अजूनकाही
दि. २१ मार्च २०१७ रोजी गोविंद तळवलकर यांचे निधन झाले, तेव्हा गेली सात दशके धगधगत असलेले एक ज्ञानकुंड विझले. इ.स. १९५० ते ९५ या ४५ वर्षांतील सुरुवातीची १२ वर्षे ‘लोकसत्ता’, तर नंतरची ३३ वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकांतून त्यांनी पत्रकार-संपादक या नात्याने काम केले. त्यातही शेवटची २७ वर्षे ते महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक होते आणि त्या काळातील महाराष्ट्राच्या पत्रकारितेत त्यांचे स्थान एकमेवाद्वितीय होते. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, अर्थकारण, परराष्ट्रीय संबंध इत्यादी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तीन स्तर लाभलेले होते. कोणताही व कितीही मोठा विषय थेट हात घालून सुबोध शैलीत उतरवता येणे, हा त्यांच्या लेखनशैलीचा गुणविशेष होता. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात व दीर्घ काळाचे वाचक लाभले, त्यात या शैलीचा मोठा वाटा आहे. पण त्यांचा प्रभाव व दबदबा राहिला त्याचे कारण अनेक घटक त्यांच्या वाट्याला जुळून आले होते. त्या सर्व घटकांची व्यवस्थित जोपासना करीत, त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व व लेखन सतत विकसित होत राहील याची काळजी घेतली.
१. मुंबई शहरात जन्म झालेला असल्याने आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तारुण्याची (२२ वर्षापर्यंतची) जडणघडण झालेली असल्याने, काही अनुकूलता त्यांना प्राप्त झाल्या. मुंबईच्या जीवनाची गती आणि भाषा, जात, धर्म, वर्ग या सर्व बाबतींतील विविधता त्यांना अनुभवता आली. त्याचप्रमाणे ब्रिटिश सत्तेचा अखेरचा कालखंड व भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व संवेदनशील वयात पाहायला मिळाल्यामुळे, स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीविषयी अंदाज बांधणे व भाष्य करता येणे त्यांना सोपे गेले.
२. एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे मानले जाते, त्या शतकात भारतीय समाजजीवनात अवतरलेले राजकीय व सामाजिक सुधारणांचे प्रवाह तळवलकरांनी तारुण्याच्या काळात अभ्यासलेले होते. शिवाय, अठराव्या शतकापासून युरोपात नवे युग अवतरले असे मानले जाते, त्याचाही यथायोग्य अभ्यास त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीलाच केला होता. म्हणजे आजचे समाजजीवन मागील दोन शतकांच्या विविध प्रवाहांतून कसे आकार घेत गेले, हे समजून घेता आले; तर जो आत्मविश्वास येतो, तो तळवलकरांमध्ये पुरेपूर आलेला होता.
३. आधुनिक भारत घडवण्यासाठी विविध विचारधारा वा विचारप्रणाल्यांची ध्येयवादी माणसं १९२० ते १९८० या काळात मोठ्या जोमाने कार्यरत होती. त्यातूनच १९४० च्या दरम्यान साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, रॉयवादी आणि क्रांतिकारी असे प्रमुख प्रवाह आकाराला आले होते. (ग.प्र.प्रधान यांनी या प्रवाहांच्या वाटचालीचे मनोरम व उद्बोधक दर्शन ‘साता उत्तराची कहाणी’ या पुस्तकात घडवले आहे.) बुद्धिवंतांचा एक मोठा प्रवाह रॉयवादी या नावाने ओळखला जात होता. भावना वा बुद्धी यांच्या आहारी न जाता, व्यवहार्य दृष्टी ठेवून, सारासार विचार बाळगून ज्याने-त्याने आपल्याला पटेल तो व झेपेल तो मार्ग स्वीकारून कार्यरत राहावे, अशी धारणा असलेला तो प्रवाह होता. त्या प्रवाहात तळवलकरांची वैचारिक घडण झाली होती, हे लक्षात घेतले तर त्यांच्यातील पत्रकार-संपादक कोणती मूल्ये मानत होता, हे समजून घेणे सोपे जाते.
४. तळवलकरांच्या मितभाषीपणाबद्दल, माणसांना टाळण्याबद्दल, सभा-समारंभात न रमण्याबद्दल खूप लोकांनी खूप काही सांगितले आहे. त्यात काहींनी आपल्या मनाची भर टाकली, काहींनी काल्पनिक प्रसंग वा विधाने घुसडली, काहींनी त्यांच्या वर्तनाचा विपरीत अर्थ लावला. यामुळे वैचारिक क्षेत्रात तळवलकर हे एखाद्या आख्यायिकेप्रमाणे रंगवले गेले. पण आपला आवडीचा पेशा इमानेइतबारे करायचा तर वाचन-लेखन यासाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो. ते करायचे तर असे मोह टाळावे लागतात. मात्र साहित्य, संगीत, कला व राजकारण या क्षेत्रांतील अनेक लहान-थोरांशी तळवलकर व्यवस्थित व नियमित संपर्क-संवाद ठेवणारे होते. अन्यथा, इतक्या विविध विषयांवर, इतक्या सातत्याने व इतका दीर्घ काळ ते लेखन करूच शकले नसते.
५. तळवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका दोनच शब्दांत सांगायचा ठरला, तर लेखन व ग्रंथवाचन हेच शब्द वापरावे लागतील. त्यांनी ललित व वैचारिक या दोनही प्रकारचे किती सखोल व व्यापक वाचन केले आहे, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्या दोन डझन पुस्तकांच्या फक्त अनुक्रमणिकांवर नजर टाकली तरी पुरेसे आहे. मुख्य म्हणजे, त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखन-वाचनाला आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य आहे, असे जाणवते. त्यांनी जे काही कमावले आहे ते वाचनातून आणि त्यांचा जो काही प्रभाव वा दबदबा आहे तो लेखनामुळेच! त्यामुळेच पसायदानामधील ‘आणि ग्रंथोपजीविये। विशेष लोकी इये, दृष्टादृष्टविजये। होआवे जी’ या ओळीची आठवण येते. या ओवीचा अर्थ अभ्यासक-समीक्षक आणि वारकरी वेगवेगळ्या प्रकारे लावतात. ते असो. पण ग्रंथांच्या बळावरच जगणारा आणि ग्रंथांच्या माध्यमातून आपला प्रभाव निर्माण करणारा असा एक अर्थ लावला, तर ते तळवलकरांचे यथार्थ वर्णन होईल. मराठी वाचणार्या दोन-तीन पिढ्यांना तरी तळवलकरांनी इंग्रजी साहित्यविश्व व इंग्रजी ग्रंथजगत यांची विविध दालनं खुली करून देण्याचे काम केले. ‘टाइम्स’ ग्रुप बरोबर असल्याने त्यांना इंग्रजी विचारविश्वात वावरण्यासाठी ज्या सुविधा प्राप्त झाल्या, त्याचे त्यांनी चीज केले आणि मराठी-इंग्रजी हा सेतू उभारणीच्या कामात मोठे योगदान दिले.
असे हे गोविंद तळवलकर निवृत्तीनंतरची वीस वर्षे अमेरिकेत (त्यांच्या मुलींकडे) वास्तव्याला होते. २००७ मध्ये ते भारतात येऊन गेले, त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांनी साधनात १७० लेख लिहिले. सरासरी सांगायची तर तीन आठवड्यांतून एक लेख. त्या काळात रूढ असलेल्या प्रतिमेपलीकडचे तळवलकर काही वेळा दिसले; त्यातील पाच प्रसंग इथे सांगणे आवश्यक वाटते.
१. तळवलकरांनी साधनात लिहिलेल्या १७० लेखांपैकी सर्वोत्तम म्हणावा असा लेख म्हणजे चार्ल्स डिकन्सवरचा दहा हजार शब्दांचा लेख. इ.स.२०१२ मध्ये डिकन्सची द्विजन्मशताब्दी येणार होती, त्याआधी सहा महिने तरी ते डिकन्स (नव्याने) वाचत होते. ललित लेखकांमधे डिकन्स त्यांचा सर्वांत आवडता. या डिकन्सने त्याच्या कादंबर्यांमधून जे चित्रण केले आहे ते लहान मुलांचे, कामगारवर्गाचे, सर्वसामान्य माणसांचे, त्यांच्या हालअपेष्टांचे, त्यांच्या भाव-भावनांचे.
२. हमीद दलवाई यांच्यावर साधनाचा पुनर्भेट विशेषांक काढायचे आम्ही ठरवले (२०१५ मध्ये), तेव्हा तळवलकरांना विचारले होते- हमीदभाईंशी तुमचा संबंध आला होता का? त्यावर त्यांनी दलवाईंच्या मृत्यूनंतर लिहिलेला महाराष्ट्र टाइम्समधला अग्रलेख पाठवला होता आणि वर कळवले होते, ‘मी गप्पा मारण्यासाठी माझ्या घरी फार थोड्या लोकांना बोलवत असे, त्यात हमीद एक होता.’ त्या अग्रलेखात शेवटी तळवलकरांनी लिहिले आहे, ‘हमीद गेल्यामुळे आम्हाला आमचा धाकटा भाऊ गेल्याचे दु:ख होत आहे.’
३. इ.स.२००७ मध्ये साधनात सदर लेखनास (परामर्श) सुरुवात केल्यानंतर काहीच महिन्यांनी तळवलकरांनी कळवले, ‘माझ्या यापुढील मानधनाची रक्कम साधना विकासनिधीत जमा करावी’. ती संधी साधून आम्ही त्या वर्षी दोन युवा लेखकांना प्रत्येकी दहा हजार रुपये तळवलकरांच्या नावाने फेलोशिप देण्याचे ठरवले आणि तळवलकरांना विचारले, ‘फेलोशिपसाठी विषय कोणते असावेत, असे तुम्हाला वाटते?’ तेव्हा ‘ते तुमचे तुम्हीच ठरवा’ असे कळवून तळवलकरांनी दोन विषय तेवढे सुचवले होते. एक- ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी काही व्यक्ती-संस्था-संघटना काम करतात, त्यांची ओळख करून देणारा दीर्घ लेख. दोन हमाल, हातगाडीवाले, मजूर अशा कष्टकरी लोकांचे श्रम कमी व्हावेत यासाठी काही लोक सुलभ व स्वस्त तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांची ओळख करून देणारा दीर्घ लेख.
४. इंग्रजी नियतकालिकांची ओळख करून देणारी ‘वैचारिक व्यासपीठे’ ही तळवलकरांची लेखमाला साधनातून दीड वर्ष प्रसिद्ध झाली. नंतर ती पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून २०१२ मध्ये आली. त्या पुस्तकाच्या रॉयल्टीच्या रकमेचे काय करायचे, अशी विचारणा आम्ही केली. तेव्हा तळवलकरांनी कळवले, ‘अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे दलित मुलांचे हत्याकांड झाले आहे, मृतांच्या कुटुंबीयांना ही रक्कम पाठवली तर बरे वाटेल.’
५. मार्च-एप्रिल २००७ मध्ये तळवलकर भारतात आले होते, तेव्हा साधनाचा युवा संपादक या नात्याने त्यांच्याशी बारा-पंधरा भेटी झाल्या. त्यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची अशी तीव्र इच्छा होती की, तळवलकरांनी त्यांच्याकडे तासाभरासाठी यावे. त्या विद्यार्थ्यांनी खूपच पाठपुरावा केला म्हणून आम्ही तळवलकरांना म्हणालो, ‘‘सर, ही मुलं आठवड्यातून एकदा पत्रकारितेच्या क्लासला येतात, यातील कोणीही (अपवाद वगळता) पत्रकारिता करण्याची शक्यता नाही. आणि यापैकी कोणीही तुमचे कोणतेही लेखन वाचले असण्याची शक्यताही नाही. त्यांनी तुमचे फक्त नाव ऐकले आहे, आणि तुम्ही भारतात आलात म्हणून तुम्हाला जवळून पाहण्याची- ऐकण्याची संधी मिळावी इतकीच त्यांची इच्छा आहे. तुम्हाला सहज शक्य असेल तर एखादा तास काढून गेलात तर, तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधून काहीच मिळणार नाही. पण त्या सर्वांच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय प्रसंग असेल.’’ तळवलकरसर नकार देतील असे वाटले होते, पण क्षणभरही जाऊ न देता ते म्हणाले, ‘येतो म्हणून कळवून टाका’.
दोन दिवसांनी तिथे ते गेले आणि अर्धा-पाऊण तास अतिशय सोप्या पद्धतीने मुलांसोबत बसून बोलले. त्यानंतर तिसर्या दिवशी त्यातील काही मुले ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयात त्या छोट्या कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी गेली. ही बातमी स्वीकारायला उपसंपादकांनी नकार दिला, तळवलकर टिमविमध्ये या मुलांसमोर बोलायला गेले असतील यावर त्याचा विश्वासच बसला नाही. अखेर आम्ही खरे सांगतोय की नाही हे साधनाच्या युवा संपादकाला विचारा असे त्या मुलांनी उपसंपादकाला सांगितले. त्या उपसंपादकांनी साधना कार्यालयात फोन करून बातमी खरी असल्याची खात्री केली आणि मगच ती छापली.
या पाचही प्रसंगांतून दिसलेले तळवलकर त्यांच्या रूढ प्रतिमेला छेद देणारे आहेत. अशा या तळवलकरांच्या स्मृतीला साधना साप्ताहिकाच्या वतीने विनम्र अभिवादन.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या ८ एप्रिल २०१७च्या अंकातून साभार.)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ram Jagtap
Fri , 31 March 2017
1. वैचारिक व्यासपीठे, 2. डिकन्स आणि ट्रोलोप, 3. मधुघट
Sandeep Wagh
Fri , 31 March 2017
स्वर्गीय गोविंदराव तळवलकर यांची कोणती पुस्तके साधना ने प्रकाशित केली आहे याची माहिती मिळेल का ?
Bhagyashree Bhagwat
Fri , 31 March 2017
सुंदर आणि प्रभावी!