हल्ली हिंदू समाजात मुसलमानांविरुद्ध कधी नव्हे, एवढा विद्वेष निर्माण झाला आहे. आज ज्या लोकांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे, त्यांच्यात आज जेवढा मुस्लीमद्वेष दिसतो, तेवढा ते तरुण असताना नव्हता. मी जेव्हा माझ्या पन्नाशीच्या पुढच्या मित्रांशी बोलतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यात त्यांच्या तरुणपणी नसणारा मुस्लीमद्वेष आज मात्र प्रकर्षाने जाणवतो. हे अनुभव क्लेशकारक असून त्याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
मुस्लीमद्वेष वाढण्याची कारणे
मधल्या काळात हिंदुत्ववादी प्रवृत्तींनी मुस्लिमांविरुद्ध द्वेष आणि संताप वाढवण्याचे काम सातत्याने केलेले आहे. मुस्लिमांविषयी द्वेष निर्माण होईल अशा निवडक घटना ठळकपणे सांगणे; तशाच प्रकारच्या घटनांना द्वेष निर्माण होईल, अशा स्वरूपात प्रभावीपणे सादर करणे; मुस्लिमांविषयी खोट्या गोष्टी पसरवणे; मुस्लीम अत्याचाराच्या भूतकाळातील घटनांचा पुन्हा पुन्हा उच्चार करत राहणे; असे प्रकार सर्रास केले गेलेले आहेत.
आमच्या बालपणापासूनच असे प्रयत्न होत असल्याचे दिसत होते, पण तेव्हा त्यांचे प्रमाण खूपच कमी होते, किंवा सामान्य माणसावर त्यांचा फारसा परिणाम होत नसे. पण पुढे हे प्रकार नियोजनपूर्वक आणि संघटितरित्या होत गेले. समाजावर त्यांचा अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. तरुण पिढी तर समाजमाध्यमांवरच पोसलेली आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील ज्ञानपोई त्यांना सातत्याने तथाकथित ‘ज्ञानरसा’चे पान करत समृद्ध (?) करण्याचे आपले कार्य अविरतपणे करत आहे. ज्या टोळ्या संसाधनांनी अधिक समृद्ध आहेत, त्या असे ज्ञानदान करण्यात अधिक प्रभावी ठरतात. सध्या अशा द्वेषाचे विषपान करवणाऱ्याच टोळ्या अधिक सक्षम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक विचारांच्या (?) युवकांमध्येदेखील हा मुस्लीमद्वेष प्रकर्षाने दिसून येत आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
शासनाची आणि मुस्लिमांची भूमिका
याला केवळ हिंदू जातीयवादीच जबाबदार नाहीत, तर मुस्लिमांची धार्मिक कट्टरताही या स्थितीला कारणीभूत झालेली आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. उलट मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्यात आणि त्यांची कट्टरता जोपासण्यातच आपली सत्ता आणि क्षमता वापरली. मुस्लिमांमधील कट्टरतेला आर्थिक मागासलेपणाही कारणीभूत असल्याचे नेहरूंना कायम वाटत आलेले होते. पण नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी मुस्लिमांच्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. सच्चर आयोगाने मुस्लिमांमध्ये असलेल्या मागासलेपणाकडे पुराव्यांचा आधार देऊन आपले लक्ष वेधले होते. पण अशा अहवालांकडे लक्षच द्यायचे नाही, असे राज्यकर्त्यांनी ठरवलेले दिसते.
आता हेही खरे की, मुस्लिमांमधील कट्टरतेला त्यांच्या धर्माचे स्वरूपही कारणीभूत आहे. स्वर्गप्राप्तीचे ध्येय फक्त इस्लामच्या मार्गानेच होऊ शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे इतर धर्मियांविषयी प्रेम आणि सहिष्णुतेला इस्लाम फारसा अनुकूल नाही. थोडक्यात, इतर धर्मांच्या सहअस्तित्वाकडे इस्लाम उदारपणे पाहू शकत नाहीत. ईश्वराप्रत पोचण्याचा प्रत्येक धर्माचा आपापला मार्ग असतो, हे तत्त्व इस्लामच्या पूर्णपणे विरोधी आहे.
आमचा मार्ग इतरांच्या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले तर एकवेळ समजून घेता येईल. पण इतरांचा मार्ग जन्नतकडे नव्हे, तर जहन्नूमकडेच जातो, असे म्हटल्याने भिन्न भिन्न समुदायात सौहार्द कसे निर्माण व्हायचे, याचा कट्टरपंथीयांनी आवर्जून विचार केला पाहिजे. इस्लामच्या या तथाकथित सारभूत तत्त्वाच्या आधारे हिंदुत्ववादी मुस्लिमांविषयी हिंदू समाजात अविश्वास आणि भय निर्माण करतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
शेषराव मोरे यांच्या ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथाने हे काम चोखपणे बजावले आहे. खरे तर सामान्य मुस्लीम माणसाला इस्लामच्या या तत्त्वाशी व्यवहारात काही देणेघेणे नसते. आपल्यापुरता त्यांचा तो विश्वास असतो. बऱ्याच जणांना तर त्याची माहितीही नसते. ‘कुराणा’त शब्दशः काय सांगितले आहे, त्यापेक्षा सर्वसामान्य अनुयायांना त्याबद्दल काय वाटते, हे अधिक महत्त्वाचे आहे.
तसेच, ‘कुराणा’त काही कट्टरतासूचक बाबी असल्या तरी प्रत्यक्षात सामाजिक जीवन त्यामुळे प्रभावित होते काय, हेही पाहणे आवश्यक आहे. तसे काही होत नसेल, तर ‘कुराणा’त असे सांगितले आहे आणि काही मौलवीही त्याचा उच्चार करतात म्हणून सर्वच मुस्लीम समुदायाला त्याच दृष्टीने पाहून हिंदूमन भयचकित करण्याची गरज नसावी. म्हणूनच ‘कुराणा’तील तशा आयत जाणीवपूर्वक उदधृत करून हिंदूंमध्ये मुसलमानांविषयी भय आणि अविश्वास निर्माण करण्याचे कारण नाही.
असे असले तरी मुसलमान आपल्या धर्माविषयी हिंदूंपेक्षा अधिक कर्मठ आणि कट्टर असतात, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. त्यामुळेच त्यांच्या धर्मावर काही आक्षेप येत असतील, तर त्यांच्यापैकी काही जण बेजबाबदारपणे आपली प्रतिक्रिया देण्यास मागे पुढे पाहत नाहीत.
सध्याच्या विज्ञानयुगात मुस्लिमांची ही कट्टरता अनाकलनीय वाटणे स्वाभाविक आहे, यात शंका नाही. इस्लामची समाजशास्त्रीय चिकित्सा करणे त्यांना मुळीच मान्य नाही. कोणताही धर्मग्रंथ ज्या काळात निर्माण झालेला असतो, तो त्या काळाचे अपत्य असून तो त्या काळाची सामाजिक आवश्यकता पूर्ण करतो. बदलत्या काळानुसार समाजाच्या आवश्यकता बदलतात. बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी धर्मग्रंथांची नव्याने व्याख्या करावी लागते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
इस्लाममध्येही मुत्झिला चळवळीने काही प्रमाणात विवेकाचे महत्त्व मान्य केले होते. परंतु कर्मठ विचारांच्या आधारे सर्वसामान्य श्रद्धाळू जनतेवर प्रभाव टाकून तो टिकवून ठेवता येतो, हे इस्लाममधील कट्टर मुसलमानांना कळले होते. त्यामुळे त्यांनी मुत्झीला चळवळीला विरोध करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दुर्दैवाने पुढील काळात इस्लाममध्ये मुत्झीलासारख्या चळवळी झाल्या नाहीत. उलट मूळ इस्लामकडे परतण्याचा आग्रह धरणाऱ्या धार्मिक चळवळी मात्र होत राहिल्या. त्यामुळे मुस्लिमांमध्ये मूलतत्त्ववादाचा प्रभाव आजतागायत कायम राहिला.
पुढे सुशिक्षित मुसलमानांमध्ये हे प्रमाण किंचित कमी होत असताना दिसते. परंतु जातीयवादी मंडळी दहशतवाद्यांचे शिक्षण काढून त्यांच्यापैकी बरेच जण इंजिनियर, डॉक्टर, तंत्रज्ञ असल्याचे सांगून त्यांच्यावर शिक्षणाचा काहीही चांगला परिणाम होणार नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु विज्ञान शिकले म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होतोच, हे खरे नाही.
विज्ञानाबरोबरच समाजशास्त्र, इतिहास आणि तर्कशुद्ध विचारसरणी यांचा विकास झाल्याशिवाय विवेकवादाचा विकास होऊ शकत नाही. आपला समाज किंवा राज्य या दृष्टीने शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न करत आहे, असे क्वचितच दिसून येते. पोट भरण्यासाठी आणि अधिक पैसे मिळवण्यासाठी जे शिक्षण उपयुक्त आहे, त्याकडेच आजच्या पिढीचा ओढा असतो. आणि हे आजच्या मुक्त आणि उदार अर्थव्यवस्थेच्या काळात स्वाभाविकच ठरते. म्हणून दहशतवादी तरुणांमध्ये उच्चशिक्षित इंजिनियर, डॉक्टरही असतात, याचा अर्थ मुस्लीम धर्मीय मुळातच दहशतवादी असतात, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण अनेक हिंदू शास्त्रज्ञही कमालीचे अंधश्रद्ध असल्याच्या बातम्या आपल्या वाचनात येतातच.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हिंदुत्ववाद्यांची भूमिका आणि ‘समान नागरी कायदा’
मुस्लिमांच्या या कट्टरतेचे भांडवल करून हिंदुत्ववादी त्यांच्याविषयी हिंदू समाजात अविश्वास, भय आणि द्वेष निर्माण करतात. या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुस्लीम तुष्टीकरणाचा लंबक सध्या दुसऱ्याच टोकावर लटकताना दिसत आहे. राज्यसंस्थाच नव्हे तर इतर संस्थांनीही हे तुष्टीकरण फारच मनावर घेतलेले दिसत आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला मान्यता देताना न्यायालयाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते, पण ‘आदिपुरुष’च्या बाबतीत मात्र लोकभावना महत्त्वाच्या ठरतात.
‘समान नागरी कायदा’ आणण्याचे शासनाने कोणतीही कारणे दिली, तरी हिंदू समाजाला हा कायदा मुस्लिमांना शिक्षा देण्यासाठीच आणला जात आहे, यात शंका वाटत नाही. मुस्लिमांनाही तसेच वाटत आहे, हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. प्रत्यक्षात, व्यक्तिगत कायद्याच्या ज्या तरतुदी घटनादत्त मानवी मूल्यांशी विरोधी असणार नाहीत किंवा सामाजिक व्यवस्था (Public Order), नीतीमत्ता (Morality) आणि आरोग्य यांना प्रतिकूल असणार नाहीत, त्या तरतुदींना येणाऱ्या नवीन कायद्यातही बदलण्याची गरज असणार नाही. अशा तरतुदी त्या त्या धर्माची संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने आवश्यकच ठरतील.
म्हणूनच समान नागरी कायदा म्हणजे व्यक्तिगत कायद्याचे पूर्णपणे उच्चाटन आणि सर्व धर्मांसाठी एकसारखा नागरी कायदा नव्हे, हे एकदा घोषित केलेले बरे. समान नागरी कायदा म्हणजे- प्रत्येक धर्मासाठी, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या घटनात्मक मूल्यांशी सुसंगत असणाऱ्या किंवा अशा मूल्यांचे निकष पाळणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांचा संग्रहदेखील (Code) असू शकतो. परंतु सदर कायदा आणताना हे स्पष्ट केल्या जात नाही. त्यामुळे मुसलमान समाजात या कायद्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मुस्लीम लोकसंखेचा बागुलबोवा
मुस्लीम लोकसंख्येच्या वाढीचा वेग अत्यधिक असल्याने लवकरच मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल आणि मग हे मुस्लीम हिंदूंचे निर्दयतेने दमन करतील, अशी भीती निर्माण करण्याचेही उद्योग सातत्याने केले गेले आहेत. असे प्रयत्न करण्यात अनेक हिंदुत्ववादी विचारवंतांचाही सहभाग असतो. जनगणनेच्या आकडेवारीचे निरीक्षण केले असता, मुस्लिमांच्या वाढीचा वेग हिंदूंपेक्षा निश्चितच अधिक आहे. परंतु या दोन्हीही समुदायाच्या वाढीच्या वेगांधील फरक उत्तरोत्तर कमी होत असल्याचेही दिसत आहे.
त्यामुळे १९५१च्या जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे तेव्हाचा लोकसंख्यावाढीचा वेग पुढेही तसाच कायम राहील, असे गृहीत धरून काढलेले अंदाज वास्तवता दर्शवत नाहीत. जसजसा मुस्लिमांमधील मागासलेला दूर होईल, तसतसा त्यांच्या लोकसंख्येचा वृद्धिदर कमी होत जाण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे जातीयवाद्याचे अंदाज चुकीचेच ठरलेले आहेत, यात शंका नाही.
पुढील आकड्यांवरून हे स्पष्ट होण्यासारखे आहे. १९५१ ते १९६१ या काळात मुस्लिमांची लोकसंख्या ३२.७ टक्के या दराने वाढत होती. त्याच वेळी हिंदूंची संख्या मात्र फक्त २०.७ टक्के या दराने वाढत होती. दोन्हींच्या दरांमध्ये १० टक्क्यांचा फरक होता. २००१ ते २०११ या कालावधीत हिंदूंची लोकसंख्या १६.७ या दराने, तर मुस्लिमांची संख्या २४.७ या दराने वाढत होती. दोन्ही दरांमधील फरक ८ टक्क्यांवर आल्याचे दिसते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
दुसरी गोष्ट म्हणजे १९८१ ते १९९१ हा कालावधी वगळता मुस्लिमांच्या लोकसंखेचा दर सातत्याने कमी होत असल्याचे आढळते. उलट हिंदूंच्या लोकसंख्येचा दर १९५१ ते १९८१पर्यंत वाढत गेल्याचे दिसून येते. १९५१ ते २०११ या कालावधीत हिंदूंच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर २०.७वरून १६.७वर आलेला आहे. याचा अर्थ या दरात ४ टक्क्यांची घसरण झालेली आहे. त्याच कालावधीत मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर ३२.७ टक्क्यांवरून २४.७ टक्क्यांवर आलेला आहे. ही घसरण ८ टक्क्यांची असल्याचे आपणास दिसून येते.
पुढेही जसजशी आर्थिक स्थिती सुधारेल तसतसे सामाजिक सुधारणा होऊन मुस्लिमांच्या लोकसंखेच्या दरात कमी येईल, असा अंदाज करता येणे शक्य आहे. आणि तसे होणे देशासाठीच नव्हे, तर मुस्लिमांसाठीही आवश्यकच आहे.
योजावयाचे उपाय, समस्येवरील उपाय
मुस्लिमांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांच्याद्वारे व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियेचे एक सामान्य स्वरूप म्हणजे त्यांच्यात निर्माण होणारे भय. त्याचाच परिणाम म्हणून एकटे दुकटे मुस्लीम कुटुंब कोणत्याही हिंदू वस्तीत राहण्याचे धैर्य दाखवत नाही. १९९३च्या मुंबई दंगलीनंतर कित्येक मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदूंच्या सोसायटीचा त्याग केल्याचे आपण पाहिले आहे.
या असुरक्षिततेच्या भावनेतून भय आणि भयातून अविचार निर्माण होणे समर्थनीय नसले, तरी असे होते, हे मात्र खरे. या अविचारातून मुस्लिमांमधील, विशेषतः मुस्लीम युवकांमधील संयम संपून जाऊन त्यांच्या हातून काही अविचारी कृती घडतात. आणि अशा कृतींचे भांडवल करायला हिंदू जातीयवादी तयारच असतात. आणि मुस्लीम समाजाकडूनही बऱ्याच वेळा अशा दुष्कृत्यांचा नि:संदिग्ध शब्दांत निषेध व्यक्त होताना दिसत नाही. थोडक्यात, हिंदू-मुसलमानांच्या क्रिया-प्रतिक्रियांमधून या दोन समुदायांमध्ये वैमनस्याचे दुष्टचक्र कार्यरत राहते. ते भेदल्याशिवाय हिंदू-मुस्लीम प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही, हे निश्चित.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हे उत्तर शोधण्यासाठी दोन्हीही समुदायांनी पुढे येणे आवश्यक आहे. त्यातही बहुसंख्याक समाज म्हणून हिंदूंची जबाबदारी अधिक मोठी आहे, असे मला वाटते. पंडित नेहरूंची अशीच भूमिका राहिलेली होती. परंतु इथल्या हिंदू जातीयवादी पक्षांनी त्यांच्या या भूमिकेला ‘मुस्लीम तुष्टीकरणनीती’ म्हणून संबोधले आणि त्याचा आधार घेऊनही हिंदू समाजात मुस्लीमद्वेष वाढवण्याचा प्रयत्न करण्याचे सोडले नाही.
हिंदू जातीयवाद्यांचे मुस्लीमद्वेष निर्माण करण्याच्या मनसुबे उधळून लावतानाच शासनाने मुस्लिमांमधील जातीयवादाचाही समाचार घेत त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केल्यास मुस्लिमांच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांशी विसंगत असणाऱ्या धार्मिक तरतुदींना राज्याने स्पष्टपणे नाकारले पाहिजे. अशा अंमलबजावणीमुळे प्रारंभी मुस्लीम समाज नाराजही होण्याची शक्यता आहे. पण या नाराजीचा विचार न करता धर्मनिरपेक्ष राज्याने आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. पण शासन अशा धोरणांची अंमलबजावणी करताना निष्पक्ष आहे, असे देशातील मुस्लिमांसहित सर्वच अल्पसंख्याकांना आणि हिंदूंनाही वाटले पाहिजे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्हीही समुदायांच्या जाणकार आणि परिपक्व लोकांनी या सुधारणेच्या कार्यात परस्परांचा द्वेष करण्याऐवजी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिली कृती म्हणजे परस्परांसंबंधी द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा खोटेपणा सिद्ध करून त्यांना ध्वस्त केले पाहिजे.
जातीयवादी नेहमी येनकेनप्रकारे आपल्या विरुद्धच्या समुदायाला डिवचण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करत असतात. असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, यासाठी आपण दक्ष असले पाहिजे. कोणत्याही कारणांमुळे का होईना, काही वेळा मुस्लीम समाजातील आततायी तरुण आक्षेपार्ह कृतींना जबाबदार ठरतात. अशा वेळी त्या समुदायाने अशा कृतींचा नि:संदिग्ध शब्दांत निषेध करणे आवश्यक आहे. हिंदू समाजाबाबतीतही असेच म्हणता येईल. विविध समुदायांत सामंजस्य निर्माण करण्याच्या या मोहिमेत लोकांनी सक्रीय सहभाग घेतल्यास हिंदू-मुस्लीम द्वेषाला आळा घालणे शक्य होईल, असे वाटते.
.................................................................................................................................................................
लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.
harihar.sarang@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment