रंगांचा मायावी खेळ, रंगांची अनंत रूपे जशी प्रकाशातून स्त्रवतात, तशीच ती कालिदासाच्या साहित्यातही प्रकट होताना दिसतात!
पडघम - सांस्कृतिक
पंकज भांबुरकर
  • महाकवी कालिदास
  • Mon , 12 June 2023
  • पडघम सांस्कृतिक कालिदास दिन Kālidāsa Din कालिदास Kālidāsa आषाढस्‍य प्रथमदिवसे शाकुन्तल Shakuntala रघुवंश Raghuvaṃśa मालविकाग्निमित्र Mālavikāgnimitram विक्रमोर्वशीय Vikramōrvaśīyam

'मेघदूत' या काव्याची सुरुवात 'आषाढस्य प्रथमदिवसे' या शब्दांनी होते. त्यामुळे महाकवी कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला असं मानलं जातं. १९ जूनपासून आषाढ सुरू होतोय, त्यानिमित्ताने कालिदासाविषयीचा हा विशेष लेख... 

.............................................................................................................................................

निसर्गातील रंगांच्या विविध छटा कलादृष्टीनं हेरून, त्यांच्यातील भावसौंदर्य आत्मसात करून, वाचकांना त्याची प्रचिती देणाऱ्या चित्रकलामर्मज्ञ कालिदासाला तेजाचं अमर्याद आकर्षण असल्याचं त्याच्या काव्य-नाटकातील सर्गवार उल्लेखांवरून दिसतं.

निसर्गातील सर्व प्रकारच्या प्रकाशाची त्याच्या मनावर विलक्षण मोहिनी होती. स्वाभाविकच ज्यांच्यापासून मानवाला तेजाची प्राप्ती होते; त्या सूर्य, चंद्र, नक्षत्रादी आकाशस्थ तेजोगोल यांचा उल्लेख त्याने पुनरुक्तीचा दोष पत्करूनही केला आहे. सृष्टीमध्ये जिथं जिथं तेज किंवा प्रकाश, तिथं तिथं कालिदासाची चित्तवृत्ती गुंतलेली होती. या आकर्षणामधूनच त्याला प्रकाशविषयक अनेक उपमा सुचल्या असाव्यात.            

दृश्यकलेत प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाशामुळेच चराचर सृष्टीतील वस्तूंचे आकार व रंग गोचर होतात. बालकवींसारख्या आधुनिक रोमँटिक कवीच्या ठायी निरनिराळ्या रंगांची व त्यांतील सूक्ष्म छटांची जशी अनिवार आसक्ती दिसते, तशीच कालिदासाच्याही ठिकाणीही पाहायला मिळते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

इंग्रजीतील स्पेन्सर व किट्स हे कवी दृश्यामधील रंगांच्या गहिऱ्या छटा हेरून, त्यांचे तितकेच गहिरे वर्णन करण्यात निष्णात मानले जात. किंबहुना, साऱ्या रोमँटिक कवींच्या ठिकाणी ही आसक्ती थोड्याफार प्रमाणात दिसून येते. ज्यांच्या ठिकाणी ती अतिरेकाला गेलेली असते, अशांना इंग्रजीत ‘कलर माइंडेड क्रोमेस्थेटिकल’ म्हणतात. यांना संगीतातील सूर ऐकताच काहीतरी रंगभास होतात. सामान्य लोकांच्या दृष्टीनं हे चमत्कारिक, असंभाव्यही आहे; परंतु ज्यांची मने कमालीची संवेदनशील असतात, अशा कवींच्या बाबतीत अशक्य नाही.

संगीत आणि चित्रकला या दोन्ही कलांच्या कक्षा जिथं एकमेकांना स्पर्श करतात, त्या ‘दृक्संगीत’ संकल्पनेला जन्म देणारा ‘सायनेस्थेशिया’ हा प्रकार कदाचित कालिदासाला प्रेरक ठरला असावा! व्हॅन गॉग, कँडीनस्की, मोंद्रियान यांसारख्या चित्रकारांना; स्क्रीयाबीन, मेसियन, लिगेती यांसारख्या रचनाकारांना आणि बॉदलेअर, नबोकाव या कादंबरीकारांना जसा तो प्रेरणास्त्रोत ठरला, तसाच कालिदासालाही, असे वाटते.

बाणभट्ट, स्पेन्सर, बालकवी यांच्याप्रमाणेच कालिदासाच्या ठिकाणीही रोमँटिक कवीला साजून दिसेल, अशी रंगांची अनिवार आसक्ती दिसते. त्याच्या काव्य-नाटकात निसर्गाची जी चित्रदर्शी वर्णनं आहेत, त्यातून त्याने आपली रंगांची अनिवार आसक्ती पूर्ण करून घेतलेली दिसते.

‘मेघदूता’त यक्ष मेघाला प्रवासादरम्यान लागणारे विविध पर्वत, नद्या इत्यादींची माहिती देताना  विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खडकाळ प्रांतातून वाहणाऱ्या नर्मदेचं चित्रदर्शी वर्णन करतो. त्या श्लोकापूर्वी आम्रकूट पर्वताचं वर्णन करणाऱ्या श्लोकातही विशिष्ट रंगांकडे निर्देश आहे. या दोन्ही श्लोकांतील स्थाने भौगोलिकदृष्ट्या वेगळी असली, तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. या दोन्ही स्थळांचं कालिदासाचं ‘विहंगावलोकन’ आणि ‘व्हिज्युअलायझेशन’ एखाद्या चित्रकाराच्या तोलामोलाचं आहे.

अशा स्थितीत पर्वताचा विस्तृत भाग कालिदासाला जणू हत्तीचं काळं शरीर वाटलं आणि प्रवाह पुष्कळ ठिकाणी फाटल्यामुळे अस्ताव्यस्त वाहणारी शुभ्र फेसाळ नर्मदा हत्तीच्या शरीरावर पांढऱ्या रंगाने वेलबुट्टी काढावी, अशी वाटली. पिकलेल्या आम्रफळांमुळे ज्याच्या सर्व बाजू झाकून गेल्या आहेत, अशा आम्रकूट पर्वतशिखरावर आरूढ झाल्यामुळे पर्वताला पृथ्वीच्या स्तनाचं सादृश्य प्राप्त झालं. एकीकडे काळा-पांढरा, तर दुसरीकडे पिवळा- काळा असा रंग संकेत दिसतो.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

‘रघुवंशा’त पुष्पक-विमानातून दिसलेल्या प्रयागाजवळील गंगा-यमुना संगमाचं वर्णन रघुकाराने पुढीलप्रमाणे केलं आहे - गंगेच्या शुभ्र प्रवाहात यमुनेचे कृष्णवर्ण उदक मिळाल्यामुळे, तो कृष्णसर्पाने वेष्टीत अशा शंकराच्या शुभ्र तनुसारखा दिसत होता.

‘मालविकाग्निमित्रा’त चित्रकलाचार्यांनी काढलेल्या ज्या समूहचित्राचं अवलोकन राणी धारिणी करत आहे, त्यातील रंग ताजे, ओले असल्याचं कालिदास विषेशत्वानं नमूद करतो. याचा अर्थ असाही होऊ शकेल की, चित्र पूर्ण होतं न होतं, तोच त्याच्या दर्शनाची अभिलाषा बाळगत लगबगीनं चित्रशाळेत पोहोचणारी धारणी रसिका होती, चित्रकलेविषयी आस्था राखणारी होती!

असाही भाव कदाचित महाकवीला व्यक्त करावयाचा असावा किंवा कदाचित चित्रकलाचार्यांनीही आपल्या अपेक्षेप्रमाणे चित्र पूर्ण झालं आहे ना, असा राणीचा अभिप्राय घेण्यासाठीही तिला पाचारण केलं असावं... जेणेकरून चित्रातील रंग ओले असताना त्यात काही बदल अपेक्षित असतील, तर चित्रकारास ताबडतोब करता यावेत. कारण एकदा का रंग वाळले की, चित्रात बदल करणं कदाचित दुरापस्त होत असावं! चित्रातील रंग ओले असतानाच राजाही ते चित्र बघतो. त्यामुळे त्यातील मानवाकृतींच्या शरीरकांतीचा तजेलदारपणा जास्त उठावदार दिसत असावा.

‘कुमारसंभवा’तही चित्रातील रंग भरण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे- ‘रेखाटलेले चित्र जसे कुंचल्याने रंग भरताना उमलत जावे, तसे पार्वतीचे अंग प्रत्यंग विकसित होत होते.’ कागदावर रेखाटलेले विविध आकार रंगलेपनानंतर हळूहळू त्रिमित रूपात कसे बदलत जातात, ही रूपांतरणाची प्रक्रिया कालिदासाने निश्चितच अगदी जवळून पाहिली असावी किंवा प्रत्यक्ष अनुभवलीही असावी. म्हणूनच सूर्यकिरणांनी कमलपुष्प विकसित व्हावं, अशी उपमा देण्याअगोदर त्याने ‘उन्मीलितं  तुलीकयेव...’ म्हणत चित्राची उपमा प्रथम देणं पसंत केलं.  केवळ रेखांकन म्हणजे संपूर्ण चित्र नव्हे, तर त्यात रंग भरल्यानंतरच ते ‘चित्र’ या संज्ञेस पात्र ठरतं, असं त्याला सुचवावंसं वाटलं असावं.

‘अभिज्ञानशाकुंतल’ या नाटकातही दुष्यंत राजाने शकुंतलेचं काढलेलं स्मरणचित्र अपूर्ण असल्याचा उल्लेख असून, त्याची पार्श्वभूमी रंगवायची राहून गेल्याचं दुष्यंत विदूषकास सांगतो. दुष्यंताचा अश्रूबिंदू ओघळून चित्रातील शकुंतलेच्या गालावर पडल्यामुळे, तिच्या गालावरील रंग वर आल्याचाही उल्लेख आहे. चित्रात रंगलेपन करताना दुष्यंताची भावविभोर अवस्था या वर्णनातून स्पष्ट होते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

चित्रकलेत छायाप्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. सूर्यप्रकाशामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक रंगांच्या छटा गोचर होतात. प्रभातकालीन, मध्यान्ह व सूर्यास्त या वेळच्या प्रकाशाच्या छटा निरनिराळ्या असतात. त्याचप्रमाणे शुभ्र वर्णातही कितीतरी सूक्ष्म छटा असतात. सामान्य डोळ्यांना त्या दिसत नसल्या तरी कवी-चित्रकाराला अचूक दिसतात.

कालिदासाला परमेश्वराने ‘दुहेरी आहेर’ बहाल केला होता. शुभ्रतेचं वर्णन करण्याचा जिथं जिथं प्रसंग आला, तिथं तिथं निसर्गातील विशिष्ट पदार्थांशी त्याची सांगड घालून त्याने शुभ्र वर्णातील छटा उत्कृष्टपणे प्रकट केल्या आहेत.

कालिदासाच्या साहित्यात विविध रंगांच्या उल्लेखात सर्वाधिक श्वेत रंगाशी संबंधित आहेत. केवळ श्वेतच नाही, तर इतरही रंगांच्या सूक्ष्मतम छटा विविध प्रसंगांच्या चित्रदर्शी वर्णनात दाखवल्या आहेत. कधी कधी कोणत्याही एका विशिष्ट रंगाचा उल्लेख न करता नुसत्या रंगांचा उल्लेख केला आहे.

कालिदासाचा रंगांचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या विविध भावभावनांचा, त्यांच्या प्रतीकात्मक अर्थाचा, दोनहून अधिक रंगांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या वेगळ्याच रंगछटांचा, विविध रंगांच्या तीव्रतेचा, त्यांच्या उजळ, मध्यम व गडद छटांचा, त्यांच्या पोताचाही अभ्यास एखाद्या चित्रकाराच्या तोलामोलाचा आहे. त्याच्या साहित्यकृतींतील रंग मोहिनी घालतात, त्यातल्या रंगछटा भूल पाडतात.

रंगांचं अंतरंग कालिदासाला चांगलं उमजलं होतं. रंगांचा एकजिनसीपणा आणि त्यांच्या विविध छटा, विशिष्ट रंगातून अभिव्यक्त होणारा क्रोध आणि दुसऱ्याच रंगातून जाणवणारी मृदुता, कधी आक्रस्ताळेपणा, तर कधी सावध स्तब्धता, कधी अगदी उतावीळ, तर कधी घनगंभीरता, कधी नुसता विदुषीथाट, तर कधी वैराग्य तटस्थता. रंगांचा हा मायावी खेळ, रंगांची ही अनंत रूपे जशी प्रकाशातून स्त्रवतात, तशीच ती कालिदासाच्या साहित्यातही प्रकट होताना दिसतात.

..................................................................................................................................................................

लेखक पंकज भांबुरकर चित्रकार असून कालिदासीय साहित्यात संशोधन करत आहेत.

bhamburkar.pankaj@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......