तंत्रज्ञानाला स्वत:चा विचार, नीतिमत्ता, मूल्ये असे काही नसते. आणि असल्या गोष्टीला आपण ‘बुद्धिमत्ते’चे हत्यार देऊन बसलो आहोत
पडघम - तंत्रनामा
विजय तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 04 July 2023
  • पडघम तंत्रनामा कृत्रिमप्रज्ञा आर्टिफिशियल इंटेलिजन्स Artificial intelligence एआय AI ओपन एआय OpenAI चॅटजीपीटी ChatGPT

जुलै २०२२मध्ये ब्लेक लेमोईन या इंजीनियरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (यापुढे आपण ‘एआय’ किंवा ‘कृत्रिमप्रज्ञा’ म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे ‘लार्ज लॅंगवेज मॉडेल’ (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा’सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे, असे त्याने जाहीर केले.

२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषिकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.” त्यांच्या मते कृत्रिमप्रज्ञा मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होऊन या ग्रहाचा ताबा घेईल. लोकांत फूट पाडून सत्ता मिळवण्यासाठी कृत्रिमप्रज्ञेचा वापर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हे सगळे घडण्यापूर्वी लोक नोकऱ्या गमावून बसतील. त्यांनी खंत व्यक्त केली की, जे घडणार आहे, त्यावर त्यांच्याकडे काहीही उपाय नाही.

१६ मे २०२३ रोजी अमेरिकन सरकारच्या सिनेट पातळीवरील चौकशीसमितीसमोर OpenAIचे सीईओ सॅम अल्टमन यांनी आग्रहाने मांडले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांच्या सहकारातून कृत्रिमप्रज्ञेचे परवानीकरण आणि लेखापरीक्षण व्हावे. खरे तर २०१८पासून अमेरिकेत कृत्रिमप्रज्ञेवर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र प्रख्यात इतिहासतज्ज्ञ युव्हाल नोआ हरारी यांनी कृत्रिमप्रज्ञेबद्दल नुकतीच एक वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘जीवसृष्टीच्या प्रारंभी एकपेशीय जीव तयार झाला. तशी ही आजची कृत्रिमप्रज्ञा आहे. It’s just a baby!’ एकप्रकारे त्यांनी धोक्याचा इशाराच दिलेला आहे.

चॅटजीपीटी-३ आणि नंतर लगेच आलेल्या चॅटजीपीटी-४ने सर्वांची झोप उडवली. चॅटजीपीटी ३ आणि ४ हे भाषेसाठी आहेत. त्यात भाषा, तिची रचना, तिचे नियम, आजपर्यंतची सर्व पुस्तके, २०२१पर्यंतची जगाची सर्व माहिती त्याला पुरवलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर त्याच्या कामाच्या अनुभवातून एका शब्दाच्या पुढे नेमका कोणता शब्द येईल, हे तो जाणतो. त्यामुळे तो चुका करतो. अर्थात या चुकांमधून तो अधिक प्रगत होत जाण्याची प्रक्रिया होत असते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

कृत्रिमप्रज्ञेच्या संदर्भात चॅटजीपीटी फारच प्राथमिक आहे, अशी काही जणांची प्रतिक्रिया आहे. २०२२मध्ये ब्लेक लेमोईन कदाचित चुकीचे बोलले असतील किंवा त्यांचे आकलन चुकले असेल, असे आपण मान्य करू. जॉफरी हिंटन चुकीचे बोलताहेत का? हिंटन यांच्या न्यूरल नेटवर्क (मज्जातंतूजाल) या संशोधनावर तर संपूर्ण कृत्रिमप्रज्ञेची उभारणी झाली आहे.

एकंदरीत हे प्रकरण गंभीर आहे, कारण हिंटन स्वतः इशारा देतात. OpenAIचे सीईओ कृत्रिमप्रज्ञेच्या नियंत्रणावर भर देतात. मे २०२३मध्ये जगातील प्रतिष्ठित आणि कृत्रिमप्रज्ञातज्ज्ञ सामायिक पत्रक काढून कृत्रिमप्रज्ञेचे संशोधन सहा महिने थांबवावे, असे आवाहन करतात. म्हणजे मुळात निर्मातेच, म्हणजे बाळाचे आई-बापच “आमच्या पोटी भस्मासूर जन्माला आलाय. तुम्ही आवरा बुवा त्याला. नाहीतर काही खरे नाही.” अशी बोंब ठोकायला लागले आहेत. या निर्मात्यांच्या कंपन्यांनी कोट्यवधी डॉलर्स गुंतवून मानवतेची सेवा सुरू केलेली नव्हती. आता मुलाचे पाय पाळण्यात दिसायला लागल्यावर कायदा, नियंत्रण, नियमन आणि नैतिकतेच्या गोष्टी ते करू लागले आहेत.

आपण भारतीय माणसे. तंत्रज्ञान उधार-उसनवारीत आणायचे असते, अशीच आपली मानसिकता. पुन्हा या मानसिकतेला जागतिकीकरणाने उत्तेजन दिले आहे. आता फक्त कृत्रिमप्रज्ञेचा शोध फार पूर्वीच लागला आहे की, नव्याने लागला आहे, एवढाच वाद करता येईल आणि वाद संपेपर्यंत कळेल की, मराठवाड्यातल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कृत्रिमप्रज्ञा काम करू लागली आहे. असो.

मी तंत्रज्ञानाच्या विरोधी नाही, हे सुरुवातीलाच मांडतो. काळाप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होते. त्यातून उत्पादनाचा वेग वाढतो. सुबक आणि उत्तम प्रतीचा माल अत्यल्प वेळात आणि मोठ्या प्रमाणात तयार होतो. तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत जाते, तसे उत्पादनासाठी मनुष्यबळ कमी लागते. तरीही सगळ्या उत्पादनप्रक्रियेवर आतापर्यंत माणसाचे नियंत्रण होते. आता कृत्रिमप्रज्ञा आणि यंत्रशिक्षणामुळे मानवी नियंत्रणाची गरज नष्ट होत जाणार आहे. यंत्रांना योग्य सूचना देऊन कृत्रिमप्रज्ञा कामे करून घेईल. त्यांची काळजी ती घेईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

थोडक्यात, उत्पादनातील मानवी हस्तक्षेप किमान पातळीवर येईल. त्यानंतर तो जवळजवळ नाहीसा होईल. अनेकांच्या मते याची सुरुवात झालेली असून ते पसरायला वेळ लागणार नाही. भारतात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची नुकतीच सुरुवात झाली असून, शेतीला कृत्रिमप्रज्ञेपर्यंत पोचायला वेळ लागेल. शेतीक्षेत्रातील अनेक घटकांवर हे अवलंबून राहील. इथे मी माझी तंत्रज्ञानविषयक भूमिका मांडणार नाही. कारण लेखाचा तो विषय नव्हे. कृत्रिमप्रज्ञेबद्दल मी काही वाचले, ऐकले आहे किंवा काही तज्ज्ञ मंडळींशी बोललो आहे, त्यावरून मला भावी काळ कसा वाटतो ते मी मांडणार आहे. मी लिहिलेले खोटे ठरले, तर मला नक्कीच आनंद होईल.

आपण चॅटजीपीटी-४पासून सुरुवात करू. कुठलाही प्रश्न विचारा, काहीही विचारा, दहा सेकंदात उत्तर तयार. प्रश्नाचे उत्तर असो, निबंध असो, सादरीकरण असो, विज्ञानाबद्दल असो, ग्रह, तारे, माती, पाणी, दगड, धोंडे, कविता, साहित्य, समाजशास्त्र कशाबद्दलही विचारा, उत्तर आहे आमच्याकडे.

चॅटजीपीटी हे OpenAI कंपनीचे आहे. चॅटजीपीट-३पेक्षा चॅटजीपीटी-४ खूपच शक्तिशाली आहे. लवकरच चॅटजीपीटी-५ येऊ घातले आहे. त्यामध्ये तर भाषेसोबत आवाज आणि प्रतिमाही असणार आहेत. आधी गूगलमध्ये फक्त माहिती मिळत असे. मग त्यातली हवी ती माहिती गोळा करून आपल्याला हवे तसे लिहावे लागत असे. चॅटजीपीटीने हे तुमचे कष्ट रद्द केले. एकप्रकारे गूगलच्या धंद्याला त्याने आव्हान दिले.

OpenAIने त्यांच्या पायाखालची फळीच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मागोमाग मायक्रोसॉफ्ट बिंग नावाचा ‘चॅटबॉट’ आणला. एक महिन्यापूर्वी गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी आपल्या चमूसह केलेले सादरीकरण यू-ट्युबवर उपलब्ध आहे. त्यांची ‘बार्ड’ नावाची कृत्रिमप्रज्ञा येऊ घातली आहे आणि त्यांच्या अनेक अॅप्समध्ये कृत्रिमप्रज्ञेमुळे मोठे बदल घडणार असून, त्याने वापरणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. हळूहळू प्रत्येक जण अशीच वैशिष्ट्ये असलेले प्रोग्राम्स बाजारात आणणार आणि त्यांचा वापर सार्वत्रिक होणार. याचे परिणाम काय होतील, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

मानवी स्वभाव

निसर्गातील घटनांच्या कार्यकारणभावांबद्दल मला माहिती नसल्याने त्या घटनांचा अनुभव माझ्यामध्ये उत्सुकता निर्माण करतो. मी काही शोधायचा प्रयत्न करतो. मेंदूला त्रास देतो. काही रचतो. त्यातून नवीन शंका निर्माण होतात. मग मी त्याबद्दलची माहिती गोळा करतो. वाचतो, कृती करतो, माहितीपट बघतो, तज्ज्ञ लोकांशी बोलतो. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतो. त्यातून शंका उरल्या, तर अधिक माहिती गोळा करतो. आणि स्पष्टता मिळवतो. मानवी जीवनात ही प्रक्रिया छोट्या-मोठ्या प्रमाणात निरंतर चालू असते. या प्रक्रियेतून आपल्याला ज्ञान होते. आता उत्सुकता वाटण्याच्या पहिल्याच क्षणी आपण चॅटजीपीटी-४ची मदत घेतली आणि दिसणाऱ्या, अनुभवणाऱ्या घटनेची कारणमीमांसा विचारली की, काम संपले. त्या विषयावरील सगळी माहिती तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मांडली जाईल.

आपल्या मनात शंका निर्माण होते. मग आपण त्या शंकेकडे किंवा त्या प्रश्नाकडे अनेक अंगाने बघण्याचा प्रयत्न करतो. तो प्रश्न सुटेपर्यंत आपला हा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे एखाद्या प्रश्नाकडे अनेक अंगांनी बघण्याची आपली विश्लेषणक्षमता वाढते. पण हे सगळे हवेच कशाला? मेंदूला कशाला त्रास द्या? फक्त तुम्हाला प्रश्न नीट विचारता आला पाहिजे. तेवढे पुरेसे आहे. बाकी चॅटजीपीटी बघून घेईल.

अजून गंमत म्हणजे, चॅटजीपीटी एकच उत्तर अनेक शैलीत देऊ शकते. म्हणजे वर्गात एक प्रश्न विचारला, तर सगळी मुले चॅटजीपीटीवर उत्तर शोधतील. तरीही ती पारंपरिक प्रकारची नक्कल नसेल. पुन्हा सगळी उत्तरे बरोबर असतील. थोडक्यात, आपल्याला विश्लेषकबुद्धीची गरज नाही. प्रश्न निर्माण करून, डोक्याला ताण देण्याची गरज नाही. जास्त भाषा तरी का शिकावी? प्रश्न विचारण्यापुरती आली की झाले.

असे असूनही आम्ही चॅटजीपीटी वापरले तर शाळेत, कॉलेजात, मेडिकल, इंजिनीअरिंग या सगळ्यांत उत्तम गुण मिळतील. हे उत्तम गुण वगैरे सोडून देऊ. मात्र माणूस नावाचा विचार करण्याची सवय असलेला मी, सजीव प्राणी, ती सवय गेल्यावर कसा असेन? हा खरा प्रश्न आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

आज आपल्याला विचार करताना, डोक्याला त्रास देताना काही उत्तर सापडले, नवीन छोटेसे ज्ञान झाले तरी उत्तेजना निर्माण होते. खूप निखळ आनंद मिळतो. एखाद्या प्रश्नाचे नवीन पैलू कळले की, तसाच आनंद होतो. यातूनच आपल्याला नवनवीन प्रश्नांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. कारण ती उत्तेजना किंवा तो निखळ आनंद दुसरे कोणी देऊ शकत नाही. हे मी कुठल्या शास्त्रज्ञाबद्दल लिहीत नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात लहानपणापासून हे घडत असते. मग हे सगळेच इतिहासजमा होणार का? नाही. मात्र ते फारच मोजक्या लोकांच्या वाट्याला येईल. ही उत्तेजना, हा निखळ आनंद सार्वत्रिक नसेल. मग भावी काळातील माणूस कसा असेल? त्याची सांस्कृतिक अभिरुची कशी असेल? तो समाजात सहज संवाद करू शकेल का? या प्रश्नांचा ऊहापोह लवकरच करावा लागेल.

भाषा आणि सर्जकता

चॅटजीपीटीच्या या सगळ्या प्रक्रियेत माणूस भाषेचा आनंद घेईल, तो भाषेची विविध कौशल्ये शिकेल, विविध शैली आत्मसात करेल असे होण्याची शक्यता तपासायला हवी. स्वत: प्रश्न विचारणे, त्यावर विचार करणे, विश्लेषकबुद्धीचा वापर करणे यांची गरज संपल्यावर माणसाला भाषेची गरज कुठे लागेल? चॅटजीपीटीवर प्रश्न विचारण्यापुरती भाषा यायला लागली की पुरेसे होईल का? माणसाला काही निर्माण करायची उर्मी कमी होत गेल्यावर तो समोर येणारे विविध शैलीतील साहित्य वाचण्यात रस घेईल का? हे प्रश्न अवास्तव वाटत नाहीत.

यावर असा प्रतिवाद असू शकतो की, ज्यांना विचार करण्याची इच्छा आहे त्यांनी चॅटजीपीटी वापरू नये. पण यालाही दोन बाजू आहेत. एकतर माणूस नेहमी सोपा मार्ग शोधत असतो. अनेक कामे वेगात करायला चॅटजीपीटीशिवाय पर्याय नाही. आणि दुसरे म्हणजे जर वापरले नाही, तर तुम्ही स्पर्धेत टिकून राहणार नाही. जसे कॅल्क्युलेटर आल्यापासून पाठ असलेले पाढे विसरायला झाले. तशीच स्थिती भाषेच्या वापराबाबत होईल, ही भीती अनाठायी नाही.

तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी शेक्सपीयरने नाटके लिहिली. ती अजूनही रंगमंचावर होतात. नाट्यगृहे पूर्ण भरलेली असतात. जगातील जवळजवळ सर्व भाषांत त्याच्या नाटकांची भाषांतरे झाली असतील. हे सगळे आपल्याला माहीत आहे. शेक्सपीयरच्या काळात सर्जकता कशाला म्हणत? दोनशे वर्षांपूर्वी, शंभर वर्षांपूर्वी अगदी चाळीस वर्षांपूर्वी सर्जकता कशाला म्हणायचे आणि आज कृत्रिमप्रज्ञा आल्यानंतर सर्जकता म्हणजे नक्की काय याची परत एकदा व्याख्या करायची वेळ आलेली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, मी एका नाटकाची संहिता तयार केली. ते नाटक शेक्सपिअर शैलीत लिहून मिळेल. तेच नाटक शिरवाडकरांच्या शैलीत लिहून मिळेल. ती शैली ही सर्जकता होऊ शकते का? सर्जकता म्हणजे नक्की काय? कृत्रिमप्रज्ञेच्या संदर्भात सर्जकता म्हणजे न वापरलेली चांगली शक्यता. वाक्य वाचायला सोपे आहे, पण ते गंभीर होऊन विचार करण्यासारखे आहे. एखादा वेगळा प्रयोग एकदा केलात की, त्यातली सर्जकता संपली. कृत्रिमप्रज्ञा एक शक्यता म्हणून तुमचा प्रयोग गिळंकृत करेल. स्वत:ला अद्ययावत करून समाधानाची ढेकर देईल. म्हणजे ती विकसित झाली असे होईल. म्हणजे मानवी जीवनातील सर्जकतेची पातळी फार उंचावर नेऊन ठेवावी लागेल. कारण एक प्रयोग झाला की, ती शक्यता संपली. तिला निव्वळ विदा (Data) म्हणून गणले जाईल.

माणसाला कृत्रिमप्रज्ञेपासून स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी आजपर्यंत न केलेले प्रयोग सतत करत राहावे लागतील. त्याचा सतत विचार करावा लागेल. हे अतिशय अवघड आहे. शब्दांच्या वापरातून निर्माण होणाऱ्या सर्जकतेबद्दल जसे प्रश्न निर्माण होतात, तसेच दृश्यकलेबाबत होतात. दृश्यकलेची स्वत:ची भाषा असते. ती शब्दांची नसते. त्याला दृश्यभाषा किंवा चित्रभाषा म्हटले जाते. यापुढे कृत्रिमप्रज्ञेची मदत घेऊन चित्रे तयार करायची असतील, तर आपल्याला काय चित्र हवे आहे, मग ते वास्तववादी असो किंवा अमूर्त, ते चित्रकाराला शब्दांत मांडावे लागेल. म्हणजे चित्रकाराला चित्रभाषेतून विचार न करता व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागेल. आजपर्यंत झालेल्या प्रगतीनुसार माध्यमे बदलली पण भाषा तीच राहिली. मात्र आता कृत्रिमप्रज्ञेसाठी चित्राची भाषा कामाची नाही. चित्रभाषेसाठी जुन्या माध्यमांमधून व्यक्त व्हावे लागेल.

सिनेमा

उद्या राजकुमार रावसोबत तरुणपणातली दीप्ती नवल नटी म्हणून चित्रपटात दिसली, तर आश्चर्य वाटायला नको. फक्त हे किती वर्षांत अवतीर्ण होईल एवढाच प्रश्न आहे. म्हणजे आता तरुण वयातली दीप्ती नवल चित्रपटात आणण्यासाठी काय काय तांत्रिक प्रक्रिया करायला लागतील आणि मुख्य म्हणजे कामाचा खर्च ठरवावा लागेल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

एका मुलाखतीत एक प्रयोग बघायला मिळाला. मुलाखत घेणाऱ्याने एका तगड्या, वयस्कर काकांशी बोलत असताना स्वतःच्या मोबाईलने त्यांचे फोटो काढले. मागे पडद्यावर बेसबॉलचा सामना सुरू होता. मुलाखत घेणाऱ्याने काकांना विचारले, ‘आपल्याला कोणाच्या बदली खेळायचे आहे?’ काकांनी फक्त स्मित केले. मुलाखत घेणाऱ्याने मोबाईलमध्ये काढलेले फोटो ई-मेल केले. पडद्यावर चाललेल्या खेळामध्ये एका खेळाडूवर काकांची प्रतिमा चिकटवली गेली. तो मूळ खेळाडू दिसेनासा झाला आणि काका बेसबॉल खेळताना दिसू लागले. हा अगदी छोट्या प्रमाणात केलेला प्रयोग होता. जुन्या आवडत्या तरुण नट्या आणि तरुण नट परत पन्नास वर्षांनी नवीन सिनेमात काम करतील. फक्त ते आवडायला हवेत आणि ही प्रक्रिया स्वस्त व्हायला हवी, अशा गमतीजमती होतील.

यात धोकेही खूप आहेत. मध्यंतरी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पोलिसांनी पकडले असल्याचे चलच्चित्र समाजमाध्यमांवर फिरत होते. ते चलच्चित्र कृत्रिमप्रज्ञेच्या मदतीने तयार केले होते. एकदा तुमच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण मिळाले की, ते वापरून तुम्ही न बोललेले तुमच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून तुमच्या नावावर खपवले जाऊ शकते. तंत्रज्ञानाचा वापर कोणी कसा करावा, याचे नियम केले तरी गैरवापर थांबत नाही किंवा त्याचा वापर ठरवून केला जातो, हे आपण अनुभवत आहोत.

२०२४मध्ये भारतात निवडणुका आहेत. कुठलाही राजकीय नेता दगडफेक करतोय किंवा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतोय असे चलचित्र प्रसारित झाले, तर काय भयानक परिस्थिती निर्माण होईल? दंगली पेटवण्यापासून मतदानावर परिणाम करण्यापर्यंत काहीही करता येईल. नंतर पोलिसांत गुन्हा दाखल होईल. पण कोणावर? खोटे चलचित्र बनवणाऱ्यावर की निरपराध राजकीय नेत्यावर? जनतेत प्रेम, सलोखा, भाईचारा निर्माण करण्यासाठी खरेच बोलावे लागते. नैतिक आवाहने करावी लागतात. प्रेमाच्या खोट्या गोष्टी सांगून प्रेम निर्माण होत नाही. विध्वंसक वृत्ती समाजात खोट्याचा सरसकट वापर करून भीती आणि दहशत पसरवेल आणि ते इतके खरे दिसेल की, त्याचे परिणाम भयंकर होतील. थोडक्यात, खरे आणि खोटे यांची सीमारेषा तंत्रज्ञानाने धूसर केली आहे. ‘माकडांच्या हाती कोलीत’ मिळालेले आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

स्पर्धा

सध्या भारतात चॅटजीपीटी-४ची चर्चा सुरू आहे. एखादा एआय तयार करणे हे खूपच खर्चिक काम असते. त्यात अनेक जण सहभागी असतात, प्रचंड गुंतवणूक असते. कंपनीला त्यातून अपेक्षित परतावा मिळवायचा असतो. आता या कंपनीची स्पर्धककंपनी असते. तशीच अजून एक तिसरी, चौथी, पाचवी स्पर्धककंपनी असते. ते जेव्हा आपली कृत्रिमप्रज्ञा विकसित करतील, ती त्या काळातली सर्वांत प्रगत कृत्रिमप्रज्ञा असेल. त्यामुळे नव्या कृत्रिमप्रज्ञेचे लिहिले जाणारे संकेत हे प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी, आपली कृत्रिमप्रज्ञा अधिक प्रगत, प्रभावी आणि शक्तिशाली बनवण्यासाठी असणे, हे स्वाभाविक वाटते. अशा तीव्र स्पर्धेत नीतिमत्तेचा आणि सारासार विवेकाचा हात सुटणेही स्वाभाविक असेल. यातून निर्माण होणारी स्थिती कशी असेल, याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.

कृत्रिमप्रज्ञा ही कृत्रिम पद्धतीने पण विचार करणारी संस्था मानली गेली आहे. आज बाल्यावस्थेत असलेली कृत्रिमप्रज्ञा अक्राळविक्राळ रूप कधी धारण करेल? मानवाला कधी ओलांडेल? मानवावर अधिकार कधी गाजवेल? हे प्रश्न समोर उभे राहिले आहेत.

मानवासह कुठल्याही सजीवाची उत्क्रांती विशिष्ट वेगाने होत असते. तिचा स्वत:चा वेग असतो. मुख्य म्हणजे या उत्क्रांतीमध्ये कोणीही कोणाशी स्पर्धा करत नसतो. त्या त्या प्राण्याचा स्वत:चा वेग असतो. कृत्रिमप्रज्ञेचे तसे नाही. एका कृत्रिमप्रज्ञेची प्रगती झाली तर इंटरनेटद्वारा तिला जोडलेल्या इतर कृत्रिमप्रज्ञांची प्रगती होणार. त्याशिवाय त्या स्वत:चे स्वत:ला विकसित करत असतात. त्यांचा वेग मानवासारखा निश्चित नाही. ते घातांकीय (exponential) पद्धतीने विकसित होतील, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

ते एकदा मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेले की, ते पुढे कसे वागतील, हे सांगणे कठीण आहे. गंमत म्हणजे कृत्रिमप्रज्ञेकडे ताकद आहे, बुद्धी आहे, तंत्रज्ञान म्हणून ती स्वत: हवे तसे वागेल. पण ती कशालाही जबाबदार नाही. ज्याला जबाबदारी नाही त्याच्यावर मानवाने अधिकारांचा भरघोस दौलतजादा केला आहे. स्पर्धा करणाऱ्या कंपन्या कितीही कल्याणकारी बोलोत मात्र, यातून किती लोकांचे रोजगार जातील यावर कोणीही स्पष्ट मत मांडलेले नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

रोजगार

माझा एक मित्र छोट्या जाहिरात कंपनीत अधिकारी आहे. त्याला त्याच्या ग्राहकाकडे ‘प्रेझेंटेशन’ करायला जायचे होते. हे ‘प्रेझेंटेशन’ बनवायची जबाबदारी त्याच्या कनिष्ठाची होती. तो आजारी होता. मित्राने चॅटजीपीटी-४ला माहिती पुरवली आणि मिनिटभरात ‘प्रेझेंटेशन’ तयार मिळाले. त्याचे वेगवेगळे पर्याय मिळाले. थोडे फेरफार करून त्याने दहा मिनिटांत ‘प्रेझेंटेशन’ तयार केले. ते बघून ग्राहक खूष झाला. जाहिराती तयार करायला सांगितल्या. तेव्हा कंपनीतील कलाविभागात आधीचेच भरपूर काम होते. मित्राने एक सॉफ्टवेअर डाऊनलोड केले. ते कृत्रिमप्रज्ञाधारित होते. त्याचा वापर करून मित्रानेच जाहिराती तयार केल्या. त्या अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध झाल्या. त्याने चांगला पर्याय निवडून ग्राहकाला सादर केल्या. तोसुद्धा खूष झाला.

आता सध्या सर्व जण उच्च कौशल्याकडे जात आहेत. समाजमाध्यमावर ‘एआय शिका’ अशा खूप जाहिराती येत आहेत. हा उच्चकौशल्यप्राप्त माणूस कृत्रिमप्रज्ञेसोबत काम करेल, तेव्हा तो सोबतच्या सर्वांच्या खुर्च्या काढून घेईल. म्हणजे सोबत काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. त्यामुळे एक अंदाज असा आहे की, पुढील काही वर्षे उच्च कौशल्यप्राप्तीचे पेव फुटेल.

त्यानंतर ग्राहक असा विचार करेल की, माझे जाहिरातींचे काम जाहिरात कंपनीकडे का देऊ? त्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञाधारित वेगवेगळी सॉफ्टवेअर विकत घेईन आणि मनासारखी जाहिरात करून घेईन. हा टप्पा फार दूर नाही. प्रश्न असा आहे की, माणूस सतत उच्चकौशल्यप्राप्ती किती वर्षे करू शकेल? कृत्रिमप्रज्ञा सतत विकसित होत जाईल. त्याबरोबर स्पर्धा करणे माणसाला शक्य आहे का? माणूस टिकून राहण्यासाठी खूप आटापिटा करेल, पण त्यातून निर्माण होणारे पराकोटीचे ताणतणाव, असुरक्षितता आणि त्रास यांचे व्यवस्थापन माणसाला करावे लागेल. सध्यातरी ढोबळ दोन मार्ग दिसतात. एक मानसोपचारतज्ज्ञांचा आणि दुसरा बुवांच्या नादी लागण्याचा!

उपयुक्तता

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती हे नेहमीच कोणाला तरी उपयुक्त असते. अन्यथा ते तंत्रज्ञान विकसित होऊ शकत नाही किंवा विकले जाऊ शकत नाही. मुळात तंत्रज्ञानाला स्वत:चा विचार, नीतिमत्ता, मूल्ये असे काही नसते. आणि असल्या गोष्टीला आपण बुद्धिमत्तेचे हत्यार देऊन बसलो आहोत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

वैद्यकीय क्षेत्रात रोगनिदान आणि रोगउपचार यामध्ये क्रांतिकारक बदल होऊन, कदाचित पुढील पन्नास वर्षांत असे शोध लागतील की, मानवाचे आयुष्यमान दीडशे ते पावणे दोनशे वर्षे होईल, असे भाकीत केले जात आहे. आपण आयुष्यमानाची गोष्ट बाजूला ठेवू. रोगनिदान आणि उपचारात बदल होईल, हे आतासुद्धा दिसून येत आहे. मात्र त्यासाठी भरमसाठ गुंतवणूक करावी लागेल. मग गुंतवणुकीचा परतावा आलाच. जागतिकीकरणानंतर शासनसंस्थेने सार्वजनिक जबाबदारीतून म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या कर्तव्यांतून हळूहळू अंग काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला हे लक्षात आले असेल की, मेडिक्लेमच्या प्रसारासोबत ‘रुग्णालये’ नावाचा उद्योगसमूह पसरला.

आज भारतासारख्या देशात तळातली ६० टक्के जनता फक्त स्वतःचे उदरभरण करू शकते आणि त्याहून अधिक दुसरे काहीही करू शकत नाही. मात्र त्यांच्या श्रमातून लक्षणीय संपत्ती निर्माण होत असते. या लोकांना कृत्रिमप्रज्ञेमधून निर्माण होणारे फायदे मिळतील का?

हीच स्थिती शिक्षणाच्या बाबतीत आहे. पराकोटीच्या विषमतेचे प्रतिबिंब शिक्षणक्षेत्रातही दिसते. बालवर्गांपासून अत्याधुनिक शाळा असतात. त्यांचे शुल्क लाखो रुपयांत असते. आणि दुसरीकडे कित्येक शाळात साधी शौचालये नाहीत, मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. शिक्षण फार दूरची गोष्ट होते. सरकारी पातळीवर बदलत्या तंत्रज्ञानासोबत उच्चशिक्षण पद्धतीत बदल करायला हवे. कौशल्य विकास करायला हवा. जिथे प्रगत तंत्रज्ञान शिकवण्यासाठी गुंतवणूक करायला हवी, तिथे आपण गोमूत्रातून अमृत मिळवायचा प्रयत्न करतोय. गर्भसंस्कारांचे प्रशिक्षण स्त्रीरोगतज्ज्ञांना देतोय आणि विद्यापीठातून फलजोतिष शिकवण्याचे अभ्यासक्रम सुरू करतोय. हे पाहिल्यावर आपल्याकडे उच्चशिक्षित तरुण मुलेमुली बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वत:ला कसे जोडून घेतील हा प्रश्न निर्माण होतो.

उपाय ‘युबीआय’

बेरोजगारी किती वाढेल या प्रश्नाचे उत्तर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे प्रमुख समर्थक आणि ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे अध्यक्ष क्लाउज श्वाब यांनी दिले आहे. त्यांनी २०१६ साली ‘चौथी औद्योगिक क्रांती’ या पुस्तकात लिहिले आहे की, ज्या कामामध्ये पुनरुक्ती आहे, तोचतोचपणा आहे, ती कामे संपुष्टात येतील. त्यांच्या अंदाजाप्रमाणे ५२ ते ५९ टक्के नोकऱ्या नष्ट होतील. ३५ टक्के नोकऱ्यांमध्ये कामाचे स्वरूप पूर्ण बदलेल आणि ६ टक्के नवीन नोकऱ्या निर्माण होतील. २०१८मध्ये भारताच्या नीती आयोगाने प्रसिद्ध केलेले अंदाज वरील अंदाजांशी मिळतेजुळते आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

आज २०२३मध्ये जगातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख निर्माण होणाऱ्या या बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. नोकऱ्या कमी होण्याचे त्यांनी केलेले अंदाज ऐकून आपल्याला घाबरायला होते. यामध्ये नक्की कोणत्या नवीन नोकऱ्या तयार होतील आणि त्या किती काळ टिकतील, याबद्दल स्पष्ट विधाने अधिकृत कंपन्यांकडून किंवा एआय तज्ज्ञांकडून प्रसिद्ध झालेली नाहीत. कारण हे तंत्रज्ञान कसे आणि किती वेगाने बदलत जाईल, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही.

या निर्माण होणाऱ्या बेकारीवर टाचा घासून मरणे, हा उपाय होत नाही, यावर आपल्या सर्वांचे एकमत असेल. पण या बेकारांना पोसायचे कसे? काहींच्या मते कृत्रिमप्रज्ञा वापरणाऱ्या कंपन्यांवर विशेषकर लावावा आणि त्यातून मिळणारा पैसा हा बेकारांच्या कल्याणासाठी वापरावा.

विसाव्या शतकाच्या अखेरपासून स्वयंचलन वाढू लागल्यावर आणि कृत्रिमप्रज्ञेची संकल्पना रूढ होऊ लागल्यावर जागतिक पातळीवर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही कल्पना पुढे आली. म्हणजे तुम्हाला रोजगार नसल्यास सरसकट ठरावीक रक्कम तुम्हाला मिळत राहील. ही ढोबळ कल्पना आहे. ही कल्पना ज्या समाजातून तयार होते, तो समाज कसा आहे, हे बघायला हवे. म्हणजे कल्पनेचे स्वरूप सार्वत्रिक आहे की, विशिष्ट भागापुरते आहे, याचा अंदाज येईल.

कृत्रिमप्रज्ञेचा उगम होण्यापूर्वी या समाजात पुरेपूर सुबत्ता होती, महागाई वाढलेली नव्हती, लोकसंख्या कमी, लोकसंख्यावाढीचा दर ऋण, बहुतेकांना रोजगार आणि काही बेरोजगारांना चांगले जीवनमान जगता येईल, असा भत्ता होता. या समाजात स्वयंचलन आणि कृत्रिमप्रज्ञेमुळे बेरोजगारी वाढल्यावर युबीआय देण्याची कल्पना आली. त्यात असे मांडले की, माणसाच्या उदरनिर्वाहाची चिंता मिटली म्हणजे तो काव्य, संगीत, साहित्य, शिल्पकला, चित्रकलेत रमून जाईल. नवनिर्मिती करेल. तो नव्या जोमाने नवे तंत्रज्ञान शिकून उच्चकौशल्यप्राप्ती करेल. हा प्रयोग थोड्या कालावधीसाठी काही विशिष्ट विभागात झाला. अभ्यासासाठी त्याचे काही प्रायोगिक प्रकल्प राबवले. विविध अभ्यासांच्या आकडेवारीतून ही मांडणी योग्य असल्याचे अनेक विचारवंत मांडतात. तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या आळसावरही चर्चा झाली आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

भारतासारख्या देशात लोकसंख्या भरपूर आहे. लोकसंख्या तरुण आहे. देश अविकसित आहे. विषमता पराकोटीची आहे. कृत्रिमप्रज्ञा अवतीर्ण होण्यापूर्वीच देशातील २८ टक्के जनता दिवासाला चाळीस रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावत नाही. ती थेट दारिद्र्यरेषेखाली येते. देशाची एकूण लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे आणि शासन जवळजवळ ८० कोटी जनतेला मोफत धान्यवाटप करते कारण ते दारिद्र्यरेषेच्या खाली किंवा जवळपास असतात.

आपण असे म्हणू शकतो की, देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही बाजारभावात धान्य खरेदी करू शकत नाही, म्हणून ही जनता गरीब आहे. ही करोनाकाळानंतर सुरू झालेली योजना शासन बंद करत नाही आहे. यांसारख्या विविध प्रकारचे अनुदान शासनातर्फे दिले जाते. एकदा या गोरगरिबांना आणि कृत्रिमप्रज्ञेमुळे निर्माण झालेल्या बेकारांना म्हणजे वरील ८० कोटी अधिक कृत्रिमप्रज्ञेमुळे निर्माण होणारे बेकार म्हणजे आकडा ८५ कोटींपर्यंत पोचेल, या सर्वांना सरसकट युबीआय देणे शासनाला परवडेल का? हा पहिला प्रश्न आणि समजा दिले, तर आता अस्तित्वात असलेली अनुदाने चालू राहतील की बंद होतील? हा दुसरा प्रश्न.

२०१६-१७मध्ये ‘इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया’मध्ये असे सुचवले होते की, समाजकल्याणाच्या योजनांच्या बदली आपण ‘युबीआय’ द्यावा. त्यामुळे अनुदान आणि युबीआय दोन्ही देणे सरकारला परवडेल, याबद्दल मला स्वत:ला शंका आहे. समजा अनुदान बंद केले, तर बाजारभाव वाढतील. जसे गॅस सिलेंडरचे भाव वाढत आहेत. तसेच सरसकट युबीआय वाटपातून बाजारात पैसा येईल आणि त्यानेही भाववाढ होईल. मग हातात आलेल्या पैशाला काय किंमत राहील? मुख्य म्हणजे नागरिक म्हणून रोजगार हा माझा हक्क नसल्याने युबीआयच्या नावाखाली सरकार जो भाकरतुकडा फेकेल तो उचलावा लागेल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

कृत्रिमप्रज्ञेचे फायदे कोणाला आणि परिणाम भोगणार कोण? यावर स्पष्ट चर्चा होणे गरजेचे आहे. शेवटी मानवी जीवनाचे श्रेयस काय? इथे चर्चा येऊन थांबते. कष्ट करून पैसे मिळवावेत आणि आत्मसन्मानाने जगावे. माझ्या आत्मसन्मानातूनच माझे माणूसपण सिद्ध होते. ही भूमिका गरिबातला गरीबही घेतो. त्याच्याकडे श्रीमंती नाही, पण समाजातल्या विविध घटकांचा आत्मसन्मान सांभाळला गेला, तरच समाजाचा तोल सांभाळला जातो.

आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत की, तिथून पुढे काही वर्षांनी कष्टाविना पैसे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. यात आत्मसन्मान किती आणि अगतिकता किती असेल? माझ्या समाजाला माझ्या कष्टाची, बुद्धीची गरज नाही. माझ्या अस्तित्वाला इथे किंमत नाही. ते मला मरेपर्यंत जगण्यासाठी युबीआय देत आहेत. ही बोचरी जाणीव मला सतत असणार. अशा स्थितीत मी मनापासून बासरी वाजवू शकेन का?

.................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......