“सरकारनेच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तर आम्ही काय करायचं? आम्ही खरोखरच ‘भारताचे नागरिक’ आहोत का?”
पडघम - देशकारण
आरती कुलकर्णी 
  • मणिपूरचा नकाशा
  • Mon , 31 July 2023
  • पडघम देशकारण मणिपूर Manipur मैतेई Meitei नागा Naga कुकी Kuki

मणिपूरमधली माणसं कुकी आहेत की मैतेई? हिंदू आहेत की ख्रिश्चन वा मुस्लीम? हे प्रश्न अनाठायी आहेत. तिथली हिंसाचाराची, अत्याचारांची धग सोसणारी निरपराध माणसं ‘माणसं’ आहेत आणि त्यांना सन्मानानं जगण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

मणिपूरमध्ये गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून यादवी-अराजक उफाळून येण्यापूर्वी या माणसांचा विचार केला होता का आपण? मणिपूरची राजधानी इम्फाळच आहे ना, असा कधीतरी मनात आलेला प्रश्न, कधीतरी ईशान्येकडच्या या सात राज्यांच्या नावांची उजळणी... इम्फाळ आणि शिलाँगमध्ये सतत होणारा गोंधळ...

अगदी अलीकडेच उमगलेली ‘लोकताक लेक’ची महती, कधीतरी वाचलेला रंगकर्मी रतन थिय्याम यांच्याबद्दलचा लेख, एका माहितीपटाच्या निमित्तानं मणिपूरच्या आयएएस अधिकाऱ्यांशी झालेलं संभाषण आणि काही मित्रांकडून ऐकलेल्या गोष्टी... बस्स! एवढंच होतं मणिपूर माझ्यासाठी.

पण या काळीज पिळवटून टाकणाऱ्या संकटामुळे मणिपूरबद्दल वाचत गेले... तिथल्या चालत्याबोलत्या माणसांच्या मुलाखती पाहिल्या, लक्ष देऊन ऐकल्या... तिथले रिपोर्ट्स पाहिले... डोंगराच्या कुशीतली गावं पाहिली, इम्फाळ पाहिलं आणि कळलं, असं आहे मणिपूर आणि अशी आहेत इथली माणसं! ईशान्येकडच्या या छोट्याशा राज्यानं मन व्यापून टाकलं माझं.

मणिपूरमध्ये महिलांवरच्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्या कित्येक महिने आधीपासून मणिपूरच्या माणसांना या देशाला, सरकारला आणि जगालाच खूप काही सांगायचं होतं... पण ऐकलंच नाही आपण!

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

व्हिडिओमुळे हादरला देश 

४ मे २०२३ रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ जुलैमध्ये व्हायरल झाला आणि अवघा देश हादरला... दोन महिलांवर झालेला अत्याचार आणि मग त्यांची निघालेली नग्न धिंड... मणिपूरमध्ये काय चाललं आहे, हे कळण्यासाठी हा व्हिडिओ समोर यावा लागला आपल्या! या तीन महिन्यांच्या काळात या महिलांचं, त्यांच्या कुटुंबांचं, त्यांच्या गावांचं आणि अख्ख्या मणिपूरचं काय झालं असेल याची कल्पना केली, तरी शहारे येतात!  

मणिपूरच्या ज्या भागांबद्दल काहीच माहिती नसते आपल्याला, धड नावंही उच्चारता येत नाहीत त्यांची, त्याबद्दल पहिल्यांदाच ऐकतो आहोत, पहिल्यांदाच बघतो आहोत आणि असंही एक राज्य भारतात आहे, हे जाणवतं आहे. तिथल्या कहाण्या मन पिळवटून टाकणाऱ्या आहेत. 

मैतेई आई, कुकी बाबा... तोंगसिंगची कहाणी 

सात वर्षांचा एक मुलगा तोंगसिंग, त्याची आई आणि शेजारची मावशी या तिघांना इम्फाळमधल्या इरोइसेंबा भागात जिवंत जाळण्यात आलं. आसाम रायफल्सच्या छावणीमध्ये आसरा घेतलेला असताना या लहानग्याला बंदुकीची गोळी लागली...

तोंगसिंग हंगशिंग त्याच्या आईवडिलांसोबत छावणीमध्ये येऊन एकच दिवस झाला होता. छावणी असलेल्या या गावात कुकी आणि मैतई लोकांच्या गटांमध्ये गोळीबार झाला. एक गोळी तोंगसिंगच्या डोक्यात घुसली... एक त्याच्या आईच्या हाताला लागली...

तोंगसिंगला लगेच हॉस्पिटलमध्ये नेणं भाग होतं. तोंगसिंगची आई मैतेई आणि वडील कुकी. इम्फाळजवळच्या या भागात मैतेईंचं वर्चस्व होतं. म्हणून तोंगसिंगच्या मैतेई आईने त्याच्यासोबत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुकी पतीच्या जीवाला धोका आहे, हे ती जाणून होती...

मीना हंगसिंग आणि त्यांची आणखी एक मैतेई शेजारी तोंगसिंगला अँब्युलन्समधून घेऊन बाहेर पडल्या.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

इम्फाळजवळ इरोइसेंबा इथे पोहोचल्यावर हिंसक जमावाने अँब्युलन्सला घेरलं. या जमावाला रोखण्यात पोलीस अपुरे पडले. त्यांनी त्यांना पांगवण्यासाठी गोळीबारही केला नाही. हिंसक जमावाने अँब्युलन्सला आग लावली. तोंगसिंग, त्याची आई आणि त्याची शेजारची मावशी त्यात जळून मृत्युमुखी पडले...

याच छावणीमध्ये काही दिवसांनी तोंगसिंगचे वडील एका पत्रकाराला हे सांगत होते, तेव्हा फक्त कुठेतरी बघून रडू शकले! ते त्यांच्या आजारी मुलाला, पत्नीला पुन्हा काही विचारूही शकले नव्हते. या तिघांची काही हाडं शिल्लक राहिली होती फक्त.

ही कहाणी मैतेई आई आणि कुकी बाबा असलेल्या तोंगसिंगची आहे. हे निरपराध कुटुंब सुरक्षा छावणीत असूनही, पोलिसांच्या डोळ्यांदेखत हैवानांच्या तावडीत सापडलं...

मणिपूरमधली ही घटना ४ जूनची आहे. त्याआधी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ईशान्येकडचं हे छोटंसं राज्य हिंसाचार, यादवी आणि अराजकाच्या आगीत धगधगतं आहे.

द्वेष कुणी पसरवला?

ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम म्हणतात, आमचं मणिपूर म्हणजे एक सुंदर व्हॅली आणि नऊ डोंगरांचं राज्य आहे. रतन थियाम यांनी मणिपूरवर ‘Nine Hills One Valley’ नावाचा एक नाट्यप्रयोगही साकारला आहे. मणिपूरचे सगळेच लोक त्यांना आपलं मानतात.

ते म्हणतात, ‘‘मणिपूरमध्ये सुमारे ३७ समुदायांचे लोक कित्येक वर्षं एकत्र राहत आलेत. हे अचानक उफाळून आलेलं संकट आमच्या राज्यावर कधी येईल, असं आम्हाला वाटलंही नव्हतं… कुकी आणि मैतेई गावांमध्ये असलेली चर्च टिपून टिपून जाळण्यात आली. त्याआधी इथे चर्च आहे, हेही आम्हाला माहीत नव्हतं. या दोन समुदायांमध्ये धर्माच्या नावाखाली तेढ कुणी आणि का पसरवली, याची उत्तरं हे घडवून आणणाऱ्यांनाच द्यावी लागतील.’’ 

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

व्हॅली आणि डोंगर

इम्फाळ आणि त्याच्याजवळचा खोलगट भाग असलेली व्हॅली मणिपूरचा १० टक्के भाग व्यापते. आणि राज्याचा ९० टक्के भाग डोंगराळ आहे. इम्फाळमध्ये मैतेईंची संख्या मोठी आहे आणि डोंगराळ भागात कुकी बहुसंख्य आहेत. डोंगराळ भाग ९० टक्के असला तरी तिथे राहण्यायोग्य जागा कमीच आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. अशा दुर्गम भागात जगणं अजिबात सोपं नाही.

मणिपूरचा नकाशा पाहिला, तर आपल्या लक्षात येईल, हा डोंगराळ भाग भारत-म्यानमारच्या सीमेवर आहे आणि मिझोरम-नागालँडशी जोडलेला आहे.

याच डोगंररागांमध्ये एक जिल्हा आहे, चुराचांदपूर. मणिपूरमधल्या संघर्षाच्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा प्रत्येकाच्याच बोलण्यात या जिल्ह्याचं नाव येत होतं. चुराचांदपूर कसं आहे, त्याबद्दल माहिती घेतली, तेव्हा तिथल्या के. सोंगजंग गावात काय घडलं, ते समजलं.

के. सोंगजंग गावात काय घडलं?

के. सोंगजंग हे डोंगराळ भागातलं आदिवासी गाव. ‘एक दिवस वनखात्याचे अधिकारी सहा जेसीबी मशीन्स आणि पोलिसांचा ताफा घेऊन इथे आले आणि या गावातली घरं आणि होतं नव्हतं ते सगळं त्यांनी उदध्वस्त करून टाकलं,’ ३१ वर्षांचा एक तरुण सांगत होता.

‘२० फेब्रुवारीच्या दिवशी जेव्हा आमच्या गावावर बुलडोझर फिरत होता तेव्हा आमची मुलं शाळेत गेली होती. शाळा सुटल्यावर जेव्हा मुलं घरी आली, तेव्हा तिथे त्यांचं घरच नव्हतं. घर बांधण्यासाठी वापरलेले पत्रे, लाकडी फळ्या सगळं घेऊन अधिकारी पसार झाले. उदध्वस्त घराच्या पसाऱ्यात मुलं त्यांच्या वस्तू शोधत होती, पण आता तिथे काहीच उरलं नव्हतं...’

के. सोंगजंग गावाचे ७५ वर्षांचे प्रमुख लुनथांग हौकीप यांनी सांगितलेली ही कहाणी हेलावून टाकणारी आहे- ‘‘आमचं गाव रिकामं करायला आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही मज्जाव केला. आमची घरं पाडू नका, अशा विनवण्या केल्या पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही फक्त दोन कच्ची घरं पाडतो, असं ते म्हणाले, पण बघताबघता त्यांनी अख्खं गाव आणि घरं पाडून टाकली...’’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

‘द प्रिंट’ या वेबसाइटच्या प्रतिनिधीला लुनथांग हौकीप त्यांच्या उठलेल्या गावाची कहाणी सांगत होते- “इथे आमचं एक चर्च होतं... तेही त्यांनी पाडून टाकलं. एवढंच कशाला, त्यांनी आमची आधार कार्डही हिसकावून घेतली...”

के. सोंगजंग गावातले गावकरी रोज या मोडून पडलेल्या वस्तीच्या ठिकाणी येतात. आपलं हसतंखेळतं गाव इथे पुन्हा कधीतरी वसवता येईलच अशी त्यांना आशा आहे...

‘आम्ही अफूची शेती केली नाही, आम्ही घुसखोर नाही, आम्ही जंगलावर अतिक्रमणही केलेलं नाही. तरीही मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आम्हाला लक्ष्य केलं’, असं के. सोंगजंगच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

इथून आम्हाला बाहेर काढून, बेघर करून ही जंगलं तुम्हाला खाण कंपन्यांच्या ताब्यात द्यायची आहेत का, असाही मणिपूरमधल्या आदिवासींचा सवाल आहे.

मणिपूरमध्ये सामाजिक कामं किंवा निसर्ग संवर्धनाच्या निमित्ताने जाऊन आलेले काही संशोधक आणि कार्यकर्ते  सांगतात, मणिपूरमध्ये कधी काळी हे सगळं पाहावं लागेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. फार सुंदर राज्य आहे हे आणि फार सुंदर लोकं!

अशा राज्याच्या वाट्याला परस्परांबद्दल कमालीचा द्वेष, सूडाची भावना, हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार, असं विखारी वातावरण आलं आहे. दोन्ही बाजूचे सशस्त्र गट एकमेकांवर आक्रमण करण्याच्याच मानसिकतेत आहेत. त्यांनी ही शस्त्रं सरकारच्याच शस्त्रागारातून लुटली, असाही आरोप होतो आहे.

सरकारी अनास्था, भारतीय नागरिकांकडून मिळणारी परकेपणाची वागणूक, मूळ भारतापासून आधीच असलेलं आणि आता आणखीनच विस्तारलेलं भौगोलिक आणि मानसिक अंतर... या सगळ्यातून मणिपूर कसं वाट काढणार आहे, हा ऊर धपापून टाकणारा प्रश्न आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नॅन्सी आणि किमची हिंमत

अलीकडेच पाहिलेल्या एका मुलाखतीत मणिपूरच्या दोन धैर्यवान कुकी तरुणी त्यांची कहाणी सांगत होत्या... नॅन्सी आणि किम. इम्फाळजवळच्या पोलीस छावणीमध्ये जाताना नॅन्सीच्या नवऱ्याला आणि सासूला जमावाने ठार मारलं. नॅन्सीलाही जबर मारहाण झाली. तिला पोलिसांनी दिल्लीला आणून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. तिच्या मेंदूला मार बसला होता. मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.

डोक्यावरचे वार आणि जखमा झेलत नॅन्सी तिची कहाणी सांगत होती- ‘‘बलात्कार करा हिच्यावर... दुसऱ्या जमावाच्या बायका ओरडत होत्या... त्या महिला असून असं कसं बोलत आहेत... मला धक्काच बसला... मोठमोठी माणसंही या गुन्हेगारांच्या बाजूने चित्कारत होती!’’

तिने हिंमत दाखवून सगळ्याला तोंड दिलं. तिथे पोलीस आले, म्हणून ती या सगळ्या हाहाकारातून बचावली... पण तिचा नवरा आणि सासूचा जीव गेला...

दुसरी आहे किम. किमच्या भावाला आणि आईला तिच्या डोळ्यांसमोर जीवे मारण्यात आलं. तिलाही जबर मारहाण झाली. किमने भावाच्या अंगावर पडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला... पण नाही... तिचा भाऊ वाचला नाही त्यातून...तिला स्वत:ला कुठेतरी लपूनछपून आसरा घ्यावा लागला... पोलीस आल्यामुळे ती वाचली नाहीतर....?

किमची आई आणि भाऊ गेले. तिचे वडील चुराचांदपूरमध्ये आहेत. ते आपल्या जिवलगांचे मृतदेह ताब्यात मिळण्याची वाट बघत आहेत. किम अजूनही तिच्या वडिलांना भेटू शकलेली नाही.

‘मित्रांनी फोन केला का?’

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी या तरुणींच्या शौर्याला दाद देत त्यांना विचारलं, ‘तुम्ही आता दिल्लीमध्ये आहात. पुन्हा मणिपूरला जावंसं वाटतं का?’

त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. एकीला चुराचांदपूरमध्ये राहिलेल्या तिच्या वडिलांची काळजी होती... ‘हो जाऊ बहुतेक... ’ असा गोंधळलेला भाव होता तिच्या चेहऱ्यावर.

‘तुमचे कितीतरी मैतेई मित्रमैत्रिणी असतील ना... त्यांनी तुम्हाला फोन केला का? विचारपूस केली का?  तुम्हाला काय वाटतं आता त्यांच्याबद्दल?’ करण थापर यांनी विचारलं.

‘येस, फ्रेंड्स आहेत. पण आमचा त्यांच्याशी संपर्क नाही आता... बोलणंही नाही झालं.’ किम म्हणाली. डोक्यावरची जखमही भरून न आलेल्या नॅन्सीला काहीच बोलायचं नव्हतं. ‘त्यांनी एवढा अत्याचार केला आहे. कसं बोलणार आता?’ ती म्हणाली.

मणिपूरमधला तो व्हिडिओ पाहिल्यापासून, त्याबद्दल ऐकल्यापासून आपण सगळेच अस्वस्थ आहोत. या अस्वस्थतेला कशी वाट द्यावी तेच आपल्याला समजत नाहीये. पण अशातच नॅन्सी आणि किमची ही मुलाखत पाहिली आणि थोडा धीर आला.

या दोघी मोठ्या हिंमतीने सगळ्यांसमोर आल्या आणि त्यांनी मणिपूरची कहाणी सांगितली...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

‘त्या’ दोघींचं काय?

मनात विचार आला, या दोघी बोलू तरी शकल्या आपल्याशी पण ‘त्या’ दोघींचं काय... अत्याचार सोसून, धिंड सहन करून, जीव मुठीत धरून जगणं वाट्याला आलं तरी त्याही जगतायतच ना हिंमतीनं...? त्यांचा सोशिक श्वास इथपर्यंत ऐकू येतो आहे मला... अख्खा देश आणि या देशातली संवेदनशील माणसं त्यांच्या कहाणीने हेलावून गेली आहेत... त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहेत... पण अखेर जगावं तर त्यांचं त्यांनाच लागतं आहे!

मणिपूरपमध्ये जे घडतं आहे, त्याबद्दल कुणी कुणाचं सांत्वन करायचं अशी परिस्थिती आहे. महिला, मुलं, माणसं, त्यांची गाईगुरं, झाडं, जंगलं, नद्या, दऱ्याखोरी, डोंगर या सगळ्यांच्या वेदना न संपणाऱ्या आहेत. तरीही मणिपूरला आपलं जगणं सावरावंच लागणार आहे...

इम्फाळला हॉस्पिटलमध्ये जाणार कसं?

करण थापर यांनी आणखी एक मुलाखतींची मालिका केली, ‘‘विमेन फॉर मणिपूर’ नावाची. त्यामध्ये महिला कार्यकर्त्या डॉ. मेरी ग्रेस झो सांगत होत्या, ‘मणिपूर राज्य व्हॅली आणि डोंगराळ भाग असं पूर्ण विभागलं गेलं आहे. व्हॅलीमध्ये राहण्याची कुकींना भीती वाटते आणि डोंगराळ भागात मैतेई राहिलेले नाहीत.

मणिपूरमध्ये सगळी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्स, कॉलेज इम्फाळमध्ये आहेत. डोंगराळ भागातली माणसं इम्फाळमध्ये उपचारांसाठी जाऊ शकत नाहीत. त्यांना जवळच असलेल्या मिझोरम राज्यात जाऊन मग दिल्ली किंवा कोलकाताला जावं लागतं. इंटरनेट बंद होता त्यामुळे कुणाशी संपर्क करणंही अवघड होतं. मुलं कित्येक दिवस शाळेत गेलेली नाहीत. मुळात त्यांचा जीव कसा वाचवायचा हा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर आहे... ’’

कुकी असो की मैतेई... मणिपूरमधल्या हिंसाचारात सुमारे २००हून जास्त माणसांचा बळी गेला आहे. त्याहून अधिक ४००पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रोज अत्याचाराच्या, हिंसाचाराच्या नव्या कहाण्या समोर येतायत. ज्या राज्यात आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही प्रक्षुब्ध जमावाच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागतं आहे तिथे सामान्य माणसांची काय कथा!

हिंसाचार, राजकारण आणि दुभंगलेला समाज हे सगळं सावरायचं कसं? करण थापर यांच्यासारख्या पत्रकारांनी अनेक मुलाखतींमध्ये मैतेई, कुकी आणि नागा समुदायाच्या लोकांना आणि सरकारलाही हे प्रश्न विचारले. त्यातली निकेतू इरालु या नागा जाणकारांची मुलाखत माझ्या लक्षात राहिली. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

नागा गावाची गोष्ट

निकेतू इरालु सांगत होते- ‘‘जेव्हा नागालँडमध्ये बंडखोरी आणि हिंसाचार झाला तेव्हा माझ्याच गावातली २०पेक्षा जास्त माणसं मारली गेली. दोन समुदायांमधली तेढ संपणं अशक्य होतं... पण हळूहळू आम्ही प्रयत्न केले... आम्ही ठरवलं.. आपण मोठे लोक भांडलो, एकमेकांचे जीव घेतले... हे विष मुलांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही.

‘आम्ही गावात शांतता समिती स्थापन केली. एकमेकांनी एकमेकांबद्दल काय केलं आहे याची कबुली दिली. हे पुन्हा होऊ द्यायचं नाही असं ठरवलं आम्ही. आमच्या गावाजवळ सुंदर जंगल होतं. तेही उदध्वस्त झालं होतं. आम्ही तिथे झाडं लावली. परिसर सावरू लागला... हळूहळू आम्ही नवी सुरुवात केली... सावरलो... एकमेकांना समजून घेतलं... पुन्हा उभे राहिलो...”

मणिपूरच्या माणसांनी ठरवलं, तर इथेही हे होऊ शकतं असा विश्वास निकेतू इरालु यांना वाटत होता. खरंच व्हायला हवं असं. मला त्या सुंदर गावाचं, हिरव्यागार जंगलाचं चित्र डोळ्यासमोर दिसू लागलं...

ज्या जंगलांतून आरक्षित वनांच्या नावाखाली आदिवासींना अचानक बाहेर काढलं जातं आहे, ते जंगल तरी सावरणार कसं यातून. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय इथून बाहेर काढलेल्या आदिवासींनी जायचं कुठे? ज्या जंगलांमधून मणिपूरच्या नद्या उगम पावतात, तलावांमध्ये पाणी येतं ते जंगलच उदध्वस्त करून काय मिळणार आहे आपल्याला?

मणिपूरचे डोंगराळ भाग, हे अधिवास वाचले, तरच इथली माणसं जगू शकणार आहेत. तसंच इम्फाळ व्हॅलीला डोंगराळ भागापासून तोडून तुम्ही मणिपूरच्या ऐक्याला बाधा आणू शकत नाही, असं आणखी एक सामाजिक कार्यकर्त्या बिनालक्ष्मी नेप्रम यांचं म्हणणं आहे. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

एक आशेचा किरण...

सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हर्ष मंदर म्हणतात - ‘‘मी चार दिवस मणिपूरचा दौरा करून परतलो. अख्खं मणिपूर युद्धभूमी झालं आहे. लोकांच्या हातात रायफल्स आहेत, बॉम्ब आहेत... लोकांचे जथ्थे सुरक्षित जागा शोधण्यासाठी इथून तिथे निघाले आहेत.

दोन्ही समुदायांची गावंच्या गावं जळून राख झाली आहेत. आम्ही या समुदायांच्या प्रतिनिधींना भेटलो… त्यांच्याशी बोललो, तेव्हा माझं मन एखादा तरी आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न करत होतं… एका समुदायाच्या लोकांनी दुसऱ्या समुदायाच्या लोकांना कशी मदत केली याच गोष्टींमध्ये मला थोडा आशेचा किरण सापडला... पण या उदध्वस्त झालेल्या आणि मनाने पूर्ण कोलमडून गेलेल्या मणिपूरबद्दल आणि आपणच निवडून दिलेल्या दुर्भावनापूर्ण सरकारांबद्दल मी अंत:करणापासून व्यथित झालो आहे...’’

मणिपूरमध्ये यादवी आणि अराजक माजलं आहे. त्यावर सरकारने वेळीच पावलं उचलायला हवीत. तसं केलं नाही, तर मणिपूरचं आणि पर्यायाने ईशान्य भारताचंच मोठं नुकसान होणार आहे, असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांच्या मते, १९८९ साली काश्मीरमध्ये आणि २००२मध्ये गुजरातमध्ये जी परिस्थिती होती, त्याहूनही भीषण परिस्थिती मणिपूरमध्ये आहे. त्याचे पडसाद आसाम, मिझोरम, नागालँडमध्येही उमटू लागले आहेत... 

मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई या समुदायांमध्ये आत्ताच्या घडीला प्रचंड तेढ आहे. तरीही दोन्ही समुदायातली विचारी आणि जाणती माणसं एकमेकांना शांततेनं धीर देतायत. पण सरकारनेच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तर आम्ही काय करायचं? आम्ही खरोखरच ‘भारताचे नागरिक’ आहोत का? असा त्यांचा सवाल कुणालाही अस्वस्थ करेल असाच आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......