यक लेखक व्हता. त्याच्या ल्हानपनची गोष्ट सांगतेत. त्याच्या बापाला वाटायचं त्यानं लै वाचावं, पन ते बेणीचं वाचायचंच न्हाई. यकदा बापानं त्याला लायब्रीतून पुस्तक आणून दिलं तं त्यो म्हन्ला,
‘आपन दुसऱ्याचे पुस्तकं वाचत न्हाई.’
खरं तं पुस्तकाचा चॉइस बापाला नव्हता; पन पोराला वाईट वाटूने म्हनून बापानं बजेट काडलं आन् दोनपाच गोष्टीचे पुस्तक आनून दिले. तरीबी पोरगा पुन्यांदा बापाला म्हन्ला,
‘तुमाला म्या मागंच सांगितलं, म्या दुसऱ्याचे पुस्तकं वाचीत न्हाई म्हनून.’
तं बाप सरप्राईज देत म्हन्ला,
‘पोरा हे दुसऱ्याचे न्हाईत. तुझे सोताचे पुस्तकं हायेत. खास तुझ्यासाठी इकत आणले हायेत.’
तसं पोरगं ख्या ख्या करीत हासलं आन् म्हन्लं,
‘दुसऱ्याचे म्हंजे तसं न्हाई. दुसऱ्याचे म्हंजे दुसऱ्यानं ल्हेलेलं वाचीत न्हाई आसं म्हन्लं व्हतं म्या.’
बापानं त्वोंडात बोट घातलं. त्यो पापभिरू व्हता; त्याला पोराचे बोल कळले न्हाईत. स्सालं लेखकाचे पाय आशे पाळण्यात दिसत आस्तेत. पुडं ह्या लेखकानं सिलॅबसचे पासिंगपुरते जे काय पुस्तकं वाचले आस्तीन नस्तीन; पन दुसऱ्याचं त्यांनी कायबी वाचलं न्हाई. बापानंबी पुन्यांदा पुस्तक आणून देन्याची डेरिंग केली न्हाई.
तं ह्यो पैदाईशी लेखक मंग हाळूहाळू मोठा व्हवू लागला. पुढं त्यो मासिकाफिसिकात ल्हेवू लागला, संमेलनात बोलूफिलू लागला. लोकबी त्याच्याबद्दल बोलू लागले, त्याचं वाचू लागले, ऐकू लागले. पाच धा सालात तं त्यो गॅदरिंग फिदरिंगला बोलवन्यायवडा लेखक म्हनून स्टँड झाला.
पुडं मंग लेखकाचा टाईम फुल्ल बिझी झाला. त्यानं पुस्तकं ल्हेले, पुरस्कार मिळविले, संमेलनांमंदी अध्यक्षपदं वठवले, तावातावानं मतं मांडले. साहित्य संस्थांमंदी लुडबूडबी केली. कमिट्याफिमिट्यावर चाचेगिरी केली. आपल्या हयातीमंदी जे काय जमंल ते सारं लेखकानं करून बगितलं. नंतर मंग त्यानं ह्या साऱ्याच गोष्टी इसरून टाकल्या, सोतालाबी त्यो इसरून गेला. आन् यकदिशी तं...
‘लागलीच? काय म्हन्तो? व्हेरी सॅड.’
‘दोस्ता, ही जगरहाटीच आस्ती.’
‘लैच फास्टमंदी संपला बबऱ्या त्यो.’
‘फास्टमंदी कशाचं? सत्तरीवर तगलाहे की त्यो.’
‘पन त्वा तं सत्तर सेकंदात संपवलंस त्याला.’
‘दोस्ता, रिपीटेशन सोडलं तं मान्साची बायोग्राफी आस्तीच किती? ओढूनतानून पंचवीस तीस पानात तं सारं आटपून जातं. कवाकवा तं सोळा पॉइंटात मॅटर चालवावं लागतंय आन् तरीबी फोटोफिलर टाकायचा टाईम येतो. त्याच्याबी नंतर मिनतवाऱ्या करून दोनपाच लोकांचे आर्टीकल मागवावे लागतेत तवा कुठं सत्तरऐंशी पानं व्हतेत.’
‘बबऱ्या, यवडंबी जळकांडू आसूने मान्सानं. यखांद्या टायमाला तरी जरा बरं बोलावं दुसऱ्याच्या बाऱ्यात.’
‘म्या पॉझिटिव्ह अँगलनं सांगून ऱ्हायलोय दोस्ता. म्या सांगून ऱ्हायलोय त्यो लेखक कवाबी नाद्दरच म्हनायचा. त्याची फर्स्ट प्रायोरिटी लिटरेचर व्हती. त्यानं आजुबाजूला जवाकवा भटकंती केली तवाबी त्यानं लिटरेचरचा हात सोडला नव्हता. त्यो पक्का हातामंदी ठिवला व्हता. म्हनून त्यानं कंदी बांडगुळगिरी केली न्हाई. हुजरेगिरी केली न्हाई. कंदी पत्रकारांच्या मागं मागं हुंगत फिरला न्हाई. उलटं त्याला जवा यका पेपरनं कॉलम ऑफर केला तवा तं ‘पेप्रांच्या संपादकांनी, पाचपन्नास ताकदीच्या लेखकान्ला कॉलमात बुडवूबुडवू मारून टाकलं आसून पाचपन्नास उपटसुंभ्यांचे तकलादू कॉलमं चालवूचालवू त्यांना लेखकांच्या लाईनीत आणून बशिवलै, सबब म्या ह्या आसल्या भानगडीत पडनार न्हाई.’ आसलं डेंजर स्टेटमेंट सुनावलं व्हतं.
‘बाप्पोव! मंग तं मोहोळच उठलं आसंन.’
‘न्हाई उठलं. ते पेपरवाल्यांपत्तोर गेलं न्हाई.’
‘त्यांच्या कचाट्यातून वाचला म्हन की त्यो?’
‘दोस्ता, पैली गोष्ट तं आसले स्टेटमेंट खाजगी गप्पामंदीच जिरून जातेत आन् सपोज कळालं तरीबी इश्यू करावा आशी गोष्ट नस्ती ही. जे पेप्रात ल्हेत न्हाईत त्यांच्या टाँटींगवर पेपरवाले जादा बॉदर करीत न्हाईत.’
‘बबऱ्या, त्यानं कंदी वाचलं न्हाई म्हनतोस तं मंग ल्हेलं तरी कुठल्या बळावर?’
‘दोस्ता, क्रिएटिव्ह रायटर व्हता त्यो. त्याला काय वाचायची जरुरत?’
‘तरीबी. सब्जेक्टचं लिमिट ऱ्हातंच की.’
‘ऱ्हातं ना मंग. पन त्याच्या वाट्याला जे काय सब्जेक्ट भेटले त्याचं त्यानं सोनं केलं.’
‘म्हंजे कसं?’
‘दोस्ता, मुबलक हाये म्हनून पान्याचा नासाडा करनाऱ्यावानी त्याचा सोभाव नव्हता. त्यो प्रत्येक सब्जेक्ट पुरवू पुरवू वापरायचा. ’
‘मला न्हाय समजलं बबऱ्या.’
‘म्हंजे कसं व्हतं दोस्ता, यखांदा सब्जेक्ट भेटला की, त्यो त्याच्यावर कथा ल्हेयचा. नंतरच्याला मंग कविता ल्हेयचा. त्याच्यावर यक विज्ञानकथा ल्हेयचा. नंतर मंग...’
‘कळलं कळलं. मला यवडं सांग. हे वाचायचं कोन?’
‘दोस्ता, आशा वाचकाला स्पेसिफीक आयडेंटीटी नस्ती. त्यो कॉमन पिपल आस्तो. ज्या लेखकात एजपास्नं जेंडरपत्तोर साऱ्या कॅटॅगिरीत व्हरायटी ल्हेन्याची ताकद आस्ती त्याला वाचक कुर्निसात करीत आस्तेत.’
‘कवा गेला त्यो बबऱ्या?’
‘कोन म्हने गेला?’
‘तूच म्हन्लास ना आता.’
‘आरं गेला म्हंजे त्यो वाङमयीन कोमात गेलाहे.’
‘म्हंजे आजूक पोकळी निर्माण झाली न्हाय म्हन की.’
‘दोस्ता, एऱ्हीच पोकळीचं काय खरं ऱ्हायलं न्हाई. फारच कमी लोक गेल्यानंतर हयात ऱ्हात आस्तेत. दुसरी गोष्ट, साहित्यात पोकळी निर्माण व्हन्यासाठी आता लेखकाला मरायची गरज ऱ्हायली न्हाई, निस्ता मेमरी लॉसबी काफी आस्तो. आसा बऱ्याचदा टाईम येतो की, लोकं त्यांच्या त्वोंडाकडं बगत ऱ्हातेत आन् तवातवा हे बोलायचंच इसरून जात आस्तेत. मंग अॅटोमॅटिकच पोकळी तयार व्हत आस्ती.’
‘बबऱ्या, स्सालं ही जी काय पोकळी आस्ती, ती ब्लॅक होलवानी आस्ती काय? त्यात भरभक्कम जागा आस्ती काय? तसं आसंन तं त्यात मंडपं टाकून संमेलनं हाकता येतीन काय?’
दोस्तानं डायरेक्ट व्हिज्युअल पोकळीच डोळ्याम्होरं आणली. बरं तेवड्यावरच त्यो थांबला न्हाई. त्यानं त्या पोकळीत लंबीचवडी जागा इमॅजिन केली. म्याबी मंग त्याचे व्हिज्युअल माझ्या डोळ्याम्होरं आणले आन् पोकळीचं प्रवेशद्वार आजूक ताणून भलंचौडं केलं. आतली स्पेस वाडवत नेली आन् त्याच्यात धापाच पार्टीशनबी टाकून बगितले. मनामंदल्या नेपथ्याचा आंदाजा आल्यावर त्याला म्हन्लं,
‘निस्ती यकच न्हाय दोस्ता, ढिगानं पोकळ्या आस्तेत. त्या यकमेकाला जोडून घितल्या तं अॅटेटाईम धापाच परिसंवाद इझीली व्हतेत, शिवाय यखांद्या समांतर संमेलनालाबी जागा उरती. पोकळीच्या आतल्या गरामंदी पुस्तकाचे स्टॉलबी झ्याक बसून जातेत.’
‘काय म्हन्तो? मंग तं मजाचहे बबऱ्या.’
‘पन यक धोकाबी हाये, दोस्ता.’
‘कोन्ता?’
‘स्सालं, यखांद्या टायमाला आपन समजावं पोकळी आन् ती निंगावी पुंगळी. फुकनीचं आत घुसायचा उशीर की, लागलीच दुसऱ्या भोकातनं भायेर.’
‘च्यामारी. मंग कसं करायचं?’
‘दोस्ता, स्सालं ह्या पुंगळीचं तं आजूकच आवगड आस्तंय. अंगावरला कागद सरला, त्यो कापून, छापून पुस्तकांत बांधल्या गेला की, छापखान्यात ह्या पुंगळ्यांना कामच काय उरतं? दोस्ता, तुला सांगतो, सांप्रतला आशा पुंगळ्या संमेलनाच्या मंडपामंडपात घरंगळत आस्तेत. जमिनीचा चढउतार ह्योच ह्यांचा वाड्मयीन प्रवास होवून बस्तो मंग.’
दोस्तानं हासून घितलं, म्याबी खौट हास्लो.
‘बबऱ्या, स्सालं, पोकळीवाले लेखक शिलकीत ऱ्हायलेत का न्हाईत? की सारा जमाना पुंगळीवाल्यांचाहे?’
‘दोस्ता, पोकळीवाले मस हायेत, पुडंबी येत र्हातीन. त्याची काळजी कंदीच नस्ती. कंपॅरिझनमंदी पुंगळीवाल्यांची पैदास जादा वाडून ऱ्हायलीय.’
‘जादा पैदास ही सिझनेबल गोष्ट आस्ती बबऱ्या. कंदीकंदी चढ कमी आन् उतार जादा आशी पोजीशन येवून जात आस्ती. तवाच ह्यांची चलती आस्ती. यकदा का चढावर चढ वाढत गेले की, ही पैदास उताराला लागत आस्ती, मंग डेडएन्डपत्तोर तं ती गुडूप व्हवून जाती.’
दोस्तानं कुठंबी फिट व्हईल आशी युनिव्हर्सल फिलॉसॉफी लावली आन् माझ्याकडं उत्सुकतेनं बगू लागला. म्या मंग त्याला यक गोष्ट सांगितली.
‘लिटरेचरच्या फिल्डमंदी यक जबरा गेस्ट व्हता. त्यो लै ठिकानी आसायचा, कवा उदघाटक तं कवा प्रमुख पाव्हना. त्याच्याबद्दल साऱ्यांनाच कवतूक व्हतं. क्युऱ्यासिटी व्हती. म्हनायला गेलं तं त्याला सारे वळखायचे आन् म्हनायला गेलं तं त्याच्याबद्दल कोनालाच जादा म्हाईती नव्हती. म्हंजे आसं की, त्यो लेखकै म्हनावं तं त्याचं यकबी पुस्तक नव्हतं. त्यो प्रकाशकै म्हनावं तं त्याचा यकबी लेखक नव्हता. त्यो प्रोफेसरै म्हनावं तं त्याचा यकबी स्टुडंट नव्हता. त्याला बोलन्याची लै हौसै म्हनावं तं त्याला कोनी कंदी माईकम्होरं हुभं ऱ्हायलेलं बगितलं नव्हतं. त्यानं कंदी कोनाच्या पुस्तकावर ल्हेलं म्हनावं तं त्याच्या मागं मागं पंटरगिरी करनारे कोनी हौशेगौशे दिसायचे न्हाईत. त्यो आजीमाजी पत्रकार-संपादकै म्हनावं तं किरट्या आवाजाचा माज त्याच्या बोलन्यात दिसायचा न्हाई, त्यो घसा तानून तावातावात बोलायचा न्हाई आन् खरं म्हंजे त्यो यक शब्दबी बोलायचा न्हाई. बरं स्पॉन्सरर हाये म्हनावं तं पठ्ठ्या दुसऱ्याच्याच मोटारसायकलींवर मागं बसून आलेला आसायचा. स्सालं मंग ह्यो मानूस हाये कोन? आन् लिटरेचरच्या फिल्डमंदी त्याची यवडी वट कशी? पन ह्यो प्रश्न कुनालाच पडायचा न्हाई. कारन त्यो कंदीच वट दाखवायचा न्हाई. वागायचा यकदम दिलखुलास. नावं ठिवायला, राग करायला जागाच न्हाई. त्याचा सोभाव लैच पोलाईट. कंदीच कुनाशी जादाकमी झालं न्हाई.
फकस्त यखांदा न्यू अँकर सोडला तं त्याची कुनालाच आडचन वाटायची न्हाई. अँकरलाबी पर्सनली काय राग नसायचा; पन त्याचा परिचय काय करून द्यायचा हेच त्याला कुनी सांगायचं न्हाई आन् कुनालाबी इचारावं तं ते म्हनायचे, ‘कमालै, लिटरेचरमंदली सारी दुनिया त्यान्ला वळखती आन् तुमाला म्हाईती न्हाई?’ बस्स, अँकर गपगार व्हायचा. त्याला गिल्टी फिलींग यायचं; पन परिचयाचा प्रश्न शिलकीत ऱ्हायचाच. अँकर मंग कायतरी थातूरमातूर बोलून धकवून न्यायचा.
तं काय की, ह्यो मानूस बगर बोलता आसा नावाजून गेला व्हता. पेप्राफिप्रांनी त्याच्या कवतुकामंदी कंदी कसर सोडली नव्हती. पुडं झालं आसं की, लिटरेचरमंदी दरसाल पुस्तकाची जशी भर पडत जाती, तशी ह्या मान्सांच्या आयुष्यामंदी वर्षावर्षाची भर पडत गेली आन् ह्याचं वय झुकत चाल्लं. चांगला उच्चापुरा, गोरापान, सफेद कपडे, सफेद केस, दाढी घोटलेली. त्याच्याकडं बगून यकदिशी मंडळात खुरडलेला मानूस म्हन्ला, ह्यांच्या नावानं गौरवग्रंथ निंगला पायजेल. मजाकमजाकमंदी सुचवलेली आयडिया लोकायला लै भावली. धापाच लेखकांनी लागलीच आर्टीकलला हात घातला. यकानं तं डायरेक्ट मुलाखतच घितली.
मानूस लैच इमानदार व्हता. स्टेजवर पोलाईट आस्ला तरी कारेक्रमोत्तर कार्यक्रमात त्यो खुलून जायचा. मुलाखतकाराला मंग त्यानं भडाभडा आपली हिस्ट्री सांगायला सुरवात केली. तं काय की, ह्यो मानूस रुम करून ऱ्हायचा त्याच्याशेजारी यक हॉल व्हता. तिथं कायम काय ना काय कारेक्रम चालू आसायचे. कवा कविसंमेलन, कवा प्रकाशन, कवा चर्चासत्र. ह्या आवाजाचा त्याला लै तरास व्हायचा. पन सोभाव शामळू आसल्यानं जादा त्रागा करायचा न्हाई. येऱ्हीतेऱ्ही घरबसल्या सारं ऐकावंच लागतंय, त्यापक्षा कारेक्रम आटेंड करावं आन् मन रमवावं आसा इचार करून त्यो कारेक्रमालाच हाजेरी लावू लागला. पुडं पुडं त्याला वाटू लागलं, स्सालं आपन निस्तंच येतो आन् जातो. काय तरी पार्टीसिपेशन आस्लं पायजेल. मंग त्यानं कारेक्रमातल्या पाव्हन्याला सोताकडून यक बुके द्यायला सुरवात केली. कारेक्रम कुनाचाबी आसो ह्याचा बुके ठरलेला. घडीघडी येनाऱ्या, कारेक्रम घेनाऱ्या लोकांच्या त्यो चांगलाच नजरेत बसला. त्यांच्यापैकी कुनीतरी यकदा म्हन्लं, ह्यो मानूस सोताचे पैशे घालतो, त्याला आपन वाङ्मय मंडळावर घितलं पायजेल. पैल्यांदा जराशीक काकूं झाली पन मंग नंतरच्याला कुना मेहेरबान मान्सानं त्याला यन्ट्री दिली आन् त्यो साहित्य मंडळात सामील झाला.
कवा मंडळाच्या तं कवा सोताच्या खर्चानं त्यानं सारे प्रमुख पाव्हने बुकेळून काडले. त्याला ते व्यसनच जडलं. पुडं पुडं तं आसपास कुठेबी, कुनाचाबी, कुन्ताबी कारेक्रम आसो ह्याचा बुके हामखास आसायचाच. यखांद्या फिल्डमंदी यखांदा मानूस कायम दिसत आसंन तं त्यो वळखीचा व्हवून जात आस्तो आन् त्याला चेहरा मिळून जात आस्तो. सिस्टिममंदी काई मान्सं यूं म्हन्ता धकून जात आस्तेत, त्यो नॉनपॉइझनस आसंन तं आजूकच बेनिफीट भेटत जात आस्तंय. तं आसंच मंग ह्या मान्साची अॅटोमॅटिकच यक इमेज तयार व्हत गेली. त्याचीबी बॉडीलँग्वेज बदलत गेली. आसं व्हता व्हता यकदिशी यका न्यू कमर हौशी लेखकानं ह्याला थेट पाव्हना म्हनूनच बलावलं. झालं, त्यादिसापास्नं ह्यो पठ्ठ्या प्रमुख पाव्हन्याच्या लाईनीत जे जावून बसला ते पर्मनंटच व्हवून बस्ला. बरं सांप्रतला बोलनाऱ्या मान्सांची पब्लिकनं धस्की घेतलेली ऱ्हाती. न बोलनारा पाव्हना पब्लिकला जादा आवडून जात आस्तो. त्यो न बोलता बरंच काई सांगून जात आस्तो. तं मंग लोक त्याचं नाव वाचून आवर्जून कारेक्रमाला येवू लागले. मंग वळनच पडून गेलं. ह्यो पाव्हना आसंन तं पब्लिक लै जमती आशी यक मिथच तयार झाली. तवाधरनं ह्या मान्सानं मागं वळून बगितलंच न्हाई. केवळ कन्टिन्यूटीच्या भरोशावर त्यो श्रोता दशसहस्त्रेशू व्हवून बसला.
सांप्रतला त्याच्या नावावर पाच पंचवीस लोकल संमेलनं, पन्नासयेक कविसंमेलनं आन् शंभरेक पुस्तक प्रकाशनाचा पाव्हना म्हनून नोंद हाये. किमान दोनेकशे टायमाला त्याचे पेप्रात फोटो आन् साताठशे टायमाला बातम्यामंदी नावं येवून गेले हायेत. जिंदगीत त्यानं जेवडे केवडे हार दुसऱ्यांना घातले आस्तीन, बुके दिले आस्तीन तेवडे तं त्यानं कंदीच वसूल केले आस्तीन, वरनं शेकड्यानं शालीबी मिळीवल्या आस्तीन. आता जे काय हाये ते त्याची कल्चरलमंदली पेन्शन समजायची.’
‘बाप्पोव! बबऱ्या, त्याचा गौरवग्रंथ झाला का मंग?’
‘दोस्ता, गौरवग्रंथ ही गोष्ट इंपॉर्टंट न्हाई.’
‘त्याची मुलाखत तरी छापून आली काय?’
‘तेबी इंपॉर्टंट न्हाई दोस्ता.’
‘फुकनीच्या मंग इंपॉर्टंट हाये तरी काय?’
‘दोस्ता, आपला सब्जेक्ट पुंगळीचा व्हता.’
‘म्हंजे ह्यो पुंगळीवाला हाये म्हन की.’
‘न्हाई दोस्ता. त्यो पोकळ्यांना पुंगळी करनारा हाये.’
‘आता हे नवीन कायय बबऱ्या?’
‘सांप्रतला त्यो चढावर हाये; पन उताराला लागलेला न्हाई.’
‘म्हंजे कसा?’
‘दोस्ता न बोलनारा मानूस मुकाच आस्तो आसं कंदी समजूने. ह्या भाद्दराकडं लै डेंजर नोंदी सापडल्याहेत. फुकनीच्यानं यकेका बुकेमागं यकेक गोष्ट ल्हेवून ठिवली हाये.’
‘पन मंग त्ये भायेर कामून येत न्हाई?’
‘त्याचाबी यक प्रॉब्लेमै. ह्याच्या साऱ्या नोंदी पेपरनॅपकीनवरैत. त्याचं कसंय, कारेक्रमानंतर ह्यो बसला की, ह्याला ते सुचत ऱ्हातं. आसंच यकदा बसल्यावर त्याला कायतरी सुचलं आन् लागलीच कुनीतरी लच्छर मान्सानं पेपरनॅपकिन त्याच्या पुड्यात केला. पेनबी दिला. तवापास्नं त्यानं सारं ल्हेवून ठिवलं. फकस्त आता संगतवार लावायचं ऱ्हायलं हाये. त्ये झालं की मंग ह्यो रिप्युटेड ऑथर व्हनारै. तुला सांगतो, दोस्ता, यकदा ते झालं की मंग मोस्टली पोकळ्यांवर ह्याचंच राज्य ऱ्हानारै.’
‘हे व्हनार कवा पन? स्सालं, टेबलावरच्या गोष्टी टेबलावरच इसरून गेल्यानं मराठी लिटरेचरची लै हानी झालीहे बबऱ्या. ह्याचंबी आसंच झालं तं?’
‘दोस्ता, पब्लिकला पेशन्स ठिवावे लागत आस्तेत. काळ जावू द्यावा लागत आस्तोय. साऱ्याच गोष्टी इमिजिएट हातामंदी येत नस्तेत.
माझ्या स्टेटमेंटवर मंग दोस्त इचारात गुंगून गेला. त्यानं लांबवर नजर फेकली आन् झिरोमंदी बगत बसला. जसं काई त्यो काळाचा आदमास घिवून ऱ्हायलाय. म्या गपगुमान त्याच्याकडं बगत ऱ्हायलो.
(ता. क.- यका संमेलनामंदी पार्टीसिपेट झालेला यक वक्ता लैच तडकला व्हता. त्याचं सायलेन्सर दोनपाच ठिकाणाहून फुटलं व्हतं. त्याच्या भकभक मंदून दुसरीच ‘भ’राखडी भायेर पडू लागली व्हती. त्यो संयोजकान्ला म्हन्ला,
‘शब्दसुमनानंच स्वागत करताव आन शब्दसुमानानंच आभार मानताव! फुकनीचं, गावाकडं जाताना कंडक्टरच्या हातावर काय शब्दसुमनंच टेकवू काय?’
…..
म्या दोस्ताला ही गोष्ट सांगितली तं दोस्त म्हन्ला,
‘बबऱ्या, ह्यो पाव्हना यवडा धूर कामून सोडून ऱ्हायलाय? शब्दसुमनं यवडे आक्षेपार्ह आस्तेत काय?’
‘न्हाय न्हाय दोस्ता. ते तं अनमोल आस्तेत.’
‘मंग पाव्हना घायाळ कामून झालाहे?’
‘अनमोल गोष्टीनं कोन्ताबी पाव्हना घायाळ व्हतोच.’
‘पन मंग त्यो आसा कामून बरळायलाय?’
‘दोस्ता, त्याला भेटलेले शब्दसुमनं त्याच्या मनातल्या शब्दसुमनांशी मॅच व्हईना झालेतं. जरासाक टाईम ह्यो आंतर्गत झगडा चालू ऱ्हानारचै; भायेरचे आत घुसू पाहातीन तं आतले त्यान्ला भायेर लोटतीन. नंतरच्याला दोनीबी यकमेकात मर्ज व्हवून जातीन. आपन जादा बाऍदर करूने.)
(लेखकाच्या पुस्तकांसाठी इथे क्लिक करा.)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment