता आहे, असा त्यांचा विचार होता.

‘मेनका’कडून पुस्तक मिळाल्यावर पहिल्या तीन प्रकरणांचा कच्चा अनुवाद पूर्ण केल्यानंतर आनंद आगाशे मला विंग कमांडर अशोक लिमये यांना भेटायला घेऊन गेले. पुस्तकाचा विषय माझ्या नेहमीच्या विषयांपलीकडचा आणि भाषा माझ्या स्वभावाच्या तंतोतंत विरोधातली. त्यामुळे खूप शंका होत्या माझ्या मनात. त्यांना भेटायचं, म्हणून माझा उत्साह नुसता उतू जात होता.

विशेष म्हणजे बोलताना कळलं, आमच्या वयांमध्ये जरी बराच फरक असला, तरी आम्हा दोघांना पॅराप्लेजिया जवळपास २५ वर्षांपूर्वी झाला होता.

पुण्यातल्या त्यांच्या बंगल्यात आम्ही पोहोचलो, तर व्हीलचेअरवरून घरात सहज प्रवेश करता येईल, असा एक सुटसुटीत व अत्यंत योग्य मापात बांधलेला रॅम्प हजर होता. आत गेल्यावर साक्षात लिमयेसर सामोरे आले. ऐटदार, उंचनिंच, व्हीलचेअरवर थाटात बसलेले. त्यांच्याशी एक ‘कड्डक’ हस्तांदोलन झाल्यावर मी त्यांच्याकडे पाहत असताना माझ्या तोंडून नकळत उद्गार निघाला, “सर, तुमचं पोट किती सपाट आहे! आहा!!” सर हसले. कदाचित या नाचऱ्या उत्साहातून माझ्या स्वभावाची चुणूक त्यांना मिळून गेली असावी.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पॅराप्लेजिया झालेल्या माणसांना कमरेखालच्या भागात संवेदना नसणं, यामुळे फक्त शरीराच्या वरच्याच भागाची हालचाल होणं, हालचालीच्या कमतरतेमुळं हाडं ठिसूळ होत जाणं वगैरे असतंच. त्यातच नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसल्यामुळे शरीर व मनावर असणारा ताण, व्यायामाचा व नेमक्या डाएटचा अभाव, शिवाय महत्त्वाचं म्हणजे दुर्बळ इच्छाशक्ती या साऱ्यांमुळे बरेचदा पॅराप्लेजिक माणसं पोटाकडचा व दंडाचा भाग वाढलेली, म्हणून बेढब दिसतात आणि बरेचदा जरुरीपेक्षा जास्त स्थूल असतात. सरांचं असं फिट असणं मला चकित तर करत होतंच, पण आपणही त्यांच्याकडून चार युक्तीच्या गोष्टी घेऊन ‘असं’ दिसायला हवं, ही प्रेरणाही देत होतं. मी प्रचंड प्रेमात पडले लिमयेसरांच्या.

आजवर माझा कधी एनसीसीशीही संबंध नव्हता, त्यामुळे एकूण हे आखीव शिस्तीचं प्रकरण व कडक गणवेशातली भाषा माझ्या चांगल्याच दांड्या उडवणार होती. पहिल्यांदा लिमयेसरांना मी अगदी बाळबोध शंका विचारली, “सर, पायलटचा डेकोरम इतका कडक असतो का, की ते विमानात बसायला जाताना चार पावलंसुद्धा चालत न जाता टॅक्सीतून जातात आणि मग आत चढतात?” सर माझ्याकडे पाहत म्हणाले, “म्हणजे?” मी त्यांच्या पुस्तकातल्या त्या विशिष्ट ओळीवर बोट नाचवलं. तेव्हा अगदी मनमोकळं हसत त्यांनी सांगितलं, “टॅक्सिईंगचा टॅक्सीशी संबंध नाही. विमान आकाशात उडण्यापूर्वी, धावपट्टीवरून धावताना जी हालचाल करावी लागते, त्याला ‘टॅक्सिईंग’ म्हणतात.”

- प्रश्न विचारण्यातला प्रामाणिकपणा लक्षात घेऊन सर मला मनापासून माहिती पुरवत होते. भारतीय सैन्यदलाविषयी, फायटरफ्लाईंगसारख्या कामाविषयी गावा-शहरातल्या माणसांना उत्सुकता वाटावी आणि पुढे या क्षेत्रात येण्याची इच्छा नवयुवकांच्या मनात तयार करावी, असाच त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश होता.

विमानं ठेवण्यासाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण जागेला काय म्हणतात, हे सामान्य ज्ञानही मला असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे इतकी अवजड विमानं ‘हँगर’ला कशी अडकवतात, हाही प्रश्न मला पडलाच होता. गालातल्या गालात हसत लिमयेसर शंका दूर करत होते. या भेटीत आम्हा दोघांमध्ये एक छान मोकळेपणा तयार झाला.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

लिमयेसरांची आणि माझी शारीरिक अवस्था समान असली, तरी आमची घडणच मुळात वेगवेगळी होती. लिमयेसर भारतीय सैन्यदलाच्या मुशीतून झळाळून बाहेर पडलेले. त्यामुळे अपघातानंतर त्यांना बसलेला धक्का, अपघातावेळचं वय, सावरण्यासाठी लागलेला काळ; हे सारंच माझ्या अनुभवांपेक्षा वेगळं होतं. बाहेरच्या जगाचा त्यांना असलेला अनुभव आणि केवळ फायटर पायलट बनून न राहता, सतत शिकत राहण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास, यामुळे त्यांचं जगणं आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाही फारच वेगळा होता.

वयाच्या नवव्या वर्षी अपघात झाल्यावर जे काही उपचार मिळाले, त्यानंतर मी शारीरिक अडचणींबद्दल विशेष जाणीवजागृती नसणाऱ्या बत्तीसशिराळ्यासारख्या माझ्या खेडेगावातच येऊन राहिले होते. बाहेरच्या जगातली पॅराप्लेजिया झालेली माणसं आपलं आयुष्य कशा तऱ्हेनं जगताहेत, हे शोधण्याचा न माझ्या मनात विचार आला, न इतर कुठून माझ्यापर्यंत पोहोचला. ते मार्ग बरेच नंतर धडपडीतून सापडत गेले. तरीही पॅराप्लेजियासह जगण्याचे आणि सतत चैतन्यमय राहण्याचे सगळेच मार्ग असं नाही.

म्हणूनच लिमयेसरांची दैनंदिनी ऐकून माझ्या जगण्यात गुणात्मक फरक जरूर पडला. त्यांच्याकडून नव्या युक्त्या मिळाल्या. शरीर हे जैविक यंत्रच, एखाद्या अक्षमतेमुळे त्याची बिघडलेली भट्टी समजून घेऊन, ती आणखी बिघडू नये म्हणून योग्य व्यायाम, औषधोपचाराचं नियोजन, सतत कार्यमग्न राहण्याची केलेली सोय आणि शक्य तितकं चलनवलन लिमयेसर कसे करतात, हे ऐकताना माझा स्वतःबाबतीतला उत्साह वाढत गेला. मला दिसणाऱ्या इतर पॅराप्लेजिक्सच्या तुलनेत मी खूपच ‘अॅक्टिव्ह’ होते, पण माझं विमान लिमयेसरांना पाहिल्यावर खाली उतरलं, पुन्हा उडण्यासाठी!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

लिमयेसरांच्या पुस्तकातलं वातावरण माझ्यासाठी खूपच उपरं असल्यामुळे ते शक्य असेल तितकं ओळखीचं करून घ्यावं, असं फार मनात होतं. ते वातावरण बघितल्यावर मला अनुवादाची भाषा सापडेल, असं वाटत होतं. म्हणून लिमयेसर व आनंद आगाशेंकडे मी एनडीए पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी ते मान्य केलं, संबंधितांकडून परवानगी काढली. तिथल्या दैनंदिनीविषयी लिमयेसरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी नेवीमध्ये करिअर करण्यासाठी एनडीएमध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी - मृगेंद्र जोशी याच्याशी जोडून दिलं. तो आणि त्याचे आईबाबा मंजू आणि विनायक हे दोघंही एनडीएचा परिसर फिरताना सोबत होते. हळूहळू पुस्तकातल्या ‘स्क्वॉड्रन’, ‘बटालियन’, ‘मफ्ती’, ‘पीओपी’, ‘लॅनयार्ड’, ‘सॉर्टी’ वगैरे अनेक शब्दांना माझ्या नजरेत चित्र व अर्थ मिळत गेला.

लहानपणापासून लिमयेसरांना हॉस्टेल्समध्ये राहण्याचा सराव होताच, त्यामुळे शिक्षणाच्या व पुढे नियुक्त्यांच्या निमित्तानं सतत नव्या जागी जाऊन ती जुनी करणं त्यांना जड गेलं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना वडलांकडून विमानं उडवण्याविषयीचं कुतूहल जागवणारं ‘ऑब्झरवर्स बुक’ मिळालं. त्यानंतर विमानांविषयी जितकं काही वाचायला मिळेल, ते वाचण्याचा त्यांना नादच लागला. मग दरवर्षी ‘ऑब्झरवर्स बुक’ची नवी आवृत्ती मिळत गेली.

छंदाचं रूपांतर ध्येयामध्ये झालं. ट्रेकिंग, हायकिंग वगैरे छंद होतेच. या सगळ्यातून नेमकी व कठोर शिस्त आणि बोलण्यापेक्षा कृतीतून सिद्ध होणं, हा लिमयेंचा स्वभाव बनत गेला. या पुस्तकात तो पुरेपूर उतरला आहेच. त्यामुळे वयाच्या चाळिसाव्या वर्षी, सतत उंचावणारं करिअर अपघातामुळे धोक्यात आलं असतानाही अत्यंत संयमानं ते मार्ग शोधू शकले. म्हणूनच पुस्तक लिहिताना जगण्यातल्या भावनोत्कट गोष्टीपेक्षा प्रशिक्षणावर त्यांनी अधिक भर दिला आहे. ते सांगतानाची भाषाही काटेकोर, सैल नसलेली व कमी गुंतवणारी असली, तरी तेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.

अत्यंत फोकस्ड जशी त्यांची जगण्याची शैली आहे, तशीच लिहिण्याचीही आहे! कधी कधी त्यांचे विनोद व विशिष्ट भाषाशैली कळणं मला जड गेलं, पण इतकं आव्हान तर हवंच अधिक चेव येण्यासाठी.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

लिमयेसर अपघातापूर्वी कसे दिसायचे, हे पाहण्याचीही उत्सुकता मला होती. तेव्हा त्यांनी गोविंद निहलानींचा ‘विजेता’ नावाचा सिनेमा सुचवला. त्यात अगदी छोटी, कुणाल कपूरचा ‘फ्लाईंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून खऱ्या आयुष्यातली भूमिका त्यांनी निभावली होती. लिमयेसरांना त्यांनी अपघाताच्या सुरुवातीच्या दिवसात सोसलेल्या त्रासाबद्दल बोलतं करायचा एक क्षीण प्रयत्न करताना मी विचारलं, “हॉस्पिटलमधले उपचार संपल्यावर घरी परतलात, तेव्हा अपघातामुळं काय घडून गेलंय याची तीव्र जाणीव झाली का?” - तर गंभीर चेहरा ठेवून सर म्हणाले, “माणूस खूप बुद्धिमान असला की, त्याला त्रास होतो. माझ्याबाबतीत तसं काही नव्हतं, त्यामुळं सोपं गेलं असेल कदाचित.”

तरी नेट लावत पुन्हा मी विचारलं, “निराशा येऊन सगळं नकोसं वाटतं का केव्हातरी?”

“हं, म्हणजे माझे मामा-मामी पूर्ण बहिरे आहेत, पण त्यांचं चाललंय नीट. माझी बायको प्रिया माझ्या सगळ्या लहरी जाणते. कधी वैताग आला, तर तिच्याशी बोलतो. आता पहा सोनाली, माझी किंवा तुझी केस... व्हीलचेअर आहे, बाकी ऐकू येतंय, बोलता येतंय. उरलेलं सगळं ठीकठाक आहे. यू आर यंग. आय अॅम फिट. आणखी काय हवं?”

“नवं विमान ज्या पद्धतीनं तुम्ही उत्सुकतेनं पाहिलं, तसं अपघातानंतरचं अनोळखी शरीर, नवं जगणं पाहिलं? मन:स्थितीचं काय?”, असंही प्रश्न बदलून विचारायचा प्रयत्न केला.

म्हणाले, “उत्सुकतेनं असं नाही पाहिलं, पण शरीर समजून घेणं ही गरज होती. गरज पूर्ण करण्यासाठी ना-ना प्रश्न विचारायला हवेत. प्रश्न पडले, तर उत्तरंही मिळतात. मार्ग काढावे लागतात... आणि मनःस्थिती! त्या वेळी प्रत्येक गोष्ट माझ्याकरता नवी होती. हॉस्पिटलमधल्या छताला फॉल्स सिलिंग होतं. त्यावर असणाऱ्या डिझाईनमध्ये किती चौकोन आहेत, हे मला पाठ झालं. ते दिसले की, मला धीर वाटायचा. इतकं सोपं आहे हे! हॉस्पिटलमधली टॉयलेट्स व्हीलचेअरसाठी सोयीस्कर नव्हती. त्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन माझ्या घराच्या रचनेत मी स्वतः लक्ष घातलं, कारण मला व्हीलचेअरसह आरामशीर व सोपं जगायचं होतं. इथून दोन हातांवर बसलेल्या माणसापर्यंत जायचं, तरी मला सांगावं लागायचं की, तिथं घेऊन चला. त्यांना माझ्यापर्यंत येऊन काही द्यावं घ्यावं लागू नये, याचं प्रशिक्षण मला स्वतःला द्यावं लागलं. मला स्वतःला बजावावं लागलं की, मी स्वतः जाणारय, ते नाही येणार माझ्यापर्यंत! हळूहळू गेली २०-२५ वर्षं मी या सगळ्या गोष्टी शिकत चाललो आहे.”

स्वावलंबी होण्याचाच आणखी एक प्रयत्न म्हणून लिमयेसरांनी लूना आणि नंतर कार स्वत:च्या गरजेनुसार अनुकूल करून घेतली. त्यांच्या परवान्यानं काय हे विचारलं, तर म्हणाले, “हो... गाडी गरजेनुसार बनवून घेणं कर्म अवघड होतं, पण परवान्याबद्दल खूप त्रास झाला. त्रास झाला म्हणण्यापेक्षा माझा अॅप्रोच चुकीचा होता.”

“म्हणजे?”

“म्हणजे समजून घ्यायचं!”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

फार वर्णनात न अडकता शब्दफेकीतून लिमयेसरांनी व्यवस्थांबद्दलचा व्यक्त केलेला उपरोध मला समजला. भारतीय सेनादलातल्या हवाई विभागात अत्यंत महत्त्वाची पदं भूषवलेल्या लिमयेसरांची विनोदाची व उपरोधाची पद्धत माझ्या तशी सवयीची होऊ पाहत होती, पण तरी नवे धक्के बसत होते...

जाता जाता त्यांना म्हटलं, “तुम्ही म्हणता की, व्यक्तिगत प्रशिक्षणातून स्थैर्य येतं... ते तुमच्या हवाईदलातल्या चाकोरीत की, घरगुती जगण्यातही? दोन्ही ठिकाणच्या वातावरणामध्ये खूप फरक आहे ना म्हणून...”

“दोन्ही ठिकाणी माझं धोरण हे एकच खरं तर. मुलींबाबतीतही. जितकी मोठी चूक त्या करतील, तितकी माझी प्रतिक्रिया सौम्य असते. नियंत्रित असते. छोटी चूक असली की, आय विल थ्रो अप्. मोठ्या चुकीला, आय वूड नॉट से ए थिंग. त्यांना कळतं लगेच! घराचं दार आपटलं; तर मी जोरजोरात ओरडेन, पण दार तोडलं, तर मी काही नाही म्हणणार. दॅट्स प्रॉबॅबली द वे.”

‘राखेतून उगवतीकडे’ - विंग कमांडर अशोक लिमये | अनुवाद - सोनाली नवांगुळ

राजहंस प्रकाशन, पुणे | मूल्य - ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......