इतिहासशास्त्र ही मानवशास्त्र विद्याशाखेतील अतिशय महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. इतिहास पूर्वग्रहदूषित, व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून वा विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी लिहिला गेला, तर त्याचे समाजाला विपरीत परिणाम भोगावे लागतात. इतिहास हा नेहमीच ऐतिहास पुराव्यांवर आधारित असावा. त्यासाठी संसाधनांचा उपयोग वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिरपेक्ष भावनेतून व्हावा, ही अपेक्षा असते, परंतु तसे होत नाही. भारतातील इतिहास मार्क्सवादी ज्या पद्धतीने मांडतात, त्यात त्यांचा दृष्टीकोन प्रभावीत झालेला दिसतो. तसा सांस्कृतिक अंगाने विचारसरणीच्या पुष्टीसाठी वा विशिष्ट अस्मिता जोपासण्यासाठी इतिहासाची व्यक्तिनिष्ठ मांडणी केली जाते. त्यामुळे ती सदोष ठरते आणि खरा इतिहास बाजूला सारला जातो.
भारतातील विविध धारणा, घटना, वेगवेगळ्या कालखंडातील घडामोडी व त्यांचा आजच्या परिस्थितीशी जोडला जाणारा संदर्भ नीट समजून घेतला नाही, तर त्याचे अनेक विपरीत परिणाम घडू शकतात. म्हणून इतिहास या ज्ञानशाखेचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणे गरजेचे आहे.
मी इतिहास आणि राज्यशास्त्र आवडीनं वाचणारा एक विद्यार्थी आहे. याचं साधं कारण असं आहे की, १९७२ सालापासून आजतागायत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रमोद कोपर्डे, दिनकर झिंब्रे, अशोक काळे यांच्यामुळे मी सार्वजनिक जीवनात, सामाजिक चळवळीमध्ये आलो. त्या काळात सामाजिक चळवळीमध्ये अनेकदा अभ्यास शिबिरे, अभ्यासवर्ग घेतले जात असत.
त्यामध्ये मे. पुं. रेगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर, राम बापट, विनायक कुलकर्णी, य. दि. फडके अशा अनेक मान्यवरांचा सहवास मिळाला. त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यातून या अभ्यासाची गोडी वाढली. ती वाढत असताना मनात ज्या विषयी रस निर्माण झाला, तो ‘हिंदुत्वा’चा आणि ‘हिंदूराष्ट्र’वादाचा चिकित्सक अभ्यास करण्याचा होता. त्या अनुषंगाने मी ऐंशीच्या तीन सरसंघचालकांच्या वैचारिकतेचा आढावा घेणारी एक छोटेखानी पुस्तिकाही लिहिली होती.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
आता इतिहासाच्या कक्षा खूपच व्यापक झाल्या आहेत. केवळ ढाल-तलवार, कोण गादीवर आलं, कोण गेलं याच्या पलीकडे इतिहास पोहचला आहे. मला स्वत:ला असं वाटतं की, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या विषयांचा समावेश होतो, ते सारेच विषय आता इतिहासाच्या अभ्यासाचे विषय झालेले आहेत.
सी. पी. स्नो नावाचे एक इतिहासाचे ब्रिटिश अभ्यासक आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की, कला, साहित्य आणि भौतिक विज्ञान यांची जेव्हा फारकत होते, तेव्हा त्याचा परिणाम संस्कृतीवरही घडतो आणि इतिहासावरही घडतो. दुसरे महाराष्ट्रातले आद्य तत्त्वचिंतक अच्युतराव पटवर्धनांनी एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की, ‘जेव्हा दृश्य आणि द्रष्टा यांच्यामधलं अंतर अधिकाधिक वाढतं, तेव्हाच वास्तव अर्थानं तटस्थपणे घडामोडींकडे पाहिलं जातं. हे जसं विज्ञानाच्या क्षेत्रात दिसतं, तसं इतिहासाच्या क्षेत्रामध्येसुद्धा दिसायला हवं.’
मध्यंतरी ‘मायबोली’ नावाच्या एका मराठी वाहिनीने एक उपक्रम केला होता. तिने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतरांना एक प्रश्न त्यांनी विचारला - रायगडला राजधानी हलवण्यापूर्वी शिवाजीमहाराजांची राजधानी कोणती होती? दुर्दैवानं एकाही विद्यार्थ्याला, गृहिणींना, नागरिकांना त्यांचं उत्तरं देता आलं नाही.
महाराष्ट्राला दोन वेडानं भारलेलं आहे असं मानलं जातं. एक ‘नाटका’चं आणि दुसरं ‘इतिहासा’चं. पण अडचण अशी आहे की, इतिहासाचं वेड आणि इतिहासाचं भान याच्यामध्ये आपण गल्लत केलेली आहे. आपल्याला इतिहासाचं भान नाही. त्यामुळे इतिहासानं वेडं होणारी आणि करणारी जी मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांची इतिहासाच्या विचारविश्वामध्ये सामान्यत: चलती राहिली आहे.
दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की, महाराष्ट्रामध्ये इतिहास हा शिकण्यापेक्षा, चिकित्सकपणे वाचण्यापेक्षा गोष्टीरूपानं ऐकण्यातच महाराष्ट्रीय मंडळी धन्यता मानतात. महाराष्ट्राचं गेल्या ६० वर्षांचं मानस इतिहासाच्या ज्या शाहिरी परंपरेनं घडवलेलं आहे, त्यांनी ‘दृश्य’ आणि ‘द्रष्टा’ याच्यातलं अंतर वाढवण्याऐवजी जणू काही आपल्यासमोर इतिहास घडतोय, या पद्धतीनं त्यांनी इतिहास सांगितला. त्यामुळे इतिहासाच्या वेडाची निर्मिती झाली आणि इतिहासाचं भान समाप्त झालं.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
म्हणून त्याबाबतची खंत दूर करायची असेल, तर डोकं ताळ्यावर ठेवून इतिहासाकडे पाहण्याची ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टी आपल्याला विकसित केली पाहिजे. त्याशिवाय इतिहासाच्या संमोहनातून आपण बाहेर येणार नाही.
या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की, अनेक गोष्टींचे इतिहास मराठीमध्ये अभ्यासकांकडून लिहिले गेलेले नाहीत. भारतीय ‘राष्ट्रवादा’चा समग्र इतिहास लिहिला गेलेला नाही. कलाप्रांत, विज्ञानप्रांत हे तर इतिहासापासून लांबच आहेत. विज्ञानाचा इतिहास मराठातून लिहिला गेलेला नाही. क्रिकेटचा इतिहास लिहिला गेला, पण देशी खेळांचे इतिहासही लिहिले गेलेले नाहीत. इतिहासाच्या अभ्यासकांना अनेक न हाताळलेली क्षेत्रं आज खुणावत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा इतिहास आज ना उद्या लिहिला जाईल, पण इतिहासाचं भान आणि राष्ट्राची बांधणी, यातलं नातं जगभर असणार आहे… आपल्याकडेही असणार, ते आजच्या टप्प्यावर मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
याचं कारण असं, आपण सगळ्यांनीच आज एका अत्यंत निर्बुद्ध, सांस्कृतिकदृष्ट्या आंधळ्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून खराखुरा इतिहास लोकांसमोर न आणण्यासाठी आपली धडपड चालू आहे. म्हणून एका बाजूला परंपरेचं गौरवीकरण, राष्ट्रपुरुषांचं उदात्तीकरण, स्वातंत्र्यवीरांचं उदात्तीकरण करून खरा इतिहास झाकण्याचे पद्धतशीर प्रयत्न नव्याने सुरू झालेले आहेत.
मी आज विषय निवडला आहे तो ‘हिंदू राष्ट्रवादा’च्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या इतिहासाशी संबंधित आहे. तो निवडायचं एकमेव कारण असं आहे की, आज ‘हिंदू राष्ट्रवादा’ची वैचारिक, तात्त्विक बैठक असणारे लोक राज्यकर्ते झालेले आहेत. त्याच्यातून एक असा भ्रम निर्माण केला गेलेला आहे की, भारतीय जनतेनं या सगळ्याला मान्यता दिलेली आहे. हा भ्रम चुकीचा आहे, हे इतिहासाच्या आधारे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
माझ्या मांडणीचा संदर्भ साधारण १९२०-२५ या कालखंडातला आहे. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ‘हिंदुत्वा’ची आणि ‘हिंदू राष्ट्रवादा’ची संकल्पना प्रसृत झाली, तीच मुळी इटली आणि जर्मनीतल्या ‘फॅसिझम’ने प्रभावित होऊन.
‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदू राष्ट्रवाद’ हे दोन शब्द जरी आपल्या कानावर पडले, तरी आपल्याला असं वाटतं की, ‘हिंदू’ असणं आणि ‘हिंदुत्ववादी’ असणं याच्यात काही गैर नाही आहे. त्यात काही गैर आहे असं मीही मानत नाही,पण प्रश्न हिंदुत्वाचा आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
या संकल्पना ज्या कालखंडात प्रसृत झाल्या आहेत, त्याचा इतिहासावर असलेला परिणाम, प्रभाव लक्षात घेतला पाहिजे. हा काल संपल्यानंतर तरी या संकल्पना ‘फॅसिझम’पासून मुक्त झालेल्या आहेत का? तर याचंही उत्तर दुर्दैवानं आज ‘नाही’ असंच द्यावं लागतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याचा ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या रचनेवर वैचारिक, बौद्धिक असा प्रभाव आहे. सहसा संघाचं ‘इटली कनेक्शन’ आपल्या लक्षामध्ये येत नाही.
मार्झिया कॅसरोलीना या लेखिकेने भारतीयांच्या ‘हिंदुत्वा’च्या संकल्पनेचा आणि ‘राष्ट्रवादा’चा अत्यंत सखोलपणे वेध घेतलेला आहे. अस्सल साधनांच्या आधारे तिने असंख्य पुरावे वापरलेले आहेत. त्याचे निष्कर्ष माझ्यापेक्षा कदाचित थोडेसे वेगळे असतील, पण माझं विश्लेषण आणि आणि विवेचन त्यातल्या काही ‘फॅक्टस’वरच आधारलेलं आहे.
इथं मला एक संदर्भ सांगावासा वाटतो. १९३०च्या दशकात आपल्याला महाराष्ट्रामध्ये ‘फॅसिझम’विषयी आकर्षण निर्माण झालेलं दिसतं. किंबहुना लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर १९२४-३५ या कालखंडामध्ये ‘मराठा’, ‘केसरी’ या वर्तमानपत्रांमध्ये फॅसिझमचं समर्थन करणारे लेख प्रकाशित झालेले आहेत. ‘केसरी’, ‘मराठा’चा त्या काळातला वाचक तत्कालीन महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजातून आलेला आहे. त्या गटामध्ये फॅसिझमविषयी आकर्षण निर्माण झालेलं दिसतं. ‘केसरी’मध्ये मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीनं कशी कशी प्रगती केली, याबद्दलचा एक सविस्तर लेख प्रकाशित झाला होता.
दुसरा संदर्भ असा आहे- १९२३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुत्व’, ‘हिंदू राष्ट्र’ याच्याबद्दल मांडणी केली. तिसरा एक संदर्भ आहे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. ती जरी १९२५मध्ये झाली असली, तरी त्याचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावर धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा प्रचंड वैचारिक प्रभाव आणि एका टप्प्यावर दबावही होता. गोलमेज परिषद आटोपल्यानंतर मुंजे १९३१ साली मुसोलिनीला भेटायला इटलीमध्ये गेलेले होते आणि १९ मार्च रोजी मुसोलिनीला प्रत्यक्ष भेटले होते. त्याचं वर्णन त्यांनी स्वत:च्या डायरीत लिहिलं आहे. त्यामुळे त्याच्या अस्सलपणाबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही.
केवळ मुसोलिनीला भेटणं, हा जसा एक भाग होता, त्याच्याच बरोबरीनं इटलीमधल्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालयं यांची पाहणी करणं आणि त्या धर्तीवरचं काम भारतामध्ये सुरू करणं, हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा उद्देश होता.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
मुंजे यांच्या साहित्यामध्ये आणखी एक संकल्पना आढळते, ज्याचा या फॅसिझमशी थेट संबंध आहे. आपण साधारणत: समाजवादी समाज, कम्युनिस्ट समाज या प्रकारची विधानं किंवा या प्रकारच्या संकल्पना ऐकलेल्या आहेत. मुंज्यांच्या लेखनामध्ये ‘मिलिटरीरायझेशन ऑफ हिंदू सोसायटी’ असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे हिंदू समाजाचं लष्करीकरण व्हायला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
त्यांनीच एका ठिकाणी म्हटलं आहे की, सामान्य नागरिक आणि सैनिक यांच्यामध्ये फरकच ओळखू येता कामा नये, इथपर्यंत समाजाचं लष्करीकरण किंवा सैनिकीकरण व्हायला पाहिजे.
याचा अर्थ ज्या प्रकारची समाजरचना मुंज्यांना, त्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या हेडगेवारांना आणि पुढे चालून जर्मनीच्या फॅसिझमचे समर्थन करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत होती, तो समाज एका बाजूने हुकूमशाहीवर आधारलेला, एका माणसाच्या आज्ञेवर चालणारा, लाखो लोकांच्या शिस्तबद्ध आज्ञापालनावर चालणारा, कोणताही प्रश्न न विचारणारा, कोणतीही कौटुंबिक कारणं न सांगणारा आणि देशाच्या आज्ञेनुसार आपल्या आयुष्याचं बलिदान द्यायला तयार असणारा आहे.
म्हणून मी असं म्हणतो की, महाराष्ट्रामधल्या ‘हिंदू राष्ट्रवादा’ची, ‘हिंदुत्वा’ची सुरुवात ही महाराष्ट्रातल्या ‘फॅसिझम’ची सुरुवात आहे. तिथून महाराष्ट्रात फॅसिझम प्रवाह सुरू झाला. अर्थात तो सर्वसमावेशक असणाऱ्या ‘भारतीय राष्ट्रवादा’ने झिडकारलेला आहे. मात्र त्याची किंमत आपल्याला गांधींच्या हत्येच्या रूपानं मोजावी लागली आहे.
पुढे चालून १९४२च्या आसपास संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संपूर्ण बौद्धिक कायापालट केला असं मानलं जातं. त्यांचं ‘We of Our Nationhood Defined’ हे पुस्तक १९४२च्या आसपास प्रकाशित झालं. त्याच्यामधली ‘राष्ट्र’ संकल्पनेची सगळी मांडणी फॅसिस्ट तत्त्वावर आधारलेली आहे.
गांधीजींची हत्या ज्या वेळेला झाली, त्या वेळेला काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीमध्ये एक पत्रक प्रसृत झालेलं होतं. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी त्या पत्रकामध्ये संघाच्या कार्यपद्धतीबद्दलची काही टिपणं केलेली आढळतात. त्यातली काही निवडक उदाहरणं तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे या मंडळींच्या कार्यपद्धतीचा अंदाज यावा. त्यांनी असं म्हटलं होतं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही महाराष्ट्रीयन ब्राह्मणांची संघटना आहे. महाराष्ट्रातल्या आणि मध्य भारतामधल्या ब्राह्मणेतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यांचे सर्व प्रचारक एकाच जातीतून आलेले आहेत. यांचा संसदीय मार्गावर विश्वास नाही. हे गुप्त मंडळ्यांच्या धर्तीवर काम करतात. यांचा ध्वज भगवा असला तरी यांच्याकडे लिखित घटना नाही. यांच्याकडे फक्त एक आत्यंतिक मर्यादित लोकांचं असं निर्णय घेणारं मंडळ आहे. त्याचं साम्य मुसोलिनीच्या ‘ग्रेट कौन्सिल’शी सांगता येईल. यांच्या बैठकीचे कोणतेही अहवाल, मिनिटस उपलब्ध नाहीत. अशा गुप्त पद्धतीनं ही मंडळी काम करतात. मुंज्यांचे शिष्य डॉ. हेडगेवार हे यांचे प्रमुख आहेत, एवढीच माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
‘केसरी’-‘मराठा’तल्या ज्या लेखांचा मी उल्लेख केला, त्यातल्या एकामध्ये फॅसिझमचं कौतुक का, याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, मुसोलिनीने आणि पुढे चालून जर्मनीत हिटलरने रसातळाला गेलेला एक समाज आणि एक राष्ट्र उभं केलं, त्याच्यात चैतन्य आणलं, अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली आणि जगभर इटली व जर्मनी या दोन सत्तांचा धाक निर्माण झाला. तो धाक निर्माण होणं, हे महासत्तेचं लक्षण असल्यामुळे हे दोन्ही देश आपल्यासाठी, हिंदुस्तानसाठी आदर्श असू शकतात.
मुसोलिनीने केलेल्या काही सुधारणांचाही उल्लेख त्या लेखात कौतुकानं केलेला आहे. म्हणजे मुसोलिनीने संसद बरखास्त करून टाकली. त्याऐवजी ‘ग्रेट कौन्सिल’ नावाची एक संस्था अस्तित्वात आणली. संसदेतील प्रतिनिधी लोकांमधून निवडून येत असत, त्याऐवजी या ‘ग्रेट कौन्सिल’वर मुसोलिनीच्या मनात असणाऱ्या व्यक्तीचं ‘नॉमिनेशन’ करण्याची पद्धत आणली.
त्याचबरोबर कुटुंबसंस्थेचा अडसर, पारंपरिक मूल्यांबाबतचा आग्रह, घटस्फोटाला परवानगी नाकारणं, कुठल्याही व्यक्तीला सिंगल राहण्यासाठी परवानगी नाकारणं, स्त्रियांना मतदानाचा अधिकार नाकारणं, या प्रकारच्या मुसोलिनीच्या सुधारणांचं कौतुक ‘केसरी’तल्या त्या लेखामध्ये दिसतं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुसोलिनीला गांधींबद्दल आदर होता, पण तो गांधींच्या मार्गांबद्दल नव्हता, तर हा माणूस शस्त्राशिवाय प्रचंड प्रमाणात माणसांचं ‘मोबिलिझेशन’ करू शकतो, याबद्दल होता. डॉ. मुंजे यांच्याशी थोडंफार इकडचं-तिकडचं बोलणं झाल्यानंतर मुसोलिनीने त्यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही इथली सगळी महाविद्यालयं पाहिलीत का? लष्करी केंद्र पाहिलीत का? तुम्हाला त्यातलं काय आवडलं?’ मुंज्यांनी एका क्षणात उत्तर दिलं, या प्रकारची सगळी केंद्रं मला हिंदुस्थानात परत गेल्यानंतर सुरू करायची आहेत.
पुढे नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना झाली. पण मुंजे जेव्हा परत भारतामध्ये आले, त्या वेळेला आणखी एक योगायोगाची गोष्ट घडली. हेडगेवार रा.स्व.संघाचे संस्थापक होते, आणि १९२६ ते १९३१ या काळामध्ये ‘हिंदू महासभे’चे सेक्रेटरीदेखील होते. पुढे १९३७ नंतर ‘हिंदू महासभे’ची सूत्रं सावरकरांकडे गेली, त्यांना ‘राजकारणबंदी’ केल्यानंतरसुद्धा. तिथून पुढे सावरकरांचा प्रभाव हेडगेवारांवरही दिसतो अन् मुंज्यांवरही. संघपरंपरेमध्ये सावरकर गोळवलकरांच्या उत्तर कालखंडामध्ये अस्पृश्य ठरले, पण तोपर्यंत विद्यमान होते आणि त्यांच्याबद्दल आदर होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
त्याचा एक परिणाम म्हणून ३१ जानेवारी १९३४ रोजी कवडेशास्त्रींनी पुण्यात फॅसिझमबद्दलची एक परिषद संघटित केली होती. त्याला हेडगेवार उपस्थित होते. आता पाहा, ब्रिटिश राजवट आहे, १९३४ साल आहे, अजून दुसरं महायुद्ध सुरू झालेलं नाही आणि ही मंडळी अतिशय उघडपणे फॅसिझमच्या पुरस्काराची भूमिका घेऊन उभी होती.
ही जी परिषद झाली, तिला लालू नावाचे एक गृहस्थ, हेडगेवार, स्वतः डॉ. मुंजे हजर होते. त्यातील मुंज्यांचं जे निवेदन आहे, त्यात ते असं म्हणाले की, भारताला एका ‘हिंदू डिक्टेटर’ची गरज आहे. आणि तो शिवाजी महाराजांसारखा तरी असावा किंवा मुसोलिनी-हिटलरसारखा तरी.
लक्षात घ्या, छत्रपतींचा कालखंड, त्या काळात असणारी राजेशाही, ती राजेशाहीची चौकट भेटून पुढे जाण्याचा छत्रपतींचा प्रयत्न, हे सगळं बाजूला सारून त्यांनी एका फटक्यात शिवाजीमहाराजांना ‘डिक्टेटर’च्या रांगेमध्ये नेऊन बसवलेलं आहे. म्हणजे इथं या मंडळींची इतिहाससृष्टी, वैज्ञानिक दृष्टी जवळपास संपलेली दिसते. छत्रपतींच्या इतिहासाचं एक आकलन किंवा हिटलर, मुसोलिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्यूंच्या संदर्भात केलेला व्यवहार, या दोन गोष्टी यांच्या डोक्यामध्ये त्या कालखंडामध्ये आपल्याला सतत असलेल्या दिसतात.
डिक्टेटर इथं निर्माण व्हायला पाहिजे. तो आपोआप निर्माण होणार नाही, म्हणून संघटित प्रयत्न करावे लागतील आणि हे संघटित प्रयत्न करण्यासाठी नेटवर्क उभं करावं लागेल. त्यातल्या एका नेटवर्कचा भाग म्हणून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहत होते. दुसरा नेटवर्कचा भाग म्हणून ते मुंज्यांच्या डोक्यात असणाऱ्या लष्करी शिक्षण देणाऱ्या संस्थांकडे पाहत होते. यातून कोणत्या प्रकारचे मानस असणारे स्वयंसेवक निर्माण व्हावेत, याबद्दल मुंज्यांनी म्हटलेलं आहे- त्या स्वयंसेवकाची सनातन धर्मावर निष्ठा असली पाहिजे, दुसरं, ‘मास किलिंग’साठी त्याचं मानस तयार केलं पाहिजे. ‘मास किलिंग’ हा शब्द मुंज्यांचा स्वतःचा आहे.
त्या काळात मध्यप्रांतात असलेल्या विदर्भामध्ये हे काम करण्याची जबाबदारी मुंज्यांनी स्वीकारली. त्यांच्या मते, अहिंसा म्हणजे भित्रेपणा. त्यात त्यांनी अजून एका वाक्याची भर घातली - आपल्यातल्या मरणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण योद्धा म्हणून मरतोय. त्यांचं वाक्य पुढचं असं आहे, ‘द डाइंग वॉरियर डाइज मोअर इझिली व्हेन ही नोज हीज ब्लड इन एबिंग फॉर हिज नॅशनल गॉड’. हे एडवर्ड बन्सेलचं मूळ वाक्य मुंज्यांनी आपला लोगो बनवलेला आहे. युद्धानेच शांतता प्रस्थापित होते, ही मुसोलिनीची भूमिका होती. युद्ध हा जगावर राज्य करण्याचा उपाय आहे आणि त्याच्यामुळे सतत युद्धमान परिस्थितीमध्ये आपण आहोत, याचं भान देणारा मिलिटरी सोसायटीचा एक विचार मुसोलिनीच्या मनोव्यापारातून मुंजे, पुढे हेडगेवार या मंडळींनी स्वीकारलेला दिसतो.
त्याचा परिणाम म्हणून राष्ट्राला ‘व्हॉट इज नेशन? नेशन इज अ गॉड’ या प्रकारचं एक देवत्वाचं स्वरूप दिलेलं दिसतं. आपण हे देवासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी करतोय, या प्रकारची भावना स्वयंसेवकांना देण्याच्या दृष्टीनं त्यांची बौद्धिक तयारी सतत करायला पाहिजे. म्हणून ते पुढं असं म्हणतात की, सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये कुठेही फरक करता येणार नाही, अशी माणसं आपल्याला तयार करायची आहेत.
१९३०नंतर इटलीने भारतामध्ये आपले काही राजकीय प्रतिनिधी पेरायला सुरुवात केली. त्यांनी मेरिओ कॅरिलीओ नावाच्या माणसाला प्रमुख नेमलं. त्यांच्या हाताशी महाराष्ट्रामधला एक तरुण ब्राह्मण लागला. त्याचं नाव माधव काशिनाथ दामले. त्यांनी ‘लोखंडी मोर्चा’ (आयर्न स्क्वॉड) नावाची एक संघटना स्थापन केली. त्यांचं एक वर्तमानपत्रही होतं. त्यातून आपल्या विषारी आणि विखारी विचारांचा प्रत्यय ते देत असत. दुर्दैवानं सरकारची वक्र नजर पडल्यामुळे त्यांना ते बंद करावं लागलं.
या दामल्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम हिंदुत्वाच्या दृष्टीनं जर कोणतं केलं असेल, तर मुसोलिनीच्या ‘फॅसिझम अॅण्ड नाझीझम’ या पुस्तकाचं त्यांनी मराठीत भाषांतर. त्यामुळे इथल्या वरिष्ठ जातीय, वरिष्ठ वर्णीय संघाचा कोअर असणाऱ्या लोकांना थेटपणे तिकडे काय चाललं आहे आणि मुसोलिनीच्या चरित्रात काय आहे, याची प्रेरणा या पुस्तकाच्या रूपानं मिळालेली दिसते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
या संकल्पनेला त्या कालखंडामध्ये भले भले अभ्यासक, विचारवंत बळी पडलेले दिसतात. त्यातलं एक नाव सांगितलं तुम्हाला तर आश्चर्य वाटेल- बॅ. मुकुंद जयकर. हे पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरूही होते. नंतरच्या काळात त्यांना घटना समितीमध्ये घेतलेलं होतं. पण त्यांच्याऐवजी नंतर बाबासाहेबांना ती जागा मिळाली. या जयकरांनी स्वतः एक ‘स्वस्तिक लीग’ काढलेली होती. ‘स्वस्तिक’ हे चिन्ह हिटलरने १९४०च्या आसपास घेतलं, इकडे १९३०च्या आसपास जयकरांनी ही लीग काढली. १९४० साली जेव्हा स्वस्तिक हे हिटलरचं चिन्ह झालं, तेव्हा त्यांना इथं माघार घ्यायला लागली.
जयकरांना हिंदू महासभेमध्ये चांगलं स्थानं होतं, हे आपण विसरता कामा नये. त्याच वेळेला नेमका ‘सुडेटन जर्मन’चा प्रश्न निर्माण झाला. झेकोस्लोव्हाकिया आणि इतर देशांमध्ये अल्पसंख्य असणारे जे जर्मन्स आहेत, त्यांना जर्मनीत राहता येईल की नाही, यासाठी मतदानाची मागणी हिटलरने केली होती. त्यामुळे त्यांचा हक्क जर्मनीत राहण्याचा आहे, तर जर्मनीला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे, ही त्याची दुसरी बाजू.
ही भूमिका घेतल्यामुळे आपल्याकडे सगळ्यात प्रभावित कोण झालं असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी सातत्याने इटालीयन फॅसिझम आणि जर्मन फॅसिझमचा डिफेन्स केलेला आहे. १ ऑगस्ट १९३८ रोजी सावरकरांनी परराष्ट्र धोरणावर भाष्य केलं. त्यामध्ये ते असं म्हणतात की, नाझीझम हा जर्मनीचा हक्क आहे.
सावरकरांच्या डोळ्यासमोर मिलिटरी सोसायटी आहे. याचा अर्थ लष्करीदृष्ट्या बळकट समाज नव्हे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एखाद्या देशाचं लष्कर बळकट असेल, पण त्या देशाची राज्यव्यवस्था लोकशाही असू शकते. सावरकर असं म्हणताहेत की, इथं बळकट लष्कर हवं. म्हणून एका बाजूला ‘इंडियानायझेशन ऑफ आर्मी’ आणि दुसऱ्या बाजूला ‘मिलिटरायझेशन ऑफ सोसायटी’.
हे कोणासाठी? तर फक्त हिंदूंसाठी. ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, शीख यांच्यासाठी नाही. म्हणून हिंदूंचं लष्करीकरण, सैनिकीकरण अन् सैन्याचं हिंदूकरण आणि अनुषंगाने हिंदू धर्माचंसुद्धा. रा.स्व. संघाने चालवलेल्या ‘लष्करीकरणा’चा एक सरळ धागा आपल्याला स्वातंत्र्यपूर्वकाळाच्या इतिहासापासून आजतागायत दाखवता येतो.
पुढे सावरकरांनी असं म्हटलं आहे की, राष्ट्र ही कल्पना सांगत असताना, केवळ एकत्र राहणं हे पुरेसं नाही. हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रं आहेत, हा त्यांचा सिद्धान्त आहे. मुसलमानांचं लोकमत घेतलं, तर ते त्यांच्या वेगळ्या देशाची मागणी करतील, असं ते म्हणतातच. पण ते हे सांगत नाहीत की, हिंदूंनाही मुसलमानांबरोबर राहायचं नाही. म्हणून काही ठिकाणी सावरकर परराष्ट्र धोरणामध्ये, हिंदू महासभांच्या ठरावामध्ये लोकशाहीबाबत सोयीस्कर भूमिका घेतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
मुळामध्ये सावरकरांच्या सगळ्या राष्ट्र संकल्पनेचा मध्यवर्ती आशय जर काय असेल, तर दोन संकल्पना. एक, बहुसंख्याकांचं राष्ट्र बनतं, हा सावरकरांचा सिद्धान्त आहे. याचाच अर्थ असा की, बहुसंख्य लोकच राष्ट्र असतील, उरलेले दुय्यम असतील. सावरकरांनी यासाठी आधार कोणता घेतलाय? जर्मनीमधले जर्मन्स आणि ज्यू. मुसलमानांच्या प्रश्नाला समोर ठेवून ही व्याख्या केलेली आहे, हे लक्षात घ्या.
सावरकरांनी हिंदुत्वाची आणि त्याच्या आधारे राष्ट्रीयत्वाची केलेली व्याख्या पाहिली, तर त्यांनी ती पुण्यभू आणि मातृभू वा पितृभूच्या संकल्पनेनं आणलेली दिसते. ज्यांचं पुण्यभू, मातृभू भारतात आहे, ते सगळे आपोआप राष्ट्रीय आणि ज्यांचे नाही ते सगळे अराष्ट्रीय, अशी त्यांनी विभागणी केली. त्यामुळे हिंदूचं सगळंच इथे असल्यामुळे ते इथले, इथं मुसलमान राहतात, पण त्यांची पुण्यभू दुसरीकडे म्हणून ते भारतीय नाहीत.
तेच ख्रिश्नांचं आहे. खरं तर पारशांचही, पण त्यांच्याबद्दल सावरकर एक शब्द उच्चारत नाहीत. उलट पुढे एका ठिकाणी या समुदायाने कोणतीही तक्रार न करता भारताला आपली निष्ठा वाहिलेली आहे, भारतीयांच्या हितात आपलं हित मिसळलेलं आहे, कोणतंही आरक्षण मागितलं नाही, हे ते आवर्जून सांगतात. म्हणजे ही राष्ट्राची व्याख्याच मुळी व्यावर्तक होती. कुणाला तरी वगळण्यासाठी राष्ट्र नावाच्या गोष्टीची कल्पना केलेली होती. कारण राष्ट्रसभेचा धर्मनिरपेक्ष असणारा ‘सर्वसमावेशक राष्ट्रवाद’ विरुद्ध ‘व्यावर्तक राष्ट्रवाद’ अशी एक लढाई हिंदुत्ववादाच्या उगमापासून सुरू आहे, आजतर ती आणखीन तीव्र झालेली दिसते.
पुढे चालून नेहरू, गांधी आणि काँग्रेसने दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मनी आणि इटलीचा निषेध करणारे जे ठराव केले होते, त्याचा सावरकरांनी हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये समाचार घेतलेला आहे. ते म्हणतात, नेहरूंना नक्कीच हिटलरपेक्षा जर्मनी कळत नाही. हिटलरला जर्मनी अधिक कळणार की नेहरूंना कळणार? त्यामुळे त्यांनी काय करायचं, हे नेहरूंनी सांगू नये. म्हणजे जगभर लोकशाहीवादी भूमिका घेऊन लोकशाहीची दोस्त राष्ट्रं विजयी व्हावीत आणि फॅसिझमचा पराभव व्हावा, असं म्हणणाऱ्यांना सावरकर असं उत्तर देतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
मग भारताची रचना कोणत्या पद्धतीनं व्हावी? तिथं दुसरं महायुद्ध संपेपर्यंत ते लोकशाहीचा आग्रह धरत नाहीत. असा हा ‘लोकशाहीविरोधी’, व्यक्तीला समाजाच्या सेंद्रिय संकल्पनेमध्ये बसवणारा समाजयंत्राचा एक सुटा साधा भाग आहे. त्याला त्याच्या पलीकडे स्वतंत्र अस्तित्व नाही, असं मानणारा माणूस स्वातंत्र्यवीर असेल, पण ते स्वातंत्र्य ब्रिटिश जाण्यापुरतंच मर्यादित होतं.
आमचा खरा शत्रू काँग्रेस आणि मुस्लीम आहेत, हे सांगायला सावरकर विसरत नाहीत. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर या सगळ्या हिंदुत्ववाद्यांची पंचाइत झाली. विशेषतः हिंदू महासभावादी आणि सावरकरवाद्यांची. कारण एका बाजूला त्यांच्या विरोधी हे व्हायला लागलं. त्यामुळे त्यांना नरमाईचं धोरण घ्यावं लागलं. मग त्यांनी ठराव केला की, जर ब्रिटिश आम्हाला वसाहतीत स्वराज्य तत्काळ देणार असतील, तर आम्ही ब्रिटिशांच्या बाजूनं आमच्या तरुणांना, मुलांना सैन्यामध्ये उतरवू, नसतील तर आम्ही गप्प राहू.
दुसऱ्या ठरावामध्ये त्यांनी जाहीर केलं की, आताच्या क्षणाला आम्हाला नाझीझम आणि फॅसिझमच्या विरुद्ध भूमिका घेणं शक्य नाही. उघड त्यांची बाजू घेणं शक्य नाही, म्हणून सध्या आम्ही शांत राहू!
तीच भूमिका आधीच्या कालखंडामध्ये हेडगेवारांची होती. नाना पालकरांनी हेडगेवारांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यातली विधानं वाचली तर धक्का बसतो. हेडगेवार सरळ असं म्हणतात की, एखादी मशीद बघून राग का येत नाही, मला कळत नाही. त्या कालखंडात नागपूरला दंगल झाली. त्यात ३०-४० मुसलमान डोक्याला पट्ट्या बांधून जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा हेडगेवारांनी असं लिहिलं की, ‘आता खऱ्या अर्थानं हिंदू जागा झालेला आहे.’ काँग्रेसचा क्लेम नाकारण्यासाठी व्हाईसरायच्या कौन्सिलमध्ये आम्हाला जागा द्या, असं म्हणणारा हा राष्ट्रवाद आहे. त्याचा परिणाम आज आपण भोगतो आहोत.
१९४५नंतर जगाचे संदर्भ बदलले. स्वातंत्र्य मिळणार हे जाहीर झालं, निर्वसाहतीकरणाला सुरुवात झाली. जगभर लोकशाही राष्ट्रांचा विजय व्हायला लागला. खुद्द जर्मनीची फाळणी होऊन एक, लोकशाही स्वीकारणारा आणि दुसरा, डाव्या हुकूमशाहीचा जर्मनी अस्तित्वात आला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू फॅसिझमचे संदर्भ पुसट होत जाताना दिसताहेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्ववादी संघटनांनी औपचारिक राजकीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून ‘सोशो-कल्चरल फॅसिझम’ची पायाभरणी करायला सुरुवात केली. थोडक्यात, हिंदुत्वाचा प्रवाह सुरुवातीपासूनच फॅसिस्ट वळणाचाच आहे. शत्रूविषयी ‘किलिंग इन्स्टिक्ट’ जोपासणारा, राष्ट्राची सेंद्रिय रचना मानणारा आहे. हुकूमशाही किंवा एका ‘ग्रेट डिक्टेटर’ची वाट पाहणारा आहे. संघटनात्मक रचना आणि गुप्ततेवर विश्वास ठेवणारा आहे.
‘गांधीहत्या आणि मी’ या पुस्तकात अनेक ठिकाणी गोपाळ गोडसेनी सावरकरांविषयी संदिग्धता बाळगलेली आहे. सावरकर कायदेशीरदृष्ट्या खटल्यातून सुटले, निर्दोष मुक्त झाले, पण गोपाळ गोडसेच्या कथनामध्ये सावरकरांविषयी संशय निर्माण होईल, अशी अनेक वाक्यं आणि वचनं आपल्याला दाखवता येतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, गुप्त पद्धतीनं काम करणारी माणसं कारस्थानही गुप्त पद्धतीनेच करतात आणि आपले हेतू साध्य करतात.
आजही देशामध्ये फॅसिस्ट मानस रुजवण्याचा प्रयत्न आटोकाट चाललेला आहे. सध्याचे राज्यकर्ते दुर्दैवानं याच विचारांच्या मुशीतले आहेत. त्यामुळे तुम्ही साईबाबाची पूजा करावी की करू नये, साईच्या भक्तांनी गंगेत अंघोळ करावी की करू नये, याचे आदेश देणाऱ्या धार्मिक यंत्रणा तयार होणं, याचाच अर्थ हिंदू म्हणून कसं जगावं, याचं नियंत्रण हळूहळू येतंय.
सर्व प्रकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोप आणि त्यावर हिंसक हल्ले - मग ती हुसेनाची चित्रं असतील, ‘वॉटर’-‘फायर’सारखे सिनेमे असतील, इतिहासलेखन असेल, रामानुजाचं तीनशे रामायणासारखा महत्त्वाचा निबंध असेल, रेलिंगबाईचं पुस्तक असेल… अशी असंख्य पुस्तकं अशा अघोषित दहशतीमुळे बाजारात येत नाहीत. पेंग्विन, ऑक्सफर्ड यांनीही माघार घेतली आहे. या प्रकारे इतिहासाचं वास्तव दर्शन घडवणारी आणि चिकित्सा करणारी पुस्तकं हळूहळू येणं कमी होईल. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनाचा लोप होण्याची भीती वाटते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
आजमितीला आपल्यासमोर हिंदुत्वाने उभे केलेलं मॉडेल इस्त्राइलचं आहे. हे त्यांना यासाठी आकर्षित करतं की, जगभर पिळले गेलेले, छळले गेलेले ज्यू एकत्र आले, त्यांनी जिद्दीनं एक राष्ट्र बनवलं, स्वत:ची भाषा शोधून काढली. त्यामध्ये गाझा पट्टीतले मुसलमान वा इतर मंडळी, यांना दुय्यमत्वाने राहावं लागेल, किंबहुना राहायचं की नाही, हे बहुमताच्या आधारे, बहुसंख्येच्या मनावर ठरेल, या प्रकारची भूमिका त्यांनी घेतली म्हणून. हे सावरकरांनी केलेल्या जर्मन-ज्यू किंवा हिंदू-मुस्लीम मांडणीशी साम्य दाखवणारं आहे.
आज देश पातळीवर व महाराष्ट्रात जमातवादी, धर्माधिष्ठित राजकारणाची वाटचाल सुरू आहे. जमावाच्या अनियंत्रित वर्तनातून घडून येणारा हिंसाचार, त्याला अ-सामाजिक तत्त्वांचे आणि राजकारण्यांचे पाठबळ, मताच्या राजकारणासाठी राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्षांची संकुचित समाजहित व देशहिताला बाधक वृत्ती, धर्माच्या नावानं घडत असणारा उन्माद, यांबाबत राजकीय, सामाजिक धुरिणांनी वेळीच सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर फार मोठा अनर्थ संभवू शकतो.
जेव्हा सरकारच हिंसक होतं, तेव्हा समूहानं न्याय मागावा कोणाकडे? हे असं का झालं? याची पाळंमुळं शोधताना वरील ऐतिहासिक वास्तवाचं भान असणं व खरा इतिहास समजून घेणं, ही प्रत्येक मानव्यशास्त्र अभ्यासकाची भूमिका असावी. त्यातून उद्याच्या भारताचा आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल वाटचालीचा प्रवास घडो, हीच अपेक्षा.
दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास परिषदेत केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश
.............................................................................................................................................
लेखक किशोर बेडकीहाळ राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
kishor077@yahoo.co.in
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment