अजूनकाही
एक दृश्य (रीमा काटगी दिग्दर्शित वेबसिरिज- ‘दहाड’) - तपासणीसाठी आलेल्या दलित महिला पोलीस इन्स्पेक्टरला संशयित व्यक्तीचे वडील घर अपवित्र होईल, हे कारण सांगत घरात येण्यास अटकाव करतात. तिचं त्वरित तिखट उत्तर येतं – ‘‘तुमच्या पूर्वजांचा काळ मागे पडला, आता संविधानाचं राज्य आलेलं आहे. तुम्ही मला रोखलंत, तर पोलीस तपासणीत अडथळा आणणे आणि जातीच्या आधारे भेद करणे, या दोन्ही कायद्याअंतर्गत मी तुम्हाला अटक करू शकते.” संतापलेल्या जमीनदाराला तिला घर तपासणीसाठी परवानगी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. ‘दहाड’ या वेबसिरिजमध्ये अंजलीचं पात्र सोनाक्षी सिन्हाने अत्यंत सक्षमपणे साकारलं आहे.
दृश्य दुसरे (यशोवर्धन मिश्र दिग्दर्शित चित्रपट- ‘कटहल’) - यात पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या सानिया मल्होत्राने उभी केलेली नायिका- महिमा बासोर बेपत्ता झालेल्या किशोरवयीन मुलीबद्दल विचार करत असते. त्या मुलीचं काय झालं असेल? ती कुठे असेल? मध्यरात्रही उलटून गेलेली असते. या दृश्यात तिच्या मागे भिंतीवर लावलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र आपल्याला दिसतं. त्या छायाचित्राव्यतिरिक्त इतर कोणतंही छायाचित्र तिथं नसतं. त्या आधी दुपारी तिच्याबरोबर काम करत असलेल्या द्विवेदी आणि मिश्रा या दोन्ही कॉन्स्टेबल्सना चौकशीत दिरंगाई केल्याबद्दल तिने झाडलेलं असतं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्हीही चित्रपट पूर्णपणे दलितांवर वा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल नाहीत किंवा दलित स्त्री नेतृत्वाबद्दलही नाहीत. (उदाहरणार्थ, ‘फूलनदेवी’ किंवा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’)
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘कटहल’ किंवा ‘दहाड’च्या कथा दलित पात्रांशिवायही असू शकल्या असत्या. नेहमीसारखी प्रमुख भूमिकांची नावं सवर्ण असती तरी चाललं असतं. उदाहरणार्थ तबूने साकारलेली ‘दृश्यम’ चित्रपटातील (२०२२) मीरा देशमुख या महिला इन्स्पेक्टर जनरलची भूमिका. हा चित्रपट मीरा देशमुखच्या कर्तबगारीवर झोत टाकणारा होता. नंतर ‘गुमराह’ (२०२३)मध्ये सब इन्स्पेक्टर शिवानी माथूरच्या भूमिकेत मृणाल ठाकूर, ‘फॉरेन्सिक’ (२०२२) मध्ये सब इन्स्पेक्टर मेघा शर्माच्या भूमिकेत राधिका आपटे आणि ‘दिल्ली क्राइम’ (२०२२) या वेबसिरिजमध्ये वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत शेफाली छाया. ही पुरेशी उदाहरणं आहेत.
पण रीमा काटगी आणि यशवर्धन मिश्रा या दोन्ही लेखक-दिग्दर्शकांनी प्रमुख भूमिकेत अंजली मेघवाल आणि महिमा बासोर या दलितच पोलीस ऑफिसर असाव्या असं ठरवलं. त्यामुळे बॉलिवुडमध्ये कधीही न दाखवलेलं वास्तव समोर आलं. ‘आपल्या समाजात जे काही घडतंय, त्याचे संदर्भ चित्रपटात आणावे’, असं यशोवर्धन मिश्रा यांना वाटलं.
योगायोग म्हणजे यशोवर्धन यांच्या वडिलांनी म्हणजे अशोक मिश्रा यांनी शाम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेलकम टू सज्जनपूर’ या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. त्यात कुशवाहा या ओबीसी असलेल्या पात्राची भूमिका श्रेयस तळपदे यांनी केली होती, तेव्हा हिंदी व्यावसायिक सिनेमात बहुदा पहिल्यांदाच जातीचा उल्लेख स्पष्टपणे आला.
काटगी आणि मिश्रा या लेखकांनी महिमा आणि अंजली या दोन सामर्थ्यवान पात्रांचे लेखन करताना खूप मेहनत घेतलेली दिसते. दोन्हीही तरुणी अधिकाराच्या पदावर आहेत. शिवाय त्या गोऱ्याही आहेत. दलित पात्रं कशी दिसावी, या ठोकताळ्याला त्यांनी छेद दिला आहे. त्या बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. त्यामुळे वेळोवेळी दलितांचं तथाकथित ‘उत्थान’ करणाऱ्या सवर्ण त्रात्यांचं इथं काही काम नाही. महिमा बासोरचा आत्मविश्वास, तिची धमक, यामुळे हा विनोदी चित्रपट हास्यास्पद होत नाही. या चित्रपटाचं लेखनही उत्तम झालंय, म्हणूनही तो बघावासा वाटतो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘कटहल’मध्ये फणस चोरीचं गूढ सोडवण्याचं काम महिमा बसोर करत असते. ती प्रामाणिक, कष्टाळू, आनंदी, सहृदयी आणि विचारशील तरुणी आहे. निरपराध गरीब लोकांवर बळाचा वापर करू नका आणि दलितांना चोर म्हणणं हा निव्वळ मूर्खपणा आहे, असं ती सांगते. तीसुद्धा चोर आणि गुन्हेगारांना शिक्षा देणारी आहे, याची आठवण ती आपल्या सवर्ण सहकाऱ्यांना करून देते.
चित्रपटाच्या शेवटी डीएसपी रँकवर बढती देण्यात आल्यावर महिमा थोडी दुःखी होते. कॉन्स्टेबल द्विवेदी या तिच्या प्रियकरापेक्षा ती वरच्या हुद्दयावर गेल्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढेल, अशी चिंता तिला वाटते, पण ‘दहाड’मधील इन्स्पेक्टर अंजलीला तसं कधीच वाटलं नसतं.
या दोन्ही नायिका दलित आहेत आणि अत्यंत कर्तबगार आहेत. दोघीही आपली दलित ओळख लपवत नाहीत. आपल्या सहकाऱ्यांना सामाजिक वास्तवाची जाणीव करून देण्याचं काम करतात आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अज्ञानाबद्दल कीव व्यक्त करतात. तिच्याशी ‘इश्कबाजी’ करण्याचा प्रयत्न करणार्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला ‘हाडं मोडण्यात माझा हातखंडा आहे’, असं अंजली ठणकावून सांगते.
एका महत्त्वाच्या दृश्यात, अंजली तिचं ‘मेघवाल’ हे मूळ आडनाव (राजस्थानातील दलित आडनाव) वापरू लागते. तिच्या वडिलांनी ‘भाटी’ हे उच्च जातीचं आडनाव घेतलेलं असतं. आपल्या कुटुंबीयांना जातीवरून त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी हा उपाय शोधलेला असतो. पण आडनाव बदलल्यानं समाजाचा दृष्टीकोन किंवा सामाजिक स्थितीत बदल होत नाही, असं अंजली म्हणते आणि आपलं मूळ आडनाव अभिमानानं वापरू लागते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
प्रमुख भूमिकेतील दलित महिलेचं पात्र हिंदी व्यावसायिक चित्रपटांत अभावानेच दिसतं आणि दिसलं तरी त्यातील स्त्री दु:खी, असहाय परावलंबी असते. उदाहरणार्थ, नूतनने साकारलेली ‘सुजाता’ चित्रपटातील नायिका. आश्रय दिलेल्या ब्राह्मण कुटुंबाने तिला आपलसं केलेलं नसतं, ती आश्रितासारखीच राहत असते. ती चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे, पण असहाय आहे. त्या दु:खातून ब्राह्मण असलेला अधीर (सुनील दत्त) तिला बाहेर काढतो. शिवाय ती उजळ वर्णाची नसते. दलित स्त्री गोरी असू शकत नाही, असा भ्रम बाळगला जातो. हे त्वचेच्या रंगाचे वाटप वर्णद्वेषी आहे. इतर चित्रपटांतही दलित स्त्री पात्रंनगण्य भूमिकेत आहेत. उदा., ‘गंगा की सौगंध’मधील रेखा, ‘खानदान’मधील नूतन वा ‘सौतन’मधील पद्मिनी कोल्हापुरे.
त्यामुळे ‘दहाड’ आणि ‘कटहल’ या चित्रपटात कर्तबगार दलित महिला पोलीस प्रमुख दाखवल्याबद्दल बॉलिवुडचं कौतुक होतं आहे. परंतु दलित महिला पोलीस ऑफिसरवरील मालिका/चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्याचा बोलबाला होत नाही, हा जातीयवाद नाही का?
शिवाय सानिया मल्होत्रा किंवा सोनाक्षी सिन्हा यांची अजूनही एकही मुलाखत प्रसिद्ध झालेली नाही. पहिल्यांदाच दलित स्त्रीची भूमिका साकार करताना काय वाटलं, कोणते विचार मनात आले, हे त्यांना विचारावं, असं एकाही पत्रकाराला वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं.
बॉलिवुडने आपल्या चित्रपटात काही अपवाद वगळता जात कधी दाखवली नाही. ‘दहाड’ आणि ‘कटहल’मुळे हिंदी चित्रपट उद्योगाचा जातीवर पडदा टाकण्याचा खेळ आता संपुष्टात येईल, असं वाटतं. पण हेही तितकंसं खरं नाही. मार्केटमध्ये ज्याची चलती असते, तोच माल खपतो. त्यामुळे या पुढे जात-वास्तव पैसे मिळवून देत असेल, तरच त्यावर सिनेमे येणार.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हा बदल होण्याचं बरंचसं श्रेय पा रणजीत, मारी सेल्वराज, नागराज मंजुळे, नीरज घायवान, वेत्री मारन यांसारख्या प्रवाहाविरोधात जाणाऱ्या आणि खोल रुजलेल्या रूढी मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्दर्शकांना द्यायला हवं. खरं तर, नीरज घायवान यांच्या ‘गीली पुच्ची’ या लघुपटातील कोंकणा सेनशर्मा यांनी साकारलेली भारती मंडल ही दलित महिला आणि पीए रंजितच्या ‘नाथीचाथिराम नागरगिरथू’मधील रेने (दुसारा विजयन यांनी साकारलेला) हे मुख्य पात्र, इतर अनेक लेखक आणि दिग्दर्शकांसाठी प्रेरणादायी आहे.
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख https://feminisminindia.com या पोर्टलवर २८ जून २०२३ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://feminisminindia.com/2023/06/28/anjali-meghwal-and-mahima-basor-dalit-female-bollywood/
अनुवाद – अलका गाडगीळ
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment