मराठी संशोधन मंडळ मोल्सवर्थच्या प्रस्तावना मराठीत अनुवाद करून मूळ इंग्रजी प्रस्तावनेसह पुस्तक का प्रकाशित करत आहे…
ग्रंथनामा - आगामी
प्रदीप कर्णिक
  • ‘शब्दप्रभू मोल्सवर्थ : इंग्रजी-मराठी शब्दकोश प्रस्तावना आणि परामर्श’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 11 July 2023
  • ग्रंथनामा आगामी शब्दप्रभू मोल्सवर्थ : इंग्रजी-मराठी शब्दकोश प्रस्तावना आणि परामर्श Shabdprabhu Molesworth जेम्स थॉमस मोल्सवर्थ James Thomas Molesworth

‘शब्दप्रभू मोल्सवर्थ : इंग्रजी-मराठी शब्दकोश प्रस्तावना आणि परामर्श’ हे अरुण नेरुरकर यांनी भाषांतरित व संपादित केलेले पुस्तक परवा, १३ जुलै २०२३ रोजी मराठी संशोधन मंडळ, मुंबईतर्फे समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला मंडळाचे माजी संचालक प्रदीप कर्णिक यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

रूपारेल महाविद्यालयाचा ग्रंथपाल झाल्यानंतर, तिथे असणाऱ्या १८५७च्या मोल्सवर्थच्या शब्दकोशाची दुसरी आवृत्ती माझ्या सततच्या आकर्षणाचे विषय झाली. पुढे मी जेव्हा तिथे ‘दुर्मीळ ग्रंथ संग्रहालया’चे दालन स्वतंत्रपणे स्थापन केले, तेव्हा त्या संग्रहात हा कोश दिमाखाने ठेवला होता आणि १८३१ची पहिली आवृत्ती पाहण्यास मी उद्युक्त झालो होतो. आणि ती नेमकी अतिदुर्मीळ प्रत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात होती. अनेक ठिकाणी मी मोल्सवर्थच्या शब्दकोशाचे संदर्भ वाचत होतो. त्यातही विशेषतः त्या कोशाच्या प्रस्तावना आणि त्यात आलेला मराठी वाङ्मयाचा आढावा. या प्रस्तावना इंग्रजीत असल्याने त्या मराठी वाचकांसाठी मराठीत अनुवादित व्हायला हव्यात, ही तळमळ लागून राहिली होती. जेव्हा मी मंडळाचा संचालक झालो, तेव्हा ज्या काही योजना मनात होत्या, त्यातील मोल्सवर्थच्या प्रस्तावनेचा अनुवाद ही योजना मी हाती घेतली आणि माझे ज्येष्ठ स्नेही आणि अनुवादक श्री. अरुण नेरूरकरांच्या मदतीने प्रत्यक्षात आणायला प्रारंभ केला.

पुढे १८३१चीही प्रस्तावना मला खुणावू लागली आणि अभ्यासकांना तौलनिकदृष्ट्या पाहता याव्यात म्हणून ही प्रस्तावना संदर्भातून घेतली, परंतु त्यांची अक्षरे, पाने इतक्या वर्षानंतर वाचनयोग्य न उरल्याने, लंडनवरून श्रीमती नीलिमाताई कुलकर्णी यांच्याकडून नेरूरकरांनी मिळवली आणि आमचे काम झाले.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

१८५७च्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण ‘शुभदा सारस्वत’ या प्रकाशन संस्थेने १९७५ साली केले असल्याने मोल्सवर्थचा कोश गेल्या काही वर्षांत अनेकांना उपलब्ध झाला आहे.

श्री. शरद गोगटे यांचे कार्य मोठेच आहे. त्या कोशाला गोगटे यांनी काही नवी जोड दिलेली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे चार शब्द, डॉ. ना. गो. कालेलकर यांची प्रस्तावना आणि स्वतः गोगटे यांची तयार केलेली मोल्सवर्थ यांच्यावरची चरित्रात्मक नोंद. ही नोंद लिहिताना त्यांनी मिळवलेले तपशील अत्यंत महत्त्वाचे आहेत. अर्थात हा सर्व मजकूर इंग्रजीत आहे. शिवाय १९७५ साली पुनर्मुद्रित झालेला हा कोशही आज उपलब्ध नाही. ४८ वर्षे होऊन गेलेला हा कोश अनेकांना हवा असतो. विशेषतः ग्रंथालयांना, पण गोगटे यांच्यासारखे धाडस कुणी दाखवेल का, हा प्रश्नच आहे.

१८३१ ते १९७५ या काळातील पहिली, दुसरी आवृत्ती आणि तिसरे पुनर्मुद्रण जर पाहिले, तर एक गोष्ट लक्षात येते की, पहिली आवृत्ती जवळजवळ कुठल्याच ग्रंथालयात नाही. दुसरी आवृत्ती कुठे कुठे सापडते, पुनर्मुद्रण अधिक संख्येने सापडते.

मोल्सवर्थवरचा प्रा. अ. का. प्रियोळकरांचा १९६५ सालातला लेख ‘म. सा. पत्रिका’ या नियतकालिकात जरी प्रकाशित झाला असला, तरी तो अंक फारच थोड्या ग्रंथालयात असण्याची शक्यता आहे. हा लेख प्रियोळकरांच्या ‘हिंदुस्थानाचे दोन दरवाजे’ या ग्रंथात समाविष्ट झालेला असला, तरी हे पुस्तक आज उपलब्ध नाही, म्हणजे ज्यांच्या संग्रही आहे, त्यांच्यावर अवलंबून राहणे आले.

डॉ. श्री. म. पिंगे यांनी त्यांच्या ‘युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या पुस्तकात मोल्सवर्थच्या वाड्मयीन कार्याचा आढावा अतिशय विस्ताराने घेतला आहे. ‘मोल्सवर्थचे मराठी भाषेचे कार्य’ (पृ. १५५ १८०) हे प्रकरण ज्या त्यांच्या वरील पुस्तकात आहे, ते पुस्तक १९६० साली प्रकाशित झाले होते आणि आज ते अतिशय दुर्मीळ आहे. मोल्सवर्थचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मराठी अभ्यासकांसमोर दोन बाबी अडचणीच्या वा त्रासदायक ठरू शकतात. एक, दुर्मीळ असणारा कोश आणि कर्त्याची माहिती. दोन, कोशांतर्गत येणारी माहिती इंग्रजी भाषेत असल्याने ती मराठी भाषेत उपलब्ध न होणे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या दोन्ही त्रासदायक बाबींचा विचार केल्यानंतर मंडळाने कोशांत असणारी दुर्मीळ माहिती (प्रस्तावना इत्यादी) इंग्रजीत उपलब्ध करून द्यावी आणि त्यासोबत त्यांचा मराठी अनुवादही सादर करून एक प्रकारची सोय करावी. तसेच मोल्सवर्थविषयी असणारे लेखन जे आज सहजरीत्या उपलब्ध नाही, तेही सोबत देऊन मोल्सवर्थचा अभ्यास करणाऱ्यांची सोय करून ठेवावी. हा विचार पक्का झाल्यावर ज्येष्ठ अनुवादक श्री. अरुण नेरूरकर यांनी तत्परतेने त्याचा मराठी अनुवाद करून दिला. संदर्भ विभागाच्या सहकार्याने प्रा. प्रियोळकर आणि डॉ. पिंगे यांचे लेखनही उपलब्ध झाले आणि ते एकत्रितपणे अभ्यासकांना मराठी संशोधन मंडळ सादर करत आहे.

पिंगे आणि त्यांचा प्रबंध

भारतात आलेल्या युरोपियनांनी भाषिक वाङ्मयीन आणि शैक्षणिक कार्याविषयी जर कुणाला अधिकृत माहिती हवी असेल, १९व्या शतकाचा प्रारंभ काळ अभ्यासावयाचा असेल, तर त्याने डॉ. श्री. म. पिंगे यांचे ‘युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ आणि डॉ. कृ. भि. कुलकर्णी यांचे ‘आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती’, हे दोन ग्रंथ अभ्यासणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने ते आज दुर्मीळ झाले आहेत. मराठी संशोधन मंडळ त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करू इच्छिते, तो योग लवकर येवो ही प्रार्थना.

पिंगे यांचा ग्रंथ ४१२ पृष्ठांचा आहे. त्यात १६ प्रकरणे असून या पुस्तकाला प्रा. प्रियोळकरांनी अभ्यासपूर्ण पुरस्कार जोडला आहे. त्यातील काही भाग पुस्तक दुर्मीळ असल्याने मूळातून देणे उचित ठरेल. त्यातून पुस्तकाचे स्वरूप लक्षात यायला मदत होईल.

मोल्सवर्थचा कोश व त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी मोल्सवर्थच्या आधी कोशनिर्मितीचे कोणते आणि कसे कसे यशस्वी व अयशस्वी प्रयत्न झाले, ते समजून घेणे आवश्यक ठरते. विशेषतः केनडी यांच्या कोशाचा यशस्वी प्रयत्न, त्याच्या यशानंतर त्याने मोल्सवर्थच्या कार्यावर केलेली टीका आणि काही लपून-छपून आणलेले अडथळे, जे पुढच्या प्रकरणात पिंगे सांगतात, ते समजून घेण्यासाठीही आणि एकूणच कोशकार्याच्या अगडबंब कार्याची अदम्य तळमळ कशी अनेकांच्या ठायी निर्माण झाली होती, ते समजून घेण्यासाठी ‘मोल्सवर्थपूर्व कोश निर्मितीचे प्रयत्न’ हे प्रकरण अभ्यासणे अत्यावश्यक ठरते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मोल्सवर्थविषयीचे पिंगे यांचे विवेचन

'मोल्सवर्थचे मराठी भाषेचे कार्य' (पृ. १५५ ते १८०) असा २५-२६ पृष्ठांचा मजकूर पिंगे यांनी या ग्रंथात समाविष्ट केला आहे.

'कॉमनवेल्थ रिलेशन्स ऑफिस, लंडन येथून मागवलेल्या माहितीच्या आधारे पिंगे मोल्सवर्थचे पूर्वायुष्य अगदी त्रोटकपणे पण आवश्यक त्या तारखा देऊन रेखाटतात. पु. मं. लाड यांनी दिलेल्या माहितीबाबतही ते टीप द्यायला विसरत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात ते चार बाबींची माहिती नोंदवताना दिसतात-

१. मराठी-इंग्रजी शब्दकोश, आ. १ली १८३१

२. मराठी-इंग्रजी शब्दकोश, आ. २री १८५७

३. मराठी-मराठी शब्दकोश, १८२९

४. मोल्सवर्थचे इतर ग्रंथ.

यापैकी पिंगे पहिल्या आवृत्तीची, त्यासाठी मोल्सवर्थने केलेल्या पत्रव्यवहाराची, त्याला सरकारकडून आलेल्या उत्तराची, कोशाची रूपरेषा, उद्देश, रचना, अपेक्षा, त्यात आलेल्या अडचणी, आजारपण, कैंडी बंधूंच्या सहकार्याची केलेली विनंती, त्याला सरकारने दिलेल्या मान्यतेनंतर केवळ १० महिनेच मिळालेली मदत व नंतर पुन्हा त्यांची करण्यात आलेली बदली, पुढे थॉमस कैंडी निवृत्त होणार समजल्यावर त्याच्या सहकार्यासाठी केलेली मागणी, ती मान्य झाल्यावर आणि ते रुजू झाल्यावर त्यांचे आजारी पडणे, त्याच्या जागी जॉर्ज कैंडीचे आगमन होऊन सरतेशेवटी कोश पूर्ण होणे, हा सर्व तपशील पत्रव्यवहारांच्या आधारे पिंगे यांनी मांडला आहे. तो अत्यंत रोचक झाला आहे.

कोश तयार झाल्यावर सरकारतर्फे एक समिती नेमली जाते. त्यात व्हॅन्स केनेडी (यांचाच शब्दकोश मोल्सवर्थ शब्दकोशाच्या आधी प्रकाशित झाला होता. पिंगे यांनी या कोशाची चर्चा ‘मोल्सवर्थपूर्व कोशनिर्मितीचे प्रयत्न’ या प्रकरणात केली आहे (पृ. १४६)), पोप आणि रॉबर्ट कॉटन मनी यांचा समावेश सरकार करते. पैकी व्हॅन्स कैनेडी व पोप मोल्सवर्थच्या कोशावर प्रतिकूल अभिप्राय तर देतातच, पण त्यावर कठोर टीकाही करतात.

उदा. मोल्सवर्थने उगाचच शब्दसंख्या घुसळून वाढवलेली आहे, शब्दांचे अर्थ देताना असभ्य व ग्राम्य अर्थ दिले आहेत, काही शब्दांचे अर्थ अनिश्चित आहेत इत्यादी. उरलेल्या दोघांचा अभिप्राय अनुकूल असल्याने व समितीचे मत एक नसल्याने सरकार हा कोश १७ जणांकडे पाठवते आणि मत मागवते. १७ जणांचे अभिप्राय अनुकूल आल्याने सरकार कोशाला मान्यता देणारे पत्र जारी करते. डॉ. पिंगे या १७ जणांची नावे देतातच, पण त्यातील काही महत्त्वाच्या अभिप्रायांचे उतारेही देतात. उदा. ले. शॉर्टीड, ले. एच. ऑस्टिन, स्टीव्हन्सन, विल्सन इत्यादी.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

इतके सर्व विवेचन १ल्या आवृत्तीबाबतच पिंगे करतात, मग अगदी थोडक्यात दुसरी आवृत्ती, मराठी-मराठी शब्दकोश, आणि मोल्सवर्थच्या इतर ग्रंथांचे दाखले देतात.

या प्रकरणातील अगदी अनोखा तपशील म्हणजे मोल्सवर्थ यांची इतर ग्रंथसंपदा. पिंगे मोल्सवर्थची शिक्षणविषयक एक आणि धार्मिक ३ पुस्तकांचे तपशील देतात. ते असे -

१. शालापद्धती, १८२४

२. पापपीडितांस शांती, ट्रॅ. सो., १८२९, पृ.१९

३. ज्ञानमार्गाची सूचना, ट्रॅ. सो. १८४९, पृ.५०, भाषांतर

४. God Being Compassionate, स्वतंत्र, ट्रॅ. सो., १८५०, पृ.१२

या चार पुस्तकांपैकी दोन पुस्तकांची माहिती पिंगे थोडक्यात नमूद करतात. दोन पुस्तके आजही अज्ञात आहेत. दोन पैकी पहिले ‘शालापद्धति’चे गुजराती भाषांतर प्रियोळकरांनी ‘मराठी संशोधन मंडळा’साठी ब्रिटिश म्युझियममधून मायक्रोफिल्म करून आणली होती. ‘निशाळनी पद्धति’ हे गुजराती देवनागरीतील पुस्तकाला प्रियोळकरांनी इंग्रजी प्रस्तावना जोडून मुंबई विद्यापीठाच्या जर्नलमध्ये (सप्टेंबर १९५४) प्रकाशित केले होते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मराठी संशोधन मंडळ प्रकाशित करणार आहे.

दुसरे पुस्तक ‘पापपीडितांस शांती’ हे पुस्तक अहमदनगर येथील अमेरिकन मिशनमध्ये त्यांना पाहायला मिळाले. १८३७ची १३ पृष्ठांची व १८३९ची १९ पृष्ठांची तिसरी आवृत्ती त्यांनी अभ्यासली आणि त्यातील काही उतारे दिले आहेत. मोल्सवर्थचे हे पुस्तक मिळवून त्याची नवी आवृत्ती त्याचे स्मरण म्हणून प्रकाशित करायला काहीच हरकत नाही. इतर दोन पुस्तकेही शोधायला हवीत, पण त्यासाठी प्रियोळकरांसारखा तळमळीचा ग्रंथप्रेमी हवा, तरच ते शक्य आहे.

मोल्सवर्थवर प्रा. अ. का. प्रियोळकरांनी १९६५ साली एक लेख लिहिला. पिंगे यांचे इतके संशोधन त्यांनी करवून घेऊन, त्यांनीच प्रकाशित करूनही त्यांना स्वतंत्र लेख का लिहावासा वाटला, याचा शोध घेतला तर काय सापडते ते पाहू. तसेच प्रियोळकर मोल्सवर्थविषयी आणखी वेगळे तपशील काय देतात, तेही पाहाणे उद्बोधक ठरेल.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

प्रा. प्रियोळकर आणि मोल्सवर्थ

‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ ऑक्टो- डिसें. १९६५च्या अंकात हा लेख प्रियोळकरांनी प्रकाशित केला. त्याच लेखनामागचे त्यांचे दोन हेतू लक्षात येतात एक, सरकारतर्फे मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी कोशाचे पुनर्मुद्रण होणार आहे, अशी बातमी त्याच्या कानावर आली होती. आणि या कोशाचे पुनर्मुद्रण व्हावे, अशी त्यांना तळमळ लागली होती. दोन, १७७२ साली मोल्सवर्थ यांच्या मृत्यूवर्षाची शताब्दी होती व त्यानिमित्ताने हा कोश पुनर्मुद्रित व्हावा, करावा अशी त्यांची सरकारला सुचना होती. तिसरा हेतू सुप्त मनात असावा, असे त्यांचा लेख वाचून वाटते. तो असा की, डॉ. पिंगे यांच्या प्रबंधात या मोल्सवर्थविषयी आणि मराठी-इंग्रजी कोश निर्मितीविषयी विशेषतः जी माहिती आली आहे, त्यापेक्षाही जास्त आणि वेगळी माहिती त्यांच्यापाशी होती, ती त्यांना सादर करावी असे वाटत असावे. प्रामुख्याने दुसऱ्या आवृत्तीबद्दल. कारण पिंगे आपल्या प्रबंधात मोल्सवर्थच्या दुसऱ्या आवृत्तीचा केवळ उल्लेख करताना दिसतात. त्यामुळेही ही त्रुटी भरून निघावी असे त्यांना वाटत असावे.

प्रियोळकरांचा हा मूळ लेख प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करत असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.

गोगटे आणि मोल्सवर्थ

शुभदा सारस्वत या संस्थेच्या वतीने १९७५ साली प्रकाशित झालेल्या मोल्सवर्थ यांच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात पुरवणी म्हणून शब्दांची भर जरी पडलेली नसली, तरी त्यात तीन-चार महत्त्वाच्या लेखांची भर पडलेली दिसते. तेही सर्व लेख इंग्रजीत टाकून कोशाच्या माध्यमाशी साधलेला दुवा जाणवतो. यात ‘Forewords’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी लिहिलेले असून त्यात त्यांनी संस्कृतमधील कोश परंपरेचा उल्लेख करून पाणिनीने लिहिलेल्या व्याकरणाकडे लक्ष वेधून कोशनिर्मितीनंतर व्याकरण रचनेला कशी चालना मिळते आणि मोल्सवर्थने आपल्या कोशामुळे मराठी व्याकरण-व्यवस्थेला कशी चालना दिली, याकडे तर्कतीर्थ लक्ष वेधतात.

या कोशाला शरद गोगटी यांनी मोल्सवर्थ यांची चरित्र नोंद लिहिली आहे. त्यासाठी प्रामुख्याने प्रा. प्रियोळकर आणि डॉ. पिंगे यांच्या संशोधनाचा आधार मुख्यत्वेकरून घेतला असला तरीही काही नवीन माहितीही त्यांनी त्यात दिलेली दिसते. त्यात प्रामुख्याने मिचेल मरे यांचे ‘In Western India’ किंवा जॉर्ज स्मिर यांच्या ‘The Life of John Wilson’ डेव्हिड डेव्हिडसन यांच्या ‘Memoir's of a Long Life’ अशा काही ग्रंथांचाही अचूक वापर केला आहे. गोगटे यांच्या लेखातील दोन बाबी विशेष लक्षवेधक आहेत. एक, मोल्सवर्थ यांनी ज्या चार पुस्तिका लिहिल्या होत्या त्यापैकी ‘ज्ञानमार्गाची सूचना’ ही पुस्तिका १८४९ साली मोल्सवर्थ इंग्लंडमध्ये असताना प्रकाशित झाली होती. दोन, मोल्सवर्थ यांचा नेमका मृत्युदिन. प्रियोळकर पिंगे केवळ १८७२ हे वर्ष नोंदवतात, तर गोगटे १३ जुलै १८७२ ही नेमकी तारीखही देतात. त्यांनी आपल्या चरित्र नोंदीला जोडलेले परिशिष्टही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या नव्या आवृत्तीला जोडलेली नवी प्रस्तावना, जी डॉ. ना. गो. कालेलकर यांनी लिहिली आहे, ती या कोशाचे वैभव वाढवणारी आहे.

डॉ. ना. गो. कालेलकर आपल्या प्रस्तावनेत भारतात आलेल्या व्यापारी व धर्मप्रसारकांच्या कार्याचा थोडक्यात इतिहास, त्यांची भूमिका, दृष्टी आणि कार्य यांचा आढावा घेतात आणि शब्दकोशाच्या ऐतिहासिक कार्याकडे वळतात. १८१० सालातली विल्यम कॅरे यांनी बनवलेला मराठी-इंग्रजी शब्दकोश ज्यात मराठी मोडी लिपीत आहे, १८२४चा केनेडी यांचा मराठी-इंग्रजी कोश, १८२९चा ‘महाराष्ट्र भाषा कोश’ या सर्व मोल्सवर्थपूर्व कोशांचा उल्लेख करून १८६३ व १८७० सालातल्या बाबा पदमनजींच्या कोशापर्यंत येतात. पण याच्याही पुढचे टप्पे जेव्हा ते मांडतात. त्यामुळे मोल्सवर्थच्या कोशचे अनन्यत्व अधोरेखित होते.

१९३२ साली स्थापन झालेले ‘महाराष्ट्र कोश मंडळ’ आणि या मंडळाद्वारे प्रकाशित झालेला पुरवणीसह सात खंडात प्रकाशित झालेला ‘महाराष्ट्र शब्द कोश’ यांचा उल्लेख महत्त्वाचा अशासाठी की, या कोशात ‘It covers all the entires from Molesworth’ या उल्लेखाने मोल्सवर्थच्या कोशाचे न संपलेले महत्त्व आणि त्या कोशाची अपरिहार्यता ठळकपणे समोर येते.

विष्णूशास्त्री चिपळूणकर, ‘मराठी शब्दरत्नाकर’ (आपटे) यांनी नोंदवलेल्या मोल्सवर्थच्या कार्याचीही ते दखल घेतात, त्यांची उद्धृतेही देतात. इतकेच करून डॉ. कालेलकर थांबत नाहीत, तर त्यांच्या प्रस्तावनेचे जे प्रधान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे मोल्सवर्थ यांनी त्यांच्या शब्दकोशाला लिहिलेल्या प्रस्तावनेचे केलेले विश्लेषणात्मक विवेचन आणि हेच डॉ. ना.गो. कालेलकर यांच्या प्रस्तुत प्रस्तावनेचे महत्त्व आहे.

प्रा. प्रियोळकर, डॉ. पिंगेपासून मोल्सवर्थच्या शब्दकोशाच्या निर्मितीचा इतिहास आपल्याला अधिकृतपणे समोर येतो, परंतु मोल्सवर्थ कोशाच्या संदर्भात कोणती भूमिका घेतो, कोणते शब्द निवडतो, कोणते शब्द गाळतो, ते का गाळतो, कोशांतर्गत आलेल्या उद्धृतांना कसे संदर्भ देत नाही, सर्वच शब्दांना उद्धृते देत नाही, अशा अनेक मुद्द्यांकडे कालेलकर लक्ष वेधून घेतात.

अशा पद्धतीने विश्लेषण-विवेचन माझ्या समजुतीनुसार १८३१ ते १९७५ या काळात प्रथमच झालेले असावे. आणि याचमुळे श्री. गोगटे यांचे कार्य अजोड आहे. हे नुसते पुनर्मुद्रण ठरत नाही, ते या आवृत्तीला ‘सुधारित पुनर्मुद्रण’ (Corrected Reprint) म्हणतात ते काही प्रमाणात योग्यच ठरते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

प्रस्तुत पुस्तकाचे प्रयोजन

मराठी संशोधन मंडळ मोल्सवर्थच्या प्रस्तावना मराठीत अनुवाद करून मूळ इंग्रजी प्रस्तावनेसह का पुस्तक प्रकाशित करत आहे, हेही नमूद करणे अत्यावश्यक आहे.

१९७५ सालातले कोशाचे पुनर्मुद्रण उपलब्ध असल्याने एके काळी अत्यंत दुर्मीळ असलेला मोल्सवर्थचा मराठी-इंग्रजी शब्दकोश आता वाचकांना सहज उपलब्ध आहे. या कोशाची निर्मितीचा हेतूच मुळी युरोपिय लोकांना मराठी शब्दांचा अर्थ इंग्रजी भाषेत कळावा हा आहे. भारतीय वाचकांचा विचार केला, तर हा कोश कशासाठी, असा प्रश्न पडू शकतो. कारण दोन्ही भाषा येणारा वाचक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पसरलेला आहे. तो वाचक हा कोश किती वापरेल असा प्रश्न पडतो. या कोशाचा वापर जो मराठी वाचक इंग्रजी भाषेचा नवशिक्षित आहे किंवा इंग्रजीत लेखन पत्रव्यवहार करू इच्छितो, त्याच्याकरता अत्यंत उपयुक्त ठरेल.

मोल्सवर्थचा जो मूळ हेतू होता, त्याच्या अगदी उलटा हेतू आता निर्माण झाला आहे. इंग्रजी भाषा अल्पस्वरूप जगणारा आणि चांगल्या प्रमाणात जाणू इच्छिणारा वर्ग भारतात खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. त्यांच्यासाठी इंग्रजीतील लेखन मराठीत अनुवादित स्वरूपात तयार करून द्यावे, या उद्देशाने मंडळाने प्रामुख्याने या आधीही असे अनुवाद केले आहेत. मात्र जोडीला मूळ इंग्रजीही देण्याची प्रथा आम्ही ठेवलेली आहे. त्याचे उद्देश दोन. एक, मूळ लेखन ज्याला वाचायचे असेल त्याला दुर्मीळ झालेले लेखन उपलब्ध व्हावे, ते टिकावे, पुन्हा अधिक वाचकांपर्यंत देता यावे. दोन, इंग्रजी-मराठी तौलनिक अभ्यास करता यावा किंवा मराठी वाचल्यावर इंग्रजी वाचून समज अधिक पक्की होऊ शकते, त्यासाठी ते उपलब्ध असावे.

मूळ १८५७ची प्रस्तावना व त्याचा मराठी अनुवाद ही कल्पना ‘वाढता वाढता वाढे’सारखी विस्तारच गेली आणि १३ जुलै २०२२ ही प्रकाशनाची तारीख चुकली आता हे पुस्तक मोल्सवर्थ यांच्या १५१व्या स्मृतिदिनी प्रकाशित होत आहे, याचा मंडळाला आनंद होत आहे.

मारुतीचे शेपूट वाढत जावे तसा एकेक नवनवा मजकूर मी ज्येष्ठ अनुवादक श्री. अरुण नेरूरकर यांना सुचवत गेलो आणि तेही बिचारे तो तो मजकूर स्वीकारत गेले. त्यांच्या सौजन्याचा फायदा मी नेहमीच घेत आलो आहे. त्यांच्या या मृदू स्वभावाच्या ऋणात राहणे आवडत राहावे, असे असते. मराठी वाचक, विशेषतः इंग्रजी अधिक प्रगल्भ करू इच्छिणारे वाचक आमच्या या उपक्रमाचे पूर्वी केले आहे, तसेच आताही स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......