पंचेचाळीशीत स्त्रियांच्या शरीरांची आणि मनांची ‘सेटिंग्ज बदलतात’, तशी पुरुषांच्या मनाचीसुद्धा सेटिंग्ज बदलतात का?
श्रृती उत्तूरकरच्या टेरेसवर नाटकाची तालीम सुरू होती. मी सिगरेट ओढत नाटकाचं वाचन घेत होतो, पण मनासारखे काही नीट जमत नव्हते. तसे सगळे ‘परफेक्ट’ होते. श्रृतीच्या अपार्टमेंटची टेरेस, एप्रिल महिन्यातली संध्याकाळ, मंद संध्याप्रकाश, पाठीमागच्या बाजूनं टेरेसच्या वर आलेला गुलमोहर, त्याचा लालेलाल मोहर, टेरेसवर त्याचा पडलेला सडा, पण तालमीत मन लागत नव्हतं. मी पूर्वीचा असतो, तर असं सुंदर ‘सेटिंग’ पाहून भयंकर मूड तयार झाला असता. सुंदर तालीम झाली असती. आता हेच सगळं बावळटपणाचं वाटत होतं.
मी म्हटले, ‘आज तालीम नको’. मग फालतू गप्पा सुरू झाल्या. श्रृती म्हणाली, ‘बुवा, तुम्ही सिंहगडावर येणार का उद्या? माझा एक मित्र आहे महेश जोशी, तो दर रविवारी जातो गडावर. मी जाणार आहे उद्या त्याच्याबरोबर.’
म्हटलं, जाऊ की!
ती म्हणाली, ‘ठीक आहे महेशला सांगते मी’.
तिने फोन केला. महेश म्हणाला, ‘या उद्या पहाटे चार वाजता’.
सगळं ठरलं. मी कित्येक वर्षांनी गडावर जात होतो. तेसुद्धा पायवाटेनं.
तेवढ्यात श्रृती म्हणाली, ‘बुवा, तुला जमणार आहे का पण?’
म्हणालो, ‘का नाही जमणार? आपण आपल्या फुप्फुसांचं धुराडं करून ठेवलं आहे.’
मी जोशी असल्यानं ती मला ‘बुवा’ म्हणू लागली होती. पहिल्यांदा ‘जोशीबुवा’ होतं, मग नुसतं ‘बुवा’ झालं. हे एकवेळ ठीक होतं, पण ती मला ‘अहो-जाहो’ का करते, हे काही कळलं नाही. आदर म्हणावा, तर तसं काही तिच्या वागण्यात कधी दिसलं नाही. अधून-मधून ती ‘अरे-तुरे’सुद्धा करत असे. माझा अपमान करायचा असेल किंवा जमिनीवर आणायचं असेल, तर ती ‘अरे-तुरे’वर यायची.
तिचं म्हणणं बरोबर होतं. तेव्हा मी दिवसाला तिसेक सिगारेटी ओढत होतो. अशा माणसाला गड कसा जमावा? मीसुद्धा जरा चरकलो, पण म्हटलं जाऊन तर पाहू.
मला काहीतरी नवीन हवं होतं. माझ्या आयुष्यात काही ‘मॅजिक’ उरलं नव्हतं. व्यसनाचा कंटाळा आला होता, पण ते सुटत नव्हतं. तीच ती गोष्ट अव्याहतपणे करत राहायचं... काही अर्थ नाही.
...........................................................................................................................................
मानवी आयुष्याच्या अर्थहीनतेचा फवारा तोंडावर बसला की, निराशेचा एक ढग नाही म्हटलं, तरी आपल्या मनामध्ये कायमचा राहायला येतो. आपल्या आयुष्याला अर्थ आहे, असं वाटत राहणं आनंदाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असतं. आपल्या तोंडावर बसलेला एकूण अर्थहीनतेचा फवारा जरी खरा असला तरी, या जगात विविध प्रकारे रमून जाणं तेवढंच खरं असतं.
...........................................................................................................................................
श्रृती म्हणजे एकदम ‘स्पेशल’ व्यक्ती. या समाजात आपलं मनमोकळेपण टिकवून ठेवलेली स्त्री. नाटकात काम करायला म्हणून आली आणि जवळची स्नेही झाली. तिचा नवराही तसाच. एक मनमोकळं कुटुंब! काही काळातच मी त्यांच्या घरातला होऊन गेलो.
त्या काळात श्रृती माझ्या दोन-तीन अगदी जवळच्या मित्रांचीही मैत्रीण झाली. मनमोकळेपणाची हद्द! सगळ्यांचं म्हणणं : अशी बाई या आपल्या समाजात बघायलासुद्धा मिळणं कठीण. आमचा विनायक गोखले म्हणाला- अख्खं पुणे शोधलं तरी हिच्यासारख्या पंचवीसेकसुद्धा बायका मिळणार नाहीत!
श्रृती त्या काळात माझ्या समोर जिवंत मनोवृत्तीचा एक ‘हॉलमार्क’ बनून राहिली होती. तिचं सगळंच भारी! तिची फुलांची आणि पक्ष्यांची आवड, तिचं त्यांच्यात रमून जाणं, त्या आवडीची तिची अभिव्यक्ती...!
तिच्या टेरेसवर पोहोचलेल्या गुलमोहरावर कावळ्याचं एक घरटं होतं. त्या जोडप्यातला कावळा श्रृतीचा फार आवडता. तिने त्याचं नाव ‘मनू’ ठेवलं होतं. त्याची बायको अर्थातच ‘मनी’! मनू किती स्मार्ट आहे, हे श्रृती मला सांगायची, दाखवून द्यायची. त्याचा चाणाक्षपणा, त्याचा सावधपणा, त्याचा दिमाख, त्याचा अॅटिट्यूड असं सगळं. तिने त्यांच्यासाठी उन्हाळ्यात पाणी ठेवलेलं असायचं. ते जोडपं तिच्यावर विश्वास ठेवून कसं पाणी पितात ते दाखवायची. मनू कसा सावधचित्त आहे, तिच्यावर कसा सावध विश्वास ठेवतो, त्या मानानं मनी कशी बावळट आहे, हे मला दाखवून द्यायची. टेरेसच्या कट्ट्यावरून चालताना मनी कशी धडपड करते, तिच्या डोळ्यात आत्मविश्वास कसा नाहिये, मनी कसं सगळं मनूला विचारून करते....
संध्याकाळी टेरेसवर खुर्च्या टाकून आम्ही त्या दोघांना बघत राहायचो. मनू-मनीबद्दल श्रृती म्हणते, ते खरं, असं मला वाटायचं. श्रृतीच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यायलाच पाहिजे होती. मी अशा प्रकारे जग कधी पाहिलंच नव्हतं!
...........................................................................................................................................
सार्त्र असो किंवा काम्यू असो किंवा अजून कोणी- मानवाच्या आपल्या आयुष्यात रमून जाण्याचं गूढ ते सोडवू शकले नाहीत. मूलतः अर्थहीन असलेल्या मानवी जीवनात लोक इतके का रमून जातात? पण एक गोष्ट खरी की, रमून जाण्यामधलं सौंदर्य कुणी नाकारू शकत नाही.
...........................................................................................................................................
श्रृतीच्या अंजिरी रंगांच्या डोळ्यातून आनंद, उत्साह, मिश्किलपणा अशा वेळी ओसंडत असे. तिच्या डोळ्यांमध्ये रत्नांसारखी प्रभा होती. आनंदाची आणि जिवंतपणाची प्रभा! अशी जिवंत माणसं साधारणपणे भाबडी वगैरे असतात, पण श्रृती तशी लबाड, ढाक, डांबरट होती. ती म्हणायची, ‘बुवा, मी मांजर आहे. माझं सगळीकडे बारीक लक्ष असतं.’
मी वेड्यासारखा ते सगळं पाहत असे. व्यक्तिमत्त्वाची अशी श्रीमंती लाभलेल्या श्रृतीला माझ्यासारख्या माणसाशी मैत्री करावी, असं का वाटलं असावं, याचा विचार करत राही.
अजून एक म्हणजे लोक काय बोलतात, त्याविषयी श्रृती कमालीची बेफिकीर होती. लोकांच्या अकला त्या किती आणि ते बोलतात त्याला किंमत ती किती द्यायची, असं तिचं म्हणणं. आज इतक्या वर्षांनी मी आमच्या मैत्रीवर लिहितो आहे, पण प्रसिद्ध करण्यापूर्वी हा लेख एकदा तिला दाखवून घ्यावा, असं मला वाटत नाहिये.
माझं आयुष्य त्या काळात विझून गेलं होतं. कॉलेजच्या वयात मी काम्यू आणि सार्त्र वाचले होते, एक फॅड म्हणून! त्या लिखाणातले खरे संदर्भ चाळीशीनंतर माझ्या लक्षात हळूहळू येऊ लागले. मानवी आयुष्यातल्या त्या अर्थहीनतेच्या पार्श्वभूमीवर श्रृतीचा एकंदर उत्साह आणि आनंद बघून मला फार आश्चर्य आणि खूप बरं वाटत असे!
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
गडाचा विषय झाला, त्या संध्याकाळी आणि माझ्या मनात हुरहुर सुरू झाली. मला मर्ढेकरांची ‘कितीतरी दिवसांत’ ही कविता आठवली. मी घरी जाऊन पुस्तक काढलं आणि ती कविता वाचली-
‘किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा’
माझं सगळं बालपण ग्रामीण भागातलं आणि निसर्गाच्या सान्निध्यातलं! त्यातलं आता काहीच शिल्लक उरलं नव्हतं. मधल्या अनेक वर्षांत मी पूर्ण शहरी होऊन गेलो होतो. ‘बरी तोतऱ्या नळाची, शिरी धार, मुखी ऋचा’ अशीच माझी अवस्था झाली होती.
दुसऱ्या दिवशी आम्ही गडावर गेलो. काही लोक मुळापासूनच ‘फ्रेंडली’ आणि गोड असतात. मी पहिल्यांदाच भेटलेलो, पण महेश संपूर्ण गड होईतो माझ्या बरोबर चालला. मला आधार देत राहिला. मी मनात म्हणालो - ‘चला, एक मित्र मिळाला’. महेशच्या साथीनं गड सर केला. मला अतिशय आनंद झाला. मी श्रृतीच्या नाकावर टिच्चून सिगरेट पेटवली.
ती म्हणाली, ‘बुवा, जरा मोकळा श्वास घ्या गडावरच्या हवेचा! धुरकांडं काय सुरू केलं लगेच?’ ‘आहो-जाहो’ करायचं आणि वर एकामागून एक अपमान करायचे, ही श्रृतीची खासीयतच! ऊन-पावसाचा खेळ असतो, तसा आदर आणि अपमानाचा खेळ म्हणजे श्रृती!
...........................................................................................................................................
मला आता मनापासून वाटू लागलं आहे की, तुकाराम हीच आता माझी शेवटची आशा आहे. छोट्या-मोठ्या मॅजिकमध्ये रमण्यापेक्षा जगातील ‘अल्टिमेट मॅजिक’मध्ये रमणं जास्त लॉजिकल वाटू लागलं आहे. अशा सगळ्या विचारात मी गड चढू लागतो. गडाच्या पाषाणाची खोळ पांघरून तो तुकोबाचा ‘हृषिकेश’ इथेच कुठेतरी बसला आहे.
...........................................................................................................................................
आम्ही गडाच्या पार्किंगमधल्या एका टपरीमध्ये बसलो होतो. तिशीतल्या एक तरतरीत तरुणाने दह्याबद्दल विचारलं. एक्साईट झालो होतो, दहा-बारा मडकी दही खाल्लं. गप्पा झाल्या आणि आम्ही परत आलो.
त्या दुपारी मी झोप वगैरे घेतली, संध्याकाळी टेरेसवर तालमीसाठी हजर झालो. पण दमलो होतो, चेहरा ओढला गेला होता, पाय भयंकर दुखत होते. कठड्याला धरून पायऱ्या चढत उतरत होतो. मला पाहून श्रृती जोरात हसली- ‘काय अवतार करून घेतलायस बुवा?’
मी क्षीण हसलो आणि सिगरेट पेटवली!
‘आता परत नाही जाणार बुवा गडावर तुम्ही. ‘फिरून नाही जाणे आता दूर त्या वनात!’ ही ओळ म्हणून ती जोरात हसली. ‘पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात’ ही ‘गीतरामायणा’तली एक ‘स्लिक’ ओळ. माझा अपमान करण्यासाठी तिने ती ओळ थोडी वळवून घेतली होती. अपमान करताना श्रृतीच्या प्रतिभेला पंख फुटत आणि अपमान जर माझा असेल, तर त्या पंखांवर चांदण्याची झळाळी येई!
तिच्या गाण्याकडं दुर्लक्ष करत मी म्हणालो, ‘मी आता दर रविवारी गडावर जाणार आहे.’ मग दर रविवारी गडावर जाऊ लागलो. श्रृती काही आठवडे आली. हळूहळू तिचं येणं कमी होत गेलं. मी आणि महेश अशी जोडी जमली. पाच-सहा वेळा झाल्यावर पाय दुखणं वगैरे कमी झालं. पुढे जून-जुलैमध्ये पाऊस सुरू झाला. पावसाळ्यातील गड म्हणजे ‘प्युअर मॅजिक’!
मी ऐन पावसाळ्यात गड सुरू ठेवला. पावसात भिजत भिजत गड चढायला शिकलो. मर्ढेकरांना गावाकडच्या नदीत जलमय व्हायचं होतं, तसा मी गडावरच्या पावसाच्या पाण्यात जलमय झालो! आज अकरा पावसाळे झाले, मी कधीही रेनकोट किंवा छत्री वगैरे घेऊन गडावर गेलो नाही. गच्च हिरवाई, खळाळ पाणी, भरार वारा, खाली उतरलेले ढग, ढगांमधून अध्येमध्ये खाली उतरणारे ऊन - सगळा जिवंतपणा!
मर्ढेकर म्हणतात तशी वाहत्या पाण्याची शीळ गडाच्या प्रत्येक उतारावर ऐकू येत राहते. गवताची असंख्य पाती, त्यावर चमकणारे पाण्याचे असंख्य थेंब, असंख्य किडे असंख्य प्रकारचे! एक नांदतं-जागतं जग! स्वतःमध्ये मग्न असलेलं. श्रृतीचा जिवंतपणा, तिचं ‘मॅजिक’ काहीच नाही, या जिवंत विश्वापुढे! यात सार्त्र आणि काम्यू यांची अर्थहीनता कुठे येते, मला काही कळेना!
‘मॅजिक’ हा तसा साधा, संपलेला शब्द आहे, पण आयुष्यात ‘मॅजिक’ नसेल तर काय उपयोग?
...........................................................................................................................................
प्रेमानं हृदय भरून जातं आणि नंतर पुन्हा रितं होतं! मध्यम वयातच काय, पण अगदी म्हातारपणी लोक नवे प्रेम शोधत असतात. त्यांना पुन्हा तो पूर्वीचा पूर्णत्वाचा ‘एहसास’ हवा असतो. त्यांना परत एकदा असं प्रेम मिळालं, तरी हे नवे प्रेमसुद्धा पूर्वीच्या प्रेमासारखं अल्पायू असणार आहे, हे त्यांना कळत नाही. लोक खरं तर पूर्णत्वाच्या शोधात बाहेर पडलेले असतात आणि गल्ली चुकल्यामुळे प्रेम शोधत राहतात!
...........................................................................................................................................
माझी सिगारेट हासुद्धा एकेकाळी ‘मॅजिक’चाच भाग होता. चांगलं पुस्तक वाचताना सिगारेट, मी लिहिलेलं नाटक बसवलं जात असताना सिगरेट, एकटं असताना सिगरेट आणि कशात तरी गर्क होऊन जाताना सिगरेट! त्या ‘मॅजिक’चं व्यसन कधी झालं मला कळलं नाही. सिगरेट एक ओझं म्हणून मानगुटीवर बसली होती. मी तिला झुगारून देऊ शकत नव्हतो.
या सगळ्यामध्ये महेश माझा स्थिर मित्र झाला. अगदी शांतपणे साथ देत राहिला. कित्येक वेळा तो पतियाला किंवा चेन्नई अशा दूरच्या ठिकाणी टूरवर गेलेला असे. घरी परत यायला शनिवार रात्रीचे एक-दीड वाजून गेलेले असत, पण गडावर जायच्या माझ्या हट्टापायी साडेतीन वाजता उठून माझ्या बरोबर यायचा! स्टेडी मित्र! अत्यंत मेथॉडिकल!!
पण आजुबाजूच्या निसर्गाचा त्याच्यावर फार काही परिणाम होत नाही, हे माझ्या लवकरच लक्षात आलं. महेश भराभर गड चढायचा! आपली एफिशियन्ट फुप्फुसं आणि आपण! बाकी कशाशी देणं नास्ति आणि घेणं नास्ति!
मी म्हणे, ‘अरे, आपण एवढं चढून जातो, तर थोडा वेळ गडावरच्या हवेत बसावं, पाहिजे असेल तर चहा प्यावा किंवा दही खावं! मग शांतपणे उतरावं!’ त्यावर तो म्हणत असे - ‘बुवा, एकदा अंग गार झालं की, मग खाली उतरावंसं वाटणार नाही’. श्रृतीमुळे महेशसुद्धा मला ‘बुवा’ म्हणायला लागला, ‘अहो-जाहो’ करायला लागला. मी मात्र त्याला ‘अरे-तुरे’च करतो. श्रृती त्याला ‘अहो-जाहो’ करत नाही, मी का करावं?
पावसाळ्यातला गड म्हणजे प्रत्येक क्षणी बदलत राहणारा जिवंतपणा! हवेमध्ये सूर मारणारे पक्षी, सकाळी झोपायला उशीर झाल्यामुळे उशीरापर्यंत किरकिरणारे रातकिडे, वेगवेगळ्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळका, आपल्या चमकत्या आणि ओल्या पंखांवरून तोंड फिरवणारे विविध रंगांचे वर्ख लावलेले किडे, यातील कशाचाही महेशवर काहीही परिणाम होत नसे. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून महेश गड चढताना पाठीच्या स्नायूंना ताण देऊन झाला आहे, आता उतरलो नाही तर पोटाच्या स्नायूंना व्यायाम होणार नाही, म्हणून उतरत असे!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
कधी श्रृती आली की, मातीमध्ये रांगणारे मृगाचे लालेलाल किडे हातात घेऊन मला दाखवत असे. मृगाचेच काय पण मोरपंखी, निळे, जांभळे, पिवळे ठिपके असलेले गुलाबी, अशा सगळ्या आकर्षक रंगांच्या किड्यांना उचलून ती आपल्या हाताच्या गोऱ्या तळव्यावर ठेवत असे. त्यांचे निरनिराळ्या रंगांचे वर्ख दाखवत असे. एखाद्या ज्ञानवंत आणि रसिक जोहऱ्यानं आपल्या तळव्यावर एक एक रत्न घेऊन दाखवावं, तसे. मला टेन्शन येत असे. एखादा विषारी किडा चावला, तर हे निसर्गप्रेम केवढ्याला पडायचं? तिला असलं टेन्शन-बिन्शन येत नसे. महेशला अर्थातच याचं काही नसे. तो आपला गड चढण्यात मग्न असे.
कधी श्रृतीचा नवरा राजा उत्तूरकर येत असे. हे अजून एक विचित्र प्रकरण. तो शिवाजी महाराजांचा निस्सीम भक्त. गड चढताना राजाभाऊंच्या डोक्यात इतिहास किंवा ऐतिहासिक कादंबऱ्या असत. कधी पाय दुखायला लागले की, राजा ‘श्रीमान योगी’मधलं शिवाजी महाराजांच्या तोंडचं वाक्य अत्यंत ष्टायलीमध्ये म्हणत असे - “सगळी उमर गड-किले चढण्यात आणि उतरण्यात गुजरली, पण आता वय झालं पंत. शरीराचा तेवढा मगदूर राहिला नाही आता!”
...........................................................................................................................................
प्रेमाच्या आनंदाचं सार म्हणजे जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा आपण अर्थहीन जगत आहोत, असं आपल्याला वाटत नाही. सार्त्र आपल्या प्रेयसीला लिहितो - “तू माझ्या जीवनतली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस, असं मी म्हणू शकत नाही - कारण तुला भेटल्यावर माझे आयुष्य माझे राहिलेले नाही. आता तू माझ्यातच असतेस सदोदित, मी म्हणजेच तू आहेस.” प्रेम आपल्याला आपलं अस्तित्व विसरायला लावते. जी गोष्ट आपल्याला आपलं अस्तित्व विसरायला लावते, त्या गोष्टीमध्ये अर्थ आहे, असं आपल्याला वाटतं का?
...........................................................................................................................................
मला भयंकर हसू यायचं! माणसानं इतिहासात किती राहावं? क्षणोक्षणी बदलणारा निसर्ग नाही, भावभावनांची कारंजी नाहीत, तत्त्वज्ञान नाही - नुसताच इतिहास! मी श्रृतीजवळ राजाला हसायचो. ती भडकायची. ती भडकली की, मला अजून हसू यायचं. राजा प्रिन्सिपॉल असल्याने मी त्याला ‘अहो-जाहो’ करावं, असं श्रृतीचं म्हणणं असायचं. राजा मित्र म्हणून येतो, मग आम्ही त्याला प्रिन्सिपॉल म्हणून का वागवावं, असा माझा प्रश्न असायचा! शेवटी मी एक तोडगा काढला. श्रृती असताना राजाला मी ‘अहो, राजाभाऊ’ असं म्हणू लागलो. तिच्या मागे मी त्याला ‘अरे-तुरे’ करू लागलो.
कुठल्या तरी एकाच एका आदर्शात रमलेलं हृदय म्हणजे मोठं बोअर काम असतं. डब्ल्यू. बी. येट्स त्याचा ‘इस्टर नाईन्टीन सिक्सटीन’ या कवितेत अशा लोकांना प्रवाहात पडून राहिलेल्या धोंड्यावर प्रेम बसलेल्या लोकांची उपमा देतात. अशा लोकांना पाण्याचा जिवंत खळखळाट दिसत नाही, लाटांचं नर्तन दिसत नाही, पाण्याची शीळ ऐकू येत नाही, प्रवाहात पडलेल्या ढगांचं प्रतिबिंब दिसत नाही. एकाच एका ओल्या धोंड्यामध्ये हे लोक अडकून पडलेले असतात.
मला खरं तर राजावर कॉमेंट करायचा काही अधिकार नव्हता. श्रृती जगात रमली होती, तसा राजा इतिहासात रमला होता. पण इतिहास जिवंत नसल्यामुळे मला राजाचं हसू येत असे. कधी वाटायचं - राजासाठी इतिहास जिवंतसुद्धा असेल. आपण कोण ठरवणारे?
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
बहुतेक वेळा गडावर जायला मी आणि महेशच असायचो. गड चढून झाला की, मी वर हॉटेलात एकटा बसू लागलो. बसलो की, तो तरतरीत मुलगा समोर दही आणून ठेवू लागला. हळूहळू ओळख झाली. हा संतोष यादव. साडे-पाच फुट उंचीचा, गोरटेला, शेलाटा, उमदा तरुण. शर्ट-पँट आणि चप्पल असा पेहराव. हालचालीत एक वेग होता, आक्रमण होते. डोळ्यात मिश्किल भाव होते.
लवकरच आमची दोस्ती झाली. त्याच्या लक्षात आलं की, मला परफेक्ट लागलेलं दही हवं असतं. थोडं आंबट, थोडं गोड अशा चवीचं घनदाट दही. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, प्रत्येक ऋतूत दही लावण्याचे हिशोब वेगळे असतात. मला सकाळी सात वाजता परफेक्ट लागलेलं दही द्यायचं असेल, तर प्रत्येक ऋतूत रात्री किती वाजता दही लावायला लागतं, हे संतोषला माहीत झालं होतं. रात्री दही लावून झाल्यावर ते चुलीच्या उबेमध्ये कसं ठेवायला लागतं, हे त्यानेच मला सांगितलं.
संतोषचं स्वतःचं हॉटेल नव्हतं. तिथल्या दोन-तीन हॉटेलच्या मालकांबरोबर त्याने आपलं बस्तान बसवलं होतं. दही विकता विकता त्यांना मदत करणं, त्यांच्या हॉटेलात गिऱ्हाइकं बोलावून आणणं वगैरे कामे तो करत असे. गिऱ्हाइकं वाढली तर भज्यांसाठी कांदा कापून देणं, अशी कामं तो करत असे. या बदल्यात आणि गावातल्या मैत्रीखातर ते लोक त्याला त्यांच्या हॉटेलात आलेल्या लोकांना दही विकू देत.
...........................................................................................................................................
आयुष्याला अर्थ नाही, असं मनापासून वाटल्याशिवाय कोणी आत्महत्या करत नाही. हा ‘शून्यवाद’, ‘निहिलिझम’ झाला. आयुष्याला अजिबात अर्थ नाही, असं ‘शून्यवादी’ म्हणतात. याला उत्तर म्हणून सार्त्र वगैरे अस्तित्ववादी म्हणतात, आपणच आपल्या आयुष्याला अर्थ द्यायचा असतो. संतोषने तसा अर्थ त्याच्या कळत-नकळत दिलाही होता. पण, आयुष्याच्या रेट्यापुढे तो ‘शून्यवादा’च्या भोवऱ्यात अडकून बुडाला.
...........................................................................................................................................
या हॉटेल मालकांच्या आया आणि बायका ही हॉटेलं चालवत. त्यांच्याशी संतोषचे अतिशय चांगले संबंध होते. कधी संतोष दिसला नाही की, विचारत असे. त्या बायकातलं कुणीतरी हसून म्हणे- ‘हिथंच कुटंतरी असंल मुडदा’. संतोषला ते ऐकू गेलं, तरी त्याचं काही म्हणणं नसे. हसून म्हणायचा, ‘कांदा कापून हवा असंल की, लगंच बोलंल मावशी ग्वाड!’
संतोष अतिशय सावध नजरेचा होता तेव्हा! पार खाली पश्चिमेकडच्या दरीत त्याचं मोरदरी हे गाव होतं. त्या गावातली घरं वरून अगदी छोटी छोटी दिसायची. संतोष मला त्याचं घर दाखवायचा. मला काही दिसायचं नाही. मी आपला ‘हो हो’ म्हणायचो. वाटायचं, तो मला फसवत आहे. पण एके दिवशी गडावरून आपल्या घराकडे बघताना तो अस्वस्थ झाला. दारात बांधलेली म्हैस सुटलेली त्याला दिसली. वरून त्याने हातवारे वगैरे केले. घरात असलेल्या बायकोला याचे हातवारे कसे दिसावे? संतोषने तिला मोबाईल केला. एक्साईट झालेला संतोष तिला म्हणाला - ‘अगं म्हस सुटलीय बग’.
मी संतोषचा मोबाईल माझ्या हातात घेतला. पलीकडून बोलणाऱ्या कल्याणीताईंना विचारलं - ‘खरंच सुटली आहे म्हैस?’ त्या म्हणाल्या - ‘व्हय आताच सुटलीय. ह्ये काय बांदते तिला आता.’
म्हणजे संतोषला खरंच म्हैस सुटलेली दिसली होती इतक्या वरून!
‘आपली नजर तेज आहे लई’ - संतोष अभिमानानं म्हणाला. मी विश्वास ठेवला नाही म्हणून संतोष दुखावला होता.
संतोषची नजर चौफेर असे. गिऱ्हाईक कुठल्या दिशेनं येत आहे, कोण कुठे गाडी लावत आहे, या सगळ्याकडे त्याचं लक्ष असायचं. माझ्याशी बोलता बोलता तो सगळीकडे लक्ष ठेवून असायचा. कधी माझं एखादं वाक्य तोडून एकदम म्हणायचा - ‘दमा आलो वाईच जाऊन!’ पटकन जायचा आणि गिऱ्हाईक गळाला लावायचा. पार्किंग वगैरेवरून भांडणं लागली असतील, ती सोडवायचा आणि गप्पा मारायला परत यायचा.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
सगळ्यात मजा हिवाळ्यात यायची. खाली गावातली पोरं रानडुकराच्या शिकारीला निघायची.
खालच्या दरीच्या तीन सोंडांवरून हा शिकारीचा खेळ चालायचा. पाच सहा कुत्री आणि दहा-बारा पोरं दरीत आलेल्या एखाद्या रानडुकराचा ताना काढायची -पाठलाग करायची.
एकदा माझ्याशी बोलता बोलता संतोष उठला आणि शंभर-दोनशे फूट पळत गेला. सोंडेच्या टोकावरून खाली पाहू लागला. भयंकर एक्साईट झालेला. मीसुद्धा पळत जायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. इतक्या उंच सखल जमिनीवरून पळणार कसं? मी एक एक पाऊल जपून टाकत त्याच्याजवळ जाऊन उभा राहिलो. संतोषला खाली चाललेली शिकार वरून दिसत होती. मला तो सांगू लागला, रानडुक्कर कुठे आहे. त्याला कसं ट्रॅप केलं जात आहे.
वेगवेगळ्या दिशांनी आरडाओरडा करून रानडुकराला कुठल्या तरी एका दिशेला न्यायचं. कुठल्या तरी एका बेचक्यात ट्रॅप करायचं. एक दोघांकडे डबल बार असायची. डुक्कर व्यवस्थित ट्रॅप झालं आणि टप्प्यात आलं की, बंदूक चालणार.
...........................................................................................................................................
मला संतोषविषयी खूप वाईट वाटत होतं, आता श्रृतीबद्दल वाईट वाटून गेलं. श्रृती आता फक्त काऊन्सिलर म्हणून उरली होती. मला आजकाल तिचे फोन्स बोअर होऊ लागले. वाटलं, तिला दलाई लामांचं वाक्य पाठवावं - “If you want others to be happy, practice compassion. If you want to be happy, practice compassion.” तुम्हाला इतरांच्या आयुष्यात आनंद आणायचा असेल, तर करुणामय होऊन जा. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात आनंद आणायचा असेल, तरीही करुणामय होऊन जा!
...........................................................................................................................................
संतोषला सगळे लोक, सगळी कुत्री, बंदूकवाले आणि मुख्य म्हणजे ते रानडुक्कर असं सगळं दिसत होतं. मला प्रयत्न करूनही काही म्हणता काही दिसत नव्हतं. एकतर पळणारी पोरं वरून हाताच्या अंगठ्याएवढी दिसत होती. कसं दिसणार मला ते सगळं? संतोष शिकारीची ‘रनिंग कॉमेंट्री’ करत होता- ‘त्यो बगा तो पोरग्या थिकडनं येतोय, हिकडनं दोन कुत्री भुकतायत बगा. त्ये बगा… डुक्कर तिकडनं पळाया लागलंय…’ संतोष एकदम चिडला आणि ओरडला - “आरं फिरलं फिरलं फिरलं बगा’. डुकरानं नको त्या दिशेला मुसंडी मारली होती.
संतोष वरून हातवारे करत, कर्कश्श्य शिट्ट्या वाजवत खालच्या पोरांना सूचना देत होता. त्या त्यांना इतक्या खाली कशा कळाव्यात? हा काय बोलतो आहे, हे खालच्या पोरांना कळत नव्हतं आणि मलाही कळत नव्हतं. संपूर्ण फ्रस्ट्रेशन! संपूर्ण निराशा! संतोषचा श्वास वाढला होता. त्याला सगळं दिसत होतं. त्या शिकारीचं त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं, पण काय करावं?
‘हा खेळ आता किती वेळ चालणार’ - मी विचारलं. ‘आता त्याला कोन सोडतंय! पार अंधार पडूसपर्यंत हुणार ह्यो खेळ आता’, संतोष म्हणाला. सकाळचे आठ वाजले होते. अंधार पडेपर्यंत ते भूमीपुत्र त्या दऱ्याखोऱ्यातून, खाचखळग्यांतून आणि त्या काट्याकुट्यांतून पळणार होते. रानडुकराच्या आत्मरक्षणाच्या प्रेरणेशी बुद्धिबळ खेळणार होते.
मला काही कळत नव्हतं, म्हणून संतोष माझ्याशी बोलेनासा झाला. मी परत फिरलो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
श्रृती तिच्या आयुष्यात रमून गेली होती, संतोष त्याच्या आयुष्यात रमून गेला होता. दोघांच्याही आयुष्यात ‘मॅजिक’ होतं. दोघंही अत्यंत सतर्क होते. अत्यंत तीव्र संवेदना घेऊन जन्माला आले होते. या निसर्गातल्या आणि या मानवी आयुष्यातल्या ‘मॅजिक’शी एकरूप होऊ शकत होते.
तसं पाहिलं तर राजासुद्धा शिवाजी महाराजांशी एकरूप होऊन गेला होता. मला कित्येक वेळा वाटत असे की, गेल्या जन्मात राजा नक्कीच शिवाजी महाराजांचा मावळा असणार. त्याने अगदी हसत हसत आपला प्राण शिवाजी महाराजांवरून ओवाळून टाकला असणार!
इतिहासकारांचा शिवाजी, बखरकारांचा शिवाजी, शाहिरांचा शिवाजी, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लोकांचा शिवाजी आणि खरा शिवाजी, असा कुठलाही फरक राजाच्या डोक्यात नव्हता. शिवाजी हा त्याच्यासाठी एक ‘ग्रँड रोमान्स’ होता. एक एकसंध, अतिसुंदर रोमान्स!
सार्त्रचं एक वाक्य आहे - ‘Freedom is what you do to what has been done to you!’ स्वातंत्र्य म्हणजे जीवनाचा जो खेळ तुमच्याशी कुणीतरी केला आहे, त्या जीवनाशी तुमच्या मनाला येईल तो खेळ तुम्ही करणं! थोडक्यात आपल्या आयुष्याला जो काही अर्थ आपल्याला द्यावासा वाटतो, तो आपण बिनधास्त द्यायचा!
महेशसुद्धा श्रृती, संतोष आणि राजा यांच्यासारखाच रमलेला होता का? महेश आपल्या फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत मनापासून रमलेला होता? की, त्याची इतर लोकांच्या फुप्फुसांशी फक्त शर्यत सुरू होती?
मला श्रृती आणि संतोष यांचं रमणं, राजा आणि महेश यांच्या रमून जाण्यापेक्षा श्रेष्ठ वाटत होतं. श्रृती आणि संतोष त्यांच्या आजूबाजूच्या जिवंतपणामध्ये रमले होते. राजा स्वतःच्या मनात रमला होता आणि महेश स्वतःच्या शरीरात.
...........................................................................................................................................
मधल्या काळात श्रृतीने मला पळता भुई थोडी केली. माझ्या मनाचे अनेक आजार त्या काळात तिने मला सांगितले. अगदी आज मी या लेखाचा विषय तिला सांगितला. म्हटलं, जीवनातील ‘मॅजिक’ हा विषय आहे. श्रृती मला म्हणाली, ‘बुवा, तुम्हाला अँग्झायटी आहे, तुमच्यासारख्या लोकांना आपल्या आयुष्यात ‘मॅजिक’ असावं असं वाटतं!’ माझं डोकं फिरलं. मी तिला गडकऱ्यांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता पाठवली.
...........................................................................................................................................
स्वतःच्या मनात किंवा शरीरात रमण्यापेक्षा निसर्गात रमणं मला श्रेष्ठ वाटत होतं, कारण त्यासाठी तीव्र संवेदना, तीव्र बुद्धीची गरज होती. आपल्या अस्तित्वाच्या बाहेरच्या जगामध्ये ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायचं असेल तर भावनिकदृष्ट्या जास्त जिवंत असणं गरजेचं होतं.
शेवटी रमणं ‘इन इटसेल्फ’ महत्त्वाचं नाही, असं मला वाटत होतं. ‘कलेसाठी कला’ हा पटणारा विचार आहे. त्याच धर्तीवर रमायचं म्हणून रमणं, हा विचार योग्य आहे का? मी विचार करत राहायचो!
मी स्वतः यात कुठेच बसत नव्हतो. या सगळ्यांच्या रमण्यामध्ये मी प्रतवारी ठरवत असलो, तरी मी त्यांच्यासारखा जिवंत नव्हतो. श्रृती, संतोष, राजा आणि महेश यांच्या प्रवाहाच्या काठावर पडून राहिलेला धोंडा होतो मी एक! सिगारेटी ओढणारा धोंडा!
मी लेखन वगैरे करत होतो, नाटकांमधून विविध भावना रंगवत होतो, म्हणून मी भावनिकदृष्ट्या संपृक्त असेन, असं श्रृतीला वाटत होतं. त्यामुळे तिने माझ्याशी मैत्री केली होती. भावनांची संपृक्तता तिला हवी होती. त्या संदर्भातले काहीतरी ‘क्लू’ माझ्याकडून मिळतील, असं तिला वाटलं होतं, पण मी एक धोंडा होतो फक्त. भावनांची चित्रं काढायला फार काही लागत नाही. थोडी शब्दकळा, थोडी संवेदना असली की, काम भागतं. मला इतरांच्या भावना कळत होत्या, त्यांची चित्रं मी काढू शकत होतो, पण माझ्या स्वतःच्या भावना मी ‘हॅंडल’ करू शकत नव्हतो.
सुंदर स्त्रियांची सुंदर छायाचित्रं काढणारा छायाचित्रकार स्वतः सुद्धा सुंदर असेल, असा विचार करण्यासारख्या श्रृतीच्या अपेक्षा होत्या.
तुकारामाची जी अवस्था देवाविषयी होती, ती माझी भावनिक संपृक्ततेविषयी होती-
‘वाचेच्या चापल्ये बहु झालो कुशळ।
नाही बीज मूळ हाती आले।।’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
मानवी आयुष्याच्या अर्थहीनतेचा फवारा तोंडावर बसला की, निराशेचा एक ढग नाही म्हटलं, तरी आपल्या मनामध्ये कायमचा राहायला येतो. आपल्या आयुष्याला अर्थ आहे, असं वाटत राहणं आनंदाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असतं.
माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की, एकूण मानवी आयुष्याला अर्थ आहे की नाही, हा प्रश्न फार महत्त्वाचा नाहीये. आयुष्यात अर्थ आहे की नाही, या विषयी आपल्याला काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे. कारण, आपल्या तोंडावर बसलेला एकूण अर्थहीनतेचा फवारा जरी खरा असला तरी, या जगात विविध प्रकारे रमून जाणं तेवढंच खरं असतं.
सार्त्र असो किंवा काम्यू असो किंवा अजून कोणी- मानवाच्या आपल्या आयुष्यात रमून जाण्याचं गूढ ते सोडवू शकले नाहीत. मूलतः अर्थहीन असलेल्या मानवी जीवनात लोक इतके का रमून जातात? पण एक गोष्ट खरी की, रमून जाण्यामधलं सौंदर्य कुणी नाकारू शकत नाही.
जिथं सौंदर्य आहे, तिथं अर्थ आहे, असं मला वाटू लागलं. पण गंमत अशी होती की, एवढं सगळं कळत असूनही मी स्वतः कशामध्येही रमू शकत नव्हतो. मला श्रृती वगैरे लोकांविषयी फार आश्चर्य वाटत असे. त्यांचे चेहरे आनंदी होते. त्यांनी माझ्याशी केलेली मैत्री खरी होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
गडाचं बोलायचं झालं, तर संतोष माझं काही अडू देत नव्हता. दरड वगैरे कोसळली असली आणि खाली यायला जीप वगैरे नसतील, तर संतोष मला त्याच्या मोटरसायकलवर सोडत असे. पडलेल्या दरडीच्या अस्ताव्यस्त दगडांमधून वाट काढत मला खाली पोहचवत असे. म्हैस व्याली की, चिकाचं दूध माझ्या मुलींसाठी आठवणीने घेऊन येत असे.
पहिल्यांदा चीक आणला, तेव्हा मी विचारलं, ‘पैसे किती द्यायचे?’
संतोष म्हणाला - ‘मुस्काटात हाना आता माज्या!’
मी म्हटलं - ‘का?’
तो म्हणाला - ‘चीक मी मुलींसाठी आणलाय, त्याचे पैशे घिऊ काय?’
गडावरचे जीपवाले, दहीवाले, हॉटेलवाले... सगळ्यांना माझी आणि संतोषची मैत्री माहीत झाली होती. श्रृती आणि माझी मैत्रीसुद्धा प्रसिद्ध झाली होती, पण काही कळायच्या आत हे दोघंही माझ्यापासून दूर गेले.
संतोषला श्रीमंत व्हायचं होतं. तो म्हशींच्या नादी लागला. मोठ्या मोठ्या, भारी भारी म्हशी! मेहसाणा, जाफराबादी अशा जातिवंत आणि महागड्या म्हशी! शेजारच्या गावात कुणी जगताप की, गायकवाड नावाचे म्हैस-तज्ज्ञ होते. त्यांना घेऊन गुजरातमध्ये मेहसाणा किंवा हरियाणामध्ये कर्नाल वगैरे ठिकाणी जायचे. त्यांच्या सल्ल्याने भारीमधल्या म्हशी आणायच्या. एकेका म्हशीची किंमत सत्तर-पंचाहत्तर हजार रुपये. संतोष डोळे विस्फारून म्हशी आणि ते म्हैस-तज्ज्ञ यांच्याबद्दल बोलायचा. ‘महाभारतकार’ ज्या आदरानं ‘महाभारतामध्ये अश्वपरीक्षकांबद्दल बोलतात, त्यापेक्षा जास्त आदरानं संतोष म्हैस-तज्ज्ञांबद्दल बोलत असे.
...........................................................................................................................................
आपल्या भावना आपल्याला काही किंमत भरायला लावतात. ती दुःखाच्या स्वरूपात भरावी लागणं, एलिसला मान्य नव्हतं. तसं होत असेल, तर आपण ‘रॅशनल’ विचार करायचा आणि त्या भावनेला दूर करायचं. म्हणजे, एखादं प्रेम तुमच्या आयुष्यात दुःख तयार करत असेल, तर त्या प्रेमाला बाजूला करायचं, हे असले विचार श्रृती मला प्रत्येक भेटीमध्ये सांगू लागली. त्या चर्चांमध्ये ‘बुवा, या अमुक एका भावनेचा ‘कॉस्ट पे’ जास्त आहे’ अशी वाक्यं डोकावू लागली. आमची ‘भावनांची सम्राज्ञी’ आता ‘भावनांची व्यापारी’ बनली होती.
...........................................................................................................................................
त्याने सुरुवातीला दोन म्हशी आणल्या! पण लवकरच त्यांच्या सडांमध्ये गाठी होऊन त्या बाद झाल्या. प्रचंड नुकसान! वीस रुपयांचं एक मडकं विकून फायदा किती आणि बाद झालेल्या म्हशीमधून होणारं नुकसान किती! त्याने परत उमेद धरली आणि अजून काही म्हशी आणल्या. त्यांचीही तीच अवस्था झाली. संतोष खचला. दारू पिऊ लागला. हळूहळू पूर्ण दारूच्या आहारी गेला. लोक हळहळले!
संतोषच्या चेहऱ्यावरचं तेज गेलं. संतोष व्यवहाराला चोख होता, आता तो हिशोब चुकवायला लागला. दह्याचे दीडशे रुपये झाले आणि आपण दोनशे दिले, तर सुट्टे पुढच्या रविवारी देऊ म्हणून चुकवायला लागला. म्हशीचा चीक मुलींसाठी आणला, तरी त्याचे अव्वाच्या सव्वा पैसे मागायला लागला. सगळी मजा गेली.
हळूहळू महेशचं गडावर येणं बंद झालं. त्याच्या पत्नी कल्याणीवहिनी दही घेऊन गडावर येऊ लागल्या. एकदा मी संतोषच्या आईला कल्याणी वहिनींसमोर म्हटलं, असं काय झालं संतोषचं? त्या शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या - ‘वाया गेला पोरगा!’ त्यांनी आणि कल्याणी वहिनींनी संतोषचं वाया जाणं स्वीकारलं होतं. त्यांच्या डोळ्यात मालकाचा मार खाणाऱ्या गाईची शांतता होती. माझ्या पोटात भयंकर कालवलं!
गेल्या तीन वर्षांत संतोष एकदा-दोनदा भेटला. दोन्ही वेळा पायाला लागलं होतं. दारू पिऊन गाडीवरून पडणं नित्याचं झालं होतं. कधीतरी रात्री दारू पिऊन फोन करायचा- ‘खेकडं धरल्यात, उद्याच्याला या खायाला, उद्या जत्रा आहे या जत्रंला’... या अशा प्रकारची आमंत्रण द्यायचा. मैत्रीला जागायचा प्रयत्न करायचा.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
याच काळात श्रृती माझ्यापासून दूर गेली. तिने सायकॉलॉजीचा अभ्यास सुरू केला. हळूहळू विविध कोर्सेस केले. पुढे सायकॉलॉजीमध्ये एम. ए.सुद्धा केलं. भावभावना हा तिचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आजुबाजूच्या विविध व्यक्तींच्या भावजीवनावर ती माझ्याशी तासन् तास बोलत असे. आता तिला तिच्या आवडीचं क्षेत्र मिळालं होतं. हळूहळू ती काऊन्सिलिंग करू लागली. तिच्या तिच्या नव्या आवडीमध्ये रमून गेली. राजाही आता निवृत्त व्हायला आला होता. निवृत्तीनंतर आपण काही करणार नाही, हे त्याने जाहीर केलं होतं. त्यामुळे वाढत्या महागाईमध्ये आपलं काय होणार, अशी किंचित चिंता श्रृतीला होती, परंतु आता तिला काऊन्सिलिंगमधून चांगले पैसे मिळू लागले.
संतोषप्रमाणे तीसुद्धा अधूनमधून मेसेज करत असे, मैत्रीला जागायचा प्रयत्न करत असे. आम्ही कधी भेटतही असू. त्यात मला एक गोष्ट जाणवली. तिच्या डोळ्यामधली मजा, रत्नप्रभा निघून गेली होती. मी तिला तसं सांगितलंदेखील. मधल्या काळात सायकॉलॉजीने तिच्यामध्ये खूप बदल केले होते. भावभावनांविषयी ती ‘टेक्निकल टर्म्स’मध्ये बोलू लागली होती. बोलण्यात आत्मविश्वास वाढला होता, पण उत्स्फूर्तता निघून गेली होती. तिला त्याचं भान नव्हतं. तिचं बोलणं या काळात फार ‘प्रेडिक्टेबल’ होऊन गेलं. लोकांच्या नातेसंबंधात निर्माण झालेले प्रश्न, या शिवाय दुसरा विषय राहिला नाही. पूर्वी ती त्याविषयी बोलायची, त्यात प्रेम असायचं, जीवनाचा आस्वाद असायचा.
श्रृती आता लोकांच्या आयुष्यातील किरकिरींचं विश्लेषण करू लागली. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, इंदिरा संत आणि जी. ए. कुलकर्णी असे तिचे लाडके विषय बासनात गेले. अल्बर्ट एलिस वगैरे ‘स्यूडो विचारवंत’ चलनात आले. जीवनात आनंद मिळवणं, हे एकच एक ध्येय आहे आणि ‘रॅशनल’ विचार केले असता, भावनिक पाश त्रास देत नाहीत, एवढ्या एका क्षुद्र विचारावर रचला गेलेला सगळा अल्बर्ट एलिस या मानसोपचाराचा डोलारा.
...........................................................................................................................................
संतोषला श्रीमंत व्हायचं होतं. तो म्हशींच्या नादी लागला. मोठ्या मोठ्या, भारी भारी म्हशी! मेहसाणा, जाफराबादी अशा जातिवंत आणि महागड्या म्हशी! शेजारच्या गावात कुणी जगताप की, गायकवाड नावाचे म्हैस-तज्ज्ञ होते. त्यांना घेऊन गुजरातमध्ये मेहसाणा किंवा हरियाणामध्ये कर्नाल वगैरे ठिकाणी जायचे. त्यांच्या सल्ल्याने भारीमधल्या म्हशी आणायच्या. एकेका म्हशीची किंमत सत्तर-पंचाहत्तर हजार रुपये. संतोष डोळे विस्फारून म्हशी आणि ते म्हैस-तज्ज्ञ यांच्याबद्दल बोलायचा. ‘महाभारतकार’ ज्या आदरानं ‘महाभारतामध्ये अश्वपरीक्षकांबद्दल बोलतात, त्यापेक्षा जास्त आदरानं संतोष म्हैस-तज्ज्ञांबद्दल बोलत असे.
...........................................................................................................................................
आपल्या भावना आपल्याला काही किंमत भरायला लावतात. ती दुःखाच्या स्वरूपात भरावी लागणं, एलिसला मान्य नव्हतं. तसं होत असेल, तर आपण ‘रॅशनल’ विचार करायचा आणि त्या भावनेला दूर करायचं. म्हणजे, एखादं प्रेम तुमच्या आयुष्यात दुःख तयार करत असेल, तर त्या प्रेमाला बाजूला करायचं, हे असले विचार श्रृती मला प्रत्येक भेटीमध्ये सांगू लागली. त्या चर्चांमध्ये ‘बुवा, या अमुक एका भावनेचा ‘कॉस्ट पे’ जास्त आहे’ अशी वाक्यं डोकावू लागली. आमची ‘भावनांची सम्राज्ञी’ आता ‘भावनांची व्यापारी’ बनली होती.
मी वैतागलो. दुःखांपासून इतकं पळायचं तत्त्वज्ञान म्हणजे, येशु ख्रिस्त, गांधीजी आणि अगदी तुकाराम असे सगळे गेले बाराच्या भावात!
पण अशा वेळी आपण काय बोलायचं? मी गप्प बसायचो.
माणूस ज्ञानाच्या शोधात वा जीवनाच्या अर्थाच्या शोधात, विविध विचारवंतांच्या आहारी जातो. असं झाली की, निदान सुरुवातीला तरी त्याच्या आयुष्यात गोंधळ वाढतो. माझ्याही आयुष्यातला गोंधळ असाच वाढला होता. मी श्रृतीच्या गोंधळाला का हसावं?
अल्बर्ट एलिसच्या आहारी जाणं, हे तिच्या वैचारिक प्रगतीच्या मार्गामधलं एक विवर होतं. ते त्याचा त्याचा एक वेळ घेणार होतं. आणि त्याच वेळी त्याची स्वतःची एक किंमत ते वसूल करणार होतं. सिनिकल विचार वाढल्यामुळे तिच्या डोळ्यामधली रत्नप्रभा निघून गेली होती.
संतोषचे ते तसं झालं, श्रृतीचं हे असे!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
मधल्या काळात श्रृतीने मला पळता भुई थोडी केली. माझ्या मनाचे अनेक आजार त्या काळात तिने मला सांगितले. अगदी आज मी या लेखाचा विषय तिला सांगितला. म्हटलं, जीवनातील ‘मॅजिक’ हा विषय आहे. श्रृती मला म्हणाली, ‘बुवा, तुम्हाला अँग्झायटी आहे, तुमच्यासारख्या लोकांना आपल्या आयुष्यात ‘मॅजिक’ असावं असं वाटतं!’
माझं डोकं फिरलं. मी तिला गडकऱ्यांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता पाठवली. त्यातल्या - ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’, या ओळी मी ‘हाईलाईट’ केल्या. आणि विचारलं- ‘विजेच्या प्रेमानं भारलेल्या आलिंगनाच्या मिठीचं ‘मॅजिक’ हाती लगावं म्हणून आयुष्यभर झुरणाऱ्या वृक्षाला कसली ‘अँग्झायटी’ होती? ही कविता लिहिणाऱ्या गडकऱ्यांना कसली ‘अँग्झायटी’ होती?’
काही उत्तर आलं नाही.
‘प्रेम आणि मरण’मध्ये वृक्ष झडून गेलेला असतो, कारण त्याला विजेचं प्रेम हवं असतं. तिची मिठी हवी असते. शेवटी त्याला वीज मिठी मारते. तो जळून जातो. कोसळतो. पण पडता पडता पुन्हा एकदा बहरून जातो आणि मग जळतो.
या वृक्षाला अल्बर्ट एलिसने सांगितलं असतं - ‘कसली वीज आणि कसलं दिव्य प्रेम गड्या, तुला प्रेम करायला या जगात दुसरं कोणी मिळत नाहिये का? बाजूला सार ते प्रेम. थोडी पाने फुटू दे तुला. किडकी तर किडकी!’
ही कविता पाठवल्यावर दुसऱ्या दिवशी श्रृतीला मर्ढेकरांची ‘दवात आलीस भल्या पहाटे’ ही कविता पाठवली-
‘दवांत आलीस भल्या पहाटे
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुन पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे ?
लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!’
शेवटून दुसरं कडवं मी हायलाईट केलं होतं. म्हटलं, आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांमधल्या आरक्त डाळिंबांच्या मॅजिकचा पारा हातात धरावा, असं वाटणाऱ्या मर्ढेकरांना कसली अँग्झायटी होती?
तिचा मेसेज आला - ‘बुवा, तुम्ही बावळट आहात.’
मी गप्प बसलो. म्हटलं जाऊ दे. ती स्वतःच्या नव्या आयुष्यावर खुश आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
परवा अचानक मित्राचा फोन आला की, संतोष गेला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मी श्रृतीला फोन केला. बातमी सांगितली. ती म्हणाली, ‘बुवा, सुटले असतील त्याच्या घरचे. मी अशा खूप केसेस बघितल्या आहेत.’
मला संतोषविषयी खूप वाईट वाटत होतं, आता श्रृतीबद्दल वाईट वाटून गेलं. श्रृती आता फक्त काऊन्सिलर म्हणून उरली होती. मला आजकाल तिचे फोन्स बोअर होऊ लागले.
वाटलं, तिला दलाई लामांचं वाक्य पाठवावं - “If you want others to be happy, practice compassion. If you want to be happy, practice compassion.” तुम्हाला इतरांच्या आयुष्यात आनंद आणायचा असेल, तर करुणामय होऊन जा. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात आनंद आणायचा असेल, तरीही करुणामय होऊन जा!
मला या वाक्यातून ती काय अर्थ काढेल, याचा अंदाज येईना. मी ते पाठवलं नाही. भावनिकदृष्ट्या आपल्याला जिवंत राहायचं असेल, तर आपल्या भावना आपल्याला करुणेच्या कोषात सुरक्षित ठेवायला लागतात. मी मनात म्हणालो, तिला जेव्हा हे सारं कळायचं असेल तेव्हा कळेल. आपण तिला शिकवायला का जायचं, आपलं तरी कुठे ठीक चाललं आहे?
परवा काम्यूचं एक वाक्य वाचनात आलं - “This very heart which is mine will forever remain indefinable to me. Between the certainty I have of my existence and the content I try to give to that assurance, the gap will never be filled. Forever I shall be a stranger to myself.”
भयंकर खरं वाक्य! आपल्या हृदयाचा नक्की अंदाज कुणाला आला आहे? आपण अस्तित्वात आहोत, एवढं नक्की. आपण काहीतरी विचार करून आपल्या हृदयाला आधार देत असतो. आपण कुठलाही अर्थ दिला, तरी आपल्या हृदयाला कधीही परिपूर्ण वाटत नाही. अस्तित्व आणि अर्थ यांच्यातील दरी भरून निघत नाही. आपण आपल्याला कायम ‘परके’ वाटत राहतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
श्रृती आणि संतोष दोघंही आपापल्या मार्गावर निघून गेले होते. मी त्यांच्याविषयी विचार करत राहिलो.
आयुष्याला अर्थ नाही, असं मनापासून वाटल्याशिवाय कोणी आत्महत्या करत नाही. हा ‘शून्यवाद’, ‘निहिलिझम’ झाला. आयुष्याला अजिबात अर्थ नाही, असं ‘शून्यवादी’ म्हणतात. याला उत्तर म्हणून सार्त्र वगैरे अस्तित्ववादी म्हणतात, आपणच आपल्या आयुष्याला अर्थ द्यायचा असतो. संतोषने तसा अर्थ त्याच्या कळत-नकळत दिलाही होता. पण, आयुष्याच्या रेट्यापुढे तो ‘शून्यवादा’च्या भोवऱ्यात अडकून बुडाला.
श्रृती खरं तर तिच्या नकळत का होईना, अतिशय सुंदरपणे ‘अस्तित्ववादी’ होती. तिने उत्स्फूर्तपणे तिच्या आयुष्याला अतिशय सुंदर सुंदर अर्थ दिले होते. पण आयुष्याच्या रेट्यापुढे ती पुढे आत्मप्रेमाकडे ओढली गेली. आपण सगळेच आपल्या कळत-नकळत, आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळी तत्त्वज्ञानं जगत असतो.
माझ्यासाठी श्रृती संपली आणि संतोषही संपला. राजा आणि महेश अजून आहेत, पण तेही जातील कधीतरी. त्यांचं रमणं, ही एक ‘मेमरी’ बनून राहील. सिंहगड मी असेपर्यंत गेला नाही, तरी वृद्धत्व मला त्याच्यापासून दूर करेल. मग कसलं ‘मॅजिक’ आणि कसलं काय? नुसताच स्वतःचा स्वतःबद्दलचा परकेपणा!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
हे सगळं चालू असतानाच दत्ता दंडगे या मित्राने तुकारामाचा एक ‘डेस्परेट’ अभंग पाठवला-
‘पाषाणाची खोळ घेऊनिदा बैसलासी । काय हृषिकेशी जाले तूज ।।’
अभंग बुडवले गेल्यावर तुकारामाने तेरा दिवस धरणे धरले होते, तेव्हाचा हा अभंग आहे. माझा विचार करायचा तर, इथं माझ्यासमोर सगळे आयुष्यच पाषाणाची खोळ पांघरून बसलं होतं. गेली कित्येक वर्षं!
काम्यूला पूर्णत्व हवं होतं, पण त्याने पूर्णत्वाची आशा सोडली होती. आपल्या हृदयाचं अपूर्णत्व स्वीकारलं. मीसुद्धा सगळी आशा सोडून देऊन काम्यूसारखी हृदयाची अपूर्णता स्वीकारावी का? की, तुकारामासारखे देवाला साकडं घालावं?
तुकारामाला विठ्ठलाने आपली दगडाची खोळ सोडून बाहेर यावं, असं वाटत होतं. मर्ढेकरांनासुद्धा देवाची दगडी भिवई स्वतःच्या डोळ्यांदेखत थोडी चळलेली बघायची होती-
‘… जगेन पोळत
फक्त तुझी जर दगडी भिवई
चळेल थोडी डोळ्यांदेखत!’
हे अल्बर्ट एलिसला कसं कळावं?
मर्ढेकर पोळत पोळतच जगले, पण जिवंत असेपर्यंत भगवंताची दगडी भिवई चळली नाही. डोळ्यांमधल्या डाळिंबांच्या पाऱ्याला हात न लावताच अपूर्ण हृदयाने मर्ढेकर गेले.
गडकरी आणि मर्ढेकर यांच्या ‘मॅजिक’च्या शोधात एक समान दुवा आहे- प्रेमाचा! स्त्री-पुरुषांच्या प्रेमाच्या नाट्यामध्ये आपल्याला ‘मॅजिक’ सापडेल, असं या दोघांना वाटतं. काम्यू आणि सार्त्रदेखील स्त्री-पुरुष प्रेमाविषयी ‘सेन्सिटिव्ह’ होते.
सार्त्रने लिहिलं आहे - ‘That is the essence of joy of love, when it exists: we feel justified to exist.’
प्रेमाच्या आनंदाचं सार म्हणजे जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा आपण अर्थहीन जगत आहोत, असं आपल्याला वाटत नाही.
सार्त्र आपल्या प्रेयसीला लिहितो - “तू माझ्या जीवनतली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस, असं मी म्हणू शकत नाही - कारण तुला भेटल्यावर माझे आयुष्य माझे राहिलेले नाही. आता तू माझ्यातच असतेस सदोदित, मी म्हणजेच तू आहेस.”
प्रेम आपल्याला आपलं अस्तित्व विसरायला लावते. जी गोष्ट आपल्याला आपलं अस्तित्व विसरायला लावते, त्या गोष्टीमध्ये अर्थ आहे, असं आपल्याला वाटतं का?
...........................................................................................................................................
स्वतःच्या मनात किंवा शरीरात रमण्यापेक्षा निसर्गात रमणं मला श्रेष्ठ वाटत होतं, कारण त्यासाठी तीव्र संवेदना, तीव्र बुद्धीची गरज होती. आपल्या अस्तित्वाच्या बाहेरच्या जगामध्ये ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायचं असेल तर भावनिकदृष्ट्या जास्त जिवंत असणं गरजेचं होतं. शेवटी रमणं ‘इन इटसेल्फ’ महत्त्वाचं नाही, असं मला वाटत होतं. ‘कलेसाठी कला’ हा पटणारा विचार आहे. त्याच धर्तीवर रमायचं म्हणून रमणं, हा विचार योग्य आहे का? मी विचार करत राहायचो! मी स्वतः यात कुठेच बसत नव्हतो. या सगळ्यांच्या रमण्यामध्ये मी प्रतवारी ठरवत असलो, तरी मी त्यांच्यासारखा जिवंत नव्हतो. श्रृती, संतोष, राजा आणि महेश यांच्या प्रवाहाच्या काठावर पडून राहिलेला धोंडा होतो मी एक!
...........................................................................................................................................
मारिया कासारेस ही अल्बर्ट काम्यूची प्रेयसी. ती त्याला लिहिलेल्या पत्रात लिहिते -
“मी प्रत्येक वेळी तुला मिठीत घेते, तेव्हा मी तुला पहिल्यांदाच मिठीत घेतलं आहे, असं मला वाटत असतं. तू जो आणि जसा आहेस, त्या तुझ्यावर मी प्रेम करते. आणि मुख्य म्हणजे, मी तुझ्या हृदयावर अलोट प्रेम करते. मी जेव्हा माझा आणि तुझा विचार करत असते, तेव्हा आपल्या शाश्वततेवर आणि अमरत्वावर विश्वास न ठेवणं, मला मूर्खपणाचं वाटू लागतं.”
म्हणजे जी गोष्ट आपल्याला काळ विसरायला लावते, ती आयुष्यातील मृत्यूचासुद्धा प्रश्न सोडवते, असं म्हणता येईल का?
मला स्वतःला प्रेमात पडून कित्येक दशकं झालेली. खूप त्रोटक आठवणी उरल्या आहेत. एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो - मी प्रेमात पडलो होतो, त्या काळात मला सार्त्र, काम्यू, मर्ढेकर, तुकाराम, यातलं काहीच वाचावंसं वाटलं नसतं.
प्रेम हे या मर्त्य जगातलं ‘ग्रेट मॅजिक’ आहे, या बाबतीत कोणाचंच दुमत होण्याची काहीच शक्यता नाही. पण जिवंत प्रेम फार काळ टिकत नाही. त्याची जादू आणि उत्कटता फार काळ टिकत नाही. प्रेमातून मिळणारा अर्थ आणि अमरत्वाचा फील फार थोडा काळ टिकतो.
सॉरेन कर्कगार्डने प्रेमाचा अजून एक प्रॉब्लेम फार सुंदर पद्धतीनं सांगितला आहे- “Love is the expression of the one who loves, not of the one who is loved.” प्रेम हा एक आविष्कार असतो. जी व्यक्ती प्रेम करत असते, तिचा आविष्कार असतो तो.
थोडक्यात, आपलं प्रेम म्हणजे आपली स्वतःची गोष्ट असते. आपणच आपल्याला सांगितलेली गोष्ट! ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, तिचा या आपल्या ग्रेट आविष्कारात काहीच सहभाग नसतो.
एकतर्फी प्रेम एकतर्फी असतंच, पण आपल्याला दुतर्फी वाटणारं प्रेमसुद्धा मूलतः एकतर्फीच असतं. हे सारं मला फार लहान वयात कळून चुकलं होतं. मी विचार करायचो - आपण पुण्यात आहोत, म्हणून या मुलीच्या प्रेमात पडलेलो आहोत. आपण दुसऱ्या कुठल्या देशात असतो, तर आपण दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडलो असतो. अस्सेच आणि इतकंच!
प्रेमानं हृदय भरून जातं आणि नंतर पुन्हा रितं होतं! मध्यम वयातच काय, पण अगदी म्हातारपणी लोक नवे प्रेम शोधत असतात. त्यांना पुन्हा तो पूर्वीचा पूर्णत्वाचा ‘एहसास’ हवा असतो. त्यांना परत एकदा असं प्रेम मिळालं, तरी हे नवे प्रेमसुद्धा पूर्वीच्या प्रेमासारखं अल्पायू असणार आहे, हे त्यांना कळत नाही. लोक खरं तर पूर्णत्वाच्या शोधात बाहेर पडलेले असतात आणि गल्ली चुकल्यामुळे प्रेम शोधत राहतात!
मी आता आयुष्यात खूप चालून पुढे आलो आहे. चांगल्या आणि वाईट भावनांचं रान खूप तुडवून झालं आहे. बुद्धीचं रानसुद्धा खूप तुडवून झालं. दोन्हीकडे हृदय अपूर्ण राहिलं. तुकारामाचा एक मार्ग तुडवून बघायचा उरला आहे. या मार्गावर परिपूर्णता मिळते, असं तुकाराम म्हणाला आहे. का विठ्ठल हे त्याचे फक्त रमणे होते?
अशा रितीनं श्रद्धेचा स्वीकार करायचा म्हणजे एक तात्त्विक आत्महत्याच असते, असं काम्यू म्हणतो. बुद्धीची कास सोडायची म्हणजे ‘फिलॉसॉफिकल आत्महत्या’च! त्यावर मी काम्यूला म्हणेन - ‘बाबा, तुझे बरोबर आहे, पण आपल्या हृदयाचं अपूर्णत्व स्वीकारून तू जगलास, तसं जगणं मला नको वाटतं. मला या जगातल्या सौंदर्याच्या पाऱ्याला हातात घ्यायचं आहे. तुझ्या बुद्धीची कास धरून तो पारा तू माझ्या हातात कसा आणून देतोस, ते मला सांग… नाहीतर मला श्रद्धेचा मार्ग चालून बघावा लागणार. त्याला इलाज नाही. या जगातील सौंदर्य हा मानवाच्या मनाचा खेळ आहे आणि सौंदर्य हे ‘सबजेक्टिव्ह असतं’, अशा उत्तरांनी माझं हृदय भरत नाहिये. तुला तुझ्या बुद्धिशी प्रामाणिक राहायचं आहे, तसं मला माझ्या हृदयाशी प्रामाणिक राहायचं आहे.’
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मला आता मनापासून वाटू लागलं आहे की, तुकाराम हीच आता माझी शेवटची आशा आहे. छोट्या-मोठ्या मॅजिकमध्ये रमण्यापेक्षा जगातील ‘अल्टिमेट मॅजिक’मध्ये रमणं जास्त लॉजिकल वाटू लागलं आहे.
अशा सगळ्या विचारात मी गड चढू लागतो. गडाच्या पाषाणाची खोळ पांघरून तो तुकोबाचा ‘हृषिकेश’ इथेच कुठेतरी बसला आहे आणि त्याच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून की, काय हिरव्यागार जादूचे कवडसे पाषाण भेदून वर आलेले आहेत, असं मला खूप वेळ वाटत राहतं.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment