अजूनकाही
भारतीय आधुनिक रंगभूमीचे चार शिलेदार मानले जातात - बादल सरकार (बंगाली), गिरीश कार्नाड (कन्नड), मोहन राकेश (हिंदी) आणि विजय तेंडुलकर (मराठी). बादल सरकारांनी ‘तिसरी रंगभूमी’ ही संकल्पना मांडून नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर पुसणारे विविध प्रयोग केले. अशा या बादल सरकार आणि त्यांच्या तिसरी रंगभूमीची ओळख करून देणारे ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ हे पुस्तक अविनाश कदम यांनी लिहिले आहे. नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
काही वर्षांपूर्वी छबिलदासच्या प्रायोगिक नाट्यगृहात बादल सरकार यांच्या नाटकांचा एक महोत्सव आयोजित केला गेला होता. नाट्यप्रयोगानंतर होणाऱ्या चर्चेमध्ये मी बादलबाबूंना विचारले ‘तुम्ही तुमच्या तिसऱ्या रंगभूमीवरील नाटकांसाठी नटांची निवड कशी करता?’ त्यावर बादलदा म्हणाले होते, “मी नाटकातून जे मांडू पाहतोय, त्याच्याशी सहमत असणाऱ्यांचीच मी निवड करतो. त्याची नटपणाची कुशलता ही नंतरची गोष्ट आहे... माझ्या नाटकातील कलावंतांनाही तेच म्हणायचं असेल तरच ते प्रभावी होऊ शकतील.”
अविनाश कदम यांचं ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ हे पुस्तक पाहिल्यानंतर वरील विधानाची तीव्रतेने आठवण झाली. या पुस्तकाने त्यांनी नाट्यसाहित्यातील एक त्रुटी भरून काढली आहे.
कमानी रंगमंच नाकारणारे बादलदा आणि त्यांच्या तिसऱ्या रंगभूमीची संकल्पना समजून घ्यायची असेल, तर अगोदर कमानी रंगमंचावर होणारी नाटकं, शहरी आणि ग्रामीण नाटकांचा स्वभावधर्म परिचित व्हायला हवा. आणि त्याचबरोबर बादलदांच्या जीवनदृष्टीचीही ओळख करून घ्यायला हवी. लेखकाने ती पुरेशा तपशीलवारपणे मांडली आहे. बादलदांची जडणघडण कशी झाली, हे त्यांच्या चरित्रावरून समजते आणि नाटक या संस्थेकडे ते कोणत्या हेतूने पाहतात, हे लक्षात येते
बादलदांची ‘शताब्दी’ ही नाट्यसंस्था पूर्वी कमानी रंगभूमीवरचीच नाटकं करायची. पण बादलदा परदेश फिरून आले आणि तिकडे पाहिलेल्या रंगभूमीचा त्यांच्यावर विलक्षण परिणाम झाला. नोकरीच्या निमित्ताने आणि शिक्षणासाठी त्यांना युरोप, अमेरिका, नायजेरिया, लंडन, पॅरिस या देशांत जावं लागलं. तिथली रंगभूमी, ग्रोटोस्कीची गरीब रंगभूमी हे सगळं सगळं त्यांनी पाहिलं आणि ते कमालीचे प्रभावित झाले. नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषेचा झगमगाट, तांत्रिकतेचा वापर यांच्याशिवाय नाटक किती परिणामकारक होऊ शकतं, याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या सर्व प्रकारच्या अवलोकनातून प्रेरणा घेऊन, भारतीय संस्कृतीच्या मुशीतून त्यांनी एक वेगळेच नाट्यनिधान सिद्ध केले. जे नाटक हाडामांसाच्या माणसांचे होते, माणसातले होते, न भूतो न भविष्यती होते. तिसऱ्या रंगभूमीचा हा जन्म होता. कुठलाही आणि कसलाही जामानिमा न करता एका ग्रीक राजा-राणीची शोकांतिका प्रेक्षकातच उभी राहते आणि प्रेक्षकांना हादरवून टाकते, तर हे आपल्याकडेही शक्य का नाही होणार? कितीतरी ज्वलंत प्रश्न आपल्याकडे आहेत. ते याच पद्धतीने लोकांना भिडवता येतील. नाटक आणि समाजकारण यांच्या कळा असह्य झाल्या आणि तिसऱ्या रंगभूमीचा जन्म झाला.
केवळ पहिल्या आणि दुसऱ्या रंगभूमीच्या चौकटी मोडणे, एवढंच उद्दिष्ट तिसऱ्या रंगभूमीसमोर नव्हतं. लेखक म्हणतो, “ग्रामीण व शहरी नाटक या दोघांना पर्यायी असलेलं हे नाटक होतं, म्हणून बादलदांनी त्याला ‘तिसरी रंगभूमी’ म्हटलं. पण तिसरी रंगभूमी हा एका बदलत्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवर नव्या परिवर्तनशील नाटकाचा व्यापक पातळीवर घेतलेला शोध होता.”
या संदर्भात बादलदा म्हणतात, “अशा प्रकारचं नाटक उभं राहायचं, तर ती एक नव्या नाटकासाठीची चळवळ असायला हवी. तो एक व्यवसाय असून चालणार नाही. ज्यांना केवळ नाटकासाठी नाटक करण्यात रस आहे किंवा नाटक ज्यांच्या उपजीविकेचे साधन आहे, त्यांना अशा प्रकारची नाट्यचळवळ करता येणार नाही. एका व्यापक बदलाची जे अपेक्षा करतात आणि बदल घडवण्याच्या शक्तीमध्ये नाट्यकलेचेही योगदान असावे, असे ज्यांना वाटते, तेच अशा प्रकारच्या नाट्यचळवळीमध्ये येतील, पण असे लोक जास्त नाहीत.” तिसऱ्या रंगभूमीबाबतची बादलदांची वैचारिक स्पष्टता यावरून लक्षात येते.
या पुस्तकात दिलेलं बादलदांचं चरित्र फार महत्त्वाचं आहे. ते वाचल्यानंतर त्यांची भूमिका कुठल्या मुशीतून आणि वातावरणातून तयार झाली, हे चटकन लक्षात येतं. त्यांना केवळ नाटकाचं वेड नव्हतं, तर समाजाबद्दलही आत्यंतिक जिव्हाळा होता. समाज आणि नाटक यांच्यात ते अद्वैत निर्माण निर्माण करू पाहत होते, एक अतूट नातं निर्माण करू पाहत होते. समाजपरिवर्तनाचं एक साधन म्हणून ते नाटकाकडे पाहत होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
सामूहिक सहभागातून, कार्यशाळांतून नाटकं कशी उभी राहत गेली, नाटकाचे संवाद कसे म्हणायचे, हालचाही, नेपथ्य, देहबोलीतून कसे निर्माण झाले? हे सारे बादलदांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. त्याचा तितकाच सुबोध अनुवाद लेखकाने केला आहे. त्यांची नाटकं केवळ कवायती झाली नाहीत. त्याचे कारण देताना ते म्हणतात, “आम्ही भर आशयावर दिला आणि त्यानुसार आकृतिबंध ठरवले ... अगोदर आकृतिबंध आणि मग त्यावर आशय लावला नाही.”
देहबोलीवर नाटक करणारे आपल्याकडचे बरेच जण आकृतिबंधाचेच बळी ठरले आणि त्यांच्या नाटकांची संचलने झाली... आंधळ्या अनुकरणाने मूळ संकल्पनाच मोडीत काढली. बादल सरकार जे सांगतात, त्याचा प्रत्यय जाणकारांनी, समीक्षकांनी त्यांच्या नाटकांचा जो प्रयोगानुभव कथन केलाय आहे, त्यावरून येतो आणि कसल्याही बाह्य तांत्रिक मदतीशिवाय त्यांचे नाट्यप्रयोग विलक्षण प्रभावी कसे झाले, याचे कारण कळते.
आपल्या नाटकातील अनुभवाबद्दल बादलदा लिहितात - “या नाटकातील प्रेक्षकांचा अनुभव वास्तवाच्या आभासापेक्षा प्रत्यक्ष वास्तवाचा अनुभव असावा असा भासतो आणि केवळ प्रेक्षक क्षेत्र आणि अभिनय क्षेत्र यांच्या बदललेल्या रचनेमुळे हे घडलं असं नाही, तर कलाकार व प्रेक्षक या दोन व्यक्तीसमूहांच्या मानवी नात्यात घडलेल्या मूलभूत बदलामुळे हे घडलं.”
नाटकाच्या बाजारू व्यवहाराबाबतही बादलदांनी आपले विचार मांडले आहेत. “मुक्त किंवा मोफत नाटकाकडे आम्ही वळलो, याचे कारण केवळ आपल्या देशातले गरीब लोक आणि नाटकाचे तिकीट काढणे त्यांना परवडणार नाही, एवढेच नव्हते... तर आमची अशी धारणा होती की, नाटकामध्ये कलाकार व प्रेक्षक यांचा दर्जा समान असायला हवा. तो विक्रेता व ग्राहक असा नसावा. नाटकासाठी जेव्हा तिकीट विक्री-खरेदी केली जाते, तेव्हा साहजिकच खरेदीदार व विक्रेता हे नातं निर्माण होणं अपरिहार्य ठरतं. खरेदीदाराचा अनुनय करणंही मग अपरिहार्य ठरतं. त्यामुळे नाटकात तुम्हाला जे सांगायचं आहे, ते परखडपणे सांगणं कठीण होऊन बसतं.”
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..............................................................................................................................................................
बादलदांनी देशभर नाट्यशाळा घेतल्या. पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, ब्रिटन अशा देशांत जाऊनही कार्यशाळा घेतल्या. तिसऱ्या रंगभूमीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी झपाटून काम केलं. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात मैलोनमैल चालायचं आणि पुढच्या गावात नाटक करायचं, कलाकारांचे अनेक चमू त्यांना सामील झाले. लोककला गाणी पोवाडे अशा सगळ्या रांगड्या कलांचं साहाय्य घेत त्यांनी आठ वर्षे ही नाटकांची ‘ग्रामपरिक्रमा’ चालवली.
बादलदांनी आपल्या नाट्यप्रयोगातून जे आकृतिबंध मूर्तिमंत केले, त्याचा अर्थ आणि अन्वयार्थं पुस्तकात अगदी जाताजाता आला आहे. बादलदाच आपल्या नाटकाचे दिग्दर्शक असल्यामुळे ही महत्त्वाची बाब ठरते. आपल्याकडेही नाटककार-दिग्दर्शकाची परंपरा आहेच. देवल, खाडिलकर, दारव्हेकर, आळेकर, मतकरी ही नावं सहज आठवतात या संदर्भात. पुस्तकात फक्त ‘स्पार्टाकस’ नाटकाचं एकच उदाहरण आहे. अधिक उदाहरणे आली असती, तर प्रयोगाची प्रभाव शक्ती वाचकांना अगदी टोकदारपणे उमजली असती.
चळवळ म्हणजे काय आणि नाट्यचळवळ कशी उभी राहते, हे ज्यांना मनापासून जाणून घ्यायचे असेल, त्यांनी बादलदांची ही कहाणी वाचायलाच हवी. एका छोट्या नाट्यगृहात सातत्याने वेगळी नाटकं करत राहणं, याला चळवळ म्हणता येत नाही. चिकाटीनं विशिष्ट नाट्यकार्य करत राहणे एवढेच विशेषत्वाने सांगता येईल आणि तेवढ्यासाठीच ते कार्य करणारी संस्था लक्षणीय ठरेल.
मराठी रंगभूमी आणि बादलदांची जनवादी रंगभूमी वा तिसरी रंगभूमी यांची तुलनाच होऊ शकत नाही. प्रेक्षकांसाठी नाटक करणं, हा दोघांतला समान दुवा असला, तरी त्या परस्पर विरोधी संकल्पना आहेत. सांगलीचे राजे पटवर्धन यांना विष्णुदास भाव्यांच्या नाट्यचमूला पदरी ठेवायचं होतं. पण त्यांच्या अकाली निधनामुळे ते शक्य झालं नाही. राजपुत्र बालवयाचा असल्यामुळे नेमलेल्या व्यवस्थापकानं नटमंडळीला फक्त दीर्घमुदतीची रजा मंजूर केली. सांगलीकर हिंदू नाटक मंडळी स्वारीवर म्हणजेच दौऱ्यावर निघाली. आपोआपच नाटक कंपनी सरंजामदारीतून भांडवलदारीत पडली...
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आणि बादलदा तर नाटक घेऊन भांडवलशाहीच्या विरोधातच उभे होते. सांगलीकर नाटक मंडळीचा पहिला मुक्कम तासगावला पडला. सात-आठ खेळ केले.. नाटक तिकीट काढून येणाच्या प्रेक्षकांसाठी झाले. अभिजन वर्गाचे झाले. मध्यमवर्गाचे झाले. भावे दौऱ्याला ‘स्वारी’ म्हणतात ते यथार्थच आहे. सांगलीकरांनी मराठी रसिक मनावर स्वारीच केली. हा रसिक वर्ग बुद्धिवादी होता, ब्राह्मण होता.
तिकीट काढून नाटक बघण्याची चैन त्या वेळच्या कष्टकऱ्यांना परवडण्याजोगी नव्हती. आजपर्यंतचे आपले नाटक मध्यमवर्गीयच राहिलेले आहे. रंगमंचावर प्रथम कामगारविश्व यायला १९३१ साल उजाडावे लागले. (सोन्याचा कळस - मामा वरेरकर) याचा अर्थ तिसरी रंगभूमी सर्वश्रेष्ठ आहे, असं मुळीच नाही. तिन्ही रंगभूमी गुणाढ्य आहेत, यात शंकाच नाही. फक्त प्रत्येकाची ‘खेळा’ची मैदानं वेगवेगळी आहेत, हे लक्षात घ्यायला हवं
चरितार्थाचे साधन म्हणूनच ज्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, त्यांच्याकडून ‘कमिटेड थिएटर’ होऊ शकत नाही, हे तर बादलदांनीच लिहून ठेवलंय. कम्युनिस्ट असूनही त्यांनी पक्षाचा प्रचार कधी केला नाही. सत्तेने निर्माण केलेल्या परिस्थितीवर, दमनशक्तीवर, शोषणावर मात्र त्यांनी जोरदार हल्ले चढवले. त्यामुळेच सरकारी पुरस्कारापासून आणि पक्षाच्या पाठिंब्यापासून ते नेहमीच वंचित राहिले. ‘ ‘तिसरी रंगभूमी’ हे माझं कार्य नसून ते माझं तत्त्वज्ञान आहे’, असं ते नेहमी म्हणायचे.
कॅन्सर झालेला असतानाही वयाच्या ८६ वर्षांपर्यंत ते सतत कार्यरत होते. नाट्यविश्वातल्या एका तत्त्वनिष्ठ आणि झपाटलेल्या माणसाचे हे परिपूर्ण चरित्रनाट्य मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकणारे आहे.
आज निर्माण झालेल्या परिस्थितीत तिसऱ्या रंगभूमीची आणि जनवादी नाट्यकर्मी बादलदा यांची तीव्रतेने आठवण येते. तीच तारणकर्ती असू शकेल.
‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ - अविनाश कदम
लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने - १८८ | मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment