अजूनकाही
आज ५३ वर्षं होत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘खुश है जमाना, आज पहली तारीख’ हे गाणं रेडिओवर वाजतं. असं भाग्य एखाद्याच गाण्याला लाभतं. या चित्रपटाचं नावच ‘पहली तारीख’ (१९५४) असं आहे. किशोरकुमार या चित्रपटाचा नायक आणि गायक आहे. गाण्यात तसं काव्याच्या दृष्टीनं काहीच नाही. कमर जलालाबादी यांनी किशोरकुमारला डोळ्यासमोर ठेवूनच शब्द रचले आहेत. गीताची मजेशीर चालही सुधीर फडके यांनी तशीच बांधली आहे. यातील लता-रफी यांच्या आवाजातली बाकी गाणी मात्र फारशी गाजली नाहीत.
या गाण्याला लोकप्रियता नंतर मिळत गेली, पण त्या वर्षीच्या बिनाकात मात्र हे गाणं नाही. त्याला तसं कारणही आहे. १९५४ हे वर्ष जबरदस्त स्पर्धेचं वर्ष होतं. हेमंतकुमार (नागिन - सगळीच गाणी हिट, शर्त - न ये चांद होगा न तारे रहेंगे), सी. रामचंद्र (नास्तिक - देख तेरे संसार की हालत, सुबह का तारा - गया अंधेरा हुआ उजाला), एस.डी.बर्मन (टॅक्सी ड्रायव्हर - जाये तो जाये कहाँ), गुलाम मोहम्मद (मिर्झा गालिब - दिल ए नादान तुझे हुआ क्या है), ओ.पी.नय्यर (आरपार - सगळीच गाणी हिट), शंकर जयकिशन (बुट पॉलिश - नन्हे मुन्ने बच्चे तेरी), नौशाद (अमर - न मिलता गम तो बरबादी, इन्साफ का मंदिर है). या अटीतटीच्या स्पर्धेत हे गाणं बिनाकात टिकलं नाही.
पण एक तारखेच्या पगाराच्या मानसिकतेमुळे या गाण्याची लोकप्रियता टिकून राहिली. दुसर्या महायुद्धानंतर जगभरात आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतात शहरीकरणाचा जोर वाढत गेला. गावगाडा सोडून लोक छोट्या-मोठ्या शहरांकडे नोकरीसाठी धाव घेत होते. हे नोकरदार लोकच चित्रपटांचे मोठं प्रेक्षक होते. याच लोकांकडे तेव्हा रेडिओ असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, एक तारीख हा फार मोठा दिवस झाला. कारण या दिवशी महिनाभराच्या कामाचा पगार मिळणार. मग स्वाभाविकच अशा गाण्यांना उठाव मिळाला.
हेच गाणं नव्हे, तर अशा प्रकारच्या नोकरदारी मानसिकतेला ग्राहक म्हणून भारतीय बाजारपेठेत मोठी किंमत मिळायला सुरुवात झाली. पार अगदी १९९१च्या जागतिकीकरण पर्वापर्यंत ही मानसिकता कायम होती. ‘माँ मै बी.ए. पास हुआ हँ’, ‘माँ मुझे नोकरी मिल गयी’, ‘माँ आज मेरी तनखा हो गयी’... वगैरे वगैरे संवाद लोकप्रिय व्हायचा हाच तो काळ.
१९५४लाच किशोरकुमारचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होतं- ‘नोकरी’. या अख्ख्या चित्रपटात ही नोकरदार मानसिकता बिमल रॉय यांनी मोठ्या सुरेख पद्धतीनं रेखाटली आहे. गावात म्हातारी आई, आजारी बहीण यांना ठेवून नोकरीच्या शोधात कोलकात्यात आलेला किशोरकुमार, त्याचा नोकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष, शीला रमाणीसोबतचं त्याचं प्रेम... याच चित्रपटातलं एक गाणं तेव्हा बिनाकात हिट झालं होतं...
छोटा सा घर होगा जी बादलों की छाँव मे,
आशा दिवानी मन मे बांसुरी बजाये.
हम ही हम चमकेंगे तारों की उस गांव मे
आँखो की रोशनी हरदम ये समझाये
शैलेंद्रचे शब्द आणि सलिल चौधरी यांचं संगीत. शंकर जयकिशननंतर शैलेंद्र यांचे सूर खर्या अर्थाने जुळले ते दोनच संगीतकारांसोबत- एस.डी.बर्मन आणि सलिल चौधरी. या गाण्यात
चांदी की कुर्सी पे बैठे मेरी छोटी बहना,
सोने के सिंहासन पे बैठे मेरी प्यारी माँ
या कडव्याच्या ओळींनंतर ध्रुवपदाशी जुळणारी जी ओळ येते,
मेरा क्या मैं पडा रहूंगा अम्मी जी के पाँव में
ही अतिशय सहज आणि गोडव्यात बुडालेली आहे. हे शैलेंद्रचं वैशिष्ट्य!
शैलेंद्रने आपल्या गाण्यांमधूनही ही मध्यमवर्गीय नोकरदाराची मानसिकता बरोबर टिपली आहे. किशोर कुमारच्या आवाजात एक गाणं या चित्रपटात आहे-
एक छोटीसी नोकरी का तलबगार हू मैं,
तुमसे और कुछ मांगू तो गुनहगार हू मैं
आता या शब्दांच्या पलीकडे अजून काय सांगणार! तेव्हाच्या बहुतांश नोकर्या कारकुनांच्याच होत्या. व.पु.काळेंसारख्या लेखकांनी याच मानसिकतेवर सतत लिखाण केलं आहे. शैलेंद्रने या गाण्यात ‘मैं कल कलेक्टर ना बनू और ना बनूंगा अफसर, अपना बाबू ही बना लो बेकार हू मैं’
याच चित्रपटात नोकरीसाठी अर्ज करतानाचं पण एक गाणं आहे -
अर्जी हमारी, ये मर्जी हमारी,
जो सोचे बिना ठुकराओगो,
तो देखो बडे पछताओगे
त्यासाठी टाईप राईटरचा आवाज मोठा सुरेख वापरून घेतला आहे. गाणं खास किशोरकुमार शैलीतलं आहे. या गाण्याचा अजून एक कलात्मक वापर बिमल रॉय यांनी करून घेतला आहे. किशोरकुमार आपल्या खोलीच्या खिडकीत उभं राहून हे गाणं म्हणतो आहे आणि शिला रमाणी ही त्याची प्रेयसी पलीकडच्या खिडकीत पुस्तक वाचत उभी आहे. तेव्हा ही अर्जी केवळ नोकरीसाठी नसून प्रेमासाठीही आहे. मधूनच किशोरकुमार आपल्या मनाने ‘सुना है तुम्हारे यहाँ जगा खाली है’ असं म्हणतो. आता हे वाक्य शीला रमाणीच्या हृदयालाही लागू पडतं.
असाचा कलात्मक वापर देव आनंद वहिदाच्या गाण्यात ‘अपनी तो हर आह इक तुफान आहे’मध्ये करण्यात आला आहे (कालाबाजार, १९६०). देव आनंद जेव्हा ‘उपरवाला जान कर हैरान है’ म्हणतो तेव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या वहिदाकडे त्याचा इशारा असतो आणि दुसर्या अर्थाने उपरवाला म्हणजे देवाकडेही इशारा असतो.
‘खुश है जमाना आज पहली तारीख’ हे गाणं आणि ‘नोकरी’ चित्रपटातली तीन गाणी असं मिळून नोकरदारांची एक मानसिकता स्पष्टपणे समोर येते. बिमल रॉयसारखा दिग्दर्शक असल्यामुळे असेल कदाचित, पण ‘पहली’ तारीखपेक्षाही ‘नोकरी’मध्ये बेकारांचा प्रश्न जास्त ठळकपणे समोर येतो आणि त्याला कलात्मक रूपही प्राप्त होतं.
एक एप्रिलशी अजून एका गाण्याची आठवण निगडित आहे. १९६४मध्ये विश्वजीत, सायरा बानू यांचा ‘एप्रिल फुल’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात याच नावाचं रफीचं गाणं आहे, ‘एप्रिल फुल बनाया, उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया.’ हसरतसारख्या प्रतिभावंतांनी असं लिहायला सुरवात केली, तेव्हा पुढे गाण्याचा दर्जाच ढासळत गेला, हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. याच चित्रपटातलं रफीचं दुसरं गाणं ‘आ लग जा गले दिलरूबा’ थोडं तरी सुसह्य आहे. हा दोष खरं तर शंकर जयकिशनसारख्या संगीतकारांकडेही जातो. एखादा कारखाना असावा तसं यांनी ‘प्रॉडक्शन’ सुरू केलं होतं. १९६०नंतर तर अशी परिस्थिती होती की, नायक-नायिका-दिग्दर्शक कुणीही असो, शंकर जयकिशनची गाणी म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला गोळा करणार, याची खात्री असायची. परिणाम, एकूणच गाण्यांचा दर्जा घसरत गेला.
'नोकरी'मधल्या ‘छोटासा घर होगा’ची आठवण पुढे 'घरोंदा'मधल्या (१९७७) गाण्यानं परत ताजी झाली. ‘इक अकेला इस शहर मे’ या गाण्यानं मुंबईमधल्या घराच्या समस्येला कलात्मक तोंड फोडलं, पण हे गाणं मुंबईपुरतंच मर्यादित वाटतं. ‘छोटासा घर होगा’ किंवा ‘खुश है जमाना आज पहली तारीख’ ही गाणी ज्याप्रमाणे भारतभरच्या छोट्या-मोठ्या शहरांमधल्या नोकरदरांची वाटतात, तसं हे गाणं वाटत नाही.
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment