अजूनकाही
गिरीश कुबेर, आनंद नाडकणी, संध्या गोखले, अतुल देऊळगावकर, हमीद दाभोलकर, सतीश बागल, दत्ता दामोदर नायक, शिल्पा कांबळे, छाया दातार, रझिया पटेल, ज्ञानेश्वर मुळे, सदानंद मोरे, भारत सासणे, दासू वैद्य, सुजाता देशमुख आदी २१ मान्यवरांनी ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विषयावर लिहिलेल्या लेखांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात करण्यात आलेला आहे. साधना प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन विनोद शिरसाठ यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
२०१३मध्ये भारतीय सिनेमाचे शताब्दीवर्ष आले, तेव्हा ‘साधना साप्ताहिका’चा विशेषांक ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या थीमभोवती काढला होता. विविध क्षेत्रांतील २१ मान्यवरांचे लेख असलेला तो अंक, त्यानंतरच्या दहा वर्षांतील ‘साधना’च्या ‘टॉप टेन’ अंकांमधील एक होता. तो अंक प्रसिद्ध झाला, त्याच आठवड्यात साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्या वातावरणात त्या अंकाकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्या अंकातून हाती आलेला निष्कर्ष असा होता की, ‘या सर्व लेखकांच्या कलाविषयक जाणीवांमध्ये सामाजिक भानाची तीव्रता बरीच जास्त आहे.’
वस्तुतः तो अंक तयार करताना मनात अनेक हेतू होते, पण मुख्य हेतू हा होता की- तरुणाईकडून तो अधिक वाचला जावा. सर्व प्रकारची व सर्व क्षेत्रांतील तरुणाई इतर कोणत्याही माध्यमापेक्षा सिनेमाशी अधिक निगडित असते, असे चित्र या देशात मागील पाऊण शतक तरी आहे. त्यामुळे तरुणाईने सिनेमा या माध्यमाकडे अधिक सजगपणे पाहून, त्याचा अधिक चांगला लाभ करून घ्यावा, अशीही त्या अंकामागची अपेक्षा होती.
नंतर त्या अंकात सहा लेखांची भर टाकून केलेले पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले. त्याच वेळी, तीच मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून जागतिक ‘पुस्तक दिना’चे निमित्त करून ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या थीमभोवती विशेषांक करायचा विचार मनात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी या ना त्या कारणाने मागे पडत गेली. २०२१मध्ये तो अंक प्रत्यक्षात काढता आला. विविध क्षेत्रांतील १५ मान्यवरांनी त्या अंकात लेख लिहिले. त्यानंतर २०२२च्या ‘जागतिक पुस्तक दिना’च्या निमित्ताने आणखी सहा मान्यवरांकडून तसे लेख मिळवले आणि ‘साधना’ अंकात प्रसिद्ध केले.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
त्या दोन्ही अंकांतील मिळून २१ लेखांचे हे पुस्तक आहे. विविध क्षेत्रांतील असे म्हणताना, विविध वयोगटांतील व विविध प्रकारच्या लेखन-वाचनाची अभिरूची असणारे मान्यवर हे गृहीतच होते. मात्र ज्यांचे स्वतःच्या कार्यक्षेत्रात विशिष्ट असे काही स्थान आहे, ज्यांच्या भूमिका बऱ्यापैकी निश्चित व निर्णयात्मक आहेत, ज्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन समाजसन्मुख आहे, आणि ‘प्रभाव’ मोजण्यासाठी ज्यांनी आयुष्याची किमान चाळीशी गाठली आहे, अशाच मान्यवरांना लेख लिहिण्यासाठी विनंती केली. अर्थातच अशी यादीही बरीच मोठी होती, पण उपलब्ध वेळ व उपलब्ध अवकाश लक्षात घेऊन त्या मान्यवरांना पत्र पाठवले होते. त्या पत्रातील दोन परिच्छेद असे होते-
“अंकाची, कल्पना अशी आहे की आपणाला आवडलेली पुस्तके अनेक असतात, प्रभावित करून गेलेली तुलनेने कमी असतात. त्यातली थोडी पुस्तके अशी असतात जी अधिक सखोल, गहन व गंभीर प्रभाव टाकून गेलेली असतात. तो प्रभाव आपली भाषा, शैली, विचार यांवर परिणाम करणारा असू शकतो; सामाजिक/राजकीय जाणिवा विकसित करणारा असू शकतो; कला/ सहित्य/ संस्कृती यांच्याविषयीचे आकलन वाढवणारा असू शकतो; एखादे नवे व अनोखे दालन खुले करून देण्यास कारणीभूत ठरलेला असू शकतो; जीवनविषयक दृष्टीकोनाला कलाटणी देणारा असू शकतो, किंवा अन्य काही प्रकारचा असू शकतो.
मात्र उपलब्ध वेळ व शब्दसंख्येची मर्यादा लक्षात घेता, प्रत्येकाने एकाच पुस्तकावर लिहावे, अशी विनंती आहे. अर्थातच हा लेख काहीसा आत्मचरित्रात्मक असणार आहे. म्हणजे प्रभावित करून गेलेल्या त्या पुस्तकाचा गाभा व आवाका थोडक्यात सांगून, त्या पुस्तकाने त्या वेळी कसे प्रभावित केले व नंतरही तो प्रभाव कसा राहिला, अशा प्रकारचा लेख अपेक्षित आहे. ते पुस्तक
व तो प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने वाचकांना समजावेत यासाठी आवश्यक ते तपशील या लेखात जरूर द्यावेत.”
वरील पत्रातून हे स्पष्ट होत होते की, लेख लिहिताना त्या पुस्तकाचा परिचय किंवा परीक्षण अपेक्षित नाही. त्याचबरोबर, हा लेख काहीसा आत्मचरित्रात्मक म्हणताना, त्यातून रसग्रहणही अपेक्षित नाही. म्हणजे ‘प्रभावित करून जाणे’, ही प्रक्रिया ठळक होण्यासाठी त्या पुस्तकाचे आवश्यक तेवढेच तपशील यावेत असे गृहीत होते. हा प्रकार एका अर्थाने सोपा असतो, कारण चांगले वाचक असणाऱ्याला तो प्रभाव पटकन् लक्षात येतो आणि सांगताही येतो; पण त्या प्रभावाच्या संदर्भात लेख लिहिताना काही महत्त्वाचे राहून गेले, असे वाटण्याची किंवा जरा जास्तीचे महत्त्व आपण त्या पुस्तकाला देतोय का, अशी शंका मनात येण्याची शक्यताही असतेच. अशा पार्श्वभूमीवर आलेले सर्वच लेख (थोडे इकडे-तिकडे सरकले असले तरी) मूळ थीमच्या भोवतीच लिहिले गेले आहेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
प्रस्तुत पुस्तकात २१ लेख आहेत. त्यातील ११ लेख इंग्रजी पुस्तकांवरचे आहेत, आठ लेख मराठी पुस्तकांवरचे आहेत, तर दोन लेख हिंदी पुस्तकावरचे आहेत. यात लिहिणारे बहुतेक सर्व जण मराठी माध्यमात शालेय शिक्षण झालेले आहेत, तरीही सखोल प्रभाव म्हणताना ११ व्यक्तींनी अंतिम निर्णय घेताना इंग्रजी पुस्तकाची निवड केली आहे.
अर्थात, यातील काहींच्या मनात अंतिम निवडीसाठी मराठी पुस्तकही असेल, पण मराठी ग्रंथविश्वाला जरा अपरिचिताची ओळख करून देऊ असा विचार त्यांनी केला असावा. उदा. गिरीश कुबेर यांनी लिहिलेच आहे की, नरहर कुरुंदकर यांचे ‘जागर’ हे पुस्तक या लेखासाठी त्यांच्या मनात होते. किंवा उर्वरित सात लेखकांपैकी काहींनी इंग्रजी पुस्तकाचीही निवड केली असती. उदा. भारत सासणे यांनी नाथमाधव यांच्या ‘वीरधवल’वर लिहिले असले तरी, त्यांच्या मनात मार्क ट्रेन यांच्या ‘लाइफ ऑन मिसिसिपी’ या इंग्रजी पुस्तकाचा पर्यायही होता. त्यामुळे इंग्रजी- मराठी असा काही निष्कर्ष इतक्या कमी सँपल्सच्या (पुस्तकांच्या) आधारे काढता येणार नाही.
तसेच, कोणत्या प्रकारची पुस्तके प्रभावित करून जातात असा प्रश्न उपस्थित केला तर? प्रस्तुत पुस्तकात वैचारिक पुस्तकांवरील लेखांची संख्या जास्त आहे. पण आत्मचरित्र, कविता व कादंबरी या तिन्ही प्रकारची पुस्तकेही त्यात आहेत (‘बिनपटाची चौकट’, ‘हे माझ्या गवताच्या पात्या’, ‘नक्षत्राचे देणे’, ‘धूप के साये में’, ‘टोपी शुक्ला’, ‘बलुतं’, ‘वुदरिंग हाइट्स’) हे लक्षात घेतले आणि आणखी काही सँपल्स घेतली तर चित्र बदलूही शकेल कदाचित.
प्रभावित करून जाणारी पुस्तके ‘बेस्टसेलर’ किंवा ‘क्लासिक्स’मधील असतीलच असेही नाही, हे या पुस्तकांच्या नावांवरून नजर टाकली तरी कळेल. मात्र इव्हान इलिच आणि युवाल नोवा हरारी यांची पुस्तके अनुक्रमे ‘क्लासिक्स’ व ‘बेस्टसेलर’ आहेत आणि ती दोन पिढ्यांतील दोन मनोविकारतज्ज्ञांना (अनुक्रमे डॉ. आनंद नाडकर्णी व डॉ. हमीद दाभोलकर) प्रभावित करून गेलीत, ही नोंद घेतली पाहिजे.
‘बेस्टसेलर’ आणि ‘क्लासिक्स’ या दोहोंमधून जाणाऱ्या प्रवाहातील पुस्तकेही प्रभावित करणारी असू शकतात. उदा. दत्ता नायक यांना प्रभावित करून गेलेले अल्बर्ट एलिस यांचे ‘अ गाइड टू रॅशनल लिविंग’ हे पुस्तक.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
छाया दातार, संध्या गोखले आणि शिल्पा कांबळे या तीन मान्यवरांना प्रभावित करून गेलेली पुस्तके ‘लोकप्रिय’मध्ये मोडणार नाहीत तितकीशी, पण संशोधनावर आधारित अशा या पुस्तकांमध्ये प्रभावित करून जाण्याची क्षमता तुलनेने जास्त असू शकते असे कदाचित म्हणता येईल. असेच काहीसे ग. प्र. प्रधान यांच्या ‘साता उत्तराची कहाणी’बद्दलही म्हणता येईल..
सात-आठ शतके मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा ग्रंथ म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ आपल्याला माहीत असतो, परंतु तो पूर्ण वाचलेला आहे. अशांची संख्या तुलनेने खूप कमी असते. सदानंद मोरे यांचा लेख त्यांच्यावर ‘ज्ञानेश्वरी’चा वेगळ्या प्रकारचा प्रभाव तर दाखवतोच, पण ‘ज्ञानेश्वरी वाचायची राहून गेली’, अशी जाणीव अनेकांच्या मनात उत्पन्न करून जाणारा आहे.
अशा या २१ लेखांमधून मोठे व ठोस असे निष्कर्ष काढता येणार नसले तरी, एक विशेष महत्त्वाचा निष्कर्ष डोकावताना दिसतो आहे. तो असा की, मनाची काही एक मशागत झालेली असते (अभ्यास व अनुभव यांच्यासह) आणि त्या टप्प्यावर त्याला अनुकूल असे पुस्तक वाचनात आले, तर ते मनात रूजते, प्रभावित करून जाते. म्हणजे मनातला गोंधळ संपुष्टात आणण्यास उपयुक्त ठरते किंवा मनात निर्माण झालेल्या कोंडीला वाट करून देते.
संध्या गोखले यांनी त्यांच्या लेखात ‘कावळा बसायला आणि पारंबी तुटायला एकच वेळ आली असावी’, अशी शक्यता त्यांना प्रभावित करून गेलेल्या पुस्तकाबाबत व्यक्त केली आहे. प्रभावित करून जाणाऱ्या बहुतांश पुस्तकांच्या बाबतीत असेच होत असावे, असे म्हणायला बराच वाव आहे, हे अन्य लेख वाचताना जाणवते.
शिवाय, असेही म्हटले जाते की (जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या नावाने ते कोटेशन वापरले जाते), “एखादा विचार तुम्हाला पटला किंवा कोणी पटवून दिला म्हणून तुम्ही तो स्वीकारला, असे कमी वेळा घडते; बहुतांश वेळा असेच घडते की, आपल्या मनोभूमिकेला अनुकूल किंवा पूरक असा विचार समोर आला/कोणी आणला म्हणून तो स्वीकारला.”
या विधानातही बरेच तथ्य आहे, असे मानले तर? तर असे म्हणता येईल की, कोणावरही मोठा प्रभाव टाकून जातील इतकी शक्तिशाली पुस्तके नसतात, पण ती इतकी शक्तिशाली निश्चितच असतात की, त्यांना अनुकूल मानस असलेल्या व्यक्तीवर सखोल प्रभाव टाकून जातात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
यातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचना’चे व ‘अधिक चांगल्या वाचना’चे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता-प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभावित करून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!
ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाण्यांच्या शोधात असते. अर्थातच हे एक सर्वपरिचित साधे सत्य आहे, पण प्रयोगातून पुढे आलेले! म्हणून याचे महत्त्व अधिक!
सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बऱ्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधुक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल.
‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ - संपादन विनोद शिरसाठ
साधना प्रकाशन, पुणे \ पाने - १४६ \ मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment