जग हे परिवर्तनशील आहे. जे आज आहे ते उद्या नसणार आहे. हे शाश्वत सत्य असलं तरी जीवन-मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी मोक्षप्राप्तीचे अनेक प्रयोग माणूस आयुष्यभर करत असतो. तर दुसरीकडे कायद्याने हा गुन्हा असला तरीही, आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेण्याच्या घटनांमध्ये पराकोटीची वाढ होताना आपल्याला दिसत आहे. देशात २०२१ या वर्षात एक लाख ६४ हजार ३३ इतक्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात (२२२०७१३.५) झाल्या आहेत.
मी इयत्ता सहावीमध्ये असताना आमच्या शेजारील एका माणसाने पंख्याला दोर बांधून आत्महत्या केली होती. आरडाओरड झाली. सगळे लोक जमा झाले. त्या माणसाचे डोळे बाहेर आले होते. गळ्याला दोरीचे गडद व्रण स्पष्ट दिसत होते. मी स्वतः त्या गर्दीत उभा राहून ते विषण्ण दृश्य बघत होतो. सुदैवाने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचा श्वासोच्छवास थोडा सुरू होता. तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण दोन दिवसानंतर त्याचा श्वास कायमचा बंद झाला होता. लोकांच्या चर्चा कानावर पडत होत्या. त्या माणसाचे एका स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. बायकोला हे माहीत झाल्यापासून ती रोज त्याच्या मागे भूणभूण लावत असे. अखेर या रोजच्या त्रासाला कंटाळून त्या माणसाने तीन लहान पोरं मागे ठेवून स्वतःला संपवलं. आत्महत्या आणि आत्महत्येची कारणे यांचा परिचय पहिल्यांदाच मला झाला.
त्यानंतर २०१४-२०१५ या एका वर्षात आमच्या सांताक्रूझ पूर्व, कालिना विभागात वय वर्षे १७ ते ३७ वयोगटातील जवळजवळ ११ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे पाऊल उचलायला प्रत्येकाची वेगवेगळी कारणं होती. कुणाला परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून, कुणाचा प्रेमभंग झाला म्हणून, कुणी कर्जबाजारी झालं म्हणून, कुणी नशेच्या आहारी गेले म्हणून, तर कुणी किरकोळ भांडणावरून...
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आत्महत्या करणारे किंवा त्यांचे कुटुंब यांपैकी कुणी न कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझ्या परिचयाचे होते. माझ्याच विभागातलं हे मृत्यूचं तांडव बघून मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. उत्तरं सापडत नव्हती, पण समस्या गंभीर आहे, हे काही मनातून जात नव्हतं.
मग काही दिवसांनी विचार विनिमय करून प्रबोधन ‘युवा संघ’ या स्थानिक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बुद्ध जयंतीनिमित्त डॉ. निलेश मंडलेचा यांचं ‘आत्महत्या’ या विषयावर व्याख्यान ठेवलं आणि माझ्या मनातील कल्पनेला आकार येऊ लागला.
माझं व्यक्त होण्याचं साधन नाटकच आहे. आजवर बऱ्याच सामाजिक विषयांवर मी नाटकातूनच व्यक्त झालोय. कारण माझ्या मते, नाट्यकलाकृती हा समाजाचा आरसा आहे. त्यात प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याची सर्जनशीलता आहे. त्यामुळे नाटकाच्या माध्यमातूनच मी अधिक प्रभावीपणे या विषयाला निदान स्पर्श करून प्रबोधनाची भूमिका साध्य करू शकतो, याची मला संपूर्ण खात्री झाली आणि अशा प्रकारे मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या ‘बी पॉझिटिव्ह’ या नाटकाचा जन्म झाला.
नाटक लिहून झालं, पण ते बराच काळ कागदावरच राहिलं. कारण प्रयोग करायचा म्हणजे आर्थिक गणितं आली आणि तिथेच नेमकी माघार घ्यावी लागली. २०१९मध्ये करोना काळात तर लोक एक प्रकारे नजरकैदेतच होते. एरवी गजबजलेले रस्तेही शांत होते. अनेकांचा रोजगार बुडाला होता. अशा भयाण परिस्थितीत आपली नोकरी वाचवायला लोक कालिना ते सांताक्रूझ / कुर्ला रेल्वे स्टेशन येथे चालत जायचे. कारण बस सेवा बंद होत्या. एखादी बस सोडली जायची, त्यात तुडुंब गर्दी असायची. त्यामुळे पायी प्रवास करत लोक पोटाची खळगी भरण्यासाठी निघून जायचे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
या रोजच्या मरणयातनेला कंटाळून प्रथमेश नावाच्या माझ्या मित्राच्या सहनशीलतेचा बांध फुटला. त्याने एके दिवशी दारूच्या नशेत रात्री साडेबारा वाजता मला फोन केला आणि या व्यवस्थेवरचा असंतोष भडाभडा व्यक्त केला. एक तासाच्या संभाषणात फिरून फिरून एकच गोष्ट होती की, बस आपल्या स्टॉपवर थांबत नाही आणि आम्हाला रिक्षाने जाणं परवडत नाही. त्यात कामावर पोहोचायला जर उशीर झाला की, साहेबांचा ओरडा आहेच. दांडी झाली तर कामावरून काढण्याची भीती... आपण मोर्चा काढू या, रस्ता जाम करू या, आणखीन बसेस सोडायला सांगू या... मी त्याला शांत केलं. म्हटलं, आपण भेटून ठरवूया, नक्कीच यावर काहीतरी उपाय काढू या. दुसऱ्या दिवशी त्याने ट्रेन खाली आत्महत्या केल्याची बातमी आली.
काल माझ्याशी बोलणारा माणूस आज हे जग सोडून जातो, विश्वासच बसत नव्हता. एक दिवस त्याने वाट का पाहिली नाही, याची खंत मला आजही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमचा संवादच तुटला होता आणि हा संवाद शेवटचा ठरला.
त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला भेटलो, मुलांना भेटलो, घरचा तो कर्ता पुरुष होता. आता कुटुंबाचा डोलारा कोण सांभाळेल? कारण त्याची पत्नी अशिक्षित असून सतत आजारी असते. शिवाय पदरात दोन मुलं आहेत- एक पाचवीला आणि एक सातवीला. त्यांच्या शिक्षणाचं कसं होईल? अशा बऱ्याच प्रश्नांचा कल्लोळ मनामध्ये सुरू होता. जाणारा माणूस जातो, पण मागे त्याच्या कुटुंबाची काय फरफट होते, याची आपण कल्पनाच करू शकत नाही.
नकारात्मकतेवर मात
अशा बऱ्याच वास्तववादी गोष्टींचं गाठोड संचित करून ‘बी पॉझिटिव्ह’ या नाटकाची संहिता आकार घेत होती. नाटकाचे वाचन माझ्या काही निवडक नाट्यकर्मी कलाकार मित्रांसोबत करण्यात आलं. काहींना संवाद आवडले, पण कथा आवडली नाही, काहींना कथा आवडली, पण त्यात नाट्य दिसत नव्हतं, काहींनी तर एवढा जड विषय लोकांना कळेल की नाही, याची शाश्वती नसल्यामुळे नाटकात अभिनय करायलाही टाळाटाळ केली. या वेळी मी खरोखच खूप वाईट नाटक लिहिलंय या जाणिवेतून हे नाटक नकोच करायला या निर्णयावर पोहोचलो. पण माझे काही सहकलाकार जे माझ्या लिखाणाशी आणि माझ्या दिग्दर्शनाशी परिचित आहेत त्यांनी म्हटलं, ‘अरे, नाटकाचं नाव ‘बी पॉझिटिव्ह’ आणि तू निगेटिव्ह विचार काय करतोस?’ बस या एका वाक्याने मनाला उभारी आली. माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणित झाला. ज्या काही सूचना मित्रमंडळींकडून, रसिक प्रेक्षकांकडून येतील त्याप्रमाणे अनुरूप असा काही लहान सहान बदल करू, पण नाटक करू...
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
एका मित्राच्या सांगण्यानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र स्पर्धेत भाग घ्यायचं ठरलं. पण तालमीसाठी पैसे नव्हते. मग अशा परिस्थितीत मित्रांनी त्यांच्या कार्यालयात जागा दिली. काहींनी तर तालमीसाठी जागा बुक करायला पैसे दिले. सामाजिक चळवळीतील माझे मित्र, सहकारी या सर्वांनी मला या नाटकासाठी पुष्कळ सहकार्य केले. त्या सगळ्यांची नावं इथं नमूद करणं शक्य नाही, पण माझ्या हृदयात त्यांच्याविषयी नितांत आदर कायम राहील.
म्हणतात ना, इच्छाशक्ती असली की, सर्व शक्य होतं. जिथे जागा मिळेल तिथे तालमीला सुरुवात केली अगदी अडगळीच्या जागेत, धुळवटलेल्या जागेतसुद्धा माझ्या टीमने स्वतः जागेची साफसफाई करत तालीम केली. तालमीत लागणारा चहा-पाण्याचा खर्चही स्वतः कलाकार आपल्या खिशातून आळीपाळीने करू लागले.
आता हे नाटक माझं एकट्याचं राहिलं नव्हतं. प्रत्येकाला ते आपलं वाटत होतं. माझ्या सर्व टीमने आपली नोकरी सांभाळत नाटकासाठी प्रचंड मेहनत घेतली. एकदा तालीम सुरू असताना माझा सहकलाकार विजय अचानक रडू लागला. आम्ही तालीम थांबवली, तो शांत झाल्यावर त्याने माफी मागितली आणि रडण्याचं कारण सांगितलं. त्याच्या मोठ्या भावाने एका वर्षापूर्वीच आत्महत्या केली होती. ‘तुझ्या जाण्याने तुझ्या आई-वडिलांना काय वाटेल? नातेवाईकांना, मित्रमंडळींना काय वाटेल? ते सहन करतील तुझं हे असं मरण...’ हे संवाद म्हणत असताना त्याला त्याचा भाऊ समोर उभा दिसला आणि अश्रू अनावर झाले... आम्ही सगळेच निशब्द! आता कलाकार म्हणून आमची जबाबदारी आणखीनच वाढली, एवढं मात्र नक्की.
बदल घडवणारा नाट्यप्रयोग
नाटकाच्या प्रयोगाची जाहिरात पेपरमध्ये दिली, तेव्हा जाहिरात वाचून अमोल नावाच्या तरुणाने डोंबिवलीहून फोन केला. नाटक आहे की वर्कशॉप आहे, अशी चौकशी केली. मला यायला आवडलं असतं, पण मला जमेल की नाही, हे सांगू शकत नाही, कारण मी स्वतः काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझी मानसिक स्थिती बरोबर नाही, मी घराच्या बाहेर पडलो की, भीती वाटते, पुन्हा घरात जातो आणि स्वतःला घरात कोंडून घेतो. त्यामुळे डोंबिवलीहून वरळीला येणं शक्य होईल की नाही सांगवत नाही, असं म्हणत पुन्हा अस्वस्थ झाला.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
त्यानंतर आम्ही ठरवलं आपल्या नाटकाचा प्रयोग नाट्यगृहापुरता मर्यादित न ठेवता समाज मंदिर, बालवाडी, शाळा, कॉलेज प्रत्येक वस्त्यांमध्ये झाला पाहिजे, हा विचार घेऊन प्रचार सुरू केला. कार्यकर्ते, सामाजिक संस्था, मंडळांपर्यंत निरोप पोहोचवले की, मानधनाची पर्वा करू नका, प्रयोगाचं आयोजन करा. या सर्व धावपळीत अखेर तो दिवस उजाडला. स्पर्धा झाली आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र ६८व्या नाट्य महोत्सवात प्राथमिक फेरीत आम्ही तब्बल पाच पारितोषिकं पटकावली-
१) उत्कृष्ट नाटक (द्वितीय क्रमांक),
२) उत्कृष्ट दिग्दर्शक (प्रथम क्रमांक)
३) उत्कृष्ट अभिनेत्री (द्वितीय क्रमांक)
४) उत्कृष्ट प्रकाशयोजना (द्वितीय क्रमांक)
५) उत्कृष्ट अभिनय (उत्तेजनार्थ)
तसेच अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयाची दोन पारितोषिके या नाटकाला मिळाली. लोकांनी स्तुतिसुमने उधळली, अभिनंदनाचा वर्षावही केला, परंतु प्रयोगाचं सादरीकरण करण्याचं प्रयोजन मात्र झालं नाही. हे नाटक स्वतःची पाठ थोपटण्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. तर प्रयोगानंतर प्रेक्षकांमध्ये उत्स्फूर्तपणे होणाऱ्या चर्चा, त्यांचे स्वतःचे वैयक्तिक अनुभव यांची गोळाबेरीज करून आत्महत्येच्या घटना काही प्रमाणात का होईना रोखण्यासाठी एक नवं पाऊल उचलता येईल का, ही प्रामाणिक तळमळ होती.
काही दिवसांनी आंबेडकर जयंतीनिमित्त नेरूळच्या बुद्ध विहारात चंदू जगताप आणि राम झेंडे या कार्यकर्त्यांनी प्रयोगाचे आयोजन केले. त्याला आपल्या नाटकातील अभिनेत्री संध्या पानस्करची कार्यालयीन सहकारी रमा, जी आमच्या नाटकात बॅकस्टेजला मदत करत होती, ती आपल्या पतीला सोबत घेऊन आली होती. पहिल्या अंकातच तिचा पती अस्वस्थ झाला. मनाची चलबिचल सुरू झाली. त्याने रमाला फोन केला, मी निघालो, मला त्रास होतोय. तिने फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी तिने संध्याकडे फोन दिला. प्रयोग चालू असताना मध्येच संध्याने रमाच्या पतीशी संवाद साधला. त्याला संपूर्ण नाटक बघण्याची विनंती केली. त्यानेही पराकोटीच्या प्रयत्नांनंतर मान राखला आणि शेवटपर्यंत थांबला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या सर्व मनस्तापाचं कारण कधीतरी त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात तो वाचला, म्हणून नाटक पाहताना तो स्वतःला ‘कनेक्ट’ करत होता. नाटक पूर्ण पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे नाटक मी अगोदरच पाहायला हवं होतं, असे उद्गार त्याने काढले. दोन दिवस नाटकाविषयी तो रमासोबत सतत चर्चा करत होता. त्याच्या मनात ‘पॉझिटिव्ह’ विचार पेरण्यात नाटक यशस्वी झालं, याचं समाधान आम्हाला मिळालं.
बघता बघता या नाटकाचे तीन प्रयोग झाले, अगदी विनामूल्य प्रेक्षक तसे फार काही नव्हते, पण जे होते त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. त्यातील काही प्रेक्षकांच्या निवडक प्रतिक्रिया मला जाणीवपूर्वक अधोरेखित कराव्याशा वाटतात-
१) मानवी नैराश्येतून आणि वेदनेच्या ढिगाऱ्यातून स्वयंप्रकाशाकडे मार्गक्रमणाचा संदेश देणारा नाट्यप्रयोग.
२) अनेक वर्षांपासून लोप पावत चाललेल्या माझ्यातल्या नाट्य रसिकास पुन्हा रंगभूमीकडे वळण्याची किमया साधणाऱ्या ‘बी पॉझिटिव्ह’ टीमचे त्रिवार अभिनंदन.
३) पप्पा उगाच का मरायचं, आपल्यासाठी जगलं पाहिजे ना.... (एक आठ वर्षाची लहान मुलगी)
४) आपण हाताळत असलेला विषय खूप मोठा आहे. दोन तासात बसवणं शक्यच नाही. तरीही तुमचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
५) नाटकातला शेवट अविस्मरणीय आणि लक्षात राहण्यासारखा होता. खरंच या नाटकाने आपल्याला आयुष्यात दुःख असताना, कसं ‘पॉझिटिव्ह’ जगायचं हे शिकवलं.
६) महत्त्वाचे विषय ‘हायलाइट’ केलेत. सगळ्यांच्या भूमिका कमाल होत्या. नाटक पुन्हा बघायला आवडेल.
७) अत्यंत बोधप्रद नाटक. एक वास्तव डोळ्यासमोर उभं राहिलं. नैराश्याचा सामना करायला बळ देणारं नाटक. जेव्हा कोरोनामध्ये पप्पा मला आणि मम्मीला अचानक सोडून गेले, तेव्हा खूप मोठा धक्का बसला. त्यातून सावरणे कठीणच होते. नाटकातील मुख्य गाभा म्हणजे या जगात आता आपलं कोणी नाही, हा विचार डोक्यात सुरू होतो आणि मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. आयुष्यातला हा एकटेपणाच घातक असतो. आपली प्रिय व्यक्ती आपल्या सोबत नाही. आता जगण्यात काय अर्थ म्हणत आत्महत्येचे विचार नकळत जिवंत होतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
सम्यक दृष्टीची दिशा
जगात दुःख सर्वांनाच आहे, वेदना सर्वांनाच आहे मुळात माणसाचा जन्म हा वेदनेतूनच होतो, हे त्रिवार सत्य आहे. आणि सत्य स्वीकारलं की दुःख कमी होतं. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते! जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची ही सम्यकदृष्टी या नाटकाने माझ्या मम्मीला व मला दिली. कसदार अभिनयातून उत्कृष्ट लेखनातून हे नाटक रंगमंचावरून थेट हृदयाशी कनेक्ट होतं.
एका मैत्रिणीने तर स्टेटसवर नाटकाचे फोटो ठेवले आणि नाटकाच्या आशयासहित इतरांपर्यंत फॉरवर्ड केले. हे नाटक सगळ्यांनी आवर्जून पहायला हवं, अशी विनंती ती सगळ्यांना करत होती. कारण नाटक पाहिल्यावर तिला तिचा चुलत भाऊ डोळ्यांसमोर उभा दिसला. सोळा वर्षांचा मुलगा शेतात क्रिकेट खेळताना बाद नाबादवरून बाद निर्माण झाला. मी बाद नसतानाही बाद दिल्यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. त्याने शेतात असलेलं कीटकनाशक खायची धमकी दिली. पण त्याच्या धमकीला किंवा त्याच्या भावनेला त्याच्या मित्रांनी समजून न घेता थट्टा उडवली. त्याने रागाने ते कीटकनाशक घटाघटा प्यायलं. दोन तासात सोळा वर्षांच्या तरुणाचा जीव गेला. सुट्टीत गावी गेला होता. गावी गेला तो परत आलाच नाही...
खरं म्हणजे हा विषय अत्यंत खोल आहे. या विषयावर बरीच नाटकं, बरीच पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. जे होऊन गेलं ते रोखणं आपल्या हातात नसतं, पण यापुढे जे होऊ नये ते रोखण्यासाठी एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून माझे योगदान काय असणार आहे? या प्रांजळ नेणिवेतून हा नाट्य प्रपंच माझ्या यथाशक्तीने करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..............................................................................................................................................................
एकटेपणाची भावना जीवघेणी असते, म्हणून 'संवाद अखंड सुरू असलाच पाहिजे, कारण संवादातून अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळतात. या दोन अंकी नाटकाच्या समाप्तीनंतर तिसरा अंक सुरू होतो तो प्रेक्षकांचा... बऱ्याच गोष्टी नाटकाच्या निमित्ताने लोक मोकळेपणाने मांडतात. खरोखरच हे माझ्यासाठी ‘पॉझिटिव्ह’ आहे.
असे प्रबोधनपर नाट्याविष्कार जोवर जनमानसात पोहोचणार नाहीत, तोपर्यंत कलाकृतीचं यश अपूर्णच. कारण तुमच्याकडे कितीही कौशल्य असलं तरीसुद्धा तुम्हाला जर त्याचा योग्य प्रचार आणि प्रसार करता आला नाही, तर कालांतराने त्या कलाकृतीला आत्महत्या करावी लागते...
‘बी पॉझिटिव्ह’ हे केवळ नाटक नसून विचार आहे आणि विचार कसाही कुठेही स्वैरपणे पोहोचू शकतो. विचार माणसाला एकमेकांशी ‘कनेक्ट’ करू शकतो, ही पॉझिटिव्ह भावना अजूनही माझ्या मनात टिकून आहे.
‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या जून २०२३च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment