अजूनकाही
१. राज्यसभेचा निरोप घेताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सभागृहाचे आभार मानले. यावेळी पर्रिकर यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनाही धन्यवाद दिले. गोव्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही दिग्विजय सिंह यांना सत्तास्थापनेची जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले. या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी दिग्विजय सिंह यांचे आभार मानत त्यांना चिमटा काढला. ‘मी दिग्विजय सिंह यांचे विशेष आभार मानतो. दिग्विजय सिंह यांनी गोव्यात काहीच केले नाही. त्यामुळे मला सरकार स्थापन करता आले,’ असा चिमटा पर्रिकर यांनी काढला.
पर्रीकर यांच्या तथाकथित साधेपणाचं आणि सचोटीचं कौतुक असलेला एक मोठा वर्ग आहे... त्यांना हा चिमटा आहे, पण तो बसणार नाही. त्यांची कातडी निबर झाली आहे. गोव्याच्या राज्यपालबाईंनी सगळे संकेत, शिष्टाचार धाब्यावर बसवून केंद्रीय मंत्र्यांशी (अरुण जेटली) सल्लामसलत करून जनतेने मुख्यमंत्र्यासकट नाकारलेल्या भारतीय जनता पक्षाला पाचारण केलं आणि नीतीमत्तेचे मानबिंदू पर्रीकर यांनी दोन जिल्ह्यांच्या सरपंचकीसाठी देशाचं संरक्षणमंत्रीपद सोडलं, हा अभिमानास्पद घटनाक्रम यातून सहजच आठवला.
.....................................................................................................................
२. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकावरच भ्रष्टाचाराचा आरोप लागला आहे. या पथकाची आता सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. केजरीवाल यांनी स्पाय युनिट नावाने हे पथक सुरू केले होते. दिल्लीतील शाळांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती अरविंद केजरीवाल यांना देण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली होती.
अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या टोप्या कोणाकोणाच्या डोक्याला शून्य मिनिटांत फिट झाल्या होत्या, याची कल्पना नाहीये का केजरीवालांना? या देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या बाता मारणारा प्रत्येकजण अंती महाभ्रष्टच निपजतो, या इतिहासाचंही ज्ञान दिसत नाही त्यांना. असली कुचकामी पथकं स्थापन करण्याचे स्वस्त मार्ग अवलंबून लोकप्रिय व्हायला तुम्ही काय भाजपचे मुख्यमंत्री आहात काय?
.....................................................................................................................
३. भारतातील सर्वात मोठे हाय-प्रोफाइल गुंड कैदेत असलेल्या तिहार तुरुंगात भारतातल्या दोन मोठ्या गुंडांमध्ये एक वेगळंच गँगवॉर, खरं तर टीव्हीवॉर पेटलं आहे. माफिया डॉन छोटा राजन आणि बिहारचा गुंड राजकारणी शहाबुद्दीन यांच्यामध्ये हे म्युझिकल गॅंगवार पेटलं आहे. छोटा राजनला तुरुंगात टीव्ही मिळाला आहे, हे कळाल्याने शहाबुद्दीनचा तीळपापड झाला असून आपल्यालाही टीव्ही मिळालाच पाहिजे, असा हट्ट त्याने धरला आहे.
पण, म्हणजे बड्या गुन्हेगारांच्या मानवी हक्कांची पायमल्लीच आहे त्यांना टीव्ही वगैरे नाकारणं म्हणजे. असंही नाहीये की हे सगळं ते फुकट मागतायत. सगळ्यासाठी दामदुप्पट पैसे मोजून ते या सुविधा मिळवत असतात. मग सरळ सरकारने प्रिझन लक्झरी टॅक्स लावून या सुविधा पुरवल्या तर त्यातून राजकीय कैद्यांसाठी वातानुकूलित डुप्ले किंवा ट्रिप्लेसारखे सुंदर, टुमदार, सुसज्ज तुरुंग तरी बांधता येतील देशभर.
.....................................................................................................................
४. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भगवान श्रीराम यांच्याशी तुलना केली आहे. उत्तर प्रदेशातील ‘योगीराज’ हे रामराज्य आहे, याच रामराज्याचा उल्लेख कधी काळी राजीव गांधी यांनी केला होता, असे हुसैन एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान म्हणाले.
राजीव गांधी हुसैन यांच्या स्वप्नात आले होते आणि आनंदाने रडत रडत त्यांनी इतक्या वर्षांचं आपलं स्वप्न आता पूर्ण झालं आहे, असं सांगितलं, हे त्यांनी सांगितलं नाही का? फारच संकोची आहेत बिचारे. रामाच्या काळात बिभीषण आणि सुग्रीव होते, त्यांची जागा आज शहानवाझांनी घेतली आहे, हेही त्यांनी विनयशीलतेमुळेच सांगितलं नसावं.
.....................................................................................................................
५. राज्यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्याच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोडतोड केल्याची घटना समोर आली आहे. इंदौरमध्ये संघाचे नेते हिम्मत राठोड यांचे निधन झाले. राठोड यांच्यावर गोकुळदास रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे राठोड यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धुडगूस घातला. रुग्णालयात तोडफोड करण्यात आली.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रुग्णालयाची मोडतोड झाली, मोडतोड करणारे भारतमाता की जय अशा देशप्रेमाने भारलेल्या घोषणा देत होते. त्या सर्वांनी जाज्वल्य धर्माभिमान दाखवून देणारा टिळा लावला होता, या सगळ्या सकारात्मक गोष्टी कधीच लोकांपुढे आणणार नाही हा बिकाऊ मीडिया!!!
.....................................................................................................................
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment