हुकूमशहा व्हायचे जवळजवळ कोणतेही गुणधर्म ट्रम्पकडे नाहीत. त्याची बुद्धिमत्ता सामान्य आहे. बुद्धिमत्ता म्हणजे औपचारिक शिक्षण नव्हे. हुकूमशहाला औपचारिक शिक्षणाची गरज नसते. उदाहरणार्थ, हिटलर. त्याची आर्थिक परिस्थिती साधारण, तेव्हा औपचारिक शिक्षणही जेमतेम. पण तरुणपणी त्यानं वाचन प्रचंड केलेलं. त्याला इतिहासाची जाणीव होती. जणू काही मोठेपणी एका बलवान राष्ट्राची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडणार, याची जाणीव त्याला त्याच्या तरुण वयातच झाली होती.
ट्रम्पच्या बाबतीतला प्रकार वेगळाच होता. त्याच्या बापाकडे गडगंज पैसा होता. पण तो स्वतः खुशालचेंडू असल्याने त्याच्या औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षणाबद्दल एकूण आनंदीआनंदच होता. त्याचे सर्व निर्णय त्याच्या अंत:प्रेरणेत उगम पावत. म्हणूनच जणू काही ते बरोबर असण्याची शक्यता दांडगी होती!
इतिहास सोडूनच द्या, ट्रम्पला जागतिक सद्यपरिस्थितीची माहितीसुद्धा जेमतेमच आहे. (या बाबतीत तो अमेरिकेच्या थोर परंपरेत बसणारा आहे. भारताचा पंतप्रधान कोण, या निवडणूकपूर्व मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाचे उमेदवार जॉर्ज बुशनी, असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवण्याची गरज काय? अशा प्रतिप्रश्नाने दिलं होतं!) इतर सामान्य अमेरिकन माणसाप्रमाणे ट्रम्पचे वाचन सवंग फिल्मी किंवा गुन्हेगारी मासिकांपर्यंतच सीमित आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफसारख्या लुटुपुटीच्या आणि दिखाऊ कुस्त्यांच्या संघटनेशी त्याचे एके काळी जवळचे संबंध होते. आणि ते पाहणाऱ्या पब्लिकमध्ये तो विशेष लोकप्रिय होता. त्याने कधीही राजकारण किंवा समाजकारण यांच्यावर किंवा यांच्याशी संलग्न असलेल्या विषयांवर लेख लिहिल्याचे किंवा व्याख्यान दिल्याचे ऐकीवात नाही.
राजकारणातही त्याला फक्त चलनी अमेरिकन शब्दप्रयोग (लोकशाही, स्वातंत्र्य, आपली बिनचूक राज्यघटना, आपले दूरदर्शी राष्ट्रपिते, वगैरे) पाठ आहेत. पण त्याचं त्या विषयांचं ज्ञानही उथळच आहे. ते ज्ञान अधिक पक्कं करावं, असं त्याला चुकूनही कधी वाटलं नाही. हिटलर आपल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे, असं म्हणतात. ट्रम्पकडे ती कला नाही. त्याची विनोदबुद्धी खालच्या दर्जाची आहे. (पण तसल्याच दर्जाच्या विनोदाला आजकाल बाजारात किंमत असते, हेही तितकंच खरं.) कॉलेजशिक्षित विद्यार्थ्यांचा किंवा पदवीधरांचा त्याच्याकडे ओढा नाही किंवा त्याचा त्यांच्याकडे!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
दुनिया गेली उडत...
राजकारणात येण्यापूर्वीसुद्धा राजकीय पुढाऱ्यांबरोबर त्याच्या ओळखी होत्या, पण त्या कामापुरत्या. बिल्डिंग बांधणं हा त्याचा व्यवसाय असल्याने त्याची गरज होती. दोन्ही पक्षांत. त्याच्या तिसऱ्या (आणि आतापर्यंत शेवटच्या) २००५मध्ये झालेल्या लग्नात क्लिंटन पती-पत्नीने हजेरी लावली होती. (त्या वेळेस श्रीयुत क्लिंटन राजकारणातून निवृत्त झाले होते आणि श्रीमतींचा राजकारणात प्रवेश झाला होता.) अमेरिकेचा अध्यक्ष व्हायचे डोहाळे ट्रम्पला सन १९८०पासून लागले होते. पण अमेरिकेचा अध्यक्ष हे पद आपल्या लायकीपेक्षा कमी आहे, असा त्याचा बोलण्याचा थाट असे. कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार हे काही त्याचं पक्कं ठरत नव्हतं. आपण कोणत्याही पक्षातून निवडून येऊ, अशी त्याला खात्री होती. उलट ज्या पक्षातर्फे आपण लढू, त्या पक्षावरच आपण कृपा करणार, अशी त्याची मिजास होती. रिपब्लिकन पक्षात मूर्ख लोक भरले असल्यामुळे त्या पक्षाची उमेदवारी मिळण्यास आपल्याला फारसा विरोध होणार नाही, अशा समजुतीने तो त्या पक्षात गेला, असं म्हटलं जातं.
हा हुकूमशहाचा गुणधर्म नव्हे
या सर्व पाऊलखुणा काही हुकूमशहाच्या नक्कीच नाहीत. चार वर्षांच्या वादळी राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीत हुकूमशहा व्हायची संधी ट्रम्पला अनेक वेळा येऊन गेली. अगदी शेवटीशेवटी २०२०मध्ये सुवर्णसंधी म्हणावी, अशी संधी त्याला दोनदा येऊन गेली. कोणत्याही हाडाच्या होतकरू हुकूमशहाने त्यांचा फायदा उचलला असता.
पहिली संधी दिली कोविडच्या महामारीने. ही संधी साधून हंगेरीच्या व्हिक्टर ऑर्बन नामक टिनपॉट हुकूमशहाने आणीबाणी जाहीर करून लोकांच्या नागरी हक्कांवर गदा आणली होती. पण ट्रम्पने हे पाऊल उचलले नाही. त्याबद्दल त्याच्यावर टीकेची झोड उठली होती, विशेषतः डेमोक्रॅटिक पक्षाकडूनच!
त्यांच्यातल्याच राष्ट्राध्यक्ष ट्रुमनने कोरियन युद्ध चालू असताना ‘संरक्षण उत्पादन कायदा १९५०’ हा जुलमी कायदा मंजूर करून तो वापरला होता. त्याची पुनरावृत्ती ट्रम्पने करावी, असं दडपण त्याच्यावर सर्व ठिकाणांहून (यात त्याचा भावी प्रतिस्पर्धी जो बायडनही होता) येत असतानासुद्धा त्याने तो कायदा वापरला नाही. हे काही हाडाच्या हुकूमशहाचं लक्षण नव्हे.
हीच परिस्थिती आली, त्याच वर्षी झालेल्या वांशिक दंगलीच्या वेळी. अशाच प्रकारच्या पण अनेक पटीने कमी हिंसक दंगलीत अमेरिकेतल्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्कर पाठवल्याची उदाहरणं आहेत. ट्रम्पने हवाई दल वापरून निदर्शकांवर गोळीबार करावा, असा आग्रह त्याच्या पक्षातील काही नेत्यांनी केला. पण ट्रम्पने संयम दाखवला. तो अगदी गांधीजींसारखा अहिंसावादी नव्हता. पण त्याला एकूण हिंसेचा तिटकारा होता, आणि आजूबाजूच्या लोकांचा असह्य असा दबाव आल्याशिवाय तो युद्धाच्या मागे लागायचा नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
सिरियाच्या विमानतळावर हल्ला करायच्या वेळी त्याने हात आखडता घेतला होता, हे सर्वश्रुत आहे. आणि जेव्हा हल्ला केला, तेव्हा तो करायच्या अगोदर त्याने रशियाला आणि सिरियाला पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे मनुष्यहानी टळली, अणुयुद्धापासून होऊ शकणारा पृथ्वीचा विनाश टळला. त्याचबरोबर त्याला अमेरिकन टीकाकारांच्या देशद्रोही, पुतिनचा हस्तक असल्या टीकेला तोंड द्यावे लागले. देशप्रेमाच्या देखाव्यात कमी पडणे, हा काही हुकूमशहाचा गुणधर्म असू शकत नाही!
आया हैं राजा...
अगदी मुळाशीच जायचं तर असं म्हणावं लागेल की, हुकूमशहा व्हायची ट्रम्पची मनोवृत्तीच नव्हती. मुख्य म्हणजे हुकूमशहा व्हायचं म्हणजे काम करणं आलं! ते त्याने आयुष्यात कधी केलं नव्हतं! त्याच्या कल्पनाविश्वात राष्ट्राध्यक्ष म्हणजे राजा. एक विधिपूर्वक जागा. फार जबाबदारी नाही. राज्याविषयी निर्णय घ्यायला मंत्रीमंडळ आहे, आपण फक्त सह्या करायच्या, समारंभाच्या फिती कापायच्या, पाटर्चा झोडायच्या. जमतील तितक्या नाटकशाळा ठेवायच्या. त्याला इतरांकडून भरपूर मान मिळाला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असे. तोही परक्यांना वारेमाप मान द्यायचा.
उत्तर कोरियाच्या किम जाँग उनला इतर पाश्चात्य राष्ट्र महारोग्यासारखं वागवत असताना, ट्रम्पने त्याचा हात हातात घेऊन दक्षिण कोरीयातून त्याच्या देशात प्रवेश केला. जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने केवढा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण होता तो! त्यात ट्रम्पचा गौरव करण्याऐवजी त्याने असल्या हलक्या माणसाला जवळ केलं आणि अमेरिकेची इभ्रत धुळीला मिळवली, असं त्याच्याविरुद्ध टीकास्त्र सोडलं. असं वर्णन कोणत्या हुकूमशहाशी जुळतं?
ट्रम्प निवडून आला, तर काय भयानक परिणाम होतील, या विषयावर अनेक ‘न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर्स’ लिहिले गेले. लेखकांची पोटं भरण्यालीकडे या पुस्तकांतून काही निष्पन्न झालं नाही. त्याच्या विरोधी लिहिणाऱ्या लेखकांना तो तुरुंगात पाठवेल, ही भीतीही अनाठायी ठरली. मेक्सिको आणि अमेरिका यांच्यामध्ये भिंत उभी करायची किंवा मुसलमानांना अमेरिकेत यायला बंदी घालायची, असल्या शेख महमदी कल्पनांना, त्याने त्या गोष्टींना कायद्याची बाधा येते, म्हणून केव्हाच फाटा दिला.
जॉर्ज बुशने खोटी कारणं सांगून इराकवर हल्ला केला आणि हकनाक दहा लाखांचा बळी घेतला. बराक ओबामा त्या वेळी समाजसेवक असल्याने या युद्धाबद्दलचे त्याचे मत कोणी विचारले नव्हते. तो राजकारणात येईपर्यंत हे युद्ध बदनाम झाले होते, तेव्हा त्याचा धि:कार करणे, ही स्वस्तातली बाब होती. पण ओबामाच्या हातात सत्ता आल्यानंतर त्याने लिबियावर स्वारी करून त्या देशाचं वाटोळं केलं. त्यानंतर सिरिया या देशाचं वाटोळं करायच्या मागे लागला. गेली बारा वर्षं हा प्रयोग चालला आहे. त्यात ट्रम्पच्याच कालावधीत चार वर्षांचा काय तो खंड पडला होता, तेवढाच.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
युक्रेनमधलं सध्याचं युद्ध हा बायडन यांच्या भ्रष्टाचारी आणि अतिधाडसी राजकारणाचा परिपाक आहे. ट्रम्पने त्याच्या कारकिर्दीत कोणतंही नवीन युद्ध चालू केलं नाही. जुनी युद्धं वाढवायचा प्रयत्न केला नाही. असं असूनही, ट्रम्प हा हुकूमशहा, ओबामा हा नोबेल शांती पारितोषिक विजेता, जॉर्ज बुश हा चांगल्या मनाचा, भोळसट सार्वजनिक काका आणि बायडन प्रेमळ आजोबा!
अपप्रचाराच्या जाळ्यात अलगद...
सत्य परिस्थितीचा विपर्यास करणे, हे तंत्र परक्या शत्रूंबद्दल सर्रास वापरले जाते. हल्लीचीच एक गोष्ट. अमेरिकेतच एक आग लागली होती. तिचे फोटो आणि चित्रफिती एका वृत्तवाहिनीने सिरियामध्ये तिथल्या हुकूमशहा बशार अल-आसादने मुलांच्या हॉस्पिटलला लावलेली आग, या शीर्षकाखाली वापरल्या. ही गोष्ट अमेरिकेतील एका स्थानिक वाचकाच्या लक्षात आली. त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर ती कथा त्या वाहिनीवरून नाहीशी झाली, पण दिलगिरी वगैरे व्यक्त करण्याचे नाव नाही. हेच तंत्र ट्रम्पविरुद्ध वापरायचं ठरवलं.
ट्रम्पने आपली उमेदवारी जाहीर केल्यापासून आपल्याला कुचेष्टा करायला एक विदूषक मिळाला, या आनंदात सर्व वृत्तपत्र व्यवसाय होता. त्याच्या आसपास वार्ताहरांची गर्दी जमायला सुरुवात झाली. त्याला फुकट प्रसिद्धी मिळाली. जनतेत त्याला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. हा उलटा परिणाम झाला, हे बघून ट्रम्पचे पाय खाली ओढायचं ठरलं. त्याच्या पूर्वीच्या वक्तव्यांची छाननी व्हायला सुरुवात झाली, त्यातून सोयीस्कर असा उलटसुलटा अर्थ काढला गेला. त्याने म्हटलं, रशियाबरोबर युद्ध नको. असं म्हणण्यात नवीन काही नव्हतं, किंवा चुकीचंही काही नव्हतं.
अणुबॉम्ब निघाल्यापासून अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने आयसेनहावर, केनेडीपासून ते कार्टरपर्यंत वेगळं काही म्हटलं नव्हतं. वार्ताहरांच्याच भाऊबंद गल्लाभरू लेखकांनी ‘पृथ्वीचा विनाश’, अशा धर्तीची शेकडो पुस्तकं लिहिली होती. पण ज्याअर्थी अणुयुद्ध नको, असं ट्रम्प म्हणतोय, त्याअर्थी त्यात काही तरी गोलमाल आहे. त्याने रशियाकडून पैसे खाल्ले असले पाहिजेत! रशियाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नको. यापुढे रशिया या नावाचा एक देश आहे. आणि त्याच्याकडे अणुशस्त्रं आहेत हे म्हणायचीही चोरी झाली. इथून जगप्रसिद्ध ‘रशियागेट’ या नाटकाला सुरुवात झाली.
२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहू लागले. ट्रम्पच्या विरुद्ध उभी राहिली डेमोक्रॅटिक पक्षाची अनभिषिक्त सम्राज्ञी हिलरी क्लिंटन! ही निवडणूक अद्वितीय होणार याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नव्हता. ती तशीच झाली, पण वेगळ्या अर्थाने! जगातील सर्वोच्चपदी विराजमान व्हायचा, मान एका महिलेला मिळणार होता. तिचा विरोधक राजकारणातला नवशिका. बोलण्यावर ताबा नसलेला. पक्षांतर्गत झालेल्या प्राथमिक चाचणींतील वादांमुळे म्हणा, किंवा ट्रम्पच्या बालिशपणामुळे म्हणा, खुद्द त्याच्या पक्षातल्या अनेक अधिकारी व्यक्ती त्याला पाठिंबा देण्याबाबत अनुत्सुक होत्या. त्यात पुन्हा ‘रशियागेट’च्या छापखान्यातून दररोज ट्रम्पच्या देशद्रोहाची, रशिया चीनवरच्या प्रेमाची एक तरी थरारक कथा बाहेर पडत असे. बऱ्याचशा कथा हेरखात्यातील आतल्या गोटातल्या वरच्या थरावरून आल्या असत. अशा थरावरच्या लोकांवर जनतेचा एक प्रकारचा भाबडा विश्वास असतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
नको त्यांच्याशी पंगा...
अमेरिकेची सुरक्षायंत्रणा ही अमेरिकेच्या इतिहासात पदार्पण करणारी त्यातल्या त्यात नवीन संस्था. ही अमेरिकेच्या राज्यघटनेत नाही. ही तशी चोरपावलांनी घुसली आणि सर्वाच्या डोक्यावर बसली. अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांनी देश चालवण्यासाठी तीन संस्था निवडल्या. एक राज्यशकट चालवणारी देशाचा राष्ट्राध्यक्ष हा या संस्थेचा प्रमुख. दुसरी संस्था, संसद ही कायदा तयार करण्यासाठी. तिसरी, न्यायव्यवस्था. यांपैकी कुणी एकीने स्वतःकडे सत्ता खेचू नये, याकरता बाकी दोघींनी तिला कायम जरबेत ठेवायचे यासाठी तरतुदी होत्या.
अमेरिका जशी वयात आली, तशा तिच्या गरजा वाढल्या. प्रथम म्हणजे लढाईला सैन्य ते घटनेप्रमाणे राष्ट्राध्यक्षाच्या अखत्यारीत आले. पण अमेरिकेची लढाईची व्याप्ती दुसऱ्या महायुद्धापर्यंत स्वल्पच होती. ती पुढे वाढली आणि संस्थेला शिंगं फुटली. तिच्या गरजा आणि खर्च वाढले. इतपत ठीक होतं. पण तिचा स्वयंभू असल्यासारखे वागण्याचा कल वाढला. जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष तिच्या मनासारखे वागेल तोपर्यंत ती त्याच्या धाकात राहील!
अमेरिकेच्या कोरियन युद्धात राष्ट्राध्यक्ष टुमन यांनी दिलेला आदेश पसंत पडला नाही, म्हणून अमेरिकन सेनानी मॅकार्थर जेव्हा तो मोडायला निघाला, तेव्हा द्रुमन यांनी त्याला नोकरीवरून कमी केले. तो जेव्हा कोरिया सोडून मायदेशी परत आला, तेव्हा जनतेने त्याचं अभूतपूर्व असं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत टुमन यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला.
त्यानंतर अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने कोणत्याही सेनानीशी पंगा घ्यायचा प्रयत्न केला नाही. सैन्य ही एक स्वयंभू संस्था झाली. म्हणून ट्रम्पने जेव्हा त्याच्या सेनानीला सिरियातून सैन्य मागे घेण्यास सांगितलं, तेव्हा सेनानीने उत्तर दिलं की, विचार करून सांगतो, आणि ट्रम्पला गप्प बसण्याऐवजी पर्याय नव्हता.
सैन्यासारख्याच अनेक संस्था अंतर्गत सुरक्षेसाठी ठेवलेल्या आहेत. एफबीआय ही त्या सगळ्यांत प्रसिद्ध, किंवा कुप्रसिद्ध. हिच्याकडे अमेरिकेतल्या सर्वांच्या कुंडल्या असतात. राजकारणी धरून हिचा पहिला प्रमुख होता जे. एझर हूव्हर. याचं नाव ऐकूनच सगळे जण त्या काळी चळाचळा कापत. त्याची नेमणूक ही खरी पाच वर्षांची, पण त्याने ही जागा मरेपर्यंत सोडली नाही. नंतरच्या काळात एफबीआयच्या प्रमुखाला चालता हो म्हणून सांगायचे धाडस ट्रम्पने एकदा केले. (आणि ते त्याच्या अंगाशी आलं!) विरोधी पक्षाच्याच नेत्याने त्याला समजावलं, उगीच त्यांच्या मागे लागू नकोस. तुला बुडवायचे पन्नास मार्ग त्यांच्याकडे आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अमेरिकेचे औद्योगीकरण जसे झाले, तशा वित्तसंस्था वाढल्या. त्यातल्या मुख्य म्हणजे वॉल स्ट्रीट आणि बँका. या सहसा रिपब्लिकन पक्षाला अनुकूल असत. २०१६ निवडणुकी अगोदर त्यांनी फक्त एकदा म्हणजे १९६४मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा दिला होता.
त्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भुईसपाट झाला. २०१६मध्ये तीच परिस्थिती येणार, असा अनेक विश्लेषकांचा अंदाज होता. आपल्याला ट्रम्प नको, ही भावना २०१६च्या निवडणुकीच्या वेळी सुरक्षायंत्रणेच्या सर्व संस्थांमध्येसुद्धा होती. पण ट्रम्प निवडून यायची शक्यता जशी वाढायला लागली, तशा त्यांच्या कारवाया वाढायला लागल्या.
अमेरिकेत ‘फिरता दरवाजा’ नावाचं एक परिभ्रमण चालतं. सरकारमधल्या नागरी किंवा लष्करी खात्यातलं महत्त्वाचं काम, ‘थिंक टँक’मध्ये नोकरी, प्रसार माध्यमांत सल्लागार, असं हे चक्र चालतं. त्यामुळे वरवर वेगळी वाटणारी मतं प्रत्यक्षात एकच असतात. माणसं एका खात्यातून निवृत्त झाली, तरी त्यांची कामं चालूच असतात. लष्कर, सुरक्षायंत्रणा, वित्तसंस्था, प्रसारमाध्यमं यांचा संगम होऊन झालेली जबरदस्त ताकदीची संस्था आज देशावर राज्य करत आहे.
हक्काची पंचिंग बॅग
तेव्हा अतिरेकी हुकूमशहा ट्रम्प हे नाटक केवळ पैसे आणि प्रसिद्धीसाठी होते. कोणत्याही युनिव्हर्सिटीत नोकरी पाहिजे असेल, किंवा वृत्तपत्रव्यवसायात काम हवे असेल, किंवा रंगभूमीवर अथवा चित्रपटात भूमिका पाहिजे असेल, तर ट्रम्प हा एक होतकरू हुकूमशहा असून त्याच्या मागे कोट्यवधी निर्बुद्ध अंधभक्त आहेत, असं म्हटल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
त्या अंधभक्तांत धर्मवादीही होते. (यांची अमेरिकेत संख्या २५ टक्क्यांच्या आसपास आहे.) त्यांना ट्रम्पविरुद्ध चिथवायचे प्रयत्न झाले. (ट्रम्पचं चारित्र्य हीन दर्जाचं होतं.) कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटी ते दयनीय आहेत, असे हिलरीने उद्गार काढले. खरं म्हणजे लोकांचं ट्रम्पवर खास प्रेम होतं, अशातला भाग नव्हता, तर त्यांचा प्रस्थापित राजकारण्यांवर राग होता आणि तो इथे व्यक्त होत होता. त्याचा सूड म्हणून तो निवडून आल्यानंतर, त्याला त्याच्या विरोधकांनी पावलोपावली त्रास द्यायला सुरुवात केली.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
तो देशद्रोही आहे, रशियाचा माणूस आहे, हा प्रचार दिवसरात्र चालू झाला. (प्रचाराचा कहर म्हणजे रशियाच्या मनात त्याला १९८० पासून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करायचं होतं आणि ते फक्त संधीची वाट पाहत होते, असे अहवाल प्रसिद्ध झाले!) त्याला एकदा नव्हे तर दोनदा इम्पीच केलं. म्हणजे, पदावरून काढायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला वेडा ठरवून आणि घटनेच्या २५व्या दुरुस्तीचा दुरुपयोग करून त्याला हाकलायचे बेत झाले.
या प्रक्रियेला संबंध मंत्रीमंडळाला सामील करावे लागते. ते होणं अशक्य कोटीतील गोष्ट होती. पण स्वप्न रंगवायला पैसे पडत नाहीत. (आणि या प्रसंगी उलट पैसे मिळत होते!) जगाच्या इतिहासातल्या कोणत्याही हुकूमशहाविरुद्ध असल्या कारवायांचा नुसता विचार जरी केला असता तरी तो विचार करणाऱ्याला गोळ्या खाव्या लागल्या असत्या.
कसला वंशवादी नि कसला फॅसिस्ट
या सर्व पसाऱ्यात युक्रेन हा ध्रुव ताऱ्यासारखा अढळपणे चमकत होता. युक्रेनच्या रामायणास २०१३मध्ये सुरुवात झाली. तेथे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार दंगाधोपा करून उलथवून लावलं गेलं. त्या दंग्यामागे अमेरिका, आणि अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्रपती बायडन, उघडपणे होते. अमेरिकेचे काही राजकारणी दंगेखोरांना उघडउघड चिथावणी देत असताना दिसत होते. उपपरराष्ट्रमंत्री त्यांना बिस्किटं वाटत होती. जेव्हा नवनाझींनी गोळीबार सुरू केला तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्रखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवर खलबतं चालू होती. (हे फोन चोरून अभिलिखित होत होते.) त्यानंतर सुरू झालेल्या यादवी युद्धात युक्रेनला लष्करी मदत करणं आलं. त्यांत ट्रम्प मुद्दाम हात आखडता घेतो, असा आरोप केला गेला.
बायडनचा हंटर नामक मुलगा युक्रेनमधील सरकारी उपक्रमांत काहीही काम न करता महिना एक लाख डॉलर्स कमवत होता. या गैरव्यवहाराची युक्रेन सरकारने चौकशी करू नये, म्हणून जो बायडन युक्रेनच्या अधिकारी व्यक्तींना दम देत असल्याच्या चित्रफिती प्रसिद्ध झाल्या होत्या. खरं म्हणजे ट्रम्पला असल्या उपदव्यापांत अजिबात स्वारस्य नव्हते. ‘सर्वप्रथम अमेरिका’ ही त्याची घोषणा. ही घोषणा त्याच्या मनाचा कोतेपणाच दाखवते, एवढंच नव्हे तर ती त्याच्या वंशवादी आणि फॅसिस्ट विचारांतून आली आहे, असा आरोप त्याच्यावर झाला.
बायडनसाहेबाचे उद्योग
त्यानंतर झाली ती २०२०ची निवडणूक. ही २०१६च्या निवडणुकीइतकीच वादग्रस्त ठरली. २०२०च्या निवडणुकीआधी काही महिने अगोदर हंटर बायडनचा लॅपटॉप एका दुकानात सापडला. त्यात त्याच्या रंगीबेरंगी जीवनाच्या चित्रफिती होत्या. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे युक्रेनमधल्या तो खात असलेल्या पैशात त्याच्या बापाचा हिस्सा होता, हे उघडकीस आले. तेव्हा तो लॅपटॉप कुणाच्या नजरेस पडू नये, याची काळजी घेणं आलं. त्यानुसार सुरक्षा यंत्रणेतील अगदी वरच्या थरांतल्या पन्नास लोकांनी स्वत:च्या सहीने एक पत्रक काढून जाहीर केले की, हा लॅपटॉप म्हणजे रशियाने बायडनविरोधात केलेल्या कारवायांपैकी आहे, आणि जो कोणी आपल्या लिखाणात किंवा व्याख्यानात या लॅपटॉपचा उल्लेख करेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
आणि खरोखरच ज्यांनी या विषयावर लिहायचं धाडस केलं, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कारस्थानात सिलिकन व्हॅलीतील कंपन्या सामील होत्या. (त्याचा मोबदला त्या कंपन्यांना पुढे मिळाला. कायद्याने कुठल्याही बुडलेल्या बँकेतले अडीच लाख डॉलर सुरक्षित असतात. सिलिकन व्हॅली बैंक बुडाली तेव्हा बायडनने अडीच लाख डॉलरची मर्यादा काढून टाकली, म्हणजे त्याच्या मित्रांच्या सर्व ठेवी सुरक्षित!)
२०२०ची निवडणूकसुद्धा काट्यावरची ठरली. ट्रम्प निवडून येता येता एका रात्रीत काय गोलमाल झाला कळलं नाही. (कोविडमुळे गोलमाल करणं सोपं झालं होतं.) विजयाची माळ बायडनसाहेबांच्या गळ्यात पडली. हा निकाल २०१६च्या बरोबर उलटा होता. त्या निवडणुकीत ट्रम्प यशस्वी होईल, याची कल्पना कुणालाही आली नव्हती. आणि तो निवडून आल्यापासून ट्रम्पच्या विरोधकांनी अप्रतिम गोंधळ घातला होता. रस्त्यावर आणि आतमध्ये रस्त्यावर मोर्चे, निदर्शनं आणि दंगली. ‘आम्ही याला आमचा राष्ट्राध्यक्ष मानतच नाही’, अशा घोषणा. तो निवडून आलेल्या राज्यात फेरमतमोजणी झाली. त्याने नेमलेले इलेक्टर बेकायदेशीरपणे फोडण्याचे प्रयत्न झाले. यांत लोकशाहीचा घात कुणाला दिसला नाही की, लोकशाहीची विटंबना कुठे दिसली नाही. जणू काही जे काही झालं, ते सर्व साहजिकच होतं.
बुडत्याचा पाय खोलात...
२०२०मध्ये उलटे प्रयोग झाले. पण आता ट्रम्पची लढाई प्रस्थापितांविरुद्ध होती. यशाची शक्यता पहिल्यापासूनच शून्य होती. ट्रम्पची कल्पना की, आपण ठरवलेला उपराष्ट्रपती, आपण निवडलेले सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश हे वेळप्रसंगी आपली बाजू घेतील. पण ऐन वेळी सगळ्यांनी दगा दिला. चिडलेले ट्रम्पचे समर्थक निवडणुकीच्या शेवटच्या सोहळ्याच्या वेळी संसदेत होणाऱ्या इलेक्टरांच्या मतमोजणीच्यावेळी संसदेत जमले. तिथे नक्की काय झाले, या निवेदनात प्रचंड मतभिन्नता आहे. ट्रम्पच्या समर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे ती केवळ निदर्शने होती. आणि ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’च्या निदर्शनांच्या मानाने फार सौम्यच होती. सबंध देशातून आलेले लोक. अर्थातच मद्य आणि ड्रग यांचा सढळ हाताने वापर होणार, हे साहजिकच आहे. तर विरोधकांच्या मते तो १९१७ सालच्या नोव्हेंबरमध्ये लेनिनच्या बोल्शेव्हिकांनी जसा रशियात सरकार उलथवायचा प्रयत्न केला होता, त्याचाच हा नमुना होता.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
ते नक्की काय होतं, हे ठरवण्यासाठी एक संसदीय समिती नेमून तिच्याकडून चौकशी करायचं ठरवलं. या समितीत डेमोक्रॅटिक पक्षाचं वर्चस्व असल्याने ती कोणत्या बाजूने निकाल देणार, हे उघडच होतं. त्याच प्रमाणे झालं. तिने सापडलेल्या लोकांना जबरी शिक्षा सुचवल्या. त्या प्रमाणे कोर्टात सुनावणी झाली. गेल्या महिन्यांतच तिघांना वीस-वीस वर्षांच्या शिक्षा झाल्या. अजून खटले सुरू आहेत.
पुढचा प्रश्न ट्रम्पचं काय करायचं? झालेल्या गुंडागर्दीत त्याचा किती हात होता, ही चौकशी सुरू आहेच. त्यानंतर त्याच्या घरावर घातलेल्या धाडीत त्याच्या घरात गोपनीय अशी असंख्य कागदपत्रं मिळाली. त्याबद्दल त्याला हातकड्या घालायच्या अगोदर नवीन राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या घरातही अशीच गोपनीय कागदपत्रं त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या काळात हडप केलेली मिळाली! तेव्हा त्या निमित्तानं ट्रम्पला पकडायचे प्रयत्न बंद केले. काही दिवसांनी भूतपूर्व उपाध्यक्ष पेन्स यांच्याही निवासस्थानी गोपनीय कागदपत्रं मिळाली! साहजिकच हा विषय चर्चेतून बाद झाला आहे.
ट्रम्पसाहेबांचं व्यक्तिमत्त्वं बहुरंगी आणि बहुढंगी असल्यामुळे त्यांच्यावर गुन्ह्याचे आरोप शोधायला फार लांब जावं लागत नाही. कर चुकवण्यासंबंधांत त्याच्यावर अनेक खटले उभे झाले आहेत. अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध आल्यामुळे जवळजवळ दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या गावातून एखादी स्त्री उभी राहते आणि आपले ट्रम्पबरोबर संबंध होते, हे जाहीर करते. २०१६ची निवडणूक तोंडावर आली असताना, अश्लील चित्रपटात काम करणारी एक नटी त्याच्यावर आरोप करणार, हे त्याच्या लक्षात आलं आणि तिला गप्प राहण्याकरता त्याने तिला दीड लाख डॉलर दिले. हे नंतर बाहेर पडलं. त्या प्रसंगानिमित्त त्याच्यावर वेगवेगळ्या चौतीस कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
आता अशीच एक दुसरी मुलगी उभी राहिली आहे. तिसऱ्या एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. नऊ मे या तारखेला या खटल्याचा निकाल लागला तो असा - ट्रम्पने बलात्कार केला, हे सिद्ध करता येत नाही, पण त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, हे नक्की. त्याबद्दल त्याला पन्नास लाख डॉलरची शिक्षा केली आहे. (हा फक्त दिवाणी खटला होता. फौजदारी खटला अजून उभा राहायचा आहे.) या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती करून घ्यायची असेल तर ‘भागवत पुराणा’सारखं ‘ट्रम्प पुराण’ लिहायची आवश्यकता आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
भानगडबाजी मुळांवर उठली...
तारा रोड नावाच्या बायडनच्या ऑफिसमध्ये कारकूनी करणाऱ्या स्त्रीने बायडनने १९९३मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार २०१९मध्ये केली होती. तो अतिप्रसंग झाला त्याच वेळेस तिच्या आईने एका चालू रेडियो कार्यक्रमात तक्रार केली होती आणि अशा प्रसंगी मुलीने काय करावे, हा सल्ला विचारला होता. (या सगळ्याची नोंद आहे असं तारा रीडचं म्हणणं आहे.) २०१९मध्ये जेव्हा ताराने प्रश्न उपस्थित केला तेव्हा तिच्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. मी अश्लील चित्रपटात काम करणारी नटी नाही, म्हणून असेल, तारा उपरोधाने म्हणते. ते काही असो, रिपब्लिकन पक्षाने तिच्या आरोपांची चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बायकांशी केलेल्या भानगडींच्या कथा अंजनाच्या शेपटीसारख्या असतात म्हणजे कधीही न संपणाऱ्या. आता राजकारण लांब राहील आणि देशा समोरचे प्रश्न तर आणखी लांब राहतील.
ट्रम्पचं आज वय आहे ७७ आणि बायडनचं ८०. दोघांनाही पुढच्या निवडणुकीला उभं राहायचं आहे. तेव्हा त्यांची वयं असतील अनुक्रमे ७९ आणि ८३. दोघांनाही बुद्धिभ्रम झालेला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण याहून अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या सुमारास अमेरिका २५० वर्षांची होईल. तिच्या सध्याच्या हालचालीवरून तिला ‘म्हातारचळ’ लागला आहे, असं निदान करण्याशिवाय गत्यंतर नाही. तीच तीच तोंडाची बडबड, अवास्तव खर्च, क्षीण झालेली ताकद, गृहकलह, सूडबुद्धीने चाललेलं राजकारण, या सगळ्यांचा दुसरा अर्थ काय?
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या जून २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. मोहन द्रविड हे अमेरिकास्थित फिजिक्समधील पीएच.डी. असून त्यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास हे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांचे ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक आहे.
mohan.drawid@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment