‘शब्द कल्पिताचे : न पाठवलेली पत्रे’ या स्वानंद बेदरकर यांनी संपादित केलेल्या आणि नुकत्याच प्रकाशित झालेल्या ग्रंथात ‘महाकवी कालिदास’ - सरोजा भाटे, ‘संत ज्ञानेश्वर’ - आनंद कुलकर्णी, ‘संत लल्लेश्वरी’ - मीनाक्षी पाटील, ‘संत तुकाराम’ - आसावरी काकडे, ‘संत सखु’ - तारा भवाळकर, ‘शिवाजी महाराज’ - श्रीनिवास हेमाडे, ‘बाळशास्त्री जांभेकर’ - अनंत येवलेकर, ‘महात्मा फुले’ - अशोक चौसाळकर, ‘गोपाळ गणेश आगरकर’ - अरुणा ढेरे, ‘विष्णू नारायण भातखंडे/ विष्णू दिगंबर पलुस्कर’ - चैतन्य कुंटे, ‘रवींद्रनाथ टागोर’ - माधवी भट, ‘सयाजीराव गायकवाड’ - बाबा भांड, ‘वि.का. राजवाडे’ - एकनाथ पगार, ‘बाया कर्वे’ – मृणालिनी चितळे, ‘महात्मा गांधी’ - विवेक सावंत, ‘योगी अरविंद’ - मिलिंद जोशी, ‘महर्षी शिंदे’ - रणधीर शिंदे, ‘गाडगेबाबा’ - श्रीकांत देशमुख, ‘पिकासो’ - श्रीराम हसबनीस, ‘पी. जी. वुडहाऊस’ - भारती पांडे, ‘डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे’ - वीणा गवाणकर, ‘डॉ. केशव बळीराम हेडगेवार’ - आशुतोष अडोणी, ‘अहमदजान थिरकवाँ’ - नीतीन वारे, ‘जे. कृष्णमूर्ती’ - रवींद्र लाखे, ‘आचार्य अत्रे’ - श्रीकांत बोजेवार, ‘साने गुरुजी’ - हेरंब कुलकर्णी, ‘मार्गारिट मिशेल’ - वर्षा गजेंद्रगडकर, ‘हाफिज जालन्दरी’ - भारत सासणे, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ - सुनीलकुमार लवटे, ‘शिवराम कारंथ’ - उमा कुलकर्णी, ‘इरावती कर्वे’ - मंगला आठलेकर, ‘हिराबाई बडोदेकर’ - मुकुंद संगोराम, ‘व्हिक्टर फ्रँकले’ - शंतनु गुणे, ‘शकुंतलाबाई परांजपे’ - वृंदा भार्गवे, ‘रेचल कार्सन’ - विनया जंगले, ‘बा. सी. मर्ढेकर’ - सुधीर रसाळ, ‘बा.भ.बोरकर’ - अनुजा जोशी, ‘के.पी. भागवत’ - रत्नाकर पटवर्धन, ‘इंदिरा संत’ - आशा बगे, ‘दीनानाथ दलाल’ - चंद्रमोहन कुलकर्णी, ‘नानी पालखीवाला’ - युवराज नरवणकर, ‘जी. ए. कुलकर्णी’ - भारत सासणे, ‘रोहिणी भाटे’ - वंदना बोकील, ‘अन्नपूर्णा देवी’ - मोनिका गजेंद्रगडकर, ‘विजय तेंडुलकर’ - दासू वैद्य, ‘शरद जोशी’ - श्रीकांत उमरीकर, ‘रा. ग. जाधव’ - राम जगताप, ‘प्रा.खाग सिंग वाल्दिया’ - अश्विन पुंडलिक, ‘नामदेव ढसाळ’ - पी. विठ्ठल आणि ‘माणूस’ - अवधूत परळकर, अशा ५० पत्रांचा समावेश आहे. यातील प्रतिपाद्य व्यक्ती प्रातिनिधिक असून त्यांना महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींनी पत्रं लिहिली आहेत. महाकवी कालिदासापासून ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत वैविध्याने सजलेला हा ग्रंथ आहे. शब्दमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या देखण्या आणि संग्राह्य ग्रंथाला बेदरकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
पत्र. एक विलक्षण आतला विषय. जो पाठवतो त्याच्या नि ज्याला पाठवायचंय त्याच्याही. असा एकच भाव दोहो ठायी असल्याने त्यात ओलाव्यापासून आत्मीयतेपर्यंत सारं काही घडण्याचा संभव. ओलाव्याने परस्परांमधलं नातं घट्ट होत जात-जात ते आत्मियतेपर्यंत म्हणजे ‘आत्म’पर्यंत जात असेल, तर त्यात सारेच विषय विरघळतात. मग ते पत्र गदगद किंवा उमाळा या स्तरावर न राहता व्यष्टी ते समष्टी असा एक व्यापक पट कवेत घेत जातं. पत्राचे असे हे व्योम होणे, म्हणूनच त्याला एका स्वतंत्र वाङ्मयप्रकाराच्या पातळीवर घेऊन जाणारे ठरले असावे.
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या सिद्धान्तापलीकडे जसे काही नाही, तसेच काहीसे पत्राने केले. पत्रामुळे अगणितांची आयुष्ये उभी राहिलीत, तशी अनेकांची उद्ध्वस्तही झाली. म्हणजे ‘निर्माण ते विसर्जन’ आणि पुन्हा ‘विसर्जन ते सर्जन’ असा सर्वंकष पट पत्रात सामावलेला दिसतो. म्हणूनच तर चांगदेवाच्या कोऱ्या पत्रापासून पुढे ज्यांची स्वतंत्र पुस्तके झालीत, अशा तावच्या ताव पत्रव्यवहाराला मराठी साहित्यात विशेष स्थान आहे. कवितेच्या आत जसा तत्त्वज्ञानाचा सुप्त झरा अखंड झुळझुळत असतो, ती निखळता पत्रात असते, म्हणूनही ते एकाचवेळी उंच आणि सखोल होत जाते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
खरे तर लिहिणारा आणि वाचणारा अशा दोहोंचेच हृद्गत पत्रात असते. त्यामुळे त्यात नात्यातल्या तात्कालिक प्रसंगांचा, त्यातून निघणाऱ्या, जाणाऱ्या अर्थाचा, प्रसंगनिष्ठ तपशिलाचा आढळ अधिक असतो; पण काळाच्या पात्रात त्यातली तात्कालिकता विरून जाते आणि उरतो तो प्रसंगातल्या जगण्याचा गंध. तो गंधच नव्या पिढ्यांचा दिग्दर्शक होतो.
‘पत्रवाङ्मया’विषयी...
पत्राचा हा प्रवास जसे आपले लक्ष वेधून घेतो; त्याप्रमाणे पत्र हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार होण्याची यात्राही व्यक्ती जीवनातल्या अनेक समांतर धाग्यांचे वेगवेगळे रंग दाखवत-दाखवत शेवटी त्याच्या धवलतेजवळ येऊन थांबते. पत्राचा साहित्य म्हणून अभ्यास करताना लक्षात येते की, पत्राला कोणताही विषय वर्ज्य राहिलेला नाही. हेच त्याचे वाङ्मयप्रकार म्हणून खरे सामर्थ्य आहे. ज्ञानदेवांच्या ‘ये हृदयीचे ते हृदयी’तली सूक्ष्मता आणि भव्यता तितक्याच उत्कटतेसह पत्रात आल्याने पत्र त्याचे वेगळेपण घेऊन उभे राहिले.
कुणाला तरी काहीतरी सांगायचेय या प्रमुख भूमिकेतून आजवरची पत्रे लिहिली गेली. त्यामुळे अव्यक्ताच्या बऱ्या-वाईट साऱ्याच खाणाखुणा पत्रात नमूद झालेल्या दिसतात. काळाची संगती आणि काळाचे कथन, यांतून काळाचा तूस न् तूस वेगळा करून पाहणे पत्रामुळेच सोयीचे झाले. त्यातून समोर उभा ठाकला तो इतिहास.
इतिहासाचा प्रस्तर तावून-सुलाखून पाहण्यासाठी पत्रवाङ्मयाने फारच मोलाची मदत केलेली दिसते. त्यामध्ये प्रत्येक राजेशाहीचा पत्रव्यवहार हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय असून विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारचे संशोधन काही प्रमाणात झालेदेखील आहे. यावरून इतिहास आणि पत्र यांचा अन्योन्यसंबंध समोर येतो.
प्राचीन काळापासून आधुनिक साहित्यापर्यंत अशा पत्रवाङ्मयाने मोलाचा ऐवज वाचकांच्या हाती दिला आहे. त्यामध्ये ‘काव्येतिहास संग्रहातील पत्रव्यवहार’, ‘हरिभाऊंची पत्रे’, ‘कुसुमानिल’, ‘विश्रब्ध शारदा खंड - १, २, ३’, ‘श्यामकांताची पत्रे’, हे पत्रवाङ्मय एका वेगळ्या पद्धतीने अभ्यासले गेले. त्याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांचा पत्रव्यवहारदेखील असाच मूल्यवर्धन करणारा झाला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आपल्या विचारांच्या प्रतिपादनासाठी पत्र हा वाङ्मयप्रकार निवडून तो लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेय मराठीतल्या एका नामवंत विचारवंताला जाते ते म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख हे होय. ‘लोकहितवादींची शतपत्रे’ हा मराठीतील एक महत्त्वाचा ठेवा आहे. त्याची नोंद घेतल्याशिवाय मराठी साहित्याचा वैचारिक वाङ्मयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.
पत्र या वाङ्मयप्रकारची महत्ता आणखी एका पद्धतीने मराठी साहित्यिकांनी अधोरेखित केली आहे. त्यात ललित साहित्यकृतींच्या निर्माणासाठी ‘पत्र’ वापरल्याचे दिसते. कविता, कथा, कादंबरी या प्रकारांमधील लेखनासाठी मराठीतल्या साहित्यिकांनी पत्र हा वाङ्मयप्रकार वापरल्याचे दिसते. म्हणजे एका प्रमुख वाङ्मयप्रकाराच्या पोटात हा आणखी एक स्वतंत्र वाङ्मयप्रकार. त्याचे उदाहरण सांगताना सुरुवात करावी लागेल ती ‘इंदू काळे, सरला भोळे’ या कादंबरीच्या उल्लेखाने. वामन मल्हार जोशी यांची ही अत्यंत गाजलेली कादंबरी. मराठीतील ही पहिलीच पत्रात्मक कादंबरी आहे.
दुसरी महत्त्वाची कादंबरी म्हणजे पु.शि.रेगे यांची ‘सावित्री’ होय. सावित्री ही त्यातल्या तरल, तलमतेमुळे विशेष वाचकप्रिय झाली. रेगे हे मूलत: कवी. एखादा कवी जेव्हा इतर साहित्यप्रकार हाताळतो, त्या वेळी त्याचे कवी असणेदेखील त्या साहित्यप्रकारात प्रकर्षाने डोकावते. ‘सावित्री’च्या बाबतीत हेच झाले. विलक्षण काव्यात्म लय घेऊन उतरलेली ही कादंबरीदेखील रेग्यांना पत्रात्मक करावीशी वाटली, यातच या वाङ्मयप्रकाराचे महत्त्व ठसठशीत होते.
पु.भा.भावेंची ‘अकुलिना’, ‘तेरूओ’, चारुता सागर यांची ‘पत्र’ आणि गौरी देशपांडे यांची ‘कारावासातून पत्रे’ हे लेखन कथा, दीर्घकथा यांच्या सीमा पुढे-मागे करते. या लेखनातून तिघांनीही वापरलेला पत्रप्रकार कथेला नवे रूप देणारा ठरला आहे. भावे आणि गौरी देशपांडे या दोघांचीही लेखनप्रकृती निरनिराळी आहे. भाषेचा आणि जीवनाकडे पाहाण्याचा पोत वेगळा आहे; पण ते दोघे जेव्हा पत्र हा वाङ्मयप्रकार उपयोगात आणून वाङ्मयनिर्मिती करतात, त्या वेळी पत्र कसे, कुठे, केव्हा आणि किती वळवता येते, याचा प्रत्यय येत जातो.
ललित साहित्याशिवाय समीक्षेसारख्या प्रकारातही पत्राचा वापर झालेला दिसतो. कथाकार विद्याधर पुंडलिक यांनी आस्वादक समीक्षेसाठी पत्राचाच आकृतिबंध वापरला आहे. नरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्रातल्या ज्ञानवंतांना लिहिलेली पत्रे फार महत्त्वाची असून, त्यातही ते समीक्षेला या पत्रवाङ्मयात बसवताना दिसतात. समीक्षक सुधीर रसाळ यांच्या ‘कवितेतील प्रतिमासृष्टी’ या विषयावरील प्रबंधाचे विवेचन कुरुंदकर यांनी पत्राद्वारे केले आहे. हे पत्र म्हणजे समीक्षेचा, संशोधनाचा एक उत्तम नमुना असून, ७४ मुद्द्यांमध्ये कुरुंदकर या प्रबंधाची दीर्घ मीमांसा करते झाले आहेत. ही मीमांसा करताना आपण पत्र लिहित आहोत, हे त्यांचे भान कुठेही सुटले नसून पत्रात असणारा जिव्हाळा प्रबंधाच्या तर्काधिष्ठीत दीर्घ मीमांसेतदेखील आला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जी.ए.कुलकर्णी हे पत्रवाङ्मयातील एक महत्त्वाचे नाव. त्यांनी सुनीता देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला असून त्यात जी.ए. आणि सुनीताबाई यांच्यातील वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा आहेत. एखाद्या विषयाच्या निमित्ताने कवेत घेतला जाणारा मोठा आशय हा या पत्रांचा गाभा असून त्याद्वारे एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दलचा जिव्हाळा, आदर प्रतीत होत जातो.
जी.एं.चा जसा सुनीताबाईंशी पत्रव्यवहार होता, तसाच तो कवी ग्रेस यांच्याशीदेखील होता. ‘पत्रवेळा’ या नावाने जी.ए. आणि ग्रेस यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला आहे. मराठीतील ही काही पत्रवाङ्मयाच्या बाबतीतील महत्त्वाची उदाहरणे.
याशिवाय लेखकांना वैयक्तिक पातळीवर प्राप्त झालेल्या पत्रांचीदेखील मराठीत पुस्तके झालीत. यांमध्ये ना. धों. महानोर यांना आलेली पत्रे ‘रानगंधाचे गारूड’ या पुस्तकात; परेश प्रभू संपादित ‘बाकीसंचित’ (बा.भ.बोरकर यांना आलेली पत्रे), ‘एकट्याचे गाणे’ (कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित) या नावाने प्रसिद्ध आहेत. काल्पनिक पात्र निर्माण करून ‘श्यामची पत्रे’, ‘वत्सलावहिनींची पत्रे’ असा पत्रव्यवहारही उपलब्ध आहे.
मराठीच्या या सगळ्या पत्रवाङ्मयाला डोळ्यांपुढे ठेवूनच प्रस्तुत ग्रंथात ‘कल्पनापत्रां’चा समावेश करण्यात आला आहे.
‘शब्द कल्पिताचे’विषयी...
सावरकरांच्या कवितांवर बोलताना त्यांच्या ‘माझे मृत्युपत्र’ या कवितेजवळ मी अनेकदा भावव्याकूळ होतो. त्यांनी जे काही लिहिले, त्यामुळे ‘पत्र’ हा प्रकार मनात पक्का मांड मांडून बसला. त्यातच ‘शब्दमल्हार’च्या पहिल्या अंकात डॉ. अरुणा ढेरे यांनी गोपाळ गणेश आगरकर यांना लिहिलेले एक पत्र छापण्याची संधी मिळाली, तेव्हाच या वाङ्मय प्रकारावर काम करायचे ठरवले. त्यातूनच हा ग्रंथ सिद्ध झाला.
आजच्या पेन-कागद हरवल्याच्या काळात पत्रंही हरवलं आणि त्यामागचं नातंही. ‘संवेदन’ स्टॅच्यू होण्याच्या या निष्ठूर काळात पुन्हा एकदा पत्र अवतरायला हवं; ही जाणीव संपादक म्हणून उचंबळून आली आणि हा ग्रंथप्रकल्प पुढे सरकला. मग सुरू झाला शोध पत्रवाङ्मयाचा. एक जिज्ञासाच निर्माण झाली की, काय असेल या प्रकारात. वाचता-वाचता बराच आनंद हाती लागला; मात्र त्याच्या मुळाशी होती ती जिज्ञासा. म्हणूनच ही प्रस्तावना म्हणजे ‘अथातो पत्रजिज्ञासा...’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
काळ नेमके काय करतो याचे उत्तर या पत्रांनी दिले. त्याचे व्यापकपण त्यातून माझ्यापुढे खुले केले. या ग्रंथातून ती ती माणसे आणि त्या माणसांनी आपल्या विचार, कृतीने गाजवलेला एक संबंध काळ सतत वाहताना दिसतो. हा काळ जोखताना, वाचताना आणि त्या काळात त्यांनी केलेले काम पाहताना जीवन संघर्षाची अगणित रूपं दिसतात.
काळाचे सरळ सरळ दोन तुकडे प्रस्तुत ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे ज्यांना पत्र लिहिली आहेत, त्यांचा काळ आणि ज्यांनी लिहिली आहेत तो आजचा काळ. त्यातील सामाजिक, वैचारिक, भावनिक, आत्मिक शोध इथे आहे. दोन काळांच्या समूहमनाशीही या पत्रांचे नाते घट्ट जुळलेले आहे. त्या संदर्भात वाचणारा त्याचा काळ इथे शोधतो आणि मग आपल्या पुढच्या-मागच्या काळाकडे नजर टाकतो. त्यामुळे त्या त्या काळातले जीवन त्याच्यापुढे साक्षात होत जाते. म्हणूनच मग या ग्रंथातील कोणतेही पत्र हे विशिष्ट काळापुरते राहत नाही. ते कालप्रवाहातली तात्कालिकता सोडून देत एक सत्व घेऊन उभे राहते. त्या सत्वाला धरूनच बोलायचे झाले, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीला ते सातत्याने काही ना काहीतरी देत राहील हे नक्की.
आणखी एक गोष्ट म्हणजे ही पत्रं त्या त्या व्यक्तिमत्त्वांबरोबरच त्यांच्या काळाचे चित्रण नव्हे, तर शोध घेत जातात. त्यातून लक्षात येते की अनुभूतीचा एक-एक तुकडा या पत्रांच्या कालावकाशात आहे. तो तुकडा म्हणजे त्या माणसाचे संपूर्ण जीवन नव्हे आणि लिहिणाऱ्याचा व्यक्त झालेला मानस म्हणजेदेखील त्याचे जीवन नव्हे, तर पत्रातील शब्दांच्या आणि भावार्थाच्याही पलीकडे ही माणसं, त्यांचे काम दशांगुळे उरले आहे. तेच काळाने आपल्या अंगप्रत्यंगावर कोरून ठेवले आहे; इथे ते वाचकाला शोधावे लागणार आहे. त्यामुळेच ही पत्रं आपल्याला शोधाकडून शोधाकडे नेतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
शोधाच्या बाबतीतला दुसरा मुद्दा असा की त्या-त्या काळातील व्यक्तींचे परस्परांशी असणारे संबंध, त्यासंबंधांचे निर्माण झालेले जाळे, त्यातले ताण, गुंता, संघर्ष, 'स्व'चा शोध अशा जीवननाट्याचा अथांग आणि विराट असा पट या पत्रांमधल्या व्यक्तींमध्ये दिसतो. प्रत्येक माणूस वेगळा असल्याचे आपल्याला वरकरणी दिसते; पण त्या माणसाने हाती घेतलेले काम जितक्या तळासून तो पुढे घेऊन गेला; त्यातली त्याची आंतरिक गुंतवणूक प्रत्येक माणसागणिक मात्र सारखी आहे.
वर्तमानातील शीर्षस्थ व्यक्तींनी भूतकाळातील शीर्षस्थ व्यक्तींशी साधलेला हा संवाद आहे. यापूर्वी येथे केलेला पत्रवाङ्मयाचा विचार, हा त्या त्या काळातील व्यक्तींनी कोणत्यातरी कारणास्तव केलेला खराखुरा पत्रव्यवहार आहे. त्याप्रमाणे ही पत्रं नाहीत. त्यामुळे ग्रंथाचे शीर्षक ‘शब्द कल्पिताचे’ असे ठेवले आहे. ग्रंथाच्या निमित्ताने कल्पना करून ही पत्रं मुद्दाम लिहून घेतलेली असल्याने नेहमीच्या त्रोटक आणि कारणमीमांसा करणाऱ्या संक्षिप्त पत्रांपेक्षा या पत्रांचे स्वरूप विस्तारित आहे.
पत्र हा वाङ्मयप्रकार वापरून दोन काळांचा संवाद व्हावा, ही या संकल्पनेमागील मुख्य भूमिका होती. त्या भूमिकेला न्याय देण्यात बरेच लेखक आपले ‘निर्मिती’चे सत्व घेऊन उतरले, तर काहींनी मात्र आपले पत्र लेखाच्या वा निबंधाच्या पातळीवर नेले. पत्रात एक ‘ओलावा’ असतो आणि तो वर नमूद केलेल्या कारणांनी येतो. तसा तो नसेल, तर मग लेख वा निबंधातला कोरडेपणा येणे अपरिहार्य ठरते. तसे काही पत्रांचे झाले आहे, हे संपादक म्हणून मला मान्य केलेच पाहिजे. काही पत्रं मात्र फारच भावविभोर झाली आहेत. ती वाचताना आपण हळहळतो. अनामिक हुरहूर लागून राहते. डोळ्यांच्या कडाही ओलावतात. आपल्या विचारचक्राचा ते भाग होतात. अशी मनात रूतून बसणारी पत्रेही या संग्रहात बरीच आहेत. लिहिणारा आपले भावबळ घेऊन तिथे उतरला असल्याचे त्यातून स्पष्ट दिसते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अनुक्रमणिकेतील नावे वाचलीत की, ‘यांना पत्र का नाही?’ असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. पण त्याला अर्थ नाही. ग्रंथ सर्वसमावेशक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र कुठेतरी थांबून वेळेत काम पूर्ण करायचे असल्याने पन्नास पत्रांचा हा ग्रंथ साकार झाला आहे. खरं तर भारतीय स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने पंचाहत्तर पत्रांचा संकल्प सोडला होता; पण होकार मिळूनही पंचवीस पत्रं मिळू शकली नाहीत, याची खरोखर हळहळ वाटते.
राहून गेलेल्या त्या पंचवीस व्यक्तीदेखील अतीव मोलाचे कार्य करणाऱ्या होत्या. संपादक म्हणून याचा सकारात्मक अर्थ मी असा घेतला आहे की, अजूनही पन्नास पत्रांचा दुसरा खंड प्रकाशित करण्याची संधी या न मिळालेल्या पंचवीस पत्रांनी आपल्याला दिली आहे.
‘शब्द कल्पिताचे : न पाठवलेली पत्रे’ : संपादक - स्वानंद बेदरकर
कलानिर्देशन – चंद्रमोहन कुलकर्णी
मुखपृष्ठ आणि मांडणी – फाल्गुन ग्राफिक्स
शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
पाने – ४४० (आकार - डबल क्राऊन, बांधणी - हार्ड बाउंड)
मूल्य – १५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment