ख्रिस्तोफर नोलन या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ‘ओपेनहायमर’ हा नवाकोरा सिनेमा २१ जुलै २०२३ रोजी जगभर प्रदर्शित झाला आहे. नोलनच्या सिनेमाची चर्चा होते, कौतुक होते आणि त्यावर बख्खळ लिहिलंही जातं. या वेळचा सिनेमा तर अमेरिकन शास्त्रज्ञ ओपेनहायमरवरच आहे. ते अमेरिकी अणुबॉम्बचे जनक. पण अमेरिकेतल्या हिणकस राजकारणाचा ते बळी ठरले. त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले गेले. आपल्या शत्रूला ‘द्रेशद्रोही’ ठरवून देशोधडीला लावणारी ही अमेरिकरण राज्यकर्त्यांची करणी म्हणजे ‘मॅकार्थिझम’. त्याची सविस्तर ओळख करून देणारे पुस्तक पत्रकार आणि ‘प्रोपगंडा’ आणि ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक रवि आमले लिहीत आहे. त्याचे नाव आहे- ‘मॅकार्थीचे भूत’. या आगामी पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश....
..................................................................................................................................................................
प्रचंड असत्य, अपमाहिती, खोटे आरोप यांची राळ उडवायची. समोरील व्यक्तीचे चारित्र्यहनन करायचे. त्यास ‘देशद्रोही’ ठरवायचे, हे एकीकडे आणि दुसरीकडे समाजासमोर सातत्याने एक शत्रू उभा करायचा. त्याच्यापासून आपल्याला, राष्ट्राला, धर्माला धोका आहे, असे सांगत द्वेष आणि भय यांचे वातावरण उभे करायचे. त्यातून तयार होणाऱ्या भयग्रस्त, हिंस्त्र, उन्मादी झुंडींद्वारे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करायचे... हा ‘मॅकार्थिझम’!
जोसेफ मॅकार्थी हे काही त्याचे निर्माते नव्हेत. दोन्ही महायुद्धांच्या आगेमागे अमेरिकी समाजात असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते. ‘रेड स्केअर’ म्हणतात त्याला. ती तेथील तेव्हाच्या सनातनी परंपरावाद्यांची, अतिरेकी धर्मवाद्यांची आणि या दोन्हींच्या पाठीवर बसून चाललेल्या भांडवलवाद्यांची करणी.
सिनेटर मॅकार्थी हा पुढच्या काळात त्याचा चेहरा बनले. तो चेहरा एवढा विद्रूप होता की, हे सारे त्यांच्याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी फुंकलेल्या भय आणि विद्वेषाच्या विखारामुळे तेथील अमेरिकी नागरिकांचा एक मोठा वर्ग प्रचंड हिंस्र झाला. विवेक, तर्क हे सारे हरवूनच गेले. अशा झुंडीला साधे नाराज करणे हेही सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या धाडसाचेच. ते करायला जावे, तर त्यात आपलाच बळी जाण्याची शक्यता अधिक. या दहशतीने, इतरांचे सोडा, अमेरिकेतील सर्वात शक्तीशाली असे ज्यांना मानले जाते त्या राष्ट्राध्यक्षांनाही ग्रासले होते.
अन्यथा रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांना जे भोगावे लागले ते घडतेच ना.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
ओपेनहायमर ही काही साधी आसामी नव्हती. अमेरिकी अणुबॉम्बचे जनक होते ते. ज्या मॅनहटन प्रोजेक्टद्वारे हा बॉम्ब तयार करण्यात आला, त्या प्रकल्पाचे ते प्रमुख. लॉस ॲलमॉस प्रयोगशाळेत हा बॉम्ब तयार करण्यात आला. तिची उभारणी ओपेनहायमर यांच्याच देखरेखीखाली झाली होती. या प्रकल्पासाठी हवा असलेले प्रज्ञावंत वैज्ञानिकांचा, प्रतिभाशाली तंत्रज्ञांचा गट त्यांनीच तयार केला होता. युद्धानंतर अणुऊर्जा आयोगाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती त्यांची.
अशा व्यक्तीवर पुढे देशद्रोहाचे आरोप झाले. ते ‘रशियाचे एजंट’ असल्याचे म्हटले गेले. अणुबॉम्ब निर्मितीची अनेक गुपिते ज्यांनी जन्माला घातली, तो हा वैज्ञानिक राष्ट्रीय गुपिते धारण करण्याच्या लायकीचा नाही, असा शिक्का मारण्यात आला त्यांच्यावर. ही राष्ट्रीय कृतघ्नताच. भयगंड आणि विद्वेषाच्या राजकारणातून जन्मास आलेली कृतघ्नता.
ओपेनहायमर यांची डाव्या विचारसरणीशी जवळीक होती. ते त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. ते लपवण्याची आवश्यकताही नव्हती. डावे असणे हे काही पाप नव्हते, गुन्हा नव्हता. अनेक कम्युनिस्टांशी त्यांची मैत्री होती. त्यांचा धाकटा भाऊ फ्रँक हा कम्युनिस्ट होता. १९३७मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत शिकत असताना तो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाला होता. पुढे चार वर्षांनी, १९४१मध्ये त्याने पक्षसदस्यत्व सोडले होता भाग वेगळा.
ओपेनहायमर यांच्या पत्नी कॅथरिन यासुद्धा काही काळ कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य होत्या. कॅथरिन यांचे हे दुसरे लग्न. त्यांचा पती - जो डॅलेट हा स्पेनमधील कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य. तेथील यादवी युद्धात तो मारला गेला. त्यानंतर कॅथरिन यांनी आयसेनहॉवर यांच्याशी विवाह केला. पण पुढे त्यांचाही कम्युनिस्ट पक्षाबाबत भ्रमनिरास झाला आणि त्या पक्षापासून दूर गेल्या.
असे सगळे असले, तरी ओपेनहायमर हे कधीही कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नव्हते. आपण केवळ त्यांचे ‘सहप्रवासी’ होतो, असे ते सांगतात. सहप्रवासी म्हणजे त्यांना साम्यवादी विचारधारा आवडत होती. मात्र पक्षाचे सदस्य बनून आपली बुद्धी पक्षाच्या पायाशी वाहण्याची त्यांची इच्छा नव्हती.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
१९४१-४२मध्ये आयसेनहॉवर यांच्या घरी कम्युनिस्टांचे ‘डेली पीपल्स वर्ल्ड’ हे दैनिक येत होते. हा सहप्रवास, ही कम्युनिस्टांशी मैत्री त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या आड नाही आली. ते कम्युनिस्टांचे सहप्रवासी होते, ‘अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या जवळ जवळ सगळ्याच छुप्या कम्युनिस्ट संघटनांशी आपला संबंध आहे’, असे त्यांनी मॅनहटन प्रकल्पासाठी भरून घेण्यात आलेल्या प्रश्नावलीत नोंदवले होते आणि तरीही या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्याच वेळी जे. एडगर हूव्हर यांची एफबीआय त्यांच्यावर पाळत ठेवून होती.
ते डावे असतानाही अणुबॉम्ब निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ते डावे आहेत म्हणून त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे मानून त्यांच्यावर नजर ठेवली जात होती, हे सारे प्रचंड विसंगत. पण विवेकाला रजा दिली की, त्यातून अशा विसंगतीच निर्माण होतात.
१९४५मध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाला. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांची राखरांगोळी झाली. दुसरे महायुद्ध संपले. आणि अमेरिकेच्या विजयाचे एक नायक ओपेनहायमर हेही ठरले. तेव्हा एक एफबीआय आणि त्यांचे काही शत्रू वगळता कोणालाही त्यांच्या डावेपणाची आठवण नव्हती.
ओपेनहायमर हे काही अजातशत्रू नव्हते. त्यांचे वागणे सरदारी थाटाचे. जीभ जरा अधिकच तिखट. तशात ते प्रसिद्धीचे धनी. परिणामी वैज्ञानिक वर्तुळातही त्यांचा दुस्वास करणारे काही जण होते. या सगळ्यांना ओपेनहायमर यांचे उट्टे काढण्याची संधी लौकरच मिळाली.
१९४९मध्ये सोव्हिएत रशियाने अणुस्फोट चाचणी करून सगळ्या जगालाच धक्का दिला. रशिया अणुबॉम्ब बनवत असल्याची खबर अमेरिकेला होती, पण तो इतक्या झटपट बनवला जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. ते घडले, याचे कारण अणुबॉम्बचे रहस्य काही अमेरिकी गद्दारांनीच रशियाला दिले, अशी लोकभावना निर्माण झाली होती. त्यात तथ्यही होते. आणि त्यामुळे कम्युनिस्ट विरोधाला अधिकच धार आली.
अमेरिकेतील फितूर वेचून वेचून काढण्याची स्पर्धाच सुरू झाली. त्याच वेळी सरकारी, लष्करी वर्तुळात वेगळ्याच स्पर्धेचा विचार सुरू झाला होता. तो होता - स्टॅलिनच्या रशियाने बनवलेल्या बॉम्बच्या श्रीमुखात मारील, असा महाबॉम्ब तयार करण्याचा. हजारो अणुबॉम्बपेक्षा अधिक संहारक्षमता असलेला बॉम्ब - हायड्रोजन बॉम्ब - आपण बनवावा काय, अशी विचारणा राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्या विशेष सल्लागार गटाने ओपेनहायमर यांच्या सल्लागार समितीकडे केली.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
...............................................................................................................................................................
याला पर्याय होता, रशियाशी चर्चा करून अणुबॉम्बस्पर्धा थांबण्याचा. यातील कोणता पर्याय निवडावा? ओपेनहायमर आणि त्यांच्या समितीतील अनेकांचा अणुबॉम्ब निर्मितीत सहभाग होता. त्याने केलेला विनाश त्यांनी पाहिलेला होता. या समितीने एकमताने निर्णय दिला, हायड्रोजन बॉम्ब बनवू नये. या निर्णयाचा मसुदा लिहिला होता ओपेनहायमर यांनी.
शस्त्रनिर्मितीकडे सामान्य जनता नेहमीच राष्ट्रप्रेमळ नजरेने पाहात असते. अमेरिकेतील ‘मिलिट्री-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स’ ही संकल्पना ज्यांना किमान माहीत आहे, त्यांना हे सांगायला नको की, यात राष्ट्रहित वगैरे गोष्टींच्या वर असते ते अर्थकारण. त्यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध दडलेले असतात आणि काहींचे राजकीय. हायड्रोजन बॉम्ब निर्मितीला ओपेनहायमर यांचा विरोध आहे, एवढेच नव्हे, तर अमेरिका आणि रशिया यांच्यात शस्त्रस्पर्धा सुरू होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, म्हटल्यावर असे लोक संतापणे स्वाभाविकच होते.
तसेच झाले. त्यांना सामील झाले ओपेनहायमर यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील काही शत्रू. ते फार नव्हते, पण होते ते वरिष्ठ पदांवर होते. लेविस स्ट्रॉस हे त्यातलेच एक. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. त्यांनी ओपेनहायमर यांच्या विरोधात आता आघाडी उघडली. त्यांना साथ मिळाली विल्यम एल. बॉर्डन यांची.
बॉर्डन हे एक तरुण वकील. कनेक्टिकटचे सिनेटर ब्राएन मॅकमोहन यांच्याशी त्यांचे घरगुती संबंध होते. मॅकमोहन यांच्याकडे जेव्हा अणुऊर्जाविषयक संयुक्त समितीचे अध्यक्षपद आले तेव्हा त्यांनी बॉर्डन यांना समितीवर नेमले. कार्यकारी अध्यक्षपद दिले. बॉर्डन हे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब - ‘सुपर’ म्हणत त्याला - बनवावा या मताचे होते. म्हणून त्यांचा ओपेनहायमर यांना विरोध. ते खोटारडे आहेत, उगाच घबराट पसरवत आहेत, असे बॉर्डन यांचे म्हणणे.
पुढे १९५०मध्ये ट्रुमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनविण्यास हिरवा कंदील दाखवला, त्याचे काम सुरू झाले, तरी ओपेनहायमर आणि त्यांच्या समविचारी वैज्ञानिकांचा विरोध कायमच होता. दरम्यानच्या काळात बॉर्डन यांना अणुऊर्जा समितीतून बाहेर पडावे लागले होते. लेविस स्ट्रॉस यांनी त्याचा फायदा घेतला. बॉर्डन यांनी ओपेनहायमर यांच्याविरोधात एफबीआयला पत्र लिहावे असे त्यांनी सुचवले आणि बॉर्डन यांनी आजवर कोणीही जे करू धजावले नव्हते, ते केले. जे. एडगर हूव्हर यांना ७ नोव्हेंबर १९५३ रोजी पाठवलेल्या त्या पत्रात त्यांनी ओपेनहायमर यांच्या राष्ट्रनिष्ठेवरच शंका उपस्थित केली.
‘‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे बहुतकरून सोव्हिएट संघराज्याचे एजंट आहेत. उपलब्ध गोपनीय पुराव्यांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून, सर्वांगिण विचार करून माझे हे मत बनले आहे…’’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
कोणतेही पुरावे नाहीत, सारे आरोप मोघम. केवळ चारित्र्यहनन. पण हेच तर ‘मॅकार्थिझम’चे तंत्र. बॉर्डन यांनी हे पत्र अणुऊर्जा आयोग आणि व्हाईट हाऊसलाही पाठवले. तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते आयसेनहॉवर. त्यांनी महिनाभरात ओपेनहायमर यांच्या हाती राष्ट्रीय गोपनीय माहिती पडणार नाही याची व्यवस्था केली.
तो होता १९५३चा डिसेंबर महिना. तेव्हा ओपेनहायमर युरोप दौऱ्यावर गेले होते. तिकडून ते परतले डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात. तोवर अणुऊर्जा आयोगाने त्यांचा ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ निलंबित केला होता. एखादी व्यक्तीपासून सुरक्षेला, गोपनीय माहितीला कसलाही धोका नसल्याचे हे प्रमाणपत्र. २१ डिसेंबर १९५३ रोजी आयोगाचे अध्यक्ष लेविस स्ट्रॉस आणि सरव्यवस्थापक केनेथ डी निकोल्स यांनी ओपेनहायमर यांची भेट घेऊन, त्यांना या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्यावर आयोगाने ठेवलेले आरोपपत्र दिले. दोन पर्याय ठेवण्यात आले होते त्यांच्यासमोर.
एक तर या निर्णयाला आव्हान द्या. आव्हान दिल्यास अर्थातच त्यावरची सुनावणी होईल. किंवा मग आयोगाचे सल्लागारपद सोडा आणि सुनावणी टाळा. जे काही ठरवायचे असेल, ते एका दिवसात ठरवा, असेही स्ट्रॉस आणि निकोल्स यांनी बजावले. मोठा धक्का होता तो ओपेनहायमर यांच्यासाठी.
‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ निलंबित होणे, याचा अर्थ आपण विश्वासार्ह नाही. आपल्याजवळ गोपनीय माहिती सुरक्षित राहू शकत नाही. आपण शत्रूराष्ट्राला ती माहिती देऊ, असा संशय आहे. ज्यांनी अणुबॉम्बची गुपिते जपलीच नव्हे, तर त्यातील काही गुपिते जन्मासही घातली, अशा व्यक्तीवर संशय घेतला जावा? ओपेनहायमर यांना ते सहन होणे शक्यच नव्हते. हा डाग धुवून काढावाच लागेल. त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरवले.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
समान नागरी कायदा : आगामी निवडणुकांसाठी ध्रुवीकरणाकरता नवा पण राखलेला पत्ता
.................................................................................................................................................................
पण आयसेनहॉवर वा त्यांच्या सल्लागारांना खरेच असे वाटत होते का, की ओपेनहायमर यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो? खरे तर आयसेनहॉवर यांना त्याची चिंता नव्हतीच. पण मग त्यांनी अशी कारवाई होऊ कशी दिली?
ती होऊ दिली, याच्या मागे होते मॅकार्थी यांचे भय.
मॅकार्थिझमने सर्वोच्च सत्ताधाऱ्यांच्या मनातही कशी दहशत निर्माण केली होती, याचा एक उत्तम नमुना म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे पाहता येईल. त्यासाठी याचा घटनाक्रम लक्षात घ्यावा लागेल.
ओपेनहायमर यांचा डावीकडे असलेला कल लपून राहिलेला नव्हता. त्यांची कम्युनिस्ट मैत्री सर्वांनाच माहीत होती. तशात त्यांनी हायड्रोजन बॉम्बला विरोध केला होता. शस्त्रस्पर्धेच्या विरोधात होते ते. त्यामुळे ते मॅकार्थी यांचे लक्ष्य बनले नसते तर नवलच. ओपेनहायमर यांची चौकशी करण्यास मॅकार्थी यांचे हात सळसळतच होते.
१९ मे १९५३ रोजी ते आणि त्यांचे सहकारी रॉय कोहन (हे पुढे डोनाल्ड ट्रम्प यांचे खास मार्गदर्शक झाले.) यांनी एफबीआयचे संचालक हूव्हर यांची भेट घेतली. ओपेनहायमर यांची चौकशी आम्ही सुरू केली, त्यांची सुनावणी घेतली, तर…? त्यांनी हूव्हर यांना विचारले. त्यावर हूव्हर म्हणाले, ‘तुम्ही या भानगडीत अजिबात पडू नका’.
हूव्हर यांना काळजी होती ती वेगळीच. एफबीआय ओपेनहायमर यांच्या मागे होतीच. मॅकार्थी यात पडले, तर एफबीआयच्या सगळ्या चौकशीचा फज्जा उडेल. मॅकार्थी यांना चिखलफेक करण्यात, अतिशयोक्तीत, किंबहुना ‘ठोकून देतो ऐसा जे’ स्वरूपाचे आरोप करण्याची सवय. त्याचा परिणाम एफबीआयच्या चौकशीवर झाला असता. त्यातली हवाच निघून गेली असती. शिवाय मॅकार्थींच्या चौकशीमुळे देशभरातील वैज्ञानिक मंडळी संतापली असती, ते वेगळेच. हूव्हर यांनी म्हणूनच मॅकार्थी यांना ओपेनहायमर यांच्या फंदात न पडण्याचा सल्ला दिला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
पण मॅकार्थी अजूनही मागे हटलेले नव्हते. जून महिन्यात खुद्द लेविस स्ट्रॉस यांनी मॅकार्थींनी चौकशी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यावरून हेच दिसते. त्या वेळी काही वरिष्ठ रिपब्लिकन नेत्यांना स्ट्रॉस यांनी सांगितले होते की, मॅकार्थींनी ओपेनहायमर यांची चौकशी सुरू केली, तर ती केवळ ‘मूर्खपणाची आणि अशिष्टपणाची कृती’ ठरेल.
हे सारे जून १९५३ पर्यंत चाललेले होते. पण पुढे नोव्हेंबरमध्ये बॉर्डन यांनी एफबीआय, अणुऊर्जा आयोग आणि व्हाईट हाऊसला पत्र पाठवून, ओपेनहायमर हे ‘रशियाचे एजंट’ असल्याचा संशय व्यक्त केला आणि सारीच हवा फिरली. बॉर्डन यांचे पत्र प्रशासनातील अनेकांच्या हातात पोचले होते. ते मॅकार्थींपर्यंत पोचणारच होते. अशा परिस्थितीत आपण ओपेनहायमर यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यास मॅकार्थी यांच्या हातात कोलीतच पडेल. ते थेट आपल्यावरच हल्ला चढवतील, अशी भीती राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांना होती. ती किती खरी होती, ते पुढे एप्रिल १९५४ मध्ये दिसलेच.
हायड्रोजन बॉम्ब निर्मितीला उशीर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना मॅकार्थी म्हणाले, ‘‘मी याची चौकशी करत नाही, कारण प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केले आहे, की ते या प्रकरणाच्या खोलात जाणार आहेत.’’
सोमवार, १२ एप्रिल १९५४ रोजी अणुऊर्जा आयोगासमोर ओपेनहायमर यांची चौकशी सुरू झाली. ओढूनताणून काढलेले निष्कर्ष, चिखलफेक, अर्धसत्ये, एखाद्या घटनेचे सोयीस्कर अर्थ लावणे, अशा अनेक गोष्टी त्यात पाहावयास मिळाल्या. यात ओपेनहायमर हे दोषी ठरणारच होते. त्यांचा ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ रद्द करण्यात आला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
तब्बल ६० वर्षांनंतर, २०१४मध्ये या सुनावणीचे कोणत्याही सेन्सॉरशिपशिवायचे पूर्ण अहवाल जेव्हा प्रसिद्ध करण्यात आले, तेव्हा अवघ्या जगास हे समजले की, ओपेनहायमर यांच्यापासून अमेरिकेच्या सुरक्षेला केव्हाही धोका नव्हता. ते कधीही रशियाचे हेर नव्हते. १९९६मध्ये ब्रिटनचे नागरिकत्व पत्करलेले माजी केजीबी हेर अलेक्झांडर व्हॅसिलेव्ह यांच्याकडील कागदपत्रांतूनही त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांना फितवण्याचे अनेक प्रयत्न रशियाने केले होते. पण ते अखेरपर्यंत अमेरिकानिष्ठच राहिले.
ते कम्युनिस्टांचे सहप्रवासी जरूर होते, पण कम्युनिस्ट असणे वा त्या विचारधारेशी जवळीक असणे याचा अर्थ ती व्यक्ती देशद्रोहीच असते असा लावणे, यास मूर्खपणा म्हणतात. ओपेनहायमर ‘देशद्रोही’ नव्हते. पण त्या ‘मॅकार्थिझम-ग्रस्त’ वातावरणाने त्यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले. त्यात सामान्य जनताही वाहवत गेली. ती बिचारी काय करणार? ओपेनहायमर यांच्याविरोधात जनमत निर्माण करण्यासाठी आयसेनहॉवर प्रशासन आणि खास करून ओपेनहायमर यांचे शत्रू लेविस स्ट्रॉस हे वृत्तपत्रांना गाळीव माहिती पुरवत असत. ओपेनहायमर यांच्यावरील आरोपांना भरभरून प्रसिद्धी दिली जात असे. आधीच कम्युनिस्ट विरोधाने पछाडलेली जनता या प्रोपगंडाने आंधळी झाली नसती, तर नवलच.
या काळात त्यांच्या बाजूने कोणीच नव्हते असे नव्हे. अनेक प्रतिष्ठित नागरिक, वैज्ञानिक यांचा त्यांच्यावर विश्वास होता. मॅकार्थिझमने चालवलेले देशाचे नुकसान तेही अनुभवत होते. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी तर या सगळ्या प्रकरणावर अतिशय कडवट टीका केली. ‘ॲटॉमिक एनर्जी कमिशनला आता ॲटॉमिक एक्स्टर्मिनेशन कॉन्स्पिरसी असेच म्हणायला हवे,’ अशा शब्दांत त्यांनी या सर्व प्रकरणाचे वाभाडे काढले.
ओपेनहायमर मात्र या प्रकरणामुळे आतून उद्ध्वस्त झाले होते. याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसला. ओपेनहायमर यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावरील आरोपांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.
टोनी ओपेनहायमर ही त्यांची कन्या. पोलिओग्रस्त होती ती. १९६९मध्ये तिने संयुक्त राष्ट्रांत भाषांतरकार या पदासाठी अर्ज केला होता. त्या पदासाठी ती योग्यही होती, पण तिला ते पद देण्यात आले नाही. तिच्या वडिलांना - जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांना १५ वर्षांपूर्वी ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ नाकारण्यात आला होता. सदरहू तिलाही ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ देता येणार नाही, असे एफबीआयने कळवले. तिला ती नोकरी मिळाली नाही.
.................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment