मणिपूरमधून येणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ क्लिप्स आतून हादरवून सोडणाऱ्या आहेत. पण आपल्या समाजात अशा एका ‘व्हायरस’चा शिरकाव झाला आहे, ज्यामुळे हिंसाचार, अत्याचार वगैरेंकडे ‘पाहण्या’ची दृष्टी ठरू लागली आहे. ज्यामुळे अमानवी कृत्य ‘कुणी' केलं आहे, यावर आपली प्रतिक्रिया ठरू लागली आहे. ‘आपण' आणि ‘ते’ या मानसिक फाळणीच्या निकषावर सारं काही ठरू पाहत आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा, पक्ष, विचार याआधारे कुठल्या बाजूला उभं राहायचं हे ठरतं आहे. ‘आपल्या’ लोकांनी कुकर्म केलं असेल, तर त्याच्या समर्थनार्थ तर्क लढवत बसायचं, आणि ‘त्यांनी’ केलं असेल, तर मात्र गहजब करायचा. ‘आपण’ आणि ‘ते’च्या व्याख्या परिस्थितीनुसार बदलत राहतात आणि काही लोक हिंसेचं-हिंसाचाराच्या समर्थनाचं विष अंगात भिनवत राहतात.
मणिपूर हे आपल्या दृष्टीने लांबचं राज्य आहे. भौगोलिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही. भौगोलिकदृष्ट्या ते भारताच्या ईशान्य टोकाला म्यानमारला लागून आहे. आपण एकूणच ईशान्य भारताबद्दल अनभिज्ञ असतो. त्या भागाचा इतिहास, संस्कृती, भाषा, सामाजिक गुंतागुंत, राजकारण, राजकीय पक्ष, संघटना, त्यांच्या मागण्या, याबद्दल आपल्याला जवळपास काहीही माहिती नसतं. मग एकेका राज्याबद्दल नेमकी माहिती असण्याचा तर प्रश्नच नाही. मणिपूर म्हटलं की, बहुतेकांची धाव बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या पलीकडे जात नाही. काहींना इरोम शर्मिला यांचं नाव माहीत असू शकतं, पण त्यापलीकडे फक्त अंधारच असतो.
पण तरीही मणिपूरमध्ये काही अघटित घडतं आहे, हे कळलं की, माणसं आधी ते कोण घडवत आहे, हे पाहतात. ‘मरणारे आपले’ आहेत की ‘मारणारे आपले’ आहेत, हे पाहतात. त्यानुसार भूमिका ठरवतात. सर्वच लोक इतके असंवेदनशील नसतात; पण अशा लोकांची संख्या गेल्या काही काळात खूपच वाढली आहे, हे मात्र खरं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जाळपोळ, हाणामाऱ्या आणि जीव घेण्याचं सत्र सुरू झालं, तेव्हा हा ‘दूर’ ईशान्य भारताचा प्रश्न आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण जसजशा बातम्या वाढू लागल्या, तिथल्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल तिथले लोक बोलू लागले आणि मग केंद्र सरकारपर्यंत त्याच्या झळा पोहचू लागल्या, तेव्हा बहुतेकांचं तिकडे लक्ष गेलं. पाठोपाठ अज्ञात शक्ती कामाला लागल्या आणि मणिपूर हिंसाचारामध्ये आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत, हे पसरवायला सुरुवात झाली. हे (अ)विचारकण ग्रहण करण्यास समाजातले अनेक मेंदू उत्सुक होतेच.
मग त्यानुसार मणिपूरमधील मैतेई लोक आपले मानले गेले आणि कुकी-नागा लोक परके मानले गेले. मैतेईंचं सगळं बरोबर आणि कुकींचं सगळं चुकीचं असंही ठरलं. मैतेई हिंदू आहेत आणि कुकी ख्रिश्चन आहेत, असा शोध लावला गेला. मणिपूरचे मुख्यमंत्री मैतेई समाजातील आहेत आणि ते भाजपचे आहेत, हे कळल्यानंतर आपल्याकडील फाळणी आणखी स्पष्ट झाली. भूमिका आणखी तीक्ष्ण होऊ लागल्या. भाजपविरोधकांनाही भाजप विरोधाचं नवं हत्यार मिळाल्यासारखं झालं.
मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ही ‘आपपरभावी’ वृत्ती त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे. कोणत्याही घटनेचे विविध कंगोरे आणि पदर तपासून न पाहता त्याकडे ‘आपले’ आणि ‘परके’ याच चष्म्यातून पाहणं समाज म्हणून केवळ धोक्याचं आहे. त्यातून न्यायाची संकल्पनाच बाद होते. मणिपूरमध्ये राज्यकर्ते कोण आहेत, हे पाहून आपण नग्न धिंड काढल्या गेलेल्या तरुणींचा न्याय करणार असू, तर माणूस म्हणून आपण जगण्यास लायक नाही.
सत्तेवर पक्ष कोणताही असो, नेता कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, तो राज्यघटनेच्या चौकटीत काम करतो की नाही, जनतेला समान न्याय, संधी, अधिकार देतो की नाही, हे महत्त्वाचं. जो नेता ही किमान अपेक्षा पूर्ण करत नसेल, तो नेता कोणत्याही पक्षाचा, विचाराचा, धर्माचा, प्रांताचा, भाषेचा असो; तो नाकारला जायला हवा.
पण अशा घटना घडल्या/घडवल्या गेल्या की, राजकीय पक्ष आणि त्यांच्या तैनाती फौजा उखाळ्यापाखाळ्या काढतात. जुने दाखले देऊन आपल्या कुकर्मावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. भाजपवाले काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढतात आणि काँग्रेसवाले भाजपच्या. पक्षांची ही लढाई एका पातळीवर ‘फेस सेव्हिंग’ची असते. लोक या लढाईकडे तटस्थपणे पाहून निर्णय घेणार असतील, तर त्यांचा पक्षावर वचक राहू शकतो. पण हल्ली लोकही पक्षांच्या तैनाती फौजांचे भागीदार बनले आहेत. त्यामुळे चूक झाली, घोडचूक झाली, तरी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना जनमत दुरावण्याची भीती राहिलेली नाही. संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने ही खचितच धोक्याची घडामोड आहे.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...
मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?
मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!
.................................................................................................................................................................
मणिपूरमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे आणि दोन गटांमध्ये संघर्ष घडतो आहे, त्याबद्दलच्या ‘बेसिक फॅक्ट्स’ बघितल्या, तर ‘आपले-परके’ करण्यातले धोके कदाचित कळू शकतील.
ईशान्य भारतात स्वातंत्र्यावेळी तीन प्रांत होते. आसाम, मणिपूर आणि त्रिपुरा. पुढे १९६३ ते १९८७ या काळात आसामपासून नागालँड, मेघालय, अरुणाचल आणि मिझोराम ही राज्यं तयार झाली. स्वातंत्र्यापूर्वी मणिपूर हे स्वतंत्र संस्थान होतं. स्वातंत्र्यानंतर ते भारतात सामील झालं. त्याला आधी केंद्रशासित आणि मग राज्याचा दर्जा मिळाला. मणिपूरच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी राज्यात दीर्घकाळ संघर्षही झाला.
या प्रांताचा इतिहास ईशान्य भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच गुंतागुंतीचा आहे. ब्रिटिश काळात म्यानमार आणि भारत या सीमारेषा निश्चित नव्हत्या. त्यातून ही गुंतागुंत तयार झाली आहे. पारंपरिकरित्या मणिपुरी ही लढवय्या जमात आहे. इतिहासात त्यांची सत्ता पार म्यानमारपर्यंत पोहोचली होती. एवढंच काय, चीनच्या सम्राटाचं आक्रमण परतवून लावणारा राजा मणिपूरला लाभला होता.
पुढे कौटुंबिक सत्तासंघर्षात एका गटाचा बंगालमधील मुस्लीम शासकासोबत संबंध आला. त्या शासकाचे मुस्लीम सैनिक मैतेई राज्यासाठी लढले. या घटनेमुळे मुस्लीम धर्माचा इकडे शिरकाव झाला. त्यातून मैतेईंमध्ये पांगल मुस्लीम हा गट तयार झाला. एका अर्थी मैतेई प्रदेशाबाहेरून आलेले हे लोक मैतेईंमध्ये मिसळून गेले. या घडामोडीमुळे मूळ मणिपुरी समाजात मुस्लीम समाजाविषयी वैरभाव निर्माण होऊ शकला नाही.
मणिपूरच्या मैतेई राजांनी १७१४मध्ये वैष्णव पंथ स्वीकारला, पण जनतेपैकी काही मूळच्या सनामाही धर्मातच राहिले. त्यांची संख्या साधारण आठ टक्के आहे. त्यांचे देव, देवळं, पूजाविधी हे वैष्णव पंथीयापेक्षा वेगळे आहेत. मात्र हे दोन्ही समाज एकमेकांसोबत राहत आले आहेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
मणिपूरची लोकसंख्या जेमतेम ३३ लाख, पण त्यात ३० समाजगटांचं वास्तव्य आहे. त्यातील मैतेई समाजाची संख्या ५३ टक्के आहे. मणिपूरमध्ये पूर्वापार मैतेई राजांचं राज्य राहिल्यामुळे हा समाज आर्थिक-सामाजिक सुस्थितीत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांचं प्राबल्य आहे. या उलट कुकी आणि नागा या अन्य दोन मोठ्या जमातींची संख्या साधारण ४३ टक्के आहे. हे समाज प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीय असून अनुसूचित जमाती या प्रवर्गात येतात. मैतेई यांना दुय्यम स्थान देतात, असं त्यांचं दु:ख आहे. पूर्वी यांच्याबाबतीत अस्पृश्यताही पाळली जात असे, असं म्हटलं जातं.
मैतेई लोक हे वैष्णवपंथीय असले, तरी त्यांच्यात जातींचं स्तरीकरण आहे. सवर्ण, अन्य मागास, मागास असं सारं काही त्यात आहे, मैतेई समाजातून ख्रिश्चन धर्मातही प्रवेश झालेले आहेत. हे धर्मांतर मैतेईंमधील उच्च वर्णीयांमधून झालेलं नसून निम्न जातींमधून झालेलं आहे.
मैतेई लोक प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यातील सपाट प्रदेशात राहतात, तर कुकी-नागा लोक हिमालयातील पर्वत रांगांवर राहतात. तिथे जमेल तशी शेती करून गुजराण करतात. मैतेईच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या हा वर्ग दुर्बळ आहे. भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या भागात या समाजाचं वास्तव्य असल्याने त्यांच्यात आजवर मोठे संघर्ष घडले नव्हते.
पण गेल्या काही वर्षांत आपलीही अनुसूचित जमाती या प्रवर्गात नोंद करून घ्यावी, अशी मागणी मैतेई समाजातील संघटना करू लागल्यानंतर मैतेई व कुकी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मैतेईं पैसापाणी बाळगून असल्याने त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिला, तर ते पर्वतीय क्षेत्रातील जमिनी विकत घेऊ लागतील आणि कुकी लोकांच्या जगण्यावर आक्रमण होईल, अशी भीती कुकींना वाटू लागली आहे.
मणिपूरमध्ये मैतेई समाजातील आमदारांची संख्या जास्त आहे. (एकूणात ६० टक्के.) मुख्यमंत्रीही त्याच समाजाचा आहे. त्यांच्याच पक्षाचं सरकार दिल्लीतही आहे. त्यामुळे मैतेईंच्या बाजूने निर्णय होईल, अशी भीती कुकींमध्ये तयार झाली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंग (जे २००२ ते २०१६ काँग्रेसमध्ये होते) यांनीही मैतेईंना अनुकूल भूमिका घेतली आहे.
शिवाय मणिपूरमध्ये होणारी अफूची लागवड आणि म्यानमारमधून येणारे अंमली पदार्थ यावर त्यांनी जोरदार कारवाई चालवली आहे. या कारवाईअंतर्गत कुकी लोकांना फसवण्यात येत आहे, असं कुकींचं म्हणणं आहे. यावर ‘जे कोण या अवैध धंद्यात सामील असतील, त्यांच्यावर कारवाई करणारच’, असं जाहीर केल्याने कुकींमधील संबंधित घटक पिसाळले आहेत. त्यातून या प्रकरणाला मैतेई विरुद्ध कुकी असा संदर्भ मिळाला आहे. हितसंबंधी लोक त्याला हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असंही रूप देऊ पाहत आहेत. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्याच्या हिंसाचारात चर्चेस आणि देवळांची तोडफोड झाली आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मैतेईंच्या वाढत्या प्रभावामुळे कुकी लोकांच्या संघटनांनी स्वतंत्र राज्याची मागणी रेटायला सुरुवात केली आहे. त्याला अर्थातच मैतेई संघटनांचा विरोध आहे. दोन्हीकडच्या संघटना या हिंसक स्वरूपाच्या आहेत. मणिपूरवर याच संघटनांचं अप्रत्यक्ष राज्य चालतं, असं त्यात होरपळणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. कुकींना आपल्यावर अन्याय होतो आहे, असं वाटत असेल तर त्यांनी राज्यातून निघून जावं, असं मैतेई संघटनांचं म्हणणं आहे.
खरं पाहता, मणिपूरवर पूर्वापार मैतेईंचं राज्य असलं, तरी कुकीही इथलेच आहेत. ते कुणी बाहेरून आलेले नाहीत. कुकी म्यानमारमधून आले आहेत, असा एक दावा केला जातो. पण इतिहासात आपण जसजसे मागे जातो, तसतशी या भागातील गुंतागुंत कळत जाते. म्यानमार आणि भारत यांच्या सीमारेषा ब्रिटिश काळात स्पष्ट झाल्या. तोपर्यंत एकमेकांवर आक्रमणं चालू होती आणि त्यातून माणसांचा वावर घडत होता. त्यामुळे कोण स्थानिक, कोण बाहेरचे, हा वाद फिजूल आहे.
१९४७मध्ये जो भारत आपल्याला मिळाला, त्याचे प्रश्न सोडवणं ही आपली भूमिका असायला हवी. पण तसं न करता ‘आपले-परके’ या नजरेतून पाहण्यातच काही लोक धन्यता मानत आहेत. या नजरेतून आपण इतिहास पाहू लागलो, तर शतखंडित भारताचं भयानक चित्रं आपल्याला दिसू लागेल.
मणिपूरमधील प्रश्न हा काही फार जगावेगळा आणि न सुटणारा नाही. ईशान्य भारतातील जमातींच्या संघर्षाचा गुंता सोडवण्याचा प्रदीर्घ अनुभव भारत सरकारला आहे. अशा प्रयत्नांतूनच नागालँड, मिझोराम वगैरे प्रदेशात तुलनेनं शांतता प्रस्थापित झालेली आहे. परंतु मे महिन्यात मणिपूरमध्ये उद्रेक झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पोलिसांची शस्त्रं पळवून नेली जात असतानाही त्यावर कारवाई झाली नाही. गृहमंत्र्यांनी दौरा करूनही राज्यात शांतता निर्माण झाली नाही.
आजवर या संघर्षांत दीडशेहून अधिक माणसं मारली गेली आहेत. ६० हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. गावं-खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. मुलीबाळींवर घोर अत्याचार झाले आहेत. तरीही केंद्र सरकारने ना राज्य सरकारला दम भरला आहे, ना कुठली कारवाई केली आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
आजघडीला या राज्यात लष्करी, निमलष्करी आणि पोलीस दलाचे मिळून ४० हजार सैनिक तैनात आहेत म्हणे. तरीही मणिपूरमधला उद्रेक शांत होऊ शकलेला नाही. याचा अर्थ, राज्याची कायदेव्यवस्था राज्य सरकारच्या ताब्यात राहिलेली नाही, किंवा यंत्रणेने त्यांना खुली सूट दिलेली आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावून केंद्राने कारभार हातात घ्यावा, अशी मागणी होत आहे.
मणिपूरमधील संघर्षाचे पडसाद आता शेजारच्या मिझोराम राज्यातही पडू लागले आहेत. मिझोराममध्ये राहत असलेल्या मैतेई लोकांनी मणिपूरमध्ये जावं, असं धमकीवजा आवाहन मिझो उग्रवादी संघटनांनी केलं आहे. त्यानुसार शेकडो लोक आपापली राहती घरं सोडून इम्फाळ खोऱ्यात परतू लागले आहेत. राज्यांची जमातीनुसार फेरविभागणी ही ईशान्य भारतातील दुखरी नस आहे. ती पुन्हा दाबली गेली, तर तिथली परिस्थिती हाताळणं अवघड होणार आहे.
मिझोराममध्ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ची भाजपच्या सोबतीने सत्ता आहे. तिथले मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी कुकी लोकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. मणिपूरमधील कुकी विस्थापितांना ते आपल्या राज्यात आश्रयही देत आहेत. झोरमथांगा हे झो/झोमी जमातीचे आहेत आणि ही जमात ख्रिश्चन आहे.
कुकी आणि झोमी या जमाती वांशिकदृष्ट्या बंधुत्वाचं नातं सांगणाऱ्या आहेत. याचा अर्थ ईशान्येत पक्ष आणि युती-आघाडीपेक्षा वांशिक जवळीक प्रबळ ठरते. मणिपूरमधील प्रश्न चिघळला, तर मिझोरामच्या पाठिंब्याने कुकीलँडची मागणी जोर धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ईशान्य भारतात या आधीच ‘ग्रेटर नागालिम’ची मागणी रेटली जात आहे. आसाम, अरुणाचल, मणिपूर या राज्यांतील नागा लोकांच्या वास्तव्याचा भूभाग नागालँडला जोडून देण्याची ही मागणी आहे. मणिपूरच्या आर्थिक संघर्षाला वांशिक रूप मिळू दिलं, तर ईशान्येतील प्रश्नात आणखी एक धोकादायक वळण मिळण्याची भीती आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
एनएससीएन या ईशान्य भारतातील सर्वात खुंखार संघटनेनेही आता मणिपूरमधील संघर्षात उडी घेतली आहे, ही धोक्याची आणखी एक सूचना आहे. (मैतेई हिंदू आणि नागा ख्रिश्चन असूनही) मैतेई लोक नागा लोकांना स्वतःसारखंच स्थानिक समजतात, पण नागांच्या या संघटनेने स्त्रियांच्या नग्न धिंडीबद्दल कडक निषेध नोंदवला आहे. मणिपूरमधील संघर्षात इशान्येतील अन्य राज्यांतील संघटना उतरू लागल्या, तर तिकडची गुंतागुंत आणखी चिघळू शकते.
मणिपूरसह मेघालयातही भाजपचा साथीदार असलेल्या ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ने भाजपच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली आहे. हा पक्ष गारो जमातीचं प्रतिनिधित्व करतो. ही जमात प्रामुख्याने ख्रिश्चनच आहे. मणिपूरमधील संघर्षाला हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असं रूप आलं, तर ईशान्येतील धार्मिक वातावरण ढवळून निघण्याचीही भीती आहे.
हे सगळं पाहिल्यानंतर आपण आपापल्या घरात बसून मणिपूरचा प्रश्न ‘आपण’ आणि ‘ते’ या सूत्रानुसार सोडवू शकू, असं अजूनही वाटतं का?
.................................................................................................................................................................
लेखक सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिकाचे आणि ‘समकालीन प्रकाशना’चे मुख्य संपादक आहेत.
samakaleensuhas@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment