प्रत्येक राज्यातली बहुसंख्याक जात भाजपला जशी देशभर सत्ता मिळत चालली, तशी त्या पक्षाकडे वळू लागली आहे. या बहुसंख्याक जाती काँग्रेससोबत जशा असत, तशा समाजवादी, साम्यवादी विचारांच्या पक्षांपाशीही असत. दलित, मुस्लीम, आदिवासी याही घटकांना काँग्रेसबद्दल आस्था होती. इतका गोतावळा जमवणारा काँग्रेस पक्ष सर्वहितदक्ष आणि कल्याणकारी योजना राबवणारा असे. निखालस सवर्ण म्हणजे ‘शेटजी-भटजी’ असे हिणवले गेलेले (ब्राह्मण व व्यापारी) भाजपकडे त्याच्या नामांतरानंतरही म्हणजे जनसंघापासून आपला पक्ष म्हणून बघत.
भारतात खरे तर जातींचे ‘राजकियीकरण’ व्हायला हवे होते. म्हणजे समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, लोकशाही, शोषण, अधिकार आदींची जाण वाढून ‘जातिमुक्त भारत’ बनू शकला असता. परंतु राजकारणाचे ‘जातीयकरण’ झाले आणि असंख्य घाणेरड्या गोष्टी नष्ट न होता टिकल्या. जातिव्यवस्था फायदेशीर वाटू लागली. ‘मंडल आयोगा’चा हेतूही शिक्षण व सत्ता यांतून निर्णयाधिकार प्राप्त करून, जाती नष्ट करण्याची प्रेरणा मिळावी, हा होता. परंतु धर्म राजकारणात प्रविष्ट होताच, त्याला चिकटून जात आलीच.
त्यामुळे भाजप हा धर्मवादी राजकारण करणारा पक्ष जातिव्यवस्थेला पुनरुज्जीवन देणारा आपोआप बनला. त्याचे हिंदुत्वाच्या राजकारणाचे विच्छेदन केल्यास तो केवळ ब्राह्मण व क्षत्रिय यांची प्राचीन काळापासूनची सत्तेशी असलेली सांगड पुन:स्थापित करू पाहतोय, हे स्पष्ट होते. या करताच ठाकूर, राजपूत, जाट, पटेल, रेड्डी, लिंगायत या बलाढ्य जातींपाठोपाठ भाजपने मराठ्यांनाही साद घातली. भाजप कधीही सामाजिक परिवर्तनाची भाषा करत नाही. फुले, शाहू व आंबेडकर यांना तो तोंडदेखला प्रणाम करतो. द्रविड चळवळ असो की कबीरपंथ आणि भक्तिपरंपरा असो की सूफीपंथ, भाजपला समता व न्याय यांचे वावडेच आहे. तो सरळ सनातन धर्माची आठवण काढू लागतो आणि धर्मराज्य उभे करू पाहतो. असे धर्मराज्य केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या खांद्यांवरच उभे असते, हे भारत अनेक शतकांपासून अनुभवतोय.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
भाजप आर्थिक कोंडी करून, शैक्षणिक बदल करवून आणि सरकारी नोकऱ्या घटवून दलित, आदिवासी व महिला यांची आरक्षणे अडचणीत आणत आहे. खाजगीकरणामागची त्याची खटपट त्यासाठीच चालते. भाजप धर्म ‘राजकीय’ विचार मानतो. त्यामुळे जातसुद्धा त्याच्या नजरेत ‘राजकीय’च आहे. त्यामुळे ब्राह्मण व क्षत्रिय या राज्यकर्त्या जाती असल्याचा त्याचा समज अधिक पक्का होतो. त्या जातींनाही मग हा पक्ष आपला वाटतो. काँग्रेसनेही हाच मसाला सत्तेसाठी वापरला, मात्र तो छोट्या, दुर्बल घटकांचाही तारणहार होता. कारण संविधानाची मोडतोड तो करू इच्छित नव्हता. ती आणीबाणीवेळी एकदाच झाली. ऐन आणीबाणीत संविधानात दुरुस्ती करून ‘समाजवाद’ या शब्दाची भर इंदिराबाईंनी घातली. त्याचे कारण इंदिरा काँग्रेसला आपली गरीब भारतीयांशी असलेली नाळ तोडायची नव्हती. पण इंदिराजींच्या काळातच आणि राजीव गांधींच्या हस्ते अर्थकारण बदलण्याचा निर्णय काँग्रेस करत सुटली. मग सारे राजकारणच बदलले.
‘विनॅबिलिटी’ अर्थात ‘जिंकून येण्याची क्षमता’ हा नवा आधार सत्तेच्या राजकारणात शिरला आणि बलाढ्य जातींना मोकळे रान मिळाले. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पदे, परिवार, संस्था, संख्या असे सर्व काही त्यांच्याकडे एकवटले. पाहता पाहता ही क्षमता इतकी व्यक्तीकेंद्री बनली की, तिकीट नाकारणे, पद न देणे, शब्द न पाळणे, अशा किरकोळ कारणांसाठी बड्या जातींचे नेते व कार्यकर्ते आपल्याला हवे ते मंजूर करणारा पक्ष जवळ करू लागले. भाजप त्यांना जवळ करू लागला.
झाले! सत्ता टिकवून ठेवायचे एक वर्तुळ या राज्यकर्त्या वर्गाने पूर्ण केले. केवळ राजकीय परिवर्तनाची भाषा करायचा पक्ष म्हणून भाजप सर्वांना प्यारा ठरला. काँग्रेसचा पोकळ समाजवाद, बेगडी धर्मनिरपेक्षता, दिखाऊ लोकशाही आणि स्वातंत्र्यचळवळीपासूनची त्यागी वृत्ती निरर्थक, निरुपयोगी वाटू लागली. त्याऐवजी हिंदुत्व, संस्कृती, परंपरा, इतिहास अशा अमूर्त गोष्टी विचार म्हणून प्रचारात आल्या. पोटापाण्याच्या राजकारणापेक्षा अस्मितांचे, भावनांचे राजकारण महत्त्वाचे ठरवले जाऊ लागले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या साऱ्या गोष्टी ब्राह्मण-क्षत्रिय यांच्यापुरत्याच मर्यादित होत्या, पण त्यांना सबंध समाजाचे व राष्ट्राचे व्यापकत्व बहाल केले गेले. हा भाग बलाढ्य जातींच्या परिचयाचाच होता. आयते नेतृत्व, साधनसंपत्ती आणि त्यांचा राजकारणाचा अनुभव भाजपच्या कामी आला. हळूहळू अनेक राज्ये याच मार्गाने भाजपच्या कह्यात जाऊन बसली. काँग्रेस अनाथ झाली.
धर्माचा राजकीय वापर करणारा पक्ष म्हणून भाजपला चारित्र्य, पावित्र्य, नीतीमत्ता, श्रद्धा, निष्ठा अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागला. ही मूल्यव्यवस्था अंगीकारणे सामान्य माणसाला फार जड जाते. कार्यकर्ते व नेते यांनाही ती कठीण जाते, पण भाजपने संघपरिवारामार्फत अशी झाकपाकव्यवस्था निर्मिली की, मूल्यभंग कोणी केला, तरी त्याची वाच्यता होऊ देणार नाही आणि दोन, आम्ही मूळचे राज्यकर्ते असल्याने आम्ही मूल्ये मोडली तर चालते. ते क्षम्य असते. पौराणिक दाखले, ऐतिहासिक उदाहरणे देऊन भाजप त्याचा भ्रष्टाचार, त्याची अनीती व त्याचा निष्ठाबदल कायम योग्य ठरवत आला आहे.
देवेंद्र फडणीवस यांनी नाही का, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती ही ‘कूटनीती’ म्हणून सार्थ ठरवली! ब्राह्मण व क्षत्रिय एकत्र आल्यास अथवा येताना अशा थोतांडाखेरीज दुसरा आडोसा कोणता बरे घेणार? खुद्द पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जाहीर नोंद घेतात अन् चार दिवसांत तो पक्ष फोडून आपल्यासोबत सत्तेत घेतात. सत्तेचा दुरुपयोग करून अजित पवारादी नेते भ्रष्टाचारी झाले, असे मोदींचे म्हणणे, मग (त्यांना पुन्हा सत्ता सोपवून) लटके, नाटकी अन् पोकळ ठरत नाही का? परंतु छोटी-मोठी व्यवधाने आल्याने फारसे बिघडत नाही!
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
संघातल्या निष्ठावंत, सच्च्या, मूल्यबद्ध लोकांना या सर्व घडामोडींचा म्हणे संताप, उबग आलेला आहे! काय गंमत आहे बघा, ज्या संघटनेचे कागदोपत्री काहीही संविधान नाही, सदस्यता नाही, हिशेब वा प्रामाणिक नोंदी नाहीत, तिने निष्ठा अन् विश्वास यांविषयी चिडचीड करावी? ज्या संघटनेचा संपूर्ण कारभार गुप्त, गूढ, मूठभरांच्या साक्षीने चालतो, ती लोकशाही राजकीय व्यवस्थेत चारित्र्याचा अन् निष्ठांचा आग्रह धरणार?
संघ असे सांगतो की, गुरुपौर्णिमेला शाखेत ध्वजाला जी रक्कम अर्पण केली जाते, ती म्हणजे संघाची कमाई. चरितार्थाची ती चावी! म्हणजे ध्वजापुढचा निधी असो की फसवणुकीमधून आलेला, तो कसा आला, कोणी दिला, याची ना वाच्यता करायची, ना विचारपूस! हा भ्रष्टाचार नसतो वाटते!!
डॉ. प्रदीप कुरुलकर देशाचाच घात करायला निघाले, म्हणून सापडले. त्यांच्यासारखे लाखो कुरुलकर संघाच्या व्यासपीठावर राष्ट्रभक्ती आणि चारित्र्य यांवर भाषणे ठोकत असतातच की! संघवाले म्हणतील की, कुरुलकरांना भाजपच्या सरकारनेच पकडले… अहो, पण त्यांना पकडून देणारेही संविधानाची शपथ घेणारेच होते आणि ते भाजपचे दुटप्पी, दुतोंडी कार्यकर्ते नव्हते. शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत कोण कोण सापडले, हे सर्वांना कळाले आहे, नाही का?
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
स्वत:ला एक क्षत्रिय राजा समजून ब्राह्मणांकडून राज्याभिषेकासारखा एक समारंभ मोदींनी करवून घेतला अन् संघाचे सनातन स्वरूप फटक्यात प्रकटले. संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन सभापती, उप-सभापती, राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती यांना बाजूला ढकलून मोदी करतात, हा तर ‘एकचालकानुवर्तित्वा’चा तेवढाच निर्लज्ज नमुना होता. भरपूर गुन्हे नावावर असलेले संसदसदस्य जर एवढ्या पवित्र जागेत बसणार असतील, तर त्याबाबतीत भाजपचे काय म्हणणे असेल? खैर, मोदी सदोदित आपली प्रतिमा धर्माशी जोडून ती सात्त्विक, ईश्वरी बनवायच्या खटाटोपात असतात. परंतु या दैवी घटपटांत आपल्या हातून तमाम भ्रष्ट, हिंस्त्र व धूर्त लोकांना ते मान देतात, हेही आपोआप सिद्ध होत जाते.
सत्ता आपल्याला मोहवू शकत नाही, असा एक दावा संघनिष्ट नेहमी करत असतात. ताजी बातमी अशी की, भाजपच्या सरकारने कर्नाटकात संघाच्या जवळच्या संस्थांना अडीचशे एकरांवर जमीन दिली होती, ती काँग्रेस सरकारने रोखून धरली आहे. या वाटपाची चौकशी नवे सरकार करत आहे. जितके सत्ताधारी संघाच्या गणवेशात झळकतील, तितके संघाला आवडते, ते मग कशासाठी? ‘हिंदूराष्ट्रा’ची भाषा ही सत्तेचीच भाषा नव्हे काय? गेल्या नऊ वर्षांत शेकडो सरकारी पदांवर संघाची माणसे नेमली गेली आहेत. प्रशासनापासून शिक्षण-न्याय-उद्योग आदी क्षेत्रांत त्यांची उपस्थिती दिसते.
म्हणूनच सत्ता आपल्या हातची जाऊ नये, यासाठी वाट्टेल तशा तडजोडी, लटपटी, संघ-भाजप करत राहतात. त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. कित्येक वर्षं काँग्रेसला मतदान करून संघ आपला विस्तार करत राहिला. कारभार संदिग्ध, संशयास्पद असूनही सत्तेच्या सावलीत तो त्याने लपवून ठेवला. आता झाले असे की, सत्ता आपलीच, सावलीही आपलीच आणि कारस्थानेही आपलीच. अति तिथे माती होणारच!
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आता मराठा जातीचे राजकारण बघू. सत्ता व मराठा ‘परस्परजीवी’ आहेत. जात हाच ‘राजकीय’ विचार मानायची चूक मराठाही करतात. त्यामुळेच त्यांचे तसे संघाशी काही भांडण नाही. जात्युच्छेदाचे आंबेडकरी तत्त्वज्ञान कोणाही बड्या मराठा नेत्याने कधीही स्वीकारलेले नाही. शरद पवार यांनी ते पूर्णपणे स्वीकारलेले नाही. किंबहुना ते काय, अजित काय, दोघेही बहुजन म्हटल्या जाणाऱ्या आणि मराठा नेतृत्वाखालच्या जातीय राजकारणाचीच अपत्ये आहेत.
शरदरावांना समाजवाद, भांडवलशाही, गांधीवाद, रॉयवाद, सर्वोदय आदी राजकीय तत्त्वज्ञाने ज्ञात आहेत, परंतु ते तशी जाण असणाऱ्या मराठा जातीतल्या नेत्यांमधले अखेरचे. धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी कितीही अंगीकार केलेला असो, जातीच्या राजकारणामुळे त्यांची नैतिक प्रतिमा ठिसूळ होत जाते. तेही जेव्हा प्रत्यक्ष सत्ता उपभोगत नसतात, तेव्हा सत्ताकेंद्रापासून लांब जात नाहीत. शेती, सहकार, शिक्षण, बँकिंग, या पायावरच त्यांचे राजकारण उभे आहे. त्यालाही आता खाजगीकरण, चौकशा, कायदेबदल आणि अपहार यांची वाळवी लागली आहे.
देवेंद्र फडणवीस असोत की, के. चंद्रशेखर राव, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ब्राह्मण नेत्याच्या हाताखाली काम करायची आता लाज वाटत नाही. सत्तेसाठी त्यांना ही तडजोड करावी लागते, कारण त्यांनाही ब्राह्मण-क्षत्रिय यांची ‘अभिजनशाही’ मान्य झालेली आहे. आजघडीला कित्येक मराठ्यांचा एक पाय भाजपमध्ये, तर दुसरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मराठा आरक्षणाच्या लालचीमुळे तर असंख्य मराठा भाजपच्या प्रेमात पडले. सरंजामदारी, वेठबिगारी, रंगढंग, उधळपट्टी, धाकदपटशा, हुकूमशाही, परंपरापूजन, रितीरिवाजपालन, शोषण यांमधून मराठा वेगाने बाहेर पडत आहेत.
मात्र हिंदुत्व, संस्कृती, इतिहास, जातप्रेम आदींत त्यांची गोडी वाढते आहे. याचा अर्थ पुरोगामी, आधुनिकता, विज्ञान-तंत्रज्ञान यांचे आकर्षण ओसरले आहे, असे नाही. मात्र त्यांचे तळ्यात-मळ्यात असणे भाजपला लाभ देते. त्यांनाही असे अधांतरी राहणे भोवल्यावाचून राहणार नाही…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment