‘कुब्र’ अर्थात ‘एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी’ हे सत्यजीत पाटील यांचं पुस्तक नुकतंच शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. ‘कुब्र’ म्हणजे निबिड अरण्य. ते वाचणाऱ्या, पाहणाऱ्या, अनुभवणाऱ्या आणि त्याच्यासोबत जगणाऱ्या लेखकाचं हे निसर्गसुक्त आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ व लेखक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
फ्रेड्रिक नित्शे यांचं महावाक्य ‘परमेश्वराचा मृत्यू झाला आहे!’ हा विसाव्या शतकाचा आरंभबिंदू आहे. या विधानाचा पूर्णांश असा आहे- ‘परमेश्वराचा मृत्यू झाला आहे. आणि आपण त्याची हत्या केली आहे. आता आपण आपलं सांत्वन कसं करणार आहोत? एक खुनी दुसऱ्या खुन्याला धीर कसा देऊ शकेल? आपल्या हातावरील रक्ताचे डाग पुसू शकेल, असं पवित्र तीर्थ कुठे सापडेल? आपल्याला पापक्षालनासाठी कोणते प्रायश्चित्त घेता येईल? आता या कृत्याची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळे आपणच महान होणं अपरिहार्य नाही काय? आपणच आपल्यासाठी परमेश्वर होऊन त्याला साजेसे वर्तन व कृती करत राहणे अटळ नाही का?’ हा घंटानाद करत विसावं शतक जन्माला आलं.
ईश्वराला हद्दपार करून ख्रिश्चन धर्मावर हल्ला चढवणाऱ्या नित्शेंनी परमेश्वर नसलेल्या जगात आपली जबाबदारी आपल्यावर आल्याची जाणीव करून दिली. आयुष्याला अर्थ देण्याचं काम पारलौकिक, बाह्य शक्ती करणार नसून त्यासाठी आपल्यालाच झगडावं लागणार असल्याचं भान दिलं. नित्शे यांनी विसाव्या शतकातील बंडखोरीच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. त्यातूनच सिंग्मंड फ्रॉइड यांना मानसशास्त्र गवसलं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
एकविसाव्या शतकाचा आरंभ होताना ‘निसर्गाची राजरोस व सातत्याने हत्या होत असून आपण सगळे त्यात सहभागी आहोत’, अशी घोषणा कोणीही केली नसली, तरी त्या वास्तवाची जाणीव सर्वांना होत आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली म्हणत, ‘मानवजात नाहीशी झाली तर’ वनस्पती, पक्षी व प्राणी यांचं काहीही बिघडणार नाही. मात्र ही जीवसृष्टी नष्ट झाली, तर मानवजात जगू शकणार नाही. या भयप्रद भविष्याकडे आपली वेगवान वाटचाल चालू आहे.
सध्या निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नाहिसं करण्याचा चंग बांधला आहे. हे ऱ्हासपर्व मानवकेंद्री मानलं जात असलं, तरी ते प्रत्यक्षात भांडवलशाहीकेंद्री आहे. निसर्ग खरवडून संपत्तीची निर्मिती हा तिचा बाणा आहे. या उद्ध्वस्तीकरणात धोरणकर्ते सक्रिय सामील आहेत आणि ते सामान्य माणसाला ‘लाभार्थी’ बनवण्याचा वेग वाढवत आहेत. सामूहिक विवेकशून्यता (मूर्खपणा) वाढत चालली आहे. त्यातून उत्पन्न झालेला अंतर्बाह्य कोलाहल मानवाला पेलवेनासा झाला आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी मानसशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाविषयीचं विश्लेषण केलं, आता मात्र त्यांनी पर्यावरणीय सवयींविषयींचं विश्लेषण करून सांगणं आवश्यक आहे. ते कार्य मानसशास्त्रज्ञ करत नसल्यामुळे पर्यावरणशास्त्रज्ञांना करावं लागत आहे.
वाईट पर्यावरणीय सवयी हा सक्तीचा विकार (कंपलसिव्ह डिसऑर्डर) झाला असून, आपल्याला त्याचं भान नाही व आता तो विकार थांबवताही येत नाही. अविवेकी वर्तन (‘पडिले वळण इंद्रिया सकळ’) हे अती अंगवळणी पडले असून त्याचीच एक तार्किकता तयार झाली आहे. सार्वजनिक धोरणांत त्यांचा सहज शिरकाव झाला आहे. या काळात निसर्ग विनाश हीच दैनंदिन जीवनातील मनोविकृती झाली आहे. निसर्गनाशामुळे समाजाची मानसिक अवस्था बिघडत चालली आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
अशा काळात आपल्याला योग्य दिशादर्शन करत आहेत, डॉ. थिओडोर रोझॅक! (‘पर्यायी संस्कृती- काऊंटर कल्चर’ ह्या संज्ञेचे निर्माते.) त्यांनी फ्रॉईड यांचं अबोध मन व कार्ल गुस्ताव्ह युंग यांच्या ‘सामूहिक अबोध मन’ या संकल्पनांचा विशाल विस्तार करून ‘पर्यावरणीय अबोध मना’ची (‘इकॉलॉजिकल अनकॉन्शस माईंड’) महती सांगितली आहे. ते म्हणतात, मानवाला निसर्गाविषयी जन्मजात आकर्षण व आत्मीयता असते. निसर्ग ही माणसाच्या अबोध मनात दडलेली उपजत प्रेरणा आहे. त्यामुळेच जन्मापासूनच चंद्र-तारे, नदी-नाले- वृक्ष-वेली-फुले-फळे यांच्याविषयी आस्था व ओढ असते.
रोझॅक यांनी निसर्ग व मानव यांच्यातील आदिबंध हा धर्म, तत्त्वज्ञान, आदर्शवाद याहूनही अधिक दृढ, सघन व खोल आहे. आपलं निसर्गाशी असलेलं नातं उमजून घेणं अनिवार्य आहे, याकडे लक्ष वेधण्याचं ऐतिहासिक कार्य रोझॅक यांनी केलं आहे.
त्यांनी ‘आधुनिक मानसशास्त्राने मन आणि निसर्ग यांचा एकत्र विचार न करण्याचा मोठा गुन्हा केला आहे. पर्यावरण व मानसशास्त्र यांना एकमेकांची गरज आहे’, असं मत मांडलं होतं. निसर्गाच्या अतिशय जवळ राहणाऱ्यांना निसर्गाच्या खाणाखुणा माहीत असतात. त्यानुसार त्यांच्या वर्तनात व व्यवहारात ते बदल करत असतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या उपजत शहाणपणाला ते ‘पर्यावरणीय चातुर्य’ (इकॉलॉजिकल विस्डम) म्हणतात. आदिवासी, शेतकरी व कोळी यांच्यामध्ये ते सहज जाणवतं. म्हणून रोझॅक म्हणतात, पर्यावरणीय अबोध मनात निसर्गाविषयी जिव्हाळा आहे, अलिप्तता की तिटकारा यावर त्याचे निसर्गाशी होणारे व्यवहार ठरतात. त्यांनी पर्यावरणाचा माणसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करताना ‘परिसंस्थामानसशास्त्र’ (इकोसायकॉलॉजी) ही संज्ञा वापरली होती.
डॉ. रोझॅक यांनी निसर्गापासून झालेली मानवाची फारकत हेच सर्व समस्यांचं मूळ आहे. या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी ‘सध्याच्या धावपळीच्या जीवनाचा वेग कमी करणे, लोकशाहीकरण, विकेंद्रीकरण हा मार्ग स्वीकारणं आवश्यक आहे’, असा उपाय सुचवला आहे.
याचसाठी सत्यजीत पाटील यांचा अट्टाहास चालू आहे. त्यांनी मध्य भारतामधील ताडोबा जंगलाचं तिन्ही त्रिकाळात घडवलेलं हे दर्शन आहे. त्यांना ‘अरण्यातील ऋतुंचा अनुभव घेतल्यशिवाय अरण्य समजणार नाही’, याची चोख जाण आहे. ते त्यांच्या भटकंतीला ‘निरुद्देश’ संबोधतात, तशी ती अजिबात नाही. ते साक्षीभाव ठेवून (हे अतिशय कठीण आहे.) निखळ मनाने जे जे समोर येईल ते मनःपूर्वक टिपत जातात. त्यांना छायाचित्रणासाठी कॅमेऱ्याचीसुध्दा गरज वाटत नाही. त्यात त्यांना अजिबात गुंतायचं नाही. अरण्यातील जीवसृष्टी मनाच्या आत साठवत जायची, असा त्यांचा दृढ निश्चय आहे.
अकिरा कुरोसावा यांच्या अभिजात ‘राशोमान’मध्ये अरण्याची प्रदीर्घ यात्रा आहे. ती केवळ बाह्य अरण्यातील नसून ‘मनअरण्यात’सुद्धा जाते. आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. तसेच प्रश्न सत्यजित पाटील आपल्याला पाडत जातात. त्यांनी अरण्यांमधील वृक्ष-वेली, ओढे-नाले, पक्षी व प्राणी, यांची विविध ऋतुंमध्ये अनुभुती घेतली आहे. ती वाचताना आपल्या सभोवतालचा निसर्ग व ऋतु दोन्हींचा विनाश विषण्ण करून जातो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आपण एका विशाल व अफाट संसाराचा भाग आहोत, ही भावनाच स्वतःचं उन्नयन करणारी, उदात्तता आणणारी आहे. त्यामुळेच मानसशास्त्रज्ञांनी ‘मानवाचं या संपूर्ण विश्वाशी काही नातं-बंध आहे काय? असे सवाल उपस्थित करून त्यांचं निरूपण करणं आवश्यक आहे, विश्वव्यापी सत्याचा शोध घ्यावा’, अशी रोझॅक यांची अपेक्षा आहे. त्यातूनच पर्यावरणीय अबोध मनाचा उलगडा होत जाईल.
ते कसं हे समजून घेण्यासाठी ‘कुब्र’ वाचणं आवश्यक आहे. निबिड व अस्पर्शित अरण्यात रममाण झालेल्या पाटील यांना संपूर्ण जीवसृष्टीविषयी अतोनात कुतूहल आहे. त्या परिसराशी, तिथल्या ओढ्या-नाल्यांशी, टेकड्या - पर्वतांशी, वृक्ष-वेलींशी, पाना-फुलांशी, पक्षी-प्राण्यांशी, त्यांचं आतड्याचं नातं जडलं आहे.
पाटील यांनी उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात रात्रंदिवस, सोबतीनं वा एकट्यानं जंगलभ्रमण केलं आहे. त्यांना घनदाट अरण्यातील असंख्य खुणा पाठ आहेत. ते, अरण्यातील वैविध्यपूर्ण आकार, रंग, स्पर्श व गंध जाणवून देतात. त्यांना पक्षी व प्राण्यांचे अधिवास व संकेत समजतात. इतकंच नाही, तर पाऊलखुणांवरून व विष्ठेवरून प्राण्यांचा व पक्ष्यांचा अदमास लावता येतो.
वाघाची चाहूल लागल्यावर सावध करण्यात कोतवाल हा अधिक विश्वासार्ह आहे. दोन किलोमीटर अंतरावर वाघ असताना त्याचा सुगावा लागलेला कोतवाल सावधतेचा इशारा देऊन टाकतो. मोरही ध्वनी बदलून तेच सांगत असतो. मात्र तो तेवढा अचूक नाही, अशी नेमकी समज असणारे पाटील त्यांच्या लेखनातून कानाकोपऱ्यातून जंगल दाखवत राहतात. त्यातून गोम, गोचिडापासून विषाणूपर्यंत आणि बांबूपासून अर्जुनवृक्षापर्यंत अनेक प्रजातींची वैशिष्ट्य समजत जातात. रानकुत्री व वाघ यांच्या हल्ल्यातील व भक्ष्यातील फरक लक्षात येतो. त्यातून पाटील आपल्याला कित्येक पक्षी व प्राण्यांचं वर्तन दाखवून देतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
त्यांना अरण्यातील जीववैविध्य व त्या जिवांचा उदय व विलय याविषयी उत्सुकता आहे. भलेमोठे ओंडके असोत वा महाकाय प्राणी ते मातीत मिसळून जाताना त्यांच्यावर रंगीबेरंगी कवकफुलं दिसू लागतात. वनातला गंधही बदलत जातो. ज्वालामुखीनंतर निर्माण होणारा पहिला जीव म्हणजे कवक! जिवोत्पत्तीचा आद्य घटक. निसर्गातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तगून राहणारी बुरशी ही वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश, तसेच खोल समुद्रात आढळते. वनस्पती असो वा प्राणी, मृतावशेषांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणारी बुरशी, ही निसर्गातील श्रेष्ठ सफाईकामगार आहे. अलीकडे तर पाण्यावर तेलतवंग साफ करण्याठीही तिचा वापर केला जातो.
वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर कवच तयार करून बियांना आवश्यक प्रथिने पुरवणाऱ्या बुरशी बिजांकुरणात अमूल्य भूमिका बजावतात. पाव बनवण्यापासून मद्यनिर्मितीपर्यंत असंख्य गोष्टी आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी बुरशी वापरली जाते. सर्दी-तापापासून ते कर्करोग व मानसिक विकारापर्यंत अनेक आजारांवरील औषधात उपयुक्त आहे. जंगलात, गवताळ प्रदेशात वनस्पती वाचण्यास आहारासाठी बुरशीचा आधार असतो. मानवजातीसाठी संजीवनी असूनही उपेक्षितांहून उपेक्षित बुरशीला अणुवृक्ष, असं साजेसं संबोधन देऊन पाटील यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
जंगलतोड कशी होते? याचा साक्षात अनुभव सांगताना पाटील कळवळतात. ते ‘सागवान हा रानाचा प्राण आहे. सागवानासोबतच जंगल नष्ट होत जाईल’, या रास्त भीतीने गांगरून जातात. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाला, सखोल विश्लेषणाची व उत्तम रसग्रहणाची जोड असल्यामुळे प्रस्तुत पुस्तक म्हणजे अरण्यवाचन झालं आहे.
चौथ्या शतकात कालिदासानं लिहिलेल्या ‘ऋतुसंहार’ (ऋतूंचा पुष्पहार) या काव्यात ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत या सहा ऋतूंचं वर्णन आहे. त्यात ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर व त्यामुळे प्रेमिकांच्या मनोवृत्तीत कसा परिणाम होतो, याचं सूक्ष्म निरीक्षण आहे. विख्यात लेखक व नाटककार रतन थिय्यम यांनी २००३ साली याच ‘ऋतुसंहार’चा काळानुरूप अन्वय लावणारा नाट्याविष्कार सादर केला. हवामान बदलाच्या काळात ऋतूंची लक्षणंच बिघडत चालली आहेत. ऋतूंच्या संहाराला माणूसच जबाबदार आहे. हे जाणणाऱ्या थिय्यम यांनी उर्जा देणारा स्त्रोतच नष्ट करत असलेल्या मानवजातीच्या आत्मविनाशीपणाला नाट्यरूप दिलं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या प्रस्तुतीकरणाविषयी ते म्हणतात, “आपल्या जीवनात पृथ्वी किंवा नैसर्गिक लय समाविष्ट करण्यास विसरत आहोत. निसर्गाच्या असंतुलनाचे सूक्ष्म संकेत आपल्या जीवनात दिसून येत आहेत. त्यामुळे शारीरिक असंतुलन होत असून उर्वरित चक्र तणावग्रस्त होत आहे. मानवजातीने सर्व प्रयत्न करूनही, पृथ्वीच्या अदभुत शक्तीशी जुळण्याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही.”
निसर्गाकडे जाण्याचा उल्लेख आल्यास नेहमी ‘परत निसर्गाकडे’, ‘पुन्हा निसर्गाकडे’ असं म्हटलं जातं. त्यातून निसर्गाकडे जाणं म्हणजे मागं जाणं आहे, असा अर्थ ध्वनित होतो. वास्तविक इथून पुढे आगेकूच करण्यासाठी प्रगती करण्यासाठी निसर्गाकडे जाणं आवश्यक आहे, असं म्हणणं उचित ठरेल. संपूर्ण जगभर आधुनिकता, उच्च तंत्रज्ञान हे समीकरण बिंबवलं गेलं आहे. मात्र आता आधुनिकता, उच्च निसर्ग असं ठरवणं आवश्यक आहे.
रिचर्ड लुव्ह म्हणतात, आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ठीक करण्यासाठी निसर्ग ही जीवनावश्यक बाब आहे. निसर्ग म्हणजे ‘न’-जीवनसत्त्व असून त्याच्या मात्रेवर आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरते.
अशाच विचारप्रक्रियेतून सत्यजीत पाटील आपल्या हातात ‘कुब्र’ देतात. ‘न’-जीवनसत्त्व कसं प्राप्त करावं हे समजून घेण्यासाठी ते वाचणं गरजेचं आहे.
‘कुब्र’ – सत्यजीत पाटील,
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर | पाने – १२२ | मूल्य – २३० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment