मराठी ग्रंथ संग्रहालय, ग्रंथाली आणि सुनील कर्णिक मित्रपरिवाराच्या वतीने शनिवारी, २४ जून २०२३ रोजी सुनील कर्णिक यांचा पंचाहत्तरीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार निखिल वागळे, श्रीकांत बोजेवार, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, कवयित्री नीरजा, समीक्षक विजय तापस, कवी महेश केळुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘स्वत:खेरीज सर्व काही’ या कर्णिक यांच्यावरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले. त्यातील हा एक लेख...
.................................................................................................................................................................
सुनील कर्णिक म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील, वृत्तपत्र क्षेत्रातील एक मानाचं नाव. कर्णिक सरांची ओळख होऊन आज २५ वर्षांहून अधिक काळ लोटला. कमी बोलणारे पण मोजक्याच शब्दांत भरपूर काही सांगणारे कर्णिक सर आज, २८ जून २०२३ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
माझे मित्र प्रा. राजेंद्र शिंदे १९९५-९६ साली पत्रकारिता करायचे. त्यासाठी त्यांना शोधपत्रकारितेचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा त्याने त्याचे सर्व श्रेय कर्णिक सरांना दिले होते. त्या वेळी त्याने माझी ओळख कर्णिक सरांशी करून दिली. योगायोग असा की, कर्णिक सर कळव्याला राहायचे. त्यांच्या घरापासून काही अंतरावर मी राहायचो. कधी सुट्टीच्या दिवशी, तर कधी रेल्वे स्टेशनवर, तर कधी बस स्टॉपवर आमची भेट व्हायची. त्यांचं साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील नाव, कर्तृत्व ऐकून होतो. त्यामुळे ते समोर आले की, दडपण यायचं. एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण काय बोलायचं, हा प्रश्न पडायचा. ‘काय, कसे आहात? नवीन काय चाललंय?’ हे त्यांचे नेहमीचे प्रश्न असायचे. त्यात आपुलकी, प्रेम असायचं, पण मी मात्र जुजबी उत्तरं देऊन तेथून निसटायचो.
१९९८च्या सुमारास मी जाहिरातींच्या कामासाठी संध्याकाळी माटुंगा येथील दै. ‘महानगर’च्या कार्यालयात जायचो. तिथं सरांची अधूनमधून भेट व्हायची. भेटले की, मी नमस्कार करायचो, तेव्हा ते मंद स्मित करायचे आणि मी लगेच जाहिरात विभागात पळायचो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
२००० साली मला एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. ती गोष्ट मी जाहिरात विभागातील मित्रांना सांगितली. तेथील प्रकाश साळवी हेही कळव्यात राहायचे. त्यांचा माझा दररोज संपर्क यायचा. त्यामुळे साळवींनी प्रेमाने कर्णिक सरांची भेट घालून दिली. सरांनी माझं अभिनंदन केलं. शिष्यवृत्तीविषयीची माहिती जाणून घेतली. निघताना म्हणाले, “आपण बातमी करूया. तुमचं छायाचित्र द्या.” मला वाटलं, सहज बोलले असतील. मी ‘हो’ म्हटलं आणि निघालो...अन् विसरून गेलो. दोन दिवसांनी त्यांनी साळवींकडे छायाचित्राची चौकशी केली, मग मी छायाचित्र दिलं. दुसऱ्या दिवशी छायाचित्रासकट माझी बातमी छापून त्यांनी मला सुखद धक्का दिला.
त्यानंतर त्यांची दै. ‘महानगर’च्या कार्यालयात भेट होऊ लागली. कधी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी भेटी होऊ लागल्या. वेगवेगळ्या साहित्यविषयक गप्पा होऊ लागल्या. कधी कधी सोबत आम्हा दोघांचा मित्र उन्मेष अमृतेही असायचा. काही वेळा सुट्टीच्या दिवशी मी माझ्या मुलांनाही सोबत घेऊन त्यांच्या घरी जायचो.
२००३-०४च्या आसपासचा काळ. माझ्या मोठ्या मुलाला वाचनाची आवड असल्याने तो त्यांच्या घरातील पुस्तके न्याहाळत बसायचा, तर कधी कधी आमच्या गप्पा ऐकत बसायचा. काही कळायचं नाही त्याला. ते त्याचं वयही नव्हतं, तरीही तो शांतपणे ऐकत बसायचा.
खरं तर सर बोलत असायचे आणि आम्ही श्रवण करायचो. पुढे त्याने दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन रुईया महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर त्याला पदवी शिक्षणासाठी ग्रेटर नॉयडा, उत्तर प्रदेश येथील शिव नाडर विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. तिथं त्याने बी.ए. रिसर्च इन सोशियॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षी ‘शिवसेन’वर संशोधनात्मक पेपर लिहिला. तो पेपर वाचण्यासाठी त्याची अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात निवड झाली.
हे सर्व सांगायचं कारण असं की, त्यासाठी कर्णिक सरांनी त्याला प्रकाश अकोलकर यांचं शिवसेनेवरील ‘जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ हे स्वत:कडचं पुस्तक तर दिलंच, शिवाय आणखीही पुस्तकं सुचवली. मार्गदर्शनही केलं. एवढ्यावरच सर थांबले नाहीत, तर त्यांनी अकोलकर सरांचीही भेट घालून दिली. त्यामुळे माझ्या मुलाचा पेपर छान झाला, हे सांगायलाच नको.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
२००५ साली उन्मेष अमृते, मी, समीर जोशी आणि कर्णिक सर अशा आम्ही चौघांनी मिळून दिवाळी अंक काढायचं ठरवलं. या कला विशेषांकाचं नाव ‘मांदियाळी’ असं ठेवलं. संपादक म्हणून आम्ही कर्णिक सरांचं नाव ठरवलं होतं, पण त्यांनी नम्रपणे नकार दिला. उलट ‘माझ्यापेक्षा आणखीन मोठं नाव घ्या’ असं सांगून त्यांनी प्रकाश विश्वासराव यांचं नाव सुचवलं. आम्ही प्रत्यक्ष काम करत असल्यामुळे कार्यकारी संपादक म्हणून माझं व नीतीन रिंढे यांचं नाव टाका, असं त्यांनी सुचवलं. स्वत:चं नाव कुठेही नाही.
उन्मेष आणि सरांनी मिळून अंकाची रूपरेषा ठरवली. मी, समीर आणि सोबतीला साळवी यांना घेऊन जाहिराती बघू लागलो. साळवींचा एक गाळा ठाण्यात होता. तिथं मी आणि समीरने घरचे कॉम्प्युटर आणून काम सुरू केलं. सगळा हौसेचा मामला होता. बसायला फक्त चटई होती. कर्णिक सर दररोज संध्याकाळी यायचे. मांडी घालून खाली चटईवर बसायचे. कामाचा आढावा घ्यायचे. काय काम करायचे ते सांगायचे. आलेले लेख तपासायचे, दुरुस्त्या करायचे. शांतपणे आपलं काम करायचे. कसलाही रुबाब नाही, अंकाचा लेआऊट कसा असावं, मुखपृष्ठ कसं असावं, संपादकीय कसं लिहावं, लेखांची निवड कशी करायची, याचे पाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाले.
दिवाळीचे दिवस जवळ येत होते, तशी आमची धांदल सुरू झाली. एखादी जाहिरात आली नाही वा एखादा लेख आला नाही की, आम्हाला टेंशन यायचं. काय करायचं काही कळायचं नाही. ‘हर दर्द का जालीम इलाज’ कर्णिक सर असायचे. कुठेही चीडचीड नाही, गडबड नाही. शांतपणे, हळूवारपणे ते उपाय सांगायचे. आम्ही त्या पाच-सहा महिन्यांत खूप चुका केल्या, तरीही त्यांनी आम्हाला समजून घेऊन मार्गदर्शन केलं. आमचं ते पहिलंच वर्ष शेवटचं ठरलं. पुन्हा आम्ही त्या वाटेला गेलो नाही. मात्र त्या वर्षी आमच्या ‘मांदियाळी’ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे दोन पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संपादन म्हणजे सुनील कर्णिक हे सांगायलाच नको.
वर्ष नक्की आठवत नाही, पण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दै. ‘महानगर’ने विशेषांक काढायचा ठरवलं. कर्णिक सरांनी मला ज्यांनी भारताची सिमारेषा आखली होती, त्या सिरील रॅडक्लिफ यांच्यावर लेख लिहायला सांगितला. सोबत संदर्भासाठी एका इंग्रजी वृत्तपत्राचं कात्रणही दिलं होतं. मीही ऐटीत ‘हो, लिहून देतो’ असं सांगितलं. लेख लिहून दिला. सात-आठ दिवस झाले. मीही पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे कार्यालयीन कामात व्यस्त होतो. त्यामुळे त्यांना भेटता आलं नाही. लेख कसा झालाय, हे पाहण्यासाठी १५ ऑगस्टला उत्साहानं अंक विकत घेतला. पाहतो तर काय, त्यात माझा लेखच नव्हता. मग मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी लेख कसा असावा, त्यातला मजकूर कसा लिहावा, सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा, असे अनेक बारकावे समजावून सांगितले.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
कर्णिक सरांचं एक वैशिष्ट्य आहे- ते लेख वाचल्यानंतर हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, असं सांगून समोरच्या व्यक्तीला दुखवत नाहीत, तर यात अजून अशी अशी माहिती हवी, अशा अशा प्रकारे लिहिलं, तर ते अधिक वाचनीय होईल, असं सकारात्मकरित्या समजावून सांगून समोरच्या व्यक्तीकडून लिहून घेतात, प्रोत्साहन देतात.
आणखी एक घटना सांगायला हवी. त्यांनी मला २०११ साली ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकासाठी ‘न्यू हनुमान थिएटर’वर लेख लिहिणार का म्हणून विचारलं, तेव्हा मी काळजीपूर्वक विचार करून ‘हो’ सांगितलं. पहिला अनुभव पाठीशी असल्यानं मेहनत घ्यायची आणि त्यांच्या पसंतीला उतरेपर्यंत परत परत लिहायचं मनोमन ठरवलं. न्यु हनुमान थिएटरचे मालक मधुकर नेराळे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून लेख लिहिला, पण त्यांच्याकडून फक्त इतिहास मिळाला होता. सरांना वाचायला दिला. त्यांचं समाधान झालं नाही. “लेख वाचनीय व्हायचा असेल, तर त्यात गमतीदार किस्से हवेत, महत्त्वपूर्ण घटना हव्यात, त्याचा शोध घ्या. सापडतील तुम्हाला. आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत”, असं सरांनी सांगितलं.
लालबाग, परळ, अभ्युदय नगर या भागात तीन-चार महिने फिरलो. अनेकांना भेटलो. त्यांच्याकडून माहिती घेतली, पण हवी तशी माहिती काही हाती लागत नव्हती. पाच-सहा वेळा लिहून त्यांना दाखवलं. शेवटी कंटाळून लिहायचा नाद सोडून द्यावा, इथवर येऊन पोहाचलो असताना, परळच्या एका मित्राचा फोन आला. त्याने मला भेटायला बोलावलं आणि माझी दोन व्यक्तींशी भेट घालून दिली. त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळाल्या, त्या लेखात घेतल्या आणि कर्णिक सरांना तो वाचायला दिला. त्यांची प्रतिक्रिया काय येते, याची वाट पाहतो, तर त्यांनी आवडल्याचं सांगितलं. अशा प्रकारे लेख छापून आला. ‘त्या लेखाचं सर्व श्रेय तुमचं आहे सर’ असं सांगितलं, तर ते फक्त हसले आणि म्हणाले, ‘आता नवीन विषय घ्या’. त्यांच्याकडे जाऊन बसलो की, जादूगार जसा वेगवेगळ्या असंख्य गोष्टी पोतडीतून काढतो, तसे ते एकेक करत २०-२५ विषय सहज सुचवतात.
मुंबईतील चोरबाजार हा माझा आवडीचा विषय. वेळ मिळेल तेव्हा मी तिथं जाऊन येतो. काही दुर्मिळ पुस्तकं, रेकॉर्ड मिळाली की, घेऊन येतो, हे सरांना माहीत होतं. गप्पांच्या ओघात त्यांना सांगायचो. मला चित्रपट, संगीत, नाटक यांची आवड असल्याने त्या संदर्भातील पुस्तके मी वाचतो. विकत घेतो. सरांकडे त्याविषयीची पुस्तकं आली, तर ते मला आवर्जून देत. आता ते तळेगावला राहायला गेल्यामुळे आमच्या भेटीगाठी थांबल्यात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
सरांचं वैशिष्टय असं की, ते सर्व शांतपणे ऐकून घ्यायचे आणि मग हळूच बोलायचे. आता तुम्ही मला ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या गोष्टी लिहून काढा. मी काही लेखक नाही, असं मी त्यांना म्हणालो, तर म्हणाले “चांगला विषय आहे. तुम्ही आधी लिहून तर काढा. मग बघू त्यात काय सुधारणा करायच्या त्या” आणि त्यांनी पाठपुरावा करून माझ्याकडून लिहून घेतलं. त्यात काही सुधारणा करायला सांगितल्या. तशा मी त्या करून दिल्या आणि त्यांनी तो लेख ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध केला. मी काही लेखक नाही, पण त्यांच्यामुळे थोडं फार लेखन करू लागलो.
आता मी एका राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेल्या नामवंत व्यक्तीच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर लेखन करत आहे. त्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य, पुस्तकं कशी मिळवायची, त्या व्यक्तीची, तिच्या बरोबर कामं केलेली, त्यांच्या संपर्कात आलेली माणसं, या सगळ्यांच्या मुलाखती कशा प्रकारे घ्यायच्या, प्रसंगातील वातावरण निर्मिती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इ. अशा त्यांनी केलेल्या असंख्य लहान-मोठ्या सूचनांचा उपयोग मला लेखन करताना होत आहे.
केलेल्या लेखनाची प्रत त्यांना वाचायला दिल्यावर त्यांनी सांगितलेल्या मौलिक सुधारणा करत आहे, असं म्हणण्यापेक्षा कर्णिक सर माझ्याकडून लेखन करून घेत आहेत. ‘हे लेखन तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीचा विषय असल्याने तुम्ही तो नक्की पूर्ण कराल’, असं सांगून सरांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला.
................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा -
जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. ते आता भ्रमंतीला निघाले असतील
................................................................................................................................................................
‘नवशक्ति’, ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘महानगर’, अशी विविध नामवंत वृत्तपत्रं; मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मौज प्रकाशन गृह, मॅजेस्टिक प्रकाशन, अशा संस्था यांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या गाठीशी संपादनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळेच त्यांना विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत, श्री. पु. भागवत, भाऊ पाध्ये, राम पटवर्धन अशा नामवंतांचा सहवास लाभला. त्यांचं प्रेम मिळालं. त्यांच्याकडून शिकायला मिळालं.
‘राजारामशास्त्री भागवत यांचे समग्र वाङ्मय’च्या संपादनासाठी दुर्गाबाईंना कर्णिक सरांनी खूपच मदत केली. तेव्हापासून दुर्गाबाईंनी सरांवर शेवटपर्यंत पुत्रवत प्रेम केलं. दुर्गाबाईंचे ते मानसपुत्र होते.
असे हे हळूवार, शांतपणे बोलणारे कर्णिक सर स्वतःच्या हळू बोलण्याविषयी सांगतात- “श्री. पु. भागवतांकडून मी संथ बोलण्याची कला व विचारी चर्या आत्मसात केली.” श्रीपुंचा त्यांना सहवास लाभला. इतरही अनेकांकडून ते शिकत गेले, आत्मसात करत गेले. ते सर्व स्वत:कडे न ठेवता, विद्यादानातून तरुण पिढीला वाटत गेले, नवीन पिढी घडवत गेले.
आता उर्वरित पुढील २५ वर्षातही असंच लाखमोलाचं काम त्यांच्या हातून होवो, यासाठी या मितभाषी साक्षेपी संपादकाला लाख लाख शुभेच्छा आणि मानाचा मुजरा...!
‘स्वत:खेरीज सर्व काही : सुनील कर्णिक @ ७५’ - संपादन - प्रवीण धोपट, डॉ. कृष्णा नाईक, मंगेश सातपुते,
पाने - १४४, मूल्य - दिलेले नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment