‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’ हे पुस्तक नुकतेच ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या ‘मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे’ विद्याशाखा आणि ‘कुसुमाग्रज अध्यासना’च्या वतीने प्रकाशित झाले आहे. यात महाराष्ट्रातल्या विविध मान्यवरांनी पुष्पाबाईंविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. याचे संपादन ‘मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखे’चे प्र. संचालक आणि विद्यापीठाच्या ‘कुसुमाग्रज अध्यासना’चे समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी केलं आहे. त्यांनी लिहिलेल्या सविस्तर संपादकियाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या ‘मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे’ विद्याशाखा आणि ‘कुसुमाग्रज अध्यासना’च्या वतीने महाराष्ट्रातल्या थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्राध्यापक पुष्पा भावे यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारं ‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’ हे संपादित पुस्तक प्रकाशित करताना आनंद होत आहे. ३ ऑक्टोबर २०२० रोजी पुष्पाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी जगात, देशभरात आणि आपल्या राज्यातही कोविड या संसर्गजन्य रोगाची भली मोठी साथ सुरू होती. त्या वेळी असलेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत पुष्पाबाईंचे सक्रिय असणं फार गरजेचं होतं, पण दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही.
मराठीच्या प्राध्यापिका, नाट्य समीक्षक, विचारवंत, निडर सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक, स्त्रीवादी विचारवंत, चळवळीतल्या झुंजार रणरागिणी अशी त्यांची ख्याती सांगता येते. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने असं पुस्तक सिद्ध करावं, हे या पुस्तकामागचं प्रयोजन.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
त्यासाठी पुष्पाबाईंच्या समवेत काम केलेल्या आणि त्यांना जवळून ओळखणाऱ्या त्यांच्या सहकारी, विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते, मराठी भाषा व साहित्याचे अध्यापक, हितचिंतकांकडून लेखन मागवण्यात आलं. या पुस्तकात ज्यांचे लेख समाविष्ट केले आहेत, त्यापैकी एक-दोन अपवाद वगळता सर्वांचाच पुष्पाबाईंशी निकटचा संबंध आलेला आहे.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तल्या इतिहासाच्या प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांनी आपल्या ‘पुष्पामावशी’ या लेखातून पुष्पाबाईंचं मनोज्ञ चित्रण रेखाटलं आहे. ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तले वर्ग आणि व्याख्याने, विविध चर्चासत्रे, कार्यशाळा अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांचा लेखिकेशी परिचय झाला. आपलं म्हणणं गांभीर्यानं मांडणं, कोणत्याही सत्तेच्या दबावापोटी आपल्या विचारांना मुरड न घालणं, समोरच्या माणसाचे विचार आपल्याशी असहमती दर्शवणारे असतील, तरीही आधी ते शांतपणे ऐकून घेणं आणि मग त्यांचा तितक्याच शांतपणे, विचारपूर्वक प्रतिवाद करणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व संवादात कडवटपणा किंवा आक्रस्ताळेपणा येऊ न देणं, या गोष्टी पुष्पाबाईंकडून शिकता आल्या, असं कुंभोजकरांनी नमूद केलं आहे.
पुष्पाबाईंच्या भारदस्त आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वाचा वेध ‘राष्ट्र सेवा दला’चे सुभाष वारे यांनी आपल्या लेखातून घेतला आहे. २००३मध्ये चिपळूण येथे भरलेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात पुष्पाबाईंनी घेतलेल्या ठाम भूमिकेचं स्मरण वारे यांनी आपल्या लेखातून करून दिलं आहे. परिणामी शिवसैनिकांनी पुष्पाबाईंना रत्नागिरी जिल्हाबंदी केली होती. जिल्हाबंदी लादण्यात पुढाकार घेतलेल्या या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या एका तगड्या नेत्याने पुष्पाबाईंची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांचे पांढरे केस आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व बघून खाली वाकून नमस्कार केला.
सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू, नरेंद्र दाभोलकर आणि बाबा आढाव यांच्यासमवेतच पुष्पाबाईंचाही मोठा सहभाग असल्याचं वारे यांनी अधोरेखित केलं आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातल्या योगदानाचीही चर्चा या लेखात केलेली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
‘महाराष्ट्राचा विवेक आणि संघर्षाचा आवाज’ या लेखातून डॉ. मेघा पानसरे यांनी विद्वान प्राध्यापक, साहित्य समीक्षक, अनुवादक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ती, पुरोगामी विचारांची समर्थक, गोवा मुक्ती संग्राम व आणीबाणी काळातली निर्भयी योद्धा, समाजवाद, गांधीवाद नि आंबेडकरवादाच्या पुरस्कर्त्या पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘स्त्री अध्ययन केंद्रा’त त्यांनी ‘लिंगभाव समानता’ या विषयावर केलेली मौलिक मांडणी, पानसरे कुटुंबाशी असलेलं त्यांचं स्नेह आणि जिव्हाळ्याचं नातं, कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर गाभारा स्त्री प्रवेश आंदोलन, पितृसत्ताकतेवर हल्ला, आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेलं काम, १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलींना विरोध, जळगाव जिल्ह्यात १९९३-९४मध्ये उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना, १९९६मध्ये घडलेलं रमेश किणी खून प्रकरण या आणि अशा वेगवेगळ्या घटना-घडामोडींच्या अनुषंगाने पुष्पाबाईंच्या कार्याचा सविस्तर आढावा या लेखातून पानसरे यांनी घेतला आहे.
कोल्हापुरातून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘भाई माधवराव बागल’ पुरस्कार स्वीकारायला त्यांनी आधी विनम्रपणे नकार दिला होता. कारण हा पुरस्कार स्वीकारण्याइतकं त्यांचं काम नाहीये, असं त्यांना वाटत होतं. पण कोल्हापूरकरांच्या इच्छेला मान देऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यातून पुष्पाबाई किती साध्या आणि प्रसिद्धीचा सोस नसलेल्या होत्या, याचा प्रत्यय येतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
डॉ. लीना चिंतामण केदारे या पुष्पाबाईंच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी. त्यांनी ‘भावेबाई...’ या लेखातून त्यांच्या भावविश्वात पुष्पाबाईंचे काय स्थान होतं, याचं उत्कट चित्रण केलं आहे. पुष्पाबाईंची मराठी साहित्य आणि भाषा, सौंदर्यशास्त्र हे विषय शिकवण्याची शैली, नाटकाविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था, शिकवताना त्या देत असलेले विपुल संदर्भ, भाषांतर याविषयी त्यांच्या ठायी असलेली वेगळी मर्मदृष्टी, त्यांचं विद्यार्थ्यांशी बरोबरीच्या नात्याने वागणं, त्यांच्याकडे सुजाण, सुबुद्ध नागरिक म्हणून पाहणं, स्त्रीवादाची त्या करत असलेली मांडणी, रुईया महाविद्यालयात त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून राबवलेली अत्यंत प्रतिष्ठेची ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला’, ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ या संस्थेशी त्यांचा असलेला संबंध, ‘साने गुरुजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रा’त त्यांनी केलेलं काम इत्यादींविषयी फार सखोल आणि उद्बोधक विवेचन केदारे यांनी केलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी ‘समतावादी समाजचिंतक’ या लेखातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत, राजकीय स्थित्यंतरात एक प्रामाणिक, परखड भूमिका घेऊन समतावादी, लोकशाहीवादी विचारांचा जागर करीत त्याच्याशी निष्ठा ठेवत कार्य केलेल्या पुष्पाबाईंचे योगदान विशद केलं आहे. ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ ही गाजलेली नाटकं, पुण्यातल्या ‘भांडारकर संस्थे’वर झालेला हल्ला, दीपा मेहता यांचा ‘वॉटर’ हा हिंदी चित्रपट, मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं कथित सेन्सॉर बोर्ड इत्यादींबाबत त्यांनी घेतलेली निर्भीड नि परखड भूमिका, महाराष्ट्रात युतीचे शासन असताना ठाकरे मंडळींना आव्हान देणं, मृणालताई गोरे यांच्या विविध आंदोलनातला तसेच लाटणे मोर्चाचा सहभाग, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंदोलनात सहभाग, हमाल पंचायतच्या कामातला सहभाग अशा वेगवेगळ्या घटना-घडामोडींमध्ये त्यांनी सक्रिय ‘जागल्या’ची भूमिका निभावली असल्याचं खोरे यांनी साधार स्पष्ट केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक शांताराम पंदेरे यांनी ‘प्रा. पुष्पा भावे आणि नामांतर चळवळ’ या लेखातून मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. निर्भयता, स्वातंत्र्य व लोकशाहीची जीवनमूल्ये केवळ मानायची नाहीत; तर ती व्यावहारिक जीवनातही कशी आणायची, याचे एक आदर्श रूप म्हणजे ‘आमच्या मॅडम’ अशा शब्दांत पंदेरे पुष्पाबाईंचा गौरव करतात. राज्यघटनेतल्या मूल्यांवर गाढ श्रद्धा असलेल्या पुष्पाताईंनी मराठवाडा विद्यापीठाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचं नाव द्यायला समर्थन दिलं होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
अलका गाडगीळ यांनी ‘विचारवंत कार्यकर्त्या’ या लेखातून पुष्पाबाईं या वैचारिक अधिष्ठान असलेल्या कार्यकर्त्या असल्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. समाजातल्या वंचित, उपेक्षित, पीडित, अभावग्रस्त, दलित, कष्टकरी समूहातल्या स्त्रियांच्या जगण्यातले प्रश्न त्यांनी उपस्थित केले. उदाहरणार्थ, रोजंदारीवरील स्त्रिया, शेतमजूर महिला, घरेलू कामगार, रस्त्यावर छोट्या-मोठ्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्या, शहरातल्या उद्योग-व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगार स्त्रिया, तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा-सेविका व अंगणवाडी-सेविका, गावखेड्यात, वस्ती पातळीवर काम करणाऱ्या आरोग्यसेविका यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी सदैव संघर्ष केला. त्यांना मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने उभारली.
‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’च्या माध्यमातूनही त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. देवदासींच्या प्रश्नावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासमवेत काम केलं. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभा करण्यासाठी निळू फुले, डॉ. लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्या सोबतीने पुष्पाबाई सहभागी झाल्या होत्या. स्त्रीवादी आणि समतेच्या चळवळींना बौद्धिक प्रतिष्ठान मिळवून देण्याचं मोठं काम केल्याचं गाडगीळ यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या माजी ग्रंथपाल सुषमा पौडवाल यांनी ‘व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या लेखातून पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. मराठीच्या प्राध्यापिका, नाटकाच्या अभ्यासक, सामाजिक चळवळीना वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या विचारवंत, रंगभूमीवरील कार्यकर्त्यांसाठी निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्या अशी त्यांची विविध रूपे वाचकांसमोर ठेवली आहेत. पुष्पाबाईंनी आजारपणात केलेल्या ‘Good Muslims, Bad Muslim’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचा विशेष उल्लेख केला आहे. ‘विविध ज्ञानविस्तार सूची’, ‘रंग नाटकाचे’, ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’, ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकातले ‘राजकारणाच्या अंगणात’ हे सदर लेखन, सामाजिक प्रश्नांचा वेध घेणाऱ्या पुस्तकांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना इत्यादी त्यांनी केलेल्या लेखन-संपादनाचा आढावा घेतला आहे. मराठी नाटकांबाबत त्यांनी मांडलेल्या लक्षणीय मुद्द्यांचाही उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. चळवळीमुळे त्यांना जास्त लेखन आणि संशोधन करता आलं नसल्याची खंत लेखिकेने व्यक्त केली आहे, ती रास्त वाटते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
नाशिकच्या कार्यकर्त्या, स्त्रीवादी अभ्यासक कालकथित अनिता पगारे यांनी ‘निडरबाई’ या लेखातून पुष्पाबाईंचं त्यांना भावलेलं चित्र उभं केलं आहे. विवेकवादी अभ्यासक आणि विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या दिवशी हत्या झाली, त्याच दिवशी पुष्पाबाईंवर एक शस्त्रक्रिया होणार होती, पण त्यांना ही दुःखद नि धक्कादायक बातमी समजली आणि त्यांनी शस्त्रक्रिया करू दिली नाही. त्या तडक पुण्याला गेल्या आणि दाभोलकरांचे अंत्यदर्शन घेतलं, पगारे यांनी सांगितलेली ही आठवण पुष्पाबाई किती धैर्यवान होत्या याचा प्रत्यय आणून देणारी आहे.
वृषाली मगदूम यांनी ‘एक झंझावात’ या लेखात पुष्पाबाईंच्या वादळी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, मुंबईतली गिरणी कामगार चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, देवदासींच्या मुक्तीची चळवळ, कागद-काच-पत्रा वेचणारे, हमाल, रिक्षाचालक, रमेश किणी प्रकरण, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार आदी मुद्द्यांचा परामर्श लेखात घेतलेला आहे.
डॉ. कविता मुरुमकर यांनी ‘एक तेजस्वी पर्व’ या लेखात पुष्पाबाईंच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला आहे.
प्रख्यात विचारवंत लेखिका रजिया पटेल यांनी लिहिलेल्या ‘लोकशाही आणि मानवी हक्क लढ्याच्या दीपस्तंभ’ या लेखातून पुष्पाबाईंच्या परखड स्वभावाची कल्पना येते. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांवर येणारी बंधने, संततिनियमनासाठी केलेले कायदे आणि उपक्रम, संततिनियमनाची साधने व शस्त्रक्रिया, जातीव्यवस्था आणि स्त्रियांवरील अत्याचार यांचा सहसंबंध, धर्मांध दंगली, धर्मांध संघटनांमधला सहभाग अशा विविध मुद्द्यांवर पुष्पाबाईनी लोकशाहीवादी, विवेकवादी भूमिका घेतली होती, असं रजियाताईंनी अधोरेखित केलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
युवा पत्रकार, ‘अक्षरनामा’चे राम जगताप यांनी ‘प्रा. पुष्पा भावे - समकालीन आणि अभिजात’ या लेखात पुष्पाबाईंचं योगदान अतिशय तन्मयतेनं चितारलं आहे. प्रा. राम बापट, प्रा. यशवंत सुमंत आणि प्रा. पुष्पा भावे या तिघा प्राध्यापक-कार्यकर्त्यांच्या कामातील साम्यस्थळे आणि साधर्म्य यांचा अभ्यासपूर्ण वेध जगताप यांनी घेतला आहे. या तिघांना लेखनापेक्षा संवाद अधिक आवडत होता. परिणामी तिघांचं फार कमी लेखन प्रकाशित झाल्याचं नोंदवलं आहे. या तिघांनीही आत्मचरित्र लिहायला हवं होतं. यातून महाराष्ट्रातल्या काही सामाजिक चळवळी कशा आकाराला आल्या, त्यांचा प्रवास कसा झाला, त्यांचं फलित काय निघालं, यावर प्रकाश पडला असता, असं जगताप यांना प्रकर्षानं वाटतं.
प्रख्यात स्त्रीवादी विचारवंत, लेखिका, प्राध्यापिका डॉ. विद्युत भागवत यांनी आपल्या लेखातून पुष्पा भावे आणि त्यांच्या भूमिका याची चर्चा केली आहे. पुष्पाबाई यांना ‘विचारवंत’ म्हणून मान्यता मिळाली, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं असून बाईंनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांची अतिशय तटस्थपणे चिकित्सा केली आहे. विशेषतः स्त्रीवाद आणि स्त्रियांची चळवळ या संदर्भात भागवत यांनी नोंदवलेलं निरीक्षण फार महत्त्वाचं आहे. त्यांना विचारवंत म्हणून मान्यता मिळाल्याचा आनंद व्यक्त करून, हे कोणत्या पार्श्वभूमीवर घडून आलं, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. यातून वाचकांसाठी एक वेगळा पण दखलपात्र मुद्दा उपस्थित केला असल्याचं लक्षात येतं. कदाचित या मांडणीशी सर्वच सहमत होतील, असं नाही! एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि कार्याचं आकलन करून देणारा हा लेख आहे.
‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संपादक डॉ. गीताली वि. म. यांनी ‘...साऱ्याजणीतून राजकीय भान जागवताना...’ या लेखातून पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची मांडणी केली आहे. गीताली यांनी पुष्पाबाईंची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेले विचार लेखाच्या सुरुवातीला थोडक्यात मांडले आहेत.
पुष्पाबाईंनी ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये ‘राजकारणाच्या अंगणात’ आणि ‘राजकारण आपल्या घरात’ या दोन लेखमाला जवळपास तीन वर्षे लिहिल्या. या लेखमालेतून पुष्पाबाईंनी केलेलं विचारमंथन म्हणजे हा लेख. तसेच त्यांचं जागतिक स्तरावरचं वाचनही किती समृद्ध होतं, याचे दाखले त्यांनी दिले आहेत. त्यांनी लेखन कमी केलं, याची सल गीताली यांनी लेखाच्या शेवटी व्यक्त केली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट निशा शिवूरकर यांनी ‘पुष्पाबाई भावे आणि लोकशाही विचारधारा’ या लेखातून पुष्पाबाईंच्या वैचारिकतेचा आढावा घेतला आहे. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी सांगितलेल्या ‘फावडे, मतपेटी आणि तुरुंग’ या त्रिसूत्रीचा जाणीवपूर्वक तरीही सहज असा संगम पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात झालेला असल्याचे अॅडव्होकेट शिवूरकर यांनी विशद केलं आहे.
मराठी भाषा व साहित्याचे युवा अभ्यासक अमोल गुट्टे यांनी ‘पुष्पाबाई यांचा साहित्य विचार’ या लेखातून पुष्पाबाईंच्या मराठी साहित्यातल्या योगदानाचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला आहे. मराठी साहित्यात सौंदर्य विचारांची मांडणी मोठ्या प्रमाणात झाली तसा मराठी नाटकाचा सौंदर्य विचार फार कमी प्रमाणात मांडण्यात आला. पुष्पाबाईंनी मराठी नाटकातले सौंदर्यस्थळे दाखवताना केवळ नागर जीवनाचा पट लक्षात न घेता पारंपरिक लोक सांस्कृतिक आणि त्याचबरोबर येणाऱ्या ग्रामीण सौंदर्यस्थळांचा विचार प्रामुख्याने मांडला असल्याचं गुट्टे सांगतात.
पुष्पा भावे नामक विचारवंत, कार्यकर्त्या, मराठी भाषा आणि साहित्याच्या प्राध्यापिका यांच्या कारकिर्दीचा अभ्यासकांनी, त्यांच्यासमवेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम केलेल्या सहकाऱ्यांनी घेतलेला आढावा, त्यांच्या जीवनकार्यावर टाकलेला प्रकाशझोत वाचकांना समृद्ध करणारा ठरेल, अशी आशा आहे.
.................................................................................................................................................................
‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’ : संपादक - प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
पाने - १६४, मूल्य - दिलेले नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment