अजूनकाही
विदुषी, संशोधक आणि ललितलेखिका इरावर्ती कर्वे यांचं ‘परिपूर्ति’ हे १९४९ साली प्रकाशित झालेलं छोटंसं पुस्तक आहे... दीडेकशे पानांचं. त्यात १८ ललितलेखांचा समावेश आहे. खरं तर त्यांना ‘ललित-वैचारिक’ म्हणायला हवं. प्रत्येक लेख बुद्धीला आवाहन करणारा, विचाराला चालना देणारा... आज ७४ वर्षानंतरही हे पुस्तक तितकंच वाचनीय आणि विचारणीय आहे. आता हेच पहा ना... या पुस्तकातला ‘एकेश्वरी पंथाचा विजय’ हा लेख... स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या काळातही नेमस्त पक्षाने नैतिक अधिष्ठान पुरवण्याचं आणि नैतिक मूल्यांचा पुरस्कार करण्याचं मोठं काम केलं. त्याचा दूरगामी परिणाम काय झाला, हे सांगत असताना इरावतीबाईंनी या पक्षाच्या नामशेष होण्याने आपण नेमके काय गमावून बसलो आहोत, याची अतिशय नेमकी मांडणी केली आहे. आपण नेमके काय गमावत चाललो आहोत आणि कशाच्या आहारी चाललो आहोत, याचा आपण विचारही करत नाही, इतकी विचारहीन अवस्था का आली? असो... इरावतीबाईंचा हा लेख वाचून त्याचा विचार करून पाहता येईल...
.................................................................................................................................................................
भावोजी मला नेहमीच सनातनी व बुरसटलेली म्हणतात. पहिल्याने मला त्याचा राग येई, मग-मग गंमत वाटे, पण आज मात्र जुनेपणाची जाणीव मला तीव्रतेने होते आहे. आज माझे मलाच कळते आहे की, मी गतिमान (dynamic) तर नाहीच नाही, पण नुसती स्थितीमान (static)सुद्धा नाही, तर सर्वस्वी प्रतिगामी आहे. जुन्या नाहीशा झालेल्या किंवा मरू घातलेल्या गोष्टीबद्दल मला आज किती वाईट वाटत आहे! माझ्या भोवतालच्या सुशिक्षित जाणत्या लोकांना काही नाहीसे झाले, याची जाणीवसुद्धा नाही, आणि मी मात्र गेलेल्या मूल्याबद्दल अश्रू ढाळत आहे.
नुकतेच वर्तमानपत्रात वाचले की, “हिंदुस्थानातील लिबरल (नेमस्त, मवाळ) पक्ष राजकीय पक्ष म्हणून स्वतःला बरखास्त करून टाकणार आहे.” किती क्षुद्र बातमी! कोणी म्हणाले, “म्हणजे या नावाचा राजकीय पक्ष होता तर?” कोणी म्हणाले, “नाहीतरी मेलेलाच पक्ष होता, आता काय बरखास्त होण्याचे राहिले होते?” मला मात्र कशी हुरहूर लागून राहिली आहे!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
मी माझ्या मनाला विचारते आहे की, पक्षोपपक्षांची, जातीपातींची पर्वा न करता साधारण मानव्याची तरफदारी करणारे आता भारतात कोण राहिले आहे? आधी माणुसकी आणि मग पक्षाचे राजकारण अशी वृत्ती ठेवणारे हे लोक गेले म्हणजे आमचे काय होणार? इंग्रजांच्या घरच्या राजकारणातील लोकशाहीची तत्त्वे नेमस्त पुढाऱ्यांनी खरी आचरणात आणली. त्यांची लोकसेवा पक्षातीत होती! कोणत्याही पक्षाशी केव्हाही लोककल्याणासाठी सहकार्य करण्यास त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. काँग्रेसशी लोककल्याणासाठी सहकार्य करण्यास त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र्य संपादनाच्या मार्गाचा निषेध करूनही प्रत्येक वेळी तुरुंगात गेलेल्या काँग्रेस पक्षीय लोकांसाठी खटपट या लोकांनी केली. सरकारच्या प्रत्येक प्रतिगामी धोरणाचा निषेध त्यांनी न चुकता व्यक्त केला.
‘सरकारचे पित्त्ये’, ‘देशद्रोही’ अशा सर्व तऱ्हेच्या शिव्या खाऊनही त्यांनी रागाच्या भरात किंवा सत्तेच्या लालसेने स्वजनद्रोह व लोकशाही तत्त्वांशी द्रोह केला नाही. त्यांचे राजकारण अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांचे लिखाण बहुजन समाजाच्या वृत्ती थरारून सोडण्यासाठी नसून बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी होते. त्यांनी आपल्या शहाणपणाची प्रौढी मारली नाही, देशभक्तीचे प्रदर्शन केले नाही; उद्दाम तर ते कधीच नव्हते; अशा विद्वान, सर्वसंग्राहक वृत्तीच्या माणसांना आजच्या समाजात स्थान नाही, म्हणून मी हळहळते आहे.
आज ते असते, तर कम्युनिस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मते अमान्य असतानाही या लोकांच्या विनाचौकशी तुरुंगवासाविरुद्ध त्यांनी निषेध प्रदर्शित केला असता. त्यांच्यापैकी एकाने तरी कौन्सिलात प्रश्न विचारला असता की, “आज भारतात विनाचौकशी किती लोक तुरुंगात आहेत? किती संस्थांना न्यायालयासमोर चौकशी न करता बेकायदा ठरवले आहे? किती वर्तमानपत्रांवर बंदी घातली आहे?”
पूर्वी सरकारचा केवळ शाब्दिक निषेध करणारे म्हणून या लोकांची हेटाळणी होत असे. पण आजच्या स्वराज्यात शाब्दिक निषेधही करण्याची कोणाच प्राज्ञा आहे का ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेकायदा ठरवला, त्या दिवशी माझ्या ओळखीच्या एका लहान मुलाला काय आनंद झाला! मला नवल वाटले, पण मी काही बोलले नाही. तोच लहान मुलगा दुसऱ्या दिवशी संतापलेला असा माझ्याकडे आला व सरकारला शिव्या देऊ लागला. “का रे बाबा, आज काय झाले?” तर त्याने सांगितले की, “सरकारने दलावर बंदी घातली आहे.” दल म्हणजे काँग्रेसांतर्गतच एका उपपक्षाचे स्वयंसेवक मंडळ आहे, असे मला समजले.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
“अरे, जशी संघावर बंदी, तशी तुमच्यावर; त्यात एवढे संतापायला काय झाले?” “छे! छे! तुमच्याशी बोलण्यात काही फायदा आहे का? रा.स्व.संघ, आमचे दल नि कम्युनिस्ट सर्व काय सारखे आहेत? त्यांच्यावर बंदी घातली, उत्तम झाले! पण आमच्या दलावर घातली, हा काय न्याय आहे?”
म्हणजे बंदी घालणे योग्य की अयोग्य? हा प्रश्नच नव्हता, फक्त आमच्यावर असता कामा नये, इतरांवर असावी हा कटाक्ष होता. जी गोष्ट या छोट्या मुलाची, तीच इतर छोट्या-मोठ्यांची. परवापासून वाचते आहे व ऐकते आहे; “काय सांगावे हो, अठरा वर्षांखालील कोवळ्या मुलांनासुद्धा संघाने सत्याग्रह करावयास लावला!” शाळेतील व कॉलेजातील मुले म्हणजे सत्याग्रहातील मुख्य शस्त्र हे तंत्र पहिल्याने कोणी अंमलात आणले? या बाबतीतील एका काँग्रेसजनाचा व एका भाईचा वादविवाद मोठा बोधप्रद वाटला म्हणून सांगते. काँग्रेस पक्षीयाने सांगितले की, “तेव्हाची गोष्ट निराळी होती. परकी सत्तेविरुद्ध प्राणपणाने लढावयाचे होते. राष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता, तेव्हा सर्वच सैनिक होते; लहान-मोठा भेद करण्याचे कारण नव्हते. आता आपले राज्य आहे, म्हणून पूर्वीचा मार्ग बरोबर ठरत नाही.”
भाईंनी तितक्याच गंभीरपणाने सांगितले, “गृहस्था, मागे फक्त राष्ट्राचा प्रश्न होता, आता सबंध मानवी मूल्यांचा प्रश्न आहे. हा लढा जागतिक आहे. येथे सर्वांनी लढले पाहिजे. मुले आणि मोठी माणसे हा भेद ठेवता येत नाही...”
पुढची पुस्ती मी जोडते; संघाचा मनुष्य म्हणेल, “आमचा लढा न्यायासाठी आहे. मूलभूत मानवी हक्काचा लढा चालू असता मुले व मोठी माणसे असा भेद ठेवता येत नाही.” म्हणजे मिळून काय, शाळांतील मुलांना राजकीय लढ्यात ओढू नये, असे कोणीच म्हणत नाही, फक्त आमच्या मूल्यासाठी ओढावे, इतरांच्यासाठी नाही!
जी गोष्ट सत्याग्रहाची, तीच इतर बाबींची. प्रत्येक पक्षाचा गणवेश आहे, प्रत्येकाचे निशाण आहे, प्रत्येकाचा स्वयंसेवक संघ आहे, प्रतिज्ञा आहे, शिस्तपालन आहे. पक्षातीत राहणाऱ्याची यात काय ओढाताण होते, ते काय सांगू? मुलांच्या वर्गातून राजकीय पक्षाच्या नावावर सदैव भांडाभांडी चाललेल्या असतात. मूल अभ्यास टाकून कुठच्या पक्षात जाईल, याचा नेम नाही. मूल म्हणून त्याला पक्षोपपक्षात ओढावयास कोणी कचरत नाही, व ते त्यात अडकले, तर मूल म्हणून त्याला कसलीही दयामया दाखवली जात नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
१९४२ सालची गोष्ट. जळिताचे किती खटले माझ्यापुढे आले! तेरा-चौदा वर्षांची पोरे स्टेशने, चौक्या, शाळांच्या इमारती जाळत होती! त्या जळलेल्या इमारतींपेक्षा एका उगवत्या पिढीच्या जीवनात कालवलेल्या विषामुळे माझे आईचे मन तळमळत होते. त्या मुलांची नैसर्गिक घृणा, दया नाहीशी झाली होती. त्यांपैकी एकाला विचारले, “काय रे, तुमच्या पुढाऱ्याने सांगितलेली गोष्ट तू ऐकशील का रे!” त्याने आपली बालदृष्टी माझ्याकडे लावून म्हटले, “अर्थात, वाटेल त्याचा खून करावयास सांगितले तरी करीन.” माणुसकीची मूल्ये मिळवायला हजारो वर्षे लागतात, धुळीला मिळवायला एक पिढीसुद्धा लागत नाही!
“ला इलाहा इल्लिल्लाह, मोहंमद रसूल्लिल्लाह!” अल्ला एकच आहे आणि महंमद त्याचा प्रेषित आहे! काय भयंकर तत्त्वज्ञान! सबंध मानवतेच्या अंगी आज तेच विष भिनले आहे. अल्लाचा प्रेषित जो महंमद, त्याचे जो ऐकत नाही, तो मरणास योग्य आहे, त्याचा नायनाट झाला पाहिजे. हेच ब्रीदवाक्य आज सर्व पक्षांचे आहे.
फक्त ‘महंमद रसूल्लिल्लाह’ऐवजी ‘गांधी रसूल्लिल्लाह’, ‘स्टालिन रसूल्लिल्लाह’ व ‘गोळवलकर रसूल्लिल्लाह’ हे शब्द घातले म्हणजे झाले! या प्रेषितांच्या विरुद्ध एक शब्द कोणी बोलता कामा नये. यांच्या चिन्हाचा कोणी अनादर करता कामा नये. प्रत्येकाने यांपैकी कोणातरी एकाच्या पंथाचे असले पाहिजे.
गांधीवादी म्हणतात, “देशभक्त काय ते आम्हीच, इतर देशद्रोही आहेत, विनाशक आहेत, त्यांचा नायनाट केला पाहिजे.”
हेच शब्द स्टालिनवादी उच्चारतात, व तेच आरएसएसवाले उच्चारित असणार. माझ्यासारख्या अनेक दैवतवादी हिंदू संस्कृतीत रूजलेल्या व या वादाने भांबावलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का? सगळेच राहीनात! कोणी कोणावर जुलूम नाही केला, म्हणजे झाले!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
आम्ही लहानपणी कडक वैष्णव व शैव लोकांना हसत असू. नेसणे, कुंकू, उपासतापास काय, पण केससुद्धा वैष्णव व शैव निरनिराळ्या पद्धतीने काढत! पण आजच्या या आधुनिक एकेश्वरीवादापुढे बिचारे शैव व वैष्णवसुद्धा फिके पडतील. आमच्या आळीत मागे सर्व मुले शाळेतून आली की, एकत्र खेळत, पण आता ते सर्वस्वी अशक्य झाले आहे. खेळाच्या जागेवर काठी उभी असते, त्यावर पक्षाचे निशाण असते, खेळाच्या सुरुवातीला व शेवटी विशिष्ट प्रार्थना असते, आठवड्यातून एकदा बौद्धिक (?) असते. हे सर्व ज्यांना पसंत आहे, त्यांनीच खेळायला यावे, इतरांनी नाही. दलात पाच वर्षांपासून पंधरा वर्षे वयापर्यंत मुले आहेत. तेव्हा शाळांतील मुलांना पक्षाचे शिक्षण द्यावे की नाही, हा प्रश्नच उभा राहत नाही.
निरनिराळ्या पक्षांची बौद्धिके मी पाहिली आहेत. सर्व भर असतो संघटनेवर, संघटना करा, संघ, दल, समितीप्रमुखाच्या आज्ञेचे पालन करा, पक्षाच्या निशाणाला नमस्कार करा, पक्षाच्या पुढाऱ्याला भजा, या शिकवणीत आणि एकेश्वरी पंथाच्या शिकवणीत फरक काय? म्हणून म्हणते, माझे प्रतिगामी मन मरू घातलेल्या लिबरल पार्टीसाठी, अनेक दैवतवादासाठी, परस्परसहिष्णुतेसाठी, साध्या माणुसकीसाठी हळहळते आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment