गेल्या दहा वर्षांत सिंहांच्या स्थलांतराचा प्रकल्प राबवला असता, तर कुनोमध्ये पुन्हा एकदा सिंहांची डरकाळी घुमली असती...
पडघम - देशकारण
आरती कुलकर्णी
  • ‘कुनो नॅशनल पार्क’मधील गढी आणि तेथील सिंहांची दोन प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Tue , 06 June 2023
  • पडघंम देशकारण कुनो नॅशनल पार्क Kuno National Park कुनो नंदी Kuno River सिंह Lion

काही दिवसांपूर्वी भारताने मध्य प्रदेशातल्या ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये आफ्रिकेतून आणलेले चित्ते सोडले आणि ते जागतिक पातळीवर नावाजलं गेलं. विंध्य पर्वताच्या कुशीत वाढलेलं हे जंगल अजिबातच साधंसुधं नाही. एकेकाळी हा वनराज सिंहांचा- आशियाई सिंहांचा - अभेद्य बालेकिल्ला होता!

ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेनं या जंगलाचा वेध घेतला, तर कुनो नदीचा झोकदार प्रवाह दिसतो. नदीच्या दोन्ही काठांनी झाडांच्या हिरव्या तपकिरी छत्र्यांचं घनदाट आच्छादन आहे. कॅमेरा जंगलाला वळसा घालून आला की, कुनो नदीच्या काठावर बुरुजांची भक्कम तटबंदी असलेली एक शानदार गढी दिसते. तिच्या बुरुजांवर पलिते पेटलेले असतात... 

सिंहांसाठी दिली गढी

ही गढी राजा गोपाल सिंग यांनी १८व्या शतकामध्ये नदीच्या डाव्या काठाला बांधली आहे. त्यामुळे या गढीला नैसर्गिक संरक्षण मिळतं. कुनो पालपूरचे किल्लेदार श्रीगोपाल देव सिंग या गढीचे वारसदार आहेत. गुजरातमधल्या गीरचे काही सिंह इथं आणायचं ठरलं, तेव्हा त्यांनी ही गढी आणि त्याभोवतीचं जंगल वनखात्याच्या ताब्यात दिलं.

इथं पुन्हा सिंह येणार असतील तर आम्हाला अभिमानच आहे, या भावनेनं त्यांनी गढी आणि जमीन दिली होती, पण आता सिंहांऐवजी चित्ते आणले गेले, ही गोष्ट त्यांना फारशी रुचलेली नाही... 

सिंहांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये गीरमधले काही सिंह आणावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्येच दिले होते. त्यानंतर या जंगलात सिंह आणण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली होती. कुनोचा हा अधिवास गीरसारखाच आहे. हे खटिहार गीर पानगळीचं जंगल आहे. पूर्वी इथं आशियाई सिंह असल्याच्या अधिकृत नोंदीही आहेत. त्यामुळे गीरचे काही सिंह इथं राहू शकतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

भारत सरकारने सिंहांच्या स्थलांतरासाठीचा २५ वर्षांचा कार्यक्रमही तयार केला होता. सिंहांचं जंगल संरक्षित असावं, यासाठी इथून २४ गावांचं स्थलांतर करण्यात आलं. या वन्यजीव अभयारण्याचं क्षेत्र वाढवून ते ‘नॅशनल पार्क’ घोषित करण्यात आलं.

हे जंगल, कुनो नदी आणि गाभा क्षेत्रातली ही गढी, अनेक वर्षांनी इथं अवतरणाऱ्या सिंहांची वाट बघत होतं. पण त्यांचा वनराज काही आलाच नाही… त्याऐवजी आला तो एक शाही पण परदेशी पाहुणा- चित्ता!!

गीरमध्ये उरले होते अवघे १२ सिंह

गुजरातमधल्या गीरमध्ये भारताने आशियाई सिंहांचं यशस्वी संवर्धन केलं आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला गीरमध्ये फक्त १२ सिंह उरले होते. पण त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले आणि आता त्यांची संख्या ६७४वर गेली आहे! एकट्या गीरच्या जंगलात एवढे सिंह झाल्यामुळे या क्षेत्रावर त्याचा ताण पडतो आहे. म्हणूनच काही सिंह कुनोच्या जंगलात हलवण्याचा प्रकल्प सुरू झाला होता, पण गुजरात सरकारच्या विरोधामुळे एकही सिंह कुनोला हलवता आला नाही. 

‘सिंहांचा जनसंपर्क कमी पडला’

गीरच्या सिंहांवर संशोधन करणारे डॉ.रवी चेल्लम यांच्या मते, ‘सिंहांची डरकाळी खूप मोठी असते. त्याची आयाळही रुबाबदार आहे. तो एका झडपेत मोठमोठे प्राणी गारद करतो. एवढं सगळं असूनही सिंहाला आपण वाघ, बिबटे आणि चित्त्यांइतकं महत्त्व दिलेलं नाही. याचं कारण म्हणजे सिंहांचा जनसंपर्क नेहमीच कमी पडतो!’

सिंह आळशी आहेत का?

डॉ.रवी चेल्लम यांनी गीरमध्ये राहून सलग पाच वर्षं या सिंहांचा अभ्यास केला आहे. ते सिंहांची वेगवेगळी छायाचित्रं दाखवून त्यांची कहाणी सांगतात, ‘हे सिंह बऱ्याच वेळा आराम करताना दिसतात. त्यामुळे सिंह आळशी असतात, अशी त्यांची बदनामी झाली. पण मी त्यांना जवळून पाहिलं, तेव्हा त्यांची ताकद माझ्या लक्षात आली.’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

‘गीरचे सिंह लपतछपत दबा धरून सांबर, चितळ, नीलगाय, म्हैस अशा प्राण्यांची शिकार करतात. सिंहाला एका वेळी मोठी शिकार सापडली की, मग तो सात दिवस काहीही न खाता राहू शकतो. म्हणून तर त्यांना झाडाखाली आराम करत पहुडणं शक्य होतं!’ 

छाव्यांसाठी झटणाऱ्या सिंहिणी

‘एका सिंहिणीने एकटीने नीलगायीवर झडप घालून तिचा फडशा पाडलेला मी पाहिला आहे. पण सिंहिणीला ही शिकार तिच्या छाव्यांसाठीही करायची असते. छाव्यांचं पालनपोषण तिलाच करावं लागतं. त्यामध्ये नर भाग घेत नाही… सगळ्या ‘कॅट फॅमिली’मध्ये सिंह हा एकमेव प्राणी कळप करून राहतो. अशा कळपांना ‘सिंहांची सोसायटी’ असं म्हणतात.’

सिंहांच्या नरांची युती

सिंहांच्या कळपामध्ये वेगवेगळ्या वयाच्या माद्या आणि त्यांचे छावे अशी रचना असते. त्यामुळे एका कळपात अगदी १५ सिंहही असू शकतात. सिंहांचे नर मात्र कळपापेक्षा वेगळे राहतात. ते दुसऱ्या नरांशी युती करून राहतात आणि फक्त खाण्याच्या किंवा मीलनाच्या वेळी कळपाशी संबंध ठेवतात. दोन किंवा तीन नर एकत्र पाहायला मिळतात आणि ते एकत्र शिकारही करतात.  

सिंह छाव्यांना ठार मारतात?

सिंहिणींनी वाढवलेल्या छाव्यांना मोठं झाल्यानंतर कळप सोडावा लागतो आणि दुसऱ्या नरांशी युती करून हद्दी आखाव्या लागतात. या हद्दींच्या स्पर्धेमध्ये क्षेत्र कमी असेल, तर मोठे सिंह वाढत्या छाव्यांना ठार मारण्याचीही शक्यता असते.

गीर का कमी पडतंय?

सिंहांच्या सोसायटीची रचना पाहिली तर लक्षात येतं की, त्यांच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी मोठ्या क्षेत्राची गरज असते. ‘गीर नॅशनल पार्क’चं सध्याचं क्षेत्र १ हजार ४१० चौ. किमी आहे. ते सिंहांसाठी कमी पडतं आहे. परिणामी ते बाहेर येत आहेत. सिंह भर वस्तीत आल्यानं गोंधळ उडतो. ते बिथरले तर माणसांवर हल्ले करण्याच्याही घटना घडतात.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

मालधारी आणि सिंहांचं सहजीवन

गीरमधला मालधारी समुदाय आणि हे सिंह इथं अनेक वर्षं सहजीवनाच्या भावनेनं राहत आहेत. हे मालधारी लोक म्हशी पाळतात आणि दूध, ताक, लोण्याची विक्री करून गुजराण करतात. सिंहांसाठी राखलेल्या या जंगलात चारा, पाणी यांची चांगली उपलब्धता आहे. त्यामुळे इथं राहणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे.

मालधारी त्यांच्या घरांना काटेरी कुंपण घालून पाळीव जनावरांना सुरक्षित ठेवतात. पण चरायला गेलेल्या म्हशींच्या कळपावर सिंहाने हल्ला केला, तर मात्र त्यांचं नुकसान होतं. मालधारी लोकांना सिंहांचं इथलं अस्तित्व मान्य आहे. त्यामुळे त्यांची फारशी तक्रार नसते. आता तर सरकारही नुकसान भरपाई देतं. पण तरीही गीरचे सिंह जंगलाबाहेर येत आहेत. 

साथीचा रोग आला तर सिंहांचं काय होणार?

हे आशियाई सिंह भारतात गीरमध्ये एकाच ठिकाणी एकवटले आहेत. त्यांना जर एखाद्या साथीच्या रोगानं घेरलं, तर मोठ्या संख्येनं त्यांचे मृत्यू होण्याचा धोका आहे. आफ्रिकेमध्ये ‘सेरेनगटी नॅशनल पार्क’मध्ये १९९४मध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. एका विषाणूच्या प्रसारामुळे तेथील ३०० सिंह दगावले होते.

त्यामुळेच डॉ. रवी चेल्लम यांच्यासारख्या वन्यजीव तज्ज्ञांनी गीरच्या काही सिंहांना कुनोमध्ये   हलवण्याचा आग्रह धरला होता. ते म्हणतात, ‘आम्ही सिंहांचे फक्त दोन कळप कुनोला हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. इतक्या कमी प्रमाणातल्या स्थलांतरामुळे गीरच्या सिंहांचं अजिबात नुकसान झालं नसतं. उलट त्यांचा वंश कुनोमध्ये आणखी विस्तारला असता.’ 

कुनोमध्ये आफ्रिकन सिंह?

याच कुनोमध्ये १९०४मध्ये ‘आफ्रिकन सिंहां’चे छावे सोडण्यात आले होते. त्या वेळच्या ग्वाल्हेरचे महाराजांनी लॉर्ड कर्झन यांच्या सल्ल्याने हा प्रकल्प राबवला होता. पण या आफ्रिकन सिंहांनी मोठं झाल्यावर पाळीव जनावरांवर हल्ले करायला सुरुवात केली. काही सिंह तर माणसांनाही मारू लागले. मग एकेक सिंहाचा माग काढून त्यांना बंदुकीनं ठार करण्यात आलं.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

कुनोमधून आशियाई सिंह नाहिसे झाले म्हणून इथे आफ्रिकन सिंह आणले. पण या सिंहांना इथं पुरेसं भक्ष्य मिळालं नाही आणि हे क्षेत्र त्यांच्यासाठी अनुकूलही नव्हतं. म्हणून ते या ठिकाणी तग धरू शकले नाहीत. आता आफ्रिकन चित्त्यांच्या बाबतीतही हीच भीती तज्ज्ञांना वाटते आहे.

आफ्रिकन चित्ता ही परदेशी प्रजाती

मुळात आफ्रिकन चित्ता ही परदेशी प्रजाती आहे. अशा प्रकारची परदेशी प्रजाती भारताच्या जंगलात तग धरू शकत नाही आणि त्यामुळे आहे ती परिसंस्थाही विस्कळीत होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

भारतातले चित्ते जंगल आणि माळरानं या दोन्ही अधिवासांमध्ये राहत होते. आफ्रिकन चित्ते मात्र तिथल्या विस्तीर्ण माळरानांवर राहतात. भारतातलं तापमान आणि आफ्रिकेतलं तापमान, यातही बराच फरक आहे. शिवाय आफ्रिकन चित्ते इंपाला, गॅझल्स, स्प्रिंगबक अशा प्राण्यांची शिकार करतात. भारतात सांबर, चितळं, काळवीटं,  चिंकारा आणि नीलगायी आहेत. या प्राण्यांची शिकार करण्याची आफ्रिकन चित्त्यांना अजिबातच सवय नाही.

सहा चित्त्यांचा मृत्यू

आफ्रिकेतून कुनोमध्ये आणलेल्या २० चित्त्यांपैकी आतापर्यंत तीन मोठ्या चित्त्यांचा मृत्यू ओढवला आहे. त्याचबरोबर ज्वाला या चित्तिणीचे तीन बछडेही दगावले. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याची मागणी तज्ज्ञ करत आहेत. चित्त्यांना खुल्या जंगलात सोडल्यानं पुन्हा एकदा माणूस विरुद्ध प्राणी असा संघर्ष नव्यानं सुरू होईल, अशीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीनं हा अत्यंत कसोटीचा काळ आहे.

चित्ता प्रकल्पामध्ये मोठी आव्हानं

एवढी सगळी आव्हानं असूनही भारताने चित्त्यांच्या संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी भारताचा वन विभाग आणि वन्यजीव तज्ज्ञांची पथकं अहोरात्र मेहनत करत आहेत. चित्ता प्रकल्पामध्ये आतापर्यंत जे काही झालं, त्याची आम्ही जबाबदारी घेतो, पण चित्त्यांच्या स्थलांतराचा प्रकल्प नक्की यशस्वी होईल, असं भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

हा प्रकल्प यशस्वी झाला तर ती चांगलीच गोष्ट असेल, पण त्यात काही आव्हानं आहेत, असं वन्यजीव तज्ज्ञ वाल्मिक थापर यांना वाटतं. त्यांनी आफ्रिकेमध्ये ‘सेरेनगटी नॅशनल पार्क’च्या चित्त्यांचा अभ्यास केला आहे. आफ्रिकन चित्त्यांना लागणारा अधिवास, हवामान, विस्तारित क्षेत्र, शिकार यातल्या कुठल्याच गोष्टी सध्या आपल्याकडे नाहीत. त्यामुळे हे चित्ते इथं तग धरणार नाहीत, अशी भीती त्यांना वाटते.

सिंहांची हाक ऐकणार कोण?

ही सगळी आव्हानं आशियाई सिंहांच्या बाबतीत नव्हती. पण कुनोमध्ये आफ्रिकन चित्ते आणले गेले आणि सिंहांचं स्थलांतर मागे पडलं, असं डॉ. रवी चेल्लम सांगतात. मात्र आज ना उद्या आपल्याला गीरच्या आशियाई सिंहांच्या स्थलांतराकडे लक्ष द्यावंच लागणार आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. 

गेल्या दहा वर्षांत सिंहांच्या स्थलांतराचा प्रकल्प राबवला असता, तर तो आतापर्यंत यशस्वीही झाला असता. कुनोमध्ये पुन्हा एकदा सिंहांची डरकाळी घुमली असती, असं सांगून डॉ. रवी चेल्लम शांतपणे त्यांचं सादरीकरण संपवतात. स्क्रीनवर सिंहाच्या छाव्यांचं एक सुंदर छायाचित्रं येतं... ते पाहिलं की सगळे वादविवाद बाजूला पडतात आणि आशियाई सिंहांच्या संवर्धनाची हाक आपल्या काळजाचा ठाव घेते!

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......