श्री. सुरेश सोनवणे हे पुण्यातले काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांचा अभ्यास प्रचंड होता, राजकीय आकलन भरपूर होते आणि ते अतिशय प्रभावी वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. २१ जून २०२१ रोजी वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परवाचा २१ जून हा त्यांचा दुसरा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचा हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
१.
आज सुरेशभाई सोनवणे जर असते, तर त्यांनी वयाची ७४ वर्षे पूर्ण करून ७५व्या वर्षात पदार्पण केले असते. मात्र त्यांनी २१ जून २०२१ रोजी इहलोकाची यात्रा संपवली. तसं पाहिलं तर मागील दोन-चार वर्षांपासूनच त्यांच्या प्रकृतीचे चढउतार सुरूच होते. त्यांनी पिंपरी–चिंचवड शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, यांसारखी पदे जरी भूषवली असली, तरी त्यांची ओळख प्रामुख्याने राज्यातील एक प्रभावी व अभ्यासू वक्ता म्हणूनच होती.
सुरेशभाईंचा स्वभाव व चित्तप्रवृत्ती मुळात राजकीय कार्यकर्ता वा नेत्याची नव्हतीच. ते राजकारणात अपघातानेच आले. त्या काळी उल्हासदादा, रामकृष्ण मोरे आणि इतर युवक नेत्यांच्या नेतृत्वाखालील ‘युवक काँग्रेस’ चांगलीच फॉर्मात होती. परंतु आणीबाणीबाबत लोकांमध्ये उमटणारे प्रतिकूल पडसाद लक्षात घेता, १९७७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधी वातावरण तापले होते. बदललेले राजकीय वातावरण लक्षात घेता, पक्षाचे अनेक नेते अतिशय बिचकत–बिचकत प्रचारमोहिमेत जाहीर भाषणं करत होते.
परंतु अशाही वातावरणात जे मोजके नेते काँग्रेसची बाजू आक्रमकतेनं मांडत होते, त्यात सुरेशभाईं सोनवणे यांचा समावेश होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच्या काही आठवड्यातच, पुण्यातील शनिपार चौकात काँग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुरेशभाई वाडिया महाविद्यालयाच्या आपल्या काही मित्रांबरोबर आले होते. तेव्हा नव्या रक्ताला संधी देण्यासाठी उल्हासदादा पवार, रामकृष्ण मोरे आदी नेते पुढाकार घेत असत आणि युवकांशी सातत्याने संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे तेव्हाची ‘युवक काँग्रेस’ हा खळाळणारा प्रवाह होता, कार्यचैतन्यानं गजबजणारं व्यासपीठ होतं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
त्यामुळे उल्हासदादांनी सभेच्या ठिकाणी गप्पांची मैफल रंगवत असलेल्या सुरेशभाईंना अचानकपणे सभेत बोलण्याचा आग्रह केला. त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. मात्र क्षणार्धात त्यांनी होकार भरला आणि त्यांच्या जीवनातील पहिलंवहिलं राजकीय भाषण केलं. त्या दिवशी वाचनाची आवड असलेल्या आणि वाडिया महाविद्यालयामधून बी.एस.स्सी. करणाऱ्या सुरेशभाईंची चांगलीच तार लागली. आणीबाणीचं खणखणीत समर्थत करत आणि अमोघ वक्तृत्वानं आपला युक्तिवाद मांडत त्यांनी सभा गाजवली. मग काय विचारता! पुणे शहरात त्यांना सर्वत्र सभेची निमंत्रणं येऊ लागली… त्यांचा आवाज शहरभर दुमदुमू लागला.
अशा प्रकारे अपघातानं सुरेशभाईंचा राजकारणात प्रवेश झाला. १९७३च्या सुमारास सुरेशभाई मंगळवार पेठेतील बारणे वाड्यातील एका खोलीत राहत होते. वाडियामध्ये शिकत असल्यापासून ते भरपूर वाचन करायचे. सोमवार पेठेत तात्या नाईकांच्या घरी त्यांनी व काही मित्रांनी मिळून अभ्यासवर्गही सुरू केला.
त्या काळी फॉर्मात असलेले सर्वश्री वसंत चव्हाण, विजय नालम, अॅड. विजय सावंत, विलास एरम, हेमंत पवार, शशी कांबळे, रमेश अडवानी, सुधीर गाडगीळ, धनंजय थोरात, आदी असंख्य कार्यकर्ते व मित्रही त्यामध्ये सहभाग घ्यायचे. त्यामुळे सुरेशभाईंची मंगळवार पेठेतील खोली म्हणजे चळवळ्या राजकीय कार्यकर्त्यांचा जणू अड्डाच बनला होता. याच दरम्यान सुरेशभाई कलमाडी यांचा काँग्रेस प्रवेश झाला होता.
त्या काळी विरोधी पक्षीयांचे विचार ऐकून घेणे, समजून घेणे, या प्रकारची ‘सहिष्णुता’ सहजपणे अनुभवायला मिळायची. सुरेशभाईंचे नाव वक्ता म्हणून दुमदुमू लागले. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एके दिवशी सुरेशभाईंना पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नामवंत वकील बाबासाहेब भिडे यांचा निरोप आला. ‘मला तुमचं भाषण ऐकायचं आहे. तुमची पुढील सभा कुठे आहे?’, अशी त्यांनी विचारणा केली. ‘माझी पुढची सभा तुमच्या घराजवळच, म्हणजेच शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेच्या चौकात घेईन’, असा सुरेशभाईंनी त्वरित निरोप पाठवला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
ती सभा चांगलीच गाजली. बाबासाहेबांनी ती घरी बसूनच ऐकली. सभेनंतर घरी येण्याचंही निमंत्रण दिलं आणि भाईंचं मनमोकळं कौतुकही केलं. त्यानंतर १९७८मध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पुन्हा सुरेशभाईंचा झंझावती प्रचार सुरू झाला. शिवाजीनगरमध्ये सुरेश कलमाडी आणि बारामतीत शरदराव पवार यांच्यासाठी भाईंनी भरपूर सभा घेतल्या.
भाषणं करून करून काही वेळा त्यांच्या घशात रक्त उतरायचं. जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतरच्या १९८० सालच्या निवडणुकांमध्येही सुरेशभाईंनी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या खेड लोकसभा मतदारसंघात गावोगावी सभा गाजवल्या.
याच काळात हॉटेल ‘डिलाईट’ हे मुख्यत्वेकरून डाव्या विचारांच्या (आणि पूना युनिवर्सिटी स्टुडंट्स युनियन – ‘पुसू’ संस्थेशी निगडित) तथाकथित आणि स्वघोषित क्रांतिकारकांचा ठिय्या बनलं होतं. तिथं कामगार चळवळीतल्या, काँग्रेसच्या आणि १९७७मध्ये जनता पक्षात विसर्जित झालेल्या, परंतु मूळच्या जनसंघाच्या आणि समाजवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांची उठबस होती. त्यामुळे ‘डिलाईट’वर डावे, उजवे, मधले, डाव्यांमधले दडलेले उजवे, उजव्यांमधले मध्यम, अशा अनेकविध छटा दिसायच्या. परिणामी चर्चा व वादाच्या ठिणग्या सतत उडत रहायच्या.
सुरेशभाई बऱ्याचदा ‘डिलाईट’वर हजेरी लावायचे. मीही फेरफटका मारत असायचो. तिथंच माझी त्यांच्याशी ओळख झाली. याच ठिकाणी सुरेशभाईंची डाव्या चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या लता भिसे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर काही वर्षांनी ते दोघं विवाहबद्ध झाले, हा आम्हा मित्रांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.
२.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी नावाच्या खेड्यात जन्मलेल्या सुरेशभाईंच्या घरी शेती व दुधदुभतं होतं. त्यांचं शिक्षण सोलापूर, सातारा आणि नंतर पुण्यात झालं. मात्र पुण्यात शिकत असताना वडिलांचं आकस्मित निधन झालं आणि सुरेशभाईंची आर्थिक रसद तुटली. हे एक प्रकारचं अरिष्टच होतं. त्यात त्यांचं काँग्रेसचं काम सुरू झालं होतं. आर्थिक चणचण भासू लागल्यानंतर सुरेशभाई काही काळ काँग्रेसभवनवरही राहिले. १९८४ दरम्यान त्यांनी पिंपरी–चिंचवड या औद्योगिक नगरीत मुक्काम हलवला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
१९८६मध्ये औद्योगिक नगरीतील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एकदा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील पिंपरी–चिंचवडला एका सार्वजनिक कार्यक्रमाला आले. पक्षाचे स्थानिक अध्यक्ष म्हणून सुरेशभाई त्यांच्या शेजारीच बसले होते. दादांनी त्यांची मोठ्या मायेनं चौकशी केली आणि ‘एकदा तरी लोकांमधून निवडून जाऊन महानगरपालिकेत नगरसेवक हो’, असा वडिलकीचा सल्ला दिला. राजकारणात कोणत्याही स्तरावर काम केलं, तरी लोकप्रतिनिधी होण्याला फार महत्त्व असतं, असा गुरूमंत्रही दादांनी सुरेशभाईंना दिला.
त्यानुसार त्यांनी खराळवाडी प्रभागातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्या वेळी गोविंदराव आदिक यांनी सुरेशभाईंना भरपूर ‘मदत’ केली, तर विरोधी पक्षातले भाईंचे मित्र गिरीश बापट, सुरेश नाशिककर, आदी अनेकांची ‘रसद’ लाभली. म्हणून सुरेशभाई निवडून आले आणि लगेचच स्थायी समितीचे अध्यक्षही झाले.
त्या वेळी पुण्यातील राजकारणाला असलेलं महत्त्व लक्षात घेता, नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी दुर्लक्षित राहिली. या परिसरात वाय.सी.एम. हॉस्पिटल, अप्पू घर, चिंचवड भाजी मंडई, मनपा कामगारांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यास भाग पाडणे, हॉकीसाठीचे पहिलेवहिले पॉली-ग्रासचे मैदान उभारणे, अशा अनेकविध प्रकल्पात सुरेशभाईंचा मोठा हातभार होता.
दुर्दैवाने हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सर्वोच्च कामगिरी ठरली. लोकप्रियता, प्रचंड मोठा मित्रपरिवार, अभ्यासू वक्ता म्हणून असलेला नावलौकिक लक्षात घेता, खरं तर त्यांची राजकीय कारकीर्द आणखीन उंचावेल, अशी अनेकांना आशा होती, ती फोल ठरली.
एकेकाळी अगदी घट्ट मित्र असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यापासून कायमचे दूरावल्यानंतर, सुरेशभाईंनी त्यांच्याच विरोधात भारिप–बहुजन महासंघातर्फे आमदारकीची निवडणूक लढवली. सुरेशभाईंनी बरीच मते घेतल्यामुळे मोरे पराभूत झाले, मात्र भाईंचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यानंतर मात्र त्यांचं तारू भटकू लागलं. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले, नंतर राष्ट्रवादीत गेले, तेथून ते स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले गेले. मात्र राजकारणाची घडी काही ते पुन्हा बसवू शकले नाहीत. हळूहळू ते बाहेर फेकले गेले.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
२००४ साली पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सुरेश कलमाडी यांच्या प्रचाराला नेमकी दिशा देण्याचं, तसंच प्रचार व भाषणात कोणते मुद्दे उचलावेत आणि कोणते बाजूला ठेवावेत, याबाबत सुरेशभाईंनी दिलेले ‘इनपुट्स’ फार मोलाचे ठरले. कलमाडींचा एकूण दरारा आणि रागीट स्वभाव लक्षात घेता, त्यांना न आवडणाऱ्या, न रुचणाऱ्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासमोर मांडताना सुरेशभाईंनी कसलीही तमा वा भीती बाळगली नव्हती. अर्थात त्यांचा राजकीय अभ्यास व अंदाज याची कलमाडींनाही चांगली जाण होती.
एकच उदाहरण. सुरेश कलमाडींना ‘आयटी’ क्षेत्राचं भरपूर आकर्षण असायचं. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून ‘आयटी’ क्षेत्रातील युवकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असायची. तेव्हा सुरेशभाईंनी कलमाडी यांना स्पष्टपणं सांगितलं की, काँग्रेस पक्षामुळे जरी ‘आयटी’ उद्योगांची भरभराट झाली असली तरी, ‘आयटी’मधील युवक मतदानाला बाहेर पडत नाही; त्यामुळे आपण ‘आयटीआय’ करणाऱ्या मंडळींवर लक्ष केंद्रीत करू, कारण ते मतदानाला बाहेर येतील आणि तुम्हाला मतदानही करतील.
कलमाडींना तो सल्ला पटला होता. या निवडणुकीत कलमाडी निवडून आले होते, मात्र सुरेशभाईंनी काँग्रेस पक्ष व कलमाडी यांच्याशी संपर्क ठेवण्यात सातत्य दाखवले नाही. पक्षाचे काम करण्याचा त्यांचा उत्साह संपल्याचे आम्हा मित्रांना जाणवायचे. परिणामी सुरेशभाई राजकारणात पुन्हा एकदा मागे पडले… ते कायमचेच.
पक्षीय राजकारणातील धबडग्यात आणि त्यापासून दूर असतानाही, सुरेशभाईंनी वेगवेगळी इंग्रजी व मराठी मासिकं, राजकारणावरील पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावला होता. त्यांचं राजकीय भान जबरदस्त होतं. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सामाजिक रचना व राजकीय परिस्थिती, कोण चांगले कार्यकर्ते व नेते, याबद्दलची इत्यंभूत माहिती त्यांना मुखोदगत होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
३.
१९९९मध्ये राज्यातील आम्ही काही मित्रांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आधी, लोकमताचा काटा कुठे सरकतोय, याचा नेमका अंदाज घेण्याच्या दृष्टीनं, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या पुढाकारानं एक अभ्यासगट तयार झाला होता. त्या वेळी आम्ही संपूर्ण राज्यभर फिरलो होतो, विविध थरातील लोकांशी थेट बोलून वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती गोळा केली होती. या अभ्यासगटात सुरेशभाईंनी त्यांचा अभ्यास व अनुभवांवर आधारित जो अंदाज व्यक्त केला, तो अगदी अचूक ठरला होता.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला किमान १३० ते १३५ या दरम्यान जागा मिळतील आणि त्यांची सत्ता येईल, असे त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं होतं आणि झालंही तसंच. आघाडीला १३३ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या या अंदाजाचं पत्रकार व नेत्यांनी कौतुकही केलं होतं.
‘मनसे’च्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर आणि हर्षल देशपांडे यांच्यामार्फत निरोप पाठवून, सुरेशभाईंना पुण्यात अनिल शिदोरे काम पाहत असलेल्या ‘मनसे’ प्रबोधिनीत एक सल्लागार म्हणून सहभागी करून घेतलं होतं. राज ठाकरे अनेकदा त्यांच्याशी चर्चा करायचे. तेव्हाही ते स्वतःची मतं स्पष्टपणे मांडायचे. काही काळानं ही प्रबोधिनी बंद पडल्यानंतर, मात्र सुरेशभाई राजकीय क्षेत्रात पुन्हा कधीही सक्रीय दिसले नाहीत.
वाकडला राहत असल्यामुळे ते ना पिंपरी-चिंचवडच्या संपर्कात राहू शकले, ना पुणे शहराच्या. तोपर्यंत त्यांचा मुलगा कबीरही वयानं वाढत होता. त्याच्याशी असलेल्या उत्तम संवादामुळे कबीरची वैचारिक बैठक चांगल्या प्रकारे होऊ शकली.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
अधूनमधून राजकीय सल्ला वा मतदारसंघाची आखणी करून देण्याचं भाईंकडे काम यायचं आणि त्याचा थोडाफार मोबदलाही मिळायचा. नंतर नंतर तोही कमी झाला. धाकटा भाऊ अमृत होता, त्याचा काही प्रमाणात भाईंना आधार असायचा. मात्र तो आकस्मितपणे गेला. परिणामी, त्यानंतरच्या काळात सुरेशभाईंची पत्नी लता भिसे यांनीच घराची जबाबदार पेलली. त्या डाव्या संघटनांच्या विविध प्रकारच्या कामांत, उपक्रमांत आणि आंदोलनांत राज्यभरात कार्य करणाऱ्या तडफदार नेत्या म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत… आजही त्या तितक्याच सक्रीय आहेत!
या काळात चिंचवडमध्ये राहणारा आणि भाईंवर निखळ प्रेम करणारा मित्र नाना येरवडेकर आणि शशिभाऊ कांबळे सातत्यानं संपर्कात असायचे. दरम्यान, येरवडेकर हृदयविकाराच्या धक्क्यानं गेला. त्यामुळे भाई खऱ्या अर्थानं ‘आतून’ कोसळले.
नाना आणि भाई हे दिलीपकुमार व मधुबालाचे जबरदस्त फॅन! एखाद्या सायंकाळी नानाच्या घरी ‘मैफल’ जमली की, भाईंची रसिकता खुलायची! बॉलिवुड, हॉलिवुड, अभिनेते, अभिनेत्री, नवे-जुने चित्रपट व त्यातील गाणी; कुसुमाग्रज ते नारायण सुर्वे यांच्या मुखोद्गत कवितांचे सादरीकरण, गालिब ते जावेद अख्तर यांची शायरीचा फुलोरा…
हे सारं ऐकलं की, सुरेशभाई राजकारणात आहेत, हे खरंच वाटायचं नाही. रसिकतेच्या याच भावोत्कट मूडमध्ये ते अचानक समेवर आल्यासारखे, महात्मा गांधी, पं. नेहरू, राम मनोहर लोहिया, मार्क्स, डार्विन, वॉल्टेअर, इंदिरा गांधी, राजीव गांधी, हेमवतीनंदन बहुगुणा, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, चौधरी चरणसिंग, शरद जोशी, यांसारख्या अनेक नेत्यांचे संदर्भ देऊ लागायचे! अशा अनेक मैफलींचा मी साक्षीदार आहे. करोनाचं संकट कोसळण्याआधीपर्यंत माझाही सतत संपर्क होता. नंतर कमी होत गेला. आम्ही अधूनमधून फोनवरून बोलायचो, कधीतरी भेटायचो.
काही वर्षांपासून सुरेशभाईंनी वेद आणि बौद्ध व जैन धर्मांचा अभ्यास सुरू केला होता. ‘जिओपॉलिटिक्स’बद्दलही त्यांना खूप आकर्षण होतं. त्या दिशेनंही त्यांचं वाचन सुरू होतं. जे हातात येईल, ते वाचायची त्यांना जणू सवय जडली होती.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
सुरेशभाईंचे राजकीय जीवन एका अर्थानं शोकान्त म्हणावं लागेल. इतके सारे गुण असूनही राजकारणात जी एक शिस्त लागते, संयम व शांतपणा आवश्यक असतो, डिप्लोमॅटिक वागणं-बोलणं, कार्यकर्त्यांचा चांगला संच उभा करणं, लोकांच्या व पक्षाच्या सातत्यानं संपर्कात राहणं, राजकारणातील सातत्य टिकवणं, आदी बाबींचा त्यांच्यामध्ये अभाव होता. स्वतःची आर्थिक घडी बसवण्याकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केलं. राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने आर्थिक बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही, याची सुरेशभाईंनी कधीच तमा बाळगली नाही.
४.
सुरेशभाईंचा स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा नव्या पिढीतील राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडणारा नव्हता. मला आठवतं, मोहन धारियांनी जेव्हा १९८०च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून उभं राहण्याचं ठरवले, तेव्हा सुरेशभाईंनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, “अण्णा, बारामतीत जाऊन निवडणूक हरण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या पुणे मतदारसंघातून उभे राहून पडलेले चांगले. त्यामुळे तुमचा पुण्यातील ‘क्लेम’ कायम राहील”, असं स्पष्टपणे ऐकवलं होतं.
‘धनगर’ समाजाचे असूनही सुरेशभाईंनी जातीचे कार्ड कधीही वापरलं नाही. इतका प्रचंड मित्रपरिवार असूनही, शेवटच्या काही वर्षांत सोनवणे स्वतःच्या कोषातून बाहेर येऊ शकले नाहीत. राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि राजकीय प्रवाह किती वेगाने पुढे सरकतो, हे त्यांना फारसं उमगलं नाही की, ठरवून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं, माहीत नाही. परिणामी, त्यांचं ज्ञान व अनुभवाचा ना समाजाला फायदा झाला, ना काँग्रेस पक्षानं त्यांचा काही उपयोग करून घेतला.
एक मात्र निश्चित की, सुरेशभाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसच्या मूळ विचारांची बांधीलकी सोडली नाही. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी रक्त आटवून काँग्रेस पक्ष आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल त्यांना खूप अप्रूप होतं. भाजपने त्यांना हलक्यात घेण्याची चूक करू नये, असं त्यांनी गप्पांच्या ओघात सांगितल्याचं मला आजही चांगलंच आठवतं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
नेहरू–गांधी कुटुंबाने देशासाठी केलेला त्याग, त्यांच्यातला निर्भयपणा, लोकांमध्ये सहज मिसळून जाऊन संवाद साधण्याची आंतरिक जबरदस्त ऊर्मी, यांबद्दल भाई ठासून बोलायचे!
महात्मा गांधींबद्दलचं त्यांचं वाक्य माझ्या चांगलंच स्मरणात आहे. ते म्हणायचे, २१व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २२व्या शतकात गांधीजी फारच ‘प्रासंगिक’ असतील. कारण अतिरेकी यांत्रिकीकरणामुळे माणसाच्या हातांना फारसं काम नसेल आणि रिकामटेकडं मन अविचारानं भरकटत जाईल, तेव्हा महात्मा गांधींच्याच विचारांचीच कास धरावी लागेल. त्यांचं हे आकलन किती योग्य होतं, हे आता जाणवतं.
इतकं सारं असूनही, स्वतःच एकट्यानं वल्हवत असलेलं तारू, राजकारणाच्या भोवऱ्यात किती पुढे सरकणार? त्यांच्या जीवनाचं तारू स्वतःभोवतीच फिरत राहिलं आणि अखेरीस काळाच्या खोल डोहात दिसेनासं झालं. मध्यंतरी त्यांची बरीच आजारपणंही झाली. अखेरीस २१ जून २०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आम्हा असंख्य मित्रांना भाईंची उणीव नेहमीच भासते, भासत राहील...
.................................................................................................................................................................
prashant.kothadiya@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prashant Kothadiya
Sat , 24 June 2023
२००४ साली पुण्यातून कॉंग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढविणा-या श्री. सुरेश कलमाडी यांच्या प्रचाराला नेमकी दिशा देण्याचे, तसेच प्रचार व भाषणात कोणते मुद्दे उचलावेत आणि कोणते बाजूला ठेवावेत, याबाबत सुरेश सोनवणे यांनी दिलेले ‘इनपुट्स’ फार मोलाचे ठरले होते. कलमाडींचा एकूण दरारा आणि रागीट स्वभाव लक्षात घेता, त्यांना न आवडणा-या, न रुचणा-या गोष्टीसुद्धा त्यांच्या समोर मांडण्याचे धारिष्ट्य आणि प्रसंगी स्वतःच्या फटकळपण स्वभावाचा वापर करताना सोनवणे यांनी कसलीही तमा वा भीती बाळगली नव्हती. अर्थात सोनवणे यांचा राजकीय अभ्यास व अंदाज याबाबत कलमाडींना चांगलीच जाण होती. याचे एकच उदाहरण देण्याचा मला मोह होत आहे. सुरेश कलमाडी यांना ‘आयटी’ क्षेत्राचे भरपूर आकर्षण असायचे. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून ‘आयटी’ क्षेत्रातील युवकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असायची. तेव्हां सोनवणे यांनी कलमाडी यांना स्पष्टपणे सांगितले की कॉंग्रेस पक्षामुळे जरी ‘आयटी’ उद्योगांची भरभरात झाली असली तरी, ‘आयटी’मधील युवक मतदानाला बाहेर पडत नाही; त्यामुळे आपण ‘आय.आय.टी. करणा-या मंडळींवर लक्ष केंद्रीत करू, कारण ते मतदानाला बाहेर येतील आणि तुम्हाला मतदानही करतील. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- वरील परिच्छेदात आय.आय.टी. च्या ऐवजी आय.टी.आय. वाचावे, ही विनंती. मूळ लेख पाठवताना माझ्याकडूनच ही चूक झाली होती. - प्रशांत कोठडिया.