अतुल देऊळगावकर यांच्या ‘लॉरी बेकर’ या पुस्तकाच्या सहाव्या व सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नामवंत दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन व विख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते उद्या (२ एप्रिल) मुंबईत पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
“कला म्हणजे समाजाला उपयुक्त पडणारा आरसा नसून ती समाजाला घडवणारी हातोडी आहे.” - बर्टोल्ट ब्रेख्त
बेकर म्हणजे अमर्याद खुलेपणा! आयुष्य येईल तसं स्वीकारत जाऊन त्याला आकार देत गेले. आपण कल्पनाही करू शकत नाहीत असे अतिशय मनस्वी आयुष्य लॉरी बेकर प्रत्येक टप्प्यावर निवडत गेले. इंग्लडच्या बर्मिंगहॅम शहरात वास्तुविशारद ही पदवी लॉरी बेकर यांनी १९३७ साली घेतली. त्या वर्षी फ्रँक लॉईड राइट यांची कॉफमन हाऊस (फॉलिंग कॉटर ) ही वास्तु जगाचे लक्ष वेधून घेत होती. कॉल्टर ग्रोपियस यांनी पडदेवजा भिंतीसाठी काचेच्या वापराचा आरंभ केला होता. १९४२ साली फ्रेंडस अँम्ब्युलन्स युनिटच्या पथकासोबत बेकर चीनकडे निघाले, त्यावेळी दुसरे महायुद्ध पेटले होते. युद्ध समाप्तीनंतर प्रचंड प्रमाणावर बांधकामे होणार होती. वास्तुविशारद व अभियंत्यांचा तुटवडा भासेल एवढी कामे निघण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. इंग्लंडकडे जाण्याकरता जहाज गाठण्यापूर्वी मुंबईत थांबावं लागलं, तेव्हा बेकर यांची गांधीजीशी भेट झाली. गोरा तरुण पाहून ‘चले जाव’च्या घोषणांचा आवाज अजून वाढत असे. बेकर व गांधीजींचे सूर सहज जुळले आणि भेटी वाढत गेल्या. गांधीजी म्हणाले, ‘‘तुमची गरज इकडे अधिक आहे.’’ भारतात परत येऊन कुष्ठरोग्यांच्या वसाहतींची दुरुस्ती व नूतनीकरण करावं, असाच बेकर यांच्या मनाचा कल होता. गांधीजींमुळे तो निश्चय दृढ झाला.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी बेकर यांना ‘करिअर’चा कसलाही मोह पडला नाही. उलट जीवाची जोखीम पत्करून ते थेट अंधारात उडी टाकून मोकळे झाले. ‘आयुष्य हा अज्ञाताचा प्रवास आहे. तर त्यात समोर येईल ते स्वीकारू’ ही त्यांची वृत्ती होती. भारतात कायमस्वरूपी येण्याचा निर्णय असो. मधुचंद्रासाठी हिमालयात गेल्यावर रस्ता, वीज नसणाऱ्या दुर्गम व पहाडी पिठोरागड भागात पंधरा वर्षे मुक्काम ठोकणे, हे येरा गबाळयाचे काम नाही. वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी वास्तुविशारद या करिअरचा अजिबात विचार केला नाही. त्या काळात ते केवळ त्यांच्या पत्नी डॉ.एलिझाबेथ यांच्या वैद्यकीय सेवेत परिचारकासारखे सहकार्य करणे, मुलांचे संगोपन व गरज लागल्यास शेतकऱ्यांच्या घराची डागडुजी केली. क्वचित कधीतरी कुष्ठरोग्यांच्या वसाहतींची कामे असत. कोणतीही भूमिका असो ती मनोभावे करायचा स्वभाव असल्याने तक्रारीसारख्या नकारात्मक गुणांना थाराच नव्हता. तसेच उदात्तीकरणाला जागा नव्हती. काही कारणांनी पुढेही ते तिथेच राहिले असते तर कदाचित त्यांना वास्तु निर्मितीच्या संधीही मिळाल्या नसत्या.
कुमार गंधर्व व सत्यजित राय यांच्या सारखीच बेकर यांची उत्तुंग कामगिरी आहे. वास्तुला काव्य व संगीतानुभवाच्या पातळीकर नेण्याचे अजोड कार्य त्यांनी केले. फ्रँक लॉईड राइट यांनी पर्यावरणाशी संवाद साधणाऱ्या घररचनेची आस धरली, त्याबद्दल भरपूर लिहिले. परंतु बेकर यांनी सदैव पर्यावरणाशी तादात्म्य पावणाऱ्या रचना निर्माण केल्या. लोकगीत किंवा ओवी जशी साधी असते तशा बेकर यांच्या वास्तू या कमालीच्या साध्या व अनाग्रही आहेत. गांधीजींचा ‘पंचक्रोशीतील सामग्रीतून गरजा भागवल्या पाहिजेत.’ हा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. ‘‘देशाची पुनर्रचना कशी व्हावी याविषयी सातत्यानं मांडणी करणारे गांधीजी हे एकमेव नेते होते. पाचात्य विचार आणि वास्तुकलेचे संस्कार असल्यामुळे वयाच्या तिशीत मला त्यांचा सल्ला पचत नव्हता. परंतु वय आणि अनुभव वाढत गेले, तसे गांधीजींचे द्रष्टेपण उमजत गेलं. हिमालय आणि केरळमधील आदिवासी भागात राहताना स्थानिक सामग्रीचा कल्पक उपयोग समजत गेला,’’ असं बेकर प्रांजळपणे म्हणत. स्थानिक सामग्रीचा सर्जनशील हे त्यांचं वैशिष्ट्य झालं. कुमार गंधर्वांनी लोकसंगीताची महत्ता समजावून सांगितली. तर बेकर यांनी स्थानिक वास्तुकलेचा सन्मान करून प्रचलित वास्तुकलेत सामावून घेतलं.
एकविसाव्या शतकात हरित इमारत हा सर्वत्र वापरला जाणारा मंत्र झाला. त्याचे प्रमाणीकरण सुरू झाले. या संकल्पना बेकर यांनी काळाच्या खूपच आधी अंगिकारल्या होत्या. ‘‘वीट तयार करण्यासाठी कसदार माती वापरू नका. मातीचा खालचा थर वापरा’’ असे ते कळकळीने सांगत. दगड, वीट, कौले, बांबू यांच्या अप्रतिम रचनेतून त्यांनी अभिजात वास्तु रचल्या. प्रत्येक टप्प्यावर अनावश्यक ते काढून टाकण्याचा त्यांचा अट्टाहास होता. सभोवतालच्या निसर्गाला चुकूनही धक्का लावायचा नाही, याबाबत ते जागरूक होते. १९७०च्या सुमारास थिरूअनंतपुरम येथील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’च्या व्यवस्थापकीय संकुलाचे बांधकाम चालू होते. त्या वेळी तिथे एक बहाव्याचे (अमलताश - कॅशिया फिस्तुला) छोटे झाड होते. ते पाहून बेकर यांनी ऐन वेळी रचनेत सुधारणा केली. (‘देअर इज ऑलवेज सम रूम फॉर इम्प्रोव्हायझशन’ - सत्यजित राय ) बहाव्याला धक्का न लावता त्याभोवती जिना देऊन इमारतच गोल करून टाकली. बहावा वाढला आणि वसंत ऋतूत त्याचा पिवळा धम्मक पसारा इमारतीची शोभा वाढवू लागला. वृक्षांचा आदर करावा तो बेकर यांनीच! वृक्षाला स्पर्श न करता त्याभोवती रिंगणासारखी इमारत रचणे, याला अलौकिक प्रतिभा लागते. इमारतीची उंची नारळापेक्षा जास्त असू नये. वृक्षराजीत बांधकामे सहज लपून जावीत, याकडे त्यांचा कटाक्ष असे.
ऊर्जेचा कमीत कमी वापर व्हावा, याबाबत ते सदैव काटेकोर होते. ‘‘घरात दिवसा दिवा लावावा लागत असेल, तर वास्तुविशारदाचा उपयोगच काय?’’ असे ते विचारत. त्यांच्या वास्तूत पंखा लावण्याचीसुद्धा गरज क्वचितच पडते. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ या भव्य संकुलात संगणक दाखल झाला व वातानुकूलतेची गरज भासली. तेव्हा बेकर यांनी नैसर्गिकरित्या हवेचा झोत फिरणाऱ्या भिंतीचे आवरण तयार केले. आरंभापासूनच प्रत्येक रचनेत पावसाचे पाणी साठवणाऱ्या हौदाची सोय केली, शक्य तेथे विविध आकाराची तळी दिली. ‘ऊर्जा संकट’ ही चर्चा जोरात सुरू झाली त्या वेळी त्यांनी बेकर शैलीत खिल्ली उडवली. ‘‘देशासमोर ऊर्जेचे संकट बिकट होत असूनही आपली बिनडोक उधळमाधळ चालूच राहते. ऊर्जेची बचत होऊ शकेल अशी बांधकाम सामुग्री आपण वापरत नाही. स्थानिक सामग्री उपलब्ध असूनही बेफाम वाहतूक करतो. असंख्य प्रकारचा उधळेपणा करत राहायचे आणि खर्च भागत नसल्याने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अवाढव्य कर्ज घ्यायचे. बदलत्या वास्तवाचे आम्हा वास्तुविशारदांना आणि नागरिकांना तरी कुठे भान आहे ?’’, अशी बेकर यांची स्पष्टोक्ती असायची.
वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत
एका ज्येष्ठ वास्तुविशारदांनी ‘‘लॉरी बेकर हे कलावंत आहेत. आम्ही बापडे पोटभरू व्यावसायिक!” असे मार्मिक विवेचन केले होते. बांधकाम असो वा सार्वजनिक जीवन, त्यातील ओंगळपणा त्यांना सहन होत नसे. ‘‘सध्याचे घरबांधकाम व इमारती पाहून वास्तुकलेच्या प्रवासाबद्दल काय वाटते?”, असा प्रश्न विचारल्यावर बेकर यांनी प्रतिप्रश्न केला, ‘‘व्यावसायिक वास्तुविशारदाला कलावंत म्हणता येईल का?, असेही विचारता येईल (‘‘विचार न करता कसरत करणाऱ्यांना गायक म्हणायचे का?”, असा सवाल कुमार गंधर्वदेखील विचारत). वास्तुविशारदाच्या कल्पनांना ग्राहक आणि शहर-नियोजन अधिकारी यांच्याकडून संमती मिळवत जावे लागते. कागदावर काढलेल्या संकल्पनांना कला म्हणायचे ठरवले, तर अंतिम निर्मितीशी त्याचा संबंध काय उरतो, हे तपासावे लागेल. त्या कल्पनांचे ‘काँक्रिटीकरण’ करणाऱ्या कंत्राटदाराला त्यातील कला दिसत नाही. समजणे तर फारच दूर! असे म्हटले, तर कला म्हणजे काय, असे कुणी विचारु शकेल. ‘कला म्हणजे सौंदर्याची निर्मिती ’, अशी व्याख्या शब्दकोषात आहे. सौंदर्य म्हणजे काय, असा पुन्हा प्रश्न येईल. ‘बघितल्यावर नजरेला बरी वाटावी अशी निर्मिती’ असे कलेला म्हणणे मी पसंत करीन. सध्याचे बांधकाम, इमारती या कलेचा आविष्कार आहेत, असे म्हणता येईल का (अपवाद एखादे सतीश गुजराल !) असा प्रश्न मला पडतो.’’
विख्यात वास्तुविशारद नॉर्मन फोस्टर “वास्तुकला ही मूल्यांची अभिव्यक्ती असते”, असे म्हणत. बेकर यांची वास्तुकला ही त्यांच्या मानवतावादी विचारांचे प्रकटीकरण होते. इंग्लिश, युरोपीय, पर्शियन, केरळी, बौद्धकालीन या सर्व वास्तुशैलींचा उत्कट मिलाफ त्यांच्या वास्तुकलेत आढळतो. त्यांनी काचेच्या खिडक्या, बाल्कनी यातून खाजगीपण आणि सार्वजनिकतेसाठी मोकळ्या जागा दिल्या. वसतिगृहातसुद्धा वैयक्तिकता जपण्याकरिता त्यांनी साधा आडोसा (लाकडी पार्टिशन) करून विश्रांतीसाठी जागा करून दिली. कोणता उद्देश कसा साध्य करावा याची अप्रतिम प्रचिती त्यांच्या वास्तूंमधून येते.
कुमार म्हणत, ‘‘राग हे अरूप व अमूर्त असतात. राग म्हणजे आत्मा, बंदिश हे शरीर. वेगवेगळी शरीरे धारण केली की एकाच रागाची असंख्य रूपे दिसायाला लागतात.’’ बेकर यांनी साध्या व नेहमीच्या आकारांना अर्थ दिला. तऱ्हेतऱ्हेच्या आकारांशी खेळणे हा बेकर यांचा खास छंद होता. दोन स्वर नकळत एक होऊन जातात, तसे हे आकार एकमेकांमध्ये सहज मिसळून जायचे. त्यांनी केलेली त्रिमिती सघन आणि सेंद्रीय होऊन जाते. प्रकाश आणि हवा यांच्या संगमातून त्यांनी निर्माण केलेली स्पेस आल्हाददायी व सचेत होते. त्यांच्या वास्तूंमधून प्रकाशाला स्निग्धता आणि स्पेसला शांतपण प्राप्त होतो. त्या वास्तूंमधील रंगच्छटा आणि गंध मनाला मोहवून टाकतात. या साऱ्या रचनेतून वातावरण बेहद्द प्रसन्न आणि डौलदार होऊन जाते. जोहान कॉन गटे यांच्या “वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत” या प्रतिपादनाची प्रचिती येते. ही अनुभूती घेताना कुमार गंधर्वांची मालकबिहाग रागातील अवर्णनीय बंदिश (कुमार रचित) मनात घुमत राहते. कुमारांना वास्तुकलेत खास रुची होती. शिरीष पटेल यांच्यासारखे विद्वान वास्तुशिल्पी त्यांचे चाहते होते. कुमार मोठ्या आवडीने प्राचीन व समकालीन वास्तू पाहत; चित्रसंग्रहालयाला भेट देत. कुठल्याही क्षेत्रात नवीन काही झाले की, त्याची वार्ता त्यांना लागत असे आणि ते सवड काढून तिथे जात असत. पटेल यांनी कुमारांना चंदिगड दाखवले आणि त्याची महती वर्णन केली. कुमार मनोभावे पाहत राहिले. ल कार्बुझ्ये याची प्रतिभा पाहून थक्क झालेल्या कुमारांनी स्वत:च्या अवस्थेबद्दल म्हटले आहे,
ये सब खेल ज्ञानी महा धीर के
रूप बुलायो , छिपाग्यो, डरायो , मोहायो
सोचही-सोच सुधर सब बन्यो है
अंग निहारू, बहारू भीतरू देखायो
बेकर यांची कुठलीही निर्मिती पाहताना आपली अवस्था अगदी अशीच होते.
बेकर एक दंतकथा !
बेकर यांचा पिंडच विरळा होता. त्यांनी स्वत:ला कधीही कुणावर लादले नाही. कुठले तत्त्व मांडत असल्याचा आविर्भाव आणला नाही (त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचे ठरवल्यानंतर प्रस्तुत लेखकाला त्यांनी दोन वर्षे वेळ दिला नाही. सहसा अगदी उलट अनुभव येतो. लिहा म्हणून मागे लागणारे पावलोपावली भेटतात). स्वत:बद्दल ते फारसे बोलत नसत. विचारले गेलेच तर बोलताना अभिनिवेशाचा लवलेश नाही. केवळ सकारात्मकतेने ते ओतप्रोत भरलेले होते. जे.कृष्णमूर्तींना अभिप्रेत पूर्वग्रह न ठेवता घटना व व्यक्तींकडे पाहण्याची स्वच्छ व निकोप नजर त्यांना लाभली होती. कुठल्याही अवघड वा गंभीर प्रसंगी निरोगी हास्य निर्माण करणारी सूक्ष्म विनोदबुद्धीची जोड लाभल्याने बेकर हे व्यक्तिमत्त्व कायम प्रसन्नच राहिले.
१९४८ साली बेकर भारतात कायमस्वरूपी वास्तव्याकरिता आले. त्या वेळी भारत नुकताच स्वतंत्र झालेला अष्टदरिद्री देश होता. ‘लोकशाहीस लायक नाही’, ‘यादवी माजून असंख्य शकले होतील’, ‘भारत म्हणजे अनागोंदी ’ अशी भारताची वर्णने इंग्लंडमधील पंडित करत होते. तरीही बेकर यांनी हा निर्णय का व कसा घेतला, याबद्दल ते कधीही, काहीही बोलले नाहीत. त्यांना इंग्लंडचे कसलेही आकर्षण नव्हते. भारतवासी झाल्यानंतर ते केवळ एकदाच, १९८१ साली रॉयल युनिव्हर्सिटीचा सन्मान स्वीकारण्याकरिता इंग्लंडला गेले. त्यांनी चीनमध्ये सैनिकांची शुश्रुषा करून हिंसा व रक्तपाताचा तिरस्कार व्यक्त केला. गरीब देशांचा छळ आणि लूट केलेल्या गोऱ्यांची त्यांना घृणा वाटत असे. त्यांचा धिक्कार करण्यासाठी बेकर यांनी दरिद्री नारायणांमध्ये सामील होऊन त्यांच्या सेवेत आयुष्य घालवले. निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावले. सभोवतालच्या परिस्थितीचा त्यांना संताप जरूर येत असे, परंतु तो व्यक्त करण्याची त्यांची रीत सर्जनशील आणि अतिशय सकारात्मक होती. अशी अभिव्यक्ती केकळ तत्त्वज्ञान जगणारे श्रेष्ठ कलावंत देऊ शकतात. ते भौतिक अर्थाने आपल्यामध्ये असले, तरी ते आपल्यासारखे नसतात. बेकर भारतात केवळ सर्वकाही देण्याकरताच आले आणि ‘जे जे उत्तम, उदात्त,उन्नत ते ते’ देत गेले. वार्ध्यक्यामुळे शरीर थकले, तरी त्यांचे मन टवटवीतच होते. थोडे बरे असले, तरी ‘‘मला माझ्याच हातचे आवडते’’, ही सबब पुढे करत ते स्वत: स्वयंपाक करत. ‘‘मला रुग्णालयात ठेवू नका’’ अशी त्यांची सक्त ताकीद होती. त्यांचा घन पदार्थांचा आहार हळूहळू बंद होत गेला. एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे ते मृत्यूला अतिशय शांत मनाने सामोरे गेले!
भारतात आल्यापासून ५९ वर्षांनंतर १ एप्रिल २००७ रोजी, वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी जगाला अखेरचा रामराम केला. दंतकथा भासावी असे आयुष्य बेकर जगले आणि त्यांच्या हयातीतच ते एक दंतकथा होऊन गेले!
सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या बेकर यांचा उपयोग भारताने किती व कसा करून घेतला? कसा घेता आला असता? असे प्रश्न त्रासदायक आहेत. आपल्या देशातील अर्थराजकाराणाच्या प्राथमिकता त्यातून स्पष्ट दिसतात. आपल्याला देशभर बेकरप्रणित हरित इमारती व वसाहती दिसू शकल्या असत्या (जगातील हरित शहरात भारतातील एकाही शहराचा समावेश नाही). कित्येक संस्थांची नमुनेदार संकुले उभी राहिली असती. १९९३च्या किल्लारी भूकंपानंतर महाराष्ट्राने त्यांच्याकडून पुनर्वसन करवून घेतले असते, तर तो आदर्श विचार ठरला असता. बेकर हे राष्ट्राचे भूषण होते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच झाले नाही. समाजाची व राष्ट्राची मात्र कधीही भरून न निघणारी हानी झाली.
बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तूकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूमधून व्यक्त होत राहिले. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास असे वास्तूकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडले असेल, तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. साधारणपणे १९९०च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तूकलेचा नव्याने अभ्यास करू लागले आहेत. या विद्यार्थ्यांकरिता बेकर हे आदर्श नायक आहेत. बेकर यांच्या कार्यातून स्फूर्ती घेणारे असंख्य तरुण आहेत. त्यांची वास्तूकला आजही समकालीन वाटते. या तरुणांनी प्रचलित खर्चिक, ऊर्जाग्राही वास्तूंच्या विरोधात मोहिम उघडून पर्यावरणसंवादी रचनांचा प्रसार केला, तर आपली वैयक्तिक व सामाजिक स्पेस अर्थपूर्ण होऊ शकेल.
atul.deulgaonkar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment