‘निर्जन पूल’ हे पुस्तक वाचून पूर्ण होतं, तेव्हा जणू आपण ‘महाभारत’ वाचलं आहे, असा मानसिक शीण येतो!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • कोंडापल्ली कोटेश्वराम्मा यांच्या आत्मकथनाच्या तेलुगु, इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांची मुखपृष्ठे
  • Wed , 31 May 2023
  • ग्रंथनामा शिफारस निर्जना वारधी Nirjana Varadhi कोंडापल्ली कोटेश्वराम्मा Kondapalli Koteswaramma द शार्प नाईफ ऑफ मेमरी The Sharp Knife of Memory निर्जन पूल Nirajana Pool सीपीआय CPI सीपीएम CPM

काही व्यक्ती जन्माला येताना ‘आयुष्यभर दुःखाचा भार वाहीन’, असं लिहून देऊनच आलेल्या असतात की काय, कोण जाणे! त्यात भर म्हणजे हे लोक स्वतःचं दु:ख, वंचना, अवहेलना, मानसिक- शारीरिक- आर्थिक- सामाजिक- राजकीय अशा सर्व पातळ्यांवरचा त्रास कमी म्हणून की काय, समाजाला होणारा त्रास दूर करणं, ही जणू आपल्याच शिरावरची जबाबदारी असल्याप्रमाणं समाजाचं प्रबोधन आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत राहतात.

कोंडापल्ली कोटेश्वराम्मा या आंध्र प्रदेशातल्या माओवादी चळवळीचे प्रणेते कोंडापल्ली सीतारामय्या यांच्या पत्नी. त्यांना जवळपास शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं. त्या माओवादी चळवळीत झोकून देऊन, अनेक वर्षं भूमिगत राहून काम केलेल्या, स्वतंत्र विचारांच्या प्रतिभावान महिला आणि साहित्यिक. त्यांची ही जीवनकहाणी म्हणजे आंध्र प्रदेशातल्या महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय चळवळीत काम करताना त्यांना आलेल्या भेदक अनुभवांची गाथा आहे.

स्वातंत्र्य आंदोलन, कम्युनिस्ट चळवळ, तेलंगणाचा सशस्त्र लढा, नक्षलबारी या सगळ्यात उघडे डोळे, आणि असीम करुणेनं भरलेलं मन घेऊन सक्रीय सहभागी झालेल्या या शूर स्त्रीच्या लढाईचा मन हेलावून टाकणारा हा वृत्तान्त आहे.

कोटेश्वराम्मा यांनी वयाच्या ९२व्या वर्षी तेलुगु भाषेत ‘निर्जना वारधी’ या नावानं आत्मचरित्र लिहिलं. त्याचा ‘The Sharp Knife of Memory’ या नावानं सौम्या व्ही. बी. यांनी इंग्रजीत अनुवाद केला, आणि त्यावरून शर्मिला इनामदार यांनी ‘निर्जन पूल’ या नावानं मराठीत केलेला अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केला आहे. हा अनुवाद अतिशय ओघवत्या भाषेत आणि लेखिकेच्या भावनांशी समरस होऊन केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

कोटेश्वराम्मा यांची आई, त्या, त्यांचे पती, मुलगा, मुलगी, नाती, अशा चार पिढ्यांतल्या विशेषत: स्त्रियांनी समाजासाठी काय काय केलं, याचा थोडक्यात आढावा या साधारण सव्वाशे पानी पुस्तकात आहे. पण हे पुस्तक वाचून पूर्ण होतं, तेव्हा जणू आपण ‘महाभारत’ वाचलं आहे, असा मानसिक शीण येतो.

देशभरात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती तेव्हापासून, ते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या काळातली आंध्र प्रदेश आणि तेलंगण इथली सामाजिक, राजकीय परीस्थिती, सामान्य लोकांची मानसिकता, राजकीय, विशेषत: डाव्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांनी भारलेल्या तिथल्या तरुण कार्यकर्त्यांनी स्वतःचा, कुटुंबाचा, आर्थिक स्थैर्याचा, सरकारला केलेल्या विरोधाचा काय परिणाम होईल, याचा विचार न करता एका ध्येयासाठी स्वतःच्या आयुष्याचा जो बळी दिला, त्याचा प्रातिनिधिक इतिहास आपल्यासमोर कोटेश्वराम्मा यांच्या नजरेतून उलगडत जातो. आणि मन उदास करणारा प्रश्न पडत राहतो की, या लोकांनी केलेल्या त्यागाची समाजाला जाणीव तरी आहे का?

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, यांची अवस्था हैदराबादच्या निजामाच्या अंमलात असल्यानं वेगळी होती. ती संपूर्ण पार्श्वभूमी आणि त्याचे इतर सर्व आयाम स्पष्ट करून रामास्वामी एका वेगळ्याच विषयावर प्रकाशझोत टाकतात. संपूर्ण भारतात स्वातंत्र्यासाठी चळवळ चालू असताना आंध्र प्रदेशात जमीनदारांच्या जाचाला कंटाळलेल्या मध्यम व गरीब शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे काम कम्युनिस्ट करत होते. या काळात झालेले तेलंगणा आंदोलन म्हणजे हैदराबादच्या निजामाने चालवलेल्या जुलमी जमीनदारीच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेला सशस्त्र उठाव. तो कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली झाला होता.

या आंदोलनाने साधारण तीन हजार गावांना जमीनदारांच्या पाशातून मुक्त केले. भूमिहीन शेतकऱ्यांना दहा हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. जमीनदारांच्या खाजगी सैनिकांशी लढताना चार हजारांवर शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

१९४८मध्ये भारतीय सैन्याने ताबा घेतल्यानंतर हैदराबाद अधिकृतरीत्या भारतात सामील झाले. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीने कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करायचे ठरवले आणि बऱ्याच पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पाठवून दिले.

मूलगामी चळवळीत सक्रीय असलेले कार्यकर्ते काही ना काही कारणानं या आयुष्यापासून लांब जातात, तेव्हा त्यांना एका प्रचंड मोठ्या पोकळीला तोंड द्यावं लागतं. ते आता त्यांच्या गत आयुष्याकडेही परतू शकत नाहीत. आणि ते त्यांच्या कुटुंबीयांनाही नकोसे झालेले असतात. पुरेसं औपचारिक शिक्षण नसतं. बाहेरच्या जगातल्या कामांचा अनुभव नसतो. त्यामुळे नोकरीच्या बाजारात ते निकामी ठरतात.

शिवाय क्रांतिकारी चळवळीचं वलय त्यांच्याशी जोडलेलं राहतंच. त्यामुळे कुटुंबासाठी रोजगार कमावणारा, हे स्थान ते निर्माण करू शकत नाहीत. त्यांचं व्यक्तिगत वर्तुळ आणि मित्र वर्तुळ पार्टीशीच निगडीत असतं. त्यामुळे पार्टी सोडून ते बाहेर पडतात, तेव्हा बाहेरच्या जगात त्यांना समजावून घेणारे कमीच असतात.

बदलासाठी अविरत संघर्ष, लोकांना संघटीत करणं, इतरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणं, नि:स्वार्थ वृत्ती, ही आतापर्यंत जपलेली मूल्यं निरुपयोगी ठरतात. बाहेरच्या जगातली पैसाकेंद्रित व्यापारी वृत्ती आणि चंगळवाद त्यांच्या पचनी पडत नाही. त्या वेळी त्यांना गरज असते थोड्या वेळेची आणि थोड्या अवकाशाची. काळानुसार त्यांचे घाव भरून येतात. त्यांना यथावकाश आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःची तयारी करण्याची संधी मिळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आसपासच्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपलं योगदान देण्याची आणि इतरांना छोट्या छोट्या गोष्टींत मदत करण्याची मानसिकता ते हळूहळू विकसित करू शकतात. ही एक अत्यंत वेदनादायक प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल आजपर्यंत फारच कमी प्रमाणात लिहिलं गेलं आहे. नेमकं याचंच प्रत्ययकारी चित्र आपल्याला कोटेश्वराम्मा यांच्या लिखाणात दिसतं.

चळवळीची पीछेहाट होते, तेव्हा त्यातल्या क्रांतिकारी स्त्रियांना आणखी जास्त गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागते. चळवळीशी जोडलं गेल्यावर वेगळ्या जीवनपद्धतीशी आणि आकांक्षांशी या स्त्रियांनी स्वतःला जोडून घेतलेलं अससं. ते सोडून द्यावं लागतं, तेव्हा तो काळ प्रचंड ताणतणावानं आणि दु:खानं व्यापला जातो.

कोटेश्वराम्मा १९४०पासून कम्युनिस्ट चळवळीत काम करत होत्या. पूर्ण पाच वर्षं आपल्या कुटुंबापासून आणि मुलांपासून दूर अज्ञातवासात राहिल्या होत्या. नंतर चळवळीतून बाहेर पडल्यावर त्यांनाही ‘पोकळी’चा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्यांचा नवरा कम्युनिस्ट नेता सीतारामय्या यांनी दुसऱ्या स्त्रीसाठी सोडून दिल्याचा मानसिक आणि सामाजिकसुद्धा धक्का पचवावा लागला. त्याबाबत लिहिताना त्यांनी सीतारामय्या यांना राक्षसाचं रूप दिलेलं नाही. सारा घटनाक्रमसुद्धा त्यांनी अत्यंत संयतपणे आणि तटस्थपणे मांडला आहे. त्यांनी पक्षासाठी आणि पर्यायानं समाजासाठी केलेले त्याग विसरून लोक त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागले, ते वाचताना मन विषण्ण होतं.

म्हणूनच ही कोटेश्वराम्मा यांची केवळ व्यक्तिगत जीवनकहाणी न राहता आंध्र प्रदेश आणि तेलंगणातल्या कम्युनिस्ट पार्टीच्या उभारणीची, समाजासाठी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी वाहिलेल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या वर्षांची, चळवळीची, कम्युनिस्ट पार्टीतल्या मतभेदांची, त्यामागच्या खऱ्या-खोट्या, चूक-बरोबर कारणांची आणि सरतेशेवटी पक्षाच्या फुटीची कहाणी ठरते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्याचबरोबर जगातल्या कामगारांना एक होण्याची हाक देणाऱ्या या कार्यकर्त्यांची आपसातली दुफळी सोडून एक येण्याची तर सोडाच, पण इतकी वर्षं एकत्र काम केलेल्या एखाद्या सहकाऱ्याला, केवळ तो पक्षाच्या दुसऱ्या तुकड्यात आहे, म्हणून वाळीत टाकण्याची मानसिकतासुद्धा कोटेश्वराम्मा त्याच अलिप्त तटस्थपणे मांडतात.

एका बाजूला या बुद्धिमान, निरलस आणि स्वप्नाळू कार्यकर्त्यांची समाजासाठी आयुष्य वाहण्याची तयारी आणि त्याच वेळी तत्त्वाचा विषय आला की, स्वत:बाबत, आपल्या सहकाऱ्यांबाबत निर्मम कठोरपणा! हा परस्पर अंतर्विरोध आणि त्यातून येणारी त्यांची वर्तणूक आणि भूमिका बघून चकित व्हायला होतं.

या कालखंडाबाबत कोटेश्वराम्मा विस्तारानं लिहितात. कारण हाच कालखंड त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात जीवघेणी परीक्षा पाहणारा कठोर कालखंड होता. त्यांची दोन्ही मुलं त्यांना दुरावली. त्यांचा पोलिसांनी खून केला आणि नवऱ्याच्या आकस्मित मृत्यूमुळे खचून मुलीनं आत्महत्या केली. आयुष्यभर त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहणारी त्यांची आईदेखील निवर्तली. नवरा तर पूर्वीच सोडून गेला होता.

कोटेश्वराम्मा लिहितात, ‘‘मी बालविधवा असतानासुद्धा जिनं माझं दुसरं लग्न लावून दिलं, ती माझी आई आता या जगात नाही. नवरा दुरावला. या लग्नातून जन्माला आलेली मुलंदेखील आता या जगात राहिली नाहीत. असं वाटतं की, माझं हे लग्न म्हणजे निव्वळ आभासच होता… माझं आयुष्य म्हणजे खरंच एखादं वाईट स्वप्न आहे का? की केवळ अश्रूंची नुसती एक धारा आहे? हे व्याकूळ हृदय उराशी घेऊन मी कशी जगू? मला प्रश्नच पडायचा.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पण असा प्रश्न पडलेला असला, तरी त्या जगल्या. भरपूर जगल्या. आणि समाजासाठी जमेल तसं, जमेल तितकं करत राहिल्या. प्रदीर्घ आयुष्यात त्या कायम इतरांसाठी काहीतरी करतच राहिल्या. समाजानं त्यांना अवहेलना आणि उपहासाशिवाय फार काही दिलं नाही, पण त्यांनी मात्र समाजाला, त्यांना शक्य होतं, त्यापेक्षाही खूपच जास्त दिलं, असंच म्हणावं लागेल.

स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या पडझडीच्या बरोबरच, त्यांनी ज्याला आयुष्यात खूप मोठं स्थान दिलं, त्या कम्युनिस्ट पक्षाची पडझडही त्यांना अगदी जवळून बघावी लागली, आणि त्याचा त्यांना जास्त त्रास झाला. या बाबत त्या लिहितात, ‘‘माझ्या मते पार्टी एकच आहे - कम्युनिस्ट पार्टी. पार्टीचे सीपीआय आणि सीपीएम असे दोन तुकडे झाल्यावरदेखील मी दोन्हीकडे माझं नोंदणी शुल्क पाठवत असे. पुढे सुन्दरय्यांनी मला हे थांबवण्याचा सल्ला दिला. कम्युनिस्ट पार्टीचे आता सात तुकडे झाले होते. आम्हा सर्वांच्या मनातली समतेची समाजव्यवस्था या सात तुकड्यांपैकी नेमकं कोण आणणार आहे? प्रत्येक मे दिनाला ते घोषणा देतात- ‘जगातल्या कामगारांनो एक व्हा!’ पण आम्ही स्वतः कधी एकत्र येत नाही. आम्ही आमच्यातच भांडत बसतो, मग कामगार तरी कसे एकत्र येणार, आणि क्रांती तरी कोण आणणार?’’

१९९१पर्यंत सीतारामय्या थकले. त्यांनीच स्थापन केलेल्या त्यांच्याच पार्टीतून त्यांची हकालपट्टी झाली होती. एका बाजूला हजारो माओवाद्यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या या नेत्याची हकालपट्टी आणि दुसऱ्या बाजूला त्यानं नाकारलेली स्त्री. आयुष्यभर सर्वांकडून अवहेलनेचं दु:ख तिनं सोसलं, तरीदेखील ती शेवटपर्यंत ताठ मानेनं उभी राहिली. हे वाचताना या दोघांपैकी कोणाचं आयुष्य जास्त दु:खद होतं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पार्टीतून बाहेर पडावं लागल्यानंतर कोटेश्वराम्मानी एका हॉस्टेलची व्यवस्थापिका म्हणून नोकरी सुरू केली. तिथून निवृत्त झाल्यानंतर आणखी एका वसतिगृहात व्यवस्थापिकेची जबाबदारी विनावेतन सांभाळली. त्यानंतर वयाच्या ७९व्या वर्षी त्या वृद्धाश्रमात राहायला गेल्या. तिथंही त्यांनी इतरांची काळजी घेण्याचं काम शेवटपर्यंत केलं.

कोटेश्वराम्मा यांच्या लिखाणातून आपल्याला चळवळीतले चढ-उतार आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी, यांची कल्पना येते. त्या काळातले कम्युनिस्ट कार्यकर्ते आजच्या वेगवान, संपूर्णपणे व्यापारीकरण झालेल्या जगात स्वप्नवत वाटतात. कोटेश्वराम्मा आपल्याला त्यांची बलस्थानं आणि उणीवा, दोन्ही दाखवतात.

या पुस्तकाला सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत लेखिका आणि ‘हैदराबाद बुक ट्रस्ट’च्या गीता रामास्वामी यांनी लिहिलेला ‘वंचितांमधून एक आवाज’ हा प्रास्ताविकपर परिचयही तितकाच महत्त्वाचा आहे. कोटेश्वराम्मा यांचा आवाज आंध्र प्रदेशातल्या डाव्या स्त्रियांमधून येणारा पहिला थेट आवाज आहे. हा वंचितांचा आवाज आहे... नव्या प्रगतीशील जगाच्या उभारणीसाठी मदत करणारा. काळाच्या विशाल पडद्यावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवलेल्या या महान स्त्रीची ही आत्मकथा ‘वाचलीच पाहिजे’ अशीच आहे.

.................................................................................................................................................................

‘निर्जन पूल’ - कोंडापल्ली कोटेश्वराम्मा, अनुवाद - शर्मिला इनामदार

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे \ पाने - १२९ \ मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......