“बाहेर जा, तुम्हाला अनेक झुरळं फिरताना दिसतील. त्यांना तुमच्याकडच्या बंदुकीनं मारून टाका.”
“कामावर जा.”
किंवा
“मी शपथ घेतो की शेवटच्या प्राणापर्यंत हिंदू राष्ट्र करण्यासाठी मरेन किंवा मारेन.”
“यूपीएससीमें जिहाद.”
“उद्धव ठाकरे मेरा खुला चॅलेंज हैं.”
“जिहाद, जिहाद, जिहाद.”
या घोषणा नाहीत.
निवेदकांची वक्तव्यं आणि आवाहनं आहेत.
पहिली दोन आवाहनं १९९४मधली रवांडा या देशातली आहेत.
दुसरी दुसरी आवाहनं भारतातील २०२१-२२मधली आहेत.
यांमध्ये फरक काहीच नाही, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. आवाहन सारखेच आहे- ‘‘उठा बाहेर जा आणि ‘त्यांना’ मारा.”
नुकतेच दिल्लीजवळील नोएडा इथे ‘हिंदू राष्ट्रा’साठी मरण्याची आणि मारण्याची शपथ ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी दिली. सुदर्शन टीव्हीवरून ‘यूपीएससी जिहाद’सारखे मुस्लिमांच्या विरोधात कार्यक्रम चालवले जातात. चिथावणी देणारे, ‘फेक न्यूज’ पसरवणारे कार्यक्रम ‘रिपब्लिक’, ‘टाइम्स नाऊ’, ‘झी’ या टीव्ही वाहिन्यांकडून याच प्रकारचे अनेक कार्यक्रम चालवले जातात. दंगलींमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हाच प्रकार केला होता. भाजपच्या अनेक नेत्यांनी फेसबुकचा असाच वापर केला आणि द्वेषपूर्ण भाषणं पसरवली. आता अनेक यूट्यूब वाहिन्यांचीही यामध्ये भर पडली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला साजेसा हा प्रकार ‘सुल्ली डिल्स’ आणि ‘बुली बाई’ या अॅपपर्यंत पोहोचला आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
सूत्र साधं आहे, एका जमातीला नामोहरम करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित माध्यमांचा उपयोग करून, आपला द्वेष पसरवणारा संदेश थोड्या वेळात सगळीकडे वेगाने पसरवायचा आणि हवे ते काम घडवून आणायचे. बहुसंख्याकांनी विविध माध्यमांचा\प्रसारमाध्यमांचा वापर करून अल्पसंख्य समुदायाला लक्ष्य करण्याचा हा प्रकार नवा नाही, तर ‘रवांडा रेडिओ’ नावाने अलीकडच्या इतिहासात प्रसिद्ध आहे.
द्वेषाचा रेडिओ
रेडिओ रवांडा आणि रेडिओ टेलिव्हिजन लिब्रे डेस मिले कोलिन्स किंवा आरटीएमएल (Radio Television Libre des Mille Collines RTLM) या दोन रेडिओ स्टेशनने रवांडा या देशामध्ये धुमाकूळ घालत, विरोधी जमातीचे आणि आपल्याच जमातीतील पुढारलेल्या लोकशाहीवादी लोकांचे हत्याकांड घडवून आणले होते. या नरसंहारामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले.
आफ्रिका खंडातील बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या रवांडा या देशामध्ये ८५ टक्के हुतू, १४ टक्के तुत्सी आणि १ टक्का त्वा जमातीचे लोक राहतात. हुतू जमातीचे प्रशासनावर वर्चस्व होते आणि त्यातून तुत्सी जमातीवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून १९९० ते १९९४ या काळामध्ये गृहयुद्ध सुरू होते. रवांडाचे सरकारचे प्रतिनिधित्व करणारे रवांडन सशस्त्र दल आणि बंडखोर रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट (RPF) यांच्यामध्ये १ ऑक्टोबर १९९० ते १८ जुलै १९९४ या दरम्यान गृहयुद्ध लढले गेले. त्याच वेळी १९९४ या वर्षांत १०० दिवसांमध्ये हा नरसंहार झाला.
रवांडाचा रक्तरंजित इतिहास
वसाहतीच्या काळामध्ये युरोपातील सत्तांनी आफ्रिका वाटून घेतला होता. रवांडावर फ्रेंचांचे राज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात बेल्जियमने रवांडा जिंकून घेतले. मात्र रवांडामध्ये असलेल्या तुत्सी राजेशाहीला धक्का लावला नव्हता. १९५९ ते १९६२ या काळात क्रांती झाली आणि तुत्सी राजेशाहीची जागा हुतूच्या नेतृत्वाखालील प्रजासत्ताकाने घेतली. त्यामुळे सव्वा तीन लाख तुत्सींना शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पडले.
युगांडामध्ये गेलेल्या या तुत्सी निर्वासितांच्या गटाने रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटची स्थापना केली. याच फ्रंटने पॉल कागामे आणि इतरांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात लढाईसाठी शसस्त्र सेना उभारली. १ ऑक्टोबर १९९० रोजी फ्रंटने उत्तर-पूर्व खांडावर आक्रमण केले आणि युद्धाला सुरुवात झाली.
हे युद्ध पुढे ५ वर्षे सुरू होते. ६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांचे विमान पाडण्यात आले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतरच्या १०० दिवसांमध्ये हा नरसंहार झाला. १८ जुलै १९९४मध्ये फ्रंटने सत्ता ताब्यात घेतल्यावर हा नरसंहार थांबवण्यात आला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
रेडिओ हेच अपप्रचार माध्यम
१९६१मध्ये स्थापना झालेल्या सार्वजनिक मालकीच्या रेडिओ रवांडावरून सरकारची भूमिका प्रसारीत केली जात होती. आता रवांडा ब्रॉडकास्टिंग एजन्सीच्या अंतर्गत हा रेडिओ काम करतो. फ्रंटने युद्ध सुरू करण्यापूर्वी रवांडामधील रेडिओ रवांडा हे एकमेव राष्ट्रीय रेडिओ स्टेशन होते, जे राज्य आणि सत्तेत असलेल्या पक्षाच्या दोन्ही मतांचे प्रतिनिधित्व करत होते. युद्ध सुरू झाल्यानंतर काही काळानंतर, फ्रंटने स्वतःचे रेडिओ स्टेशन रेडिओ ‘मुहाबुरा’ सुरू केले. १९९०पासून तुत्सीविरोधी लेख आणि ग्राफिक व्यंगचित्रे ‘कांगुरा’ नावाच्या वर्तमानपत्रात दिसू लागली होती. तुत्सी नेते आणि जमातीची बदनामी हाच त्याचा मुख्य हेतू होता...
मार्च १९९२मध्ये रेडिओ रवांडाने हुतू अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्याच्या खोट्या बातम्या आणि माहिती प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून बुगेसेरा प्रदेशात अनेक तुत्सी लोक मारले गेले. एप्रिल १९९२मध्ये रवांडात एक संक्रमणकालीन सरकार स्थापन करण्यात आले. त्या सरकारने राष्ट्राध्यक्ष हब्यारीमाना यांच्याकडे रेडिओच्या कार्यक्रमात बदल करण्याची मागणी केली.
यामुळे रेडिओ रवांडाने संक्रमणकालीन सरकारची भूमिका घ्यायला सुरुवात केली, पण अध्यक्षांच्या पक्षाची भूमिका यायची थांबली. त्याच वेळी फ्रंटने सुरू केलेल्या ‘रेडिओ मुहाबुरा’चा प्रभाव वाढू लागला होता. त्यामुळे कट्टरपंथी हुतू गटाने १९९३ मध्ये एक नवीन रेडिओ स्टेशन तयार केले, ज्याचे नाव ‘रेडिओ टेलिव्हिजन लिब्रे डेस मिले कोलिन्स’ किंवा ‘आरटीएमएल’ असे होते. ८ जुलै १९९३ ते ३१ जुलै १९९४पर्यंत आरटीएमएलचे प्रसारण होत होते. तत्कालीन हुतू सरकारची एक प्रसार-प्रचार शाखा म्हणूनच या रेडिओने काम केल्याचे पुढे सिद्ध झाले.
जनसंहाराचा साउंडट्रॅक
‘रेडिओ टेलिव्हिजन लिने डेस मिले कोलिन्स’ हे फ्रेंच नाव आहे. त्याचा अर्थ ‘हजार डोंगरांचा स्वतंत्र रेडिओ’, असा आहे. रवांडाचे वर्णन ‘हजार डोंगरांची भूमी’, असे केले जाते. या रेडिओला सरकारच्या ‘रेडिओ रवांडा’चा पाठिंबा होता. त्यांचीच उपकरणे वापरून सुरुवातीला ‘आरटीएमएल’चे प्रसारण होत होते. ‘रेडिओ रवांडा’ आणि ‘आरटीएमएल’ ही दोन वेगळी, स्वतंत्र रेडिओ स्टेशने असूनही, ते वेगवेगळ्या वेळी एकाच तरंगलहरींवर (फ्रिक्वेन्सी) प्रसारित केली जाई. त्यामुळे लोकांना गोंधळ उडे हे अर्थातच हेतूपुरस्सर करण्यात आले होते.
‘आरटीएमएल’ हे रेडिओ स्टेशन खूप लोकप्रिय झाले होते. समकालीन संगीत लावून त्याची लोकप्रियता वाढवण्यात आली होती. सामान्य लोकांनी ते मोठ्या प्रमाणावर ऐकले. परंतु या लोकप्रियतेचा गैरफायदा उठवत तुत्सी, लोकशाहीवादी हुतू, बेल्जियमचे नागरिक आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता पथकाविरुद्ध द्वेषपूर्ण प्रचार प्रक्षेपित करण्याची भूमिका ‘आरटीएमएल’ने बजावली.
खांडाच्या नागरिकांमध्ये जातीय शत्रुत्वाचे वातावरण तयार करण्यात ‘आरटीएमएल’ने कळीची भूमिका बजावली. पुढे जाऊन याचमुळे नरसंहार झाल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युद्ध गुन्हे न्यायाधिकरणानेदेखील व्यक्त केले. त्यामुळे ‘आरटीएमएल’चे वर्णन ‘रेडिओ नरसंहार’, ‘रेडिओद्वारे मृत्यू’ आणि ‘जनसंहाराचा साउंडट्रॅक’ असे केले गेले आहे.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
असिफाची हत्या आणि बलात्कारावर ‘चुप’ राहणाऱ्या लोकांचा नेता कोण आहे?
हाथरस गँगरेप : सत्याच्या दरवाजावर षडयंत्राचे पोलादी पडदे टाकण्याचा प्रयत्न
या मुली संविधानावर आणि न्यायालयावर विश्वास ठेवून लढत आहेत. त्यांनी लढावे, त्या लढतील...
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
.................................................................................................................................................................
तोंडदेखली बंदी
‘आरटीएमएल’ स्टेशनने तुत्सी फ्रंट आणि अध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेला विरोध केला. हब्यारीमाना यांच्या कुटुंबाचा मात्र या रेडिओ स्टेशनला पाठिंबा होता. तरुण आणि वयोवृद्ध अशा दोन्ही वयोगटातले एकनिष्ठ प्रेक्षक आरटीएमएलने विकसित केले, ज्यांचेच रूपांतर पुढे हल्लेखोरांमध्ये झाले.
फेलिशिअन काबुगा हा कोट्यधीश व्यावसायिक आणि ‘कांगुरा’ या वृत्तपत्रसमूहाचा ‘आरटीएमएल’च्या स्थापनेमध्ये मोठा वाटा होता. यामध्ये विनोद आणि लोकप्रिय झैरियन संगीताच्या बरोबरच द्वेषपूर्ण वक्तव्ये या रेडिओ स्टेशनवरून वारंवार करण्यात येत असे. तुत्सींना ‘झुरळे’ म्हणून संबोधले जात. ‘तुम्ही तुत्सी झुरळे आहात! आम्ही तुम्हाला मारून टाकू!’, अशी हिंसक वक्तव्ये प्रसारित केली जात.
या रेडिओची ‘हेट रेडिओ’ अर्थात ‘विद्वेषी रेडिओ’ म्हणून चर्चा सुरू झाली, तसे रवांडाच्या तकालिन सरकारने रेडिओवर बंदी घालण्याची घोषणा मार्च १९९३मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘दार एस सलाम’मधील संयुक्त बैठकीत केली, पण इकडे रेडिओ बिनबोभाटपणे सुरूच राहिला. ‘आरटीएमएल’चे संचालक इतिहासकार फर्डिनांड नहिमाना यांनी मात्र असा दावा केला होता की, या रेडिओ स्टेशनची स्थापना प्रामुख्याने फ्रंटच्या रेडिओ मुहाबुराच्या प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी करण्यात आली होती.
हिंसाचाराचा भडका
जानेवारी १९९४मध्ये ‘आरटीएमएल’च्या स्टेशनने संयुक्त राष्ट्र संघटनेचे कमांडर रोमियो डॅलेर यांच्या विरोधात द्वेषपूर्ण संदेश प्रसारित केले. ६ एप्रिल १९९४ रोजी अध्यक्ष हब्यरीमानाचे खाजगी विमान खाली पाडल्यानंतर ‘आरटीएमएल’ने तुत्सींचा नाश करण्यासाठी अंतिम युद्ध पुकारण्याची घोषणा केली. तुत्सींविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार भडकावण्यास सुरुवात केली. तुत्सींशी विवाह केलेल्या हुतूंविरुद्ध बहिष्कार घालण्याचा प्रचार केला. हुतू असणारा गायक संगीतकार सायमन बिकिंडीचे संगीत वारंवार वाजवले गेले. त्याची दोन गाणी होती, ‘बेने सेबाहिन्झी’ (शेतकऱ्यांच्या वडिलांचे पुत्र), आणि ‘नंगा अबाहुतु’ (आय हेट हुटस), ज्यांचा अर्थ ‘द्वेष आणि नरसंहार भडकावणारा’ असा होता.
‘आरटीएमएल’ लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रवांडात तेव्हा मोठ्या प्रमाणावर निरक्षरता होती. नागरिकांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. रवांडा नरसंहारातील अंदाजे १० टक्के हिंसाचार हा ‘आरटीएमएल’च्या द्वेषपूर्ण रेडिओ प्रसारणामुळे झाल्याचा निष्कर्ष एका अभ्यासात काढण्यात आला. १९९४च्या नरसंहारानंतर, घटनास्थळावर मदतीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी शेकडो तुल्सींना त्यांच्या पाठीवर कपडे आणि कानाला लावलेला ट्रान्झिस्टर रेडिओ घेऊन त्यांच्या गावातून पळून जाताना पाहिल्याचे सांगितले गेले.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
नरसंहार होत असताना, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याने ‘आरटीएमएल’चे प्रसारण ठप्प करण्यासाठी एक योजना तयार केली होती, पण ही कारवाई कधीही केली गेली नाही. जेव्हा फ्रेंच सैन्याने रवांडामध्ये प्रवेश केला, तेव्हा ही कारवाई मुख्यतः तत्कालीन सरकारला वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप झाला. तेव्हा ‘आरटीएमएल’ने हुतू मुलींना आवाहन केले की, आमच्या फ्रेंच मित्रांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करा. चांगले आकर्षक कपडे घाला. सर्वच्या सर्व तुत्सी मुली मेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ही मोठी संधी आहे.
हिंसक मनोवृत्तीचे निवेदक
जेव्हा तुत्सीच्या नेतृत्वाखालील फ्रंटच्या सैन्याने जुलैमध्ये देशावर नियंत्रण मिळवले, तेव्हा ‘आरटीएमएल’ने सर्व उपकरणांसह झैरे या देशामध्ये पळ काढला. कांतानो हबिमाना, हा कांतनो या नावाने प्रसिद्ध असलेला ‘आरटीएमएल’चा निवेदक होता. त्याने आवाहन केले होते, ज्यांच्याकडे बंदुका आहेत, त्यांनी ताबडतोब या झुरळांकडे जाऊन त्यांना घेरून मारावे.
व्हॅलेरी बेमेरिकी ही एकमेव महिला निवेदक होती. ती हिंसाचार भडकवण्यासाठी ओळखली जात होती. ती आवाहन करायची की, ‘त्या झुरळांना गोळीने मारू नका. त्यांचे चाकूने तुकडे करा.’ नोएल हिटिमाना, हा पूर्वी रेडिओ रवांडा येथे निवेदक होता. दारूच्या नशेत असताना ऑन-एअर राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांचा अपमान केल्याबद्दल त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. जॉर्जेस रुग्गीउ, हा इटालियन वंशाचा बेल्जियमचा एक गोरा माणूसही हिंसाचाराचे आवाहन करायचा.
दोषींविरोधात खटले
याशिवाय फेलिसियन काबुगा, रेडीओचा संचालक फर्डिनांड नहिमाना ‘आरटीएमएल’च्या कार्यकारी समितीचा अध्यक्ष जीन बॉस्को बारायाग्विझा, मुख्य संपादक गॅस्पर्ड गहिगी, दैनंदिन कामकाज पाहणारा व्यवस्थापक फोकस हबीमाना, असे अनेक लोक ‘आरटीएमएल’शी संबंधित होते. त्यातल्या अनेकांना पुढे युद्ध गुन्हेगार ठरवले गेले. त्यांच्याविरोधात खटले चालविले गेले. ‘आरटीएमएल’च्या विरोधात पुढे २३ ऑक्टोबर २००० रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सुरुवात केली आणि त्यामध्ये ‘कांगुरा’चे संचालक आणि संपादक हसन नेजे यांच्यावर खटला चालवला गेला. १९ ऑगस्ट २००३ रोजी फर्डिनांड नहिमाना आणि जीन बॉस्को बारायाग्विझा यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. १४ डिसेंबर २००९ रोजी उद्घोषक व्हॅलेरी बेमेरिकीला रवांडा येथील गॅकाका न्यायालयाने दोषी ठरवले आणि नरसंहाराला उत्तेजन देण्याच्या दोषापायी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
यातील बराचसा भाग हा गाजलेल्या ‘हॉटेल रवांडा’ या चित्रपटात आला आहे. ‘स्वीस थिएटर’ निर्माते मिलो राऊ यांनी त्यांच्या ‘हेट रेडिओ’ या नाटकात ‘आरटीएमएल’चे चित्रण केले आहे.
विद्वेषी प्रसारणाचा हा इतिहास पाहिल्यानंतर भारतातील रुबिना लियाकत, सुधीर चौधरी, अरणब गोस्वामी, सुरेश चव्हाणके, अंजना ओम कश्यप, दीपक चौरसिया यांचे आणि ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘झी न्यूज’, ‘टाईम्स नाऊ’, ‘सुदर्शन टीव्ही’ यांच्यासारख्या अनेकांचे या इतिहासाशी साधर्म्य आढळल्यास, तो निव्वळ योगायोग नाही.
फरक इतकाच आहे की, हा प्रवास आता इंटरनेट आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी, फेसबुकपर्यंत पुढे गेला आहे. ‘टेक फॉग’सारखे अॅप वापरून हा द्वेषाचा प्रचार-प्रसार अधिक संघटित आणि टोकदार करण्यात येत आहे.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
लेखक नितीन ब्रह्मे यांना मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये काम करण्याचा १५ वर्षांहून अधिक अनुभव असून, माध्यम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
brahmenitin@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment