‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ हे तरुण संशोधक राहुल माळी यांचं पुस्तक नुकतंच अक्षर दालनतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
आमचे तरुण मित्र राहुल माळी यांच्या ‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान - स्वामीजींच्या कोल्हापूर भेटीचा मागोवा’ या ग्रंथाला प्रस्तावना लिहीत असताना मी थोडा दबकून गेलो आहे! कारण खुद्द स्वामीजींनीच म्हटले आहे की, ‘पंधराशे वर्षे पुरेल इतके ज्ञान मी या पृथ्वीवरील मानवजातीस दिले आहे. या विवेकानंदाने काय केले आहे, हे समजण्यासाठी दुसरा विवेकानंद जन्मास आला पाहिजे.’
आणि मी तर स्वामी विवेकानंदांच्या चरित्र कार्याचा केवळ एक वाचक, अभ्यासक नव्हे! परंतु राहुल माळी यांनी - जे महाराष्ट्र पोलीस दलात सध्या कार्यरत आहेत - स्वामीजींच्या विचार कार्यावरील अव्यभिचारी निष्ठेचा आणि व्यासंगाचा मी साक्षीदार आहे! म्हणूनच मी या प्रस्तुत ग्रंथाला स्वामीजींच्या चरित्रकार्याचा नम्र वाचक या नात्याने दाद द्यावी म्हणून प्रस्तावना लिहिण्याचे अक्षम्य धाडस करत आहे!
आजपर्यंत स्वामी विवेकानंदांबाबत इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली इत्यादी विविध भाषांमधून खूप लिहिले गेले आहे. खुद्द स्वामीजींच्या समग्र विचारांचे १० खंड, त्यांचा पत्रव्यवहार इत्यादी साहित्य आहे. परंतु अगदी निवडक अशा त्यांच्या चरित्रग्रंथांचा विचार केला, तरी ‘The life of Swami Vivekananda’ या virajananda Swami (१९१२)पासून ते डॉ. वि. रा. करंदीकरांपर्यंत असंख्य ग्रंथ प्रसिद्ध झालेले पहावयास मिळतात. परंतु स्वामीजींनी भेटी दिलेल्या वा वास्तव्य केलेल्या शहरांबाबत, तिथे त्यांना भेटलेल्या प्रमुख व्यक्तींचा किंवा त्यांच्याशी झालेल्या विविध विषयांवर झालेला विचारविनिमयांचा किंवा स्वामीजींना आलेल्या अनुभवांचा मागोवा घेणारे ग्रंथ निश्चितच त्यांच्या चरित्रग्रंथांपेक्षा कमी असतील असा तर्क केला, तर तो चुकणार नाही, असे मला वाटते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
अशाच ग्रंथांमध्ये राहुल माळी यांच्या प्रस्तुत ग्रंथाचा समावेश करावा लागेल. ते स्वामींच्या चरित्र व कार्याचे निस्सीम भक्त आहेत. परंतु त्यांची ही भक्ती आंधळी नाही! किंवा ती त्यांच्या अंधश्रद्धेचा भाग नाही.
परिणामी, ते स्वामीजींच्या जीवनकार्याचा-विचारांचा अभ्यास डोळसपणे करत आहेत. साहजिकच त्यांना स्वामीजींनी दिलेल्या कोल्हापूर भेटीबाबत अधिक जिज्ञासा वाटली. त्यासंबंधी अधिक माहिती प्राप्त करावीशी वाटली. त्यातून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर भेटीचा जो मागोवा प्रस्तुत ग्रंथात अतिशय सांक्षेपाने घेतला आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत-
पहिले कारण म्हणजे राहुल माळी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी कोल्हापूर शहर आहे. मी ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीवर स्वामीजींची पावले सुमारे १३० वर्षांपूर्वी उमटली होती. स्वामीजींचे थोडे दिवस का असेना, इथे वास्तव्य झाले होते. त्यांनी राजर्षी शाहू छत्रपतींना भेटण्याचा प्रयत्न केला होता. इत्यादी अनेक घटनांबाबत त्यांच्या मनात सदैव आनंद आणि अभिमानाच्या भावना वास करत असणार हे निश्चित!
दुसरे कारण असे की, स्वामी विवेकानंदांच्या या कोल्हापूर भेटीबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्यांचे वास्तव्य कोल्हापुरातील कोणत्या पेठेत, कोणत्या बंगल्यात होते? त्यांची व्याख्याने कोणत्या ठिकाणी झाली? या प्रसंगी कोल्हापुरातील कोणत्या व्यक्तींना त्यांचा सहवास लाभला? ते नेमके काय बोलले? इत्यादीसंबंधी गैरसमजुती आहेत किंवा भिन्नभिन्न मते जी व्यक्त केली जातात, त्यांचे निराकरण करण्याचा राहुल यांनी अतिशय प्रामाणिक असा खटाटोप या ग्रंथात केला आहे.
अगदी पहिल्याच प्रकरणात स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर संस्थान भेटीपूर्वी परिव्राजक या नात्याने त्यांचा जो प्रवास सुरू झाला, तो केव्हा आणि कोणत्या ठिकाणहून हे नमूद करून माळी यांनी त्यांच्या मार्गातील असंख्य शहरे-खेड्यांचा उल्लेख केला आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
याच प्रवासात स्वामी विवेकानंद रेल्वेने मुंबईहून पुण्याकडे (१८९२) येत असताना लोकमान्य टिळकांची भेट कशी झाली, ते लोकमान्यांच्या घरी कसे राहिले होते या संबंधी थोडक्यात आढावा त्यांनी घेतला आहे.
प्रकरण २ ते ५ अशा एकूण चार प्रकरणांत लेखकाने ‘ग्रंथमाला’कार विष्णू गोविंद विजापूरकर, प्रा. गणेश ऊर्फ गणपती सदाशिव भाटे आणि श्री. हरिपद मित्र यांच्या स्वामी विवेकानंदांच्या अतिशय मौलिक अशा आठवणी दिल्या आहेत. या सर्वांनाच स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची संधी मिळाली होती. ही प्रकरणे अधिक वाचनीय आणि उदबोधक ठरणार आहेत.
स्वामी विवेकानंदांच्या स्मरणक्षमतेच्या अनेक आख्यायिका आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत; परंतु श्री. हरिपद मित्र यांनी आपल्या ‘Reminiscences of Swami Vivekananda’ या ग्रंथामध्ये स्वामीजींच्या स्मरणक्षमतेबाबत डिकन्सच्या ‘पिकविक पेपर्स’ या प्रसिद्ध कादंबरीचे उदाहरण दिले आहे. त्यांच्याशी गप्पा मारत असताना स्वामी विवेकानंदांनी त्या कादंबरीतील चार-पाच पृष्ठांचा मजकूर सहजपणे आपल्या मुखातून सादर केला! केवळ दोन वेळा ‘पिकविक पेपर्स’ ही कादंबरी आपण वाचल्याचे स्वामीजींनी हरिपद मित्रांना सांगितल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही!
विशेषतः धर्म, भोंदू, साधू, भूकबळी, मांसाहार, चोरी, बालविवाह इत्यादीबाबत स्वामीजींनी जे विचार व्यक्त केले होते. त्याचाही मागोवा विजापूरकर, भाटे, हरिपद मित्र या काही व्यक्तींच्या मौलिक आठवर्णीच्या आधारे राहुल माळी यांनी घेतला आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
वास्तव्याचे ठिकाण
१८९२च्या ऑक्टोबर महिन्यात स्वामी विवेकानंद पुण्याहून कोल्हापूर संस्थानात आले, तेव्हा ते कोणत्या ठिकाणी राहात होते, याबाबत काही गैरसमज दिसून येतात. त्याबाबत वेगवेगळी मते व्यक्त होताना दिसतात. तर वि. रा. करंदीकरांसारखे स्वामीजींचे साक्षेपी चरित्रकार याबाबत काहीच सांगत नाहीत!
परंतु राहुल माळी यांनी कोल्हापूरमध्ये स्वामी विवेकानंद कोणत्या पेठेत, कोणत्या बंगल्यात तीन दिवस राहिले होते, याचा शोध अतिशय मेहनतीने घेतला आहे. इतकेच नव्हे, तर त्या जागेचे उतारे आणि नकाशे त्यांनी या ग्रंथात सादर केले आहेत. या खेरीज लेखकाने कोल्हापूर संस्थानाचे प्रशासन अहवाल (Administration Report) आधार म्हणून उद्धृत केले आहेत..
१३, १४ आणि १५ ऑक्टोबर १८९२ या दिवशी स्वामी विवेकानंद खासबाग येथील सध्याच्या कलायोगी जी. कांबळे स्मृती शिल्पासमोरच्या जागेत वास्तव्यास होते. सध्या तेथे राधा-कृष्ण आणि श्री हनुमान या देवदेवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत, त्याला लागून रिक्षा स्टॉप आहे. बरोबर त्याच्या पिछाडीस जो बंगला होता, त्यात स्वामीजींचे वास्तव्य होते; असा निष्कर्ष राहूल माळी यांनी मांडला आहे!
व्याख्यान कोठे दिले?
स्वामी विवेकानंदांनी आपल्या कोल्हापूर भेटीत जे व्याख्यान दिले होते, त्यासंबंधी संभ्रम निर्माण करणारी काही मौखिक माहिती आजही सादर केली जाते. त्या संबंधीही राहुल माळी यांनी ‘ग्रंथमाले’चे संपादक प्रा. विजापूरकर यांची साक्ष देऊन स्वामीजींचे व्याख्यान अजूनही अस्तित्वात असणाऱ्या राजाराम कॉलेजच्या मेन हॉलमध्ये झाले होते, हे स्पष्ट केले आहे. राजाराम कॉलेजच्या ‘राजामियन परिषदे’मार्फत स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान राजाराम कॉलेज (जुनी इमारत) येथेच झाले होते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
स्वामी विवेकानंद ज्या ज्या शहरात किंवा मोठ्या गावात जात असत त्या त्या शहरात किंवा मोठ्या गावात असणाऱ्या ग्रंथालय-वाचनालयाला ते आवर्जून भेट देत असत. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर मुक्कामी ‘Native General Library’ म्हणजेच आजचे ‘करवीर नगर वाचन मंदिरा’ला निश्चितपणे भेट दिली असावी, असा तर्क करता येतो.
शाहू छत्रपतींना ते भेटले का?
स्वामी विवेकानंद यांची शाहू छत्रपतींशी भेट झाली होती का? या संबंधीही स्वामी विवेकानंदांच्या अनेक चरित्रकारांनी कल्पनांचे पतंग खूप उंच उंच उडवून ठेवले आहेत. उदा. वि. रा. करंदीकर यांच्यासारख्या प्रसिद्ध चरित्रकाराने आपल्या ‘विश्वमानव स्वामी विवेकानंद’ या बृहद् चरित्रात असाच कल्पनांचा पतंग उडवलेला दिसतो. परंतु राहुल माळी यांनी या ग्रंथात विविध साधनांचा अतिशय काळजीपूर्वक धांडोळा घेतला आणि त्यांचा अभ्यास करून दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आणल्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शाहू छत्रपती आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली नाही. स्वामीजी १३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर १८९२ या तीन दिवसांच्या कोल्हापुरातील वास्तव्यामध्ये जुन्या राजवाड्यात शाहू छत्रपतींना भेटायला गेले, तेव्हा शाहू छत्रपती राजवाड्यात नव्हते!
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वेळी छत्रपती घराण्यात शाहू छत्रपतींच्या पणजी अहिल्याबाई राणीसाहेब, आजी सकवारबाई राणीसाहेब, आई आनंदीबाई राणीसाहेब आणि पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब अशा चार राण्या हयात होत्या. आणि त्या सर्व राणीसाहेबांचे वास्तव्य किंवा वावर जुन्या राजवाड्यात त्या काळी होता. परंतु कोणीही स्वामी विवेकानंदांना कोल्हापुरी चपला, भगवी वस्त्रे इत्यादी वस्तू अर्पण केल्या होत्या, यासंबंधी निश्चित माहिती हाती लागत नाही!
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
थोडक्यात, स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे साक्षेपी अभ्यासक आणि निस्सीम भक्त असणाऱ्या राहुल माळी यांनी अस्सल संशोधकाला शोभेल अशा पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर भेटीचा मागोवा घेतला आहे.
परिणामी, माळी यांच्या छोटेखानी ग्रंथामुळे स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान यांच्यामधील संबंधाबाबत ‘सत्य’ प्रकाशात आले आहे. त्यामुळे स्वामीजींच्या कोल्हापूर भेटीबाबत असणारे अनेक गैरसमज दूर होतील, हे सांगण्याचेही गरज नाही!
१८९२मधील कोल्हापूर शहर
प्रमुख उत्पादनाची प्रक्रिया चालू असताना मुख्य वस्तूबरोबर उप-उत्पादतीत (By product) अशा काही गौण वस्तूही आपणांस प्राप्त होतात. या अर्थशास्त्रीय संकल्पनेप्रमाणे प्रस्तुत ग्रंथात राहुल माळी यांनी जो स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर संस्थान भेटीचा मागोवा घेतला आहे, तो निश्चितच अभिनंदास पात्र आहे!
परंतु याचबरोबर या ग्रंथात एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर शहर कसे होते, याचाही धावता आढावा त्यांनी घेतला आहे, तोही खूप वाचनीय झाला आहे. तो आढावा या ग्रंथाचे उपउत्पादन फल मानावे लागेल! जुन्या कोल्हापुरातील रस्ते, नियतकालिके शासकीय इमारती, शाळा, तुरुंग, हॉस्पिटल, टाऊन हॉल, मंदिरे, धर्मशाळा, जत्रा, वेगवेगळे तलाव इत्यादींबाबत अस्सल कागदपत्रांचा वापर करून जुन्या कोल्हापूर शहराचे जे चित्रण लेखकाने केले आहे!
या खेरीज गीतेच्या अध्ययनापेक्षा मैदानावर फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट पोहोचू शकाल, असा फुटबॉल या खेळाचा गौरव करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा फुटबॉल हा आवडीचा खेळ होता. त्यामुळे त्यांच्या नावाने विवेकानंद फुटबॉल स्पर्धा १९३० मध्ये कोल्हापुरात कशा भरत होत्या त्याचीही माहिती प्रस्तुत ग्रंखात वाचवायास मिळते. फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकरांना ही माहिती निश्चितच सुखावून जाईल!
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
याशिवाय कोल्हापूरमध्ये १९२९मध्ये श्री स्वामी विवेकानंद संघ स्थापन झाला होता, त्याचे कार्यवृत्त सविस्तरपणे लेखकाने सादर केले आहे. या संघामार्फत अगदी बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्यापासून ते पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत मातब्बरांची व्याख्याने झाल्याचे समजते.
या ग्रंथात एक परिशिष्ट आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा त्यांच्या कोल्हापूर भेटीची शताब्दी (१८९२-१९९२) साजरी करण्याच्या उद्देशाने हुतात्मा पार्कमध्ये २० एप्रिल १९९५ रोजी बसवण्यात आला. त्याचप्रमाणे रंकाळ्याच्या परिसरात स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा कन्याकुमारी विवेकानंद स्मारकाप्रमा उभा करण्याचा कोल्हापूराचे एक सुंदर स्वप्न होते, परंतु अजूनही ते स्वप्नच राहिले आहे, हेही या ग्रंथातून समजून येते.
स्वामीजींची हिंदू धर्म ही संकल्पना फार विशाल व्यापक, सर्वसमावेशक, सहिष्णू आणि अहिंसक आहे. त्याचप्रमाणे त्यांना हिंदू आणि मुस्लीम यांच्यात केवळ सहकार्य नव्हे, तर समन्वयही हवा होता किंवा मी भारताचा आहे, तेवढाच जगाचा आहे. मला अतिरेकी राष्ट्रवाद मान्य नाही... सत्य हा माझा ईश्वर व विश्व माझा देश! असे स्वामीजींचे मौलिक विचार हीच त्यांची खरी ओळख होती!
‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ : संशोधन आणि संपादन - राहुल माळी
अक्षर लन, कोल्हापूर | पाने – ११३ | मूल्य – १७५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment