अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या अशा ‘व्यूह-चक्रा’चा जागर सातत्याने, निरंतर आणि मुख्यत: गांभीर्याने व्हायला हवा...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन वैद्य
  • ‘व्यूह-चक्र’चे मुखपृष्ठ
  • Wed , 28 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस व्यूह-चक्र Vyuhchakra आनंद जोशी anand Joshi

डॉ. आनंद जोशी हे विरळा, विद्वान, क्रियाशील व्यासंगी रसिक आहेत. दोन सुवर्णपदकांसह मिळवलेली वैद्यकातली पदव्युत्तर पदवी, तदनंतर जबाबदारीच्या पदावर राहून गेले अर्धशतकभर केलेला वैद्यकीय व्यवसाय, या सर्वार्थाने भरगच्च वाटेलशा आयुष्याला समांतर असे वेगळे सांस्कृतिक सृजनशील आयुष्यही जोशी जगलेत. ते अधिक विलोभनीय आहे. मानवी आयुष्याचे शारीर-मानसिक गुंते आपल्या स्तरावर ते पाहत अनुभवत होतेच, पण जिज्ञासेचा विषय म्हणून बाहेरही त्याचे संदर्भ शोधत, वाचत होते. अशा एखाद्या गूढाचा उलगडा करण्याची, कुणी केलेला समजून घेण्याची, त्यापेक्षा हे समजलेलं तुमच्या-आमच्यापर्यंत पोचवण्याची असोशी जोशींना कार्यरत ठेवत आलेली आहे.

‘हृदयी धरा हा’ (हृदयरोग), ‘एड्सचा भोवरा’, शेखर देशमुख यांच्याबरोबर ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, अशा चाहुलीनंही धडकी भरवणाऱ्या रोगांवरील कमाल सुलभ, संवादी शैलीतले लेखन वा थोड्या बाहेरच्या परिघातलं ‘मेंदूतला माणूस’ (सहलेखन सुबोध जावडेकर) सारखं लेखन त्यांनी केलं, पण याहीपेक्षा वेगळ्या वाटेलशा वाटेवरचे, पण माणूस समजून घेण्याच्या व्यापक प्रक्रियेचाच भाग म्हणता येईलसे त्यांनी केलेले वेगळे लेखन मराठी साहित्यविश्वाने आवर्जून दखल घ्यावी असे आहे.

या शिवाय त्यांचे जागतिक वाङ्मयातील सार्वकालिक महत्त्वाचे साहित्य, त्याचे लेखक आणि त्या लेखनातल्या अभिजाततेचा, वर्षानुवर्षे जगभरच्या वाचणाऱ्या जनमानसावर असलेल्या त्याच्या प्रभावाचा शोध घेणारे शोधप्रकल्पासारखे लेखन दोन अडीच दशकांपूर्वी ‘तपशील’ या अनियतकालिकांतून आले होते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अलीकडे हर्मन मेलविल, त्याची अभिजात कादंबरी ‘मोबी डीक’, तिचा पाश्चात्य जगतातल्या जगण्यात वेगवेगळ्या रूपात उतरलेला प्रभाव, असा तपशीलांचा मोठा पट असणारे लेखन करताना त्यांनी वाचनातले सृजन कशात असते नक्की, मेंदूत वाचनाने काय घडामोडी होतात, बदलते का वाचन माणसाला असा व्यापक वेध घेऊ पाहणारे दोन दीर्घ (‘वाचनाचेनि आधारे’ आणि ‘अक्षर पाविजे निर्धारे’) लेख लिहिले. त्याचे वाचनावरचा जुना पण त्याचे बीज म्हणता येईल, अशा निबंधासह आलेले पुस्तकरूप ‘अक्षर पाविजे निर्धारे’ हा मौलिक ऐवज आहे.

हा थोडा आढावा ज्यानिमित्ताने ते - अगदी आत्ताच आलेले - त्यांचे ‘व्यूह-चक्र’ हे पुस्तक. दै. ‘लोकसत्ते’त बारा-तेरा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या पाक्षिक सदरातले. त्यामुळे अर्थात जागेच्या वृत्तपत्रीय मर्यादेतले, आटोपशीर असे २८ लेख यात आहेत. ‘नेचर’, ‘लॅन्सेट’ यांसारख्या जगभर प्रतिष्ठित नियतकालिकांसह वैद्यकातल्या घडामोडींची अद्ययावत माहिती देणारी जर्नल्स, यापेक्षा अधिक, वेगळी माहिती मिळवण्यासाठी एशियाटिक सोसायटी ग्रंथालयातून आणलेली गलेलठ्ठ पुस्तकं, असा डोलारा लोकलमधून वाहून नेत, पूर्णवेळच्या वैद्यकव्यवसायात सांभाळत त्यातून मुद्दे, तत्संबंधी तपशील मिळवत त्याला अनुभवांची जोड देत केलेले हे लेखन आहे.

‘सांगण्याची उर्मी होती. लिहिल्याने विचारांचे स्फटिक होतात, ते दुसऱ्यांपर्यंत पोचतात, एक वर्तुळ पूर्ण होते’, असं जोशी मनोगतात म्हणालेत. वाचक म्हणून या वर्तुळाचा भाग होणं, हा समृद्ध करणारा अनुभव आहे. मुख्यतः वैद्यक-विज्ञानविश्व आणि सामान्य माणसाच्या आकलन-अभिरूचीच्या कक्षातले विश्व याच्या मधल्या जागेतले हे लेखन पुरेशा गांभीर्याने, भार होणार नाही इतपत तपशीलांसह, तरी अत्यंत वाचनीय, रोजच्या आयुष्यातल्या जिव्हाळ्याच्या विषयांवरचे, मुक्त तरी एका व्यापक सहानुभावी सूत्रात गुंफलेले आहे. मराठी ज्ञानवाहक भाषा आहे, तिने कालांतरात तरी ज्ञानोत्पादक भाषा व्हावे, अशी तळमळ त्यामागे आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

तारुण्यातच बहुविकलांग झालेल्या स्टीफन हॉकिंगने स्वयंप्रज्ञेच्या बळावर जे लिहिले-मांडले, त्यामुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले विज्ञानविश्व वादळून गेले. जोशी पहिल्याच लेखात उल्लेखतात तो हॅसो असा कुणी असामान्य प्रतिभावंत नाही, पण त्याचेही जग ऐन तारुण्यात आलेल्या स्ट्रोकने बिछान्यावरच गोठून गेलेले. पापण्यांची उघडझाप एवढीच शारीरिक हालचाल तो करू शके. या यातनापर्वात वाट्याला आलेले भोग त्याच्यात जिवंत असलेल्या चेतनेला कळत-जाणवत होते. केवळ व्यक्त होण्याच्या हतबल असहाय तरी अदम्य असोशीच्या बळावर, अतिसंवेदनशील संगणक आणि तितकीच सहानुभावी पत्नी यांच्या मदतीने ते सारे त्याने शब्दांत केवळ पापण्यांच्या हालचालींमधून ‘इन दि ब्लिंक ऑफ दि आय’ या त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी आलेल्या पुस्तकात कसे मांडले, त्याची सर्वार्थाने चमत्कारिक वाटेलशी कथा जोशी सांगतात.

पण मानवी मेंदू, त्याच्यातली चेतना, शरीर वेगवेगळ्या निमित्ता-कारणा-प्रकारानं कोमात जातं, मेंदूचे आदेश पाळण्यात असमर्थ होतं, तेव्हा आतल्या चेतनेचं काय होतं, माणसाच्या व्यक्त होण्याची असोशीचं काय होतं, याची विविध अंगाने-संदर्भाने मांडणी करत.

एखाद्या माणसाला लाभलेली असामान्य बुद्धिमत्ता, क्वचित सोबतच असलेल्या मेंदूतल्या विकृती, त्यातून येणारी आत्मघाताची उर्मी, ती कडेस जात नाही, तरी त्यातून आयुष्यभर चिकटून राहणारी विमनस्कता, हे सगळं, त्यामागची असामान्य प्रज्ञा ओळखून, तिच्यासाठी का होईना सांभाळले तर काय होते, हे विटगेस्टाईनच्या निमित्ताने सांगितले आहे.

सर्जनशीलता, कलानिर्मिती आणि मेंदूतल्या अशा ‘वैज्ञानिक दृष्टी’ने असलेल्या विकृती यातला संबध, आणि एकूणच मानसिक आरोग्यासंदर्भातले आपले एक सार्वजनिक चारित्र्य यावर चर्चा करत, ‘काठा’वर उभे असणाऱ्यांना ‘सांभाळून’ घेण्याची गरज जोशी अधोरेखित करतात.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

- रक्ताच्या कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवरची नवी संशोधनं, अशी दीर्घकालीन संशोधनं शासकीय पातळीवर होण्यात असलेल्या मर्यादा, त्यातला औषधकंपन्यांचा - कदाचित अपवादाइतका तरी - मौलिक सहभाग,

- स्त्रीपुरुष समानेतसंदर्भातले वैद्यकीय-वैज्ञानिक दृष्टीकोन, त्यातल्या विषमतेकडे विज्ञान कसे पाहते, तीसह आपण निर्माण केलेले ‘जेंडर डिफरन्सेस’ कमी करत ‘सामाजिक उत्क्रांती’च्या दिशेने कसे जाता येईल,

- आजही भारतासारख्या महाकाय देशांपुढे कायम असलेले मलेरियासारख्या पारंपरिक रोगांचे ओझे कमी करून, ती ऊर्जा निर्मितीक्षम विकासाकडे कशी वळवता येईल,

- युद्ध आणि त्यातल्या अपरिहार्य हिंसेचे सैनिकांवर होणारे दीर्घकालीन मानसिक परिणाम (ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर),

- जन्मतः बहुविकलांग (सेरेब्रल पाल्सी) असलेल्यांच्या मनात असणारी सृजनशीलता अभिव्यक्तीचे रस्ते कसे शोधते,

- ‘थॅलसेमिया’ - हा जनुकीय विकृतींचा समूह - वरील संशोधनाची खडतर दीर्घकालीन वाट चालून तो उपचारांच्या आवाक्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डेव्हिड वेदरॉलसारखे संशोधक,

- महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगावरील संशोधनात हेन्रिएटा लॅक्स या कृष्णवर्णीय (हेही यात महत्त्वाचे होते) महिलेची, वाचतानाही काही क्षण मूक व्हावे अशी, मिटून गेलेली कहाणी...

अशा अनेक वैद्यकीय विषयांचे काही समकालीन संदर्भ घेऊन कायदे, संशोधनं, सामाजिक मानसिकता आणि या सगळ्यांवर असलेली नीतीमत्ता याची व्यापक परिप्रेक्ष्यात चर्चा जोशी करतात, ती वाचावीच अशी आहे.

‘कादंबरीतील नट आणि चित्रपटातील रंग’ यासारखे वैज्ञानिक संदर्भ असलेले तरी अगदी वेगळे, रोचक विषयही यात आहेत. ‘कादंबरी आणि त्यावरचे चित्रपट’ हा नेहमीचा वादविषय या लेखात पार्श्वभूमीला आहे.

जोशी लिहिणे-वाचणे-पाहणे या यातल्या त्रयीकडे आस्वादकाच्या निर्मम भूमिकेतून पाहतात. यातल्या वाचणे आणि पाहणे यात ‘बोधन’ (पर्सेप्शन) आहे, एकूणात समजले जाते, तशा या निष्क्रिय बाबी नाहीत.

‘परसेप्शन मेक्स’ ही इमर्सनची उक्ती उदधृत करत या ‘बोधना’तले मेंदूविज्ञान उलगडण्याचा वेगवेगळी उदाहरणे देत प्रयत्न यात आहे. तरी वाटले, चित्रभाषा प्रभावी कारण त्याला परिणामासाठी त्रिमिती उपलब्ध असते, पण शब्दांनी उभे केलेले चित्र प्रत्यक्षात वाचणाऱ्याच्या कल्पनेने उभे होते. चित्रपट काढावासा वाटतो, तेव्हा तो आधी लेखकाच्या शब्दांनी चित्रकर्त्याच्या डोळ्यांपुढे उभा केलेला असतो, दिग्दर्शकाच्या प्रातिभ नजरेला त्याच्या उणीवा, मर्यादाही जाणवतात, त्या उल्लंघण्याचा प्रयत्न तो करतो. असो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

‘पुरस्कार, उगम आणि उत्क्रांती’ हाही असाच जमून आलेला वेगळीच दृष्टी देणारा लेख. पुरस्कारांचा निसर्गातला उगम आणि पुढे त्याची होत गेलेली उत्क्रांती याचा एक गोफच विणलेला. किती संदर्भ आहेत या छोट्याशा लेखात. कुठल्याही निर्मितीची असोशी ही जैवविज्ञानिक मूलभूत ऊर्मी - बेसिक इंन्स्टिंक्ट - आहे, (कलागुण हा निसर्गाने दिलेला पुरस्कार, त्यासाठी निर्मिती हाच सन्मान, अन्य काही नव्हे, या व्यापक विचारासह) इथपासून ‘कला माणसांना जोडते’, या उक्तीपर्यंतचा प्रवास अनेक संदर्भ, संशोधने, पाहण्या अशा मार्गाने या लेखात होतो, तिला बायोसोशल अर्थात जैवसामाजिक विचारपद्धती असं म्हणतात म्हणे!

‘नैपुण्य आणि लैंगिक निवड’ असा एक संदर्भ यात आहे. नैपुण्य आणि लैंगिक निवड यात अन्योन्य संबंध असतो, हे ठीक. मोठा पिसारा असलेला मोर मादीला अधिक आकृष्ट करतो, तेव्हा त्या मोराचे जनूक अधिक सक्षम, निरोगी, उत्तम असतात हे सिद्ध झालेले. पण तसे कलानैपुण्य असलेल्या माणसाचे जनूकही अधिक निरोगी असते का? नसेल तर हे समीकरण कसे सिद्ध होईल? हे इतके ढोबळ कसे, असे वाटून गेले.

‘नीडहॅम इन्स्टिट्यूट आणि चीन - एक महासत्ता’ या लेखाला जोशींच्या चीनभेटीच्या अनुभवाचा संदर्भ आहे. रोमन साम्राज्य कोसळल्यावर युरोपाचे अनेक देशांत विभाजन झाले, पण ख्रिस्तपूर्व काळापासून चीन मात्र एकसंध होतोय, याकडे जोशी लक्ष वेधतात. वॉस्को द गामाच्या आधी चिनी खलाशांनी सागरसफरी केल्या, पण त्यामागे वसाहतवाद नव्हता, माहीत असलेल्या दूरच्या प्रदेशातही चिनी संस्कृती पोचावी, हा उद्देश होता असंही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

जोशी याला अलीकडच्या चीनच्या घोडदौडीचा आलेख जोडून घेत तिथल्या ‘नीडहॅम रिसर्च इन्स्टिट्यूट’ला भेट देतात. ‘घाई न करता निर्भयपणे आम्ही हे जग जिंकू’ हे तिथल्या एका पाटीवरचे शब्द लेखात शेवटी उदधृत केलेत. त्यात काहीसा कौतुकाचा सूर आहे. पाच हजार वर्षे जुन्या संस्कृतीने हा उद्देश अजून जागता ठेवला आहे, अशा अभिप्रायासह. पण मुळात आजच्या काळात कुठल्याही पुरातन, श्रेष्ठ वगैरे संस्कृतीला जग जिंकण्याची, आपल्या पावलांखाली आणण्याची अभिलाषा असणे, हेच असंस्कृत असे का म्हणू नये? कारण त्यात जगात कायमच असलेल्या सर्व प्रकारच्या वैविध्यांसह असण्याची कांक्षा नाही. असो.

व्यापक विज्ञानाचे संदर्भ असलेले पण थेट जैववैद्यकाशी संबंध नसलेले असेही लेख या पुस्तकात आहेत. ‘सरंजामशाही, गुलामगिरी आणि मानवी हक्क’ यात दुसऱ्यावर हक्क गाजवण्याच्या प्रवृत्तीचा जैवसंदर्भ, तरी त्यातून बाहेर येत सुसंस्कृत होण्याकडे झालेला प्रवास, गुलामगिरी आणि त्याविरुद्ध संघर्ष या दोन्हीचा इतिहास, तंत्रज्ञान आणि मानवी स्वभाव यातला संबंध, मानव्यविद्या आणि इतिहासाचा असायला हवा पण प्रत्यक्षात दुर्मीळ असा नाळेचा संबंध, एकूणच विज्ञानाचे असलेले पुरातन संदर्भ, ऑक्सफर्डने काढलेला सर्वार्थाने ऐतिहासिक असा शब्दार्थसंग्रह (यातले एक उदाहरण- ‘इमिजिएटली’ या शब्दाला इंग्रजीत समानार्थी छटा असलेले तब्बल २६५ शब्द आहेत), त्यासंदर्भाने व्याकरण, बोली-प्रमाण, असा भाषावाद असेही विषय येतात. जोशी त्यात अंमळ जास्त रमतात.

वर्तमानपत्री मर्यादेत विषयाविषयी कुतूहल वाटेल इतपतच रस्ता कापता येतो. त्याचा तपशीलात उलगडा करता येत नाही. अर्थात वाचकांच्या मनातही अनेक प्रश्नांचा जन्म होतो, हे मोठे यश. विस्तृत असते तर सामान्य वाचकांकडून वाचले गेले असते का, हाही पुन्हा प्रश्नच. यात संशोधनं, तांत्रिक-वैज्ञानिक तपशील, आकडेवारी जेवढ्यास तेवढे आहेत, तेही कमाल सुलभ केलेले, पण मुळात तुम्हाला ज्ञान देणे, हा या लेखनामागचा हेतूच नव्हे. त्यामागे सूक्ष्मपणे कार्यरत असणाऱ्या बौद्धिक अहंकारापासूनही जोशी कोसो लांब आहेत. आहे ती जगण्यातील व्यापक नैतिकतेकडे घेऊन जाण्याची ओढ.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

सदर १३ वर्षांपूर्वीचे. तत्कालीन विशेषतः वैज्ञानिक घटना-संशोधनांचे संदर्भ त्याला आहेत, तरी ते तात्कालिक नाही. त्याचा सांगावा नित्यनूतन आहे. ‘ही एक टेहल-टिकोरी’, अर्थात इकडे तिकडे पाहात तपास करणे, बारकाईने पाहात केलेली (पण) स्वैर भटकंती (लगेच, हा दाते-कर्वे शब्दकोशातला अर्थ, असे आवर्जून येते.). हे पोचवणे निरोप्याचे आनंददायी काम, असं जोशी विनयानं म्हणतात, पण ‘निरोप्या’त क्वचित असणारी सृजनशील ऊर्जा जोशींकडे आहे. त्यामुळे हा ‘निरोप्या’ मूळ संदर्भ कानगोष्टींसारखा बदलत, पण सत्यापासून तसूभरही दूर न जाता आपल्या समजुतीचे, शाहणीवेचे रंग त्यात मिसळत, त्याला अर्थवान करतो. मुळातल्या तशा अमूर्त माहितीला काही सांगाव्याकडे घेऊन जातो.

या मौलिक म्हणाव्याशा छोट्याशा पुस्तकाची निर्मिती मात्र ग्रंथालीने ढिसाळपणे केली आहे. मुद्रितशोधनात राहून गेलेल्या असंख्य चुका बासमती तांदळाच्या वासाने दरवळणारा पुलाव खाताना दातात खडे लागावेत तशा खटकतात. काही ठिकाणी दोनदा एकच वाक्य छापले गेले आहे. बाईंडिंगही लगेच निखळतेय. याकडे लक्ष द्यायला हवे होते. ‘अज्ञानाचा अंधार दूर करणारे विचारांचे व्यूह-चक्र, ज्ञान ही त्याची ऊर्जा’ असं शेवटाला येतं. खरं तर अशा ‘व्यूहचक्रा’चा जागर सातत्याने, निरंतर आणि मुख्यत: गांभीर्याने व्हायला हवा.

‘व्यूह-चक्र’ : डॉ. आनंद जोशी | ग्रंथाली, मुंबई | मूल्य : २०० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......