अजूनकाही
शिवसेनेत असताना अल्प काळ राज्याचे मुख्यमंत्री झालेले नारायण राणे नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रचंड नाराज असून ते लवकरच अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगलेली आहे. काँग्रेसच्या सलगपणे होणाऱ्या पराभवाची उदात्त सल राणे यांच्या मनी असून त्यासाठी काँग्रेसचं राज्यनेतृत्व जबाबदार असल्याचा प्रत्येक पराभवानंतरचा आवडता राग याही वेळी राणे आळवत आहेत. शिवसेना सोडताना काँग्रेसने दिलेलं मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही, हे मोठं वैफल्यही उदात्ततेसोबत आहे. विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रिपद तर मिळू शकत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद मिळावं, अशी नारायण राणे यांची रास्त अपेक्षा असावी, पण ते लांबच राहिलं; ‘पक्षातलेच काही नेते आपल्याविषयी सतत नाहक कारवाया करतात. परिणामी, काँग्रेसमध्ये आता आपल्याला कोणतीही संधी उरलेली नाही’, सारांशाने अशी खंत नारायण राणे यांनी अनेक प्रकाश-वृत्त वाहिन्यांवर व्यक्त केली आहे.
ज्या पक्षात सतत डावललं जातं, जिथं दिलेला शब्द पाळला जात नाही (खरं तर दिलेला शब्द पाळण्यापेक्षा तो मोडण्याची मोठी परंपरा काँग्रेसमध्ये आहे, हे नारायण राणे यांना ठाऊक नसावं, हे काँग्रेसचं सुदैवच म्हणायला हवं; अन्यथा ते शिवसेना सोडतेच ना!), त्या पक्षात राणेच काय अन्य कोणीही जाण्याचं आणि राहण्याचं कारण नाही. मात्र नारायण राणे यांच्या बाबतीत असं सरळसोट विधान करता येणार नाही. ते का, हे समजून घेण्यासाठी नारायण राणे यांचं राजकीय वर्तमान काय आहे, हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या सलग पराभवासाठी राज्यातल्या (काही) नेत्यांना राणे जबाबदार धरतात, पण देश पातळीवर झालेल्या काँग्रेसच्या सुपडा-साफसाठी ते राहुल गांधी किंवा सोनिया यांना दोषी ठरवत नाहीत. हा विरोधाभास गांधी घराण्यावरील निष्ठेचा पुरावाच मानायला हवा. काँग्रेसच्या विस्तारासाठी जीव तोडून प्रयत्न होत नाहीत, असं म्हणत असतानाच राणेंनी त्यासाठी काय केलं, हे राणे सांगत नाहीत. उलट काँग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला नाही, हेच रडगाणं गातात; हाही एक सॉलिड गोंधळ आहे. खूप बोल लावूनही अखेर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्रिपद स्वीकारून नारायण राणे यांनी ते पदासाठी आसुसलेले असल्याचं सिद्ध केलं आणि त्यांचा दिल्लीतला ‘रुबाब’ ओसरायला सुरुवात झाली, याचा त्यांना विसर पडतो. राणे यांना पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याला कोणी रोखलं नव्हतं, पण जो कोकण हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो, त्याच किल्ल्यात स्वत:चा आणि पुत्राचा पराभव राणे रोखू शकले नाहीत. लगेच झालेल्या पोटनिवडणुकीत मुंबईतही बांद्रा मतदार संघातून नारायण राणे दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभवाला सामोरे गेले. अखेर विधानपरिषदेचं सदस्यपद राणे यांना मिळालं, तो पक्षश्रेष्ठींचा कृपाकटाक्ष (राहुल गांधी यांच्यामुळे - हे राणे यांनीच सांगितलेलं आहे) होता. याचा दुसरा अर्थ असा की, कोणत्याही सभागृहात स्वबळावर निवडून येण्याइतपतही राणे यांचा प्रभाव आता उरलेला नाही, हेही आता दिल्लीकर पक्षश्रेष्ठींना पुरतं पटलेलं आहे. मंत्री, आमदार आणि खासदार अशी सत्तेची पद कुटुंबात मिळाल्यावरही पक्षानं काहीच दिलं नसल्याचं राणे म्हणतात आणि त्यावर कडी म्हणजे, काँग्रेसच्या प्रत्येक पराभवानंतर नारायण राणे पक्षातल्या नेत्यांवर दुगाण्या झाडण्याचा कार्यक्रम करतात, पण पक्ष सोडत नाहीत हे आता काँग्रेसच्या चांगलं लक्षात आलेलं आहे. वर्तमान स्थिती म्हणून आणखी स्पष्ट सांगायचं तर काँग्रेसच्या दृष्टिकोनातून नारायण राणे यांचा उपयोग आता संपलेला असून ते यापुढे राजकारणात जे काही असतील त्यासाठी श्रेष्ठींची ‘कृपादृष्टी’ आवश्यक असेल-आहे. म्हणूनच वैफल्याचं जे काही उदात्त गाणं नारायण राणे म्हणत आहेत, त्याकडे पक्षश्रेष्ठींच नाही, तर राज्यातले नेतेही साफ दुर्लक्ष करत असावेत. थोडक्यात काय, तर नारायण राणे आता काँग्रेस पक्षात एकटे पडलेले आहेत.
नारायण राणे यांनी पक्ष सोडला, तरी पक्षाचं फार काही मोठं नुकसान होण्याची शक्यता आता उरलेली नाही, कारण दोन पुत्र वगळता त्यांचा कोणी समर्थक आता पक्षात आहे, अशी आजची स्थिती नाही. ‘शिवसैनिक असणं’ म्हणजे ‘अरे ला कारे’ करण्याचा रांगडेपणा आणि आक्रमकपणा हा नारायण राणे यांचा डीएनए आहे; तर पक्षश्रेष्ठींचा कल ओळखून सूर्योदयाचीही दिशा ठरवण्याची प्रथा आणि परंपरा काँग्रेसमध्ये आहे. या ‘डीएनए’मुळे राणे यांचं बऱ्यापैकीही फॉलोइंग काँग्रेस पक्षात तयार झालेलं नाहीये. शिवसेना सोडून राणे यांच्यासोबत जे आले, त्यांची नेत्यांनी काँग्रेसी शैलीत कधीच वाताहत करून टाकलेली आहे. उरले हे दोन समर्थक आणि तेही पुत्र, तर ते नारायण राणे यांचं इन्क्रीजिंग नव्हे, तर ‘इमेज डॅमेजिंग’ भांडवल आहे. या दोघांनी जे काही कर्तृत्व कोकणात दाखवलं (त्याला जनभाषेत मग्रुरी आणि माजोरीपणा म्हणतात!) तेही राणे यांचा कोकणातला प्रभाव ओसरण्याचं एक मुख्य कारण आहे. वेश बदलून नारायण राणे यांनी जरा कोकणात सर्वत्र फिरावं, म्हणजे ही नाराजी त्यांना समजेल.
नारायण राणे यांचा डीएनए बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, पण आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही. ‘कायम राडा करणारा पक्ष’ ही शिवसेनेची प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बदलली असून राजकीय लाभाचा समंजसपणे विचार (राजकीय भाषेत याला धूर्तपणा असं म्हणतात) करणारा पक्ष म्हणून शिवसेनेनं आकार घेतलाय. ‘दुबळं’ (आणि यापेक्षा आणखी बरंच काही-बाही आणि तेही जहरी) नेतृत्व अशी उद्धव यांची संभावना नारायण राणे यांनी सेना सोडताना आणि सोडल्यावर कायमच केली. ज्यांचा अवमानास्पद एकेरी उल्लेख नारायण राणे करत असत, त्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात सेनेचा विस्तार करण्यातच यश मिळवलेलं आहे. सेनेवर आता उद्धव यांचा एकछत्री अंमल आहे. झालेले अपमान आणि केले गेलेले अवमान गिळून; योग्य वेळी त्याचं भांडवल करत उद्धव यांच्या नेतृत्वाखालच्या सेनेनं नारायण राणे यांना कोकण आणि बांद्र्यातून हद्दपार केलंय. म्हणूनच शिवसेनेकडून नारायण राणे यांना टाळीसाठी हात पुढे येत नाहीये, असं म्हणायला वाव आहे.
राणे यांच्यासारखा आक्रमक, मराठा नेता शिवसेनेला खरं तर हवाच आहे. मानापमान खुंटीवर टांगून ठेवून सेनेने प्रवेश दिला, तरी नारायण राणे यांना परिस्थितीशी जुळवून घेणं जमेल का, हा कळीचा मुद्दा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणे यांनी सेनानुकूल वक्तव्यं जाहीरपणे केलेली आहेत. शिवाय अशात दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी उद्धव यांचा उल्लेख एकेरी न करता ‘उद्धवजी’ असा केलाय (आणि तशी जीभ वळवताना राणे यांना बराच त्रास झाल्याचं) हेही लक्षात आलंय. हे राणे यांच्यातल्या बदलांचे संकेत आहेत, असं गृहीत धरलं, तरी राणेंच्या संदर्भात उद्धव ठाकरे बदलल्याचे संकेत काही मिळालेले नाहीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तेव्हा सेनेत असणारे राणे यांचे सर्व कनिष्ठ सहकारी आता नेते झालेत आणि त्यांना हँडल करणं राणे यांना जमेल का, हाही प्रश्न आहे. शिवाय अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘बाळराजे’ आदित्य ठाकरे हेही आता रिंगणात आलेले आहेत आणि तेही स्वभाविकच थेट नेता म्हणूनच! या ‘बाळराजें’च्या हाताखाली काम करणं जमेल नारायण राणे यांना?
युतीत असताना नारायण राणे यांना ज्युनिअर असणारे भारतीय जनता पक्षातले राज्यातले बहुसंख्य नेते आता निर्णयाधिकारी झालेले आहेत. सेना-भाजप युती असताना नारायण राणे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा एकदा नागपूर अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाला अनुकूल असणारी वक्तव्ये केली. ते कळल्यावर नारायण राणे यांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे झणझणीत शब्दात झापलं, तेच देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महाराष्ट्रातला चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे काम करतील का, भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका राणे यांना निमूटपणे मान्य असेल का, मुख्यमंत्री नसलेल्या, पण त्या पदाचे दावेदार असणाऱ्या नारायण राणे यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना मान्य असेल का, दर वर्षी एकदा रेशीमबागेत हजेरी लावण्याचा संयम राणे यांच्यात आहे का? असे अनेक जर-तर-परंतु राणे यांच्या भाजप-प्रवेशाच्या मार्गात आहेत. अशा असंख्य तडजोडी करून नारायण राणे यांचा स्वभाव इतक्या बॅकफूटवर जाण्याचा आहे, असं कधी आजवर दिसलेलं नाहीये!
एके काळी कोकण हा भाजपचा गड होता. डॉ. क्षमा थत्ते, कुसुम अभ्यंकर, अप्पा गोगटे आणि अशा असंख्य सदाचारी, सेवाभावी मंडळींनी आधी जनसंघाचा मिणमिणता दिवा कोकणात पेटता ठेवला; नंतर भाजपचं कमळ फुलवलं. पुढे नारायण राणे यांच्या हाती सूत्रं देत बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात सेनेचा भगवा रुजवला आणि तोच भगवा घेऊन राणे काँग्रेसवासी झाले. कोकणात भाजप रुजवण्यासाठी नारायण राणे यांचा निश्चित उपयोग होईल, पण सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन जेवण उरकण्याची सरळमार्गी वृत्ती असणाऱ्या कोकणच्या भाजपवासीयांच्या पचनी नारायण राणे यांची आक्रमकता पडेल, असं गृहीत धरणं चुकीचं ठरेल.
मनसे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा सध्या अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. अस्तित्व टिकलं, तर या दोन्ही पक्षांचे नेते भविष्यात पक्षविस्ताराचा विचार करू शकतात. आज तरी या दोन्ही पक्षांना नारायण राणे नावाची ‘धग’ सहन होण्यासारखी नाही. थोडक्यात काय, तर या दोन्ही पक्षांचे दरवाजे तूर्तास तरी नारायण राणे यांच्यासाठी बंद आहेत!
नारायण राणे यांच्यासाठी राज्याचं राजकीय वर्तमान असं प्रतिकूल आणि राणेंची अस्वस्थता वाढवणारं आहे; असं असलं, तरी राणे एक राजकीय शक्ती आहेत, हे वास्तव आहेच. अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचे त्यांचे दरवाजे बंद आहेत आणि त्यातून सेनेतून ‘गेल्या घरी...’ म्हणजे काँग्रेसमध्येच त्यांनी गुमान राहावं, असा त्याचा तात्पुरता अर्थ आहे. तात्पुरता म्हणण्याचं कारण, राजकारणात कोणतीच स्थिती कायम नसते. नारायण राणे दिल्लीत आणि त्यांचे मुलगे राज्यात असा पर्याय भाजपसमोर खुला आहे, असं दिल्लीत बोललं जातंय. दिल्लीतली प्रत्येक चर्चा खरी ठरत नाही, पण सर्वच भाकितं खोटीही ठरत नाहीत, हेही विसरता येणारच नाही.
तूर्तास तरी, वाट्याला आलेलं उदात्त वैफल्य घेऊन जगणं, हेच नारायण राणे यांचं राजकीय वर्तमान आहे!
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment