दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान
संकीर्ण - पुनर्वाचन
हेमंत गोळे
  • जॉर्ज ऑर्वेल, '१९८४'चं मुखपृष्ठ आणि अल्डस हक्सले, 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'चं मुखपृष्ठ
  • Fri , 31 March 2017
  • इंग्रजी पुस्तक 1984 जॉर्ज ऑर्वेल George Orwell ब्रेव्ह न्यू वर्ल्ड Brave New World अल्डस हक्सले Aldous Huxley

जॉर्ज ऑर्वेलची १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेली '१९८४' ही कादंबरी एखाद्या दुःस्वप्नासारखी आहे. ती आपल्याला भयग्रस्त आणि अभावग्रस्त वातावरणात घेऊन जाते आणि स्वप्नातून बाहेर आल्यानंतरही जसा एखाद्या भीतिदायक स्वप्नाचा परिणाम आपल्याला जाणवत राहतो, तसा या कादंबरीचा प्रभाव आपल्या मनावर दीर्घ काळ रेंगाळत राहतो.

विन्स्टन स्मिथ आणि ज्यूलिया या विजोड जोडप्याच्या आयुष्यातल्या काही महिन्यांचीच ही कहाणी आहे. एरवी ती एक वेगळी पार्श्वभूमी लाभलेली सफल किंवा विफल प्रेमकथा होऊ शकली असती, पण ही कहाणी ज्या वास्तवात उलगडते, त्यामुळे ती त्या दोघांची गोष्ट राहत नाही. त्यांचं विफल प्रेम आपल्याला दुःखी करत नाही, कारण त्यांच्यामधली जवळीक म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचं बंड आहे आणि या दोघांनाही त्याची जाणीव आहे. सहवासाने त्यांच्यामध्ये काही कोमल भावना निर्माण होतात, पण ती निर्मितीही एक राजकीय विद्रोही कृतीच ठरते! त्यामुळे अखेरीस वाचकाच्या लक्षात राहते, ती एक विफल राजकीय विद्रोहाची गोष्ट!

हा विद्रोह ज्या व्यवस्थेविरुद्ध घडतो आहे, ती एक अत्यंत भयावह व्यवस्था आहे. 'आपल्या मनाच्या बाहेर अचल, अपरिवर्तनीय वास्तव आहे', या विश्वासावर आपण उभे असतो; पण या कादंबरीत रेखाटलेली व्यवस्था आपल्या त्या विश्वासाचा पायाच उखडून टाकते. वास्तव-वास्तवता असं काहीच नसून ही व्यवस्था जे सांगेल, तेच सत्य असेल, असा या व्यवस्थेचा सिद्धान्त आहे. या व्यवस्थेत सत्याला वाहिलेलं एक खातं आहे; मंत्रालय आहे. सत्याची सतत दुरुस्ती करत राहणं, हे या मंत्रालयाचं काम आहे. ही दुरुस्ती वैज्ञानिक व्यवहारामधून, संशोधनामधून आवश्यक झालेल्या दुरुस्तीसारखी नाही, तर 'पक्ष' म्हणून ओळखलं जाणारं, सत्ता गाजवणारं जे टोळकं आहे, त्याची सर्वशक्तिमानता, सकळकळेपण लोकांवर ठसवण्यासाठी आवश्यक झालेल्या या दुरुस्त्या आहेत.

'१९८४'मधली पृथ्वी ओशॅनिया, युरेशिया आणि इस्टॅशिया अशा तीन तुल्यबल सत्तांमध्ये विभागली गेली आहे. ही कादंबरी ओशॅनियामध्ये घडते. या तीनही सत्ता सर्व पृथ्वीवर सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी धडपडत आहेत, लढत आहेत. यांपैकी कुठलीही एक सत्ता वरचढ व्हायला लागली, तर उरलेल्या दोन सत्ता एक होऊन डोईजड होणाऱ्या सत्तेला खाली खेचतात. त्यामुळे ओशॅनियाचा मित्र आणि शत्रू अखंड बदलत असतात आणि पक्षाचं सर्वशक्तिमानपण आणि सकळकळेपण कायम राखण्यासाठी दफ्तरात आवश्यक ते बदल करावे लागतात. सत्याचं-वास्तविकतेचं जे खातं आहे, त्याचं हे काम आहे.

या व्यवस्थेमधल्या गृहखात्याचं - हे सुहृदतेचं, सद्भावनेचं खातं म्हणून ओळखलं जातं - खरं काम म्हणजे, व्यवस्थेच्या शत्रूंचा शोध घेणं आणि त्यांचा नाश करणं. व्यवस्थेविरुद्धचं हे पाऊल जाणीवपूर्वक उचलेलं असो किंवा अजाणतेपणाने उचललं गेलेलं असो, सद्भावना खातं त्याचा समाचार घेणारच! युद्ध खात्याचं नाव 'शांतीचं खातं' असं आहे. त्यांचं काम आहे - युद्ध करणं. या सर्व अश्रद्धपणाला शोभणाऱ्या तीन घोषणा आहेत -

“युद्ध म्हणजेच शांतता”

“स्वातंत्र्य म्हणजेच गुलामी”

“अज्ञान हेच बळ”

पक्षाच्या या घोषणा सगळीकडे झळकत असतात. याशिवाय विद्रोही विचारांवर करडी नजर ठेवणारे विचारांचे पोलीसही आहेत. नवीन पिढी जन्माला घालणं, तिचं संगोपन करणं यांसाठी लग्न आणि कुटुंब यांना पक्षाला अजूनतरी पर्याय सापडलेला नाही; पण यामुळे पक्षाने जनतेवरची पकड मात्र ढिली होऊ दिलेली नाही. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांनी जास्तीत जास्त काळ घराबाहेर काढावा आणि व्यवस्थेला त्यांच्यावर आवश्यक ते संस्कार करता यावेत, अशी योजना केली गेली आहे. त्यामुळे आई-वडलांपैकी कोणीही चुकून जरी विद्रोही विचार बाळगला किंवा कृती केली, तर त्याची वर्दी मुलंच पोलिसांकडे देतील, अशा प्रकारे त्यांना तयार करण्यात आलं आहे.

तसंच व्यक्तिगत किंवा खासगी जीवनाचा संकोच करणारे उत्सव, महोत्सव, देशोत्सव अशा समारंभांची योजना करून माणसांमधली अतिरिक्त ऊर्जा निचरून टाकली जाते. या सगळ्या व्यवस्थेत पक्षाच्या आतल्या वर्तुळाकडे कर्तुम-अकर्तुम शक्ती आहे, पण या वर्तुळातही रस्सीखेच आहे. तेही एकसंध नाही. त्यामधूनही कोणी ना कोणी बाहेर फेकला जातोच.

आतल्या वर्तुळाच्या खालोखाल सर्वसाधारण पक्ष सभासद आहेत. ते या सर्व व्यवस्थेचे प्रशासक आहेत. या सभासदांमध्ये निष्ठावंत बहुसंख्येने आहेत. विन्स्टन आणि ज्यूलिया यांच्यापैकीच एक आहेत. त्यांची निष्ठा कायम राखण्याच्या हेतूने परस्पर-विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवण्याचं तंत्र पक्षाने त्यांच्यासाठी विकसित केलं आहे.

त्यांच्या खालोखाल प्रत्यक्ष उत्पादन करणारा कष्टकरी वर्ग आहे. या वर्गाने विनातक्रार काम करत राहावं म्हणून पक्षाच्या योजना तयार आहेत - या वर्गाला आवश्यक तेवढंच शिक्षण देणं, त्याला सवंग करमणूक पुरवणं, त्यांच्या व्यसनांची सोय करणं, इ. यामधून पक्ष त्यांच्यासंदर्भातला स्वतःचा हेतू साध्य करून घेतो.

या कादंबरीत रेखाटलेल्या समाजातली फार मोठी लोकसंख्या युद्ध आणि प्रशासन (व्यवस्थेचं रक्षण) यात गुंतलेली असल्याने समाज अभावग्रस्त असणं स्वाभाविक आहे. या व्यवस्थेमधली भयग्रस्तता, संशयग्रस्तता, श्रद्धाहीनता, अभावग्रस्तता यांचा अनुभव ही कादंबरी देतेच देते, हे लेखकाचं मोठंच यश आहे; पण 'अशी व्यवस्था निर्माण करणं शक्य आहे का?', असा प्रश्न पडू शकतो.

या कादंबरीपूर्वीची ऑर्वेलची 'अॅनिमल फार्म' ही कादंबरी १९१७ साली रशियामध्ये झालेल्या राज्यक्रांतीवर भाष्य करणारी कादंबरी होती. '१९८४' या कादंबरीमध्ये रंगवलेल्या चित्राचा आधार 'स्टालिनच्या काळातलं शासनतंत्र' हाच निःसंशय आहे. स्टालिनच्या काळात निर्माण झालेल्या या शासनतंत्रामागे काही ऐतिहासिक कारणं निश्चितपणे होती. तथाकथित स्वतंत्र जगामधल्या सत्तांनी नवजात सोव्हिएत सत्ता नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न आणि तो अयशस्वी ठरल्यावर सोव्हिएत युनियनला घेरण्याचा केलेला प्रयत्न, या घटनाही सोव्हिएत राज्यतंत्राने धारण केलेल्या रूपासाठी कारणीभूत होत्या. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीकडून नुकसानभरपाई घेण्याचे जे प्रयत्न झाले, त्यामुळे हिटलरसारख्या शक्तींना मोठं बळ मिळालं, हे नाकारता येत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र कोणीही नुकसान भरपाईच्या गोष्टी केल्या नाहीत. उलट उद्ध्वस्त जर्मनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली गेली. तरीही इथे लक्षात घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काहीही घडू शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याबद्दल सावध राहिलं पाहिजे.

विशिष्ट परिस्थितीत अशी विपरीत गोष्ट निर्माण होणं शक्य आहे आणि ती निर्माण झाल्यानंतर कायम राखण्याचा प्रयत्नही होणं साहजिक आहे. '१९८४'मध्ये निर्माण झालेली शासन-यंत्रणा म्हणजेदेखील निर्माण झालेली व्यवस्था कायम राखण्याचाच एक प्रयत्न आहे. जगात काहीही बदलाशिवाय राहू शकत नाही, पण तरीसुद्धा व्यवस्था कायम राखण्याचा हा प्रयत्न सतत चालू असतो.

इथं अल्डस हक्सलेच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'ची आठवण होते. त्यातही वर्णव्यवस्थाच आहे. ही व्यवस्था अगदी वर्णाश्रमधर्मातल्या वर्णव्यवस्थेसारखीच आहे; पण ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये विज्ञानाने एवढी प्रगत तंत्रं निर्माण केली आहेत की, शूद्रांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याची आवश्यकताच राहत नाही. ते शारीरिक-मानसिकदृष्ट्या मागासच निपजतात. नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी, तिचं संगोपन करण्यासाठी आई-वडलांची गरजच नसल्याचं चित्रण या कादंबरीत केलं आहे. प्रयोगशाळासदृश कारखान्यांमधून आवश्यक त्या वर्णांचे, आवश्यक तेवढे मानवप्राणी जन्माला घातले जातात. त्यामुळे कुटुंबसंस्थेची गरजच उरत नाही आणि तशा प्रकारची संस्था या कादंबरीत अस्तित्वातसुद्धा नाही. एका पुरुषाचे एकाच स्त्रीबरोबर कायमचे संबंध असणं ही गोष्ट त्या समाजात निषेधार्ह समजली जाते. तंत्रज्ञानाच्या आधाराने निर्माण केलेली वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्याने तिच्यात वर्गसंघर्ष नाही. म्हणजे बदलाचं एक कारण इथं संपुष्टात येतं. प्राण्यांमध्ये माद्यांवरून जशी भांडणं चालतात, तशी या समाजात होऊ शकत नाहीत.

'१९८४'मध्ये कलांबाबत स्पष्ट उल्लेख नाही, पण कष्टकऱ्यांसाठी त्याच-त्याच गोष्टी योग्य मसाल्यासह निर्माण करून शोभादर्शकसदृश यंत्रांवर दाखवल्या जात असल्याचा उल्लेख आहे. 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'मध्ये कलांवर बंदीच आहे. त्यामधला नियंत्रक स्पष्ट सांगतो - 'विज्ञान आणि कलाकृती यांचा पाठपुरावा करायचा असेल, तर त्या वैज्ञानिकांनी किंवा कलावंतांनी त्यांच्याकरता राखून ठेवलेल्या बेटावर जाऊन राहावं. त्यामध्ये सिनेमाबाबत बोलतानादेखील अस्वलांमधल्या प्रणयप्रसंगाची आणि तो घडताना अस्वलाच्या कातड्यावरचा केस न केस वेगळा दिसत असल्याची चर्चा होते. किंवा पुरुष स्वतःच्या मैत्रिणीबाबत बोलतानासुद्धा ती टम्म हवा भरल्यागत असल्याचाच उल्लेख करतो!

'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'मध्ये अभाव अभावानेच आहे आणि सगळी व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी माणूसपण गमावण्याची किंमत मोजली गेली आहे! त्यामधली पात्रं माणसं आहेत का, त्यांना काही भावभावना आहेत का असा प्रश्न पडतो. '१९८४'मध्ये आपण एका भयग्रस्त, संशयग्रस्त, अभावग्रस्त नरकाचा अनुभव घेतो. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ही कादंबरीही तिच्या लेखकाच्या कल्पनेतला नरकच आहे. आणि या दोन्हीही नरकांमागे स्थिरतेची, गतिहीनतेची आस आहे!

गतिहीनता शक्य असते का? मार्क्सवादी तत्त्वज्ञानाप्रमाणे ते शक्य नाही. वास्तव नेहमी द्वंद्वात्मक असतं आणि द्वंद्वात्मक परिस्थितीत गतिहीनता शक्यच नसते, पण अतोनात प्रयत्न करून इतिहास-चक्राची गती काही काळासाठी अवरुद्ध करता येते. त्याकरता स्टालिनच्या नेतृत्वाखालची सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीच लागते, असं नाही.

(हा लेख २४ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाला होता.)

.............................................................................................................................................

१९८४ - जॉर्ज ऑरवेल, मराठी अनुवाद : अशोक पाध्ये

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

पाने - ३६८, मूल्य - ३७५ रुपये.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/160

.............................................................................................................................................

लेखक हेमंत गोळे निवृत्त बँक कर्मचारी आहेत.

gole_hemant@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......