सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयीच्या चर्चांना उधाण आलेले आहे. त्याच्या फायद्या-तोट्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. हे ‘सॉफ्टवेअर ऑटोमेशन’चे नवयुग आहे, पण हे ऑटोमेशन साधेसुधे नाही, अशी मतमतांतरं मांडली जात आहेत.
इथे हे नोंदवावेसे वाटते की, जेव्हा कुठलेही तज्ज्ञ काही नकारात्मक शक्यतांचे भाकीत करतात, तेव्हा त्या खऱ्या ठरतीलच असे नाही, पण योग्य वेळी योग्य उपाय केले नाहीत, तर त्या प्रत्यक्षात घडूही शकतात, याचा तो इशारा असतो. बऱ्याच वेळेला योग्य उपाय योजून दुष्परिणाम टाळले जातात.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’बाबत अशाच काही नकारात्मक शक्यता, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून अधोरेखित केल्या जात आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात पाहू या.
प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी २०१४मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत असे मत मांडले होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी असेही सांगितले होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जेव्हा शस्त्रनिर्मितीत होऊ लागेल, तेव्हा मानवी हस्तक्षेपाशिवाय जीव घेऊ शकणारी हत्यारे बनतील. ती जर चुकीच्या हातात गेली, काय काय घडू शकेल, याची केवळ कल्पना करणेही भयावह आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘ट्विटर’चे सद्य मालक एलन मस्क यांनीसुद्धा अशाच शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दिवस मानवापेक्षा जास्त बुद्धिमान बनेल. त्या दिवशी मानवाच्या पृथ्वीवरील सत्तेला आव्हान उभे राहील. त्यांनी स्वायत्त शस्त्रांविषयीसुद्धा धोक्याची सूचना दिली आहे.
निक बॉस्ट्रॉम हे ‘सुपर इंटेलिजन्स’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखकानेही चेतावणी दिली आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवी अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
चॅट-जीपीटीच्या आगमनानंतर मागच्या काही महिन्यांत या चर्चांनी पुन्हा वेग घेतला. जिओफ्रे हिंटन (Geoffrey Hinton) यांच्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले. हे गुगलमध्ये उपाध्यक्ष आणि इंजीनिअरिंग फेलो होते. त्यांनी गुगलमध्ये असताना ‘आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘डीप लर्निंग’ या विषयांत काही महत्त्वाची तंत्रं बनवली आहेत. त्यांनी नैतिक कारणास्तव गुगलमची नोकरी सोडली. त्यांना २०१८च्या ‘टुरिंग अवॉर्ड’ (कॉम्प्युटर सायन्समधील नोबेलच्या तोडीचा पुरस्कार)ने गौरवण्यात आलं आहे.
या पुढच्या काळात ते ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मानवतेसमोर निर्माण झालेली आव्हाने या विषयावर जनजागृती करणार आहेत. हे सगळे शोध लावून आपण किती धोकादायक काम केले आहे, याचा विचार करून मनात अपराधीपणाची भावना येते, असे त्यांचे म्हणणे आहे.
गुगल सोडल्यानंतर MIT (Massachusetts Institute of Technology)ने त्यांची एक मुलाखत घेतली. त्यात त्यांनी मांडलेले काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यापैकी काही -
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
१) ज्या मूळ तत्त्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभे आहे, ते ‘Large Language Model’ हे भव्य ‘Neural Networks’वर उभारलेले आहे. मानवी मेंदूच्या तुलनेत हे मॉडेल अजून छोटे आहे. आपल्या मेंदूत शंभर ट्रिलियन न्यूरल कनेक्शन्स असतात. लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये फक्त अर्धा ट्रिलियन न्यूरल कनेक्शन्स आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इथपर्यंत यायला वीस-तीस वर्षे लागली आहेत. पण हा प्रवास सरळ रेषेत नसून घातांक दराने झालेला आहे. काही वर्षांतच लार्ज लँग्वेज मॉडेलची न्युरल कनेक्शन्स मानवी मेंदूपेक्षा जास्त होतील आणि तिथून पुढे घातांक दराने वाढत जातील.
२) मानवी संस्कृती ही ‘विशेषीकरणा’(specialization)वर उभी आहे. कुठल्या तरी एकाच क्षेत्रात ‘विशेषीकरण’ असलेले आणि इतर क्षेत्रांमध्ये काहीही न कळणारे मानव आपल्या अवतीभोवती आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सिस्टीम तशा असणार नाहीत. एकच संगणक प्रणाली कोडिंग, रोगनिदान, अवघड गणिते सोडवणे, कायदेतज्ज्ञ वगैरे क्लिष्ट कामे किंवा इतर कुठलेही काम सहज व अचूकपणे करू शकेल. थोडक्यात, ती मानवी मेंदूला शक्य असणारी सगळी कामे करू शकेल. प्रत्येक मानवामध्ये ती सगळी कामे करण्याची क्षमता नाही.
३) सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम फक्त ‘लर्निंग’ करत आहे, पण जेव्हा एकापेक्षा अधिक सिस्टीम अस्तित्वात येतील, तेव्हा एका सिस्टीमने कमावलेले ज्ञान इतर हजारो-लाखो सिस्टीम्सला सहज शिकता येईल. कारण ते फाईल ‘कॉपी’ करणे याच्याइतके सरळ-सोपे असेल. मानवामध्ये ही क्षमता नाही. एका मानवाने कमावलेले ज्ञान वा अनुभव दुसऱ्यापर्यंत जसेच्या तसे पोहोचत नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
४) या सिस्टिम्स मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा अधिक बुद्धिमान होण्यासाठी फार थोडा वेळ उरलेला आहे. आणि ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. त्याची बुद्धिमत्ता घातांक दराने वाढत जाईल. एक दिवस या सिस्टीम मानवाला ‘कंट्रोल’ करू शकतील. मानवाला मिळणारी माहिती, त्याची विचारक्षमता आणि बऱ्याच गोष्टींवर तिचे ‘नियंत्रण’ येऊ शकते.
५) आतापर्यंतच्या संगणक प्रणाली एका साध्या तत्त्वावर बनलेल्या आहेत. त्या मानवाने दिलेल्या कमांड्स किंवा त्यांचा सिक्वेन्स पूर्ण करू शकतात. एकापेक्षा अधिक कमांड म्हणजेच subgoals हेसुद्धा यांत्रिकी पद्धतीने म्हणजेच सांगितले तितकेच पूर्ण करणाऱ्या सिस्टिम्स आता अस्तित्वात आहेत. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या subgoalsमध्ये बुद्धिमत्ता संचारेल आणि प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणाऱ्या प्रणाली अस्तित्वात येतील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्रांतीतील सर्वांत धोकादायक टप्पा असेल.
६) मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या सिस्टीम याआधी शक्यतो सरकारी पातळीवर बनवल्या गेल्या. त्यांच्यावर कायदेशीर नियंत्रणे आणण्यात आली. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सिस्टिम्स तशा नाहीत. या मुख्यत्वे नफ्यासाठी आसुसलेल्या कॉर्पोरेशन्सच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धात ‘आयबीएम’ने हिटलरला पद्धतशीरपणे नरसंहार करण्यासाठी अल्गोरिदम्स विकले होते, हे विसरून चालणार नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
या सिस्टिम्स ट्रम्प, पुतीन किंवा तत्सम हुकूमशहांना विकल्या जाऊ शकतात. आणि मग त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्यासाठीही होऊ शकतो.
एखादी मोठी फार्मा कंपनी जेव्हा एखाद्या असाध्य रोगावर औषध बनवते, तेव्हा नफा कमवणे, हेच तिचे मुख्य उद्दिष्ट असते. रोगाचे निवारण करण्यापेक्षा औषधाची विक्री वाढवणे, हा मुख्य हेतू असू शकतो. रोग निवारण झाले, तर औषध विकत कोण घेणार, असाही विचार असतो. त्यामुळे फक्त नफ्यासाठी व गुंतवणूकदारांच्या परतव्यासाठी काम करणाऱ्या ‘बिग कॉर्पोरेशन’च्या भरवशावर या सिस्टीम्स ठेवल्या जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी योग्य कायदे करावे लागतील. या कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार गरजेचा आहे. ते साध्य करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय घडवणार आहे, यासाठी मागच्या काही दिवसांत घडलेल्या दोन घटना समजून घेण्याची गरज आहे.
१) ड्रेक नावाचा एक प्रसिद्ध रॅप गायक आहे. अगदी त्याच्यासारखा हुबेहूब आवाज असलेले आणि त्याच्याच शैलीतले आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बनवलेले एक नकली गाणे इंटरनेटवर टाकण्यात आले. काही तासांतच ते व्हायरल झाले. सगळ्या महत्त्वाच्या ‘स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स’वर ते ‘ट्रेंडिंग’ होऊ लागले. कुणालाही हे गाणे नकली आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवले आहे, हे ओळखता आले नाही. काही तासांनी ड्रेक आणि त्याचे संगीत वितरित करणाऱ्या Universal Music Group या कंपनीने आक्षेप घेतल्यावर हे गाणे ‘स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स’वरून काढले गेले.
२) Sony World Photography Awards हा छायाचित्रांमधला एक फार महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. या वर्षी तो एका जर्मन छायाचित्रकाराला मिळाला. पण पुरस्काराची घोषणा झाल्यावर त्याने तो नाकारला. त्याचे कारण देताना त्याने सांगितले की, ते छायाचित्र त्याने काढलेलेच नाही. ते DALL-e नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बनवलेले आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराचे परीक्षकही जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असतात. पण त्यांना ते छायाचित्र नकली आहे, हे ओळखता आले नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
यात सगळ्यात महत्त्वाची बाब ही की, या दोन्ही घटनांमध्ये खरे काय ते उघड झाले आणि त्या अचंबित करणाऱ्या बातम्या बनल्या. पण अशा प्रकारे सत्य उघड न झालेल्या किती घटना घडत असतील आणि यापुढे घडत राहतील, त्यांचं काय करायचं?
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांचे पुढील काही प्रकारांत वर्गीकरण करता येईल -
१) फेक न्यूजचा प्रसार वाढेल
गेल्या काही वर्षांत छायाचित्र, चलत् च्चित्र (व्हिडिओ) इत्यादी संपादित करून उपलब्ध माहितीला चुकीच्या पद्धतीने सादर करणे, म्हणजेच ‘फेक न्यूज’ पसरवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. २०१७ साली ‘कॉलिन्स डिक्शनरी’ने ‘फेक न्यूज’ हा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केला होता. फेक न्यूज पसरवून आपले राजकीय अजेंडे पूर्ण करणे, हे जवळजवळ प्रत्येक देशांत दिसून येत आहे. आतापर्यंत फोटो व व्हिडिओ संपादित करणारे टूल वापरून हे साध्य केले जात असे, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाने फेक न्यूज अधिक प्रभावशाली रूप धारण करणार आहे.
मागच्याच महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेचे असे हुबेहूब छायाचित्र बनवण्यात आले की, कुणालाही ते खरे आहे की खोटे, हे ओळखता आले नाही. आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरून कुणाचेही ‘डीप फेक व्हिडिओ’ बनवता येऊ शकतील. त्यामध्ये आपल्याला हवे ते शब्द कुणाच्याही मुखी घालता येतील आणि हा व्हिडिओ ‘डीपी’ आहे, हे मानवी मेंदूला ओळखणे जवळजवळ अशक्य होईल. याची झलक मागच्या काही दिवसांपासून येते आहे.
२) आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोकांवर बरे-वाईट संस्कार करू शकेल
इन्स्टाग्राम, टिक टॉक, यू-ट्यूब इत्यादींमुळे वापरकर्त्यांच्या सवयीमध्ये आणि वागण्या-बोलण्यात फरक होतो आहे, हे बऱ्याच संशोधनाअंती दिसून येते आहे. पौगंडावस्थेत असलेल्या मुलामुलींमध्ये आपल्या शरीराविषयीच्या आणि सौंदर्याविषयीच्या कल्पना इन्स्टाग्राम, टिक टॉक वगैरे प्लॅटफॉर्म तयार करत आहेत, असे निष्कर्ष संशोधनातून पुढे येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार होणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ या समाजाला वेगळ्याच पातळीवर घेऊन जाऊ शकतात. हे फक्त आपले शरीर व सौंदर्य यांच्याविषयीच्या विचारांपुरते सिमित नाही. तुमच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक समजांना आकार देण्याचे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकेल. आणि हे तंत्रज्ञान ज्या शक्तींच्या ताब्यात राहील, त्यांना समाजावर नियंत्रण करणे अधिक सोपे होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
३) आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सायबर हल्ले वाढतील, आणि ते करणे सोपे होत जाईल
सायबर हल्ले ही आधुनिक समाजाची मोठी डोकेदुखी आहे. शत्रू राष्ट्रांवर सायबर हल्ले करून महत्त्वाची माहिती मिळवणे, आर्थिक नुकसान घडवणे इत्यादी प्रकार दिवस-रात्र सुरू असतात. सायबर हल्ले हे प्रत्यक्ष युद्धापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे खूप मोठे नुकसान घडवून आणले जाऊ शकते. भारतात नुकताच AIIMS हॉस्पिटलवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे झालेली आर्थिक आणि जीवितहानी याची माहिती सार्वजनिक झालेली नाही. पण ही हानी फार मोठी असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
काही वेबसाईट वापरताना ‘आपण बॉट नाही’, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही साध्या चाचण्या द्याव्या लागतात. त्यामध्ये छायाचित्रांत दाखवलेले गणित सोडवणे, काही छायाचित्रांमधील वेगळे चित्र ओळखणे किंवा क्लिक करून सिद्ध करणे की, मी बॉट नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून या चाचण्या सहज पार केल्या जाऊ शकतात. जगभरातील वेबसाईट बनवणाऱ्यांसाठी ही नवीन डोकेदुखी होणार आहे. आणि त्यामुळे खूप नकारात्मक परिणाम घडणार आहेत. भविष्यात सरकारला, खाजगी संस्थांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागणार आहे.
४) आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी क्षमतेपेक्षा अधिक बुद्धिमान आणि ताकदवान होण्याचा धोका
हा धोका सर्वांत अधिक अधोरेखित केला जातो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपात मानव एका अधिक बुद्धिमान आणि ताकदवान प्रजातीला जन्म देतो आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे न्यूरल कनेक्शन मानवी मेंदूच्या न्यूरल कनेक्शनपेक्षा अजून तरी बरेच कमी आहेत, पण त्यात वेगाने वाढ होते आहे. लवकरच ते मानवी मेंदूइतके होतील आणि ही प्रक्रिया तिथे थांबणार नाही. ती क्षमता दिवसेंदिवस वाढतच राहील.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मानवी मेंदूपेक्षा अधिक क्षमता असलेले, स्वतः विचार करू शकणारे आणि प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात कायम मानवी हिताचे निर्णय घेतील, याची शाश्वती नाही. त्या वेळी आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान असलेल्या आणि त्या बुद्धीत घातांक दराने वाढ होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम्सला थांबवणे मानवाला शक्य होणार नाही. त्यामुळे मानवी अस्तित्वापुढील धोका कित्येक पटीने वाढू शकतो.
मानवी उत्क्रांती जर समजून घेतली तर दिसून येते की, लाखो वर्षांपूर्वी जंगलात भटकणाऱ्या आणि आपल्यापेक्षा इतर ताकदवान प्राण्यांपासून स्वतःचा जीव वाचवत फिरणारा मानव प्राणी आज जगावर राज्य करतो आहे. आपल्या जीविताला धोका निर्माण करू शकणाऱ्या इतर सगळ्या प्राण्यांवर, वनस्पतींवर आणि निसर्गनिर्मित इतर शक्तींवर जसे अग्नी, जल, वायू इत्यादींवर मानवाने बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. असे म्हणता येईल की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सिस्टिम्स बनवून मानव प्राणी ते नियंत्रण आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान अशा सुपर प्रजातीकडे देऊ इच्छितो आहे. त्यामुळे पृथ्वीवरील आपले नियंत्रण धोक्यात येणार आहे.
या लेखात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होऊ शकणारे धोके अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या निदान सध्या तरी केवळ शक्यता असल्याने, त्या प्रत्यक्षात उतरतीलच असे नाही. तरीही हे संभाव्य धोके अधोरेखित करत राहणे आणि ते टाळण्यासाठी उपाययोजना करत राहणे, महत्त्वाचे आहे. या आधीसुद्धा मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करू शकणारे तंत्रज्ञान मानवाने निर्माण केले आहे. त्या तंत्रज्ञानाचा योग्य रीतीने वापर करणे, ही आपली जबाबदारी आहे, हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारचे तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेले, तर काय परिणाम होऊ शकतात, याच्या उदाहरणांनी आपला इतिहास काठोकाठ भरलेला आहे. त्यापासून आपण काय शिकतो आणि आपले भविष्य किती सुरक्षित करतो, यावर आपल्या म्हणजेच मानव प्रजातीचे भवितव्य अवलंबून आहे.
.................................................................................................................................................................
लेखक अमोल साळे संगणक अभियंता आहेत. अर्थशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान व त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
amoalsale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment