अजूनकाही
हातातलं वृत्तपत्र खाली ठेवून चावी देता देता सुरक्षारक्षकानं विचारलं, ‘काय वाटतं साहेब तुम्हाला, दादांच्या (पक्षी : अजित पवार) बंडाबद्दल?’ या सुरक्षारक्षकाचं आडनावही पवार आहे, हा एक योगायोग.
‘मला काय वाटायचं, तुम्हालाच काय वाटतं ते सांगा.’ मी उत्तरलो. त्यावर तो म्हणाला, ‘मोठ्या साहेबांना (पक्षी : शरद पवार) विचारल्याशिवाय दादा काहीच करू शकत नाहीत. ठरवून आपसी जुमला आहे हा’. राष्ट्रवादीतल्या बंडाळीबद्दल अगदी सर्वसामान्य माणसापासून ते राजकारणातले बडे नेते आणि प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही असंच वाटतं, असंच अनुभवायला येतंय.
राजकारणी शरद पवारांच्या संदर्भात १९७८ ते १९८३ हा झालेला बदल लक्षात घेण्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खंजीर प्रयोग’ म्हणून गाजलेली जी बंडखोरी पवारांनी केली, त्या वेळी त्यांची लोकप्रियता (आजच्या भाषेत ‘टीआरपी’) सर्वोच्च होती.
१९७८ साली राजकारण, प्रशासन, समाजकारण, संस्कृती, उद्योग या क्षेत्रातच नव्हे, तर सर्वसामान्य माणसावरही पवारांच्या नावाचं गारूड होतं. तेव्हा माझी पिढी नुकतीच पत्रकारितेत आलेली होती. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडून पवारांनी पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याची बातमी दैनिक ‘ऐक्य’साठी कव्हर करण्यासाठी मी सातारहून गेलो होतो. नंतर साधारण १९९०पर्यंत अगदी पुण्याच्या एस.एम. जोशी यांच्यापासून ते नागपूरच्या लीलाताई चितळे, भास्कर लक्ष्मण भोळे हेसुद्धा पवारांविषयी अतिशय सकारात्मक बोलत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आता प्रश्न असा निर्माण होतो की, ‘बेभरवशाचे राजकारणी’ अशी पवारांची प्रतिमा का निर्माण झाली? १९७० ते १९९०च्या दशकात असलेलं पवारांचं गारूड ओसरत का गेलं? कारण पवारांची भूमिका कायमच सत्तानुकूल आणि भाजपनुकूलही राहिलेली आहे. मात्र या संदर्भात उघड भूमिका न घेता जे छुपं राजकारण पवार खेळले, तेच कारणीभूत आहे.
पवारांनी एकूण तीन वेळा काँग्रेस पक्ष आजवर सोडला आणि पुन्हा ते सत्तेसाठी काँग्रेसच्याच छत्राखाली गेले. १९७८ साली म्हणजे ‘खंजीर प्रयोगा’नंतर राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि थोड्याच काळात मुख्यमंत्री झाले. विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड केलं, पण १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते लगेच काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झाले.
खरं तर, आपली पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा डावलून सोनिया गांधी परस्पर राष्ट्रपतींना भेटल्या, हे शल्य पवारांना रुतत होतं, म्हणूनच त्यांनी त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली असं म्हणण्यास वाव आहे; नव्हे तेच कारण आहे. १९९५मध्ये युतीचं सरकार आल्यावर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त विधिमंडळ पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी पक्षावर त्यांचं नियंत्रण कायम ठेवलं; तीदेखील सत्ताकांक्षाच होती.
पवारांचं राजकारण केवळ काँग्रेससोबत सत्तानुकूल राहिलं असतं, तर ते त्यांच्यात ‘असल्या-नसलेल्या’ सेक्युलर विचाराला शोभूनही दिसलं असतं, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचं सरकार सत्तारूढ झालं, तेव्हा केंद्रातल्या कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेलं केंद्रीय आपत्ती नियंत्रण मंडळाचं प्रमुखपद पवारांनी स्वीकारलं. २०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यावर न मागताच त्यांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला. २०१९ साली काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्तेसाठी बोलणी करत असतानाच दुसरीकडे भाजपच्याही संपर्कात पवार होते, हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेल्या बाणांवरून आणि अजित पवार यांच्या वक्तव्यातून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. नागालँडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पवारांचा पक्ष सहभागी झाला. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मात्र सत्ता आणि भाजपनुकूल राहतांना पवारांनी ते सगळं मोकळेपणानं कधी सांगितलं नाही. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना कशी झाली, हे सांगितलं, पण भाजपशी सुरू असलेली चुंबाचुंबी मात्र लपवून ठेवली. पहाटेच्या शपथविधीचं खापर त्यांनी आधी अजित पवारांवर फोडलं, पण अशात राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारलेल्या बाणानं घायाळ झाल्यावर, पहाटेचा शपथविधी हा माझा गुगली होता, कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा होण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठवली जाणं गरजेचं होतं, असा खुलासा पवारांनी केला.
हेही म्हणणं लंगडं आहे कारण राष्ट्रपती राजवट अटळ नसते. राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढवण्यासाठी संसदेची संमती घ्यावी लागते, शिवाय बहुमताची प्रत्यक्ष चाचणी (Head count) झाल्यावर बहुमताची खात्री पटली, तर राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस राज्यपालांनी करण्याच्या घटना आपल्या देशात यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पवारांचा हा गुगली वाया गेला.
‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षात प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांची भूमिका अजित पवार यांच्याइतकीच महत्त्वाची आहे. पटेल म्हणजे काही सुरेश कलमाडी नव्हेत. पटेल आणि पवार यांचं साटलोटं तीनपेक्षा जास्त दशकांचं. शिवाय त्याला पवारांवर असलेल्या पटेलांच्या निष्ठेचं बंधन कसं आहे, याचा (मला तरी) अनुभव आहे.
मी दिल्लीत असताना एकदा पटेल यांच्यासोबत नागपूरला चार्टड फ्लाईटनं एका कार्यक्रमासाठी प्रवास करत होतो. सोबत ज्येष्ठ पत्रकार हरीश गुप्ता आणि शीलेश शर्माही होते. त्या वेळी झालेल्या गप्पांत माझ्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटेल म्हणाले होते, ‘मी मरेपर्यंत साहेबांची साथ सोडणार नाही.’ हा प्रसंग घडून आता दहा वर्षे उलटली. आता नेमकं असं काय घडलं की, पवारांसोबत बांधलेली जिवाभावाची गाठ पटेल यांनी तोडून टाकली?
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हेच छगन भुजबळ यांच्या संदर्भातही. त्यांना शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये आणलं ते पवारांनीच. नंतरचा त्यांचा सोबत झालेला प्रवास सर्वांनाच ज्ञात आहे. तीन सव्वातीन महिन्यांपूर्वी भुजबळांची निवांत भेट झाली. तेव्हा ‘मी पवारांसोबतच आहे’, अशी ग्वाही भुजबळांनी खाजगीत आणि जाहीर मुलाखतीतही दिली.
आता अजित पवार, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ या तिघांसह अनेक नेते पवारांपासून दुरावले आहेत. सांगाती असलेले लोक का तुटले याबद्दल कठोर आत्मपरीक्षण पवारांना करावं लागणार आहे. म्हणजे हा संघर्ष केवळ राष्ट्रवादीतले बंडखोर विरुद्ध शरद पवार असा नाही, तर ‘शरद पवार विरुद्ध शरद पवार’ असाही आहे.
पवारांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा कधी लपवून ठेवलेली नाही, पण १९९०नंतर त्याच पदासाठी त्यांनी त्यांच्या पक्ष आणि सहकाऱ्यांचा वापर करून घेतला का, असा प्रश्न पटेल यांनीही आत्मचरित्र लिहिण्याचा जो इशारा दिला आहे, त्यातून मिळतो. मी पूर्वी एकदा लिहिलं आहे, पुन्हा एकदा सांगतो पवारांचं पंतप्रधानपदाचं स्वप्न मिथक होतं आणि आहेही.
पवारांचा संपर्क राष्ट्रीय स्तरावर सर्वच क्षेत्रात थक्क व्हावं इतका व्यापक आहे, परंतु हे स्पष्ट सांगितलं पाहिजे की, पवारांचं नेतृत्व राष्ट्रीय नाही. याचं एक कारण म्हणजे त्यांच राजकारण विश्वासार्ह नाही, हा राष्ट्रीय स्तरावर असलेला पक्का समज हे आहे आणि त्यालाही पवारच जबाबदार आहेत. ते कधी दिल्लीत ठाण मांडून बसले नाहीत आणि अविश्वासार्ह राजकारणी या प्रतिमेतून बाहेर पडण्याचे निकराचे प्रयत्नही त्यांनी केलेले नाहीत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
याआधी अनेकदा सांगितलेला एक अनुभव पुन्हा सांगतो, म्हणजे दिल्लीत काय वातावरण आहे, हे स्पष्ट होईल. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळातला हा प्रसंग आहे. एकदा दिल्लीत असताना दोन पत्रकार मित्रांसोबत काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यांकडे (पुढे ते देशाचे घटनात्मक प्रमुख झाले.) रात्रभोजनाला जाण्याची संधी मिळाली. गप्पात एकानं विचारलं, ‘दादा, तुमच्यात पंतप्रधानपदाचं सर्व ‘मेटल’ आहे, पण एकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तुम्ही शांत का झाला आहात?’
त्यावर ते चाणक्य नेते जे म्हणाले होते, त्याचं सार असं- ‘एक म्हणजे, माझ्या स्वत:च्या राज्यातूनच एक हाती संख्याबळ माझ्या पाठीशी नाही आणि दुसरं म्हणजे तर मला गांधी कुटुंबाचा पाठिंबा नाही; तो असेपर्यंत मीच काय कुणीही काँग्रेसकडून पंतप्रधान होऊ शकत नाही!’
तिथून बाहेर पडल्यावर मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो, तुम्ही दिल्लीचे पत्रकार आमच्या पवारसाहेबांना ‘मराठा पॉवर’ म्हणता, ‘ग्रेट मराठा’ म्हणता, मुत्सद्दी आणि व्यासंगी राजकारणी म्हणता, तरीही त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून म्हणून तुम्ही गृहीत का धरत नाही? त्यावर पत्रकार मित्र म्हणाला, ते अजून पूर्ण दिल्लीकर झालेले नाहीत आणि त्या पदासाठी अजून त्यांची तयारी नाही.
(आजही पक्कं स्मरणात आहे, त्यानं ‘he is a spring chicken’ असा शब्दप्रयोग केलेला होता आणि तो मला तेव्हा मुळीच रुचला नव्हता.) त्यावर देवेगौडा यांना काय एका रात्रीत सर्वज्ञान प्राप्त झालाय का असा वाद मी घातला, तेव्हा त्यानं महाराष्ट्राचे लोक पवारांबाबत ‘अंध आणि नाहक इमोशनल आहेत’, असा शेरा मारला होता.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही गटाच्या आजवर कुणीही रस्त्यावरची भाषा (street language) वापरली नाहीये किंवा शिवीगाळही झालेली नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. (शिवसेनेच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत किंवा अन्य नेत्यांनी यांची नोंद घ्यायला हवी.) मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपवून न ठेवता ‘दुसऱ्याच्या पोटी जन्माला आलो हा माझा दोष आहे का?’ हा अजित पवार यांनी उपस्थित केलेला सवाल खूप काही सांगून गेलेला आहे.
पवार भाजपबाबत कायम अनुकूल भूमिका घेतलेले, पण शेवटच्या क्षणी त्यांनी कच खाल्ली. मात्र, अजित पवार त्या मार्गावरून पुढे चालत गेल्यावर त्यांच्यावरच खापर फोडलं. ‘मला व्हिलन ठरवलं गेलं’, असं जे अजित पवार म्हणाले, त्याचा गर्भित अर्थ हाच आहे.
शरद पवार जिजीविषा वृत्तीचे आहेत. आलेल्या संकटावर मात करण्याची एक विलक्षण ताकद त्यांच्यात आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही लढण्यासाठी सज्ज असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. ही लढाई त्यांनाच प्रामुख्यानं आणि एकट्यानं लढायची आहे. पक्षांतर्गत नेतृत्वाची ही निर्णायक लढाई लढण्यासाठी पवारांना हजार हत्तीचं बळ लाभो, याच शुभेच्छा!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment