मराठी साहित्य संस्थांच्या व्यवहारातील दिग्गज, रोखठोक कौतिकराव ठाले-पाटील यांचा गौरवग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी त्यांचे संपादन केलं आहे. या ग्रंथासाठी लिहिलेला हा लेख...
..................................................................................................................................................................
नमनालाच घडाभर तेल जाळायचं म्हटलं, तर कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी माझी ओळख १९९९पर्यंत नव्हती. पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं, तेव्हापासून ते मे ९८पर्यंत माझा मुक्काम प्रामुख्यानं नागपूर आणि मुंबईत राहिला. त्यातच राजकीय आणि विधिमंडळाच्या वृत्तसंकलनात अडकलो. दैनिक ‘लोकसत्ता’मुळे महाराष्ट्रभर फिरस्ती होत होती, म्हणून मराठवाड्यातल्या राजकारण्यांशी चांगला संपर्क होता, पण मराठवाड्यातल्या सांस्कृतिक क्षेत्राशी काही मित्र वगळता जवळिकीचा संवाद नव्हता. मात्र पुण्या-मुंबईतल्या अनेक साहित्यिकांशी घरोब्याचे संबंध होते.
विदर्भाच्या सांस्कृतिक जीवनाशी माझी नाळ पक्की होती. मनोहर म्हैसाळकरांमुळे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीतही होतो. साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडणुका लढवण्यात म्हैसाळकर यांच्यामुळे सक्रिय सहभागही असायचा. नारायण सुर्वे, अरुण साधू, ह. मो. मराठे, मारुती चितमपल्ली प्रभृतींच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीतल्या उलाढालीत होतो. त्यामुळे साहित्य संस्थांत चालणाऱ्या राजकारण आणि कारभारांचे बारकावे चांगले अवगत झाले होते. याच काळात म्हणजेच १९८८च्या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यवाहपदी ठाले-पाटील निवडून आले, हे माहिती होतं, पण आमची ओळख नव्हती.
१९८८ ते २०२३ अशी सलग ३५ वर्षं ठाले-पाटीलांची मराठवाडा साहित्य परिषदेतली लखलखीत कारकीर्द आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वृत्तसंकलन करत असतांना मुंबईचे अच्युत तारी, पुण्याचे म. श्री. दीक्षित, नागपूरचे अ. ल. लिमये आणि नंतर म्हैसाळकर असे दिग्गज महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांच्या कारभारात सर्वार्थानं ‘कर्ते-धर्ते’ म्हणून प्रदीर्घ काळ होते. त्या नावात ठाले-पाटील यांच्या नावाचा नंतर समावेश झाला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
अचानक एक दिवस, औरंगाबाद ब्युरोला जायला आवडेल का? कारण मराठवाड्यात भविष्यातल्या पूर्णवेळ आवृत्तीसाठीही नेटवर्क तयार करायचं आहे, असं विचारलं गेलं. मुंबईत मी एकटाच राहत होतो. पत्नी आणि कन्या सोबत नसल्यानं तसाही मुंबईला कंटाळलो होतो. त्या दोघींना नागपूरहून औरंगाबादला शिफ्ट करणं सोयीचंही होतं.
शिवाय ब्यूरोच्या प्रमुखपदाचं आकर्षण होतं. सर्व औपचारिकता पार पाडून १० मे ९८ रोजी पुन्हा एकदा म्हणजे जवळजवळ साडेएकवीस वर्षानंतर औरंगाबादला पडाव टाकला. नागपूर आणि मुंबईच्या तुलनेत औरंगाबादला धावपळ मुळीच नव्हती. गोवेकरांच्या भाषेत सांगायचं तर ‘सुशेगात’ जगणं सुरू होतं.
एक दिवस मंगेश पाडगावकरांच्या कार्यक्रमाची बातमी वाचली आणि श्याम देशपांडेसोबत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात जाणं झालं. त्या वेळी ठाले पाटील यांची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाली. लक्षात राहिलं ते त्यांचं खणखणीत आवाजातलं बोलणं. नंतर मसापमधल्या कार्यक्रमांना नियमित जाऊ लागलो. त्याचं एक कारण बाहेरून येणाऱ्या कलावंतांच्या गाठीभेटी होतं. त्यापैकी अनेकांच्या गाठीभेटींत, तर अनेक वर्षांचा खंड पडलेला असे; मग त्यापैकी अनेकांशी मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबत मैफल रंगे. विस्मरणात गेलेलं कथालेखन, स्केचेस काढणं वगैरे पक्षी आठवणींच्या झरोक्यातून डोकावत, पण ते असो. महत्त्वाचं म्हणजे, या काळात कौतिकरावांशी भेटीगाठी वाढल्या.
आ. कृ. वाघमारे जन्मशताब्दी वर्षात एका व्याख्यानासाठीही त्यांनी मला आमंत्रित केलं. एव्हाना साहित्य संस्थांतल्या राजकारणातल्या माझ्या ‘उठाठेवी’ ठाले-पाटलांना चांगल्याच ज्ञात झाल्या. त्यातून एकमेकांशी या संदर्भातल्या खाजगीतल्या बाबींची देवाणघेवाण होऊ लागली.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
साधारण साडेपाच फुटावर उंची, किंचित टक्कल, डोईवरचे केस ना सर्व कुरळे ना सरळ, असे काही, पण चापून चोपून बसवलेले. साधासा पूर्ण बाह्यांचा बुशशर्ट आणि पँट असा ठाले-पाटील नावाच्या या माणसाचा एकंदरीत थाट होता.
अतिशय गरिबीतून ते पुढे आले, मराठीचे प्राध्यापक आहेत, प्रदीर्घ काळ प्राचार्य होते, विद्यापीठाचं कुलगुरूपदही प्रभारी म्हणून काही काळ भूषवलेलं आहे. मराठवाड्यातल्या सर्वांत मोठ्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सांभाळलेला आहे, अशी बरीच माहिती मग मिळत गेली, पण त्यात मला फार काही रस असण्याचा प्रश्नच नव्हता.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकारणात आणि राज्याच्या साहित्य व्यवहारात एव्हाना मराठवाडा साहित्य परिषद म्हणजेच ठाले-पाटील एक निर्णायक ‘मोहरे’ झालेले होते, हे एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. मी पत्रकारितेत आलो, तेव्हा सुरुवातीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवण्यात प्रकाशकाची भूमिका कळीची असे.
नंतर ही सर्व सूत्रं ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकांकडे आली, तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर मुंबई-पुण्याचीच पकड कायम होती. पकड कसली, अध्यक्षपदी कोण हे पुणे-मुंबईकरच ठरवत असत. विदर्भातून म्हैसाळकर आणि मराठवाड्यातून ठाले-पाटील यांनी मुंबई-पुणेकरांचं हे वर्चस्व संपुष्टात आणलं.
महत्त्वाचं म्हणजे म्हैसाळकर आणि ठाले पाटील या दोघांशीही माझे चांगले संबंध निर्माण झाले, तरी साहित्य संस्थांच्या राजकारणात माझी ओळख मात्र म्हैसाळकर यांच्या गोटातला माणूस अशीच राहिली. यातला विरोधाभास म्हणजे दोघांचा समान मित्र असूनही म्हैसाळकर आणि ठाले-पाटील या दोघांत का कोण जाणे, बऱ्यापैकी तीव्र मतभेद होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
ठाले-पाटील बोलण्यानं स्पष्टवक्ते आणि स्वभावानं खमके. कुणालाही शिंगावर घ्यायला न घाबरण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्यात होता. याचा अर्थ मनाला येईल ते बोलून ते मोकळे होणार असं मुळीच नाही. जे काही बोलायचं, त्याबद्दल ते आधी नक्कीच दुसऱ्या बाजूचा विचार बारकाईनं करत असणार, असं माझं निरीक्षण आहे. असं दोन्ही बाजूंनी विचार करून येणारा खमकेपणा ठाम असतो. सहसा त्यात माघार नसते. कुणी अंगावर आलं, तर शिंगावर घेण्याची तयारीही असते.
याचं आणखी एक कारण म्हणजे संस्थात्मक कारभारात कुठले वैयक्तिक हेतू किंवा आर्थिक लाभ अशा व्यक्तीच्या मनालाही शिवलेले नसतात; आर्थिक चारित्र्याच्या बाबतीत त्यांचं नाणं खणखणीत असतं. त्यामुळे असा खमका माणूस एकाच वेळी अंगावर चार तर सोडाच चाळीसही धावून आले, तरी त्यांना शिंगावर घ्यायला डगमगत नाही. अशी माणसं जिजीविषा (Survial Instinct) वृत्तीची असतात.
ठाले-पाटील नेमके याच वृत्तीचे म्हणजे इंग्रजीत त्यासाठी एक चपखल शब्द आहे. ते undeterred आहेत. साहित्यविषयक व्यासपीठावरून सत्ताधाऱ्यांशीही पंगा घेताना ते न डगमगल्याचे दाखले आहेत. साहित्य क्षेत्रातील राजकारणाच्या दालनात कुठला पत्ता किती वेळ दाबून ठेवायचा आणि केव्हा उघड करायचा याचं त्यांचं टायमिंग अचूक आहे. या सर्व गुणांमुळेच गेली सलग ३५ वर्षं ते मसापमध्ये जबाबदारीच्या पदावर उजळपणानं टिकून राहिले आणि महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांच्या राजकारणात ठाले-पाटील एक चलनी नाणं झालं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
ठाले-पाटील आणि म्हैसाळकर यांच्यातली जुगलबंदी खूपच गाजली. ‘लोकसत्ता’नं ती जास्तच गाजवली. त्यात आमचा प्रतिनिधी संदीप देशपांडे याच्या शैलीदार तिरकस लेखनीचा वाटा मोठा होता. ठाले आणि म्हैसाळकर यांच्यातील ‘धुम्मस’ संदीपनं सांगितली, तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक होतो. दोघांच्याही बाजू नीट यायला पाहिजे, हे संदीपला बजावलं. त्याचा काही ठाले-पाटील यांच्याशी थेट संपर्क नव्हता. मी तो घडवून आणला. ‘तुम्हा दोघातला कलगीतुरा आम्ही रंगवणार आहोत, संदीपशी मोकळेपणानं बोलत जा, इकडचा शब्द तिकडं होणार नाही’, ही ग्वाही मी ठाले-पाटील यांना दिली.
इथे उल्लेखनीय म्हणजे म्हैसाळकरांच्या गटातला असूनही माझ्यावर ठाले-पाटील यांनी अविश्वास दाखवला नाही. ठाले-पाटील यांनी भात्यातला एखादा बाण काढावा आणि म्हैसाळकरांनी उत्तर द्यावं, असा तो कलगीतुरा बराच रंगला. (त्या प्रकरणात म्हैसाळकरांनी काही आर्थिक लाभ घेतले असतील, यावर माझा विश्वास अजूनही नाही, पण ते असो.)
नेमक्या याच काळात विश्व मराठी साहित्य संमेलनाची कल्पना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ठाले-पाटील यांनी मांडली. विदर्भ साहित्य संघाच्या महामंडळावरील प्रतिनिधींनी त्या कल्पनेला ठाम विरोध दर्शवला. त्या विरोधाचं नेतृत्व माझा प्रिय मित्र श्रीपाद भालचंद्र जोशी याच्याकडे तर सूत्रधार अर्थातच म्हैसाळकर होते.
मी उघडपणे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या बाजूने भूमिका घेतली. त्यामुळे ठाले-पाटील आणि माझ्यातील मैत्रीचा घरोबा आणखी उबदार झाला. या वादात टोकाची भूमिका घेत विदर्भ साहित्य संघानं अमेरिकेतल्या सॅनहोजे (San Jose) येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. साहित्य संघाचा कुणीही सदस्य त्या संमेलनात सहभागी होणार नाही असं जाहीर करून टाकलं.
एक दिवस ठाले-पाटील यांनी फोनवर बोलतांना ‘सॅन होजेच्या साहित्य संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून येणार का’, अशी पृच्छा केली आणि मी तत्काळ होकार दर्शवला. एवढंच नाहीतर विदर्भ साहित्य संघाच्या व्यासपीठावर जाऊन या संमेलनात मी सहभागी होत असल्याचं जाहीर करून टाकलं आणि इकडे साहित्य संमेलनाला येईल, पण काही उणंदुणं वाटलं तर टीका करण्याचा पत्रकार म्हणून असलेला माझा अधिकार कायम राहील, हेही ठाले-पाटील यांनी सांगून टाकलं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या सर्वच संदर्भात ठाले-पाटील यांनी एका मुलाखतीत विस्तृतपणे प्रतिपादन केलेलं आहे. ते जिज्ञासूंनी नक्की ऐकावं. एक मात्र मान्य करायलाच हवं विदर्भ साहित्य संघ आणि माध्यमांनी टीका करुनही ठाले-पाटील मुळीच डगमगले नाहीत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा अधिकृत उपक्रम म्हणून त्यांनी विश्व साहित्य संमेलनं पुढेही घेतली.
साधारण ८०च्या दशकापासून मराठी साहित्यातील ‘साडेतीन टक्क्यां’च्या चिरेबंदी मिरासदरीला तडे जाण्यास सुरुवात झाली. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला साडेतीन टक्के संस्कृतीच्या मगरमिठीतून मुक्त करत दलित आणि ग्रामीण साहित्यानं एक सशक्त वेगळा प्रवाह निर्माण केला. त्यामुळे मराठी साहित्याला एक वेगळं परिमाण लाभलं, वास्तवाचं तीक्ष्ण भान आलं. प्रस्थापित मराठी साहित्याला हे आव्हान पचवणं जरा कठीणच गेलं, पण साहित्याचा प्रवाह तर त्यामुळे अधिक व्यापक आणि खळाळता झाला यात शंकाच नाही. त्यातून विद्रोहाचे टणत्कार ऐकू येऊ लागले, तरीही साहित्य संस्था मात्र साडेतीन टक्क्यांच्याच हाती होत्या.
साहित्य संस्थांवरील ही पकड ठाले-पाटील यांनी मराठवाड्यात तर म्हैसाळकर यांनी विदर्भात मोकळी केली. ‘साडेतीन टक्क्यां’च्या बाहेर असणाऱ्या मराठी साहित्यात नवं काही लिहिणाऱ्या, विद्रोह करणाऱ्यांना साहित्य संस्थांचे दरवाजे खुले करणं, हे ठाले पाटील यांचं योगदान कधीही विसरता न येण्यासारखं आहे.
ब्राह्मणी वर्चस्वातून साहित्य संस्थांचा व्यवहार त्यांनी सोडवला आणि सर्वसमावेशक केला. गावोगाव साहित्य संस्थांच्या शाखा उघडल्या आणि त्या शाखांतही नवे सर्व जातीधर्माचे लेखक सामावून घेतले. मराठवाडा लेखिका संमेलन हा उपक्रम सुरू करून मराठवाड्यातील कवयित्री आणि लेखिकांना एक महत्त्वाचं व्यासपीठ ठाले-पाटील यांनी मिळवून दिलं. महात्मा गांधी मिशन या संस्थेनं ‘महात्मा गांधी मराठवाडा भूषण’ या सन्मान देताना ठाले-पाटील यांचं हेच योगदान गृहीत धरलं. ठाले-पाटील उक्तीनं रांगडे वाटू शकतील, पण कृतीनं मात्र एक चतुर संघटक आणि अव्यभिचारी, डोहखोल तळमळीचे साहित्यप्रेमी आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा नक्षीदार आहे आणि नेमका त्यांचा हाच गुण आमच्यातला समान दुवा आहे.
कौतिकराव ठाले-पाटील यांना मी दीर्घायुरोग्य चिंततो.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment