अजूनकाही
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेत ती झाली होती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. यापूर्वी शिवसेनेचे जवळपास ४० आमदार फुटून भाजप सरकारमध्ये डेरेदाखल झाले, आणि आता राष्ट्रवादीचेही जवळपास तेवढेच आमदार. त्या वेळेस महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदेप्रणीत शिवसेना व भाजप यांचे सरकार सत्तेत येऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण या सर्व घडामोडींच्या पाठीमागे असलेले देवेंद्र फडणवीस पाठीमागे राहून उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांच्या जोडीला अजित पवार हेही उपमुख्यमंत्री झालेले आहेत. पूर्वी ‘डबल इंजिन’चे सरकार होते, त्यात आता आणखी एकाची भर पडून ‘ट्रिपल इंजिन’चे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी चालू झाले आहे, असे अजित पवार यांचे म्हणणे आहे.
या वेळेस मात्र विराजमान असलेले सरकार पडण्याचा अथवा त्याला स्थिर ठेवण्याचा प्रश्न नव्हता. कारण सरकारकडे आवश्यक तेवढ्या आमदारांचं पाठबळ आहे. पण यापूर्वी काका-पुतण्याच्या वादात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे पुतणे राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालून आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाहेर पडून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) हा नवा पक्ष काढला. आताही जवळपास तशाच घडामोडी शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या संबंधाने घडल्या आहेत. फरक इतकाच की, अजून तरी अजित पवारांनी वेगळ्या पक्षाची घोषणा केलेली नाही. ते थेट भाजप सरकरामध्येच सामील झाले आहेत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
त्याही वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचीच नक्कल करून राज ठाकरे पुढे आले होते, तसेच अजित पवारसुद्धा शरद पवार यांच्याच आधाराने पुढे आले आहेत. या इतिहासावरून असे दिसते की, पुतण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा इतक्या वाढत जातात की, त्यांना आवर घालणे कोणत्याही काकाला जरा कठीण होऊन बसते. कारण त्यांना प्रत्यक्षात आपल्या मुलामुलींनाच आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणावयाचे असते.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले. गेल्या काही वर्षांपासून पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात सूप्त घडामोडी चालू होत्या. त्याची चाहूल वेगवेगळ्या निवडणुकांच्या वेळेस लागत होती. नुकतेच पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याबाबतचे एक लहानसे नाटुकले घडले होते. तेव्हाच राष्ट्रीवादीमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे दिसले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित पवारांकडे सोपवले जाईल, अशी जवळपास सर्वांची अटकळ असताना शरद पवारांनी मात्र सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केले. तेव्हापासून अजित पवार अस्वस्थ असल्याचे सांगितले जात होते. त्याचा अंदाज राजकीय जाणकारांना आणि शरद पवारांनाही असावा. पण ते थेट पक्षच फोडतील याची त्यांनी बहुधा कल्पना केलेली नसावी.
शिवसेनेत जेव्हा उलथापालथ झाली, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना यांचे संयुक्त सरकार होते. राज्यातील पोलीस खाते, सीआयडी इत्यादी यंत्रणा हाताशी असतानाही पक्षातील फाटाफुटीचा सुगावा उद्धव ठाकरे यांना लागला नाही. ठाकरे तसे राजकारणात अननुभवी त्यामुळे ते एकवेळ समजू शकते, पण राष्ट्रीय राजकारणात मुरब्बी समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनाही आपल्याच पक्षात घडणाऱ्या संभाव्या घडामोडींचा अंदाज आला नाही, हे आश्चर्यकारक वाटते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
त्याहून आश्चर्यकारक म्हणजे जेमतेम महिनाभरापूर्वी शरद पवारांनी ज्यांची सुप्रिया सुळे यांच्याबरोबर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलेले त्यांचे जवळचे सहकारी भंडाऱ्याचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह नाशिकचे छगन भुजबळ, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्यासारखे लोकच त्यांना सोडून गेले.
अशी बोलवा आहे की, हे पवारांचे विश्वासू सहकारी भाजपमध्ये गेले नसते, तर कदाचित तुरुंगात गेले असते. यापूर्वी महाविकास आघाडीचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तुरुंगाची वारी करून आले आहेत. छगन भुजबळ तर दोन-अडीच वर्षे तुरुंगात होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आजही जामिनाअभावी तुरुंगात आहेत.
राष्ट्रवादीच्या या आमदारांनी आपल्या आघाडीत यावे, यासाठी त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल जाहीर धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भोपाळ येथील त्यांच्या भाषणात नावे घेऊन दिली होती. त्यात त्यांनी सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला होता. अशा भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवण्याचेही जाहीर आश्वासन जनतेला दिले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी या नेत्यांना तुरुंगात न पाठवता राज्याच्या मंत्रीमंडळात पाठवले आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
सध्याच्या राज्य सरकारला स्थिरतेसाठी आमदारांची गरज नसताना ही फाटाफूट का घडवून आणण्यात आली असावी? मोदी-शहा-फडणवीस यांच्यापेक्षा असा धक्का देण्याची गरज मुख्यत्वेकरून अजित पवार यांनाच वाटली असली पाहिजे. कारण ते सुप्रिया सुळे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केल्यापासून अस्वस्थ होते. यापूर्वी त्यांनी भाजपसोबत जाऊन पहाटे पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते बंड शरद पवारांनी यशस्वीपणे मोडून काढले, त्यामुळे आता त्यांनी भरदिवसा, सुट्टीच्या दिवशी तातडीने पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाचाच शपथविधी पार पडला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीसुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. आणि पुढे आणखी मंत्र्यांची संख्या वाढवू, असेही मधाचे बोट उरलेल्यांना लावले आहे.
त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचाच असून येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही वावरणार आहोत, राजकीय निवडणुकासुद्धा घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहोत, असे जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या सगळ्या फाटाफुटीला राष्ट्रवादीचा विरोध असून फुटलेल्या आमदारांवर कार्यवाही केली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार काल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार यांच्या जागेवर जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादीने फुटलेल्या आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करावी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांना काढून टाकून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नेमणूक झाल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. तिसरीकडे विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून आमचे जास्त आमदार असल्याने विरोधी पक्षनेते आपल्या पक्षाला मिळावे, असा दावा काँग्रेसने केला आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
या सर्व घडामोडी यापूर्वी शिवसेनेसंबंधाने घडलेल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सरसकट झुकते माप दिले होते. उदा., धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले आहे. त्याची पुनरावृत्ती आताही पाहायला मिळू शकते. येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचे निर्णय अजित पवार यांच्या विरोधात लागतील, याची फारशी शक्यता नाही. शरद पवारांची बाजू कितीही न्यायाची असली, तरी त्यांच्या बाजूने निर्णय लागतील, असे गृहीत धरण्यात हशील नाही.
शरद पवारांनीही कोर्टकचेऱ्यांच्या भानगडीत न पडता आम्ही सरळ जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे ३ जुलै रोजी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे राजकीय गुरू आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड (जि. सातारा) येथील समाधीवर जाऊन त्यांचे दर्शन घेतले आहे.
बाजू पलटवण्याची आणि विरोधात गेलेली परिस्थिती अनुकूल करून घेण्याची ‘किमया’ शरद पवारांकडे आहे, हे आजवर अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. त्यांच्या कामाच्या झपाटा, आवाका आणि संपर्क पाहता आता उतारवयातही ते त्याच जिद्दीने या प्रसंगाचा मुकाबला करतील, असे दिसते. मात्र त्यात त्यांना कितपत यश येईल, ते काळच ठरवेल.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हा फार्स महाराष्ट्रात घडला असला तरी, त्याचा राष्ट्रीय राजकारणावरसुद्धा परिणाम होणार आहे. किंबहुना राष्ट्रीय राजकारणासाठीची, त्यातही आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ‘खेळी’ म्हणूनच त्याच्याकडे पाहायला हवे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे, अशी व्यूहरचना चालू आहे. त्याबाबतची पहिली बैठक नुकतीच पाटण्यात झाली, दुसरी बंगलोरमध्ये याच महिन्यात होणार आहे. त्यामध्ये शरद पवार हे एक महत्त्वाचे नेते आहेत. तूर्त ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसले तरी ती महत्त्वाकांक्षा त्यांनी पूर्णपणे सोडून दिली, अशातला भाग नाही. पुढे घटना कशा घडतात, त्याचा अंदाज घेऊन आपला पत्ता उघड करण्याएवढा सुज्ञपणा त्यांच्यात नक्कीच आहे. पण महाराष्ट्रात भाजपने त्यांच्याच पक्षाला मोठं भगदाड पाडून त्यांची ताकद कमजोर केली. त्यामुळे त्यांचा देशपातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीतला सहभाग व महत्त्व आपोआपच कमी झाले आहे.
त्याचबरोबर विविध विरोधी पक्षांची मोट रडतखडत का होईना, बांधली जाण्याचा प्रयत्न होत असतानाच, तिच्यावर भाजपने राष्ट्रवादीच्या निमित्ताने दणदणीत प्रहार केला आहे, असेच म्हणावे लागेल. भाजपची ही रणनीती केवळ राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यापुरतीच मर्यादित असेल, असं समजण्याचं कारण नाही. ही भाजपच्या नव्या ‘खेळी’ची केवळ झलक असू शकते. जसजशी २०२४ची लोकसभा निवडणूक जवळ येईल, तसतशा भाजपच्या पुढच्या खेळी उघड होत जातील…
.................................................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment